‘उमेद’च्या उत्पादनांची चव आता थेट मंत्र्यांच्या किचनमध्ये!
मुंबई: ‘महालक्ष्मी सरस’ हे केवळ प्रदर्शन नसून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाचे एक मोठे व्यासपीठ आहे, असे गौरवोद्गार काढत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी वांद्रे कुर्ला संकुल या ठिकाणी सुरू असलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट देऊन उत्पादनांची माहिती घेतली आणि ‘उमेद’ अभियानाच्या महिला उद्योजकांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवला.
पंतप्रधानांचा ‘लखपती दीदी’ संकल्प पूर्ण करणार
भेटीदरम्यान बोलताना ना. आठवले म्हणाले की, “पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी देशात १ कोटी ‘लखपती दीदी’ घडवण्याचा जो संकल्प केला आहे, त्याला बळकटी देण्याचे काम हे अभियान करत आहे. या संकल्पपूर्तीसाठी आपण सर्वशक्तीनिशी कार्य करणार आहोत अशी ग्वाही दिली. ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले.
नामदार जयकुमार गोरे यांच्या कार्याची स्तुती
या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन आणि ग्रामीण विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांबद्दल त्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. श्री. जयकुमार गोरे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यात ग्रामविकास विभागाचा पुढाकार कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
थेट मंत्र्यांच्या किचनमध्ये पोहचणार ग्रामीण चव
प्रदर्शनातील शुद्ध, गावरान आणि घरगुती पद्धतीने तयार केलेले मसाले, धान्य व इतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर ना. आठवले भारावून गेले. या प्रदर्शनातील उत्पादनांची चव आता थेट केंद्रीय मंत्र्यांच्या किचनमध्ये पोहोचणार असून, त्यांनी स्वत: काही उत्पादनांची खरेदी करत महिलांना प्रोत्साहन दिले.

