Home Blog Page 2620

कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी प्रत्येक डॉक्टरांनी सज्ज व्हावे!

0

पुणे दि.२३:- कोरोना विरुद्धचे युद्ध खऱ्या अर्थाने आता सुरु झाले असून हे युद्ध जिंकण्यासाठी प्रत्येक डॉक्टरांनी सज्ज व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

करोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध खाजगी हॉस्पिटल्सच्या प्रमुखांसोबत कौन्सिल हॉल येथे बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. बैठकीला आरोग्य विभागाचे माजी महासंचालक तथा कोरोना नियंत्रणाचे राज्य समन्वयक डॉ. सुभाष साळुंखे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए)अध्यक्ष डॉ. आरती निमकर, आयएमए चे सचिव तथा भारती हॉस्पिटलचे डॉ. राजन संचेती, अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. अनिकेत जोशी आदी उपस्थित होते.

बैठकीत नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, पुणे डॉक्टर्स असोसिएशन, फिजीसिएशन असोसिएशन, स्त्री रोग विशेषज्ज्ञ, कान, नाक, घसा तज्ज्ञ, ऑर्थो विशेषज्ज्ञ, ऑप्थॉल्मिक असोसिएशन आदिंच्या प्रतिनिधींकडून डॉ. म्हैसेकर यांनी अडचणी व सूचना जाणून घेतल्या व त्यावर उपाय सुचवले.

बैठकीत डॉ. म्हैसेकर यांनी कोरोना प्रतिबंधात्मक कामातील डॉक्टर व परिचारकांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, रुग्णांनी लक्षणे आढळल्यास महानगरपालिकेच्या नजिकच्या फ्ल्यू क्लिनिकमध्ये तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. नागरिकांना ताप, सर्दी, घसा दुखणे, खोकला, धाप लागणे इ. लक्षणे आढळल्यास त्वरीत तपासणी करुन घेण्याबाबत खाजगी डॉक्टरांनी नागरिकांना मार्गदर्शन करावे. तपासणीसाठी आलेला व्यक्ती परजिल्हयातून प्रवास करुन आला असेल व त्याच्यात कोरोनाची लक्षणे असल्यास संबंधित रुग्णाला फ्ल्यू क्लिनिकमध्ये पाठवावे. कोणत्याही व्यक्तीला दवाखान्यात जाण्यासाठी पोलीस अडवणार नाहीत, असा विश्वास डॉ.म्हैसेकर यांनी व्यक्त केला.

नागरिकांनी आपल्यातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी संतूलित आहार घेण्याबरोबरच घरच्याघरी व्यायाम व योगासने करावीत. डॉक्टरांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ.म्हैसेकर यांनी केले.

पुणे विभागात कोरोना बाधित 1हजार 31 रुग्ण

0

विभागात 172 कोरोना बाधित रुग्ण बरे

* विभागामधील 47 लाख 51 हजार 802 घरांचे सर्वेक्षण पूर्ण

* 1 कोटी 82 लाख 71 हजार 857 व्यक्तींची तपासणी

पुणे दि.23:- विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 31 झाली असून विभागात 172 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 794 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 13 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 1 हजार 31 बाधित रुग्ण असून 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 936 बाधीत रुग्ण असून 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 21 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 37 बाधीत रुग्ण असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 27 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 10 बाधीत रुग्ण आहेत.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 11 हजार 707 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी 11 हजार 46 चा अहवाल प्राप्त झाल असून 662 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 9 हजार 964 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 31 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 47 लाख 51 हजार 802 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 82 लाख 71 हजार 857 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 927 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
000 0000

राज्यात ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे,८७ रेशन दुकाने निलंबित तर ४८ दुकानांचे परवाने रद्द – मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

0

मुंबई,  दि. २३  :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत रेशन धान्य वाटप करताना अनियमितता तसेच नियमांचे पालन न केलेल्या दि.१९ एप्रिल २०२० पर्यंत राज्यातील एकूण ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ८७ रेशन दुकानांचे निलंबन तर एकूण ४८ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच स्वस्त धान्य दुकानांमध्ये काळा बाजार, वाटप करताना कमी धान्य देणे किवा जास्त पैसे घेणे तसेच नियमांचे पालन केले जात नसेल तर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यातील सहा महसुली विभागात लॉकडाऊनच्या काळात एकूण ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ८७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आहे तर एकूण ४८ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. राज्यातील या वितरण व्यवस्थेवर अन्न,नागरी पुरवठा विभागाच्या वतीने काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात आले असून निर्माण करण्यात आलेल्या पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे.

पुणे विभागात एकूण ४ गुन्हे नोंदविण्यात आले असून १७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले असून १४ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात ११ दुकानांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात ८ रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले असून पुणे जिल्ह्यात ३ दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

नागपूर विभागात एकूण ५ गुन्हे नोंदविण्यात आले असून १८ रेशन दुकानांचे निलंबन तर एका दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ११ दुकानांवर निलंबित करण्याची कारवाई तर वर्धा जिल्ह्यात ४ दुकानांवर कार्यवाही झालेली आहे. रेशन दुकान रद्द केल्याची कारवाई नागपूर शहर भागात करण्यात आली असून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अमरावती विभागात एकूण ५ गुन्हे नोंदविण्यात आले असून ७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले तर १३ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ३ दुकानांवर निलंबित करण्याची कार्यवाही झालेली असून वाशीम जिल्ह्यात ५ दुकानांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यात ४ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रत्येकी २ गुन्हे अमरावती व अकोला जिल्ह्यात दाखल करण्यात आले असून बुलढाणा जिल्ह्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे

औरंगाबाद विभागात २९ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले असून ४ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक १२ रेशन दुकानांवर तर उस्मानाबाद जिल्हात ५ रेशन दुकानांवर निलंबनाची कार्यवाही झालेली आहे. तसेच जालना आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी २ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे.

नाशिक विभागात एकूण १६ गुन्हे नोंदविण्यात आले असून ९ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले तर १५ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. नाशिक व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी ३ दुकानांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात ७ तर नाशिक जिल्ह्यात ४ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तसेच अहमदनगर व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी ७ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोकण विभागात एकूण ९ गुन्हे नोंदविण्यात आले असून ७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले आहे. तर एका दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात ४ रेशन दुकाने निलंबित करण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यात एका रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ४ गुन्हे तर रायगड जिल्ह्यात ३ दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मुकेश अंबानी पुन्हा आशिया खंडातील सर्वात धनाढ्य व्यक्ती; फेसबूक-जिओ डीलचा परिणाम, जॅक मा यांनाही टाकले मागे

मुंबई. भारतातील धनकुबेर उद्योजक मुकेश अंबानी पुन्हा आशिया खंडातील सर्वात धनाढ्य व्यक्ती ठरले आहेत. मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायंस जिओ आणि मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबूकमध्ये डील झाल्यानंतर हा फरक पडला आहे. अंबानी यांनी अलीबाबाचे संस्थापक जॅक मा यांना देखील पिछाडीवर सोडले आहे. फेसबूकने या डीलसोबत मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये 4 अब्ज अमेरिकेन डॉलरची भर टाकली आहे. त्यामुळे, अंबानींची संपत्ती वाढून 49.5 अब्ज डॉलर (जवळपास 3.77 लाख कोटी रुपये) एवढी झाली आहे. फेसबुक मुकेश अंबानी यांच्या कंपनीमध्ये 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीसह फेसबूकची जिओमध्ये 9.99% भागिदारी होणार आहे.

मुकेश अंबानी यांनी आशिया खंडातील सर्वात धनाढ्य राहिलेले उद्योजक जॅक मा यांना मागे टाकले. जॅक मा यांच्या तुलनेत मुकेश अंबानी यांची संपत्ती 3 अब्ज अमेरिकन डॉलरने अधिक आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीप्रमाणे, मंगळवारी 21 एप्रिल पर्यंत मुकेश अंबानी यांची संपत्ती 14 अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत खाली आली होती. तर मंगळवारी जॅक मा यांच्या संपत्तीमध्ये 1 अब्ज अमेरिकन डॉलरची घसरण झाली होती.

रिलायंसच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसंडी

फेसबूकसोबत डील केल्यानंतर रिलायंस इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये बुधवार कमालीची झेप पाहायला मिळाली. एकावेळी तर 11 टक्के चढ्या भावाने 1375 रुपयांवर ट्रेडिंग करत होते. बाजार बंद झाले त्यावेळी आरआयएलच्या शेअर्स 9.83 टक्के वाढीसह 1359 रुपयांवर बंद झाले. केवळ बुधवारीच रिलायंस इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 90,000 कोटी रुपयांनी वधारले होते. भारतीय कंपन्यांमध्ये एवढ्या कमी भागिदारीसह ही सर्वात मोठी थेट परदेशी गुंतवणूक मानली जात आहे. जिओ प्लॅटफॉर्मसाठी प्री मनी एंटरप्राइज व्हॅल्यू 66 अब्ज डॉलर राहील. गुंतवणुकीनंतर जिओ प्लॅटफॉर्मची व्हॅल्यू 4.62 लाख कोटी होणार आहे. या भागिदारीने भारतात रोजगार आणि बिझनेसच्या संधी निर्माण होतील.

अजय देवगणने आरोग्य सेतूला म्हटले पर्सनल बॉडीगार्ड, अ‍ॅपसाठी पंतप्रधान मोदींचे मानले आभार

0

मुंबई. अभिनेता अजय देवगणने भारत सरकारच्या आरोग्य सेतू अ‍ॅपचे कौतुक केले आहे. बुधवारी त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो वर्कआउट करताना आणि स्वत: चा बॉडीगार्ड असे वर्णन करणार्‍या स्वत:चे एक पात्र सेतूशी संवाद साधत असल्याचे दिसतोय. सेतू अजयला सांगत आहे की, तो एक वेगळ्या प्रकारचा बॉडीगार्ड आहे. सेतूने इतर अनेक फायदे सांगताना म्हटले की, भारत सरकारने 130 कोटी भारतीयांच्या संरक्षणासाठी प्रत्येकाचा वैयक्तिक बॉडीगार्ड बनवला आहे.

अजय यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अजयने पीएमओ इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले, “कोविड 19 सोबत लढण्यासाठी प्रत्येक भारतीयांना त्यांचा वैयक्तिक अंगरक्षक दिल्याबद्दल धन्यवाद… सेतू माझा बॉडीगार्ड आहे आणि तुमचाही.” पंतप्रधान मोदींनी त्याच्या ट्विटचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्विट केले, “अजय देवगण बरोबर म्हणाले. आरोग्य सेतू आपले, आपल्या कुटुंबाचे आणि देशाचे रक्षण करते.”कोरोना व्हायरसच्या धोका टाळण्यासाठी केंद्र सरकारनं हे अ‍ॅप तयार केले आहे. हा अ‍ॅप तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला कोरोना व्हायरसबाबतच्या धोक्यापासून अलर्ट करेल आणि तुम्ही कोरोनापासून सुरक्षित आहात की नाही हेदेखिल सांगेल. या अ‍ॅपचे वैशिष्ट्य असे की, अ‍ॅप लाँच केल्यानंतर काही दिवसांतच ते एक कोटीहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे. हे अ‍ॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरमधून मोफत डाऊनलोड करू शकता. हे अ‍ॅप 11 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.

महाराष्ट्रात वाइन शॉप उघडण्याची परवानगी द्या, राज्याचा महसूल वाढेल; राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

0

मुंबई. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात वाइन शॉप पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही मागणी करताना राज ठाकरे म्हणाले, कोरोना आणि त्यानंतर लॉकडाउनमुळे महाराष्ट्राच्या महसूलात सातत्याने घट होत आहे. वाइन शॉप पुन्हा सुरू केल्यास राज्याच्या महसूलात वाढ होईल. त्यांनी याबाबतचे एक पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले आहे.

नैतिकतेमध्ये अडकू नये, जो आवश्यक आहे तो निर्णय घ्यावा

मुख्यमंत्री कार्यालयाला लिहिलेल्या पत्रामध्ये राज ठाकरे म्हणाले, वाइन शॉप उघडा म्हणून मी दारुड्यांची बाजू घेत नाही. परंतु, लॉकडाउनमुळे राज्यावर संकट आले आहे. अशात महसूल वाढवण्यासाठी मी वाइन शॉप पुन्हा सुरू करण्याचे सांगत आहे. गेल्या महिनाभरापासून लॉकडाउन लागू करण्यात आला. तेव्हापासूनच वाइन शॉप बंद आहेत. त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम लागू करून पुन्हा सुरू करण्याची परवानगी देता येईल. ही वेळ अतिशय वाइट आहे, अशात सरकारने नैतिकतेमध्ये अडकून पडू नये, जो निर्णय आवश्यक आहे तो घ्यावा. समस्येला सामोरे जात असताना त्यावर तोडगा काढू. असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.

हे देखील सुरू करा…

यासोबतच मनसे अध्यक्षांनी वाइन शॉप सुरू करण्यासोबतच स्वस्त जेवण पुरवणारे हॉटेल आणि किचन सुरू करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक याच जेवणावर विसंबून असतात. कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनमध्ये सुद्धा सोशल डिस्टन्सिंग ठेवून त्यांना परवानगी देता येईल. राज्यातील ढासळत्या अर्थव्यवस्थेला यातून मदत मिळेल असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

ऑनलाइन पुस्तक वाचनाने जागतिक पुस्तक दिन साजरा

0

नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांच्या सैनिकी शाळा फुलगावचा अनोखा उपक्रम

पुणे, दि. 23 एप्रिल : लॉकडाउन सुरु असल्याने आज जागतिक पुस्तक दिवस साजरा करण्यासाठी लोकसेवा प्रतिष्ठानच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांच्या सैनिकी शाळेने अनोखी शक्कल लढविली. ऑनलाइन पुस्तक वाचन करुन सैनिकी शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी आज जागतिक पुस्तक दिन साजरा केला. लॉकडाऊनमुळे घरी असलेल्या विद्यार्थी व पालकांनी या ऑनलाइन पुस्तक वाचनाच्या कल्पनेचे स्वागत केले आणि एक तास ऑनलाइन पुस्तक वाचन करुन हा दिवस साजरा केला. यामध्ये 45 विद्यार्थी सहभागी झाले, अशी माहिती प्राचार्या ज्योती आरडे यांनी दिली.

जगविख्यात लेखक शेक्सपिअर यांची आज जयंती व पुण्यतिथी आणि हा दिवस इंग्रजी भाषा दिन म्हणूनही साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना सर्वप्रथम जागतिक पुस्तक दिन व शेक्सपिअर यांच्याबद्दल माहिती देण्यात आली. आणि त्यानंतर एक तास पुस्तक वाचन झाले. लोकसेवा प्रतिष्ठानच्या लोकसेवा ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे संस्थापक दीपक पायगुडे यांनी ही कल्पना शाळेच्या प्राचार्या व इतर शिक्षकांसमोर मांडली. त्यानुसार सैनिकी शाळेच्या प्राचार्या ज्योती आरडे, शिक्षक पांडुरंग जगताप यांनी त्याची अंमलबजावणी केली.

इंटरनेटमुळे जग जोडले गेले आणि त्याचा अनुभव आपण अनेकदा घेतला आहे. परंतु, सध्यो कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात डिजीटल आणि इंटरनेटचे फायदे किती आहेत याचा अनुभव आपण घेत आहोत. लोकसेवा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सर्व शाळांमध्ये सध्या व्हर्च्युअल क्लासेस सुरु आहेत. याच व्हर्च्युअल क्लासच्या वेळी विद्यार्थ्यांना व पालकांना जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने ऑनलाइन पुस्तक वाचनाची कल्पना दिली आणि पालक व विद्यार्थ्यांकडून त्याचे स्वागत करण्यात आले. पुढे एक तास विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पुस्तकांचे वाचन केल्याचे प्राचार्या ज्योती आरडे यांनी सांगितले.

मोठ्या प्रमाणात टेस्ट होत असल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे

0

▪️घाबरू नका,मात्र काळजी घ्या..
▪️वारंवार घराबाहेर पडू नका..
▪️सर्वांच्या सहकार्याने कोरोनाची साखळी तोडायची आहे.
▪️उद्योजकांनी कामगारांची सोय तेथेच करावी.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन
पुणे,दि२३-सध्या आपण मोठ्या प्रमाणात टेस्ट करीत आहोत,त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे.घाबरून जाण्याचे कारण नाही,परंतु काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक धोरण अवलंबविले आहे.अशा प्रसंगी आपण सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
वाढती रुग्ण संख्या बघून घाबरू नका.यावर आपण निश्चित मत करू असे,असा विश्वास व्यक्त करुन जिल्हाधिकारी राम म्हणाले,पुरूषांच्या बरोबरीने महिलांची संख्या दिसून येत आहे.ही चिंतेची बाब आहे.त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर पडू नका.पुण्यासाठी हा कठीण काळ आहे.सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा.जीवनावश्यक वस्तू एकाचवेळी आणून घ्या.वारंवार वस्तू आणायला बाहेर जाऊ नका.
सर्दी,ताप,खोकला,थकावट व भूक लागत नसेल तर तातडीने महापालिकेच्या फ्ल्यू हाॕस्पिटलमध्ये जाऊन डाॕक्टरांना दाखावा.आजार अंगावर काढू नका किंवा लपून ठेऊ नका.वेळेवर उपचार मिळाले,तर रुग्ण बरे होतात,असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड हे महानगर क्षेत्र शासनाने प्रतिंबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.भाजीपाला देखील कांही दिवस नागरिकांना मिळणार नाही.
तसेच उद्योजकांनी कामगारांची व्यवस्था तेथेच करावी.त्यांना अजिबात बाहेर जाता येणार नाही.त्यासाठी सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना आवाहन करताना ते म्हणाले,शेतकऱ्यांनी सुध्दा काळजीपूर्वक शेतीची कामे करावीत. ग्रामीण भागातही कोरोनाची लागण झाली.बिनधास्त राहू नका.काळजी घ्या,असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे.

क्वारंटाईनसाठी आझम कॅम्पस मशीद इमारतीमधील संपूर्ण मजला उपलब्ध

0

आझम कॅम्पस मशिदीचा मजला देण्याचा आझम व्यवस्थापनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वीकारला

पुणे :

पुण्यातील मध्यवर्ती पेठांमधील कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती लक्षात घेता कॅम्प,भवानी पेठ,नाना पेठ ला लागून असणाऱ्या आझम कॅम्पस च्या इमारतींमधील जागा संशयित रुग्णांच्या क्वारंटाईन साठी प्रशासनाला देण्याची तयारी व्यवस्थापनाने दर्शवली होती ,हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वीकारला असून तसे पत्र कॅम्पस चे अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार यांना दिले आहे .

प्रशासनाच्या पत्रानंतर ही जागा ताब्यात देण्यासाठी स्वच्छता आणि सुविधांची तयारी बुधवारपासून सुरु झाली आहे. आझम कॅम्पस मधील प्रार्थना स्थळाच्या पहिल्या मजल्यावरील ९ हजार चौरस फुट जागा सर्व वीज ,पंखे ,स्वच्छतागृह ,पार्किंग सुविधांसह देण्याची तयारी येथील व्यवस्थापनाने दर्शवली होती. येथे आलेल्या संशयित रुग्णांची नाश्ता,जेवणाची व्यवस्था करण्याची,पोलीस बंदोबस्त आणि शासकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याची तयारी असल्याचे जिल्हाधिकार्यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते .आझम कॅम्पस मधील शैक्षणिक सुविधा पूर्ववत सुरु होईपर्यंत ही जागा शासनाला उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचे या पत्रात म्हटले होते. त्यानुसार सर्व सुविधांसह हा मजला तयार झाला असल्याची माहिती आझम कॅम्पस चे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी पत्रकाद्वारे दिली.

आझम कॅम्पस परिसरामध्ये महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ३० शैक्षणिक अस्थापना असून २४ एकर मध्ये हा परिसर आहे. त्यातील एका भागात पूर्वीपासून मशीद आहे. या मशिदीतील पहिल्या मजल्यावर ९ हजार चौरस फुटाचा सभागृहासारखा मजला आहे. त्याचे रुपांतर क्वारांटाइन वार्ड मध्ये करता येणे शक्य आहे.येथील शैक्षणिक इमारतींमधील शाळा ,महाविद्यालये सध्या बंद आहेत.लागेल तेव्हा आणखी जागा देण्याचा प्रस्ताव व्यवस्थापनासमोर आहे,असेही डॉ.पी ए इनामदार यांनी सांगितले.

‘कोरोना हे आंतर राष्ट्रीय संकट असून ते परतवून लावण्याच्या शासकीय प्रयत्नात जबाबदार नागरिक म्हणून ,संस्था म्हणून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडण्यास तयार आहोत.आपल्याकडील साधने सरकारी यंत्रणेच्या मदतीला देण्याची ही वेळ आहे’,असेही डॉ इनामदार यांनी सांगितले.

दरम्यान,रमजान च्या पवित्र महिन्यात मशिदींमध्ये न जाता घरीच नमाज पठण करण्याचे आवाहनही डॉ पी ए इनामदार यांनी केले आहे.कॅम्पस मधील युनानी मेडिकल कॉलेज चे २५ डॉक्टर्स ५ रुग्ण वाहीकांमधून पेठांमध्ये रुग्ण सेवा करीत आहेत . तसेच आझम कॅम्पस ने आता पर्यंत २५ लाखाहून अधिक किमतीचे किराणा सामान गरजूंना वितरीत केले आहे .

15ऑक्टोबर पर्यंत हॉटेल्स,रेस्टॉरंट्स बंद करण्याबाबत पर्यटन मंत्रालयाकडून कुठलेही पत्र नाही

0

नवी दिल्‍ली-

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 15ऑक्टोबर 2020 पर्यंत हॉटेल्स / रेस्टॉरंट्स बंद राहतील असा दावा करणारे खोटे पत्र पर्यटन मंत्रालयाच्या नावाखाली समाज माध्यमांवर फिरत असल्याचे आणि यामुळे संपूर्ण पर्यटन क्षेत्रात भिती निर्माण केली जात असल्याचे पर्यटन मंत्रालयाच्या निदर्शनाला आले आहे. “पर्यटन मंत्रालयाने असे कोणतेही पत्र दिलेले नाही” आणि अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांवर लोकांनी विश्वास ठेवू नये असे  पर्यटन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. .

पीआयबी फॅक्टचेक वर देखील हे स्पष्ट करण्यात आले आहे.

पर्यटन मंत्रालयाने यापूर्वीच सोशल मीडियावर हे वृत्त फेटाळले असून मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे.  पीआयबी फॅक्ट चेक युनिटनेही काही दिवसांपूर्वी हे फेटाळले होते मात्र खोटे संदेश पुन्हा फिरत आहेत. पीआयबी फॅक्टचेकने काल पुन्हा स्पष्टीकरण दिले आहे. सर्वांना विनंती केली आहे की त्यांनी अशा संदेशांकडे दुर्लक्ष करावे आणि केवळ अधिकृत निवेदनावर  विश्वास ठेवावा.

 

राज्यात आता दररोज दीड लाख शिवभोजन थाळीचे होणार वितरण

0

नाशिक –
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी दि. २८ मार्च २०२० पासून शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात येऊन दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत ५ रुपये थाळी याप्रमाणे १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत होते. लॉकडाऊनमुळे यामध्ये वाढ करत शिवभोजन थाळीची संख्या दीड लाख करण्याचा निर्णय राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत भुकेलेल्या आणि गरजु नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने यापूर्वीच १६० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा लॉकडाऊनच्या काळात दि.२ मे पर्यंत वाढीव शिवभोजन थाळी योजनेचा लाभ सुरु राहणार आहे, असे मंत्री श्री.भुजबळ यांनी कळविले आहे.

या निर्णयानुसार कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात जे लोक स्वतःच्या जेवणाची सोय करू शकत नाही त्यांना शिव भोजनाचा लाभ घेण्यासाठी व्यापक प्रसिद्धी देण्यात येऊन यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय तसेच पोलिस यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरील बेघर, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी उपाशी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असून सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी यांना अधिक लाभ होणार आहे, असेही मंत्री भुजबळ यांनी कळविले आहे.

योग्य त्या उपचारासाठी चोख नियोजन करा -कोरोना रुग्णांच्या माहितीचे संकलन अद्ययावत ठेवा

0
ससूनच्या विविध विभाग प्रमुखांसोबत विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांची बैठक

पुणे, दि.23: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात ससून रुग्णालयाच्या विविध विभाग प्रमुखांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला आरोग्य विभागाचे माजी महासंचालक तथा कोविड-19 चे राज्य समन्वयक डॉ.सुभाष साळुंखे, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्र.अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.अजय तावरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ. निरंजन तेलंग, भुमि अभिलेख विभागाचे जिल्हा अधिक्षक तथा समन्वय अधिकारी राजेंद्र गोळे, डॉ.समीर जोशी आदी उपस्थित होते.
पुण्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असून ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रशासनाशी समन्वय ठेवावा. तसेच चोख नियोजन करुन बाधित रुग्णांवर वेळेत उपचार करावेत, असे सांगून डॉ.म्हैसेकर म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातील रुग्ण संख्येतही वाढ होत आहे. रुग्णांवर वेळेत आणि योग्य प्रकारे उपचार होण्यासाठी सुक्ष्म नियोजन करुन त्यानुसार अंमलबजावणी करावी. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोरोना प्रतिबंधासाठी विविध टप्पे निश्चित करुन त्या-त्या विभागप्रमुखांनी व डॉक्टरांनी आपली भुमिका पार पाडावी. रुग्णांच्या स्वॅब तपासणीच्या नमुन्यांचा अहवाल वेळेत पाठवावा. म्हणजे रुग्णांवर लवकरात लवकर उपचार करणे सोयीस्कर होईल.
नवीन अकरा मजली इमारतीत कोरोना रुग्णांना योग्य ते उपचार होण्यासाठी आवश्यक सेवा सुविधांचा आढावा घेण्यात आला. तसेच डॉक्टरांनी सांगितलेल्या सुधारणा गतीने करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. कोरोना विषाणुच्या अनुषंगाने सूसनमध्ये आजवर तपासणी करण्यात आलेले रुग्ण, बाधित रुग्ण, संशयित रुग्ण संख्या, मृत्यू झालेल्या रुग्णांची वैद्यकीय पार्श्वभूमी इत्यादी माहितीचे संकलन अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देवून समुपदेशानासाठी तयार करण्यात आलेल्या हेल्पलाईन, पीपीई किट, व्हेंटीलेटर्स, आदींची उपलब्धता, विलगीकरण कक्ष, अतिदक्षता विभाग, आदि विषयांबाबत चर्चा केली, तसेच आवश्यक त्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.

कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर – आरोग्यमंत्री

0

मुंबई, दि.२३ : राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही. मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये यांचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर आणण्यात यश मिळाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी बुधवारी येथे सांगितले.

आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे बुधवारी रात्री संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. या संवादतील महत्त्वाचे मुद्दे :

• कोरोना उपचारासाठी नवीन तंत्रज्ञान आणले जात आहे. पीपीई कीटची गरज भासू नये यासाठी फोटो बुथ सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी एक छोटी रुम केली जाईल ज्यात केवळ एक व्यक्ती (डॉक्टर) उभी राहू शकेल. त्या रूममधून केवळ हात बाहेर निघू शकेल ज्याला ग्लोव्हज असतील त्याद्वारे रुग्णाची स्वॅब चाचणी करता येईल, यासाठी पीपीई किटची गरज नाही. मुंबईत असे १०० फोटोबुथ बसविण्यात येणार आहे.

• प्लाझ्मा थेरपीनुसार मुंबईत उपचाराचा प्रयोग केला जाणार आहे. जे रुग्ण बरे झालेत त्यांचे रक्तद्राव घेऊन ते कोरोनाच्या गंभीर रुग्णांना देऊन त्यांच्यामध्ये ॲण्टीबॉडीज वाढविण्याचे काम करतील.

• मंबईत संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. कमी जागेमुळे होम क्वारंटाईन शास्त्रीय पद्धतीने होत नाही, अशा वेळी दाट लोकवस्त्यांमधील नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये मध्ये खाटा टाकून तशी व्यवस्था केली जाईल.

• महाराष्ट्रात दररोज सुमारे सात हजार कोरोना चाचण्या केल्या जातात. आज ७११२ चाचण्या केल्या.

• कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पूर्वी ३.१, त्यानंतर ५ आणि आता ७.१ दिवसांवर गेला आहे. हा जो सात दिवसांचा कालावधी आहे तो अजून वाढविण्याचा उद्देश आहे.

• राज्यात दररोज १३ टक्के लोक बरे होऊन घरी जात आहेत. हे आशादायी चित्र आहे. केवळ एक टक्के रुग्ण अत्यवस्थ आहेत. ८३ टक्के लोकांना लक्षणे नाही तर १७ टक्के लोकांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत.

• महाराष्ट्रात सुरूवातीला कोरोनासाठी १४ हॉटस्पॉट होते. आता तेथे रुग्ण संख्या नाही त्यामुळे त्याची संख्या कमी करत पाच वर आली आहे. मुंबई महानगर परिसर, पुणे परिसर, नागपूर, नाशिक, असे हॉटस्पॉट असून मालेगाववर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे.

• राज्याचा कोरोनामुळे होणारा मृत्यूदर देखील ७ वरून सरासरी पाच वर आला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी दोन समित्या नेमल्या आहेत.

• कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. चाचण्या केल्या जात आहेत, सर्वेक्षण होत आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाईन केले जात आहे. रुग्ण दुपटीचा दर सात दिवसांवर गेलाय त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे. लोकांनी घाबरू नये.

 

लोकांनी घराबाहेर पडू नये या साठी अगोदर तुम्ही हे करा …पोलीस आणि महापालिका आयुक्तांकडे भाजपची मागणी

0

 

पुणे- कोरोना च्या संकटाने वेढले आहे, लोकांनी घराबाहेर पडू नये हे  सारे खरे आहे, पण खरेच लोकांनी बाहेर पडू नये यासाठी महापालिका आणि पोलीस यांनी अगोदर काय केले पाहिजे याबाबत काही मागण्या भा.ज.पा. चे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केल्या आहे .

महाराष्ट्रात एकूणच करोनाचे संकट नियंत्रणात येत असतानाच मुंबई व परिसर, व पुण्यमध्ये हे संकट गडद होत चालले आहे. पुण्यातील संख्या 700 च्या पुढे गेली आहे.त्यामुळे प्रशासनाच्या काय उपाययोजना सुरू आहेत याची माहिती घेण्यासाठी, काही सूचना करण्यासाठी, सहकार्याचा हात पुढे करण्यासाठी आज भा.ज.पा. चे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील व महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली… यावेळी त्यांनी पुढील मागण्या केल्या .
1) पुण्यात ज्या भागांमध्ये रुग्ण सापडत आहेत त्यासाठी सुरक्षा कडक करावी
2) लोकांनी 10 दिवस घराच्या बाहेर पडू नये यासाठी प्रशासनाने दूध पावडर सहित ( जेणे करून दुधासाठी बाहेर पडू नये) धान्य व किराणा सामानाचे किट ह्या भागातील लोकांना मोफत द्यावे.
3) 60 वर्षावरील सर्वांना ( घरच्यांच्या संमतीने) लक्षणे दिसत नसतानाही जवळच्या शाळा, मंगल कार्यालये, लॉजेस, हॉटेल्स मध्ये स्थलांतरित करावे ( अतिशय चांगल्या सुविधा त्या ठिकाणी असाव्यात)
4) केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूचनेनुसार परंतु रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी आयुर्वेदीक, होमियोपॅथिक औषधे नागरिकांना वाटावीत.
अश्या सूचना त्यांनी केल्या व सर्वप्रकारच्या सहकार्याची तयारी दर्शवली…

 

महिन्याभरापासून क्रुझवर अडकलेले भारतीय मुंबईत उतरणार

0

मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानंतर केंद्रीय नौकानयन मंत्रालयाची परवानगी

मुंबई, दि 22 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नाने अखेर मरिला डिस्कव्हरी या एका मोठ्या क्रुझ शिपवर महिन्याभरापासून अडकून पडलेल्या १४६ भारतीय खलाशी व नाविक यांना मुंबई बंदरावर उतरण्याची परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री स्वत: नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी बोलल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने  काल उशिराने यासंदर्भातील एक आदेश जारी केला. त्याचा फायदा समुद्रात ठिकठिकाणी जहाजांवर अडकलेल्या सुमारे ४० हजार खलाशी, जहाजावरील कर्मचाऱ्यांनासुद्धा होणार आहे.उद्या सकाळपासून या क्रुझवरील खलाशांना व कर्मचाऱ्यांना मुंबई बंदरावर उतरविणे सुरु होईल. त्यांची वैद्यकीय तपासणीही होणार आहे. प्रसंगी त्यांना  क्वारंटाईन करण्यासाठी एक इमारतही उपलब्ध ठेवण्यात आली  आहे.

2 ते 6 एप्रिल या कालावधीत मरिला डिस्कव्हरी ही  क्रुझ कोचीन, न्यू मंगलोर, गोवा आणि मुंबई अशा ठिकाणी पोहोचणार होती. दरम्यान कोरोनाचा उद्रेक सुरु झाला आणि या क्रुझने  लाएम चाबँग या थायलंड येथे १४ मार्च रोजी सर्व प्रवासी सोडले. ही क्रुझ १२ एप्रिल रोजी कोचीन येथे पोहोचली पण या क्रुझवरील कर्मचाऱ्यांना उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली. नंतर ही क्रुझ मुंबईजवळच्या समुद्रात १४ एप्रिल रोजी पोहोचली आणि तेव्हापासून त्यावरील कर्मचारी मुंबईला उतरण्याची वाट पाहत होते. जहाजावरील कुठल्याही कर्मचाऱ्यास कोरोना लागण झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. थायलंड सोडून ३७ दिवस होऊन गेले होते मात्र जहाजावर कुठलाही संसर्ग नसल्याचे कंपनीने सांगितले तरी परवानगी मिळत नव्हती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात नौकानयन मंत्रालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. प्रधान सचिव विकास खारगे, आशिष कुमार सिंह आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया हे सातत्याने पाठपुरावा करीत होते.

काल यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने  एक आदेश काढला. यात व्यापारी व व्यावसायिक जहाजांवरील कर्मचारी, खलाशी यांना भारतीय बंदरांवर उतरणे तसेच बंदरांवरून जाणे शक्य व्हावे म्हणून निश्चित कार्यपद्धती दिली आहे. यानुसार या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या गेल्या २८ दिवसांतील प्रवासाची माहिती कळविणे, तसेच बंदरावर उतरल्यावर कोविड चाचणी करून घेणे, प्रसंगी क्वारंटाईन करणे, या खलाशी व कर्मचाऱ्यांना थेट त्यांच्या घरी सोडण्यासाठी ट्रांझिट पास, वाहनाची व्यवस्था आदी बाबींचा समावेश आहे. याचा फायदा समुद्रात सध्या विविध जहाजांवर अडकलेल्या ३५ ते ४० हजार भारतीय  खलाशांना होणार आहे.

ही क्रुझ पुढे नॉर्वेसाठी रवाना होणार आहे.