पिंपरी । प्रतिनिधी :
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या तंत्रशिक्षण विभागातील प्रा. रविकांत सागवेकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मुख्याधिकारी वैभव आवारे, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापती विभावरीताई दाभाडे, वडगाव मावळ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी मंगलताई वाव्हळ, पुणे महाराष्ट्र विद्या प्राधिकरण बालशिक्षण विभागाचे प्रमुख, लक्ष्मणराव सुपे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, नगरसेवक गणेश खांडगे आदी उपस्थित होते.
मावळ तालुक्यातील शाळा, विद्यालये, महाविद्यालयातील आदर्श शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. प्रा. सागवेकर हे 1985 पासून इंद्रायणी महाविद्यालयात कार्यरत आहेत. शासनाने गठीत केलेल्या तंत्रशिक्षण विभागाच्या अनेक महत्त्वाच्या समित्या-उपसमित्यांवर तसेच तंत्रशिक्षण विभागाच्या अकरावी-बारावीच्या पुस्तक लेखन समितीचे प्रमुख म्हणूनही प्रा. सागवेकर कार्यरत आहेत.
“मी हा पुरस्कार माझे आई-वडील यांना अर्पण करतो. खरे तर मी आजवर प्रामाणिकपणे केलेले काम आणि संस्थेने माझ्याबद्दल दाखवलेले विश्वास हे आजच्या पुरस्काराचे फलित असल्याचे प्रा. सागवेकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.” त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार केशवराव वाडेकर, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, ज्युनियर विभागाचे प्राचार्य प्रा. सुनील वोव्हाळ, संस्थेचे अधिकारी-पदाधिकारी, सर्व प्राध्यापक वृंद, आजी माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.