पुणे :’कळयांचे दिवस ‘ सारख्या कविता, ‘ही वाट दूर जाते ‘, जीवलगा, ‘ऋतू हिरवा ‘, ‘शारद सुंदर चंदेरी राती ‘, ‘रेशमाच्या रेघांनी ‘, ‘तोच चंद्रमा नभात ‘, ‘ शालू हिरवा ‘ , ‘ वल्हव रे नाखवा ‘ या सारख्या शांताबाईंच्या प्रतिभासंपन्न शब्दांच्या गोंदणाला लाभलं रंगतदार कार्यक्रमाचं कोंदण !
निमित्त होतं ‘ अनन्वय’ संस्थेने सादर केलेल्या ‘ गोंदण शब्दांचं ‘ या कार्यक्रमाचे !
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन तर्फे शांता शेळके यांच्या कवितांवर आधारित ” गोंदण शब्दांचं ” कार्यक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते.
रविवार १४ अॉक्टो २०१८ रोजी सकाळी नातू सभागृह , सेनापती बापट रस्ता येथे झालेल्या कार्यक्रमाला काव्य रसिकांचा रंगतदार प्रतिसाद मिळाला.
भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
‘कळयांचे दिवस ‘ सारख्या कविता, ‘तोच चंद्रमा ‘ सारख्या गझल, ‘ही वाट दूर जाते ‘, ‘ मागे उभा मंगेश ‘, ‘जीवलगा ‘, ‘ऋतू हिरवा ‘, ‘शारद सुंदर चंदेरी राती ‘, ‘रेशमाच्या रेघांनी ‘ , ‘ ही चाल तुरुतुरू ‘ सारख्या अवीट गाण्यांनी, नाटय पदांनी , ‘झुरळाच्या लग्नाची वरात ‘ सारख्या बालगीतांनी रसिकांना मोहून टाकले.
कवयित्री , गीतकार शांताबाईंच्या प्रतिभासंपन्न गीतांचे सादरीकरणाने हे ‘ गोंदण शब्दांचं ‘ उत्तरोत्तर रंगत गेलं.
जन्मगावच्या शेळकेवाडयापासून श्रेष्ठ कवयित्री, प्रतिभासंपन्न गीतकार होण्यापर्यतचा शांताबाईंचा जीवनप्रवास या कार्यक्रमातून हळूवार उलगडत गेला.
हा कार्यक्रम अनन्वय ‘ संस्थेने सादर केला.
दिग्दर्शन डॉ.माधवी वैद्य यांचे होते . कार्यक्रमाची संहिता मुग्धा गोडबोले – रानडे यांची तर संगीत संयोजन राहुल घोरपडे यांचे होते. मुग्धा गोडबोले -रानडे ,रमेश पाटणकर यांनी निवेदन केले.अमृता कोलटकर ,मीनल पोंक्षे,राहुल घोरपडे यांनी गायन केले.मिलिंद गुणे,नीलेश श्रीखंडे ,आदित्य आपटे यांनी साथसंगत केली. शांता शेळके यांच्या दुर्मिळ ध्वनीचित्रफितीने कार्यक्रमाची खुमारी वाढली.विश्वास जोशी, डॉ. किरण ठाकूर,सुनील महाजन, अक्का कराड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.