Home Blog Page 314

काँग्रेसची मनसेसोबत आघाडीला ठाम नकार:ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचा स्पष्ट इशारा, कोणत्याही परिस्थितीत मनसेबरोबर जाणार नाही

संगमनेर-आगामी मुंबई महापालिका तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अशातच काँग्रेसकडून मोठा राजकीय संदेश देण्यात आला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर, आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही स्पष्ट भूमिका मांडली आहे. काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नाही, असे थोरात यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे मनसेसोबत संभाव्य आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम लागल्याचं स्पष्ट दिसत आहे.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावेळी, संगमनेर येथील त्यांच्या कार्यालयात बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत थोरात यांनी कार्यकर्त्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत अनेक गैरसमज दूर केले. मी नगर आणि नाशिक वेगळं मानत नाही, त्यामुळे कार्यकर्ते माझ्याकडे येत असतात. नाशिक येथे झालेल्या बैठकीत सीपीआयच्या प्रतिनिधींनी मला आमंत्रण दिलं होतं. तिथे कोण कोण उपस्थित राहणार आहे, हे मला माहीत नव्हतं, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. माध्यमांमध्ये झालेल्या चर्चेबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं की, मीडियाने वेगळा अर्थ लावू नये. हर्षवर्धन सपकाळ हे आमचे प्रांत अध्यक्ष आहेत, आम्ही नेहमीच एकत्र काम केलं आहे आणि पुढेही करत राहू.

बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट सांगितलं की, काँग्रेसचा निर्णय ठाम आहे, मनसेबरोबर कोणतीही आघाडी होणार नाही. त्यांच्या या वक्तव्याने काँग्रेसची निवडणूक रणनीती अधिक स्पष्ट झाली आहे. गेल्या काही दिवसांत मनसे आणि काँग्रेसच्या संभाव्य सहकार्याबाबत अफवा पसरल्या होत्या. मात्र, थोरात यांच्या भूमिकेमुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं संकेत आता अधिक ठळकपणे मिळत आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावर आंबेडकरी कार्यकर्त्यांचा मोर्चा

पुणे- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या कार्यालयावर आंबेडकरी संघटनांनी मोर्चा काढला . ‘राज्याचं सरकार हे आंबेडकरी समाजाची फसवणूक करतंय’, असा थेट आरोप आंदोलकांनी केला आहे. पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे (Ambedkar Sanskrutik Bhavan) विस्तारीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ही जागा एका खाजगी बिल्डरच्या कंपनीला दिल्याचा आरोप करत, ‘ही जागा आमची आहे’ अशा आशयाचे फलक घेऊन आंदोलकांनी मोहोळ यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. पोलिसांनी आंदोलकांना अडवले, या प्रश्नी तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ स्फोट, 8 जणांचा मृत्यू:

0

दिल्ली- सोमवारी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारचा अचानक स्फोट झाला. आग इतक्या वेगाने पसरली की जवळच उभ्या असलेल्या तीन कारही जळून खाक झाल्या.या अपघातात एकाचा मृत्यू झाला. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की स्फोटाचे कारण तपासले जात आहे.पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी उपस्थित आहे. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बाणेर मध्ये’फार्म कॅफे’ शेतातल्या हुक्का बारवर छापा

पुणे- बाणेर येथे अनाधिकृतपणे शेतात चालु असलेल्या हुक्का बारवर कारवाई करुन पोलिसांनी ४८६५०/-रु. किं.चा मुददेमाल केला जप्त केला . आणि जागा मालक याच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल केला .
चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर हद्दीमध्ये दिनांक ०८/११/२०२५ रोजीचे कॉम्बींग ऑपरेशन मोहिमेदरम्यान तपास पथक मधील स्टाफ व पोलीस अधिकारी यांना माहिती मिळाली की, फार्म कॅफे, सर्वे नं.२२४, औंध बाणेर लिंक रोड, बाणेर पुणे ४५ येथील शेतामध्ये अनाधिकृतपणे हुक्का बार चालु आहे त्यामुळे त्यांनी या ठिकाणी जावुन मिळालेल्या बातमीची खात्री करुन सदर ठिकाणी छापा टाकला . या कॅफेमध्ये ग्राहकांना धुम्रपानासाठी अवैधरीत्या तंबाखुजन्य हुक्का पुरवुन व जवळ बाळगुन हुक्का बार चालवित असताना मिळुन आल्याने एकुण ५ आरोपी विरुध्द त्यामध्ये जागा मालक व मॅनेजर व कामगार यांचेविरुध्द चतुः श्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर, गु.र.नं.४४७/२०२५, सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम- २०१८ चे कलम ४ (अ), २१ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यामध्ये २० हुक्का पॉट, तबाखुजन्य हुक्का फलेवर व इतर साहित्य असा एकुण-४८,६५०/-रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेच दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा सहा. पो. निरीक्षक अनिकेत पोट चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत.
तसेच सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त,मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४ पुणे शहर सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त, विठठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती आश्विनी ननावरे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी, सहा.पो.निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार बाबासाहेब दांगडे, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, वाघेश कांबळे, तुषार गिरंगे यांनी केली आहे.

३ दिवसात पोलिसांनी पकडले २५० मद्यपी वाहनचालक

पुणे -शहरपोलीस उपायुक्त कार्यालय वाहतूक शाखेने मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहिम हाती घेऊन ३ दिवसात अडीचशे मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांन पकडले आणि त्यांच्यावर कारवाई केली .

पुणे शहर वाहतूक विभागामार्फत दिनांक ७, ८ व ९ नोव्हेंबर २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष कारवाई मोहिम राबविण्यात आली.या कालावधीत वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख चौक, मार्ग व गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली. या विशेष मोहिमेत २५० वाहनचालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याचे आढळून आले.संबंधित सर्व वाहनचालकांवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम १८५ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, त्यावरील पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि,’मद्यपान केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे वाहन चालवू नये.स्वतःची तसेच इतर नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे.जबाबदार नागरिक म्हणून सुरक्षित वाहतूक संस्कृती जोपासावी.पुणे शहर वाहतूक विभागाकडून अशा विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार आहेत, जेणेकरून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि सर्वांसाठी सुरक्षित वाहतूक वातावरण निर्माण व्हावे.

‘वर्षा’ बंगल्यावर धडक…मरीन ड्राईव्हवर रास्ता रोको, गिरगाव चौपाटीवर आंदोलन-डॉ. संपदा मुंडेंना न्याय देण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेस आक्रमक.

मुंबई, दि. १० नोव्हेंबर २०२५

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी युवक काँग्रेसने मुंबईत आज तीव्र आंदोलन केले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर थेट धडक दिली. नरीमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह व वर्षा बंगला अशा तीन ठिकाणी युवक काँग्रेसने आंदोलन करून भाजपा महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व मुंबई युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदन भानू चिब, युवक काँग्रेसचे प्रभारी मनिष शर्मा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झीनत शबरीन, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश शर्मा, वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत, युवक काँग्रेसचे प्रभारी अजय चिकारा यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

गिरगाव चौपाटी येथून सुरु झालेले आंदोलन थेट वर्षा बंगल्यावर पोहचले. युवक काँग्रेसचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी सरकारने पोलिसांच्या मदतीने प्रयत्न केला. अनेक कार्यकर्त्यांना चर्नी रोड स्थानकात अडवून ठेवले. गिरगाव चौपाटी भागातही ठिकठिकाणी बॅरिकेटींग करून कार्यकर्त्यांची धरपकड केली. पण आक्रमक कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियमजवळ मरिन ड्रायव्हवरच रास्ता रोको केला, यामुळे जवळपास अर्धा तास वाहतुक ठप्प झाली होती. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले पण युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तन्वीर अहमद विद्रोही, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रविणकुमार बिराजदार आणि नागपूर ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिथिलेश कान्हेरे यांनी मात्र पोलिसांना गुंगारा देऊन वर्षा बंगल्यावर धडक मारली व जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासह सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले.

डॉ. संपदा मुंडे यांना भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व पोलीसांच्या अनन्वित छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असली तरी यामागचा मुख्य सुत्रधार भाजपाचा माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर मात्र अद्याप मोकाटच आहे. मुख्यमंत्र्यांनी तर निंबाळकरांना कोणत्याही चौकशी आधीच क्लिन चिट देऊन टाकली आहे. काँग्रेस पक्षाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुंडे कुटुंबियांना दिली आहे. सरकार चौकशीच्या नावाखाली मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण जोपर्यंत संपदा मुंडे यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा हा लढा सुरुच राहील.

लिफ्टमध्ये अडकलेल्या जखमी महिलेला मदत न केल्याने पोलिसांनी मॉल प्रशासनाविरुद्ध केला गुन्हा दाखल

0

पुणे-गणेशखिंड रोडवरील एका मॉलमधील लिफ्टमध्ये अडकलेल्या जखमी महिलेला मदत न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सेंट्रो मॉलच्या प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शिवाजीनगर येथील एका ५५ वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सतप्रित आवस्थी, परवेंदर कुमार, पराग हार्डे, अभिजित कोल्हटकर या मॉलचे प्रशासकीय अधिकारी  व लिफ्टची देखभाल करणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सेंट्रो मॉलमध्ये १२ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजेच्या दरम्यान घडला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर येथे राहणार्‍या महिला त्यांच्या दोन नातेवाईकांसह दिवाळीनिमित्त खरेदीसाठी गणेशखिंड रोडवरील सेंट्रो मॉलमध्ये गेल्या होत्या.  लिफ्टमधून जात असताना अचानक लिफ्ट बंद पडली. महिला आणि नातेवाईक लिफ्टमध्ये अडकले. त्यांनी लिफ्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महिलेबरोबर असलेल्या एका नातेवाईकाने लिफ्टच्या काचेवर हात मारला. काचेचा तुकडा उडल्याने महिलेच्या कपाळाला जखम झाली. महिला जखमी झाल्यानंतर लिफ्टची देखभाल करणारे कर्मचारी आणि मॉलच्या प्रशासन विभागातील अधिकारी, कर्मचारी तेथे आले नाही, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.निष्काळजीपणा, तसेच हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

शाहू वसाहती’चाआता स्वयंपुनर्विकास होणार !उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून’ एसआरए’ला स्थगिती, नागरिकांना दिलासा

पुणे-
ज्यावेळी नागरीक एकत्र येतात आणि लढा देतात, त्यावेळी यश कसे मिळते याचा प्रत्यय पर्वतीमधील शाहू वसाहतीच्या झोपडपट्टी पुनर्वसनाला थेट उपमुख्यमंत्री व गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिल्याने आला आहे. आता ‘शाहू वसाहती’ची एसआरए रद्द आणि स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया अखिल शाहू वसाहती मार्फत देण्यात आली.

याबाबत अधिक माहिती देताना अखिल शाहू वसाहत बचाव कृती समितीचे कार्तिक ढमढेरे म्हणाले की, पर्वती येथील स. नं. ९२ पैकी फायनल प्लॉट नं. पै. व स. नं. ९३ पैकी फायनल प्लॉट न. ५११ पैकी ५११ अ . पै. ५११ ब पै.येथे गेल्या पन्नास वर्षांहून अधिक नागरिक वास्तव्यास असून येथील घरे ही पक्की स्वरूपाची असून दुमजली आहेत. मात्र एका बिल्डर्ससाठी एसआरए स्कीम राबविण्यासाठी झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररीत्या झोपडपट्टी पुनर्वसन योज़ना राबविण्याचा घाट घातला. त्यासाठी बिल्डर्सचे लोक आणि संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने आम्हा रहिवाशांना धमकाविण्याचे प्रकार वारंवार झाले. आमचा येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला विरोध आहे,आणि आम्ही तसे स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेले असताना अधिकारीवर्ग संबंधित बिल्डर्सचा स्वार्थ आणि टीडीआरमधील भ्रष्टाचारासाठी दहशतीचे वातावरण निर्माण करून आम्हाला येथील एसआरए योजनेत सामील होण्यासाठी भाग पाडण्याचे कारस्थान करीत होते. इतकेच नाहीतर संबंधित बिल्डर्स / विकसक आणि अधिकाऱ्यांनी येथील रहिवाशांचा एसआरए योजनेत समावेशाबाबत खोट्या सह्या दाखविल्या. त्यामुळे अखिल शाहू वसाहतीचे सर्व नागरिकांनी एसआरएला तीव्र विरोध दर्शवत लढा उभारला. सामाजिक कार्यकर्ते हेमंत बागुल यांनी पाठिंबा देत शासनदरबारी दाद मागण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन केले. त्यानुसार उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नागरिकांच्या व्यथा मांडताना दाद मागितली.त्यावर तत्परने सर्व बाबी तपासून शाहू वसाहतीमधील नागरिकांवर अन्याय होणार नसल्याची ग्वाही देत उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ एसआरए’ला स्थगिती दिल्याचे आदेश काढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता आम्हीच ‘शाहू वसाहती’चा स्वयंपुनर्विकास करणार असल्याचे अखिल शाहू वसाहत बचाव समितीने स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून विभागनिहाय प्रभा-यांची नियुक्ती

ज्येष्ठ नेत्यांवर विभागीय प्रभारी म्हणून जबाबदारी

मुंबई दि. १० नोव्हेंबर २०२५

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने या निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्येष्ठ नेत्यांची विभागीय प्रभारी म्हणून नियुक्ती आहे.

नागपूर विभागाची जबाबदारी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वड्डेटीवार यांच्याकडे, पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे सोपवली आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र, अॅड. यशोमती ठाकूर यांच्याकडे अमरावती विभागाची, मराठवाडा प्रभारी म्हणून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची तर कोकण विभाग प्रभारी म्हणून माजी मंत्री काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

पार्थ पवार जमीन घोटाळा :हिंमत असेल तर तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात चौकशी करा, नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात चौकशी समिती गठित करावी, असे आव्हान कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केले आहे.नाना पटोले म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी विकास खरगेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आहे. या पद्धतीच्या चौकशीचा आणि कमिटीचा फार्स करून जनतेची जी दिशाभूल चाललेली आहे. महाराष्ट्र रोज लुटण्याचे काम सुरू आहे. तुमच्यात खरोखरच हिंमत असेल आणि दूध का दूध, पाणी का पाणी करायचे असेल तर तुकाराम मुंढेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी बसवा, असे आव्हान केले आहे.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, पार्थ पवारांच्या 1800 कोटींच्या जमीन घोटाळ्यात औद्योगिक नवीन धोरण आणायचे आणि स्टॅम्प ड्युटी वाचवण्याचे धोरण ही फक्त एक पद्धत आहे. मुंबई आणि बीकेसी मधील 500 एकर पेक्षा अधिक जमीन, सी लिंकच्या बाजूची जमीन, रस्ते विकास महामंडळाची जमीन, या सगळ्या जमिनी कशा आणि काय भावाने दिल्या? नवी मुंबईचे मार्केट यार्ड होते, ती जमीन मोदीजींच्या मित्रांना आयटी पार्कच्या नावाने देण्यात आली. असे सगळे सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की ही गंभीर बाब आहे.महाराष्ट्रात अशा अनेक प्रकारच्या जमीन घोटाळ्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याची चौकशी बसवण्याची गरज नाही, ते कागदावरच स्पष्ट होते. शासन तुम्ही चालवत आहात, सरकार तुम्ही चालवत आहात, अशा वेळेस चौकशी बसवायची गरजच काय? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील मुंढव्यातील 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये लाटण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी असलेली 21 कोटींची स्टँप ड्युटीही भरली नाही. हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. यावरून नाना पटोले यांनी टीका केली आहे.

बकवास बंद करा, उत्तर द्या!:आरएसएस रजिस्टर्ड आहे का? निधी कुठून येतो? प्रकाश आंबेडकरांचा संघावर हल्लाबोल

जालना -वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयं सेवक संघावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत संघाला उद्देशून तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. आरएसएस रजिस्टर्ड संस्था आहे का? नसेल, तर इतके फंडिंग कसे काय मिळत आहे? तसेच संघाने भारतीय तिरंगा स्वीकारला नव्हता, हे खरे आहे की खोटे? असा सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.

प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत म्हटले की, इकडची तिकडची बकवास बंद करा आणि माझ्या तीन प्रश्नांचे उत्तर द्या. आरएसएस ही नोंदणीकृत संघटना आहे का? जर ती नोंदणीकृत नसेल, तर तिला कोट्यवधी रुपयांचा निधी कसा मिळत आहे? हे खरे नाही का की आरएसएसने भारतीय ध्वज स्वीकारला नाही? हे खरे नाही का की आरएसएसने अनेक दशकांपासून नागपूर येथील मुख्यालयात तिरंगा फडकवला नाही? हे खरे नाही का की गोळवलकर आणि सावरकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले समतावादी, लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष संविधान नाकारले आणि मनुस्मृतीला संविधान बनवण्याची मागणी केली? असे प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केले आहेत.

वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आता आरएसएस आणि मनुवादी शक्तींना तोंड देण्यासाठी एकत्र आले आहेत. तुम्ही आणि तुमच्या अर्ध्या अंतर्वस्त्रांच्या टोळीने एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, आपला देश मनुस्मृतीने नव्हे तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाने चालेल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आज प्रकाश आंबेडकर यांची जालना येथे जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. आज धर्म नव्हे तर ओबीसी धोक्यात आहेत. ओबीसी सत्ताधारी झाल्याशिवाय आरक्षण वाचणार नाही. ओबीसींच्या राजकीय लढ्याला सुरुवात झाली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. जालना येथे जाहीर सभेत ते बोलते होते. जरांगे मुंबईत ठिय्या मांडून बसले आणि कॉंग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे 190 आमदार जरांगेंच्या दर्शनाला गेले. हेच आमदार देवेंद्र फडणवीस यांना भेरले तशी फडणवीस यांची भाषा बदलली, अशी टीका आंबेडकरांनी केली आहे.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, जे आमदार जरांगे यांना भेटले तेच आमदार जरांगे काय म्हणतात ते ऐकण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सल्ला दिला आणि कुणबी प्रमाणपत्राचा जीआर निघाल, असा आरोप आंबेडकरांनी केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हा जीआर रद्द करणार आहेत का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर म्हणाले, ओबीसींनी मोठ्या प्रमाणात आपले उमेदवार जाहीर केले पाहिजेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये एक तरी ओबीसी मतदार असायला हवा. काही मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी राखीव आहेत. काही मतदारसंघ एसटीसाठी राखीव आहेत. एसी आणि एसटी हा वर्ग आरक्षणवादी आहे. हे लक्षात घ्यायला हवे. जे लोक आरक्षणवादी आहेत, त्यांनाच मतदान करायला हवे. आपल मत हे ओबीसीला, आपले मत हे एसटीला असायला हवे, असे आवाहन आंबेडकरांनी केले आहे.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, धर्म नाही तर ओबीसी संकटात आला आहे. ओबीसी सत्ताधारी झाल्याशिवाय आरक्षण वाचणार नाही. ओबीसी नेत्यांच्या नाड्या तिसऱ्याच्या हातामध्ये आहेत. कळसूत्री बाहुल्याप्रमाणे हे ओबीसी नेते नाचवले जात आहेत, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी ओबीसींनी राजकारणात उतरावे, असेही आवाहन केले आहे.

रुपाली पाटलांना शिवसेना ठाकरे गटाकडून खुली ऑफर; आम्ही स्वागत करू – सुषमा अंधारे

पुणे-राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्तेपदावरून रूपाली ठोंबरे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांची हकालपट्टी झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून थेट ऑफर आली आहे. रुपाली ठोंबरे यांनी शिवसेनेत यावे, आम्ही त्यांचे स्वागत करू, अशी ऑफर सुषमा अंधारे यांनी दिली आहे.सुषमा अंधारे म्हणाल्या, रूपाली ठोंबरे ही माझी चांगली मैत्रीण आहे आणि ती राहील. तिला कोणतीही भीती नाही, ईडी किंवा सीबीआयचा तिला बॅरेज नाही. सर्वार्थाने ती अतिशय क्लीन इमेज असलेली व्यक्ती आहे. अशी महिला कोणत्याही पक्षात येणे कोणालाही आवडेलच. त्यांनी शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त करावी, आम्ही त्याचे स्वागत करू. पण माझ्या पक्षात ती यावी म्हणून तिच्या त्या पक्षात नुकसान व्हावे असा विचार करणारी मी नाही. जर तिच्या पक्षात तिला स्कोप मिळत असेल तर तिने तिथे काम करावे, असा सल्ला देखील अंधारे यांनी दिला आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे यांना वगळण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत वाद सुरू होते. रूपाली चाकणकर आणि रूपाली ठोंबरे पाटील यांच्यात देखील वाद सुरू आहेत. याचाच फटका रूपाली ठोंबरे यांना बसला असल्याचे बोलले जात आहे. तसेच भाजपवर सतत टीका करणाऱ्या अमोल मिटकरी यांना देखील प्रवक्ते पदावरून वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे मारहाण प्रकरणातील सुरज चव्हाण यांना प्रवक्तेपद पुन्हा देण्यात आले आहे.

भाविकांसाठी उत्कृष्ठ दर्जाच्या सेवा – सुविधा तयार करा : : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमंदिर परिसरात अत्याधुनिक एकात्मिक सुरक्षाप्रणाली विकसित करा

श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री क्षेत्र औंढा नागनाथ व श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखडा बैठक

मुंबई,दि.१० : राज्यातील ज्योतिर्लिंगाना वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक भेट देतात हे लक्षात घेवून श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री क्षेत्र औंढा नागनाथ व श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा सर्वसमावेशक विकास आराखडा असावा.मंदिर परिसरातील सुरू असलेली कामे गतीने करून प्रस्तावित कामांचे योग्य नियोजन करा.या परिसरात भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी अत्याधुनिक एकात्मिक सुरक्षाप्रणाली कार्यरत करून भाविकांसाठी उत्कृष्ठ दर्जाच्या सेवा सुविधा तयार करण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

वर्षा निवासस्थान येथे पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर, हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास सादरीकरणाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग व्ही.राधा,वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, .नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणू गोपाल रेड्डी,सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल या बैठकीला उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी येणा-या सध्याची भाविकांची व भविष्यातील संख्यानुसार दर्शन रांगांचे नियोजन, यात्रा उत्सव कालावधी हे लक्षात घेवून मंदिर परिसरात प्रतिक्षा कक्ष,पिण्याच्या पाण्याची सोय, निवासाची व्यवस्था, अंतर्गत रस्ते, परिसर साफसफाई करणे, माहिती फलक, पर्यटक स्वागत कक्ष, पार्कींग व्यवस्थापन, आपत्कालीन यंत्रणा, तिकीट कक्ष, आरोग्य सुविधा, उपहारगृह यासह पर्यटन वाढीला चालना देणारे उपक्रम या भागात प्रामुख्याने राबवा.स्थानिक नागरिक व प्रशासनाला विचारात घेवून येथील कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था काटेकार असावी यासाठी खबरदारी घेण्यात यावी.अत्याधुनिक यंत्रणा तसेच कृत्रिम बुध्दीमत्तेच्या सहाय्याने एकात्मिक सुरक्षा प्रणाली विकसित करा.जेणेकरून तात्काळ आपत्कालीन परिस्थीतीत नागरिकांना मदत मिळेल.मंदिर व्यवस्थापनासाठी काटेकोर नियम असणे गरजेचे आहे.पर्यावरण संवर्धन व रोजगार निर्मितीसाठी पर्यटन विभागानेही येथील प्रस्तावित कामे गतीने करावीत.आज सादर झालेल्या आराखड्यांना उच्चस्तरीय समितीकडून मंजूरीनंतर निधी मिळेल.पुरातत्व विभागाकडून घेण्यात येणा-या मंजुरीसाठी केंद्र शासनाच्या अधिका-यांसोबत एक वेगळी बैठक आयोजित करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

राज्यातील ज्योतिर्लिंगाच्या विकास आराखड्याची प्रभावी व तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी नियुक्त असलेले अधिकारी यांनी यावेळी विकास आराखड्यांचे सादरीकरण केले. पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा व श्री क्षेत्र भीमाशकर विकास आराखडा कुंभमेळा २०२७ चे सादरीकरण सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा, हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथचे सादरीकरण वित्त विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागला, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर विकास आराखडा सादरीकरण अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी केले.

या बैठकीला नियोजन विभागाचे प्रधानसचिव सौरभ विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के. एच. गोविंदराज, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, वित्त विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागला, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, पर्यटन विभागाचे सचिव संजय खंदारे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह,सचिव बांधकामे आबासाहेब नागरगोजे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव अप्पासाहेब धुळाज नाशिक – त्रंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग दूरदृश्यप्रणालीव्दारे नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम,पुणेचे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकात पुलकंडवार,छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर इतर विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळवणुकीस प्रतिबंधासाठी अंतर्गत समिती स्थापन करणे अनिवार्य -जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

पुणे, दि.10: कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, 2013 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी कार्यालयांमध्ये, ज्या ठिकाणी १० किंवा त्याहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, अशा सर्व कार्यालयांमध्ये अंतर्गत समिती (विशाखा समिती) स्थापन करणे बंधनकारक आहे.

अंतर्गत समिती स्थापन न करणाऱ्या संबंधित कार्यालय प्रमुख किंवा मालक यांच्यावर 50,000 रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तसेच संबंधित कार्यालयाचे नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवाना रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. महिलांच्या लैंगिक छळवणुकीबाबत online तक्रार नोंदविण्यासाठी भारत सरकारने https://shebox.wcd.gov.in हे संकेतस्थळ सुरु केलेले आहे. या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींवर योग्य कार्यवाही होण्यासाठी सर्व खाजगी आस्थापनांनी त्यांच्या अंतर्गत समित्यांची ऑनलाइन नोंदणी “Private Head Office Registration” या विभागात करणे आवश्यक आहे.

सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांनी त्यांच्या अंतर्गत समिती स्थापन केल्याबाबतच्या आदेशाची प्रत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे यांना lcpune2021@gmail.com (एल सी पुणे 2021) या ईमेलवर पाठवावी आणि सर्व खाजगी आस्थापणांनी त्यांच्या अंतर्गत समित्यांची SHe-Box Portal वर नोंदणी देखील करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची कार्यवाही सुरळीत सुरु,अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विजयसिंह देशमुख यांचे आवाहन

पुणे, दि. 10 नोव्हेंबर: मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत “महामंडळाचे कामकाज बंद झाले आहे, व्याज परतावा थांबविण्यात आला आहे” अशा प्रकारच्या निराधार अफवा काही व्यक्तींकडून सोशल मीडियासह विविध माध्यमांतून पसरवल्या जात आहेत. या अफवांना कोणतेही तथ्य नसून, महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम वगळता इतर रार्व कामकाज सुरळीतपणे सुरु असल्याची माहिती विजयसिंह देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

महामंडळाच्या वेब प्रणालीचे दि. १० ऑक्टोबर पासून अपग्रेडेशनचे काम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये वेब प्रणालीचे Security Audit प्रलंबित होते ते पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत, महामंडळाने स्वतः हुन एलओआय (LOI) व बँक सेक्शन (Bank Sanction) या दोन सेवा अधिसुचित केल्या आहेत. या नुसार या सेवा १५ कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत देण्याचे बंधन महामंडळाने स्वतः वर घालून घेतले आहे. याबाबत आवश्यक ते बदल वेब प्रणालीमध्ये करणे सुरु आहे. एजंटमार्फत लाभार्थ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबावी यासाठी म्हणून महामंडळाने CSC केंद्रांद्वारे फक्त ७० रुपयांत सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी MOU केला आहे. त्यास अनुषंगाने वेबप्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरु आहे. लाभार्थ्यांना महामंडळाच्या सर्व सेवा थेट मोबाईलद्वारे देता याव्यात म्हणून मोबाईल ॲप विकसित होत आहे. यासाठी वेवप्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करणे सुरु आहे. राज्यात विविध ठिकाणी एजंटमार्फत लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने, सद्यस्थितीत नाशिक व अहमदनगरमध्ये संबंधितांवर फौजदारी गुन्हे नोंद केले गेले आहेत. असे प्रकार घडू नयेत यासाठी वेब प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरु आहे. राष्ट्रीयकृत बँका सोबत बँक API एकत्रीकरण सुरु असून, लाभार्थ्यांना सुरळीत व सहजपणे व्याज परतावा मिळणार आहे. चॅट जीपीटी स्मार्ट बोट (Chat GPT Smart Bot) प्रणाली विकसित करण्यात आली आहे, जी लाभार्थ्यांना महामंडळाच्या योजनांबाबत मार्गदर्शन व माहिती देईल. योजनांतर्गत काही असे व्यवसाय निदर्शनास आले आहेत की, त्यामधून अपेक्षित स्वयंरोजगारनिर्मिती होत नाही अशा व्यवसायांबाबतचा अंकेक्षणाबाबत योग्य निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेणे प्रस्तावित आहे. तसेष मराठा समाजातील युवकांसाठी नवीन व्यवसाय कसे निर्माण करता येऊ शकतील? ही बाब विचाराधीन आहे. लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन वेबीनार च्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम देखील सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी व्याज परताव्याकामी लाभार्थ्यांना एका वेळेस कमाल ३ क्लेम सादर करता येत होते. मात्र सद्यस्थितीत लाभार्थ्यांना एका वेळेस कमाल ६ क्लेम सादर करता येत आहेत.

तरी कोणत्याही प्रकारच्या राजकीय, दिशाभूल करणाऱ्या किंवा अफवांवर आधारीत माहितीवर विश्वास ठेवू नये असेही श्री. देशमुख यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.