Home Blog Page 3068

किंग घडवणाऱ्या दिग्दर्शकांना सांगितीक सलामी

0

‘किंगमेकर्स’कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद.

पुणे : जुन्या काळातील दिग्गज दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांमधून संबंधित कलाकारांकडून,
त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांना योग्य न्याय मिळेल असे काम करवून घेतले, ते कलाकार पुढे
रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ‘किंग’ बनले अशा दिग्दर्शकांची ओळख हिंदी गाण्यांच्या
‘किंगमेकर्स’ ऑर्केस्ट्रातून रसिकांना करुन देण्यात आली.
पुणे नवरात्रौ महोत्सवाची तिसरी’माळ’ऑर्केस्ट्रातील बहारदार हिंदी गाण्यांनी गुंफण्यात आली.
गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सूर-पालवी प्रस्तुत, संजय हिवराळे आणि पल्लवी पत्की-ढोले
निर्मित कार्यक्रमात एस.यू.सनी, के.असिफ, बिमल रॉय, सुबोध मुखर्जी, बासू भट्टाचार्य, राजकपूर,
गुरुदत्त, विजय आनंद, ज्योती स्वरुप, ऋषिकेश मुखर्जी, नासिर हुसेन, लेख टंडन, शक्ती सामंता,
फिरोज खान, प्रकाश मेहरा, बी.आर.चोप्रा, जे.ओमप्रकाश, राज खोसला, रमेश सिप्पी, जे.पी.दत्ता या
दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमधील गाणी पल्लवी, अभिषेक, संतोष, इरफान या
गायकांनी सादर केली. अवीट गोडीच्या या गाण्यांना प्रेक्षकांमधून वन्समोअरची दाद वारंवार
मिळत होती. जुन्या पिढीतील श्रोत्यांना त्यांच्या तरुणपणातील हळुवार आठवणींना त्या
गाण्यांद्वारे उजाळा मिळाला. ‘मुकद्दर का सिकंदर’ या गाजलेल्या सिनेमातील ‘सलामे इश्क मेरी
जान’ हे गाणे पल्लवी आणि संतोष यांनी सादर केले. त्या गाण्याला वन्समोअर मिळाले., तेव्हा या
गाण्याला पुणे नवरात्र महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष ,नगरसेवक व माजी उपमहापौर आबा बागुल
साथ करणार असतील तर वन्समोअर घेण्याची तयारी पल्लवी या गायिकेने दाखविली. तिच्या
आवाहनाला दाद देत आबा बागुल यांनी तिच्याबरोबर गाणे सादर केले. रसिकांकडून आबा
बागुलांच्या या कलाविष्काराला जोरदार दाद मिळाली. सर्वच उपस्थितांना आबा बागुलांमधील ही
गायनी कला पाहून कौतुक वाटले. या कार्यक्रमात आबा बागुल यांचे बंधू राजेंद्र बागुल यांनी
मुसाफिर हूँ यारों हे गीत सादर केले.
सध्या गाजत असलेल्या कुंकू, टिकली, टॅटू मालिकेतील टॅटूची भूमिका साकारत असलेली कलाकार
भाग्यश्री न्हावले ही आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होती. तिचा सत्कार ज्येष्ठ नेते उल्हास पवार
आणि नवरात्रौ महिला महोत्सवच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी

व्यासपीठावर नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ लडकत,
हर्षदा बागुल उपस्थित होते.
गायकांना मिहीर भडकमकर, अमृता केदार, रोहित साने, अंकुश बोर्डे, विनोद सोनावणे, शाम, सचिन
वाघमारे, विजू मूर्ती, महेश रिसोडकर या वादक कलाकारांनी साथ दिली. निलम, चैत्राली, रिया यांनी
कोरसची साथ केली.
निकोप सहकार्याची जागा अजून द्वेषपूर्ण स्पर्धेने घेतली नव्हती. सर्वच कलाकार एकमेकांना मदत
करायला कायमच तयार असायचे त्या काळातील हे दिग्दर्शक. त्यांची वैशिष्ट्ये सांगत, खुमासदार
किस्से सांगत महेश अचिंतलवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. घनश्याम सावंत यांनी
संयोजन समितीच्यावतीने आभार मानले. यावेळी नंदकुमार बानगुडे, अमित बागुल, नंदकुमार
कोंढाळकर, रमेश भंडारे, हेमंत बागुल उपस्थित होते

राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्यावतीने ” मतदार नाव नोंदणी व दुरुस्ती अभियान”

0

पुणे-सोमवार पेठमधील नरपतगीर चौकात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्यावतीने ” मतदार नाव  नोंदणी व दुरुस्ती अभियान”  सुरू करण्यात आले. या अभियानाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  पुणे  शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक प्रदीप गायकवाड , राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे कॅंटोन्मेण्ट विधानसभा मतदार संघाचे  अध्यक्ष विशाल नाटेकर  , राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष फहिम शेख, अध्यक्ष भोलासिंग अरोरा , राहुल तांबे, विशाल मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . या  अभियानाचे आयोजन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे कॅंटोन्मेण्ट विधानसभा मतदार संघाचे  अध्यक्ष विशाल नाटेकर यांनी केले होते .या अभियानासाठी ललिता जगदाळे , सुषमा आंग्रे , गोपी कुरवर यांनी परिश्रम घेतले . 

‘मेरी सायकल’ लघुपटातून संस्कार मूल्यांची जपणूक

0
पुणे : आजच्या गतीमान युगात संस्कार मूल्यांचा ऱ्हास होत आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्ये अधिक आनंद सामावलेला असतो, हे नव्या पिढीला समजावून सांगण्याची खरी गरज आहे. नेमका हाच संदेश ‘मेरी सायकल’ हा लघुपट देऊन जातो. या लघुपटाचा प्रीमियर शो पुण्यातील वैकुंठ मेहता नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ कोऑपरेटिव मैनेजमेंटच्या प्रेक्षागृहात नुकताच आयोजित करण्यात आला होता.
निनाद हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील छोटा मुलगा. त्याच्या वाढदिवशी त्याची मोठी बहीण त्याला एक नवीकोरी सायकल भेट देते. त्याच दिवशी निनाद आपल्या मित्रांबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी सायकल घेऊन मैदानावर जातो. खेळून झाल्यावर पाहतो तर त्याची सायकल चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात येते. सायकल हरवल्याचे समजताच वडील निनादला रागावतात. अखेर पोलिसात तक्रार दिली जाते. त्यानंतर काय होते हे पडद्यावर पाहणे उत्सुकतेचे ठरेल. निनादची सायकल त्याला सापडते का ? सायकल कोणी चोरलेली असते ? का चोरलेली असते ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. त्यातूनच हा लघुपट मुलांवर चांगला संस्कार बिंबवून जातो.
या लघुपटात निनादची भूमिका स्वराज कांबळे या छोट्या मुलाने केली आहे. पडद्यावर प्रथमच काम करताना स्वराजमध्ये नवखेपणा जाणवत नाही. अतिशय समरसून त्याने निनादची भूमिका केली आहे. त्याला पार्थ पटकराव या छोट्या मुलाने चांगली साथ दिली आहे. अन्य कलाकारांमध्ये अगस्त आनंद (वडील), रिचा सिंग (आई), आर्विका गुप्ता (बहीण), डॉ आदित्य पटकराव (पोलीस इन्स्पेक्टर) पार्थ  पटकराव (पार्थ) आणि हिंदी सिनेमासृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप राज यांनी (पार्थचे आजोबा) यांनी भूमिका केल्या आहेत.
अगस्त आनंद यांनी या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. त्यांनी लहान मुलांकडून छान भूमिका करून घेतली आहे. लघुपटाची निर्मिती आदित्य पटकराव आणि प्रियंका आनंद यांनी केली आहे.
एकूणच लुप्त होत चाललेल्या मानवी मूल्यांना  पुनरुज्जीवित करण्याचे काम हा लघुपट करून जातो. दुसऱ्याला आपल्या सुखामध्ये सामावून घेणे आणि घेण्यापेक्षा देण्यामध्ये अधिक आनंद सामावलेला असतो हा संदेश हा लघुपट देऊन जातो.

शांताबाईंच्या प्रतिभासंपन्न शब्दांच्या गोंदणाला लाभलं रंगतदार कार्यक्रमाचं कोंदण !

0
पुणे :’कळयांचे दिवस ‘ सारख्या कविता, ‘ही वाट दूर जाते ‘, जीवलगा, ‘ऋतू हिरवा ‘, ‘शारद सुंदर चंदेरी राती ‘, ‘रेशमाच्या रेघांनी ‘, ‘तोच चंद्रमा नभात ‘, ‘ शालू हिरवा ‘ , ‘ वल्हव रे नाखवा ‘ या सारख्या शांताबाईंच्या प्रतिभासंपन्न शब्दांच्या गोंदणाला लाभलं रंगतदार कार्यक्रमाचं कोंदण !
निमित्त होतं ‘ अनन्वय’ संस्थेने सादर केलेल्या ‘ गोंदण शब्दांचं ‘ या कार्यक्रमाचे !
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन तर्फे  शांता शेळके यांच्या कवितांवर आधारित  ” गोंदण शब्दांचं ” कार्यक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते.
 रविवार  १४ अॉक्टो २०१८ रोजी  सकाळी नातू सभागृह , सेनापती बापट रस्ता येथे झालेल्या कार्यक्रमाला काव्य रसिकांचा रंगतदार प्रतिसाद मिळाला.
भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
‘कळयांचे दिवस ‘ सारख्या कविता, ‘तोच चंद्रमा ‘ सारख्या गझल, ‘ही वाट दूर जाते ‘, ‘ मागे उभा मंगेश ‘, ‘जीवलगा ‘, ‘ऋतू हिरवा ‘, ‘शारद सुंदर चंदेरी राती ‘, ‘रेशमाच्या रेघांनी ‘ , ‘ ही चाल तुरुतुरू ‘ सारख्या अवीट गाण्यांनी, नाटय पदांनी , ‘झुरळाच्या लग्नाची वरात ‘ सारख्या बालगीतांनी रसिकांना मोहून टाकले.
 कवयित्री , गीतकार शांताबाईंच्या प्रतिभासंपन्न गीतांचे सादरीकरणाने हे ‘ गोंदण शब्दांचं ‘ उत्तरोत्तर रंगत गेलं.
 जन्मगावच्या शेळकेवाडयापासून श्रेष्ठ कवयित्री, प्रतिभासंपन्न गीतकार होण्यापर्यतचा शांताबाईंचा जीवनप्रवास  या कार्यक्रमातून हळूवार उलगडत गेला.
हा कार्यक्रम अनन्वय ‘  संस्थेने सादर केला.
दिग्दर्शन डॉ.माधवी वैद्य यांचे होते . कार्यक्रमाची संहिता मुग्धा गोडबोले – रानडे  यांची तर संगीत संयोजन राहुल घोरपडे यांचे होते. मुग्धा गोडबोले -रानडे ,रमेश पाटणकर यांनी निवेदन केले.अमृता कोलटकर ,मीनल पोंक्षे,राहुल घोरपडे यांनी  गायन केले.मिलिंद गुणे,नीलेश श्रीखंडे ,आदित्य आपटे यांनी साथसंगत केली. शांता शेळके यांच्या दुर्मिळ ध्वनीचित्रफितीने कार्यक्रमाची  खुमारी वाढली.विश्वास जोशी, डॉ. किरण ठाकूर,सुनील महाजन, अक्का कराड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पारंपरिक जलस्रोत जोपासण्यासाठी चळवळ उभारणे आवश्यक-देवटाक्यांपासून अमृतेश्वर मंदिरापर्यंत कलश पूजन

0

पुणे. निसर्गातील पारंपरिक जलस्रोत नष्ट होऊ लागले आहे. याच जलस्रोतांना जपण्यासाठी “भवताल” या दिवाळी अंकातून एक चळवळ उभी करण्याचा मानस आहे. जेणे करून या पारंपरिक जलस्रोतांची जपणूक व्हावी. याचा जलस्रोतांचा आढावा घेणाऱ्या भवताल या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे किल्ल्ले सिहंगडावर खासदार छत्रपती संभाजी राजे , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिपक करमळकर यांच्या उपस्थितीत  पार पडला. अशी माहिती भवतालचे संपादक अभिजीत घोरपडे यांनी दिली. यावेळी देवटाक्यांपासून अमृतेशवर मंदिरापर्यत कलशपूजनही करण्यात आले.

यावेळी खासदार छत्रपती संभाजी राजे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक करमळकर , पर्यावरण अभ्यासक अरुणचंद्र पाठक, भवतालचे संपादक अभिजित घोरपडे यांसह आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कुलगुरू करमळकर  म्हणाले, आज पर्यावरण जागृतीची गरज निर्माण झाली असून भवतालसारख्या अंकातून हे पारंपरिक स्रोत जपण्यासाठी जी चळवळ उभी रहात आहे ती अभिनंदनीय आहे. याशिवाय ती तरुण पिढीसाठी मार्गदर्शक आहे.गड, किल्ल्यांची जपणूक होणे ही काळाची गरज आहे. या चळवळीत सर्वानी सहभागी होणे गरजेचे आहे.

खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी सांगितले, आज नैसर्गिक जलस्रोत नष्ट होत असून त्याची जपणूक होणे गरजेचे आहे. तसेच या गड, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी  शासनाने ६०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार त्याचे संवर्धन केले जाणार आहे. याशिवाय पर्यावरणाविषयी आस्था असणाऱ्या निसर्ग प्रेमींना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

अन खासदार संजय काकडेंनी पोलिसलाईनमध्ये पाठविले पाण्याचे 10 टँकर

0

पोलिसलाईनमधील पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पुण्यात येताच संबंधितांची भेट घेणार – खासदार संजय काकडे

पुणे-पुणेकरांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांवर व त्यांच्या कुटुंबियांवर पाण्यासाठी वणवण भटकायची वेळ आलीय, हे दुर्दैवी आहे.खासदार संजय काकडे यांच्याकडून जोपर्यंत पोलीस लाईनमधील पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत दररोज पाण्याचे 10 टँकर पाठविले जाणार आहेत. आता 10 टँकर पाठविले आहेत. तसेच, पोलिसलाईन मधील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी संबंधितांची लवकरच भेट घेणार असल्याचे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

खासदार संजय काकडे पुण्यात नाहीत. त्यांना पाोलिसलाईनमधील पाणी टंचाईची माहिती मिळताच खासदार काकडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगून पाण्याचे 10 टँकर पोलिसलाईन मध्ये पाठविण्याची व्यवस्था केली. पोलिसलाईनमधील पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पुण्यात येताच खासदार संजय काकडे संबंधितांची भेट घेणार आहेत.

पोलिसांना हि पाणी नाही-पालकमंत्री हतबल ..बोला आता …

0

पुणे-पुणे तिथे काय उणे ..म्हणतात ..पण पाण्याचं ऐतिहासिक सौख्य लाभलेल्या पुण्यनगरीत ऑक्टोबर मध्येच पाण्याच्या टंचाईला सामोरे जाण्याची ऐतिहासिक वेळ येवून ठेपली आहे .शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीत गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या पोलिसांच्या नातेवाईकांनी रविवारी सकाळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर मोर्चा नेला. तसेच वसाहतीबाहेर रास्ता रोको आंदोलन केले आहे. बापट यांनी सायंकाळपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे.

खडकवासला कालवा फुटीनंतर शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे शहरातील हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील पूर्व भागातील पाणी पुरवठा तर यापूर्वीपासूनच विस्कळीत आहे. शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये अगोदरपासून अपुरा पाणीपुरवठा होत होता. त्यात गेल्या तीन दिवसांपासून जलसंपदा विभागाने पालिकेचे पंप बंद केल्याने एसएनडीटी टाकीतून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने जंगली महाराज रोड, शिवाजीनगर गावठाण, जनवाडी, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी या परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये तर अत्यंत कमी दाबाने गेल्या ४ दिवसांपासून पाणी येत आहे. अनेक इमारतीमध्ये तर पाणीच आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलीस कुटुंब रविवारी सकाळी रस्त्यावर आले. महिलांनी पुढाकार घेऊन वसाहतीबाहेरील रस्त्यावर बादल्या, हंड्यांसह ठाण मांडले आहे.

दुसरीकडे काही महिला व पुरुष यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा नेला. त्यांनी आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यानंतर गिरीश बापट यांनी सायंकाळपर्यंत टँकरने पाणी पुरविले जाईल असे आश्वासन दिले.

…निवडणुकीच्या तोंडावर… भाजप फुटीच्या मार्गावर …

पुणे-राज्यात सत्ता, केंद्रात सत्ता ,आणि पालिकेत सत्ता तरीही जनता सोडा ,कार्यकर्ताच उपेक्षित … २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर आम्ही पक्षाचे राजीनामे देऊ .. असा सज्जड इशारा भाजपच्या एकमेव खासदाराला जुन्या कार्यकर्त्यांसह अनेकांनी दिल्याचे वृत्त आहे.
खासदार शिरोळेंनी प्रयत्न करूनही त्यांना दिल्ली ,मुंबईने जुमानले नाही ,त्यांच्या कार्यकर्त्यांना ते बळ देवू शकले नाही … एवढेच काय पुण्यातील कोणीही आमदार,खासदार, मंत्री हे आपल्या कार्यकर्त्यांची महामंडळ आणि समतुल्य समित्यांवर नियुक्त्या करून त्यांना बळ देवू शकलेले नाही . किंवा त्यांनी तसा प्रयत्नच केला नाही अशा कारणांनी शहर भाजप मधील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरत आहे… उपयोग काय ,सत्ता सगळीकडे आमच्या पक्षाची…आणि प्रत्यक्षात जनता सोडा…आमचीही कुठे वर्णी लागेना ..अशी असंख्य कार्यकर्त्यांची तक्रार आहे .
या पार्श्वभूमीवर लोकसभा ,विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वेळीच कार्यकर्त्याला बळ द्या ,अन्यथा निव्वळ नेतेच उरतील कार्यकर्ते उरणार नाही अशी स्थिती भाजपची झाल्याशिवाय राहणार नाही असा दावा केला जातोय. .
कॉंग्रेसचे जे झाले ,नेते वीस आणि कॉंग्रेस धुळीस ..तशीच काही अवस्था भाजपची होऊ शकते ,असे सांगितले जाते . पुण्यात कॉंग्रेस ला कलमाडी नंतर कोणी एक नेता लाभला नाही .तसाच काहीसा प्रकार भाजपचाहि आहे . सर्वत्र सत्ता असूनही भाजपचा येथील कारभार एकसूत्री असा नाही . बहुसमावेशिक नेतृत्वाचा फटका कॉंग्रेसने खाल्ला आहे. भाजप मध्ये पालकमंत्री बापट,खासदार शिरोळे आणि खासदार काकडे,शहराध्यक्ष गोगावले अशी नेत्यांची फळी आहे. पण त्याबरोबरच अन्य सात आमदार हि स्वयंघोषित नेतृत्वाकडे वाटचाल करीत आहेत . खरे सांगायचे तर येथे हि एक असा कोणी नेता नाहीच .सगळी भेळ-मिसळ झाली आहे ,त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी मुख्यमंत्री ..यांच्याकडे पाहिले जाते. म्हणजेच पुण्याचे नेतृत्व ..राज्याच्याच नेतृत्वाच्या कडे आहे. आता राज्याचा आणि नागपूरचा कारभार पाहता पाहता ,मुख्यमंत्र्यांना पुण्याकडे पाहण्यास कितीसा वेळ मिळणार ? शिवाय येथील सर्व नेते स्वयंघोषित … या परिस्थितीत येथील  भाजपमधील कार्यकर्ता उपेक्षित राहतो आहे. पुण्यात कार्यालये असलेल्या महामंडळांवर कोल्हापूरच्या चंद्रकांत दादांनी आपले कार्यकर्ते बसविले.पण पुण्यातल्या आमदारांना मात्र येथे दुसरी फळी निर्माणच होऊ द्यायची नसावी .आपल्याला पर्याय कोणी दिसूच द्यायचाच  नाही,निव्वळ स्वतःचेच पहायचे .. अशीच भूमिका त्यांची असावी असा त्यांचा कारभार राहिला आहे असा आरोपही होतो आहे.
या सर्व परिस्थितीत काही कार्यकर्त्यांनी पुण्याच्या एकमेव खासदारांकडे जाऊन हि सारी गाऱ्हाणी मांडली तेव्हा कार्यकर्त्यांच्या  नियुक्त्यांसाठी आपण दिल्लीला पाठवलेली सारी पत्रे त्यांनी दाखविली .पण त्या त्या क्षेत्रातील तज्ञांचीच नावे द्या असे सांगत  दिल्लीश्वरांनी पुण्यातल्या कार्यकर्त्यांच्या हाथी तुळशीपत्र ठेवले .या पार्श्वभूमीवर निवडणूक जाहीर झाल्यानंतर जेव्हा कधी पक्षाचे नेते काही निर्णय घेत जातील तेव्हा तेव्हा भाजप फुटीच्या मार्गावर दिसल्यास नवल वाटणार नाही अशी स्थिती आहे.

आ.टिळेकरांना -फोन रेकॉर्डिंगची ही व्हायरल क्लिप दोषी ठरवू शकेल काय ?

पुणे-भाजप चे हडपसर विधानसभा मतदार संघातील आमदार भायुमोचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यावर प्रख्यात  रवी बराटे यांनी 50 लाखाची खंडणी मागितल्याचा आरोप केला ,याप्रकरणी एक महिन्यानंतर आमदारांवर गुन्हा दाखल झाला .आता या प्रकरणी बिबवेवाडीतील मेघदूत हॉटेल मधील बैठकीतील संभाषणाचे  काही पुरावे बाहेर  आलेले नसले तरी आमदारांच्या आणि त्यांच्या बंधूंचे एकबोटे नामक कुणाशी फोनवर झालेल्या संभाषणाची ऑडीओ क्लिप मात्र व्हायरल झाली आहे.हि क्लिप कुणी आणि का व्हायरल केली आहे ? हे अद्याप स्पष्ट नसले तरी हि क्लिप आमदारांविरोधात सबळ पुरावा ठरू शकेल काय ?यावर मात्र चर्चा झडू लागल्या आहेत .एकंदरीत भाजपचे हे आमदार बदनामीच्या वावटळात पुरेपूर अडकल्याचे चित्र आहे.त्यांच्या पक्षाने याबाबत अद्याप काही भूमिका जाहीरपणे स्पष्ट केलेली नाही.
गेल्या वर्षापासून आपली बदनामी करण्यात येत असल्याचा दावा करत, हे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप करत ,सफाई देत असलेल्या या भाजपमधील या सर्वात युवा आमदाराने विशेष म्हणजे हि क्लिप देखील नाकारल्याचे वृत्त  नाही .रवी बराटे आपले मित्र असल्याने ते आपल्याबरोबर असत,असे  ते सांगत आहेत तर दुसरीकडे बराटे यांच्याकडून मात्र त्यांच्यावर  फिर्याद करणे ,आणि आरोप करणे असे प्रकार होत असल्याचे दिसते  आहे.बराटे यांनी आजवर यापूर्वी अनेक प्रकरणे हाताळली आहेत .त्याबाबत त्यांची ख्याती आहे. पण आता सध्या तरी आ. टिळेकर प्रकरणातील या ऑडीओ क्लीपच्या चर्चेला उधाण आले  आहे .
आ. टिळेकर यांच्या म्हणण्यानुसार ,गणेश कामठे हा त्यांचा कार्यकर्ता आहे ज्याचा केबल व्यवसाय कोंढवा परिसरात  आहे.
फिर्यादी बराटे यांच्याबद्दल ते  इ व्हीजन टेलि इन्ट्रा प्रा.लि. (मेंहदळे गॅरेज, एरंडवणा) येथे नोकरीस असुन ते पुणे शहरातील दक्षिण विभागात एरिया मॅनेजर म्हणुन काम करतात. कंपनीतर्फे शहरातील विविध ठिकाणी इंटरनेट फायबर ऑप्टीक केबल मार्फत जोडण्याचे तसेच खासगी व्यक्ती व आय टी आय पार्क यांना शुल्क आकारून सेवा पुरविण्याचे काम केले जाते. अशी माहिती पूर्वीच प्रसिद्ध झाली आहे.
आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार  कोंढवा परिसरात केबल विषयी या कंपनीने त्यांचा कार्यकर्ता केबल व्यावसायिक कामठे याच्याशी काही करार करून केबल संदर्भात व्यवहार करण्याचा प्रयत्न केला .तेव्हा या दोघात काही मतभेद झाले आणि कार्यकर्त्याचे काम म्हणून त्यांना फोन लावून देण्यात आला . आणि आमदार सगळ्यांशी बोलतात तसे ‘त्याचे काय असेल काम करून टाका असे म्हणाले,त्यांनी स्वतः आणि त्यांच्या भावाने स्वतः पैशाचा विषय अगर शब्द  काढलेला नाही.
जेव्हा पलीकडून ‘कामठे 50 लाख मागतो ‘असे वाक्य आले तेव्हा त्यांच्याशी बोलणारा आमदारांचा भाऊ चेतन यांचे असे म्हणणे आहेकी , -क्षणभर मी थांबलो …आणि काही समजले नाही, म्हणून प्रत्यक्ष भेटून बोलू ;असे म्हणून विषय थांबविला’ असे म्हणणे मांडतो आहे .या प्रकरणी सोशल मिडीयावर देखील चर्चा उसळते आहे. तर काही ऑनलाईन माध्यमांना प्रसारित झालेल्या फिर्यादीच्या तोंडून ,हा आपला आवाज नाही असे आमदार म्हणू शकतात काय ? गृहखाते सीएम कडे आहे मग षड्यंत्र कोण करते ?राष्ट्रवादीची ११७ प्रकरणे भाजपने विरोधी पक्ष असताना विधीमंडळात  मांडली ती कागदपत्रे मीच  काढली होती ,मग तेव्हा विरोधकांचे कारस्थान होते काय ?तेव्हा मी काढलेली कागदपत्रे भाजपला गोड वाटत होती ?आणि आता ?अशी वाक्ये असलेले बाईट्स व्हायरल  होत आहेत .
दरम्यान या सर्व प्रकरणात सध्या महत्वाचा दुवा असलेली ऑडीओ क्लिप ‘ ऐकली तर ..हि क्लिप सबळ पुरावा ठरू शकते काय ? असा सवाल केला जातो आहे . तथापि महिनाभर तपास करून देखील ‘पोलीस तपास सुरु आहे’ एवढेच पोलीस सांगताना दिसत आहेत .
एकंदरीत या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आमदार टिळेकर या वादळातून बाहेर पडणार कि अडकणार ?या मागे खरोखर काही राजकीय षड्यंत्र आहे कि आमदार दोषी आहेत ?हे येणारा काळच सांगू शकणार आहे.

सुप्रिया सुळे यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील शेरेबाजी- २०१४ मधील आपल्यावरील गुन्हा मंत्री जानकारांनी लपवून ठेवला काय ?

0

पुणे-खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील शेरेबाजी करून टीका केल्याच्या आरोपावरून बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे तत्कालीन उमेदवार व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्यावर 2014  मध्ये  वेल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता.  भारतीय दंड संहिता 509, 294, व 171 पोट कलमानुसार तक्रार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रदीप मरळ यांनी केली होती. या तक्रारीची दखल पोलिसांनी घेऊन महायुतीचे तत्कालीन उमेदवार व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्यावर वरील कलमान्वये गुन्हा दाखल केला असताना या प्रकरण खटल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये दिली नाही. महादेव जानकर यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये सदरील माहिती लपविली असल्याचा आरोप होतो आहे. दरम्यान मंत्री  महादेव जानकर यांनी याबाबत खुलासा  केला आहे की, माझ्यावर जगात कोठेही गुन्हा दाखल नसून वेल्हा येथील दाखल गुन्ह्याची माहिती मला नुकतीच मिळाली आहे. सदरील तक्रार गैरसमजुतीने करण्यात आलेली असून आरोपामध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. निवडणूक विषयक शपथपत्र दाखल करताना सदरील प्रकरणाची माहिती माझ्याकडे नसल्याने मी नमूद केली नाही नुकतेच समन्स मिळाले त्यामुळे जाणीवपूर्वक माहिती लपविली असल्याचा आरोप त्यांनी खोडून काढला

निवडणूक दरम्यान वेल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता. याप्रकरणाची नियमित सुनावणी पुणे येथील सह दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुरु आहे. वेल्हा पोलीस स्टेशन प्रथम माहिती अहवाल क्रमांक: 40 ने गुन्हा नोंद असून सन 2014 मध्ये दाखल केलेला आहे. संक्षिप्त फौजदारी खटला दाखल क्रमांक: 435494/2015 तारीख 28-12-2015 असा असून नोंदणी क्रमांक: 424727 असा आहे. या खटल्यातील पहिली सुनावणी 31 डिसेंबर 2015 रोजी घेण्यात आली. गेल्या महिन्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी न्यायालयात उपस्थिती दर्शवली असल्याची माहिती देखील पुढे येत आहे. या खटल्यातील पुढील सुनावणी तारीख 26 ऑक्टोबर 2018 आहे. सन २०१६ मध्ये ९ वेळा सुनावणी तारीख होती तर सन २०१७ मध्ये ६ वेळा सुनावणी तारीख नमूद असून २०१८ मध्ये सुनावणीच्या ५ तारखा झालेल्या आहेत. या न्यायालयात याचिकाकर्ता म्हणून महाराष्ट्र शासन विरुद्ध प्रत्युत्तरार्थी महादेव जगन्नाथ जानकर असे नमूद आहे. एकूण 20 वेळा झालेला सुनावणी तारखांपैकी गेल्या महिन्यात एक वेळ यांनी प्रत्यक्षात हजेरी लावली असल्याची माहिती आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर २०१५ मध्ये घेण्यात आले. यावेळी भाजपचे उमेदवार म्हणून विधानपरिषद सदस्य म्हणून नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल केले होते. दि. २०/१/२०१५ रोजी केलेल्या या शपथपत्रामध्ये कोणताही गुन्हा दाखल नसून निरंक असे नमूद केले होते. तर दुसऱ्यांदा जुलै २०१८ मध्ये महादेव जानकर यानी रासप या त्यांच्या पक्षाचा तिकिटावर निवडणूक लढवण्याचा हट्ट भाजपने पुरविला या वेळी विधानपरिषद सदस्य म्हणून नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल केले होते. दि. ५/६/२०१८ रोजी केलेल्या या शपथपत्रामध्ये केवळ गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील नगरपालिका निवडणूक आचारसंहिता भंगाचा दाखल गुन्हा प्रकरणाची माहिती देण्यात आलेली होती. मात्र प्रलंबित संक्षिप्त फौजदारी खटला दाखल प्रकरणाची माहिती निवडणूक शपथपत्रात दिली नसून लपविण्यात आल्याचे उघड झाले आहे. निवडणूक लढवताना शपथपत्रात खोटी माहिती माहिती देणे अथवा माहिती लपविणे लोकप्रतिनिधित्व कायदा प्रमाणे गुन्हा आहे. निवडणुकीत खोटे शपथपत्र सादर करणे हा भारतीय दंड विधाननुसार अपराध आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उमेदवाराने आपली संपत्ती, शिक्षण दाखल गुन्हे याबाबत खरी माहिती देणे उमेदवारावर बंधनकारक आहे. प्रतिज्ञापत्र खोटे असल्याचे सिद्ध झाल्यास संबधित व्यक्तींवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.
अभियांत्रिकी पदवी मिळवलेले जानकर यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पळसावडे हे आहे. महादेव जानकर यांनी 2003 साली चोंडी (जि. अहमदनगर) येथे राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर 2004 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका लढविल्या. लोकसभेला बारामती, सातारा मतदारसंघात तर विधानसभेला परंडा (जि. उस्मानाबाद) मतदारसंघात दखलपात्र मते मिळाली. बीड जिल्ह्यातील अंबोजोगाई तालुक्‍यातून त्यांचा पहिला पंचायत समिती सदस्य आणि पहिला जिल्हा परिषद सदस्य निवडून आला होता. 2006 मध्ये स्वत: महादेव जानकर यांनी सांगलीमधून लोकसभेची पोटनिवडणूक लढवली. यानिमित्ताने पक्षाची राज्यभर चर्चा झाली होती. 2009 मध्ये जानकर यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढले. त्यावेळी लाखभर मते मिळाली होती. त्यानंतर 2009 च्या विधानसभेला रासप हा रिपब्लीकन डावी लोकशाही समितीत (रिडालोस) सामील झाला होता. या युतीतून रासपचा पहिला आमदार अहमदपूर (लातूर) मतदारसंघातून निवडून आला होता. 2014 च्या लोकसभेपुर्वी दोन वर्षे महादेव जानकर हे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात होते. त्यांच्या माध्यमातून रासप लोकसभेला एनडीएचा घटक पक्ष बनला. महादेव जानकर स्वतः बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून लढले, मात्र पराभव झाला असलातरी अपेक्षेपेक्षा जास्त मते त्यांना मिळाली होती. तर विधानसभेला रासपचा दौंडमधून आमदार विजयी झाला. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची विधानपरिषद करीता भाजप मधून बिनविरोध निवड झालेली होती. स्वत: महादेव जानकर भाजप सरकारमध्ये पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास मंत्री काम करत आहेत. नुकतीच विधानपरिषद मुदत संपल्यावर पुन्हा विधानपरिषद करीता बिनविरोध निवड झालेली आहे. या निवडणुकांमध्ये दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये सदरील गुन्हे विषयक माहिती लपविली असल्याचा आरोप होतो आहे.

 

वीजभारनियमन व दरवाढीच्या विरोधात पुण्यात ” कंदील मोर्चा ” (व्हिडीओ)

0

पुणे-वीजभारनियमन व दरवाढीच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने खा.वंदना चव्हाण व शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संत कबीर चाैक ते रास्ता पेठ पाॅवर हाऊस  येथे भव्य ” *कंदील मोर्चा ” काढुन  सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना खा. वंदना चव्हाण म्हणाल्या गेल्या चार वर्षांपुर्वी जनतेला खोटी आश्वासने देउन हे सरकार सत्तेवर आले या आश्वासनामधील एक ही आश्वासन हे सरकार पुर्ण करु शकलेले नाही . सतत जनतेला खोट बोलत रहायचे अशी पध्दत या सरकारने चालविली आहे, एन सणासुदिच्या काळात गॅस , महाग, अन्नधान्य महाग ,पेट्रोल, डीझेल महाग व आता विज सुध्दा महाग करण्याचा पराक्रम या सरकारने केला आहे या सरकार चा करावा तेवढा निषेध कमीच आहे. नोटाबंदी, गॅस बंदी,आता विजबंदी पुढच्या वर्षी जनता कमळ बंदी केल्याशिवाय राहणार नाही अशी सडकुन टिका खा. वंदना चव्हाण यांनी केली.
ऐन सनासुदीच्या काळात जनतेला आणि राज्याला अंधाराच्या खाईत या अकार्यक्षम भाजपा – शिवसेना युती सरकारने लोटलेले आहे , अघोषित असे लोडशेडिंग राज्यात चालु असुन जनतेला त्याबरोबर विज दरवाढीचा शोक दिला जातोय . आपण सत्तेवर आलो त्यावेळी कोळशाचे योग्य नियोजन करणे गरजेचे होते , शेजारील गुजरात सरकारला कोळसा मिळतोय आणि आपल्याला महाराष्ट्राला कोळसा उपलब्ध होत नाही, याचा अर्थ महाराष्ट्रातील तमाम जनतेने काय घ्यायचा ? सरकारच्या या गलथान कारभारा विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने भव्य कंदिल मोर्चा काढण्यात आल्याचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी सांगितले . याप्रसंगी बापु पठारे, मोहनसिंग राजपाल,रवींद्र माळवदकर,नगरसेवक वनराज आंदेकर ,लक्ष्मीताई आंदेकर,प्रदिप गायकवाड,अशोक कांबळे, भैय्या जाधव, भगवान साळुंखे,श्रीकांत पाटील, निलेश निकम ,भोलासिंग अरोरा, नितीन कदम, विनायक हनमघर, प्रदिप देशमुख,फहिम शेख ,रमेश आढाव,महेश हांडे,किशोर कांबळे, दत्तात्रेय तुपे, अनिस सुंडके, हसिना ईनामदार ,बाळासाहेब तुपे ,गणेश ससाणे,दिनेश मोरे, विक्रम जाधव,विशाल मोरे ,प्रेम भांडे पाटिल,संतोष नांगरे ,शरद दबडे, मृणालिनी वाणी ,श्वेता होणराव,उज्वला देशकर,अजिमभाई गुडाकुवाला, विशाल नाटेकर , शांतिलाल मिसाळ,मीनाताई पवार,संजय लोणकर, युसुफ शेख ,
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते
उपस्थित होते .

‘आयसीएआय’तर्फे ‘जीएसटी व रेरा’ यावर एकदिवसीय ‘ज्ञानसंगम 2018’ परिसंवाद

0
पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया (आयसीसीआय) पुणे विभाग व दि वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशर्न्स असोसिएशन (डब्ल्यूएमटीपीए) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ’जीएसटी आणि रेरा’ या विषयावर एक दिवसाच्या ‘ज्ञानसंगम 2018’ या परिसंवादाचे आयोजन केले आहे, अशी माहिती आयसीएआय पुणेच्या उपाध्यक्षा व ‘ज्ञानसंगम-2018’च्या प्रमुख समन्वयक सीए ऋता चितळे, ‘डब्ल्यूएमटीपीए’चे माजी अध्यक्ष नरेंद्र सोनवणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. प्रसंगी ‘डब्ल्यूएमटीपीए’चे सचिव शरद सूर्यवंशी व उपाध्यक्ष मनोज चितळीकर उपस्थित होते.
ऋता चितळे म्हणाल्या, “सोमवार, दि. २२ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत हॉटेल शेरेटॉन ग्रँड, पुणे स्टेशनजवळ येथे हा परिसंवाद होणार आहे. परिसंवादाचे उद्घाटन जीएसटीचे राज्याचे आयुक्त राजीव जलोटा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ‘जीएसटी आणि रेरा’ या कायद्यांतर्गत झालेल्या बदलांविषयी कर सल्लागार सीए बिमल जैन, ऍड. रतन सामळ हे मार्गदर्शन करणार आहेत. सीए आणि कर सल्लागार यांच्यासाठी श्री ज्ञांनवच्छल स्वामी तणावमुक्तीवर बोलणार आहेत.”
या परिषदेत वस्तू व सेवा कर आणि रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी (रेरा) या कायद्यावर चर्चा केली जाणार आहे. या परिषदेत वस्तू व सेवा कर आणि रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी (रेरा) या कायद्यावर चर्चा केली जाणार आहे. पुण्यातील दोन अग्रगण्य संस्था प्रथमच एकत्र आल्या असून कर सल्लागार सभासदांना या संगमातून ज्ञानार्जन करण्याची उत्तम संधी मिळणार आहे, असे नरेंद्र सोनावणे यांनी नमूद केले.
तसेच या कार्यशाळेमध्ये जीएसटी व रेरा यासंदर्भातील नवीन कायदे समज गैरसमज, यादरम्यान येणारा मानसिक ताणतणाव व या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींचे आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. नावनोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी puneicai.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

ललिता पंचमीचे औचित्य साधून कन्यापूजन व विद्यार्थिनी व माता पालकांचा महाभोंडला उत्साहाने साजरा

0

पुणे-शनिवार दिनांक १३/१०/२०१८ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत  माता पालक संघाच्या वतीने  शारदीय नवरात्रौत्सवातील ललिता पंचमीचे औचित्य साधून कन्या पुजन व भोंडल्याचे आयोजन करण्यात आले .शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ कल्पना वाघ यांच्या हस्ते इयत्ता पहिली ते चौथी मधील सर्व विद्यार्थिनींचे कन्या पूजन करण्यासाठी औक्षण करण्यात आले .यावेळी शाळेतील सर्व माता पालक व शाळेतील शिक्षिका यांनीही विद्यार्थिनींचे कन्या पूजन केले. माता पालक संघाच्या वतीने सर्व विद्यार्थिनींना छानशी भेटवस्तू देण्यात आली.

यावेळी पारंपारिक भोंडल्याचेही  आयोजन करण्यात आले.  इयत्तेनुसार हत्ती सजावट करून त्याभोवती विद्यार्थिनी, शिक्षिका व माता पालक यांनी गोल फेर धरला .शाळेच्या शालाप्रमुख सौ कल्पना वाघ व माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ अंतरा शेठ यांच्या हस्ते हत्तींचे पूजन करण्यात आले.ऐलमा पैलमा.. , शिवाजी आमुचा राणा, एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू, यांसारख्या पारंपरिक भोंडला गीतांबरोबरच आम्ही हो देशाचे भक्त, परडीत गोळ्या चॉकलेट ग, एक थेंब झेलू बाई दोन थेंब झेलू, स्वदेशी चा वापर  यांसारख्या आधुनिक भोंडला गीतांवर फेर धरून गाणी म्हणण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी खिरापतीला काय गं.. या गाण्यातील प्रश्नांचे उत्तर देत शाळेतून मिळणारी  खारी पॅटीस ,केळी, राजगिरा वडी ही खिरापत ओळखली.ही खिरापत सर्वांना देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी शालासमिती अध्यक्ष  डॉक्टर  सुनिल भंडगे यांचे मार्गदर्शन लाभले.  ज्येष्ठ शिक्षिका सौ तनुजा तिकोने ,धनंजय तळपे शाळेतील विद्यार्थ्यांच्या माता पालक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

‘चतृःश्रृंगी मंदीरक्ष ट्रस्ट’ यात्रेत आजीबाईंच्या भोंडला

0

पुणे-‘ऐलमा पैलमा गणेश देवा’, ‘एक लिंबू झेलू बाई’, ‘कारल्याचा वेल लाव गं सुने’, ‘असं कसं झालं माझ्या नशिबी आलं’, ‘अक्कल माती चिकन माती’, ‘आडबाई आडोनी’ अशी भोंडल्यची गाणी हस्त नक्षत्रावर नवरात्रीच्या दिवसांत ऐकायला मिळतात. नवविवाहिता आणि माहेरवाशीण या माहेरचे गोडवे गात हत्तीच्या प्रतिमेभोवती फेर आजीबाईंनी धरला असेल तर काय गंम्मत..! निवारा वृद्धाश्रमातील आजीबाईंनी असा फेर धरुन चतुःश्रृंगी मंदिरातील आवारात भोंडला साजरा केला.
‘सुयोग मित्र मंडळ’ आणि ‘चतृःश्रृंगी मंदीरक्ष ट्रस्ट’ यात्रेत आजीबाईंच्या भोंडल्याचे आयोजन केले होते. यावेळी या ज्येष्ठ महिलांनी आपल्या बालपणीच्या, नवविवाहिता असताना, सासुरवाशीण असतानाच्या आठवणी जागवल्या.
भोंडल्याची गाणी गात फेर धरून, झिम्मा खेळून त्यांनी भोंडल्याचा आनंद लुटला. यानंतर खिरापत ओळखणे आणि वाटपाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर त्यांच्या देवीदर्शनाची विशेष व्यवस्थाही करण्यात आली.
भोंडला हा पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात प्रचलित असलेला महिलांचा सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवसांत हस्त नक्षत्राचे प्रतिक नऊ दिवसांत हस्त नक्षत्राचे प्रतिक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून तिच्या भोवती महिला आणि मुली फेर धरतात. पृथ्वीच्या सुलभीकरणाचा हा उत्सव आहे, असे प्रतिपादन चतुःश्रृंगी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य सुहास अनगळ यांनी केले.
निवारा वृद्धाश्रमातील महिलांना गतस्मृतींना उजाळा देता यावा आणि आनंद मिळाज्ञवा यासाठी गेली सात वर्षे सुयोग मित्र मंडळाच्या सहकार्याने या उपक‘माचे आयोजन करण्यात येते.
नंदा माने, सुवर्णा कानिटकर, प‘वी शर्मा, दीपा सुपेकर, मनिषा सुपेकर, विद्या खामकर, मिना नांगरे, आरती ढवळे, सुनिता मांडवकर यांनी या भोंडल्याचे संयोजन केले.

शिखरजी संरक्षणार्थ जैन महिलांचा भाजपा कार्यालयावर मुकमोर्चा – भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावलेंनी स्वीकारले निवेदन

0

झारखंड सरकारची भेट घेण्याचे आश्वासन

पुणे, दि. 13 : झारखंड राज्यातील समेध शिखरजी या जैन धर्मियांच्या पवित्र तीर्थस्थळाच्या संरक्षणार्थ येथील जैन समाजातील महिला भाजपच्या पुणे शहर कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता.  देशात पहिल्यांदाच जैन महिला रस्त्यावर आंदोलनासाठी उतरल्या होत्या, अशी माहिती मूकमोर्चाच्या संयोजिका शर्मिला ओसवाल यांनी दिली.

झारखंड सरकारने समेध शिखरजी येथे पर्यटन सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने त्याठिकाणी मांस, मटन दारु, रेस्टॉरंट सुरु होण्याच्या संभावना आहेत. तसेच जर त्याठिकाणी जे हेलिपॅड बनविण्यात आले आहे. ते जर व्यावसायिकतेसाठी असेल तर त्याला आमचा विरोध असेल आणि जर ते नॅशनल  सिक्युरिटीसाठी असेल तर त्याला आमचा विरोध नाही. असेही महिलांच्या वतीने सांगण्यात आले. समेध शिखरजी येथे जैन धर्माच्या 24 तीर्थकरांपैकी 20 तीर्थंकरांचे निर्वाण झाले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या निर्णयामुळे या पवित्र स्थानाचे पावित्र्य धोक्यात आल्याने जैन समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

 झारखंड सरकारच्या निर्णयाला विरोध म्हणून शनिवारी सकाळी 10 वाजता पुण्यातील संभाजी गार्डन ते भाजप कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला होता.या मोर्च्यात जैन समाजातील जेष्ठ महिलांसह तरुण महिलांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.  यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व पदाधिकारी योगेश गोगावले यांना  निवेदन देण्यात आले. आचार्य युगभूषण महाराज, व सर्व साध्वीजी, मुख्य आयोजक शर्मिला ओसवाल, रिटा गांधी, सुलभा भंडारी, कविता शहा, स्वाती मेहता, प्रिती गंगवाल यांच्या उपस्थितीत मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पुणे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी जैन समाजातील महिलांच्या हस्ते निवेदन स्वीकारून त्यांना समेध शिखरवर पर्यटन स्थळ होऊ देणार नाही.असे आश्वासन यावेळी दिले. तसेच पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांकडून व  या मूकमोर्चाच्या माध्यमातून झारखंड राज्यातील भाजपचे सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यत या भावना पोहचवल्या जातील असेही ओसवाल यांनी सांगितले.