Home Blog Page 281

आता कात्रज बायपास मार्गावर वाहन वेग मर्यादा 40 किमी प्रतितास बंधनकारक

पुणे, दि. 4 : पुणे शहर वाहतूक विभागाच्या हद्दीतील कात्रज बाह्यवळण मार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज दरम्यान वाहनांच्या वेगामुळे वारंवार होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्त्यावरील वेग मर्यादित करणे आवश्यक असल्याने मोटार वाहन कायदा कलम 115, 116 (1)(2)(बी), 116 (4) व 117 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून पोलीस उप-आयुक्त (वाहतूक), पुणे शहर हिंमत जाधव यांनी कात्रज बायपास मार्गावरील भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेवटपर्यंत कमाल वेगमर्यादा (अत्यावश्यक सेवेतील वाहने – अग्निशमन, पोलीस, रुग्णवाहिका इ. वगळता) 40 किमी प्रतितास करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत.

सदरचे आदेश 4 डिसेंबर 2025 पासून लागू राहणार आहेत. या मार्गावर यापूर्वी वेगमर्यादेबाबत निर्गमित केलेले सर्व आदेश रद्द करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी आपल्या वाहनांचे स्पीडोमीटर नियमित तपासावेत, रस्त्यावरील बोर्डिंग व चिन्हांकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन वाहतूक विभागामार्फत करण्यात आले आहे. या अधिसूचनेचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर CCTV व स्पीड गन प्रणालीद्वारे नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.

वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेने केले आहे.
0000

मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही: हर्षवर्धन सपकाळ.

भाजपा महायुती सरकार एक वर्षात बौद्धीक व आर्थिक दिवाळखोरीत, शेतकरी व लाडक्या बहिणींनाही फसवले.

शेतकऱ्यांना मदत देण्याची भाजपा सरकारची इच्छाच नाही; केंद्राला प्रस्तावही नाही व केंद्र सरकारकडून निधीही नाही.

मुंबई, दि. ४ डिसेंबर २०२५.

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगर पंचायतीचे मतदान संपल्यानंतर १७ ईव्हीएम मशीनचे सील तोडून पुन्हा मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पण अद्याप एफआयआरही दाखल केलेला नाही. हे सर्व प्रकार लोकशाहीचे वस्त्रहरण करणारे आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यात १० वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत परंतु या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्ष, प्रशासन व निवडणूक आयोग यांनी निवडणूक प्रक्रियेची थट्टा केली आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने निवडणूक प्रक्रिया सुधारण्यावर भर देत आहे. मतचोरी, मतदार याद्यांमधील घोळ, यावर आवाज उठवत आहे पण त्यात काहीही सुधारणा होताना दिसत नाही. निवडणूक आयोगाने आतातरी डोळे उघडावे. निवडणूक आयोगाला टी. एन. शेषन यांच्यासारख्या कणखर निवडणूक आयुक्ताची गरज आहे. मतचोरी प्रश्नी काँग्रेस पक्षाने १४ डिसेंबर रोजी दिल्लीत देशपातळीवर मोठी रॅलीही आयोजित केली आहे, असे सपकाळ म्हणाले.

भाजपा सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक..
राज्यात मे महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत पावसाने धुमाकुळ घातला. शेतातील पिकं वाहून गेली, शेत जमीन खरडून गेली, सर्व हंगाम वाया गेला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. सरकारने ३३ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याचे जाहीर केले पण ते कोणाला मिळाले हे माहित नाही. केंद्र सरकारकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्तावही पाठवला नाही. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी लोकसभेत महाराष्ट्र सरकारची लाज काढली. महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव पाठवलेला नाही हे केंद्रीय कृषी मंत्र्यांनीच सांगितले, यावरून भाजपा महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती खोटे बोलतात हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारकडून राज्याला निधी आणला नाही व प्रस्तावही पाठवला नाही कारण भाजपा महायुती सरकारला शेतकऱ्यांना मदतच करायची नाही, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.

महायुती सरकारचे एक वर्ष बौद्धिक व आर्थिक दिवाळखोरीचे.
राज्यातील भाजपा महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. मतचोरी करून सत्तेत आलेल्या सरकारची एका वर्षातच बौद्धिक व आर्थिक दिवाळखोरी निघाली आहे. सत्तेत येताना लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार, शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणार, नोकर भरती करणार अशी आश्वासने दिली होती पण त्याचा आता महायुती सरकारला विसर पडला आहे. कोयता गँग, खोके, आका, वाळू माफिया, ड्रग्ज माफिया हे महायुती सरकारने राज्याला दिले आहे. जाती धर्मात वाद निर्माण करण्याचे काम सरकारने केले असून ‘पैसा फेक तमाशा देख’, हे वगनाट्य जोरात सुरु आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

शितल तेजवानी बळीचा बकरा
पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी भ्रष्टाचार प्रकरणी शितल तेजवानी यांना केलेली अटक म्हणजे त्यांना बळीचा बकरा करण्यात आले आहे. या प्रकरणातील जमीन खरेदी करणाऱ्या कंपनीचा मालक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याच्यावर कसलीही कारवाई केलेली नाही व सरकार करणारही नाही, असेही सपकाळ म्हणाले..

नाशिकमधील तपोवनची वृक्षतोड म्हणजे अधर्म..
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तपोवनातील शेकडो वृक्षांची कत्तल करणे म्हणजे अधर्म आहे. याच तपोवनात प्रभू रामचंद्र, मातासीता व लक्ष्मण यांनी वास्तव केल्याचे सांगितले जाते. या पवित्र वनातील झाडांची कत्तल करून भाजपा महायुती सरकार आपला अध्यात्मिक वारसाच संपुष्टात आणत आहे आणि हा अधर्म आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

गडकरींनी लोकसभेत दिली पुण्यातील वाहतूक कोंडी आणि रस्ते पायाभूत सुविधा यांची माहिती

पुणे: नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025

सरकारचे रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मुख्यतः राष्ट्रीय महामार्गांच्या विकास आणि देखभालीशी संबंधित आहे. पुणे महानगर क्षेत्रातील विविध राष्ट्रीय महामार्गांवर वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या महत्त्वाच्या उड्डाणपूल आणि रस्ते रुंदीकरण प्रकल्पांची माहिती तसेच ही कामे पूर्ण होण्यासाठीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे :

S.No.Name of workTarget date for completion
1राष्ट्रीय महामार्ग-48 वरील चांदणी चौकातील एकत्रित संरचना बांधकाम मार्च 2024 मध्ये पूर्ण झाले.
2राष्ट्रीय महामार्ग -548DD  वर कात्रज चौकात किलोमीटर 3/880 येथे सहा पदरी उड्डाणपूलाचे बांधकामजून 2026 पर्यंत पूर्ण होणार.
3राष्ट्रीय महामार्ग -48 वरील पुणे-सातारा विभागातील सेवा/स्लिप रस्त्याचे काँक्रीटीकरण (41  किलोमीटर लांब)जून 2027 पर्यंत पूर्ण होणार.
4राष्ट्रीय महामार्ग -60 वरील नाशिक फाटा ते खेड़ विभागातील उंच मार्गिका ( 30 किलोमीटर लांब)मार्च 2030 पर्यंत पूर्ण होणार.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय)  राष्ट्रीय महामार्ग -48 वर रावेत ते नर्‍हे दरम्यान उंच मार्गिका बांधण्याबाबतच्या शक्यता तपासण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे.

याशिवाय, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळा सोबत (एमएसआयडीसी)  सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार पुणे–शिरूर विभाग (राष्ट्रीय महामार्ग -753F), तळेगाव–चाकण–शिकरपूर विभाग (राष्ट्रीय महामार्ग -548D) आणि हडपसर–यवत विभाग ( राष्ट्रीय महामार्ग-65) येथे तांत्रिक शक्यतेनुसार उंच मार्गिका बांधकाम / क्षमता वाढविण्याचे काम होणार आहे.

प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि सुरू असलेली विकासकामे लवकर पूर्ण करण्यासाठी एनएचएआय, पुणे महानगरपालिका पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि राज्य व केंद्र सरकारच्या इतर संस्था यांच्यात नियमित बैठक घेतल्या जात आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

मुंबईतील छापेमारीत 64 बनावट ‘पॉवर अडॉप्टर’ जप्त

0

मुंबई:भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखेने 28 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत अंधेरी पश्चिम येथील जेपी रोड येथे सुरेश पाटील बिल्डिंग मधील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 01 मधील मेसर्स रतन आयटी सोल्युशन्स वर छापा टाकला. मानक चिन्हाचा गैरवापर होत असल्याची माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली.

ही कंपनी मानक चिन्हाविना आयटी उपकरणांसाठीच्या पॉवर अडॅप्टरची विक्री, भाड्याने घेणे, लीज वर देणे, साठवणे किंवा विक्रीसाठी प्रदर्शित करणे अशा प्रकारात गुंतली असल्याचे छाप्यादरम्यान आढळून आले. आयटी उपकरणांसाठी वापरले जाणारे पॉवर अडॅप्टर IS 13252 (भाग 1): 2010 नुसार बीआयएस प्रमाणित नव्हते, त्यामुळे बीआयएस अधिनियम 2016 च्या कलम 17(1) आणि 17(3) चे उल्लंघन झाले. या छाप्यादरम्यान आयटी उपकरणांसाठीचे 64  पॉवर अडॅप्टर जप्त करण्यात आले.

‘बीआयएस’अर्थात भारतीय मानक ब्युरो ही बीआयएस कायदा 2016 अंतर्गत स्थापन झालेली भारताची राष्ट्रीय मानक संस्था असून ग्राहकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि गुणवत्ता अनुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी सतत कार्यरत आहे. बीआयएस, मानक निश्चिती, उत्पादनांचे प्रमाणीकरण, प्रयोगशाळेत चाचणी आणि प्रणालीचे प्रमाणीकरण या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. बीआयएस सुरक्षित, खात्रीलायक आणि दर्जेदार उत्पादने उपलब्ध होण्यास मदत करते आणि ग्राहक संरक्षण, उत्पादन सुरक्षा, अन्न सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आणि बांधकामाशी संबंधित प्रमुख सार्वजनिक धोरणांना समर्थन देऊन राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देते.

बीआयएस कायदा 2016 अंतर्गत, कोणत्याही व्यक्तीला वैध बीआयएस परवान्याशिवाय मानक चिन्ह (आयएसआय चिन्ह) वापरून कोणतेही उत्पादन तयार करणे, वितरण करणे, विक्री करणे, भाड्याने देणे, लीज वर देणे किंवा प्रदर्शित करण्याची परवानगी नाही. उत्पादक आणि विक्रेत्यांच्या दंड आणि दायित्वांबद्दल तपशीलवार माहितीसाठी नागरिक बीआयएस कायदा 2016 ची मदत घेऊ शकतात.

सर्व ग्राहकांनी बीआयएस प्रमाणित  आवश्यक उत्पादनांची यादी पाहण्यासाठी बीआयएस केअर अॅपचा (अँड्रॉइड आणि आयओएस) वापर करावा असे आवाहन बीआयएसने केले आहे. तसेच वस्तू खरेदी करण्यापूर्वी उत्पादनावरील आयएसआय चिन्ह किंवा हॉलमार्क यांची सत्यता पडताळण्यासाठी  http://www.bis.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच, जर कुठे बंधनकारक उत्पादने `बीआयएस` प्रमाणनाशिवाय विक्रीस ठेवली जात असतील किंवा आयएसआय चिन्ह अथवा प्रमाणचिन्हाचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले, तर त्याची माहिती प्रमुख, `एमयुबीओ`, पश्चिम क्षेत्रीय  कार्यालय, बीआयएस, 5 वा मजला, सीईटीटीएम संकुल, हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई – 400076 येथे कळवावी, असे आवाहन देखील केले आहे. अशा तक्रारी mubo1@bis.gov.in या ई-मेल पत्त्यावरही नोंदवता येऊ शकतात. बीआयएस अशा माहितीचा स्रोत गोपनीय राखते.

पासपोर्ट अर्जदारांसाठी संवाद सत्र

0

पुणे, दिनांक 4 डिसेंबर 2025 :प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांच्यामार्फत नागरिकांच्या पासपोर्ट संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी ओपन हाऊस अर्थात संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

संवाद सत्रादरम्यान, प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे अंतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांतील पासपोर्ट अर्जदार त्यांच्या पासपोर्ट अर्ज/तक्रारीशी संबंधित प्रश्नांसाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना भेटू शकतात.

हे संवाद सत्र येत्या बुधवारी 10 डिसेंबर 2025 रोजी पुण्यातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयपासपोर्ट बिल्डींगसर्व्हे नंबर 5/2/2 बाणेरपाषाण लिंक रोडबाणेरपुणे येथे दुपारी 3 ते या वेळेत आयोजित करण्यात आले आहेअशी माहिती प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने दिली आहे.

त्यासाठी अर्जदारांनी खालील तपशीलांचा उल्लेख करून rpo.pune@mea.gov.in वर मेल करून आपल्या प्रश्नांची नोंद करावी.

फाइल क्रमांक 
नवीनतम पासपोर्ट क्रमांक (जर असेल तर) 
नाव 
प्रश्न थोडक्यात 

यानंतर प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांच्यामार्फत आपणास एक पुष्टीकरण ईमेल पाठवला जाईल. हा पुष्टीकरण ईमेल सादर केल्यानंतरच संवाद सत्रात प्रवेश दिला जाईल, याची नोंद घ्यावी.

महाराष्ट्रात बेकायदेशीर धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची नागरिक सोशल फाउंडेशनची मागणी

0

पुणे : राज्यात वाढत्या बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने तातडीने “महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलीजन (Prevention of Fraud & Coercion) Act” पारित करून लागू करावा, अशी मागणी नागरिक सोशल फाउंडेशन (NSF) या सामाजिक संस्थेने केली आहे. यासंदर्भातील मागणीपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आल्याची माहिती ॲड. सर्वेश मेहेंदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी अमेय सप्रे, प्रीतम थोरवे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात संस्थेने नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील आदिवासी बहुल भाग—विशेषतः धुळे, नंदुरबार, पुणे आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये—बळजबरी, फसवणूक किंवा प्रलोभनाद्वारे धर्मांतराच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. अशा प्रकारचे अवैध धर्मांतर हे व्यक्तीच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे असून सामाजिक सौहार्दालाही गंभीर धोका निर्माण करणारे आहे.

संस्थेने स्पष्ट केले आहे की धर्मांतर हे केवळ व्यक्तीच्या श्रद्धा, स्वेच्छा आणि जाणिवेवर आधारित असावे; दबाव, फसवणूक, आर्थिक लाभ किंवा इतर प्रलोभनाद्वारे केलेले धर्मांतर अवैध ठरले पाहिजे. अशा कायद्यामुळे धार्मिक स्वातंत्र्याचा आदर राखत सर्व समुदायांचे संरक्षण, धार्मिक समरसता आणि सामाजिक शांतता दृढ होऊ शकते. तसेच परकीय निधी किंवा अनधिकृत धार्मिक बांधकामांचा गैरवापर थांबवता येईल, आणि दोषी संस्था किंवा व्यक्तींवर कठोर कारवाई करता येईल.

NSF ने सुचवलेल्या विधेयकातील काही प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे असाव्यात:

धर्मपरिवर्तन हे व्यक्तीच्या वैयक्तिक श्रद्धा आणि स्वीकृतीवर आधारित असावे.

दबाव, फसवणूक किंवा आर्थिक-साहित्यिक प्रलोभनाद्वारे झालेले धर्मपरिवर्तन वैध मानले जाऊ नयेत.

अवैध धर्मांतर करणाऱ्या संस्थांवर, व्यक्तींवर किंवा त्यांच्या माध्यमांवर कडक शिक्षेची तरतूद असावी.

स्वेच्छेने धर्मांतर करू इच्छिणाऱ्यांसाठी पारदर्शक, सुरक्षित आणि प्रशासकीयदृष्ट्या स्पष्ट प्रक्रिया उपलब्ध असावी.

फसवणूक किंवा दबावाखाली धर्मांतर झाल्यास पीडितांना कायदेशीर मदत व न्याय मिळण्याची हमी दिली जावी.

पत्रकार परिषदेत NSF ने या विषयावर नागरिक आणि माध्यमांनी अधिक सार्वजनिक व गंभीर चर्चा व्हावी, तसेच समाजात सर्व स्तरांवर जनजागृती वाढावी, असे आवाहन केले. तसेच राज्य सरकारने येत्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर करून तातडीने अंमलात आणावे, अशीही मागणी करण्यात आली.

नागरिक सोशल फाउंडेशनने सार्वजनिक जनजागृती, सामाजिक संशोधन, कायदेविषयक अभ्यास, तसेच कायदा अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारे डेटा, दस्तऐवज आणि समुदाय संवादाच्या प्रक्रियेत राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

एका वर्षात टोल बूथ संपतील,बॅरियर-लेस प्रणाली लागू होईल : नितीन गडकरी


नवी दिल्ली :केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले की, पुढील एका वर्षात महामार्गावरील सध्याची टोल वसुली प्रणाली बंद होईल. त्याऐवजी पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक, बॅरियर-लेस टोल प्रणाली लागू केली जाईल.
ते म्हणाले की, नवीन प्रणालीची सुरुवात सध्या 10 ठिकाणी करण्यात आली आहे आणि एका वर्षाच्या आत ती संपूर्ण देशात लागू करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांनी सांगितले की, सध्या देशभरात सुमारे 4,500 महामार्ग प्रकल्प सुरू आहेत, ज्यांची एकूण किंमत अंदाजे 10 लाख कोटी रुपये आहे.

आधी टोल प्लाझावर गाड्यांना थांबून रोख किंवा कार्डने पैसे भरावे लागत होते, नंतर FASTag आल्याने थांबण्याचा वेळ कमी झाला, आता पुढील पाऊल बॅरियर-लेस म्हणजेच बॅरियर नसलेल्या हायटेक टोलच्या दिशेने आहे.

नवीन टोल प्रणाली काय आहे?

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (NETC) कार्यक्रम तयार केला आहे. हे संपूर्ण देशासाठी एकसमान आणि परस्परांशी जोडलेले इलेक्ट्रॉनिक टोल प्लॅटफॉर्म आहे. याचा उद्देश वेगवेगळ्या महामार्गांवरील वेगवेगळ्या प्रणालींची अडचण दूर करणे आणि एकाच तंत्रज्ञानाने सहजपणे टोल वसूल करणे हा आहे.

या NETC प्रणालीचा मुख्य भाग FASTag आहे, जो रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञानावर आधारित टॅग असतो आणि तो वाहनाच्या पुढील काचेवर (विंडस्क्रीन) चिकटवला जातो. वाहन टोल लेनमधून जाताच, सेन्सर हा टॅग वाचून वापरकर्त्याच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून किंवा वॉलेटमधून टोल आपोआप कापून घेतात.

बॅरियर-लेस टोलिंग कसे काम करेल?

सरकार आता FASTag सोबत ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन (ANPR) सारखे तंत्रज्ञान जोडून बॅरियर-लेस टोलिंग लागू करत आहे, जेणेकरून गाड्यांना टोलसाठी थांबावे लागणार नाही. ANPR कॅमेरे गाडीची नंबर प्लेट ओळखतात आणि FASTag रीडर RFID टॅग वाचून टोलची रक्कम वसूल करतात, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया काही सेकंदात आपोआप पूर्ण होते.​

या प्रणालीअंतर्गत टोल प्लाझावरील मोठे बॅरियर, लांबच लांब रांगा आणि रोख पैसे देण्याची सक्ती बऱ्याच अंशी संपुष्टात येईल. ज्या वाहनांजवळ वैध FASTag नसेल किंवा जे नियम मोडतील, त्यांना ई-नोटीस आणि दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते, जसे की FASTag निलंबित करणे किंवा VAHAN डेटावर दंड आकारणे.

लाल महालातील लावणीची चर्चा परंतु कीर्तन परंपरा चालू ठेवणाऱ्यांना अडचणी 

आचार्य शाहीर हेमंत राजे मावळे यांची खंत :

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे व सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन

पुणे : इतर कार्यक्रमांना मोठ्या जागा दिल्या जातात मात्र कीर्तनकारांनी कोणत्यातरी देवळात बसून कीर्तन करायचे. आमचे कीर्तन हे वैभव आहे, त्यात विचारांची मांडणी असते. त्यामुळे कीर्तन करण्यासाठी आम्ही मोठ्या जागा घेतल्या. पूर्वी शनिवार वाड्यावर किर्तन महोत्सव होत होता परंतु काही काळानंतर तेथील परवानगी नाकारत लाल महालात कीर्तन करण्यास सांगण्यात आले. परंतु आता लाल महालातून देखील बाहेर पडावे लागेल की काय अशी परिस्थिती आहे. कारण महोत्सवातील प्रत्येक कामात आता अडथळा निर्माण होत आहे. देवासाठी काम करणारी माणसे असताना दानवासारखी वागणूक मिळत आहे. लाल महालात तरुणीने लावणी केल्यावर चर्चा होते. परंतु कीर्तनाची वैभवशाली परंपरा चालू ठेवणाऱ्यांची चर्चा होत नाही उलट अडचणी निर्माण केल्या जातात, अशी खंत शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंत राजे मावळे यांनी व्यक्त केली.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्म सार्धसप्तशती वर्षानिमित्त शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे व सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने, श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ यांच्या शुभाशीर्वादाने व वै. ह. भ. प. डॉ. किसन महाराज साखरे यांच्या स्मरणार्थ ‘पुणे कीर्तन महोत्सव २०२५’ चे आयोजन ऐतिहासिक लालमहाल येथे करण्यात आले आहे. ह. भ. प. डॉ. यशोधन महाराज साखरे यांचे कीर्तन महोत्सवात होणार आहे.  महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महोत्सवाचे उद्घाटन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदीचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांच्या हस्ते झाले. यावेळी  सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, अध्यक्ष नितीन होले, ह. भ. प. प्रा. संगीता मावळे व ह. भ. प. मंगलमूर्ती औरंगाबादकर उपस्थित होते.

पुणे कीर्तन महोत्सवाचे हे सतरावे वर्ष असून, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्म सार्धसप्तशती निमित्त तीन दिवस ह. भ. प. डॉ. यशोधन महाराज साखरे यांची वारकरी कीर्तने रंगणार आहेत.

 अक्षदा ईनामदार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संगीता मावळे यांनी आभार मानले, 

‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत महाराष्ट्राने गाठला उच्चांक

मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा

मुंबई, दि. ०४ डिसेंबर २०२५: ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात ४५,९११ सौर कृषिपंप लावण्याचा जागतिक उच्चांक गाठला आहे. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये यशस्वी नोंद झाली आहे. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (५ डिसेंबर २०२५) सकाळी १० वाजता गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर होणार आहे.

      कार्यक्रमास उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार, अपारंपरिक ऊर्जामंत्री श्री.अतुल सावे, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री श्री.संजय शिरसाट, ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, अपर मुख्य सचिव ऊर्जा श्रीमती आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.लोकेश चंद्र यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

         शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स आणि कृषिपंप असा संपूर्ण संच देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वाधिक सौर पंप बसविण्याचा उच्चांक गाठला आहे. ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून ३० टक्के तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ दहा टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषिपंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.

        राज्यात साडेदहा लाख सौर कृषिपंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे कृषिपंपासाठी पैसे भरून वीज जोडणीची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा ‘पेड पेंडिंग’चा प्रश्न सुटणार आहे. ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेसाठी महावितरणने स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांनी पंपासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर महावितरणकडून अर्ज मंजूर केला जातो. त्यानंतर शेतकऱ्याने त्याचा हिस्सा भरायचा असतो. शेतकऱ्याकडून पंप बसविण्यासाठी एजन्सीची निवड केली जाते. पंप बसविण्याच्या ठिकाणाची महावितरण, एजन्सी व शेतकरी अशी तिघांकडून संयुक्त पाहणी केली जाते, त्यानंतर कार्यादेश दिला जातो आणि शेतात पंप बसविला जातो. पंप बसविणाऱ्या एजन्सीवर पुढच्या काळात देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी आहे.

        सौर पॅनल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ शेतकऱ्यांना कृषिपंपाचे वीजबिल येत नाही. हे पंप पारंपरिक वीजपुरवठ्यावर अवलंबून नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे दिवसा कधीही सिंचन करता येते. त्यामुळे दिवसा वीजपुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होते.

‘चाणक्य ते मोदी व्हाया विवेकानंद ’ …..

अविनाश धर्माधिकारींच्या व्याख्यानाची तयारी जोरात

पुणे :
रा.स्व. संघाच्या अरण्येश्वर प्रभात शाखेच्या पुढाकाराने सहकारनगरमध्ये आयोजित केलेल्या ‘शिक्षण महर्षी लक्ष्मीकांत जांभोरकर स्मृती व्याख्यानमालेत’ माजी सनदी अधिकारी आणि विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांच्या रविवारी दि. ७ डिसेंबर रोजी होणा-या व्याख्यानाबाबत तरुणांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचे जाणवते. व्याख्यानमालेच्या कार्यकर्त्यांनी तरुणांवर लक्ष केंद्रित केले असून महाविद्यालये,वसतिगृहे, अभ्यासिका अशा अनेक ठिकाणी निमंत्रण पोहोचवले आहे. चाणक्य ते मोदी व्हाया विवेकानंद हा व्याख्यानाचा विषय असून त्याबाबत तरुणांमध्ये विशेष कुतुहल आहे.
व्याख्यानमालेच्या कार्यकर्त्यांची एक बैठक रविवारी प्रत्यक्ष व्याख्यान स्थळावर झाली.यावेळी सर्व व्यवस्थांचा आढावा घेण्यात आला.
हे व्याख्यान येत्या रविवारी दि. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सहकारनगर क्र.१ मधील ‘विद्याविकास विद्यालया’च्या क्रीडा संकुलाच्या मैदानावर होईल. व्याख्यान सर्वांसाठी खुले राहील.

धर्मजागरण विभागाच्या कार्यालयाचे पुण्यात भूमिपूजन

कार्यावरील विश्वासामुळेच संघाला भरभरून साहाय्य”

पुणे, ४ डिसेंबर
समाजासाठी आणि देशासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते निःस्वार्थीपणे गेली शंभर वर्षे काम करत आहेत. या कार्यामुळेच संघाबद्दल समाजामध्ये विश्वास निर्माण झाला आहे. या विश्वासामुळे समाज संघाला भरभरून साहाय्य करत आहे, असे प्रतिपादन संघाच्या अखिल भारतीय धर्मजागरण गतिविधीचे समन्वयक शरदराव ढोले यांनी केले.

धर्मजागरण गतिविधीचे अखिल भारतीय कार्यालय पुण्यात बांधले जाणार असून या प्रकल्पाचे भूमिपूजन ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. सुरेश उर्फ नाना जाधव, महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, पर्वती भागाचे संघचालक अॅड. चंद्रशेखर कुलकर्णी, ज्येष्ठ कार्यकर्ते दिवाकर पांडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मित्रमंडळ सोसायटीमध्ये ‘अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान’तर्फे मुद्रिका बंगला येथे हा कार्यालय बांधकाम प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

धर्मजागरण विभागाचे काम देशभरात वाढत आहे. त्यामुळे कार्यालयांचीही गरज निर्माण झाली आहे. पुण्यात कार्यालयाची जी इमारत तयार होईल त्यात अध्ययन, संशोधन, संस्था सक्षमीकरण, कार्यकर्ता प्रबोधन, कार्यकर्ता प्रशिक्षण अशा अनेक योजना चालवल्या जातील. प्रशिक्षणाचे अनेक विषय या कार्यालयाच्या माध्यमातून सुरू केले जातील, अशी माहिती ढोले यांनी दिली.

संघ प्रेरणेतून चालणाऱ्या संस्थांना जो निधी किंवा ज्या वास्तू देणगीरूपाने दिल्या जातात, त्यांचा उपयोग योग्य त्याच कारणांसाठी होतो, हा विश्वास समाजात निर्माण झाला आहे. समाजाला बरोबर घेऊनच संघ यापुढेही काम करत राहील, असेही ढोले यांनी सांगितले.

कै. वासुदेवराव आणि कै. कमलताई गोखले या दाम्पत्याच्या दातृत्वाबद्दलची माहिती अॅड. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी दिली. गोखले यांनी त्यांचा मित्रमंडळ सोसायटीतील बंगला अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठानला देणगी स्वरूपात दिल्यामुळेच त्या जागी नवी वास्तू साकारत आहे, असे कुलकर्णी म्हणाले.

सेवा आणि समाजोपयोगी उपक्रम चालावेत या अपेक्षेने जी वास्तू देणगी स्वरूपात देण्यात आली आहे, त्याच अपेक्षेप्रमाणे या वास्तूचा उपयोग केला जाईल, असा विश्वास प्रा. नाना जाधव यांनी व्यक्त केला. नितीन कमळापूरकर, शिरिष किराड, हेमंत हरहरे यांनीही मनोगत व्यक्त केले. मिलींद वाईकर यांनी सूत्रसंचालन केले.

पिंपरी चिंचवडच्या वैभवाला शब्दांच कोंदण – वर्षा उसगावकर

पिंपरी चिंचवड वैभव काव्य संग्रहामधून संस्कृतीचे दर्शन – डॉ. श्रीपाद जोशी

पिंपरी चिंचवड काव्य संग्रहाचे प्रकाशन

पिंपरी, पुणे (दि. ०४ डिसेंबर २०२५) पिंपरी चिंचवड वैभव काव्यसंग्रहा मधून शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक प्रतिभेची सर्वांना माहिती, ओळख होते. या काव्य संग्रहाने शहराविषयी शब्दांचे कोंदण निर्माण केले आहे. या माध्यमातून स्थानिक साहित्यिकांशी संभाजी बारणे यांनी योग्य समन्वय साधून व्यासपीठ उपलब्ध केले; ही विशेष कौतुकाची बाब आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा तसेच मराठी भाषा संवर्धन समिती पिंपरी चिंचवड यांच्या वतीने संभाजी बारणे यांच्या संकल्पनेतून आणि राजन लाखे संपादित “पिंपरी चिंचवड वैभव” काव्यसंग्रहाचे प्रकाशन बुधवारी (दि.३ डिसेंबर) वर्षा उसगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, डॉ. अभय कुलकर्णी, अशोक पगारिया, माजी नगरसेविका मनिषा पवार, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष राजन लाखे, संभाजी बारणे, कांचन जावळे, प्रभाकर ओव्हाळ, सागर बारणे, विशाल बारणे आदी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाद जोशी म्हणाले, सध्या संस्कृतीची साठवणूक सुरू आहे. भौतिक साधनांद्वारे संस्कृतीचे जतन करता येत नाही. त्यासाठी गावागावातील लोककला, साहित्य, काव्य, कलावंत, शास्त्रज्ञ, राजकारणी, कामगार ही त्या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदणारी सामाजिक वीण महत्त्वाची आहे. यालाच आपण संस्कृतीची श्रीमंती म्हणू शकतो. संस्कृती ही संज्ञा खूप व्यापक असून बारणे आणि लाखे यांनी पिंपरी चिंचवड वैभव काव्य संग्रहाद्वारे शहराच्या सांस्कृतिक ऐश्वर्याचे दर्शन घडविले आहे असे डॉ. श्रीपाद जोशी म्हणाले.
भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक साहित्य, क्रीडा, शिक्षण, समाजकारण, राजकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये वाढवली पाहिजे. शहरांमध्ये प्रतिभावंतांची मांदियाळी तयार होत आहे. पिंपरी चिंचवड शहरातून अनेक कलाकार घडले आणि त्यांनी राज्य, राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविला आहे. बारणे आणि लाखे यांनी सादर केलेला काव्यसंग्रह नव साहित्यिकांना प्रेरणा देणारा आहे असे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड वैभव काव्य संग्रहासाठी शहरातील कवींकडून त्यांच्या स्वलिखित कविता मागविण्यात आल्या होत्या. एकूण १५२ कविता प्राप्त झाल्या त्यामधून ९६ कवितांचा समावेश या काव्य संग्रहामध्ये करण्यात आला आहे, असे राजन लाखे यांनी सांगितले‌.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कवयित्री सुरेखा कटारिया, अकीला इनामदार, कमल सोनजे, मंगला पाटसकर, प्रा. सुभाष आहेर, डॉ. निळकंठ मालाडकर, सिताराम नलगे, रमेश पिंजरकर आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच फिरोज मुजावर यांनी नृत्याविष्कारतून गणेश स्तुतीचे सादरीकरण केले. ऋचा राजन यांनी गणेश वंदना गायली. सूत्रसंचालन गणेश लिंगाडे यांनी तर संभाजी बारणे यांनी आभार मानले. कार्यक्रमास साहित्यिक, कवी, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणूक आयोगाच्या’ चुकांची जबाबदारी फडणवीस टाळतात कशी..?

निवडणूक आयोगाची निर्मिती’च् सरन्यायाधीशांना बाजूला करून भाजप’ने मनमानीपणे केली…!
— वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे दि – ३ डिसें
‘पंतप्रधान, विरोधीपक्ष नेता व सरन्यायाधीशांच्या’
मुख्य निवडणूक आयोग निवडीच्या ‘त्रिसदस्य समिती’तुन
न्यायव्यवस्थेचे प्रतिनिधि असलेल्या ‘देशाच्या सरन्यायाधीशां’ना वगळून, केंद्रीय मंत्री अमित शहांना घेऊन ‘पंतप्रधान मोदी व शहां’नी नियुक्त केलेल्या मुख्य निवडणूक आयोगाची निर्मिती’च् मुळात भाजप’ने मनमानी पणे केल्याने, राज्य निवडणूक आयोगाच्या वारंवार व कदाचित जाणीवपूर्वक होणाऱ्या चुकांची नैतिक जबाबदारी भाजप ला टाळता कशी येईल (?) असा सवाल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला. ते म्हणाले की, सहकार व गृह खात्यात अमित शहांच्या हाताखाली काम केलेल्या ज्ञानेश कुमार यांना भाजप करीता अनुकूल पावले उचलण्यासाठीच् ‘मुख्य निवडणूक आयुक्त’ करून आयोगाची निर्मिती केल्याचे आरोप अनेक बाबींद्वारे सिद्ध होतात व त्या आरोपांना पृष्टी मिळणारे निर्णय व घटना देखील समोर येत आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने सर्व प्रथम, “उमेदवारी अर्ज ॲानलाईन भरण्याचा” फतवा काढला होता. त्यावर गदारोळ झाल्याने व तांत्रिक अडचणी आल्याने पुन्हा तो मागे घेऊन “ॲाफ लाईन अर्ज भरण्याचा” निर्णय जाहीर केला..!
तसेच, प्रचार संपण्याची मुदत सर्व प्रथम ३० नोव्हेंबर सायं ५ वा. पर्यंत होती, मात्र नंतर १ डिसेंबर रात्री १० पर्यंत वाढवली,
तसेच अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात देखील अक्षम्य विलंब का केला गेला… (?) या सर्व गोंधळा मागे काय धोरण होते (?)
निवडणूकींचा जाहीर केलेला कार्यक्रमात वरील जाणीव पुर्वक बदल कोणास फायदा होण्यासाठी केले काय…?
मतदान तब्बल १८ दिवस पुढे ढकलल्या मुळे ऊमेदवारांचा वाढीव खर्च सरकार वा निवडणूक आयोग देणार आहे काय..?
आयएएस नियुक्ती असलेला स्वायत्त निवडणूक आयोग, आपल्या दिशाहीन व गोंधळलेल्या अवस्थेचे जाणीव पुर्वक प्रदर्शन करत व वेड्याचे सोंग घेत, कुणा उमेदवार वा सत्ता पक्षास प्राप्त परिस्थितीचा फायदा पोहोचवत आहे काय (?) असे सवाल उपस्थित करून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी “आयएएस दर्जाच्या प्रशासकीय यंत्रणेची कार्यक्षमता व विश्वासार्हता” जाणीव पुर्वक धोक्यात आणली जात असल्याचा आरोप ही सत्ताधारी भाजप’वर केला.
स्थानिक नगर परिषदेच्या निवडणूकांचे ‘मतदान व निकालां’चा स्थगिती निर्णय राज्य निवडणूक आयोगात २९ तारखेला झाल्याची माहीती आहे. मात्र निर्णय जाहीर होण्यास विलंब का झाला (?) निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांशी गुफ्तगू करत होता काय वा परीस्थितीचा अंदाज घेत होता (?) या बाबत महाराष्ट्र काँग्रेस’ तर्फे आयोगास जाब विचारणारे निवेदन सर्वप्रथम आपण स्वतः (३० ता. रात्रीच) जारी केल्याचे ही त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोग केंद्र व राज्यातील सत्ताधीशांच्या तालावर नाचतोय हा काँग्रेस’चा पहील्या पासून आरोप असून.. वोट चोरी, बोगस व दुबार मतदार.. हे सर्व प्रकरण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीच सर्वप्रथम बाहेर काढले असल्याचे पुस्ती त्यांनी जोडली.

राज ठाकरे 20 वर्षांनंतर संजय राऊतांच्या घरी

मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांची त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. विशेष म्हणजे, तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे राऊतांच्या घरी आल्याने या भेटीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी राज ठाकरेंनी राऊतांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करत त्यांना काही काळ सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.

संजय राऊत यांना नुकतेच एका गंभीर आजाराचे निदान झाले असून, डॉक्टरांनी त्यांना सार्वजनिक जीवनापासून दूर राहून विश्रांती घेण्यास सांगितले आहे. याबाबत संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज दुपारी राऊत यांचे निवासस्थान गाठले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये साधारण 25 ते 30 मिनिटे चर्चा झाली.

या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, “संजय राऊत आजारी पडल्यापासून राज ठाकरे सतत माझ्या संपर्कात होते. संजय यांच्या उपचारांसाठी त्यांना अमेरिकेला नेले पाहिजे का? किंवा अन्य कोणते वैद्यकीय उपचार केले पाहिजेत? याबाबत राजसाहेब सतत फोनवरून विचारपूस आणि मार्गदर्शन करत होते. आज 20 वर्षांनंतर ते आमच्या घरी आले, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे.”

भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना काळजी घेण्याचे आवाहन केले. ” तुझा ज्याप्रकारचा आजार आहे, त्यानुसार तुला राहावे लागेल. लोकांमध्ये न जाता दीड-दोन महिने आराम करावा,” असा मोलाचा सल्ला राज ठाकरेंनी संजय राऊतांना दिल्याची माहिती सुनील राऊत यांनी सांगितले.

पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांकडून विचारपूसआजारपणानंतरही राऊतांची तोफ धडाडली

दरम्यान, संजय राऊत यांच्या आजारपणाची दखल पक्षभेद विसरून सर्वच स्तरांतून घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊतांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करून राऊतांच्या प्रकृतीची चौकशी केली. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दूरध्वनीवरून संपर्क साधत राऊत यांना आरोग्याबाबत विचारपूस केली होतीप्रकृतीत सुधारणा होताच संजय राऊत पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत. गत सोमवारी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली, ज्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या पत्रकार परिषदेत आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. आजारपण असूनही त्यांचा राजकीय बाणा कायम असल्याचे यावेळी दिसून आले.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ-प्रारुप मतदार यादीनुसार दोन लाख ७२ हजार पदवीधरांची व ४४ हजार शिक्षकांची नावनोंदणी

पुणे, दि.३ : पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या नव्याने मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीनुसार पुणे विभागात २ लाख ७२ हजार ६१ पदवीधरांची तर ४४ हजार २३३ मतदारांची नोंदणी झाली आहे.

या २०२५ च्या कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार यादीनुसार पदवीधर मतदार संघासाठी पुणे जिल्ह्यात ५४ हजार ८१० मतदार नोंदणी, सातारा-३५ हजार ८७९, सोलापूर- ३० हजार ४७२, कोल्हापूर- ८० हजार १८०, सांगली- ७० हजार ७२० अशी एकूण २ लाख ७२ हजार ६१ इतकी नोंदणी झाली आहे. तर शिक्षक मतदार संघासाठी पुणे- ९ हजार ७७८, सातारा- ८ हजार ४९२, सोलापूर- ११ हजार १९८, कोल्हापूर ८ हजार ६३१ व सांगली- ६ हजार १३४ अशी एकूण ४४ हजार २३३ मतदारांची नोंदणी झाली आहे.

२०२० मध्ये पदवीधर मतदार संघासाठी ४ लाख २० हजार ८९६ इतकी तर शिक्षक मतदारांची ७२ हजार १९० इतकी नोंदणी होती. गेल्या निवडणुकीपेक्षा यावर्षी आतापर्यंत कमी मतदार नोंदणी झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीची प्रसिद्धी व जागृती करुन जास्तीत जास्त पात्र मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.

मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम:
या कार्यक्रमांतर्गत १८ डिसेंबर २०२५ पर्यंत मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या पदनिर्देशित अधिकारी किंवा संबंधित विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे दावे व हरकती दाखल करता येतील. नवीन नाव नोंदणीचा दावा दाखल करण्यासाठी पदवीधरांना नमुना क्रमांक १८ व शिक्षकांना नमुना क्रमांक १९ द्वारे याच कालावधीत दावा दाखल करता येईल. प्रारुप मतदार यादीतील नावांबाबत आक्षेप असल्यास नमुना क्रमांक ७ व यादीतील नोंदीमध्ये दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक ८ दाखल करता येईल.

दावे व हरकतींचा कालावधी संपल्यानंतर ५ जानेवारी २०२६ रोजी दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करणे व छपाईची कार्यवाही करण्यात येईल. पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या यादीची अंतिम प्रसिद्धी १२ जानेवारी २०२६ रोजी केली जाणार आहे.