Home Blog Page 282

दिव्यांगांच्या पद सुनिश्चितीसाठी तज्ज्ञ समितीची पुनर्रचना-तुकाराम मुंढे

• प्रक्रियेसाठी एकसमान कार्यपद्धती निश्चित

मुंबई, दि. ०३ : दिव्यांग व्यक्तींना शासकीय, निमशासकीय सेवेत नियुक्ती आणि पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षणाचा कायदेशीर हक्क प्रभावीपणे मिळावा, यासाठी पदसुनिश्चिती प्रक्रियेसाठी एकसमान कार्यपद्धती (एसओपी) तयार केली आहे. पदसुनिश्चिती प्रक्रिया अधिक शास्त्रीय आणि पारदर्शक करण्याच्या हेतूने तज्ज्ञ समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो दिव्यांग उमेदवारांसाठी रोजगार, सर्व स्तरांवर समान संधी सुनिश्चित होण्यास मदत होणार असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.सचिव तुकाराम मुंढे म्हणाले, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पदसुनिश्चिती प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय, निमशासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच स्वायत्त संस्था आणि महामंडळांमधील मंजूर पदांचा सखोल आढावा घेऊन दिव्यांग व्यक्ती कोणत्या पदांवर कार्यक्षमतेने काम करू शकतील, हे ओळखणे आता बंधनकारक राहणार आहे. प्रत्येक मंत्रालयीन विभागात यासाठी तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती स्थापन करेल.

प्रत्येक मंत्रालयीन विभागाच्या या समितीत अंध-अल्पदृष्टी, श्रवणदोष, अस्थिव्यंगता, स्वमग्नता, विशिष्ट शिक्षण अक्षमता व मानसिक आजार अशा विविध प्रवर्गांतील किमान एका तज्ज्ञाचा समावेश असेल. समितीचे अध्यक्ष त्या विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव राहतील.

समिती सहाय्यक तंत्रज्ञानातील विकास, जागतिक रोजगार मानके आणि पदांच्या जबाबदारीचे स्वरूप लक्षात घेऊन विभागातील पदांची योग्यतापरीक्षण करण्यासोबतच पदसाखळीतील सर्व स्तरांचा विचार करून पदसुनिश्चिती प्रस्ताव सादर करणार आहे. दिव्यांगांसाठी सुयोग्य नसलेल्या पदांना सूट दिली जात असल्यास, ती जास्तीत जास्त तीन वर्षेच वैध राहणार असून त्याचे पुनरावलोकन अनिवार्य असल्याचे सचिव मुंढे यांनी सांगितले.
सचिव मुंढे म्हणाले, प्रत्येक विभागाने दरवर्षी 1 जानेवारी रोजी पदसुनिश्चितीची अद्ययावत स्थिती त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आणि तिची प्रत आयुक्त, दिव्यांग कल्याण तसेच दिव्यांग कल्याण विभागास सादर करणे बंधनकारक राहील. तसेच सरळसेवा भरती व पदोन्नती करताना संबंधित भरती यंत्रणेकडे तीन वर्षात एकदा पदसुनिश्चितीचा आढावा घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

याबाबतचा शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने निर्गमित केला असून महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महावितरण नेहमीच दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पाठीशी:संचालक राजेंद्र पवार यांची ग्वाही

दिव्यांग दिन उत्साहात साजरा

मुंबई, दि. ०३ डिसेंबर २०२५: दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहायक उपकरणे पुरवण्याच्या उपक्रमात महावितरणने आत्तापर्यंत राज्यभरातील ४९ दिव्यांग कर्मचाऱ्यांना दुचाकी उपलब्ध करुन दिल्या आहेत. तर आगामी सुमारे ५ हजार तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत नियमानुसार ४१२ जागा दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती देतानाच महावितरण व्यवस्थापन नेहमीच दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी दिली.

महावितरणचे मुख्यालय असलेल्या मुंबईतील प्रकाशगड येथे दिव्यांग दिनानिमित्त बुधवारी (दि. ०३ डिसेंबर) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक श्री. राजेंद्र पांडे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. संचालक श्री. पवार म्हणाले, आज दिव्यांगजन सर्वच क्षेत्रात स्वकृर्तृत्वाने यशाची उत्तुंग भरारी घेत आहेत. तीव्र इच्छाशक्ती व अढळ विश्वासाच्या बळावर न्युनगंडावर मात करण्याचे आवाहन त्यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांना केले. तर दिव्यांग कर्मचाऱ्यांशी कोणताही भेदभाव न करण्याची शपथ घेऊन संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

महावितरणमध्ये कार्यरत दिव्यांग कर्मचाऱ्यांना त्यांचे दैनंदिन कामकाज अधिक सुकर व्हावे, यासाठी अधिक खबरदारी घेण्यात येते. त्यांना दिव्यांग भत्ता नियमितपणे दिला जातो. चुकीच्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सेवेत येण्याचा कोणी प्रयत्न करीत असल्यास, अशा बाबी तत्काळ निदर्शनास आणून देण्याबाबत संचालक पवार यांनी सूचित केले.

जगभरातील विख्यात दिव्यांग लेखकांची पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन मुख्य कार्यालयात कार्यरत २३ दिव्यांग कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या वतीने परेश बोरकर आणि रोहिणी साठे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यवस्थापनाबाबत कृतज्ञता व्यक्त करताना सुविधांसंदर्भातच्या अपेक्षा दिव्यांग कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. या मागण्यांची तातडीने पुर्तता करण्याच्या सूचना संचालक पवार यांनी संबंधितांना दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ व्यवस्थापक प्रणाली निमजे यांनी केले. तर सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांनी आभार मानले.

पुणे महावितरणच्या रास्तापेठ येथील परिमंडल कार्यालयात जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभारी मुख्य अभियंता श्री. सिंहाजीराव गायकवाड यांच्या हस्ते परिमंडलातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना श्री. गायकवाड म्हणाले, दिव्यांग कर्मचारी आपल्या व्यंगांवर मात करुन कामात कायम अग्रेसर असतात. त्यांच्या संघर्षातून इतरांनाही प्रेरणा मिळते.महावितरणमध्ये दिव्यांगांसाठी असलेल्या सुविधा व सवलती याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तर दिव्यांगांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याची ग्वाहीही मुख्य अभियंता यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमास उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भुपेंद्र वाघमारे यांच्यासह दिव्यांग कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सूत्रसंचालन महेश कारंडे यांनी केले. 

राष्ट्रीय सहकारी संस्थांमध्ये वाढला महाराष्ट्राचा सहभाग-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची राज्यसभेत माहिती

नवी दिल्ली/पुणे : ‘राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड’ (एनसीईएल), ‘राष्ट्रीय सहकारी सेंद्रिय लिमिटेड’ (एनसीओएल) आणि ‘भारती बीज सुरक्षा व सेवा लिमिटेड’ (बीबीएसएसएल) या तीन महत्त्वाच्या राष्ट्रीय सहकारी संस्थांमध्ये महाराष्ट्राचा सहभाग वाढत असून, त्याचा थेट लाभ राज्यातील शेतकरी व सहकारी संस्थांना होत असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज राज्यसभेत दिली. डॉ. अनिल बोंडे यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.

मोहोळ म्हणाले, “देशातील आठ लाख सहकारी समित्यांपैकी सव्वा दोन लाख समित्या महाराष्ट्रात आहेत. देशाच्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे. एनसीईएल, एनसीओएल, बीबीएसएसएल या संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठा विस्तार होत आहे. ‘एनसीईएल’ आणि ‘एनसीओएल’मध्ये राज्यातील अनुक्रमे अकराशे आणि तीनशेहून अधिक सहकारी संस्था सामील असून, बीबीएसएसएलशी पाच हजारांहून अधिक संस्था जोडल्या गेल्या आहेत.”

महत्त्वाचे मुद्दे

  • ‘एनसीओएल’ने ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी मिशन’अंतर्गत 11 संस्थांसोबत सामंजस्य करार
  • त्यामुळे सेंद्रिय हरभरा, तूर आणि इतर कृषी उत्पादनांच्या खरेदीस चालना
  • ‘एनसीईएल’मार्फत सहकारी संस्थांकडून केळी, कांदा, हळद, अनार आणि द्राक्ष यांसारख्या उत्पादनांची निर्यात
  • ‘बीबीएसएसएल’चे पारंपरिक बियाण्यांचे संरक्षण, संवर्धन आणि त्यांच्या प्रसारासाठी टिश्यू कल्चर प्रयोगशाळा उभारण्यावर मोठे काम

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकारातून समृद्धी या धोरणानुसार आणि गृह व सहकारमंत्री अमितभाई शाह यांच्या नेतृत्वात सहकार क्षेत्राला मजबूत आणि सक्षम करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली जात आहेत. या बहुराज्य सोसायट्यांना सक्षम करत त्याचे सकारात्मक परिणाम गावपातळीवरील संस्थांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय सहकारी संस्थांमुळे उत्पादनांना बाजारपेठ, निर्यात संधी, सेंद्रिय शेतीला चालना आणि स्थानिक बियाण्यांचे संरक्षण शक्य होत असल्याने शेतकऱ्यांना थेट फायदा होत आहे’.

मुरलीधर मोहोळ
केंद्रीय सहकार राज्यमंत्री

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

पुणे, दि. ३ : पेरणे (ता. हवेली) पेरणे येथे १ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता पुणे-अहिल्यानगर महामार्ग क्र.६० वर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ५ वा. पासून ते १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२:०० वा. पर्यंत दोन्ही बाजूकडील वाहतुकीत बदलाचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

याअंतर्गत चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. अहिल्यानगर कडून पुणे-मुंबईकडे येणारी जड वाहने ही शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, हडपसर या मार्गे पुण्याकडे जातील.

पुण्याहून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने खराडी बाह्यवळण येथून हडपसरवरुन पुणे-सोलापूर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे न्हावरा, शिरुर-अहिल्यानगर मार्ग अशी वळविण्यात येतील. तसेच सोलापूर महामार्गावरुन आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने, ट्रक, टेम्पो आदी माल वाहतूक हडपसर, मगरपट्टा, खराडी बाह्यवळणमार्गे विश्रांतवाडीहून आळंदी व चाकण येथे जातील.

मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणारी कार, जीप आदी हलकी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुर मार्गे अहिल्यानगरकडे जातील, मुंबई व ठाणे कडून येणारी अनुयायांची वाहने मुंबई-पुणे महामार्गावरुन देहूरोड-निगडी-चऱ्होली-आळंदी-मरकळ-तुळापूर फाटा (लोणीकंद) अशी वळविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.

पुणे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन अहवालाचे जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते विमोचन

पुणे, दि. ३ : जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेला जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन तसेच शाश्वत विकास ध्येये जिल्हा प्रगतीमापन अहवाल जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले.
यावेळी प्रादेशिक सहसंचालक अर्थ व सांख्यिकी संचालनालय सुनील जाधव, उपायुक्त नियोजन संजय मरकळे, उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रियांका बोकील, तसेच जिल्हा सांख्यिकी आणि जिल्हा नियोजन समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, पुणे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन तसेच शाश्वत विकास ध्येये जिल्हा प्रगतीमापन अहवाल प्रशासनाला धोरणनिर्मितीत, विकास आराखडा तयार करतांना प्राधान्यक्रम ठरवितांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. जिल्ह्याच्या सातत्यपूर्ण व सर्वांगीण विकासासाठी अशा अभ्यासपूर्ण दस्तऐवजांची आवश्यकता आहे, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने संकलित केलेल्या आकडेवारीच्या आधारे तयार केलेला हा अहवाल जिल्ह्यातील विविध शासकीय, निम शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, संशोधक व विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल, असेही श्री. डुडी म्हणाले.
पुणे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन आणि शाश्वत विकास ध्येये जिल्हा प्रगतीमापन अहवाल
पुणे जिल्ह्याच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीचे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील शाश्वत विकास ध्येये निर्देशकांच्या अनुषंगाने झालेल्या कामगिरीचे सर्वसमावेशक चित्र उभे राहते. जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन हा जिल्ह्याच्या लोकसंख्या, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, उद्योग, शेती, रोजगार यांसह विविध क्षेत्रांतील स्थितीचे प्रतिबिंब दर्शवणारा महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो.
दरम्यान, शाश्वत विकास ध्येये जिल्हा प्रगतीमापन अहवाल हा संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांनुसार निर्धारित केलेल्या निर्देशकांचे मापन करून जिल्ह्याची प्रगती, आव्हाने आणि भविष्यकालीन दिशा स्पष्ट करतो. अहवालात दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ पाणी व स्वच्छता, उद्योग व नवोन्मेष, शाश्वत शहरे, हवामान कृती इत्यादी महत्त्वाच्या ध्येयांवरील जिल्ह्याची स्थिती विषद करण्यात आली आहे.

“फक्त दंडात्मक कारवाई पुरेशी नाही; नागरिकांचा जीव वाचवणे हेच सर्वोच्च उद्दिष्ट” — डॉ. नीलम गोऱ्हे

“खाजगी बस, अवजड वाहने आणि वाहतूक शिस्तीसाठी कठोर नियम; अपघात कमी करण्याचा निर्धार”

पुणे, ३ डिसेंबर २०२५ : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तसेच हिंजवडी परिसरातील वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांबाबत तातडीची समीक्षा करण्यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २ डिसेंबर २०२५ रोजी विधानभवन, मुंबई येथे आढावा बैठक घेतली.या बैठकीस पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी,श्रीमती अर्चना गायकवाड, पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. संदेश चव्हाण, पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.स्वप्निल भोसले आणि परिवहन विभागाचे सहाय्यक प्रादेशिक अधिकारी श्री. युवराज पाटील हे उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत व्यक्त केले की, “फक्त दंडात्मक कारवाई पुरेशी नाही; नागरिकांचा जीव वाचवणे हेच सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.” वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्याचे त्यांनी निर्देश दिले.

खासगी बस वाहतूक व्यवस्थेत शिस्तबद्धता

खासगी बस चालकांच्या वर्तनातील ढिसाळपणा आणि वाहतुकीत निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन खासगी बस वाहतूक व्यवस्थेसाठी प्रमाणित व स्वतंत्र कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करणे, प्रत्येक बसमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य करणे, चालकाचा बॅज क्रमांक स्वच्छपणे प्रदर्शित करणे आणि विद्यार्थ्यांसह कंपनी कर्मचार्‍यांना नेणाऱ्या बस चालकांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करणे ही महत्त्वाची पावले लागू करण्याचे सांगितले.

तसेच, मद्यधुंद चालकाविरुद्ध प्रवाशांना लगेच डिजिटल माध्यमातून तक्रार नोंदविता येईल अशी सोपी व तत्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अवजड वाहनांवरील नियंत्रण आणि सुरक्षा

अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची शक्यता लक्षात घेऊन सर्व डंपर, मिक्सर आणि अवजड वाहनांवर रिव्हर्स व्ह्यू कॅमेरा अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले. गर्दीच्या वेळात ‘नो-एन्ट्री’ चा काटेकोरपणे अंमल होईल यासाठी नवीन वेळापत्रक तयार करून त्याचे नियमित पुनरावलोकन करण्याचे सांगितले.
याशिवाय, आरएमसी प्लांट परिसरात वेग नियंत्रणासाठी गस्त वाढविणे आणि अशा वाहनांवरील नियमभंग रोखण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले.

वाहतूक नियंत्रण, सुरक्षा मोहिमा आणि अंमलबजावणी

अपघात रोखण्यासाठी वाहतूक सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाच्या मोहिमांना प्राधान्य देण्यात आले. नियमित ब्रेथ अॅनालायझर तपासणी, ब्लॅक स्पॉटवरील प्रकाशयोजनांची तपासणी, थर्मोप्लास्टिक रोड मार्किंगचे दुरुस्ती काम, रात्री उशिरा आणि पहाटे विशेष ड्रंक ड्रायव्हिंग मोहिमा राबविणे, हेल्मेट सक्ती आणि लेन कटिंगवर कठोर कारवाई हे उपाय तातडीने अमलात आणण्याचे ठरले.

अल्पवयीन वाहनचालकांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच पालकांनाही जबाबदार धरण्याचे निर्देश दिले. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील गर्दीची व अपघातग्रस्त ठिकाणे घोषित करून तेथे विशेष पथकांचे वेळोवेळी उपक्रम (ड्राइव्ह) राबविण्याचे ठरविण्यात आले.

जनजागृती आणि सार्वजनिक सहभागाचे महत्त्व

वाहतूक शिस्तीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी सायकलस्वारांना रिफ्लेक्टरचा अनिवार्य वापर, आयटी कंपन्यांना ‘फ्लेक्सी टाईम’ आणि ‘वर्क फ्रॉम होम’चा विचार करण्याबाबत आवाहन, तसेच रेडिओ आणि सोशल मीडियाद्वारे व्यापक वाहतूक-जागरूकता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले.
वाहतूक नियमभंगाची माहिती नागरिकांकडून थेट व्हॉट्सअॅपद्वारे संकलित करण्यासाठी संयुक्त मोहीम राबविणे आणि सोपी ऑनलाईन तक्रार प्रणाली तयार करून ती सर्वांसाठी उपलब्ध करणे याचाही विशेष उल्लेख केला.

अपघातग्रस्त कुटुंबीयांना भावनिक आधार

डॉ. गो-हे यांनी आपल्या कर्तव्याच्या पलिकडे जाऊन गंभीर अपघातातील मृतकांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना विमा दावा प्रक्रियेमधून जलद मदत मिळावी यासाठी विभागाने आवश्यक ते साहाय्य करावे, असे आवाहन केले. अपघातग्रस्त कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी संवेदनशील भूमिका घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

सुरक्षित वाहतुकीसाठी सामूहिक प्रयत्नांचा आग्रह

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या वाहतूक समस्यांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी नागरिक, पोलीस, परिवहन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वयाने कार्य करणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. गो-हे यांनी स्पष्ट केले. सर्व निर्देशांची तत्काळ अंमलबजावणी करून तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले.

नवरगावच्या मथुरा ताई प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर प्रशासनाची तत्काळ मदत

मुंबई, दि. ३ डिसेंबर २०२५ : नवरगाव (ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) येथील ७२ वर्षीय मथुरा ताई यांच्या अत्यंत हालाखीच्या परिस्थितीबाबत टाइम्स ऑफ इंडिया मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ मदतीचे निर्देश दिले. उपसभापतींच्या सूचना मिळताच जिल्हा प्रशासनाने त्वरेने प्रत्यक्ष भेट देऊन विविध शासकीय योजनांतून आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले आहे.

इ.स. १९७२ मध्ये देसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मथुरा ताई यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने देशभर तीव्र संताप उसळला होता. या प्रकरणामुळे महिलांवरील अत्याचारासंदर्भातील कायद्यात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या. आज ७२ वर्षांच्या झालेल्या मथुरा ताई अर्धांगवायूने पीडित असून त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी बातमी पाहताच जिल्हाधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधून मथुरा ताईंना आर्थिक, वैद्यकीय व सामाजिक पातळीवर त्वरित मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रशासनाने खालीलप्रमाणे मदत जाहीर केली आहे:

जिल्हा प्रशासनाने केलेली मदत :

  • इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना : १५०० रुपये प्रतिमाह मंजूर
  • अंत्योदय अन्न योजना (रेशन कार्ड रूपांतर) : १० किलो गहू + २५ किलो तांदूळ प्रतिमाह
  • पंतप्रधान आवास योजना : घरकुल मंजूर; पहिला हप्ता वितरित
  • ८ लाख रुपये आर्थिक सहाय्य : (४ लाख रुपये कर्मचारी कल्याण निधीतून) — संपूर्ण रक्कम मुद्दत ठेव; दरमहा अंदाजे ५००० रुपये व्याज मिळण्याची व्यवस्था
  • आदिवासी सबलीकरण व स्वाभिमान योजना : जमिनीचे प्रस्तावित प्रकरण प्रक्रिया मार्गावर
  • स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वस्तू व आर्थिक मदतीसाठी समन्वय साधला
  • नियमित भेटी आणि देखरेखीसाठी संपर्क अधिकारी नियुक्त

मथुरा ताईंच्या अर्धांगवायू स्थितीचा विचार करून आवश्यक फिजिओथेरपी, औषधोपचार आणि अपंगत्वासंदर्भातील उपकरणे उपलब्ध करून देण्याचेही निर्देश उपसभापतींनी दिले आहेत.

चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या तत्पर कारवाईबद्दल समाधान व्यक्त करत, “मथुरा ताईंना पुढील काळातही आवश्यक सर्व शासकीय व सामाजिक मदत नियमितपणे मिळेल यासाठी माझ्याकडून सतत पाठपुरावा केला जाईल,” असा निर्धार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन  ८ ते १४ डिसेंबर कालावधीत नागपूर येथे पार पडणार

विधानभवनामध्ये  विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची  बैठक संपन्न

मुंबई, दि. ३ :-   महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार दि. ८ ते  रविवार १४  डिसेंबर २०२५  या कालावधीत नागपूरमध्ये  पार पडणार  आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील,संस्कृतीकार्य मंत्री आशिष शेलार, सर्वश्री आमदार सुधीर मुनगंटीवार,अनिल परब, प्रसाद लाड,भास्कर जाधव, सुनील प्रभु, जितेंद्र आव्हाड, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, दीपक केसरकर, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे  व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दिनांक 13 डिसेंबर शनिवार आणि 14 डिसेंबर रविवार या सुट्टीच्या कालावधीत सभागृहाचे कामकाज होणार आहे
बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा  करण्यात आली.

इस्त्राईलमध्ये “नूतनीकरण बांधकाम” क्षेत्रात हजारो रोजगार संधी– राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळामार्फत ऑनलाईन अर्ज सुरू

पुणे, दि. ०३ : राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळामार्फत (NSDC) इस्त्राईलमध्ये “नूतनीकरण बांधकाम” (Renovation Construction) या क्षेत्रातील मोठ्या प्रमाणातील भरती प्रक्रिया सुरू झाली असून प्लॅस्टरींग काम – १००० जागा, सिरॅमिक टायलिंग – १००० जागा, ड्रायवॉल कामगार – ३०० जागा आणि राजमिस्त्री – ३०० जागा या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या पदांसाठी २५ ते ५० वयोगटातील, इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असलेले तसेच किमान तीन वर्षांचा नूतनीकरण बांधकाम क्षेत्रातील अनुभव असलेले उमेदवार पात्र ठरणार आहेत. उमेदवाराने यापूर्वी इस्त्राईलमध्ये काम केलेले नसावे तसेच त्यांचा जीवनसाथी, पालक किंवा मुले सध्या इस्त्राईलमध्ये काम करत नसावीत किंवा तेथील रहिवासी नसावेत, अशी अट घालण्यात आली आहे.

भरतीसंबंधी सर्व सविस्तर माहिती व अर्ज प्रक्रिया maharashtrainternational.com या संकेतस्थळावरील Latest Jobs या विभागात उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करून या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक महाविद्यालयांनी ही माहिती अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन सहायक आयुक्त सु.रा. वराडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधावा.

देशातील तरुणांच्या हाताला काम न देणे हा राष्ट्रद्रोह-प्रा. भारत पाटील

मता प्रतिष्ठान आयोजित फुले-आंबेडकर व्याख्यामालेत मार्गदर्शन

पुणे: “जुने आदर्श घेऊनच नवी पिढी पुढे जाईल. मात्र, आधीच्या पिढीने संवादाची दारे उघडी ठेवावीत. सद्यस्थितीत तरुणांमधील वाढती बेकारी, व्यसनाधीनता, गुन्हेगारी गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. त्याकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही. देशातील तरुणांच्या हाताला काम न देणे हा खरा राष्ट्रद्रोह आहे,” असे मत माध्यम तज्ञ प्रा. भारत पाटील यांनी केले.

महात्मा ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठान संचालित ग्रंथालय व वाचनालयातर्फे महात्मा फुले वाड्यात आयोजित फुले-आंबेडकर व्याख्यानमालेत ‘तरुणांमधील वाढती बेकारी, व्यसनाधीनता आणि उद्रेक’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पथारी पंचायतचे नेते काशिनाथ नखाते होते.

प्रा. भारत पाटील म्हणाले, “व्यसनाची व्याख्या बदलली असून, मोबाईल हे नवे व्यसन बनले आहे. त्या उद्योगाचेही केंद्रीकरण होत असून, त्यावर लक्ष जाऊ नये म्हणून जातीजातीत भांडणे लावून दिली जात आहेत. यामध्ये कोवळी मुले भक्ष्यस्थानी पडत आहेत. उच्च शिक्षणात कमालीची घट झाली आहे. दहावी, बारावीनंतर विद्यार्थी, शाळा सोडल्याचा दाखला आणायलाही जात नाहीत. ही पिढी निराशेच्या गर्तेत जात आहे. रिकामे हात, रिकामे मेंदू यामुळे नवी पिढी व्यसनाधीन होत आहे. त्यातून उद्रेक होण्याचा धोका वाढला आहे. नेपाळ आणि बांगलादेश ही त्याची उदाहरणे आपल्याला दिसत आहेत.”

काशिनाथ नखाते यांनी शासकीय धोरणांवर टीका केली. एका बाजूला रोजगार निर्मिती करायची नाही आणि दुसऱ्या बाजूला, स्वयंरोजगारांना अटकाव करायचा. याची दखल समाजाने घेतली नाही, तर बेरोजगारांचा उद्रेक होईल, असे त्यांनी परखडपणे मांडले. कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये न्यायालय न आणता, लवाद निर्माण केला आहे. लवाद हे सरकारी अपत्य असल्याची टीका त्यांनी केली.

कार्यक्रमाची सुरुवात फुले यांच्या अखंडाने झाली. प्रास्ताविक भाषणात ओंकार मोरे यांनी आजचा बेरोजगार युवक द्विधा मनस्थितीत असल्याचे सांगितले. आदर्शांना समाजासमोर, उभे करायचे आहे, पण उपाशी पोटी, तो भरकटत आहे, त्यातून त्याचा उद्रेक होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली. शारदा वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिष्ठानचे हारुण मुजावर यांनी आभार मानले.

18 नवदांपत्यांचा सामूहिक विवाह सोहळा पुण्यधाम आश्रमात संपन्न।

पुणे-

पुण्यधाम आश्रमात दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याने यंदाही मनाला स्पर्श करणारा अनुभव दिला. महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या 18 जोडप्यांनी, त्यापैकी 9 दृष्टिबाधित दांपत्यांनी, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी पूर्णतः निःशुल्क आणि विनादहेज आयोजित केलेल्या या सोहळ्यात एकमेकांच्या साथीने नवीन जीवनाची सुरुवात केली. हा उपक्रम सलग 10व्या वर्षी साजरा होत असून, आजतागायत 165 हून अधिक विनम्र कुटुंबातील कन्यांचे विवाह येथे थाटामाटात पार पडले आहेत।

सुमारे2500 हून अधिक लोकांच्या उपस्थितीत  पुण्यधाम परिसर लग्नाच्या तयारीची धावपळ, शहनाईचे मंगल निनाद, फुलांची आकर्षक सजावट आणि सर्वत्र सणासुदीचे वातावरनात न्हाऊन निघाला

स्वर्णलाल साड्यांमध्ये दिमाखात सजलेल्या वधू आणि शेरवानी, फेटे व मोजडीमध्ये रुबाबदार दिसणाऱ्या वरांची बारात उत्साहात नाचत सोहळा स्थळी दाखल झाली। सुंदर सजवलेल्या मंडपात वर-वधू स्थिरावल्यानंतर विद्वान पुजाऱ्यांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये विवाहविधी आरंभ केला। पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीतील अंतरपट, फेरे आणि कन्यादान यांच्या उपस्थित मान्यवरांच्या शुभाशीर्वादात संपन्न झाले।

पुण्यधाम आश्रमाच्या अध्यक्षा कृष्णा कश्यप म्हणाल्या:“पुण्यधाम आश्रम दरवर्षी अशा कन्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करतो, ज्यांच्या कुटुंबांना भव्य विवाह सोहळ्याचा खर्च उचलणे शक्य नसते। आमचे ध्येय म्हणजे या मुलींचे लग्न त्यांच्या स्वप्नांसारखे, कुटुंब-मित्रांच्या उपस्थितीत, सन्मानाने पार पाडणेतसेच दहेज प्रथेविरुद्ध जनजागृती घडवून समाजाच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडवणे हा आमचा प्रयत्न आहे।”त्यांचे जीवनमंत्र: “मानव सेवेतूनच ईश्वर सेवा”

सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते अध्यक्ष सीए सदानंद शेट्टी, सचिव घनश्याम जावार, विश्वस्त गणेश कामठे, प्रसिद्ध समाजसेविका श्रीमती ममता सिंधुताई सपकाल, विजय सोनी, विश्वनाथ टोडकर, तसेच प्रतिष्ठित व्यक्ती महादेव बाबर, वीरसन जगताप, संगिता ठोसर, जलिंदर कामठे यांनी नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले।

विवाहविधी पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षा कृष्णा कश्यप, अध्यक्ष, विश्वस्त मंडळ व मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते नवविवाहित जोडप्यांना गृहस्थ जीवनाची सुरुवात सुखकर व्हावी यासाठी घरगुती साहित्य, डिनर सेट, कुकर, चादरी, नव्या साड्या, सलवारकमीज सेट इत्यादी भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले। “सर्व नवदांपत्यांना आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा — त्यांच्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि एकोप्याचे चिरंतन आशीर्वाद राहोत” – मा. कश्यप

यापूर्वी याच उपक्रमातून विवाहबद्ध झालेले काही दांपत्यही या विशेष समारंभात सहभागी झाले होते हा दृश्य अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणणारा ठरला। सर्व पाहुण्यांसाठी पारंपरिक महाराष्ट्रीय जेवणाची स्वादिष्ट मेजवानीही आयोजित करण्यात आलीया भव्य आणि अत्यंत उदात्त सेवाकार्यातील संपूर्ण श्रेय कृष्णा कश्यप यांनाच जाते त्यांच्या सूक्ष्म नियोजनाशिवाय, अथक परिश्रमांशिवाय आणि प्रेरणेशिवाय पुण्यधाम आश्रमातील एकही उपक्रम शक्य नाही।

बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले-इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत

: समर्थ भारत व्याख्यानमाला

पुणे – जगाच्या इतिहासात अजिंक्य योद्धा बाजीराव पेशव्यांनी अवघ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात ४० पेक्षा अधिक युद्धे केली आणि एकही युद्ध ते हरले नाहीत. परंतु त्यांच्या या महान पराक्रमाकडे जाणूनबुजून दुर्लक्षित केले गेले. अवघ्या हिंदुस्थानात त्यांची दहशत एवढी होती की, इराणचा बादशहा नादीरशहा याने दिल्ली लुटण्यासाठी दिल्लीवर आक्रमण केले पण त्याच वेळी बाजीराव पेशवे आपला समाचार घेण्यासाठी दिल्लीला येत आहे ही बातमी कळताच नादिरशहा हा पळून गेला. खरं तर बाजीराव हे दिल्लीला पोहोचले देखील नाहीत. त्यामुळे त्यांचा पराक्रम आठवून आता तरी पेशवाईची बदनामी करू नका, असे आवाहन इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांनी केले.

समर्थ भारत व्याख्यानमालेत जगन्नाथ लडकत बोलत होते. मार्केटयार्ड जवळील संदेश नगरमध्ये समर्थ भारत व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. यावेळी पालखेड युद्ध स्मारक समितीचे संस्थापक सदस्य प्रशांत गोऱ्हे, अशोक धोका, निलय संघवी, मंगेश कुलकर्णी, संदीप खोत आदी उपस्थित होते. जगन्नाथ लडकत यांनी अजिंक्य योद्धा बाजीराव यांच्या विविध शौर्यगाथा तसेच पालखेडच्या लढाईचा संपूर्ण इतिहास उलगडला. 

जगन्नाथ लडकत म्हणाले, पेशवाई कालखंडामध्येच अटकेपार झेंडे लावले गेले. पानिपताच्या पराभवाचा कलंक देखील धुवून काढला. स्मार्ट पुणे या संकल्पनेचा पाया देखील याच कालखंडात घातला गेला. पुणे शहर हे त्याकाळी केंद्रस्थानी होते. तरी देखील या महान व्यक्तींच्या नावाखाली विनाकारण जाती-जातींमध्ये द्वेष पसरवण्याचे काम आज देखील केले जात आहे. आता तरी पेशवाई कालखंडाची बदनामी थांबवा. जी शक्ती अशा प्रकारे बदनामी करीत आहे त्यांना पुन्हा एकदा इतिहासाची आठवण करून देण्याची गरज आहे.

घोडदळाचा सर्वश्रेष्ठ सेनानी म्हणजे बाजीराव पेशवे होते असे वर्णन इंग्रज इतिहासकारांनी करून ठेवले आहे तसेच इंग्रज फील्ड मार्शल मॉन्टगोमरी यांनी त्यांच्या ‘A Concise History of Warfare’ या युद्धशास्त्र विषयक ग्रंथात जगातील पहिल्या दहा लढायांमध्ये पालखेडच्या लढाईचा उल्लेख केला आहे. एक बरे झाले हे इंग्रजांनी लिहून ठेवले आहे नाहीतर आज देखील मराठी इतिहासकारांनी लिहून ठेवले असते तर त्यांच्यावर देखील टीका झाली असती.

 निलय संघवी यांनी सूत्रसंचालन केले.

हलाल सर्टिफिकेशन नियमावलीत बदल करावा- खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची ‘झिरो अवर’मध्ये मागणी

पुणे:  ‘हलाल’ ही संकल्पना एका विशिष्ट धर्माशी संबंधित असून मुख्यत्वे मांसाहारी खाद्यपदार्थांपुरती मर्यादित आहे. त्यामुळे ‘हलाल’ सर्टिफिकेशन आणि त्यासंबंधित तांत्रिक व प्रशासकीय अनियमितता दूर करून ते सर्टिफिकेशन केवळ सरकारी प्रणालीद्वारेच व्हावे. तसेच या नियमावलीत आवश्यक ते बदल करावेत, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी बुधवारी सभागृहात केली.

‘झिरो अवर’मध्ये मुद्दा उपस्थित करीत प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून, विविध आस्था असलेले लोक इथे राहतात. हिंदू आणि शीख धर्मीयांमध्ये हलाल मांसाहार मान्य नाही. त्यांच्यावर हलाल मांसाची सक्ती होणे, हे संविधानातील धार्मिक स्वातंत्र्याच्या तरतुदींना बाधक आहे. आरोग्यशास्त्रामध्येही हलाल केलेले मांस खाणे आरोग्यास धोकादायक असल्याचे समोर आले आहे.

दूध, साखर, तेल, औषधी, प्रसाधन सामग्री, तसेच सिमेंट, स्टील, प्लास्टिक यांसारख्या गैर-खाद्य वस्तूंनाही हलाल प्रमाणपत्र देण्याची प्रवृत्ती वाढल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रमाणनासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामुळे उत्पादनांच्या किमती वाढून त्याचा परिणाम सर्व ग्राहकांना भोगावा लागतो, तसेच स्वातंत्र्य, बाजारातील पारदर्शकता आणि समान न्यायावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सध्या हलाल इंडिया लिमिटेड, हलाल सर्व्हिसेस इंडिया प्रा. लिमिटेड, जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट, जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र या संस्था हलाल प्रमाणन देत असून, देशभरात सुमारे ७० ते ८० अवैध आणि बोगस प्रमाणन संस्था कार्यरत असल्याचा दावा त्यांनी सभागृहात केला. उत्तर प्रदेशात अशा काही संस्थांवर गुन्हेही नोंदवले गेल्याचा उल्लेखही त्यांनी केला. तसेच अन्नपदार्थांसाठी ‘एफएसएसएआय’, तर औषधांसाठी ‘एफडीआय’ या अधिकृत प्रमाणन संस्था अस्तित्वात असताना खासगी व धार्मिक संस्थांना खाद्य प्रमाणनाचा अधिकार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

प्रा. डॉ. कुलकर्णी यांच्या मागण्या:
– मांसाहारी उत्पादनांचे हलाल प्रमाणन सरकारी यंत्रणेद्वारेच व्हावे
– खासगी व स्वयंसेवी संस्थांना प्रमाणन देण्याचा अधिकार रद्द करावा
– आवश्यकतेनुसार इस्लाम धर्मातील तज्ज्ञ सदस्याची सरकारी समितीत नियुक्ती करावी
– हलाल प्रमाणनातून मिळणारे शुल्क सरकारी कोषात जमा करावे
– बोगस व देशविरोधी कारवायांशी संबंधित संस्थांवर कारवाई करावी
– गैर-मांस आणि गैर-खाद्य वस्तूंवरील हलाल प्रमाणन पूर्णपणे बंद करावे

कोरोना रेमिडीज लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री सोमवार 08 डिसेंबर पासून

0

         कोरोना रेमिडीज लिमिटेडच्या प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“Equity Shares”) 1008 रु. ते 1062 रु. किंमतपट्टा निश्चित

·         बोली/ऑफर सोमवार 08 डिसेंबर 2025रोजी खुली होईल आणि बुधवार, 10 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक शुक्रवार 05 डिसेंबर 2025आहे.

·         बोली किमान 14 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 14 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

·         कर्मचारी राखीव भागांत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 54 रु. ची सवलत

·         रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (“RHP”) लिंक: https://live.jmfl.com/od/UploadedFiles/D85CD184-902B-431E-8620-18ABC2F68BE8.pdf

मुंबई, 03 डिसेंबर 2025: कोरोना रेमिडीज लिमिटेड (CRL) ने इक्विटी शेअर्ससाठी सोमवार 08 डिसेंबर 2025पासून प्राथमिक समभाग विक्री बोली/ऑफर खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. बोली/ऑफर बुधवार, 10 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. प्रति इक्विटी शेअरसाठी 1008 रु. ते 1062 रु. किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. जे एम फायनान्शियल लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक शुक्रवार 05 डिसेंबर 2025आहे. बोली किमान 14 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 14 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. या ऑफरमध्ये प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त [●] इक्विटी शेअर्सचा समावेश असून त्याची एकूण रक्कम 6,553.71 दशलक्ष रु. इतकी आहे.

एकूण ऑफर साइजमध्ये प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सची एकूण रक्कम 6,553.71 दशलक्ष रु. इतकी असून यात खालीलप्रमाणे समावेश आहे: डॉ. कीर्तिकुमार लक्ष्मीदास मेहता (प्रवर्तक विक्री समभागधारक) यांच्याकडून प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त [●] इक्विटी शेअर्सची 1,298.41 दशलक्ष रु. इतकी रक्कम; मिनाक्षी कीर्तिकुमार मेहता (प्रमोटिंग ग्रुप विक्री समभागधारक ) यांच्याकडून प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त [●] इक्विटी शेअर्सची 766.07 दशलक्ष रु. इतकी रक्कम; दिपाबेन निरवकुमार मेहता (प्रमोटिंग ग्रुप विक्री समभागधारक) यांच्याकडून 103.87 दशलक्ष रु. पर्यंतचे प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले जास्तीत जास्त [●] पर्यंत इक्विटी शेअर्स; ब्रिंदा  अंकुर मेहता (प्रमोटिंग ग्रुप विक्री समभागधारक) यांच्याकडून 103.87 दशलक्ष रु. पर्यत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त [●] पर्यंतचे इक्विटी शेअर्स; सेपिया इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड (गुंतवणुकदार विक्री समभागधारक) यांच्याकडून 4,046.00 दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले [●] पर्यंतचे इक्विटी शेअर्स; अँकर पार्टनर्स (गुंतवणुकदार विक्री समभागधारक) यांच्याकडून 151.25 दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले [●] पर्यंतचे इक्विटी शेअर्स; सेज इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (गुंतवणुकदार विक्री समभागधारक) यांच्याकडून 84.24 दशलक्ष रु पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले [●] पर्यंतचे इक्विटी शेअर्स यांचा यात समावेश आहे.

कर्मचारी राखीव भागांत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 54 रु. ची सवलत दिली जात आहे.

कंपनीचे रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (“RHP”) द्वारे हे इक्विटी शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) आणि BSE लिमिटेड (BSE आणि NSE बरोबर एकत्रितपणे “Stock Exchanges”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.

कोरोना रेमेडीज ही भारत-केंद्रित ब्रँडेड फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कंपनी असून महिलांच्या आरोग्य, कार्डिओ-डायबेटो, वेदना व्यवस्थापन, यूरोलॉजी आणि इतर उपचारात्मक क्षेत्रांमध्ये उत्पादनांची निर्मिती, विकास, आणि विपणन करण्याचे कार्य करते. 30 जून 2025 पर्यंत कंपनीकडे 71 ब्रँड्सचा वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ असून तो विविध उपचारात्मक क्षेत्रांना पूरक आहे.

CRISIL इंटेलिजन्स रिपोर्टनुसार, कोरोना रेमेडीज ही MAT जून 2024 ते MAT जून 2025 या कालावधीत भारतीय औषधनिर्माण बाजारपेठे (“IPM”) मधील आघाडीच्या 30 कंपन्यांमध्ये देशांतर्गत विक्रीच्या दृष्टीने सर्वात वेगाने वाढणारी कंपनी आहे. MAT म्हणजे चालू वर्षातील एकूण वार्षिक संख्या. MAT जून 2022 ते MAT जून 2025 या कालावधीत देशांतर्गत विक्रीच्या दृष्टीने IPM मधील अग्रणी 30 कंपन्यांमध्ये कोरोना रेमेडीज ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वेगाने वाढणारी कंपनी होती.

• महिलांचे आरोग्य : किशोरावस्था ते वंध्यत्व, गर्भधारणा, प्रसूतीनंतरचा काळ तसेच रजोनिवृत्तीपूर्व आणि रजोनिवृत्तीनंतरच्या श्रेणींमध्ये महिलांच्या संपूर्ण आरोग्य जीवनचक्राला कव्हर करणारे ब्रँड्स;

• कार्डिओ-डायबेटो: मधुमेह उपचाराच्या विविध टप्प्यांना कव्हर करणारे ब्रँड्स. यामध्ये इन्सुलिन प्रतिकारशक्ती, प्री-डायबेटीसपासून डायबेटीस आणि डायबेटीसशी संबंधित गुंतागुंतींपर्यंत, तसेच उच्च रक्तदाब, डिस्लिपिडेमिया आणि इस्केमिक हार्ट डिसीज यांसारख्या हृदयविकारांपर्यंत

• वेदना व्यवस्थापन: वेदना व्यवस्थापनासाठी कंपनी चार प्रकारचे डोस फॉर्म्स देते – गोळ्या, कॅप्सूल, स्प्रे आणि इंजेक्शन्स. त्यांचा उपयोग मस्क्युलोस्केलेटल स्पॅझम्स आणि डायबेटिक न्युरोपथी पेन यांसह इतर संबंधित उपचारांसाठी केला जातो;

• यूरोलॉजी: बेनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लेशिया,  ओव्हरअ‍ॅक्टिव्ह ब्लॅडर, युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स आणि स्टोन मॅनेजमेंट यांसारख्या अनेक यूरोलॉजिकल विकारांसाठी ब्रँड ऑफरिंग्ज.

ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित  नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या किमान 50% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. SEBI ICDR नियमांनुसार त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या (“Anchor Investor Allocation Price”) बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील.

जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स (प्रमुख गुंतवणूकदार भाग वगळून) नेट QIB Portion मध्ये (“Net QIB Portion”) समाविष्ट केले जातील.

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. मात्र, म्युच्युअल फंडांकडून एकत्रित मागणी Net QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असल्यास, म्युच्युअल फंड भागांत  वाटपासाठी उपलब्ध असलेल्या शिल्लक इक्विटी शेअर्सची उर्वरित Net QIB Portion मध्ये भर घातली जाईल आणि QIBs साठी प्रमाणानुसार वाटप केले जाईल.

पुढे, नेट ऑफर पैकी 15% पेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“Non-Institutional Investors”) उपलब्ध असेल. बिगर संस्थात्मक भागापैकी अ) एक तृतीयांश भाग 200,000  रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000  रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि ब) दोन तृतीयांश भाग 1,000,000  रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वाटप केला जाऊ शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. SEBI ICDR नियमांनुसार ऑफरपैकी किमान 35% वाटप रिटेल इंडिव्हिज्युअल बिडर्स साठी उपलब्ध असेल. ऑफर प्राईसच्या बरोबर किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीवर वैध बोली प्राप्त झाल्या असतील तर हे लागू होईल.

पुण्यातील कोपा मॉलमध्ये ‘इंडियन ओशियन (Indian Ocean)’ चा दमदार लाईव्ह शो; त्यानंतर विपुल गोयलची धमाल कॉमेडी

0

पुणे : पुणेकरांच्या मनोरंजनाला नवी झिंग देण्यासाठी कोपा मॉलमध्ये यंदाच्या आठवड्याअखेर दोन खास कार्यक्रमांची मेजवानी सजली आहे५ आणि ६ डिसेंबर रोजी सलग दोन संध्याकाळी संगीत व विनोदाचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.

 डिसेंबर रोजी भारतीय फ्युजन रॉक संगीताला नवा आयाम देणाऱ्या प्रतिष्ठित ‘Indian Ocean’ बँडचा बहारील ओपनएअर लाईव्ह परफॉर्मन्स टेरेसवर होणार आहे. पुणेकरांना भावपूर्ण सुरावटी आणि बँडची खास ध्वनीशैली यांचे मनमोहक मिश्रण एका वेगळ्या वातावरणात ऐकण्याची संधी मिळणार आहे.

यानंतर, दुसऱ्या दिवशी  डिसेंबर रोजी कॉमेडी फेस्ट अंतर्गत लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन – विपुल गोयलप्रेक्षकांसाठी आपली खास निरीक्षणाधारित विनोदी शैली आणि टोकदार हजरजबाबीपणा घेऊन येणार आहेत. आजच्या शहरी जीवनशैलीशी जुळणारी, सहजसुंदर कथा आणि विनोद यांचे अनोखे सादरीकरण पुणेकरांना भरभरून हसवणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांसाठी नाममात्र शुल्क ठेवण्यात आले असून, अधिकाधिक पुणेकरांनी सहभागी व्हावे, यासाठी आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

कोपा मॉलचे हे सलग दोन संध्याकाळीचे कार्यक्रमं पुणेकरांना संगीत आणि हास्याचा दुहेरी आनंद देणारे ठरतील. शहराच्या बदलत्या सांस्कृतिक धाटणीला अनुसरून, समुदायाला अधिक समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक अनुभव देणे, हे मॉलचे उद्दिष्ट आहे. डिसेंबरच्या उत्सवी दिवसांत या मनोरंजनमय कार्यक्रमांमुळे पुण्याचे सांस्कृतिक कॅलेंडर अधिक रंगतदार होणार आहे!

कार्यक्रम:

1.       Indian Ocean Live – ५ डिसेंबर २०२५ (सायं. ७ वाजता!)

2.       Comedy Fest with Vipul Goyal – ६ डिसेंबर २०२५ (सायं. ६.४५ वाजता!)