बालेवाडी ते पंढरपूर :बालवडकरांच्या मोफत यात्रेत ६०० भाविक सहभागी
इंधन अवलंबित्व संपविण्यासाठी जैव ऊर्जा हाच शाश्वत पर्याय: संतोष गोंधळेकर
मराठी विज्ञान परिषद आयोजित व्याख्यानाला चांगला प्रतिसाद
पुणे :भारताकडे स्वतःचा इंधनाचा साठा फक्त ४ वर्ष टिकणारा आहे. ८४ टक्के इंधन आयात करावे लागते. जगातील इंधनाचा साठा संपत चालला आहे. इंधनाचे भाव कितीही वाढले तरी मागणी वाढतच चालली आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी वरील आपले अवलंबित्व वाढत चालले आहे. हे अवलंबित्व संपवायचे असेल तर जैव ऊर्जा हाच एकमेव पर्याय आहे, असे ठाम प्रतिपादन संतोष गोंधळेकर यांनी केले.
27 जून 2019 गुरुवारी सायंकाळी मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित आयोजित ‘ जैवऊर्जा ‘ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
शिक्षणशास्त्र संस्था सभागृह, मयूर काॅलनी येथे हे व्याख्यान झाले.मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग अध्यक्ष विनय र.र. यांनी प्रास्ताविक केले.
गोंधळेकर म्हणाले, ‘ पेट्रोल, डिझेल वापरामुळे जगाचे तापमान वाढत चालले आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत पर्यायी जैव ऊर्जा शोधताना अन्न सुरक्षा, चारा सुरक्षा धोक्यात येता कामा नये, ही नवी ऊर्जा परवडणारी असली पाहिजे, पर्यावरणपूरक आणि शाश्वत असावे,हा संशोधनाचा विषय आम्ही हाती घेतला होता. १६ वर्षांनी हे संशोधन यशस्वी झाले आहे.
बायोमास वापरून , पाणी, शेती आणि उर्जेची साखळी निर्माण करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. हत्ती गवत आणि बांबू हे बायोमास वापरून इंधन तयार करण्यांचा उपाय आम्हाला संशोधनाद्वारे सापडला.बाबू हा कोळशापेक्षा स्वस्त असल्याने इंधन निर्मिती स्वस्त झाली. या इंधनावर गाडया चालू शकतात, हे संशोधनात सिध्द झाले आहे.
बॅक्टेरिया वापरुन बांबू, हत्ती गवत अशा बायोमास वर प्रक्रिया करून वाहनांना वापरता येणारे मिथेन वायुचे सीएनजी इंधन एका दिवसात पिरंगुट येथे गेली ३ वर्ष तयार केला जात आहे. खनिजाधारीत सीएनजी पेक्षा हा सीएनजी अधिक शुध्द आहे. आणि प्रचलित सीएनजी इतकीच या बायोमास सीएनजी ची किंमत ठेवण्यात आली आहे.सीएनजी केल्यावर उरणाऱ्या बायोमास पासून खत, जाळण्यासाठी ब्रिकेट विटा तयार करता येते. स्वयंपाकाचा गॅस ही यातून करता येते.तुराटया,झावळ्या, गवत असे कोणतेही बायोमास सीएनजी इंधन करण्यासाठी वापरता येते. पेट्रोलच्या निम्म्या भावात हे सीएनजी इंधन उपलब्ध होते. त्यामुळे सर्वसामान्यांनाही त्याचा फायदा होणार आहे.
नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया ‘ अंतर्गत या संशोधनाला प्रोत्साहन दिले. नितीन गडकरी यांनी त्यासाठी आवश्यक कायदा करण्य
चा पाठपुरावा केला. आता सर्व कायदेशीर मान्यता या सीएनजी ला मिळाली आहे. २० कोटी खर्चाचा हा प्लांट आता बँकेबल आहे. सरकारी अनुदानास पात्र आहे. भावी वर्षांमध्ये जागोजागी हे पंप दिसतील.
एकरी १० हजार खर्च केला तर एकरी १ लाख रुपये उत्पन्न दरवर्षी शेतकऱ्याला मिळू शकते. भारत आयात इंधनासाठी सहा लाख कोटी खर्च करतो, हे पैसे शेतकऱ्याला मिळू शकतात. त्यातून देश आर्थिक सक्षम होणे शक्य आहे.
‘जैवउर्जा’ हेच भविष्य
पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी,आणि कोळसा या खनिज उर्जा स्रोतांच्या वापरामुळे जागतिक तापमान वाढीचा ‘ सामना आज जगाला करायला लागत आहे.
अधुनिक विकासाचा वेग जसा वाढत जात आहे तसे वाढते खनिज उर्जा स्रोत अपरिहार्य पणे वापरले जात आहेत.
भारतात वर्षाला साधारण 100 कोटी टन कोळसा समतुल्य इंधन वापरले जाते. ‘याला पर्याय काय?’ असा प्रश्न आपल्याला पडतो.
‘जैवउर्जा’ (Biomass based Energy Solution) हा या जागतिक उर्जा प्रश्नावरचा 100% उपाय आहे असे गोंधळेकर यांनी सांगीतले.गेली 15 वर्षे संशोधन करून यावरचा ठोस उपाय म्हणून ‘ अॅग्रो गॅस ‘ प्रकल्प त्यांच्या ‘ प्रायमूव्ह ‘ इंजिनियरिंग प्रा.लि.’ या संस्थेने उभा केला आहे.
सामाजिक वनीकरण व वन विभागाचे चित्ररथ वारीमध्ये सहभागी
पुणे : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या योजनांची माहिती देणारे चित्ररथ आषाढी वारीमध्ये सहभागी होत आहेत. आज मध्यवर्ती इमारत येथे सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी यांच्या हस्ते व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेशकुमार त्यागी यांचे प्रमुख उपस्थितीत या चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला.
सामाजिक वनीकरण व वन विभागाच्या वतीने पालखी सोहळ्यामध्ये चित्ररथ काढण्यात आला आहे. या चित्ररथाचा शुभारंभ आज मध्यवर्ती इमारत येथे झाला. सामाजिक वनीकरण, वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती या चित्ररथांमधून कलापथक, मनोरंजनात्मक जादूचे प्रयोग यांचे माध्यमातून देण्यात येणार आहे. कार्यक्रमाप्रसंगी उपवनसंरक्षक श्रीमती ए. श्रीलक्ष्मी, विभागीय वन अधिकारी नारनवर, विभागीय वन अधिकारी दिलीप घोलप, विभागीय वनअधिकारी रामदास पुजारी, सहाय्यक वनसंरक्षक सामक, पुराणिक, निकम, वनक्षेत्रपाल गौरी बो-हाडे, संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा पालखी सोहळा या दिंडीचे इंगोले महाराज यांच्यासह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येडवे – बिदरकर गुरूजींच्या कलापथकाने 33 कोटी वृक्ष लागवड योजना, कन्या वन समृद्धी योजना, हरित सेना व इतर शासकीय योजनांबाबत माहिती उत्कृष्टपणे सादर केली तर जादूगार सोमनाथ पाटील यांनी जादूच्या मनोरंजनात्मक प्रयोगाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीसंदर्भात जनजागृती केली.
वारक-यांशी व उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. दिनेशकुमार त्यागी यांनी “ वृक्ष हेच आपले जीवन असून, वृक्ष आपल्याला जीवनावश्यक प्राणवायू देत असल्याने प्रत्येकाने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड मोहीमेमध्ये सहभागी होऊन वृक्ष लागवड व संगोपन केले पाहिजे ” असे त्यांनी नमूद केले.
९ जुलैला मंत्रालयासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळयाजवळ ‘मौन दिन’
पुणे:- राजपत्रित अधिकारी महासंघाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याबाबतचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठीचे निवेदन आज राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
महासंघाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज ‘लक्षवेध दिन’ पाळण्यात आला व जिल्हाधिकारी राम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, महासंघाच्या कार्याध्यक्ष डॉ. जयश्री कटारे, राज्य उपाध्यक्ष विनायक लहाडे, माहिती सचिव राजेंद्र सरग, वृषाली पाटील, रवींद्र चव्हाण, विलास हांडे, विठ्ठल वाघमारे, दुर्गा मंचच्या अध्यक्ष सुवर्णा पवार, सविता नलावडे, ज्ञानेश्वर जुन्नरकर, माणिकराव शेळके, एन. डी. पतंगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील विविध खात्यातील ७० राजपत्रित अधिकारी संघटनांच्या प्रलंबित मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. राज्यात केंद्राप्रमाणे ५ दिवसांचा आठवडा करणे, सर्व रिक्त पदे भरणे, कंत्राटी पध्दतीने भरती न करता १ लाख ९१ हजार कर्मचा-यांची योग्य मार्गाने भरती करणे, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, वैद्यकीय अधिका-यांचे सेवानिवृत्तीचे वय सरसकट ६५ वर्षे करणे, बक्षी समितीचा वेतनत्रुटी ( खंड -२) अहवाल शासनास सादर करणे, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील ५४०० रुपयांची ग्रेड पे ची मर्यादा काढणे, महिला कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्ष बालसंगोपन रजा मिळणे, सातव्या वेतन आयोगाच्या पगारावर केंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता देणे, कर्मचारी- अधिका-यांना होणा-या मारहाण, दमबाजीबाबत कठोर भूमिका घेणे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
या मागण्यांवर शासनाच्या वतीने त्वरीत निर्णय घेण्यात आला नाही तर मंत्रालयासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळयाजवळ शांततेच्या मार्गाने ९ जुलै रोजी ‘मौन दिन’ पाळण्यात येणार असल्याचे विनायक लहाडे यांनी सांगितले.
‘आम्ही लढाई जिंकलो, OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिले’-मुख्यमंत्री
मुंबई- ‘सर्वांच्या सहकार्याने एक निर्णायक लढाई जिंकलो. ओबीसी आरक्षणाला किंचितही धक्का न लावता मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला. या लढाईत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानतो’, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर विधानसभेत आपले निवेदन सादर केले.
शिक्षणात 12 टक्के, नोकरीत 13 टक्के आरक्षण
राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. पण राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आणि नोकरीत 13 टक्के आरक्षणाची शिफारस केली होती. तीच मागणी हायकोर्टाने मान्य केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच शिक्षणामध्ये 12 टक्के तर नोकरीत 13 टक्के आरक्षण देण्याला हायकोर्टाची मंजुरी मिळाली. हे सर्व काम राज्य मागासवर्ग आयोगाने अत्यंत कमी वेळेत पूर्ण केले, त्यांचे आभार, विधीमंडळ सभागृहाचे आभार, असेही फडणवीस म्हणाले.
कोर्टाकडून मराठा आरक्षण कायम
मराठा समाजाच्या आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला. राज्य सरकारला आरक्षण देण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे म्हणत न्यायालयाने मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांच्यासह सदस्यांनी दिलेला मराठा आरक्षणाचा अहवाल स्वीकारला. या अहवालानुसार मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास असल्याचे कोर्टाने मान्य केले आहे. तसेच शिक्षणामध्ये 12 टक्के तर नोकऱ्यात 13 टक्के आरक्षण देण्याला हायकोर्टाने मंजुरी दिली.
मराठा आरक्षणावर कोर्टाचा ऐतिहासिक निकाल: आरक्षण वैध पण 16 टक्के नाही……
मुंबई- राज्यभर आंदोलने आणि तरुणांच्या आत्महत्या, अशा मोठ्या संघर्षानंतर अखेर आज(27 जून) मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय न्यायालयाने जाहीर केला. मुंबईच्या उच्च न्यायलयाने आज आपला निकाल सादर केला, त्यानुसार आरक्षण सुरुच राहणार आहे, पण ते 16 टक्के नसून 12-13 टक्के असेल. यासोबतच शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण वैध असल्याचे न्यायालयाने मान्य केले. या निकालानंतर राज्यभर जल्लोषाचे वातावरण सुरू झाले आहे.मराठा आरक्षणासंदर्भात उच्चन्यायालयात आतापर्यंत 4 याचिका विरोधात आणि 2 याचिका समर्थनात दाखल झाल्या होत्या, तर 22 हस्तक्षेप अर्ज होते. ज्यातील 16 मराठा आरक्षणाच्या समर्थनात, तर 6 विरोधात आहेत. तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच 26 मार्च 2016 रोजी मराठा आरक्षणासंदर्भात युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर हायकोर्टाने निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर मे महिन्यांच्या सुट्ट्यांमुळे मराठा आरक्षणावरील याचिकांवर सुनावणी होऊ शकली नाही. पण अखेर आज आरक्षणासंदर्भात अंतिम निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठअंतर्गत या प्रकरणी निर्णय दिला.
आरक्षण विधेयक मंजूर
मोठ्या संघर्षानंतर 29 नोव्हेंबर 2018 ला दोन्ही सभागृहात मराठा आरक्षण विधेयक पास झाले आणि SEBC अंतर्गत 16 % आरक्षणाची घोषणा झाली. पण फक्त 5 दिवसात मराठ्यांच्या आरक्षणाला उच्चन्यायालयात आव्हान देण्यात आले. आरक्षण घटनाबाह्य असल्याचे सांगत आरक्षणच रद्द करण्याची मागणी उच्चन्यायालयात करण्यात आली.
राज्यभरात एकूण 32.14 टक्के मराठा समाज आहे. तसेच शासकीय आणि निमशासकीय सेवेमध्ये 6 टक्के प्रतिनिधित्त्व मराठा समाजाचे आहे. यासोबतच 73.86 % मराठा समाज हा शेतीवर अवलंबुन असल्यामुळे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 16% आरक्षण दिले पाहीजे.
मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही, मराठा-कुणबींना OBC अंतर्गत आरक्षण आहे, मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या 50% मर्यादेचे उल्लंघन आहे, SEBC मुळे आरक्षण नसलेल्यांचे नुकसान आहे, असे अनेक दावे याचिकाकर्त्यांकडून करण्यात आले आहेत. पण हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकेल अशा तरतुदी करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केले आहे. तर आरक्षणाविरोधातली बाजूही कोर्टाने ऐकून घेतली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षण टिकणार का? याकडे मराठ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचे याकडे लक्ष लागून होते.
अभिनेत्री स्मिता तांबेने पहिल्यांदाच केले ग्लॅमरस फोटोशुट( व्हिडिओ)
चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबेने नुकतंच स्टनिंग फोटोशुट केलंय. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणा-या सशक्त अभिनेत्री स्मिता तांबेला पहिल्यांदाच ग्लॅमरस रूपात ह्या फोटोशूटमूळे पाहायला मिळतंय.
इनामदार हॉस्पिटल आयोजित वारकऱ्यांचा विनामूल्य आरोग्य शिबीरास चांगला प्रतिसाद
सेनेतून हकालपट्टीचे वृत्त समजताच आशा बुचके यांना मानसिक धक्का-उपचारासाठी रुग्णालयात – ‘अन्याय झाला ‘समर्थकांचा दावा
आपण यांना ओळखलंत का?पहा प्रयत्न करून …
सेलीब्रेटींना सगळेच ओळखतात …पण तरीही यांना तुम्ही ओळखलं नसेल !!
‘Once मोअर’ चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक नरेश बिडकरांचाही स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता… एक विचित्र स्वप्न साकार होत होतं. या चित्रपटात एक विचित्र कॅरेक्टर आहे. एका स्त्रीला पुरुष साकारायचा होता पण ते पडद्यावरचं नाटक नव्हतं तर ती व्यक्तिरेखाच पुरुषाची होती. हे आव्हान होतं.. आणि ते साकारण्यासाठी कसदार अभिनेत्री हवी होती.. आणि मग ‘Once मोअर’ च्या टीमकडून एक मुखाने नाव निघालं
रोहिणी हट्टंगडी.!
हो.. ह्या फोटोत दिसणारे आजोबा म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आहेत !!
१ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘Once मोअर’ या आगामी मराठी चित्रपटासाठी रोहिणीताईंनी हे आजोबांचं पुरुषी रूप धारण केलं आहे. या भूमिकेसाठी रोहिणीताईंनी किती मेहनत घेतली असेल याचा अंदाज फोटोतील गेटअपवरून सहज येतो. ‘Once मोअर’ चित्रपटाच्या कथानकाची गरज म्हणून एकाचवेळी स्त्री व पुरुष अशी दुहेरी भूमिका साकारणाऱ्या सशक्त कलावंताची आवश्यकता होती. या भूमिकेला रोहिणीताई न्याय देऊ शकतील हा विचार करून दिग्दर्शक नरेश बीडकर यांनी रोहिणीताईंना या भूमिकेची आवश्यकता समजावून सांगितली. भूमिकेचं आव्हान व त्यातील वेगळेपणा लक्षात घेत रोहिणीताईंनी या भूमिकेला होकार दिला.
कमल हसन यांना बऱ्याच सिनेमांमध्ये गेटअप करणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट रमेश मोहंती, कमलेश आणि श्रीनिवास मेनगु यांनी ‘Once मोअर’ या चित्रपटासाठी रोहिणीताईंना मेकअप केला आहे. रमेश आणि कमलेश यांनी प्रॉस्थेटिक मेकअपच्या सहाय्याने रोहिणी यांना आजोबांचं रूप दिलं आहे. या मेकअपसाठी रमेश आणि कमलेश यांच्या जोडीने रोहिणीताईंनीही खूप मेहनत घेतली आहे. चित्रीकरणाच्या पाच तास आधी रोहिणीताईंना मेकअप करण्याची प्रक्रिया सुरू व्हायची. चित्रीकरण पूर्ण झाल्यावर दोन तास मेकअप काढण्यासाठी लागायचा. या काळात त्या काहीही खाऊ शकत नव्हत्या.
आजोबांच्या गेटअपमध्ये रोहिणीताईंना केवळ अभिनय, संवादफेक करायची नव्हती, तर त्यात धावण्यापासून अॅक्शन सीन्सपर्यंत बऱ्याच गोष्टींचा समावेश होता. त्यामुळे या वयात रोहिणीताईंनी स्वीकारलेलं आजोबांच्या भूमिकेचं आव्हान आणि त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत नक्कीच कौतुकास्पद आहे. दिग्दर्शकावर दाखविलेला विश्वासही त्यांच्या भूमिकेला वेगळ्या उंचीवर नेत असल्याचं मत चित्रपटाचे दिग्दर्शक नरेश बिडकर व्यक्त करतात. आजवरच्या करियरमधील ही नावीन्यपूर्ण आणि आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी ‘Once मोअर’ या सिनेमामुळे मिळाल्याचं सांगत रोहिणीताई म्हणतात की, ‘मला नेहमीच आव्हानं स्वीकारायला आवडतात. हे आव्हान मी स्वीकारणं धाडसाचं होतं पण यातही एक आनंद होता. त्यामुळेच पाच तासांची मेकअप प्रोसेस आणि गेटअपमध्ये अॅक्शन करणं हे देखील मी एन्जॅाय केलं. प्रेक्षकांनाही माझं हे रूप नक्कीच आवडेल’ अशी अपेक्षा रोहिणीताईंनी व्यक्त केली.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरधारकांची 16वी वार्षिक सर्वसाधारण बैठक संपन्न
पुणे-बँक ऑफ महाराष्ट्रची 16 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज बँकेच्या पुणे स्थित मुख्य कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीमध्ये दिनांक 31 मार्च 2019 रोजी समाप्त आर्थिकवर्षाचे लेखापरिक्षित अहवाल बँकेच्या भागधारकांपुढे मंजूरीसाठी ठेवण्यात आले. सदरील ताळेबंदास मान्यता देताना बँकेवर आणि बँकेच्या नेतृत्वावर सर्व भागधारकांनी विश्वास व्यक्त केला.
बँकेच्या कामगिरीमध्ये सुधारणा होण्यासाठी व्यवस्थापनाने करत असलेल्या प्रयत्नांची भागधारकांनी प्रशंसा करून त्यास मान्यता दिली.
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए. एस. राजीव यांनी 16व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्येशेअर्सधारकांना संबोधित करताना बँकेच्या कामगिरीचे ठळक मुद्दे आणि बँकेनी घेतलेल्या विविध उपक्रमांच्या पुढाकारबाबत माहिती दिली
श्री ए. सी. राउत, कार्यकारी संचालक, श्री हेमन्त टम्टा, कार्यकारी संचालक, श्री दीनदयालअग्रवाल, संचालक यासह बँकेचे सर्व सरव्यवस्थापक, भारत सरकारचेप्रतिनिधी आणि लेखापरिक्षक या बैठकीस उपस्थित होते.
पद्मावती,पंचवटी ..बत्ती गुल प्रकरणी ठेकेदारास नोटीस -‘मायमराठी’ चा दणका
पुणे:पुणे सातारा रस्त्यावरील चव्हाणनगर कमानी जवळ सुमारे 15 तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याप्रकरणी महावितरणने सायंकाळी 6 वाजता वीज पुरवठा सुरळीत होणे अपेक्षित असताना तो रात्री १२ वाजता सुरु झाला ,या विलंबा मागे पावसाला २ तासासाठी कारणीभूत धरून अन्य तासांच्या विलंबासाठी ठेकेदाराला कारणीभूत धरले आहे आणि संबधित ठेकेदारास नोटीस बजावली आहे .काल विना पूर्व सूचना दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले होते मात्र यावर ग्राहकांना एस एम एस द्वारे आपत्कालीन कामाबाबत सूचित केले होते असा पवित्रा घेतला आहे.
याप्रकरणी महावितरणाने ‘माय मराठी ‘कडे केलेल्या खुलाशात म्हटले आहे कि,
पंचवटी उपकेंद्रातून निघालेल्या 22 केव्ही वाहिनीवरील फिडर पिलरमध्ये सतत बिघाड होत असल्याने त्याठिकाणी नवीन रिंग मेन युनिट बसविण्याच्या आपत्कालिन कामास बुधवारी (दि. 26) विलंब झाल्यामुळे पद्मावती परिसरात पंचवटी सोसायटी व निर्मल पार्क सोसायटीमधील वीजपुरवठा रात्री 11.58 वाजता सुरळीत झाला.
याबाबत माहिती अशी, की पद्मावती विभाग अंतर्गत पंचवटी उपकेंद्रातून 22 केव्ही भूमिगत वाहिनीद्वारे सुमारे 8 हजार ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र या वाहिनीवरील पंचवटी येथे असलेल्या 22 केव्ही फिडर पिलरमध्ये आर्द्गता व पावसामुळे वारंवार बिघाड होत असल्याचे निदर्शनास आले. नुकत्याच झालेल्या पावसामुळे या फिडर पिलरमध्ये बिघाड झाल्याने वाहिनीवरील 8 हजार ग्राहकांची वीज खंडित झाली होती. त्यामुळे या फिडर पिलरच्या ठिकाणी नवीन रिंग मेन युनिट लावण्याचे काम बुधवारी (दि. 26) सकाळी 9.10 वाजता तातडीने सुरु करण्यात आले.
सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आला. मात्र पंचवटी सोसायटी व निर्मल पार्क सोसायटीमध्ये ओव्हरहेड वीजवाहिनी असल्यामुळे तेथील सुमारे 550 ग्राहकांसाठी वीजपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था होऊ शकली नाही. महावितरणकडून या वीजवाहिनीवरील ग्राहकांना एसएमएसद्वारे आपत्कालिन कामाची माहिती देण्यात आली होती. सायंकाळी 6 वाजेपर्यंत रिंग मेन युनिटचे काम अपेक्षीत असताना दुपारी दोन तास पाऊस झाल्याने कामामध्ये मोठे अडथळे आले. रिंग मेन युनिटमध्ये वाहिन्या जोडण्यांच्या कामांना विलंब झालात्यानंतर रात्री 11.58 वाजता काम पूर्ण झाले व लगेचच वीजपुरवठा सुरु करण्यात आला. या कामाची सक्रीय देखरेख करण्यासाठी कार्यकारी अभियंता श्री. मधुसुदन बरकडे, प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. राहुल बेंद्रे व सहाय्यक अभियंता सौ. अंजली मोने व महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.
रिंग मेन युनिट बसविण्याच्या कामामध्ये पावसामुळे विलंब झाला असला तरी संबंधीत कंत्राटदाराकडून योग्य व अपेक्षित वेगाने काम झालेले नसल्याचे दिसून आले. याप्रकरणी संबंधित कंत्राटदारास नोटीस बजावण्यात आली आहे. नवीन रिंग मेन युनिटमुळे आता 22 केव्ही भूमिगत वाहिनीद्वारे पंचवटी सोसायटी व निर्मल पार्कसह सर्वच सुमारे 8 हजार वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा होणार आहे. रिंग मेन युनिटवर पावसाचा कोणताही परिणाम होत नाही. तसेच पर्यायी वीजपुरवठा तात्काळ करण्याची सोय उपलब्ध असल्याने फिडर पिलरऐवजी रिंग मेन युनिट बसविणे गरजेचे होते.
संत गोरोबाकाका दिंडीचे भवानी पेठेत स्वागत -कोकीळ परिवाराने जपली ५० वर्षांची स्वागत परंपरा
पुणे:
संत गोरोबाकाका दिंडीचे भवानी पेठेत स्वागत करण्यात आले .
प्रामुख्याने उस्मानाबाद चे वारकरी असलेल्या या दिंडीची भवानी पेठेत सर्व व्यवस्था करण्याच्या कोकीळ परिवाराच्या परंपरेला
५० वर्षे पूर्ण झाली ! या दिंडीतील दीडशे वारकऱ्यांच्या निवास ,भोजन व्यवस्था कोकीळ परिवारातर्फे पाहिली जाते . वारकऱ्यांना पुणे मुक्कामी मिष्टान्नाचे जेवण दिले जाते . २६ आणि २७ जून रोजी या वारकऱ्यांनी कोकीळ परिवाराच्या आतिथ्याचा सलग ५० व्या वर्षी लाभ घेतला . धोंडिबा कोकीळ ,जयदीप कोकीळ ,गायत्री कोकीळ यांनी स्वागत केले . यावेळी वारकऱ्यांना वारीत उपयोगी पडणाऱ्या दैनंदिन गोष्टींचे किट देण्यात आले .
भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले…सेवा रुजू करून घेण्यास मन माझे थांबले..पुण्यनगरीत भक्तीचा महापूर
पुणे – ‘ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम’ असा जयघोष करीत लाखो वैष्णवांच्या साथीने पुण्यनगरीत बुधवारी दाखल झालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे पुणेकरांनी प्रथेप्रमाणे दिमाखात स्वागत केले. पालख्यांच्या दर्शनासाठी पुणेकरांची प्रचंड गर्दी आणि वारकऱ्यांच्या सहभागामुळे पुण्यनगरीने भक्तीचा महापूरच अनुभवला.
देहूतून प्रस्थान केलेल्या तुकाराम महाराज पालखीचे शहराच्या हद्दीत म्हणजे वाकडेवाडी येथे सायंकाळी सव्वापाच वाजता आगमन झाले. हा पालखी सोहळा पाहण्यासाठी परिसरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. तेव्हाच ते वारकऱ्यांना खाद्यपदार्थांचे वाटप करीत होते. पालखी येताच जागा मिळेल तेथून वाट काढत भविकांनी रथापर्यंत पोचून दर्शन केले. त्यानंतर पाटील इस्टेट परिसरात महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांच्यासह महापालिकेतील अधिकाऱ्यांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर फर्ग्युसन रस्तामार्गे पालखी विसाव्यासाठी नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिराकडे मार्गस्थ झाली.
दिघीतून विश्रांतवाडीत दुपारी दाखल झालेली ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सायंकाळी सहा वाजून २० मिनिटांनी पाटील इस्टेट येथे पोचली. तेव्हा फुलांची उधळण आणि ज्ञानेश्वर माउलींचा जयघोष करीत भाविकांनी स्वागत केले. पाठोपाठ महापौर टिळक यांनीही पालखीचे स्वागत केले.
त्याआधी दुपारी ही पालखी शहराच्या हद्दीत विश्रांतवाडी येथे आली असता स्थानिक नागरिकांसह महापौरांनी तिचे स्वागत केले. वाकडेवाडीतून जंगली महाराज ररस्त्यावरील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातून गणेशखिंड रस्ता, त्यानंतर फर्ग्युसन रस्तामार्गे पालखी मुक्कामासाठी पालखी विठोबा मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाली. दरम्यान फुर्ग्यसन रस्ता, डेक्कन, लक्ष्मी रस्ता परिसरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
बिलिंग असिस्टंटच्या भरतीबाबत व्हॉटस् ॲप किंवा इमेलवर विश्वास ठेवू नये महावितरणचा खुलासा
मुंबई: महावितरणमध्ये बिलींग असिस्टंट या पदाकरिता कोणत्याही प्रकारची भरती सुरु नाही. तसेच बिलींग असिस्टंट असे पदच महावितरणमध्ये अस्तित्वात नसल्याने या पदाच्या भरतीसाठी जाहिरात देखील काढण्यात आलेली नाही.
परंतु बिलिंग असिस्टंट या पदाकरिता शुल्क भरून ट्रेनिंगसाठी व रूजू होण्याबाबतचा अनधिकृत मेसेज, इमेल किंवा व्हॉटस् ॲपद्वारे पाठविण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. हा मेसेज किंवा इमेलद्वारे आलेला आदेश खोटा व अत्यंत दिशाभूल करणारा असल्याने त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये.
दिशाभूल करणाऱ्या या आदेशामध्ये १० जुलै ते १९ जुलै २०१९ असे पाच दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर २५ जुलै रोजी रूजू व्हावे आणि त्याकरिता बँकेत ३० हजार ९६० रूपयांचा भरणा करावा, असे नमूद करण्यात आले आहे. तथापि, महावितरणकडून प्रशिक्षण व रूजू होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही.. त्यामुळे अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या इमेल किंवा व्हॉटस् अॅपवरील मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.








