Home Blog Page 312

‘नोकरी द्या, नाहीतर भत्ता द्या’; NSUI चे राज्यभर अभियान.

वोटचोरीबरोबर भाजपाचे सरकार नोकरी चोरही निघाले, कुठे गेले वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन?: हर्षवर्धन सपकाळ.

मुंबई, दि. १२ नोव्हेंबर २०२५

भाजपा महायुती सरकारच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण प्रंचड वाढले असून सरकारी नोकर भरतीही केली जात नाही. निवडणुकीत महायुतीने तरुणांना नोकरी, शिष्यवृत्ती देण्याबरोबरच अनेक आश्वासने दिली पण त्यातील एकही पूर्ण केले नाही. भाजपा महायुतीने तरुणांची फसवणूक केल्याने NSUI ने आक्रमक भूमिका घेतली आहे. नोकरी द्या नाहीतर भत्ता द्या, अन्यथा राजीनामा द्या, हे अभियान NSUI राज्यभर चालवणार आहे.

टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत या अभियानाची माहिती देण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, सहप्रभारी बी. एम. संदीप, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य नसीम खान, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, NSUI चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके आदी उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येताना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते पण सत्तेत आल्यानंतर त्यांनी या नोकऱ्या तर दिल्या नाहीतच उलट १८ कोटी नोकऱ्या घालवल्या. भाजपा सरकारने तरुणांची घोर फसवणूक केली असून वोटचोर सरकार आता नोकरी, रोजगारचोर आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली. नोकरी, रोजगाराचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा असून या अभियानात केवळ काँग्रेस पक्षातीलच नाहीतर इतरांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

या अभियानाची माहिती देताना एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने निवडणूकीच्यावेळी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते, १० हजार रुपये बेरोजगार भत्ता, अप्रांटिशशिप देण्याचे आश्वासनही दिले होते पण भाजपा सरकारने आश्वासन पाळले नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही मिळत नाही. उच्च शिक्षण घेतलेल्या तरुण तरुणांना नोकरी मिळत नाही म्हणून एनएसयुआय राज्यभर हे आंदोलन राबवून भाजपा सरकाला जाब विचारणार आहे, असे साळुंके म्हणाले..

३७ कि.मी.लांबीच्या रस्त्यांसाठी ९८२ कोटी खर्च

पुणे- दि.१२/११/२०२५- पुणे महापालिका ३७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी ९८२ कोटी रुपये खर्च करत असून यातील १२ किमी रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याची माहिती येथे महापालिकेच्या वतीने देण्यात आली .एकूण १९ कामात ३७ किमी चे रस्ते होणार असून त्यात कॉक्रीट रस्ता, डीवायडर, फुटपाथ, पावसाळी लाईन ड्रेनेज लाईन, स्ट्रीट पोल चा समावेश आहे. रुंदीकरणातील जागा ताब्यात घेण्यासाठी TDR चा वापर करण्यात येणार आहे.

पुणे महानगरपालिकेने शहरातील प्रमुख रस्ते तसेच पुल पीपीपी तत्वावर खाजगी सहभागातुन डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या मोबदल्यामध्ये विकसित करण्याचा निर्णय यापुर्वी घेतलेला आहे. त्यानुसार अंदाजपत्रकीय तरतुदीमध्ये पीपीपी तत्वावर करावयाच्या डी.पी. रस्त्याची व पुलांची नावे मान्य आहेत. यापैकी ज्या कामाना पीपीपी तत्वावर प्रतिसाद मिळु शकतो याबाबत विचार विनीमय होऊन महापालिका आयुक्त यांच्या मान्यतेने तसेच स्थायी समिती ठराव क्र. 936 दि.05/01/2021 मान्यतेने पीपीपी तत्वावर रस्ते व पुल विकसित करण्याच्या धोरणास आणि त्यानुसार संबंधित कानास विहित मान्यता यापुर्वी प्राप्त झालेली आहे. त्याअनुषंगाने पुणे शहरातील विविध रस्ते व पूल पी.पी.पी. तत्वावर विकसित करण्यासाठी कामे हाती घेण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि.) ओमप्रकाश दिवटे यांचेकडून या कामांबाबत आढावा बैठक आज दि. १२/११/२०२५ रोजी घेण्यात आली.
पुणे शहरात पीपीपी तत्वावर एकूण १९ कामे प्रस्तावित असून त्यांची एकूण रक्कम रुपये सुमारे ९८२ कोटीची कामे सुरु आहेत. सदरची कामे प्रामुख्याने खराडी, मुंढवा, लोहगाव, महंमदवाडी, कोंढवा, बावधान, बाणेर, कात्रज इ. भागामधील आहेत. सदर १९ कामामधून सुमारे ३७ कि.मी. लांबीची रस्त्याची कामे करण्यात येणार आहे. या कामामध्ये कॉक्रीट रस्ता, डीवायडर, फुटपाथ, पावसाळी लाईन ड्रेनेज लाईन, स्ट्रीट पोल इ. कामे अंतर्भूत आहेत. सद्यस्थितीमध्ये सुमारे १२ की.मी. ची कामे पूर्ण झालेली असून उर्वरित कामे प्रगती पथावर आहे. सदर कामामधील रस्ता रुंदीकरणातील जागा ताब्यात येणे करिता संबधित विभागाशी समन्वयसाधून जागा टी.डी.आर पोटी ताब्यात घेणे बाबत ची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे आदेश पथ विभागास अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि.) यांनी दिले. तसेच संबधित जागा मालकांसमावेत बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच क्रेडिट नोट खर्ची प्रक्रिया बाबत संगणकीकरण करण्याचे सूचना दिल्या.यावेळी पुणे शहरातील प्रमुख मिसिंग लिंक बाबतदेखील चर्चा करण्यात आली.

या रस्त्यांचा डी.पी.आर. तयार करण्याबाबत तातडीने कार्यवाही करणेस सूचनाअतिरिक्त आयुक्तांनी दिल्या आहेत . संबधित कामांचा डी. पी. आर. प्राप्त झाल्यांनतर सदरचे कामे पीपीपी अथवा अन्य मार्गाने तरतूद उपलब्ध करून करण्या बाबतचे धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असेही महापालिकेने म्हटले आहे.


कॉंग्रेस भवनात निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी मतदार याद्या संदर्भात विशेष सत्र

पुणे- शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी मतदार याद्यांसंदर्भात माहिती विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते.या सत्रात इच्छुक उमेदवारांना व कार्यकर्त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे समन्वयक तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयाचे  डॉ.निमिष साने यांनी मार्गदर्शन केले.

शुक्रवार दि. १४/११/२०२५ रोजी निवडणुक आयोगाच्या वतीने मतदार याद्या जाहिर होणार आहेत. सदर मतदार याद्यामध्ये दुबार नावे कशी शोधायची, बुथ निहाय याद्या कशा तपासाव्या, इ. संदर्भात डॉ. निमिष साने यांनी माहिती दिली. त्यांनी इच्छुक उमेदवारांच्या उपस्थित मतदार यादीतील दुबार नावे, खोटे मतदार, चुकीचे पत्ते, मयत मतदार, शेजारील प्रभागातील मतदारांचे समावेश यावर कसे काम करायचे याची महत्वपूर्ण सविस्तर माहिती दिली.

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘आपले नेते आदरणीय राहुल गांधी यांनी मत चोरीचा शोध घेऊन त्या विरोधात जाहीरपणे परखड मत सर्वांसमोर मांडले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदार याद्या या काळजीपूर्वक अभ्यासने गरजेचे आहे. त्यावरील त्रुटी, चुका तपासण्याचे काम प्रामुख्याने उमेदवारांनी केलेच पाहिजे.’’यावेळी पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या सह प्रदेश पदाधिकारी, माजी आमदार, माजी नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष, शहर पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इशारा ? राज ठाकरेंच्या खास नेत्याच्या भावावर आयटीची धाड

मुंबई : राज्यात सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहत असताना आचारसंहिते ऐवजी ED,CBI, IT यांची जास्त चर्चा रंगणार कि काय ? असा प्रश्न आता उपस्थित होत असताना मागील काही दिवसांपासून विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरांवर आयकर विभागाच्या धाडींचं सत्र सुरू झाल्यावर आता राजकीय नेतेही टार्गेटवर असल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू नेते अशी ओळख असणारे माजी आमदार राजू पाटील यांचे धाकटे बंधू विनोद पाटील यांच्या बंगल्यावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. या धाडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा आयकर विभागाचे पथक विनोद पाटील यांच्या बंगल्यावर दाखल झाले होते. मात्र रात्री घरात शिरण्यास त्यांना प्रतिबंध करण्यात आला. अखेर आयकर विभागाचे अधिकारी आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घरात शिरले आणि त्यानंतर घरात तपासणी सुरू केली आहे. मागील जवळपास 10 तासापासून विनोद पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू असल्याचे समजते. या धाडीत अधिकाऱ्यांच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे लागतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राजू उर्फ प्रमोद रतन पाटील हे मनसे पक्षाचे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले एकमेव विधानसभा उमेदवार होते. राजू पाटील यांचा जन्म 1973 साली झाला असून ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. 2010 साली पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 2010 मध्ये झालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी मनसेकडून प्रमुख भूमिका बजावली होती. मनसेने त्यावेळेस 29 जागा जिंकल्या होत्या. यात राजू पाटील यांचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं. राजू पाटील यांनी 2009 साली ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 2012 पर्यंत त्यांनी जिल्हापरिषद सदस्याची जबाबदारी सांभाळली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून राजू पाटील यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा पराभव करत पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते.

नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे, : नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ शांततेत, निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये आदेश जारी केले आहेत, सदरचे आदेश ३ डिसेंबर २०२५ पर्यंत अंमलात राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीनी किंवा त्यांच्या हितचिंतक, मुद्रणालयाचे मालक व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापतांना पुढील बाबीवर निर्बंध घालण्यात येत आहेत. यामध्ये इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे, आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे नमूना मतपत्रिकेसाठी कागद वापरणे तसेच कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिकेची छपाई करणे.

निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तालुका दंडाधिकारी कार्यालये आणि सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय व विश्रामगृह या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणूक, सभा घेणे, मोर्चा काढणे, उपोषण करणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने इत्यादी. तसेच कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे या बाबी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक प्रचाराचे साहित्य, सार्वजनिक इमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर निवडणूकी संबंधी पोर्स्टस, बॅनर्स, पॉम्प्लेटस, कटआऊटस, होर्डिंग्ज , कमानी आदी रहदारीस अडथळा निर्माण होईल व अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यावर निर्बंध घालण्यात येत आहे. कोणत्याही राजकीय पक्षानी, निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी, किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक प्रचारासाठी १० पेक्षा अधिक मोटार गाड्या, वाहनांचा ताफ्याचा वापर करण्यावर निर्बंध घालण्यात येत आहे.

निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापरावरील निर्बंध: कोणतीही व्यक्ती, संस्था, पक्ष, कार्यकर्ते यांनी ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही. सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपणाचा वापर करता येणार नाही तसेच प्रचाराकरीता ध्वनी क्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, फिरणाऱ्या वाहनास रस्त्यावरुन धावत असतांना ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार व इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या वापरासंबंधीच्या परवानगीबाबत माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील.

प्रचाराकरिता वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे आदीबाबत निर्बंध: फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रिन ग्लासच्यापुढे राहणार नाही आणि तो त्यावाहनाच्या टपापासून २ फुट उंधी पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजुस लावू नये. वाहनावर लावायचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार, प्रतिनिधी, निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ तसेच इतर प्रचलित कायद्यांन्वये शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हादंडाधिकारी श्री. डुडी यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

पवार काका-पुतणे एकत्र येण्यासाठी बहीण सुप्रिया सुळेंची साद, खुद्द अजित पवारांनीच सांगितल्याचा दावा

पुणे- एकीकडे पुण्यातून शरद पवार गटाचे प्रशांत जगताप आणि अंकुश काकडे यांनी अजितदादा गटाशी आघाडी करणार नसल्याचे म्हटले असले तरी दुसरीकडे आज अजित पवार व सुप्रिया सुळे या भाऊ-बहिणीचा एकत्र येण्याबाबत संवाद झाला आहे. अजितदादा शरद पवारांशी चर्चा करतील, मग अंतिम निर्णय होईल, असा दावा पिंपरी चिंचवडमधले अजित पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला आहे.

राज्यामध्ये विचारांना बाजूला ठेवून अनेक ठिकाणी विविध आघाड्या पाहायला मिळू शकणार आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता शरद पवार व अजित पवार हे काका पुतणे एकत्र येणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. त्याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षानेच याबद्दलची माहिती बोलून दाखवली आहे.अजित पवार व सुप्रिया सुळे या भाऊ-बहिणीचा एकत्र येण्याबाबत संवाद झाला आहे. अजितदादा शरद पवारांशी चर्चा करतील, मग अंतिम निर्णय होईल, असा दावा पिंपरी चिंचवडमधले अजित पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला आहे. ही माहिती खुद्द अजित पवारांनीच दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे स्थानिक निवडणूकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढणार काय याबद्दल उत्कंठा वाढते आहे.दरम्यान, यापूर्वीही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बीड, चंदगड. बार्शीसह अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. त्यानंतर आता घडलेल्या या नव्या घडामोडीत सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, विधानसभा निवडणुकीतनंतर महाराष्ट्रात मोठं सत्ता नाट्य पाहायला मिळालं होतं. अजित पवारांनी पक्षप्रमुख शरद पवारांपासून विभक्त होत त्यांच्या गट निर्माण केला आणि महायुतीसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर शरद पवारांनी नवा पक्ष स्थापन केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले. एकाचं नेतृत्व अजित पवार करतात तर दुसऱ्यांचं शरद पवार. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकच असल्याच्या चर्चा देखील अधून मधून सोशल मीडियावर रंगत असतात.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झालीय. अशातच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढू शकतील अशी परिस्थिती पाहायला मिळतेय. निवडणुका एकत्र लढाव्यात अशा दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. या संदर्भात अजित पवार निर्णय घेतील, असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

ग्लोबल महाराष्ट्र बिझनेस फोरम (GMBF) तर्फे ‘महाबिझ दुबई २०२६’ची लंडनमध्ये घोषणा – जागतिक व्यावसायिक सहयोगासाठी प्रभावी मंच!

लंडन, युनायटेड किंगडम, (१२ नोव्हेंबर २०२५): जीएमबीएफ ग्लोबल महाबिझ दुबई २०२६ या आगामी आंतरराष्ट्रीय व्यावसायिक अधिवेशनाची अधिकृत घोषणा लंडन येथील ‘द शेरेटन हिथ्रो’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या यशस्वी रोडशो दरम्यान करण्यात आली. या कार्यक्रमात युनायटेड किंगडम आणि भारतातील प्रमुख उद्योजक, व्यावसायिक आणि समाजसेवी प्रतिनिधी एकत्र आले आणि जागतिक व्यावसायिक सहकार्यासाठी नव्या संधींवर चर्चा केली.

‘जीएमबीएफ’चे बोर्ड सल्लागार डॉ. साहित्य चतुर्वेदी हे दुबईहून लंडनला खास या कार्यक्रमासाठी आले होते. त्यांनी उपस्थितांना ‘महाबिझ दुबई २०२६’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय व्यवसाय अधिवेशनाविषयी सविस्तर माहिती दिली. हे अधिवेशन ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुबई येथे होणार आहे. त्यांनी या अधिवेशनाचा उद्देश – विविध उद्योगांना एकत्र आणणे, नवोन्मेष प्रोत्साहन देणे आणि भारत, यूएई तसेच जागतिक व्यावसायिक समुदायामध्ये सीमापार भागीदारी निर्माण करणे — असा असल्याचे सांगितले.

‘जीएमबीएफ ग्लोबल’चे अध्यक्ष डॉ. सुनील मंजरेकर यांनी ऑनलाईन संवादातून एनआरआय व्यावसायिक आणि जागतिक उद्योजकांना ‘महाबिझ दुबई २०२६’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की या अधिवेशनात ३,००० पेक्षा अधिक उद्योग सहभागी होणार असून, आपली उत्पादने, सेवा आणि व्यावसायिक उत्कृष्टतेचे प्रदर्शन करण्यासाठी हा एक विलक्षण जागतिक मंच ठरणार आहे.

 ‘महाबिझ दुबई २०२६’ च्या निमित्त ‘लंडन’ रोडशो आयोजनामागील उद्देश ब्रिटन आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात सहयोग, समन्वय, सहकार्य आणि संबंध निर्माण करून व्यावसायिक नातं रुजवणे हा आहे. व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि स्थावर मालमत्ता इत्यादी क्षेत्रांत गुंतवणूक, भागीदारी आणि ज्ञानविनिमय वाढविण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. युनायटेड किंगडमचे बॅरिस्टर आणि चार्टर्ड अकाऊंटंट मधुप चतुर्वेदी यांनी दुबईच्या आर्थिक स्थितीवर सखोल सादरीकरण केले. त्यांनी दुबईतील सक्षम वित्तीय प्रणाली, उद्योग-पुरस्कृत वातावरण आणि जागतिक गुंतवणूक केंद्र म्हणून अरब – अमिरातीचे धोरणात्मक महत्त्व स्पष्ट केले.

या कार्यक्रमात विविध प्रांतांतील मान्यवर आणि समाजनेते सहभागी झाले होते, त्यामध्ये डॉ. उदेश्वर सिंग (बिहार), श्री संजय (गुजरात), श्री संतोष (महाराष्ट्र), डॉ. अजय सिंग (उत्तर प्रदेश) आणि अनेक अन्य प्रतिनिधींचा समावेश होता. श्री संतोष पारकर यांनी इव्हेंट प्रेमी हे जीडीपीआर मानकांनुसार तयार केलेले ईव्हेंट व्यवस्थापन अॅप सादर केले, जे सहभागींच्या नोंदणी व संवादासाठी उपयुक्त आहे.

तरुण उद्योजक हीत सत्रा यांनी क्वालिटी कंप्लायंट सर्व्हिसेस या आपल्या कंपनीच्या आयटी सेवा सादर करत व्यवसाय क्षेत्रातील तंत्रज्ञानविषयक संधींचे सविस्तर विवेचन केले. या प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये संजय मोजरिया, डॉ. सुनील मांजरेकर, पंडित पाठक, राहुल दीक्षित, अनिल खेड़कर, राजीव बेनोडकर, छाया बेनोडकर, मोहित घाटे, मानसी लवळेकर, डॉ. मोहिनी आनंदकर, डॉ. उदेश्वर सिंग, संतोष पारकर आणि माला चतुर्वेदी यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या समारोपाला आयोजकांनी सांगितले की ‘महाबिझ दुबई २०२६’ हे अधिवेशन जगभरातील व्यावसायिक नेते, गुंतवणूकदार आणि नवोन्मेषक यांच्यासाठी जागतिक स्तरावर जोडणी, सहकार्य आणि विस्तारासाठी प्रभावी व्यासपीठ ठरेल.

अधिक माहितीसाठी भेट द्या: www.mahabiz2026.com किंवा ईमेल info@gmbfglobal.com

सहिष्णुतेतून जगात शांतता नांदेल.डॉ. सदानंद मोरे यांचे विचारः आळंदीत जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटन

पुणे: “ज्ञानेश्वर माऊलींचा सहिष्णुतेचा संदेश जगाला सुख, समाधान आणि शांती मार्ग दाखवित आहे.  या भूमीमध्ये  प्रा. डॉ. विश्वनाथ दा कराड  यांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सहिष्णुतेचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याचे कार्य केले आहे. ” असे विचार साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’, विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधन पर आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सहिष्णुता सप्ताहाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, आळंदी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा वैजयंतीताई उमरगेकर, पिंपरी चिंचवड मनपाचे माजी नगरसेवक विक्रांत लांडे, आळंदी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश काका वडगावकर, हभप आदिनाथ महाराज फपाळ, हभप बुट्टे पाटील महाराज,  नंदकुमार वडगावकर, विठ्ठलराव काळोखे, बाळासाहेब काळोखे, रमेश काळोखे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा. स्वाती कराड चाटे आणि सौ. उषा विश्वनाथ कराड उपस्थित होत्या.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले,”प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांची  विश्वशांती केंद्र स्थापनेमागची दृष्टी वारकरी संप्रदाय, महाराष्ट्र किंवा देशापुरती मर्यादित नसून संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दाखवणे ही आहे. या उद्देशाने ते अविरत कार्य करीत आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने संस्थांची निर्मिती केली आहे त्या संस्थांमध्ये जागतिक पातळीवर शांतता निर्माण करण्यासाठी हातभार लावण्याचे सामर्थ्य आहे.”
प्रा. स्वाती कराड चाटे म्हणाल्या,”जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या माध्यमातून समाज निमिर्तीसाठी पवित्र तीर्थक्षेत्रांचे खऱ्या अर्थाने ज्ञानतीर्थ क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडविण्याचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रम सर्वच समाजासाठी राबविला जात आहे. समाजाने संतांच्या विचारांवर चालावे आणि विद्यार्थ्यांनीही यातून शिकावे हा यापाठीमागचा उद्देश आहे.”

यावेळी श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनीही आपले विचार मांडले.
हभप शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.

मागोवा घेत ट्रॅव्हल्सच्या बसचा पाठलाग करत मकोका मधील फरार आरोपीला पकडले

पुणे- मकोका लावल्यावर फरार झालेल्या आरोपीचा मागोवा काढत ट्रॅव्हल्सच्या बस अड्ड्यावर शोध घेत नंतर ट्रॅव्हल्सच्या बसचा पाठलाग करत या आरोपीला पुणे पोलिसांनी पकडले अजय युवराज कसबे, वय-२४, रा-भिमज्योत मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे असे या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि,’येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं.४३६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११८ (२) (३) (५) सह भारतीय हत्यार कायदा ४, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (ब), १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ३, ७. महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ३ (१) (२), ३(२), ३(४) अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी हे मकोका अंतर्गत कारवाई झालेनंतर फरार झाला होता . या आरोपींना तात्काळ ताब्यात घेणेबाबत वरीष्ठांनी सुचना दिल्या होत्या.
या सुचनांच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४, सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग प्रांजली सोनवणे यांनी देखील सुचना केल्या होत्या त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अंमलदार शैलेश वाबळे यांनी आरोपीचा मोबाईल क्रमांक तांत्रिक विश्लेषनातुन मिळवुन त्या आधारे आरोपी हा वारंवार मोबाईल क्रमांक, वास्तव्य व ओळख लपवुन वावरत असल्याने तसेच श्रेणी पोलीस उप निरीक्षक प्रदिप सुर्वे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की संबधित आरोपी पुणे सोलापुर रोड मार्गे मुळ गावी पळुन जाण्याचे तयारीत आहे तेव्हा तपास पथकाचे सहप्रभारी प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार जायभाय, कांबळे, शिंदे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचुन पाळत ठेवली .तिथे आरोपी हा खाजगी ट्रव्हल्स मधुन गावी जात असल्याबाबत माहिती मिळाली परंतु त्याठिकाणी खाजगी ट्रॅव्हल्सची संख्या जास्त असल्याने आरोपी शोधणे कठीण होते. आरोपीच्या शोधार्थ प्रत्येक ट्रॅव्हल्सची तपासणी सुरु असताना माहिती मिळाली की काही वेळापुर्वीच सोलापुरचे दिशेने २-३ टॅव्हल्स या निघुन गेल्या आहेत अशी माहिती मिळाताच त्याबाबत खातरजमा करणेकरीता तपास पथकातील नमुद अधि/कर्मचारी यांनी त्यांचेजवळील कारने भरधाव वेगाने २० ते २५ किमी गाडीचा पाठलाग करुन सदर ट्रॅव्हल्सला थांबवुन तपासणी करत असताना एका ट्रॅव्हल्स मध्ये सगळे प्रवासी तपासकामी सहकार्य म्हणुन खाली उतरले परंतु एका सीटवरील प्रवासी हा आपली ओळख लपवुन सीट खाली लपत असताना मिळुन आला. त्याचे जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता तो झटापट करुन पळून जाण्याचे तयारीत असताना त्यास शिताफीने ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अजय युवराज कसबे, वय-२४, रा-भिमज्योत मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे असे असल्याचे सांगितले. या आरोपीस पुढील करावाईसाठी येरवडा पोलीस स्टेशन येथे आणले असुन पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे हे करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४ सोमय मुंडे,सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे,वरीष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक विजय ठाकर, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी फौजदार महेश फटांगरे, सहप्रभारी प्रदिप सुर्वे, पोलीस हवालदार शिंदे, कोकणे, वाबळे, जायभाय, सोगे, कांबळे, सुतार, जाधव, अडकमोल, गायकवाड, निलख यांनी केली आहे.

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्षपदी अविनाश बागवे यांची निवड

0

मुंबई-महाराष्ट्र राज्यातील सर्व बॉक्सिंग प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना निवडणूक २०२५ धर्मदाय आयुक्त कार्यालय, येथे उत्साहात व यशस्वीपणे पार पडली.या निवडणुकीत पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक अविनाश रमेश बागवे यांची महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड होऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या प्रेरणेतून आणि अविनाश बागवे यांच्या नेतृत्वाखाली, पुणे शहर बॉक्सिंग संघटना गेली दोन दशके युवा पिढीमध्ये क्रीडाभाव, शिस्त, आत्मविश्वास आणि समाजात सकारात्मक विचारांची प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य सातत्याने करत आहे.या निवडीमुळे महाराष्ट्रातील बॉक्सिंग क्षेत्रात नवी ऊर्जा, नवा जोश आणि नवी दिशा निर्माण होईल, अशी सर्वत्र अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धा म्हणजे संघभावनेचा संस्कार-संचालक राजेंद्र पवार

0

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेचे अमरावतीमध्ये थाटात उद्घाटन

अमरावती: महावितरणने खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. अनेक महिला व पुरुष खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. कोणत्याही सांघिक खेळ प्रकारात खेळाडूंमधील परस्पर सहकार्य, समन्वय व विश्वास या त्रिसुत्रीशिवाय विजय शक्य होत नाही. त्यामुळे खेळाडूंमध्ये प्रथम संघभावना निर्माण होणे आवश्यक आहे. महावितरणच्या दरवर्षी होणाऱ्या राज्य क्रीडा स्पर्धा या महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी एकजुटीचा व संघभावनेचा संस्कार आहे असे प्रतिपादन संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी बुधवारी (दि. १२) केले.

अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटक म्हणून संचालक श्री. पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता श्री. अशोक साळुंके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कोकणचे सहव्यस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे, कार्यकारी संचालक श्री. प्रसाद रेशमे, पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे, मुख्य अभियंते सर्वश्री सुहास रंगारी, दिलीप दोडके, स्वप्नील काटकर, चंद्रमणी मिश्रा, संजय पाटील, राजेश नाईक, अरविंद बुलबुले, संजीव भोळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके, महाव्यवस्थापक श्री. राजेंद्र पांडे तसेच प्राचार्य श्रीनिवास देशपांडे यांची उपस्थिती होती.

या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत महावितरणच्या १६ परिमंडलाच्या संयुक्त आठ संघातील सुमारे ११७० महिला व पुरुष खेळाडू सहभागी झाले आहेत. या खेळाडूंनी संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता श्री. अशोक साळुंके यांनी केले. सूत्रसंचालन सौ. क्षिप्रा मानकर, श्री. विजय पांडे यांनी केले तर उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. मधुसूदन मराठे यांनी केले. या क्रीडा स्पर्धेत २२ खेळ प्रकारातील सामने रंगणार असून येत्या शनिवारी (दि. १५) समारोप होणार आहे.

१०० मीटर धावस्पर्धेत प्रिया पाटील, गुलाबसिंग वसावेंची बाजी – अतिशय चुरशीच्या १०० मीटर धावस्पर्धेत पुरुष गटात श्री. गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती) यांनी सुवर्णपदक तर साईनाथ मसाणे (सांघिक कार्यालय-भांडूप) यांनी रौप्यपदक पटकावले. तर महिला गटात प्रिया पाटील (सांघिक कार्यालय-भांडूप) यांनी सुवर्णपदक तर श्वेतांबरी अंबादे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) यांनी रौप्यपदक मिळवले. विजेत्यांना संचालक श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते सुवर्ण व रौप्यपदक प्रदान करण्यात आले.

दुसऱ्या तिमाहीत किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लि.ची स्वतंत्र निव्वळ विक्री 1,500 कोटींहून अधिक; महसुलात वार्षिक 35% वाढ;वार्षिक 44% ची वाढ :स्वतंत्र निव्वळ नफा 141 कोटी

पुणे, : अंतर्गत ज्वलन इंजिनजनरेटर सेट आणि कृषी उपकरणे यांच्या उत्पादनातील आघाडीची कंपनीआणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लक्षणीय उपस्थिती असलेल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडने (KOEL) (BSE: 533293; NSE: KIRLOSENG) 31 मार्च 2026 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे आणि सहामाहीचे अलेखापरिक्षित आर्थिक निकाल जाहीर केले.

या निकालांबाबत किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या व्यवस्थापकीय संचालक गौरी किर्लोस्कर म्हणाल्या, “किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडने (KOEL) आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. जी कंपनीच्या वाढीच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. तिमाहीत प्रथमच आम्ही ₹ 1,500 कोटी महसूलाचा टप्पा ओलांडला आणि ₹ 3,027 कोटींची आमची आतापर्यंतची सहामाहीतील सर्वोच्च विक्री गाठली. मार्केटमधील आमची मजबूत स्थिती आणि ऑपरेशनल उत्कृष्टता दर्शवत स्वतंत्र व्यवसायातील सर्व विभागांनी दुहेरी अंकी वाढ नोंदवली. पॉवर जनरेशन बिझनेस युनिटने देखील त्यांची मजबूत कामगिरी सुरू ठेवली असून त्याला आमचे विस्तृत वितरण नेटवर्क, मजबूत ब्रँड इक्विटी आणि इंजिन तसेच जनरेटर तंत्रज्ञानातील सातत्यपूर्ण  नवोपक्रमाचे समर्थन मिळाले.

10 ऑक्टोबर रोजी, आम्ही आमच्या B2C ऑपरेशन्सची धोरणात्मक पुनर्रचना देखील जाहीर केली. आमची पूर्ण मालकीची उपकंपनी, ला-गज्जर मशिनरीज प्रायव्हेट लिमिटेडला स्लम्प सेलद्वारे हा व्यवसाय हस्तांतरित केला. हे पाऊल आमचे लक्ष्य अधिक बळकट करते आणि 2030 पर्यंत $2 अब्जच्या टॉप लाईनपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या दीर्घकालीन धोरणात्मक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. या प्रगतीमुळे आणि ध्येय निश्चित असल्याने शिस्त आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणीच्या माध्यमातून धोरणात्मक प्राधान्ये पूर्ण करण्यास आम्हाला प्रोत्साहन मिळते.”

आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीचा आढावा (स्वतंत्र):

·         वार्षिक 35% वाढ नोंदवत आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ विक्री ₹ 1,593 कोटी; आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाहीत ती ₹1,184 कोटी एवढी होती.

·         आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत EBITDA# ₹ 214 कोटींवर तर आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाहीत तो ₹148 कोटी एवढा होता. वार्षिक वाढ 45%

·         आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत EBITDA# मार्जिन 13.4% एवढे होते. तर आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाहीत ते 12.4% होते.

·         वार्षिक 44% वाढ नोंदवत आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा ₹141 कोटी होता. आर्थिक वर्ष 25च्या दुसऱ्या तिमाहीत तो ₹98 कोटी एवढा होता.

·         रोख आणि रोख समतुल्य* ₹ 475 कोटी

* कर्जाचे एकूण प्रमाण; ट्रेझरी गुंतवणूक समाविष्ट आहे तर दावा न केलेले लाभांश वगळले आहेत.

आर्थिक वर्ष 26च्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीचा आढावा (एकत्रित):

·         वार्षिक 30% वाढ नोंदवत चालू कामकाजातून मिळणारा महसूल आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत ₹1,948 कोटी एवढा होता. आर्थिक वर्ष 25च्या दुसऱ्या तिमाहीत तो ₹1,499 कोटी होता; 

·         चालू कामकाजातून# मिळणारा निव्वळ नफा आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत ₹159 कोटी होता तर आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाहीत ₹ 106 कोटी होता; वार्षिक 51% वाढ

आर्थिक वर्ष 26च्या पहिल्या सहामाहीतील आर्थिक कामगिरीचा आढावा (स्वतंत्र):

·         आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाहीत निव्वळ विक्री ₹3,027 कोटी झाली तर आर्थिक वर्ष 25च्या पहिल्या सहामाहीत ती ₹2,518 कोटी झाली; वार्षिक 20% वाढ

·         आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाहीत EBITDA# ₹405 कोटी एवढा तर आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या सहामाहीत तो ₹323 कोटी एवढा होता; वार्षिक 25% वाढ

·         आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाहीत EBITDA# मार्जिन 13.3% होते तर आर्थिक वर्ष 25च्या पहिल्या सहामाहीत ते 12.7% एवढे होते.

·         आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाहीत निव्वळ नफा# ₹264 कोटींवर गेला तर आर्थिक वर्ष 25च्या पहिल्या सहामाहीत तो ₹215 कोटी एवढा होता; वार्षिक 23% वाढ

आर्थिक वर्ष 26च्या पहिल्या सहामाहीतील आर्थिक कामगिरीचा आढावा (एकत्रित):

·         आर्थिक वर्ष 26च्या पहिल्या सहामाहीत चालू कामकाजातून मिळणारा महसूल ₹3,712 कोटी होता तर आर्थिक वर्ष 25च्या पहिल्या सहामाहीत तो ₹3,130 कोटी एवढा होता; वार्षिक 19% वाढ नोंदवली गेली.

·         चालू कामकाजातून# मिळणारा निव्वळ नफा आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाहीत ₹293 कोटी होता तर आर्थिक वर्ष 25च्या पहिल्या सहामाहीत ₹238 कोटी एवढा नफा झाला होता. वार्षिक 23% वाढ

–    वर नोंदवलेला निव्वळ नफा आणि EBITDA, जिथे लागू असेल तिथे अपवादात्मक बाबी वगळून आहे.

– # मागील कालावधीतील आकडेवारीमध्ये मागील वर्षांत केलेल्या विक्रीसाठी ग्राहकासाठी केलेल्या थकीत प्राप्तीसाठीचे रिव्हर्सल प्रोव्हिजन वगळले आहे. चालू कालावधीत असे कोणतेही रिव्हर्सल नाही. मागील कालावधीसाठी म्हणजेच Q2 FY 25 आणि H1 FY 25 साठी रिव्हर्सल संख्या खालीलप्रमाणे आहेत:

– EBITDA मार्जिनस्वतंत्र पातळीवरअनुक्रमे 13.9% आणि 14.4% होते.

– एकत्रित पातळीवरनिव्वळ नफा अनुक्रमे ₹125 कोटी आणि ₹281 कोटी होता.

– तपशीलांसाठीकृपया स्टॉक एक्स्चेंजवर प्रकाशित झालेल्या अनऑडिटेड आर्थिक निकालांची नोंद‘ पहा.

कोमल मानकर, स्वामिनी सोनवणे यांनाराज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक

पुणे: धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्थेतील विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करून संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात संस्थेचे आणि पुण्याचे देशभर उज्ज्वल केले आहे. रायगड येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत ६९ किलो वजनी गटात कोमल मानकर हिने सुवर्णपदक पटकविले, तर गाझियाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत स्वामिनी सोनवणे हिने सांघिक कामगिरीत सुवर्णपदक मिळवले. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कोमल मानकर आता गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. 

कोमल मानकर व स्वामिनी सोनावणे या दोन्ही सुवर्णकन्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष सोपान उर्फ काकासाहेब चव्हाण व संचालक अनिकेत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे अन्य पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होता. कोमलने अतिशय दमदार आणि कौशल्यपूर्ण खेळ करत हे यश मिळवले आहे, तर राष्ट्रीय स्तरावर संस्थेचे व महाराष्ट्राचे नाव उंचावणारी कामगिरी स्वामिनीने केली आहे. 

काकासाहेब चव्हाण म्हणाले, “संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात या विद्यार्थिनींनी केलेली सुवर्ण कामगिरी संस्थेसाठी अभिमानास्पद क्षण आहे. या यशामागे खेळाडू, त्यांच्या कुटुंबियांचा आणि क्रीडा शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. संस्थेच्या या दोन्ही सुवर्णकन्यांनी दाखवलेली जिद्द, मेहनत आणि यश हे आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.”

अनिकेत चव्हाण यांनी सांगितले की, “लवकरच आपल्या परिसरात आधुनिक ‘स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ उभारण्यात येणार असून, यामुळे धायरी व सिंहगड रोड परिसरातील अनेक नवोदित खेळाडूंना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे.”

एमक्योर फार्मास्युटिकल्सतर्फे महसुलात 13% वाढ आणि करपश्चात नफ्यात 25% वाढ

• कामकाजामधून मिळणारा महसूल 2,270 कोटी रु., वार्षिक 13.4% वाढ

• EBITDA मार्जिन 19.3%, EBITDA 439 कोटी रु., वार्षिक 15.2% वाढ

• PAT 251 कोटी रु., वार्षिक 24.7% वाढ

• स्थानिक व्यवसाय विक्री 1,031 कोटी रु., वार्षिक 10.6% वाढ

• आंतरराष्ट्रीय व्यवसाय विक्री 1,238 कोटी रु., वार्षिक 15.8% वाढ

पुणे: एमक्योर फार्मास्युटिकल्स (BSE:544210, NSE: EMCURE) तर्फे  30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी आपले एकत्रित आर्थिक निकाल जाहीर करण्यात आले.


या तिमाहीत कंपनीच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही व्यवसायांमध्ये मजबूत कामगिरी झाली.

स्थानिक व्यवसायात 10.6% वाढ नोंदवली गेली असून, सर्व प्रमुख उपचार विभागांतील मजबूत कामगिरी आणि नव्या उपक्रमांमुळे ही वाढ साध्य झाली. देशांतर्गत व्यवसाय हा कंपनीसाठी एक महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिला आहे आणि आम्ही सातत्याने आमचा उत्पादन पोर्टफोलिओ वाढवत असून व्यवसायासाठी टीम मजबूत करत आहोत. अलीकडेच कंपनीने नोवो नॉर्डिस्क सोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली असून त्याअंतर्गत पोविझ्ट्रा® हे जैविक इंजेक्टेबल सेमाग्लूटाइड भारतात सादर करण्यात येणार आहे. या कराराचा एक भाग म्हणून एमक्योर ही पोविझ्ट्राच्या व्यवसायीकरण आणि प्रसारासाठी जबाबदार असलेली एकमेव वितरक कंपनी असेल. पोविझ्ट्रा® हे जास्त वजन असलेल्या किंवा स्थूलतेने ग्रस्त व्यक्तींमध्ये दीर्घकालीन वजन व्यवस्थापन आणि स्थूलतेमुळे उद्भवणाऱ्या हृदयविकारांशी संबंधित गंभीर जोखीम कमी करण्यासाठी सुचवलेले औषध आहे. या तिमाहीत कंपनीने आपल्या झुवेंटस या उपकंपनीतील अल्प भागभांडवलाचे अधिग्रहणही पूर्ण केले.

आंतरराष्ट्रीय व्यवसायातही मजबूत वाढ दिसून आली असून 16% वाढ नोंदवली गेली. नवीन उत्पादन सादरीकरण आणि मॅन्क्स (Manx) युनिटच्या वाढत्या उत्पादनामुळे युरोपमध्ये 23% वाढ झाली. कॅनडामध्ये व्यवसायाने 18% वाढ कायम ठेवली आहे. जगातील उर्वरित भागातील व्यवसायात नॉन-एआरव्ही व्यवसायाच्या आधारावर स्थिर गती दिसून आली.

निकालांवर भाष्य करताना एमक्योर फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश मेहता म्हणाले, “दुसऱ्या तिमाही मध्ये आमच्या सर्व व्यवसायांनी मजबूत कामगिरी केली. आम्ही आमच्या लक्ष केंद्रीत केलेल्या बाजारपेठांमध्ये परवाना करार आणि इन-हाऊस विकासाद्वारे आमचा पोर्टफोलिओ वाढवत आहोत. नोवो नॉर्डिस्क सोबतची भागीदारी आम्हाला वेगाने वाढणाऱ्या स्थूलता उपचार विभागात मजबूत स्थान मिळवून देत असून बाजारपेठेला आकार देण्यासाठी आम्हाला सक्षम करण्याकरता  लवकर प्रवेश मिळवून देत आहे. आम्ही आमच्या सर्व प्रमुख व्यवसायांमध्ये मजबूत वाढ आणि मार्जिन सुधारणा सादर करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.”

अधिकारी जितका भ्रष्ट, तितका नेत्यांचा लाडका:पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवलेंमुळे हे पुन्हा एकदा सिद्ध-विजय कुंभार

0

पुणे-माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार बोपोडी जमीन घोटाळ्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या कथित भ्रष्ट कारभारावरून सरकार व राजकारण्यांवर कडक शब्दात टीका केली आहे . अधिकारी जितका भ्रष्ट, तितता तो राजकारण्यांचा लाडका हे पुण्याची तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या निमित्ताने पु्न्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळे त्यांच्यामागे कुणाचे राजकीय छत्र आहे? हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणालेत.त्याचबरोबर संबधित तहसीलदार येवले यांच्या १४ वर्षाच्या कारकिर्दीत ७ वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंत्रालयातून सेटिंग लाऊन पोस्टिंग करवून घेणारे अधिकारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे .

बोपोडी येथील सरकारी दूध डेअरीच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांच्यासह इतर 6 जणांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर येवले व राजकारण्यांतील कथित संबंधांवर भाष्य करताना आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या निमित्ताने पुन्हा सिद्ध झालं की अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका. अशा माणसाला नागपूरहून पुण्यात कुणी आणि का आणलं? इतके गंभीर आरोप असूनही त्याला कार्यकारी पद का देण्यात आलं? त्याच्यामागे कोणाचं राजकीय छत्र आहे?.सर्वोच्च न्यायालयाने अशा पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा होऊ नये, राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी महाराष्ट्रासह सर्व राज्यांमधे नागरी सेवा मंडळ नावाची यंत्रणा स्थापन करणे बंधनकारक केले आहे . ती यंत्रणा येवले प्रकरणात काय करत होती? की त्या यंत्रणेला डावलून येवलेंची बदली केली? केली असेल कोणी केली? नागरी सेवा मंडळाने शिफारस केली असेल तर त्यांच्या सदस्यांवर कोण आणि कधी कारवाई करणार?

येवलेंचे पराक्रम …

येवले यांनी 2001 मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली. 361 गुण आणि अपंग (कर्णबधिर) कोट्यातून पास झाल्याने त्यांना नागपूर विभागात 2004 मध्ये नायब तहसीलदार पद देण्यात आले. पण खरंच कर्णबधिर आहेत का? नसतील तर हे थेट महाराष्ट्रातील पूजा खेडकर प्रकरण ठरेल !त्याआधी येवलेंनी सर्वसाधारण गटातून परीक्षा दिली होती असे म्हणतात. 2001 चा MPSC घोटाळा गाजला होता . 398 उमेदवारांच्या उत्तरपत्रिका बदलल्या,प्रत्येकाकडून ₹3-₹5 लाख घेतल्याचे आरोप झाल्यानंतर मुंबई HC ने सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या. आता ज्याची सेवेत रुजू होतानाची कारकीर्द अशी असेल त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा कशी करता येईल ?येवले यांना 2011 मध्ये उमरेड (नागपूर) येथे ₹10,000 ची लाच घेताना पकडले. 6 दोषारोपपत्रं ठेवण्यात आली, पण चौकशीचा पत्ता नाही. त्यानंतर गडचिरोलीला हजर न राहिल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं पण सेटिंग लावून परत रुजू झाले. 2014 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सिरोंचा कोतवाल भरती प्रकरणात प्रत्येकाकडून ₹2 – ₹ 2.5 लाख लाच घेतल्याचा आरोप . हा प्रकार कानावर येताच नक्षलवाद्यांनी अशा अधिकाऱ्यांना सोडणार नाही असे जाहीर केले. 2016 मध्ये पुणे विभागात बदली.

14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप2016 मध्येच इंदापूर तहसीलदार म्हणून रुजू 58 सरकारी जमिनींचं अनियमित वाटप,वाळूमाफियाकडून संगनमत यामुळे जिल्हाधिकारी पुणे यांनी निलंबन केलं. 14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, पण प्रत्येक वेळी “सेटिंग” लावून बचाव. मोबोज हॅाटेल जमीन घोटाळा प्रकरणी त्यांच्याविरुद्ध आरोप करण्यात आले, आंदोलने झाली परंतु पुढे काहीच झाले नाही. येवले “मुंढवा जमीन घोटाळा” प्रकरणात अमेडिया कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी प्रचंड सक्रिय होते, असे विजय कुंभार यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, बोपोडी जमीन घोटाळ्याप्रकरणी सूर्यकांत येवले यांनी दिलेले आदेश रद्दबातल करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. यासंबंधीच्या अर्जाच्या पुनर्विलोकनास अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून या प्रकरणातील जमिनीची माहितीही घेतली आहे. बोपोडी येथील ही जमीन नावावर करावी, असा अर्ज आल्यानंतर येवले यांनी ही जागा संबंधितांच्या नावावर करण्याचे आदेश दिले होते. त्याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती मिळताच येवले यांच्यावर शिस्तभंग आणि गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाने केली होती.त्या शिफारशीनुसार, येवले यांना निलंबित कऱण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार, उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी येवले यांनी जमीन नावावर करण्याचे दिलेले आदेश रद्द करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्याकडे पुनर्विलोकन अर्ज दाखल केला. त्यानुसार, राऊत यांनी हा अर्ज मान्य केला असून पुढील कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे.