Home Blog Page 3078

मुठा कालवा फुटण्यास भूमिगत वीजवाहिन्यांचा संबंध नाही

0

पुणे : सिंहगड रस्त्यावर मुठा उजवा कालवा फुटण्यास कालव्याबाहेरील भिंतीबाजूला दोन वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या भूमिगत वीजवाहिन्यांचा संबंध नसल्याचे महावितरणकडूनस्पष्ट करण्यात आले.

दांडेकर पुलाजवळ गुरुवारी (दि. 27) मुठा उजवा कालवा सकाळी सव्वा अकराच्या सुमारास फुटला. तेथे इतर खासगी कंपन्यांच्या केबल्स तसेच महावितरणच्या वीजवाहिन्या दिसून आल्यामुळे कालवा फुटण्यास केबल खोदाई कारणीभूत असल्याची शंका व्यक्त झाली. मात्र या कालव्याच्या बाहेरील भिंतीबाजूला पाच फूट अंतरावर महावितरणच्या 22 केव्ही क्षमतेच्या दोन भूमिगत वीजवाहिन्यांच्या चार केबल टाकण्यात आल्या आहेत. सन 2016 मध्ये या भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामासाठी पाटबंधारे विभागाकडे रितसर परवानगी घेण्यात आली होती. तसेच आवश्यक शुल्काचा भरणा केल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या देखरेखीखाली तसेच त्यांनी नेमून दिलेल्या जागेत या दोन्ही वीजवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. त्या वेळी करण्यात आलेली खोदाई ही कालव्याच्या बाहेरील भिंतीपासून पाच फूट अंतरावर असल्याने कालवा फुटण्यासाठी या खोदाईचा कोणताही संबंध नाही. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे भूमिगत वाहिनी असलेला भराव वाहून गेल्यामुळे वाहिन्या उघड्या झालेल्या दिसून येत आहे. मात्र कालवा फुटण्यासाठी या वाहिन्यांच्या खोदाईचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

स्वरमयी पुण्याच्या मातीत जन्म मिळावा-हरिप्रसाद चौरसिया

0
पुणे : “पुण्याच्या मातीत सूर भरलेले आहेत. इथला प्रत्येकजण संगीतप्रेमी असून, कलाकारांना दाद देण्याची वृत्ती पुणेकरांमध्ये आहे. या मातीतल्या संगीतप्रेमींनी दिलेल्या दादेमुळे माझे वादन आणखीच बहरत गेलेले आहे. त्यामुळे माझा पुढील जन्म या स्वरमयी पुण्याच्या मातीत व्हावा,” अशी भावना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी व्यक्त केली. शिष्याकडून झालेल्या या अनोख्या स्वरवंदनेने खुद्द चौरसियाही भारावून गेले.
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना त्यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे शिष्य सौरभ वर्तक यांच्या ‘सौरभ फ्लूट अकॅडमी’तर्फे सामूहिक बासरीवादनातून मानवंदना देण्यात आली. चौरसिया यांचे ८१ दिव्यांनी औक्षण करून पाद्यपूजन व पुष्पवृष्टी करण्यात आले. तसेच तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते हरिप्रसाद चौरसिया यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळील विष्णुकृपा हॉलमध्ये हा हृद्य सोहळा पार पडला. यावेळी सौ. अनुराधा चौरसिया, पंडित अतुलकुमार उपाध्ये, संयोजक सौरभ वर्तक, चित्कला मुळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
सौरभ फ्ल्यूट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी तीन गटांत सामूहिक बासरीवादन केले. बासरीतून निघालेल्या अवीट स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. तर सौरभ वर्तक यांनी एकल बासरीवादन करत पंडितजींना अभिवादन केले. या बासरीवादनात भूप, दुर्गा आणि यमन राग सादर झाले. यमन रागातील रूपक ताल आणि पहाडी वादन यामुळे कार्यक्रमात रंगत आली. त्यांना तबल्यावर निलेश रणदिवे आणि पखवाजावर ओंकार दळवी यांनी साथ केली.
पंडित सुरेश तळवलकर म्हणाले, “काही व्यक्ती या सिद्धहस्त असतात. त्यातीलच पंडित चौरसिया आहेत. ते एक प्रेरणादायी गुरु आहेत. संगीतात गुरुभक्तीला अपार महत्व असून, सौरभ वर्तक यांनी ही गुरुभक्ती परंपरा जोपासली आहे. नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीही ही गुरुभक्तीची परंपरा जोपासावी.” चित्कला मुळ्ये यांनी सूत्रसंचालन केले. आदिती मूळये यांनी आभार मानले.

समाजसेवा व्यक्तिसापेक्ष असता कामा नये -डॉ. विकास आमटे

0
पुणे : “समाजासाठी काम करण्याच्या भावनेतून आज अनेक तरुण पुढे येतात. मात्र, बऱ्याचदा प्रसिद्धी आणि स्वार्थ यावर भर दिला जातो. बाबा आमटे यांनी शिकवलेली नि:स्वार्थी समाजसेवा आपण अंगिकारली पाहिजे. समाजातील वंचितांना सन्मानाचे आयुष्य जगण्यासाठी आपली सेवा उपयोगी पडावी. समाजहिताचे विधायक काम उभारायचे असेल, तर समाजसेवा व्यक्तिसापेक्ष असता कामा नये,” असे प्रतिपादन वरोरा येथील महारोगी सेवा समितीचे विश्वस्त डॉ. विकास आमटे यांनी केले. व्यक्ती, समूह आणि क्षेत्र या घटकांचा विकास यावर भर देण्याची गरज असल्याचेही डॉ. आमटे यांनी नमूद केले.
विश्वकर्मा पब्लिकेशन्स प्रकाशित आणि डॉ. चित्रलेखा पुरंदरे लिखित ‘आनंदवनाचा विकास’ या पुस्तकाचे प्रकाशन यशदा येथे आयोजिलेल्या सहाव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमध्ये झाले. प्रकाशनावेळी साधलेल्या संवादात डॉ. विकास आमटे बोलत होते. याप्रसंगी आनंदवन स्मार्ट व्हिलेजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक भरत अगरवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संपादक मनोहर सोनावणे, पुस्तकाच्या लेखिका डॉ. चित्रलेखा पुरंदरे, संवादक डॉ. मंदार परांजपे आदी उपस्थित होते. डॉ. मंदार परांजपे यांनी डॉ. विकास व शीतल आमटे यांची मुलाखत घेतली.
डॉ. विकास आमटे म्हणाले, “बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी उभारलेल्या ‘आनंदवना’ला पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. आतापर्यंत जवळपास ११ लाख कुष्ठरोग्यांना आनंदवनाने आधार दिला. आनंदवन हे एक कुटुंब आहे. इथल्या कोणालाही जातपात नाही की धर्मही नाही. प्रत्येकजण स्वयंशिस्तीने आणि स्वयंप्रेरणेने तनमनधन अर्पूण काम करतो. आनंदवन हे खऱ्या अर्थाने स्मार्ट व्हिलेज आहे. तशी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली खेडी निर्माण व्हावीत. आनंदवनातला कुष्ठरोगी सर्वच बाबतीत सक्षम आहे. मात्र, अजूनही समाजाकडून कुष्ठरोग्यांना पाहिजे तसा सन्मान दिला जात नाही.”
डॉ. शीतल आमटे म्हणाल्या, “लहानपणापासून आम्ही आनंदवनात वाढल्याने त्याच कुटुंबवत्सल वातावरणात आम्ही घडलो. बाबा आमटे, डॉ. विकास आमटे यांनी घालून दिलेली सर्व तत्वे अंगिकारली म्हणूनच आज लोकांचे प्रेम आम्हाला मिळत आहे. वैद्यकीय व्यवसायाच्या पलीकडे जाऊन लोकांचे प्रश्न जाणून त्यांना मदत करणे, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे हे आनंदवनाचे महत्वपूर्ण काम आहे. आमच्या पुढल्या पिढीनेही तेच स्वीकारून पूर्णवेळ याच कार्यात झोकून दिले आहे. डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी पुस्तक लेखनामागील भावना मांडल्या. सूत्रसंचालन कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी केले.

आजच्या काळात ‘रावण’ समजून घेणे आवश्यक-नागराज मंजुळे

0

पुणे : “रावणाला आपण नेहमीच खलनायकाच्या भूमिकेत पाहत असल्याने तो धूसर होत चालला आहे. त्याला कितीही गाडायचा प्रयत्न केला तरीही गाडू शकत नाही. रावण दहा डोक्यानी विचार करणारा बुद्धिमान योद्धा होता. आज आपल्याला एका बाजूनेच विचार करण्याची सवय लागली आहे. घटनेने सर्वांना स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे आजच्या काळात आपण रावणाची बाजूही समजून घेणे आवश्यक आहे,” असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.

न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित उद्योजक शरद तांदळे यांच्या ‘रावण : राजा राक्षसांचा’ या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात नागराज मंजुळे बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या सोहळ्यावेळी चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव, माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, चिंतन ग्रुपचे अभिनंदन थोरात, शोभा तांदळे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

नागराज मंजुळे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी आपले विचार मांडले. महात्मा फुले यांनी त्याकाळी वेगळ्या पद्धतीचे लिखाण केले. आपल्याला देखील अशा पद्धतीने वेगळा विचार स्वच्छपणे मांडता आला पाहिजे. खलनायकालाही वेगळ्या कोनातून बघण्याची दृष्टी शरद तांदळे यांनी या पुस्तकातुन दिली आहे. विरोधी विचार समजून घेण्याची क्षमता अशा लिखाणामुळे विकसित होण्यास मदत होईल.”

प्रवीण गायकवाड म्हणाले, “रामराज्याच्या काळात रावण हा विषय घेऊन पुस्तक लिहिण्याचे धाडस करणे ही कौतुकाची गोष्ट आहे. माणूस वाईट नसतो, काळ-वेळ परिस्थिती त्याला घडवत असते. रावण आता खलनायकाचा नायक झाला आहे. राम जन्माला आला तर रावण डोकावणारच आहे. सध्या राममंदिरासाठी मशिद पाडण्याचे वातावरण देशात आहे. अशा वातावरणात शरद तांदळे यांची रावण ही कादंबरी आपल्या समोर आली आहे.”

ज्ञानेश महाराव म्हणाले, “तुम्ही सत्यनिष्ठ असाल तर असत्य शोधले पाहिजे. सत्य दडवता येते पण संपवता येत नाही. प्रतिक्रिया येतच राहणार परंतु आपण क्रियावादी असले पाहिजे. फसणारे व फसवणारे अशा दोनच जाती आहेत. त्यामुळे आजच्या काळात रावण सांगायला हवा. पुस्तके ही मस्तक तयार करण्यासाठी असतात.”

शरद तांदळे म्हणाले, “रावणाविषयी वाचन केले आणि त्याविषयी लिहीत गेलो. या पुस्तकासाठी मी ४ वर्षे अभ्यास केला. रावणाला नेहमी खलनायक ठरवले जाते. त्यामुळे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने वाचले पाहिजे आणि लिहिते व्हायला पाहिजे.”

अभिनंदन थोरात यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अभिषेक अवचार यांनी सूत्रसंचालन केले. कुणाल गायकवाड यांनी आभार मानले.

गुरुतुल्य पद्धतीवर आधारित पुरु दाधीच यांची कथक कार्यशाळा

0

पुणे : आर्ट आॅफ लिव्हिंग अ‍ॅकॅडमी आॅफ परफॉर्मिंग आर्टस् (आलाप) आणि नृत्यभारती कथक डान्स अ‍ॅकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, कथक नृत्यशैलीच्या कलाकारांसाठी आजपासून (1ऑक्टोबर ) ते ४ आॅक्टोबर पर्यंत मरकळमध्ये विशेष कार्यशाळा आयोजित केली आहे. गुरुतुल्य पद्धतीवर आधारित असणारी ही कार्यशाळा‘आर्ट आॅफ लिव्हिंग’च्या त्रिवेणी आश्रमात पार पडेल.

कथकचे विद्वान कलाकार आणि कुशल अध्यापक डॉ. पुरू दाधीच पुण्यात प्रथमच नृत्यविद्या प्रदान करणार असून हे एक निवासी शिबिर असेल.

कथकच्या सर्व पैलूंवर प्रभुत्व असणारे डॉ. दाधीच हे सतत प्रचारात नसलेल्या अशा काही अप्रचलित नायिकांवर आधारित नृत्यरचना या कार्यशाळेमध्ये शिकवणार आहेत. ज्यांच्या काव्य आणि संगीतरचनाही त्यांच्या स्वत:च्या आहेत. त्याबरोबरच ताल-लयीसंबंधित ‘जातिमाल’ ही रचना शिकवली जाईल. ज्यामध्ये सर्व ‘जातिं’चा अंतर्भाव असेल. आपल्याजवळची कला आणि अमर्याद ज्ञान मुक्त हस्ताने देऊ करणाऱ्या बुजूर्ग कलाकाराजवळ निवासी शिबिरात राहून ज्ञान मिळवणं ही एक उत्तम संधी कथकच्या विद्यार्थी आणि कलाकारांना मिळणार आहे.

पुण्यासह इतर अनेक शहरांतील कलाकारांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. डॉ. पुरू दाधीच यांच्या पत्नी आणि प्रतिष्ठित कलाकार डॉ. विभा दाधीचही या कार्यशाळेत सक्रिय योगदान देणार आहेत.

शालेय जिल्हा स्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेत आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालय विजयी

0
पुणे :जिल्हा क्रीडा परिषद आणि पुणे महानगरपालिका आयोजित शालेय जिल्हा स्तरीय क्रिकेट स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात आबेदा इनामदार कनिष्ठ  महाविद्यालय विजयी   झाले. अंतिम सामन्यात त्यांनी एंजेल मिकी हायस्कुल संघाचा ९ गडी राखून पराभव केला . ३० सप्टेंबर रोजी हा अंतिम सामना आझम कॅम्पस मैदानावर झाला .
विजयी संघाचे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्यकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ . पी . ए . इनामदार ,उपाध्यक्ष आबेदा इनामदार ,सचिव लतीफ मगदूम ,तसेच आझम स्पोर्ट्स एकेडमी चे संचालक गुलझार शेख ,
महाविद्यालयाचे उप प्राचार्य गफार शेख यांनी अभिनंदन केले .

कालवाबाधितांना मोफत धान्‍य वाटप

0

पुणे- मुठा उजवा कालवा फुटून बाधित झालेल्‍या नागरिकांना आज मोफत धान्‍य वाटप करण्‍यात आले. अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कालवाग्रस्‍तांना शासनाच्‍यावतीने आवश्‍यक ती मदत करण्‍याचे जाहीर केले होते. त्‍यानुसार जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी कालवाबाधितांच्‍या नुकसानीचे पंचनामे करण्‍याचे आदेश दिले. जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने 729 पंचनामे पूर्ण करण्‍यात आले. हे पंचनामे व कालवाबाधितांची यादी अन्‍न व धान्‍य वितरण अधिकारी कार्यालयाकडे प्राप्‍त होताच आपत्‍तीग्रस्‍तांना मोफत धान्‍य वाटप करण्‍यात आले. यावेळी अन्‍न धान्‍य वितरण अधिकरी अस्मिता मोरे, गीतांजली गरड-मुळीक, राजश्री भंडारी, वीरनक, माने आदी अधिकारी उपस्थित होते. \संपर्क गीतांजली गरड 9923002156)

सोशल मिडियावर अतिरिक्त माहिती देणारे सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य : अॅड वैशाली भागवत

0

कर्वे समाजकार्य महाविद्यालयामध्ये सायबर गुन्हे व मानसिक आरोग्यासंबंधी एकदिवसीय राज्यस्तरीय परिषद संपन्न

पुणेःफेसबुक व इतर सोशल मिडियावर स्वतःची जास्तीत जास्त माहिती देणे, सतत भावनिक पोस्ट टाकणे तसेच  सोशल मिडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी सहजपणे मैत्री करणारे लोक हे सायबर गुन्हेगारांचे टार्गेट बनतात व अशा व्यक्तींची  सायबर गुन्हेगार लगेचच फसवणूक करतात असे मत  सायबर गुन्हे व सायबर सुरक्षा तज्ज्ञ अॅड वैशाली भागवत यांनी व्यक्त केले.

सोशल मिडिया,सायबर गुन्हे, सायबर सुरक्षा आणि युवक व मानसिक आरोग्य ; समस्या आणि आव्हाने या विषयावर कर्वे समाज सेवा संस्था, रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट, मनोदय मेंटल हेल्थ फोरम आणि पुणे पोलीस सायबर गुन्हे सुरक्षा विभागाने कर्वे समाजकार्य महाविद्यालयामध्ये एकदिवसीय राज्यस्तरीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये अॅड भागवत युवकांना मार्गदर्शन केले त्यावेळी त्या बोलत होत्या. या परिषदेमध्ये दै सकाळ चे  वृत्त संपादक माधव गौखले, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे सदस्य डॉ दिपक शिक्ररापुर, टेक केअर गुडनाईट सिनेमाचे दिग्दर्शक गिरीश जोशी, लेखक अतुल कहाते, पुणे सायबर क्राईम विभागातील पोलिस उपनिरीक्षक अलका जाधव, जेष्ठ मनोविकार तज्ञ डॉ. सुप्रकाश चौधरी,  डॉ वासुदेव परळीकर,  पुणे विद्यापीठाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे डिन डॉ अरविंद शालीग्राम, डॉ शैलेश पालेकर, कल्याणी गोखले, चारू श्रोत्री, डॉ. महेश ठाकूर आदी तज्ञांनी विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी अॅड भागवत म्हणाले की, सोशल मिडियावरील केल्या जाणाया पोस्टचे निरीक्षण  हॅकर करत असतात. जे लोक जास्त तीव्रतेने भावनिक पोस्ट करतात. अशांना हॅकर टार्गेट करतात. अशा लोकांना भावनिक पोस्ट पाठवणे, आपण त्यांना खुप चांगल समजूण घेतो हे सिध्द करत हॅकर त्यांचा विश्वास संपादत करतात. नंतर भावनिक करत त्यांच्या कडून विविध काम करून घेतात. मोमो आणि ब्लू व्हेल या प्रकारेच काम करतात. तरूण मुलींना प्रेमाच्या जाळयात ओढून मानवी तस्करीचे अनेक प्रकार होतात करतात. यामुळे सोशल मिडिया सावधगिरीने हाताळावे.

यावेळी  गिरीश जोशी म्हणाले की  वयस्कर माणसे टेक्नॉलॉजी शिकण्यासाठा उत्सुक नतात. त्यामुळे ४५ वयोगटातील व्यक्तीची ऑनलाईन आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण जवळपास ७०% आहे.सायबर सुरक्षतेकडे अद्याप गांभीर्याने पाहिले जात नाही. यावेली ऑनलाईन आर्थिक फसवणूक कशी होते. याचे अनेेक उदाहरणे जोशी यांनी  दिली. फेसबुक वरील माहिती आणि फोटोचा वापर करून आर्थिक फसवणूक केली जाते. फेसबुकवरील डाटा मोठया प्रमाणात चोरीला जातो. या डाटाच्या आधारे सायबर गुन्हे केले जात आहे. यामुळे सतत फेसबुक वर आपली माहिती टाकत जाऊ नका असे मत लेखक अतुल कहाते यांनी व्यक्त केले.

डॉ दिपक शिकारपुर यांनी सांगितले की, अनेकाना सेल्फीचे व्यसन लागले आहे. काही काळानंतर  सेल्फी व्यसनमुक्तीची  कार्यशाळा घ्यावी लागणार आहे. तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात बदलत आहे. भविष्यात काय खावे, कसे रहावे हे सगळ तुमचा स्मार्टफोन सांगेल. यावेळी  कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दिपक वलोकर हे म्हणाले की सोशल मिडियाच्या अतिरिक्त वापरामुळे ३० ते ४० % लोकांना मानसिक आजार झाला आहे.

सायबर गुन्ह्यासंबंधी पुणे पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे एका वर्षात जवळपास आठ हजार तक्रारी आल्या असून या तक्रारीनुसार गुन्हेगारांना पकडले देखील आहे. ऑनलाईन फसवणूक किंवा इतर सायबर क्राईम संबधी तक्रार असल्याल सायबर क्राईम विभागाशी नागरीकांनी संपर्क साधावा असे आवाहन सायबर क्राईम  विभागाच्या  पोलिस उपनिरीक्षक अलका जाधव यांनी केले.

या कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे संचालक व मासवे संघटनेचे अध्यक्ष डॉ. दीपक वलोकर,सी.एस.आर. सेल चे मानद संचालक तथा परिषदेचे निमंत्रक डॉ. महेश ठाकूर, मेंटल हेल्थ फोरम चे कार्याध्यक्ष  तथा  परिषदेचं समन्वयक प्रा. चेतन दिवाण, रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट चे अध्यक्ष रोटरीयन चारू श्रोत्रीरोटरीयन कल्याणी गोखले व पुणे पोलीस सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त ज्योती प्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

सोशल मीडिया, सायबर गुन्हे, सायबर सुरक्षा व युवकांचे मानसिक आरोग्य या विषयी पार पडलेल्या या परिषदेस महाराष्ट्रभरातील विविध महाविद्यालयांतून अनेक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.परिषदच्या यशस्वीतेसाठी  कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन विभाग व एम. एस. डब्ल्यू च्या  विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

तज्ञांची मदत घेऊन’डेटा गायब ‘ प्रकरणाची चौकशी करा -महापौरांचे आदेश (व्हिडीओ)

0

पुणे –  महापालिकेचा डेटा गायब झाल्याच्या सकाळ मधील वृत्ताचे  काल मुख्य सभेत पडसाद  उमटले. सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला याबाबत धारेवर धरले. त्याची दखल घेऊन, महापौर मुक्ता टिळक यांनी याबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) तज्ज्ञांची मदत घेऊन, चौकशी करण्याचा आदेश प्रशासनाला दिला. तसेच, दरम्यानच्या काळात माहिती तंत्रज्ञान विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडून ते काम काढून घेण्यासही त्यांनी सांगितले.  

डेटा गायब झाल्यामुळे ‘बॉम्बे स्टॉक एक्‍स्चेंज’ (बीएसई)कडे महापालिकेला ताळेबंद सादर करता आलेला नाही. डेटा ‘लॉस्ट’ आणि ‘करप्ट’ झाल्याचे महापालिकेने लेखी पत्राद्वारे ‘बीएसई’ला कळविले आहे. त्याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये गुरुवारी प्रसिद्ध झाले. त्याचे पडसाद महापालिकेच्या सभेत उमटले. नियोजित योजना, त्यांचा खर्च, निविदांमधील गैरव्यवहार आणि सल्लागार कंपन्यांवरील उधळपट्टी लपवण्यासाठीच कर्जरोख्यांसह महापालिकेच्या तब्बल साडेपाच हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाचा हिशेब गायब केल्याचा आरोप सर्वपक्षीय सदस्यांनी केला. ही माहिती लपविण्यामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असून, या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) चौकशी करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. 

सभागृहनेते श्रीनाथ भिमाले म्हणाले, ‘‘शहरातील संपूर्ण माहिती सुरक्षित असणे अपेक्षित आहे. परंतु, ती नष्ट झाली असेल तर ही बाब गंभीर आहे, त्याची चौकशी व्हावी.

नेमके सभागृहात काय झाले ..ते पहा आणि ऐका …

‘महापालिकेचा ‘डेटा’ ‘करप्ट ‘झाला कि केला ? – चेतन तुपे पाटील (व्हिडीओ)

0

पुणे -साडेपाच हजार कोटी रुपये बजेट असलेल्या महापालिकेचा संगणकीय डाटा हरविल्याची बातमी गेल्या २७ तारखेला ‘सकाळ’या वृत्तपत्राने प्रसिध्द केल्यानंतर या बातमीचे पडसाद २८ तारखेच्या मुख्य सभेत उमटले . आणि याप्रकरणी पहा विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी मुख्य सभेत हा मुद्दा उपस्थित करताना नेमके काय म्हटले ….

‘ सकाळ ‘ ने काय बातमी दिली होती …

पुणेकरांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी आखलेल्या समान पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिकेने देशभर गाजावाजा करीत तब्बल दोनशे कोटी रुपयांचे कर्जरोखे घेतले. मात्र, त्यांच्याकडे “बॉम्बे स्टॉक एक्‍स्चेंज’ची (बीएसई) नजर वळताच महापालिकेच्या दप्तरातील आर्थिक वर्षातील हिशेबाच्या नोंदी गायब झाल्याचे उघड झाले आहे. कर्जरोख्यांसोबत सुमारे साडेपाच हजार कोटींच्या अर्थसंकल्पाचाही हिशेब पुन्हा जुळविण्यासाठी दीड महिन्यांपासून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या हिशेबाचा “डेटा’ “लॉस्ट’ अन्‌ “करप्ट’ झाला आहे, असे महापालिकेने “बीएसई’ला पाठविलेल्या पत्रात कळविले आहे.

अर्थसंकल्पाचा ताळेबंद सादर करण्याची मुदत तोंडावर आली असतानाच अशा प्रकारे महापालिकेतील 2017-18 या आर्थिक वर्षाचा हिशेबच गायब झाल्याने महापालिकेच्या वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. समान पाणी पुरवठ्यासाठीचे कर्जरोखे यापूर्वीच वादात सापडले होते. दोनशे कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारले म्हणून महापालिकेला 2017-18 या वर्षाचा आर्थिक ताळेबंद 30 ऑगस्टपर्यंत सादर करणे बंधनकारक होते. परंतु, “डेटा’च गायब झाल्यामुळे ही मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवून मिळावी, अशी विनंती महापालिकेने “बीएसई’ला एका पत्राद्वारे 24 सप्टेंबर रोजी केली आहे. या पत्राची प्रत स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे कॅप ट्रस्टी अभिजित जोशी, “इंडिया रेटिंग अँड रिसर्च’ आणि “केअर रेटिंग्ज लिमिटेड’ यांनाही पाठविण्यात आली आहे.

“गायब झालेला डेटा पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु, हा डेटा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याला वेळ लागत आहे. तो मिळाल्यावरच ताळेबंद तयार करता येणार आहे. त्यामुळे मुदत वाढवून मिळणे गरजेचे आहे,’ असे महापालिकेने पत्रात म्हटले आहे. महापालिकेच्या सर्व्हरमध्ये दोन महिन्यांपूर्वी बिघाड झाला आहे. तेव्हापासून हिशेबाचा तपशील जुळविणे अवघड झाले आहे. महापालिकेने त्यासाठी संगणकतज्ज्ञांची मदत घेतली आहे. दीड महिन्यापासून हा “लॉस्ट’ झालेला डेटा “रिकव्हर’ करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. त्यासाठी महापालिकेचा संगणक विभाग युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे.

अखेर २३ गावांमधील रस्तारुंदीला मिळणार चालना -माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पाठपुराव्याला यश

0
पुणे :महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील अरुंद रस्त्यांचा आणि वाढत्या अपघातांचा गंभीर बनलेल्या प्रश्नातून आता नागरिकांची सुटका होणार आहे. पालिका प्रशासनाने   या गावांमधील रस्तारुंदीबाबत येत्या १५ दिवसात सकारात्मक अभिप्राय सादर करण्यात येत असल्याची ग्वाही माजी उपमहापौर आबा बागुल  यांना दिली आहे.  
महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील अरुंद रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून शेकडो नागरिकांचे अपघातात बळी जात आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून सर्वांनी सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी  महात्मा गांधी जयंती दिनी  मंगळवार दि २ /१०/२०१८पासून पालिका आवारात आमरण उपोषणास बसण्याचा इशारा माजी उपमहापौर आबा बागुल यांनी दिला होता तत्पूर्वी पालिका प्रशासनाने समाविष्ट २३ गावांमधील रस्ता रुंदीबाबत सकारात्मक अभिप्राय येत्या १५ दिवसात सादर करण्याची ग्वाही देऊन  गावांमधील रस्तारुंदीचे क्षेत्र, मोबदला, विकसनाचा खर्च आदींचा आराखडा तयार असून महाराष्ट्र महानगरपालिका अभिनियम २१० अन्वये प्रस्तावित रस्त्यांबाबत सविस्तर विश्लेषण करण्यात येणार आहे.  त्यामुळे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी  उपोषण मागे घ्यावे अशी  विनंती पालिका प्रशासनाने पत्राद्वारे केली आहे. त्यानुसार आबा बागुल यांनी हे आमरण उपोषण तूर्त स्थगित करण्यात येत असल्याचे स्पष्ट करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरूच राहील आणि आमरण उपोषणही केले जाईल  असे स्पष्ट केले आहे. त्यासाठी  स्वारगेट येथे जेधे चौकात सातारा रस्तारुंदीसाठी केलेले उपोषण तसेच अन्य ठिकाणी केलेल्या उपोषणाकडेही त्यांनी  लक्ष वेधले आहे. याबाबत आबा बागुल म्हणाले कि, ज्यावेळी २३ गावे महापालिकेत समाविष्ट झाली त्यावेळी या गावांमधील रस्ते दीडपट रुंद करण्याची मागणी भविष्यातील वाढत्या लोकसंख्या आणि नियोजनाच्यादृष्टीने करण्यात आली होती.  त्यानुसार तसा ठरावही दिला होता .  या गावांचा विकास आराखडा करताना रस्तारुंदी कमी दर्शविण्यात आली होती.त्यामुळे नियोजित रस्ता रुंदीसंदर्भांत  विषय  मांडण्यात आला होता मात्र स्थायी समितीने तो खाससभेकडे वर्ग केला होता. मात्र  प्रशासनाने रस्तारुंदी आवश्यक असल्याचा  प्रस्ताव सादर केलेला असताना तो फेरअभिप्रायाला पाठविण्याचा स्थायी समितीने घेतलेला निर्णय दुर्दैवी  आहे.  वास्तविक  गेली नऊ  वर्षे नियोजित रस्ता रुंदी आणि गावांचा विकास यासाठी पाठपुरावा करीत  असताना अरुंद रस्ते ,वाढणाऱ्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनक बनले आहेअनेकांचे नाहक बळी गेले आहेत. सद्यस्थितीत समाविष्ट २३ गावांमध्ये पुणे महानगरपालिकेकडून जुन्या विकास आराखड्याप्रमाणे बांधकामांना परवानगी दिली जात आहे,वास्तविक हा प्रकार चुकीचा आहे . त्यामुळे संपूर्ण प्रस्ताव पाहून आणि राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून  महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९चे कलम २१० [ १]  [ब] अन्वये २३ गावांमधील रस्ता रुंदी करण्यात यावी यासाठी  पाठपुरावा करीत आहे.  विकास आराखड्यात दर्शविलेल्या रस्त्याच्या  रुंदीप्रमाणे जागेवर रस्ते आखणीबाबत राज्यसरकारने अनुकूल निर्णय घेतल्याने नियोजनबद्ध विकासाला चालना मिळणार आहे  याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले आहे. 

‌प्रा. रविकांत सागवेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

0
पिंपरी । प्रतिनिधी :
‌तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या तंत्रशिक्षण विभागातील प्रा. रविकांत सागवेकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
           यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मुख्याधिकारी वैभव आवारे, शिक्षण  क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापती विभावरीताई दाभाडे, वडगाव मावळ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी मंगलताई वाव्हळ, पुणे महाराष्ट्र विद्या प्राधिकरण बालशिक्षण विभागाचे प्रमुख, लक्ष्मणराव सुपे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, नगरसेवक गणेश खांडगे आदी उपस्थित होते.
         मावळ तालुक्यातील शाळा, विद्यालये, महाविद्यालयातील आदर्श शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. प्रा. सागवेकर हे 1985 पासून इंद्रायणी महाविद्यालयात कार्यरत आहेत. शासनाने गठीत केलेल्या तंत्रशिक्षण विभागाच्या अनेक महत्त्वाच्या समित्या-उपसमित्यांवर तसेच तंत्रशिक्षण विभागाच्या अकरावी-बारावीच्या पुस्तक लेखन समितीचे प्रमुख म्हणूनही प्रा. सागवेकर कार्यरत आहेत.
‌             “मी हा पुरस्कार माझे आई-वडील यांना अर्पण करतो. खरे तर मी आजवर प्रामाणिकपणे केलेले काम आणि संस्थेने माझ्याबद्दल दाखवलेले विश्वास हे आजच्या पुरस्काराचे फलित असल्याचे प्रा. सागवेकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.” त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार केशवराव वाडेकर, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, ज्युनियर विभागाचे प्राचार्य प्रा. सुनील वोव्हाळ, संस्थेचे अधिकारी-पदाधिकारी, सर्व प्राध्यापक वृंद, आजी माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

दांडेकर पूल परिसरातील 350 घरांचा वीजपुरवठा सुरु

0

पुणे : मुठा कालवा फुटल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेल्या चार रोहित्रांचा शुक्रवारी (दि. 28) दुपारी चार वाजता वीजपुरवठा सुरु केल्यानंतर 350 घरांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. मात्र 150 घरांमध्ये अद्यापही पाणी असल्याने व भिंतींची पडझड झाल्यामुळे वीजपुरवठा सुरु करणे शक्य झाले नाही.

गुरुवारी मुठा उजवा कालवा फुटल्यामुळे दांडेकर पूल परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे महावितरणकडून सुरक्षिततेचा उपाय म्हणून या परिसरातील चार रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. शुक्रवारी (दि. 28) सकाळी महावितरणचे 35 अभियंते व जनमित्रांनी पाण्यामुळे बाधीत घरांमधील वीजयंत्रणेची पाहणी सुरु केली. त्याप्रमाणे देखभाल व दुरुस्तीचे कामेही सुरु केली. यामध्ये सर्व्हीस वायर बदलणे, वीजमीटरची जागा बदलणे, नवीन वीजमीटर लावणे तसेच इतर दुरुस्तीचे कामे करण्यात आली. दुपारी चार वाजता चारही रोहित्रांचा वीजपुरवठा सुरु केल्यानंतर 350 घरांमधील वीजपुरवठा सुरु झाला. मात्र या परिसरातील 150 घरांमध्ये अद्यापही पाणी आहे. भितींमध्ये ओल आहे व भितींची पडझड झालेली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या घरांमध्ये वीजपुरवठा सुरु करणे शक्य झाले नाही. या घरांची आवश्यक दुरुस्ती झाल्यानंतर वीजपुरवठा सुरु करण्यात येणार आहे.

‘ज्येष्ठोत्सव २०१८’ ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विशेष कार्यक‘म

0

पुणे- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आमदार प्रा. मेधा कुलकर्णी व ऍस्कॉप संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘ज्येष्ठोत्सव २०१८’ या विशेष कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले आहे.संयोजिका आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी ही माहिती कळविली आहे.

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सोमवार, दिनांक १ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता डी. पी. रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स (म्हात्रे पुलाजवळ) या कार्यक‘माचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट कार्यक‘माचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्ये शां. ग. महाजन, अभिनंदन थोरात, प्रतिभा शाहू-मोडक, माधव वझे, सुधीर गाडगीळ, विश्‍वास मेहेंदळे, डॉ. मोहन आगाशे, भूषण गोखले, दीपा लागू, अरुणा ढेरे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धा, फनफेअर, विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर, बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक‘ी आणि विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान असे विविध कार्यक‘म यावेळी होणार आहेत.

पीएमआरडीएच्या पाच विभागांचे आकुर्डी प्राधिकरण कार्यालयात स्थलांतर

0

पुणे-– वाढता कामाचा व्याप व अधिकारी कर्मचारी यांची अपुरी बैठक व्यवस्था कमी पडत असल्याने पुणे
महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाअंतर्गत (पीएमआरडीए) समावेश असलेली जमीन मालमत्ता, अनधिकृत
बांधकाम विभाग, अभियांत्रिकी विभाग १, २, ३ आकुर्डीतील पीसीएनटीडीए तिसरा मजला येथे स्थलांतरित करण्यात
आले आहेत.
तसेच उर्वरित नियोजन विभाग, प्रशासन व आस्थापना, लेखा विभाग एक महिन्याच्या कालावधीत स्थलांतरित होणार
आहेत. तसेच मुख्य कार्यालय, विकास परवानगी, अग्निशमन विभाग कार्यालय औंध येथील सयाजीराव गायकवाड भवन
येथेच राहतील. नागरिकांनी स्थलांतरित झालेल्या विभाग प्रमुखांकडे माहितीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास
प्राधिकरण, पीसीएनटीडीए बिल्डिंग, ए विंग, तिसरा मजला, आकुर्डी रेल्वे स्टेशन, आकुर्डी पुणे -४११०४४, येथे संपर्क
साधावा, असे आवाहन महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी केले आहे.
तसेच दूर तालुक्यातील नागरिकांसाठी पीएमआरडीएची वाघोली (शिरूर व हवेली), नरसापूर (हवेली, भोर व वेल्हा),
भूगाव (मुळशी), वडगाव (मावळ), चाकण(खेड) येथे प्रादेशिक कार्यालय दिवाळीपर्यंत सुरु करण्यात येणार आहेत.