नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांच्या सैनिकी शाळा फुलगावचा अनोखा उपक्रम
पुणे, दि. 23 एप्रिल : लॉकडाउन सुरु असल्याने आज जागतिक पुस्तक दिवस साजरा करण्यासाठी लोकसेवा प्रतिष्ठानच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांच्या सैनिकी शाळेने अनोखी शक्कल लढविली. ऑनलाइन पुस्तक वाचन करुन सैनिकी शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी आज जागतिक पुस्तक दिन साजरा केला. लॉकडाऊनमुळे घरी असलेल्या विद्यार्थी व पालकांनी या ऑनलाइन पुस्तक वाचनाच्या कल्पनेचे स्वागत केले आणि एक तास ऑनलाइन पुस्तक वाचन करुन हा दिवस साजरा केला. यामध्ये 45 विद्यार्थी सहभागी झाले, अशी माहिती प्राचार्या ज्योती आरडे यांनी दिली.
जगविख्यात लेखक शेक्सपिअर यांची आज जयंती व पुण्यतिथी आणि हा दिवस इंग्रजी भाषा दिन म्हणूनही साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना सर्वप्रथम जागतिक पुस्तक दिन व शेक्सपिअर यांच्याबद्दल माहिती देण्यात आली. आणि त्यानंतर एक तास पुस्तक वाचन झाले. लोकसेवा प्रतिष्ठानच्या लोकसेवा ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे संस्थापक दीपक पायगुडे यांनी ही कल्पना शाळेच्या प्राचार्या व इतर शिक्षकांसमोर मांडली. त्यानुसार सैनिकी शाळेच्या प्राचार्या ज्योती आरडे, शिक्षक पांडुरंग जगताप यांनी त्याची अंमलबजावणी केली.
इंटरनेटमुळे जग जोडले गेले आणि त्याचा अनुभव आपण अनेकदा घेतला आहे. परंतु, सध्यो कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात डिजीटल आणि इंटरनेटचे फायदे किती आहेत याचा अनुभव आपण घेत आहोत. लोकसेवा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सर्व शाळांमध्ये सध्या व्हर्च्युअल क्लासेस सुरु आहेत. याच व्हर्च्युअल क्लासच्या वेळी विद्यार्थ्यांना व पालकांना जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने ऑनलाइन पुस्तक वाचनाची कल्पना दिली आणि पालक व विद्यार्थ्यांकडून त्याचे स्वागत करण्यात आले. पुढे एक तास विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पुस्तकांचे वाचन केल्याचे प्राचार्या ज्योती आरडे यांनी सांगितले.