पुणे5- व्यसनमुकती ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून संबंधित विभागांनी तंबाखू, गुटखा आदी तत्सम मादकद्रव्याच्या सेवनाबाबत जनजागृती करावी, असे आवाहन मादकद्रव्य विरोधी विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी केले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी डॉ. केतकी घाटगे, हसीना मुजावर, दिलीप करंजखेले, प्रमोद पाटील, आशीष येनगंटीवार, डॉ. राहूल मणियार, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी सदस्य उपस्थित होते.
श्री. दोरगे म्हणाले, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील तसेच महापालिका हद्दीतील मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण आयोजित करावे, त्यांना शालेय परिसरात तंबाखू, गुटखा आदी तंबाखूजन्य पदार्थ विक्रीबंदी बाबत माहिती द्यावी, शालेय परिसरात पानस्टॉल, पानटपरी असतील तर त्यावर कारवाई करण्यात यावी. एस.टी तसेच पीएमपीएलच्या वाहनचालक तसेच वाहकांना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत माहिती द्यावी. बचतगट, फेरीवाल्यांच्या संघटनांनाही या कायद्याबाबत व तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल माहिती द्यावी.
13 मे रोजी तंबाखूविरोधी दिन असून त्यानिमित्ताने जाणीवजागृतीचे कार्यक्रम घेण्यात यावे. तंबाखूमुक्त गणेशोत्सव आयोजनाबाबत गणेश मंडळ प्रतिनिधींना भेटून त्यांचे सहकार्य घ्यावे, असे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यात विविध आयटीकंपन्या आहेत,त्यांचे स्मोकींग झोन आहेत, मात्र काही कर्मचारी पानटपरीवर अथवा चहाटपरीवर येऊन धूम्रपान करतात, त्यावर कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. बैठकीत विविध सदस्यांनी आपल्या सूचना मांडल्या.