Home Blog Page 2187

महाविकास आघाडी सरकारने सोलापूरच्या जनतेला वाऱ्यावर सोडले- विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0


सोलापूर, दि. ७ डिसेंबर – सोलापूरच्या विकासासाठी हे सरकार बेफिकीर असून गेल्या २ वर्षात या सरकारने सोलापूरच्या विकासासाठी एक नवा रुपया दिलेला नाही. अशा प्रकारे जनतेला वाऱ्यावर सोडण्याचे काम महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून झाले आहे आणि त्याचा सर्वात मोठा फटका दुर्दैवाने सोलापूरला बसल्याची जोरदार टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली.

सोलापूरच्या दौऱ्यावर असलेले प्रविण दरेकर यांनी सोलापूर शहराच्या विकासाचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरामध्ये रस्त्याची कामे सुरू होती. दुहेरी पाणीपुरवठा पाईपलाईनच्या योजना होत्या. त्याही ठप्प आहेत. स्मार्ट सिटीचे काम पूर्णतः ठप्प आहे. उलट ते कसे होणार नाही याची काळजी सरकारी यंत्रणा घेताना दिसत आहे. पूर्णपणे रजकीय अनास्था आहे. आपापल्या पक्षांमध्ये विसंवाद आहे. पालकमंत्री केवळ नाममात्र आहेत असा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.

खऱ्या अर्थाने पालकत्वाची भूमिका घेऊन विकास करण्याची आवश्यकता आहे. एखादा सरकारी अधिकारी बैठक घेतो आणि निघून जातो. परंतु इथल्या लोकांची सुख-दु:खे खोलवर जाऊन त्यातून मार्ग काढण्याची तसदी पालकमंत्री घेताना दिसत नाहीत. कॉँग्रेसचे वेगळे चालले आहे, राष्ट्रवादीचे वेगळे चालले आहे. शिवसेना तर इथे दिसतच नाही असेही दरेकर यांनी सांगितले.

सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलनामध्ये अधिकाधिक सहभाग द्या-निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मतराव खराडे

0

पुणे दि. 7 : देशाच्या रक्षणासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या सशस्त्र दलातील वीर जवानांच्या कुटुंबियांच्या हिताची काळजी घेण्याची जबाबदारी आपली सर्वांची असून सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलनामध्ये आपला अधिकाधिक सहभाग द्यावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मतराव खराडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ध्वजदिन 2021 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे, सहायक सैनिक कल्याण अधिकारी बबन खंडाळे यांच्यासह माजी सैनिक तसेच त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

श्री. खराडे म्हणाले, देशाच्या संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी सैनिकांवर आहे. आज सैनिकांमुळे आपण सुरक्षित असून सैनिकांच्या कुटुंबांची काळजी घेणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी निधी संकलन करण्याचे महत्वूंचपर्ण कार्य आहे. सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्ताने संकलित केलेला निधी सैनिक, माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा आणि मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येतो. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी ध्वजदिनी निधी संकलनात पुढाकार घ्यावा,समाजातील प्रत्येक घटकाने ध्वजनिधीसाठी सहाय्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले तसेच सैनिकांच्या तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांनी मिळविलेल्या यशाबदल त्यांनी सर्वांचे कौतुक केले.

प्रास्तविकात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासणे म्हणाले, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या माध्यमातून शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या अडी-अडचणी दूर केल्या जातात. कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा उपयोग केला जातो. कोरोना संक्रमणामुळे उद्भवलेल्या आपत्तीजनक स्थितीतही नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे 1 कोटी 50 लाख रुपयांचे उद्दिष्ट साध्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांना सशस्त्र सेना दिवसाचे बॅचेस लावण्यात आले आणि ध्वजदिन निधी संकलनाच्या शुभारंभप्रसंगी निधी संकलित करण्यात आला.

विशेष गौरव पुरस्काराने पाल्यांचा सत्कार
विशेष कामगिरी केलेल्या माजी सैनिक तसेच दहावी, बारावी परिक्षेत यश मिळविलेल्या सैनिकांच्या पाल्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. राजेश आंबोकर, रमेश सांगळे, बालाजी श्रीराम गायकवाड, शांताराम होले, धर्मराज दौंडकर, प्रमोद कार्वे, संजय वाघ, किरण वैद्य, संतोष डांगले यांचा विशेष पुरस्काराने धनादेश देवून गौरव करण्यात आला.

यावेळी माजी सैनिक, विरमाता, विरपत्नी यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते.

मानधन तत्वावर व्हॉलीबॉल प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

पुणे, दि. ७: राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्याच्या उद्देशाने विभागीय क्रीडा संकुल येथे मुले व मुलींसाठी खेलो इंडिया व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत  आहे. या केंद्रासाठी खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर प्रशिक्षक नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात आले.

केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयाच्या मान्यतेने व राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारा हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रासाठी व्हॉलीबॉल प्रशिक्षक म्हणून अर्ज करणारा उमेदवार ४५ वर्ष वयोगटाआतील असावा. यामध्ये अतिउच्च गुणवत्ता असल्यास समितीच्या मान्यतेने ५० वर्षापर्यंत वय असलेल्या उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. ऑलिंपिक, आशियाई स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद अधिकृत स्पर्धा सहभाग किंवा पदक प्राप्त प्रशिक्षणाचा अनुभव असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कारार्थी प्रशिक्षणाचा अनुभव असावा. एनआयएस पदविका किंवा संबंधित खेळाचे अधिकृत पातळीचे अभ्यासक्रम किंवा बीपीएड- एमपीएडसह राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त प्रशिक्षणाचा अनुभव असावा. राज्यस्तर खेळाडू बीपीएड- एमपीएडसह राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त किंवा राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त कमीतकमी ५ वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव असावा.

अर्हताप्राप्त उमेदवारांनी आपले अर्ज १५ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे सर्व्हे नं. १९१,  ग्यानबा मोझे हायस्कुल समोर, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, पुणे येथे समक्ष सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी तालुका क्रीडा अधिकारी ए. जी. सोलणकर (९८२२३५६१९७) व क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार (९५५२९३१११९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल यांनी केले आहे.
000

मागासवर्गीय गुणवंत मुलांच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

0

पुणे, दि.७ : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत पिंपरी-चिंचवड येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांच्या शासकीय वसतिगृहात २०२१-२२ साठी अनुसूचित जाती, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

प्रवेशासाठी विद्यार्थी हा बाहेरगावचा परंतु पुणे, पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा. मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, सक्षम प्राधिकाऱ्याच्या सहीचे जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र निवासाचे प्रमाणपत्र, तसेच महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, मुलाचे आणि वडिलांचे आधारकार्ड, शिधापत्रिकेची सत्यप्रत अर्जासोबत जोडावी. कोविड-१९ आजाराबाबत वडिलांचे/लाभार्थ्यांचे लेखी संमतीपत्रक असावे. शाळा अथवा महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू असल्याबाबत मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचे लेखी हमीपत्रदेखील अर्जासोबत असणे आवश्यक आहे.

शासकिय वसतिगृहात विनामुल्य निवास व भोजनाची सुविधा आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दराने पुस्तके, इतर शैक्षणिक साहित्य आदीकरिता रक्कम आणि दरमहा निर्वाह भत्ता रक्कम ८०० रुपये आधार क्रमांक जोडलेल्या विद्यार्थ्याच्या बचत खात्यावर जमा होते.

कोविड-१९ महामारीमुळे रिक्त जागेच्या ५० टक्केच जागा भरल्या जाणार आहेत. बाहेरगावाकडील परंतू पुणे पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण परिसरात शिक्षण घेणा-या गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरिता वसतिगृहात येऊन नोंदणी करावी, असे आवाहन वसतीगृह अधीक्षक एम.डी.वाघमारे यांनी केले आहे.

आर्यन पंप्स आशियाई ज्युनियर(कुमार) टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अमन दहिया, निशांत दबस, मधुरीमा सावंत यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

0

पुणे,7 डिसेंबर 2021: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) आणि डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित आर्यन पंप्स आशियाई ज्युनियर(कुमार) टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य ड्रॉ च्या पहिल्या फेरीत मुलांच्या गटात भारताच्या अमन दहिया, निशांत दबस, विनीत मुतयला यांनी तर मुलींच्या गटात मधुरीमा सावंत या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित भारताच्या निशांत दबस याने व्याट ओब्रियनचा 6-2, 6-2 सहज पराभव करून आगेकूच केली. चौथ्या मानांकित भारताच्या अमन दहिया याने जपानच्या सो ओगिरीचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 6-1 असा पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या विनीत मुतयाला याने धनंजय अत्रेयाचा 6-4, 6-2 असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले. मानांकित कोरियाच्या वोबिन शिनने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत भारताच्या शिवम कदमचा 6-4,6-2असा पराभव करत दुसऱ्या फेरीत धडक मारली. 

मुलींच्या गटात पुण्याच्या मधुरिमा सावंत हिने आयटीएफ ग्रेड कुमार टेनिस स्पर्धेतील उपविजेत्या वैष्णवी आडकरचे आव्हान 4-6, 6-3, 7-5 असे तीन सेटमध्ये मोडीत काढले. अव्वल मानांकित कझाकस्तानच्या आरुझुन सेगनडिकोव्हा हिने  भारताच्या वेद प्रापूर्णाचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला.संजना सिरिमल्ला हिने क्वालिफायर आस्मी आडकर चा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

एकेरी गट मुले- पहिली फेरी

वोबिन शिन (कोरीया) [1] वि.वि.शिवम कदम (भारत) 6-4,6-2; 

निशांत दबस (भारत) [2]वि.वि.व्याट ओब्रियन (भारत)6-2, 6-2;

अमन दहिया (भारत) [4] वि.वि. सो ओगिरी (जपान)7-6(5), 6-1;

विनीत मुतयाला (भारत)वि.वि.धनंजय अत्रेया (भारत) 6-4, 6-2;

एकेरी गट मुली- पहिली फेरी

आरुझुन सेगनडिकोव्हा (कझाकस्तान) [1] वि.वि.वेद प्रापूर्णा (भारत) 6-0, 6-0;

मधुरिमा सावंत (भारत) वि.वि. वैष्णवी आडकर (भारत) 4-6, 6-3, 7-5;

संजना सिरिमल्ला (भारत) वि.वि.आस्मी आडकर (भारत) 6-3, 6-2;

दुहेरी गट मुले- पहिली फेरी

आदित्य नांदल (भारत)/डेनिम यादव (भारत) वि.वि.संदेश कुरळे (भारत) /आर्यन सुतार (भारत) 6-1, 6-3;

डॅनिल फेल्कर (कझाकस्तान) / इस्लाम ओरीनबासर (कझाकस्तान)वि.वि.सार्थ बनसोडे (भारत) / तनिष्क जाधव (भारत) 6-2, 6-3;

मॅक्स बट्युटेन्को (कझाकस्तान) [4] /अर्तूर खैरुतदिनोव (कझाकस्तान) वि.वि.दक्ष अग्रवाल (भारत) /आर्यन लक्ष्मणन (भारत) 6-0, 6-4;

तनापट्ट निरुंदोर्न (थायलंड)/वोबीन शिन (कोरीया) [1] वि.वि. युवान नंदल (भारत) /साहेब सोधी (भारत) 6-2, 6-1;

अमन दहिया (भारत) /रुशील खोसला (भारत) [3]वि.वि. धनंजय अत्रेय (भारत) /व्याट ओब्रियन (भारत) 6-0, 7-6(2);

मुनी अनंथ मनी (भारत) /अनर्घ गांगुली (भारत)वि.वि.शिवम कदम (भारत) / प्रणव रेथिन सेंथिल कुमार (भारत) 6-3, 6-7(1), [13-11];

निखिल मुखर्जी (भारत) /जैष्णव शिंदे (भारत)वि.वि.शिंगो मसुदा (जपान) /सो ओगिरी (जपान) 7-5, 6-7(2), [10-4];

निशांत दबस (भारत) [2] /चिराग दुहान (भारत)वि.वि.मानव जैन (भारत) /आर्यन शाह (भारत) 7-5, 6-1;

दुहेरी गट- मुली- पहिली फेरी

अरुणकुमार लक्ष्मी प्रभा (भारत) /होनोका उमेदा (जपान)वि.वि.परी चव्हाण (भारत) /कोतिष्ठा मोडक (भारत) 6-1, 6-0;

एर्केझन अर्यस्तानबेकोव्हा (कझाकस्तान) / झानेल रुस्तेमोव्हा (कझाकस्तान) [4] वि.वि. रुमा गायकैवारी (भारत) / सोनल पाटील (भारत) 7-6(6), 6-1;

सेंदुगेश केंझीबायेवा (कझाकस्तान) [3] /सुहिता मारुरी (भारत)वि.वि.कायरा चेतनानी (भारत) /सिद्धी खोत (भारत) 6-0, 6-1;

हयू किनो शिता (जपान) [2] /सारा साईतो (जपान)वि.वि.नंदिनी दीक्षित (भारत) /सूर्यांशी इंडिया (इंडिया) 6-2, 6-0;

यू-युन ली (तैपैई) / आरुझुन सेगनडिकोव्हा (कझागस्तान)  [1] वि.वि. लक्ष्मी गौडा (भारत) /नेम्हा सारा किस्पोटा (भारत) 6-0, 6-0;

तेजस्वी दबस (भारत) / संजना सिरिमल्ला (भारत) वि.वि. चहाना बुधभट्टी (भारत) /आरणी रेड्डी येल्लू (भारत) 6-2, 6-3;

श्रुती अहलावत (भारत) /रिया उबवेजा (भारत)वि.वि.संजीवनी कुतवळ (भारत) / मधुरिमा सावंत (भारत)  6-0, 6-0;

क्रिस्ती बोरो (भारत) /वेदा प्रापूर्णा (भारत)वि.वि.आन्या जेकब (भारत) /श्रावणी खवले (भारत) 6-3, 6-2;

कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी आता साडेतीनशे रुपयांत; खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

0

मुंबई दि. ६ : राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले आहेत. कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ३५० रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा केली आहे. आता नव्या सुधारित दरानुसार केवळ ३५० रुपयांत चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.

निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी ३५०, ५००,  आणि ७०० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमूना घेऊन त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून ३५० रुपये आकारले जातील. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटर मधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी ५०० रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेवून त्याचा अहवाल देणे यासाठी ७०० रुपये आकारण्यात येणार आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमूने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जावून नमूने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी २००, २५० आणि ३५० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी ३००, ४००, ५०० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास १००, १५० आणि २५० असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.

सीबी-नैट अथवा ट्रूनैट चाचणीसाठी १२०० रुपये निश्चित करण्यात आले आहेत.  या चाचण्यांसाठी आवश्यक साहित्य आणि साधनसामुग्री माफक दरात उपलब्ध होत असल्याने तसेच आयसीएमआरने विविध उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने त्यांची उपलब्धता वाढली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत असल्याने त्यावरील खर्च देखील कमी झाला आहे. परिणामी खासगी प्रयोगशाळांना येणारा तपासणी खर्च कमी झाल्याचे नमूद करतानाच राज्यात आयसीएमआर आणि एनएबीएलने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांच्या संख्येत वाढ झाल्याने चाचण्यांचे दर कमी होणे आवश्यक असल्याने राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आंदोलन मागे घेण्याच्या आवाहनाला ‘मार्ड’चा सकारात्मक प्रतिसाद

0

मुंबई, दि. 6 : राज्य शासन निवासी डॉक्टर्सच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर्सनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. त्यांच्या आवाहनाला मार्डच्या सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आंदोलन मागे घेण्याची ग्वाही दिली.

आपल्या विविध मागण्यांसाठी देशातील निवासी डॉक्टरांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर्सच्या पदाधिकाऱ्यांसोबत पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे यांनी  सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत चर्चा केली. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, मुंबईतील महापालिकेच्या महाविद्यालयांचे अधिष्ठाता, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि मार्डचे सदस्य उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे म्हणाले, निवासी डॉक्टरांच्या विभागाशी निगडीत वमहानगरपालिकेच्या अखत्यारीतील समस्या सोडविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडील विषयांबाबतही पाठपुरावा करण्यात येईल. आरोग्यसेवेसाठी ज्या आवश्यक बाबी आहेत त्या चांगल्या दर्जाच्या देण्याबाबत शासन आग्रही असल्याचेही ते म्हणाले. कोविडच्या पार्श्वभूमीवर मार्डने आंदोलन करू नये, असे आवाहन श्री ठाकरे यांनी यावेळी केले.

राज्य शासनाने डॉक्टर्ससाठी चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मार्डच्या सदस्यांनी समाधान व्यक्त करून समस्या सोडविण्यासाठी शासनाच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलन मागे घेण्याची ग्वाही दिली.

‘पिफ’ मधील समंजस प्रेक्षक चित्रपटाला देत असलेला प्रतिसाद पाहून आत्मविश्वास वाढला

0

‘कँडिड टॉक्स’ अंतर्गत चित्रपटांच्या टीममधून रसिक प्रेक्षकांचे कौतुक

पुणे, दि. ६ डिसेंबर, २०२१ : चित्रपट आवडला नाही, कंटाळवाणा वाटला तर चित्रपटगृहातील प्रेक्षक मोबाईल पाहत बसतात, बाहेर चक्कर मारून येतात, चुळबळ करतात. प्रत्येक चित्रपटाच्या संवेदना वेगवेगळ्या असतात. या संवेदना जपणारा, समंजस प्रेक्षक पुण्यात आहे. यामुळेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमचा आत्मविश्वास वाढला. इतकेच नाही तर आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना या महोत्सवात कौतुकाची थाप मिळाली, असे मत महोत्सवात सहभागी झालेल्या चित्रपटांच्या टीमने व्यक्त केले.

लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आयोजित ‘कँडिड टॉक्स’ या कार्यक्रमाअंतर्गत पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते यांनी आज ‘अ होली कॉन्स्परसी’, ‘काळोखाच्या पारंब्या’ आणि ‘ताठ कणा’ या चित्रपटांच्या टीमशी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते. या तीनही चित्रपटांचे वर्ल्ड प्रीमिअर हे पिफ मध्येच झाले, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले,

‘अ होली कॉन्स्परसी’ चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक सायबल मित्रा, ‘काळोखाच्या पारंब्या’ चित्रपटाच्या कथेचे लेखक भारत ससाणे, कलाकार काजल राऊत, वैभव काळे आणि ‘ताठ कणा’ चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मोहिते आदी या वेळी उपस्थितीत होते.

प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सौमित्र चटोपाध्याय, नसीरूद्दीन शाह यांचा एकत्रित अभिनय असलेला आणि सौमित्र चाटोपाध्याय यांचा हा शेवटचा शेवटचा चित्रपट असल्याचे सांगत सायबल मित्रा म्हणाले, “माझ्या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर हा पिफ मध्ये झाला. इथल्या प्रेक्षकांना तो आवडलाय ही खात्री झाल्यानंतर आता मी तो इतर महोत्सवांसाठी पाठवेल. पण पिफ मधला प्रदर्शनाने माझा आत्मविश्वास वाढलाय.”

डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत आणि बायबलमधील सिद्धांत या विषयावर अमेरिकेत स्कूप्स मंकी ट्रायल नावाने एक प्रसिद्ध खटला चालला होता. त्यावर ‘इनहेरीट द विंड’ हे नाटक आले होते. हाच संदर्भ घेत भारतातील बाबींवर आधारित ‘अ होली कॉन्स्परसी’ हा चित्रपट असून मानवी समजूतींचा राजकीय स्वार्थासाठी कशा पद्धतीने वापर केला जातो, यावर भाष्य करण्यात आले आहे. भारताची सर्वच बाबतीतील विविधता व माणुसकी हेच त्याचे खरे सौंदर्य आहे आणि मतदानावरून हे बदलणार नाही, हे दाखविण्याचा प्रयत्न मी केला असल्याचेही मित्रा यांनी नमूद केले.

कोल्ज अप, लॉंग शॉट हेच आमच्या चित्रपटाचे सरगम आहेत असे सांगत, सौमित्र दा आणि नसीरूद्दीन शाह या हाडाच्या अभिनेत्यांना एकत्र काम करताना पाहणे आणि त्यांच्याकडून शिकणे ही सदैव लक्षात राहणारी बाब होती, असे सांगत त्यांनी शुटींग दरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला.

‘डफ’ ही माझी कादंबरी अनेकदा वाचल्यावर मकरंद अनासपुरे यांनी यावर चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला असे सांगत भारत ससाणे म्हणाले, “अलिफ या पात्राचा आधात्मिक व भौतिक प्रवास दाखविताना या पात्रातील काळोखाची छटा दाखविणारा हा चित्रपट आहे.”

अलिफ या व्यक्तीरेखेतील निष्पापपणा साकारताना, तो निष्पापपणा ज्या टप्प्यावर संपतो त्या ठिकाणी त्याच्या आयुष्यात काळोख येतो, हे दाखविताना त्याच्यातील तो काळोख दाखविणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते असे वैभव काळे यांनी सांगितले. चित्रपटात काम करण्याचा माझा पहिलाच अनुभव होता अशी माहिती काजल राऊत यांनी दिली.

ताठ कणा चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मोहिते म्हणाले, “न्यूरो स्पाईन सर्जन असलेले डॉ. पी. एस. रामाणी यांच्या आयुष्यावरील हा बायोपिक असून अनेक नागरीकांना त्यांनी स्पाईन सर्जरीद्वारे दिलेले नवे जीवन चित्रबद्ध करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.”याद्वारे त्यांचे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना नवनिर्मित नगरपरिषद/नगर पंचायतीत सामावून घेणार – नगरविकास विभागाचा निर्णय

0

मुंबई, दि. ६ – ज्या ग्रामपंचायतींचे नगर परिषद अथवा नगर पंचायतीत रुपांतर झाले आहे, तेथील सफाई कर्मचाऱ्यांना या नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये रिक्त जागांनुसार सामावून घेण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय आज सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यभरातील १४७७ सफाई कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

नवनिर्मिती नगर परिषदा व नगर पंचायतींच्या आकृतीबंधात सफाई कर्मचाऱ्यांची नियमित पदे मंजूर नसल्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन झालेले नाही.

विविध नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये ग्रामपंचायतकालीन सुमारे १४७७ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. या नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबतच्या शासनाच्या प्रचलित धोरणानुसार समावेशनाची प्रक्रिया पूर्ण होऊन देखील मंजूर व रिक्त असलेल्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या पदांवर तत्कालीन ग्रामपंचायतींमधील सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याला आता मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार मंजूर व रिक्त जागांवर विहीत शैक्षणिक व तांत्रिक अर्हता प्राप्त असलेल्या इच्छुक सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, विहीत तांत्रिक अर्हता पूर्ण न करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना यासाठी महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिक प्रशिक्षण व संशोधन संस्था (मित्रा) या संस्थेच्या माध्यमातून ६ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांचे समावेशन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

महाविकास आघाडीने ओबीसींची फसवणूक केली, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही-भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा

पुणे-

महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून केवळ अध्यादेश काढून ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे तो अध्यादेश न्यायालयात टिकला नाही आणि सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली. भारतीय जनता पार्टी ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला.

ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाबद्दल त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासाठी एंपिरिकल डेटा गोळा करण्यास सांगितले होते, तरीही महाविकास आघाडी सरकारने केवळ अध्यादेश काढून ओबीसींना राजकीय आरक्षण देऊन ओबीसींची फसवणूक केली. न्यायालयात टिकणार नाही, असा अध्यादेश काढण्याच्या प्रकाराची चौकशी करा. या अध्यादेशामागे कोण आहे, हे स्पष्ट करा. ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळू नये असा महाविकास आघाडी सरकारचा डाव आहे. चुकीचा अध्यादेश काढून ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला.

ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी राजकीय आरक्षणासाठी एंपिरिकल डेटाची जबाबदारी राज्य मागासवर्ग आयोगाला जबाबदारी दिली. माहिती गोळा करण्यासाठी मागास आयोगाने काम सुरू करण्याचा प्रयत्न केला तर राज्य सरकारने त्याला निधी आणि आवश्यक संसाधने दिली नाहीत. परिणामी राज्य मागासवर्ग आयोगाचे एंपिरिकल डेटा गोळा करण्याचे काम इंचभरही पुढे गेले नाही. त्यामुळे कंटाळून काही सदस्यांनी राजीनामा दिला.

ते म्हणाले की, २०११ साली केंद्र सरकारने जनगणना करताना गोळा केलेली सामाजिक आर्थिक पाहणीची माहिती आणि सर्वोच्च न्यायालयाने मागितलेला एंपिरिकल डेटा यांचा काही संबंध नाही. केंद्र सरकारवर आरोप करण्यापेक्षा न्यायालयाने जो एंपिरिकल डेटा गोळा करण्यास सांगितला आहे त्यावर राज्य सरकारने लक्ष केंद्रित करावे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे निधन

0

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव प्रतापराव गोडसे यांंचे सोमवार, दिनांक ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी निधन झाले. ते ६५ वर्षांंचे होते. त्यांच्या मागे पत्नी, १ मुलगी, १ मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. यकृताच्या कर्करोगासंदर्भात त्यांच्यावर मागील दोन आठवडयांपासून ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते.

सुमारे ५० ते ५५ वर्षे ट्रस्टच्या माध्यमातून ते कार्यरत होते. सन २०१० पासून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष होते. तसेच सुवर्णयुग सहकारी बँकेवर संचालक पदी देखील त्यांनी काम केले होते. अशोक गोडसे यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या माध्यमातून मानवतेचे महामंदिर ही संकल्पना रुजवित अनेक सामाजिक उपक्रम राबविले.

जय गणेश ज्ञानवर्धन अभियान, जय गणेश रुग्ण सेवा अभियान, जय गणेश संपूर्ण ग्राम अभियान, जय गणेश आपत्ती निवारण अभियान, जय गणेश जलसंवर्धन अभियान, जय गणेश निसर्ग संवर्धन अभियान या ट्रस्टच्या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

अशोक गोडसे यांनी १९६८ साली सुवर्णयुग तरुण मंडळाचे प्रमुख संघटक म्हणून सुरुवात केली. सन १९९६ मध्ये ते सुवर्णयुग तरुण मंडळाचे विद्यमान संचालक होते. सन २००१ मध्ये ट्रस्टच्या विश्वस्तपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर सन २०१० मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यापासून ते ट्रस्टवर कार्यरत होते. दरवर्षी होणा-या गणेशोत्सव सजावटीच्या संकल्पनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो.

पुण्यात भरदिवसा गोळीबार; 6 गोळ्या झाडून कॉंग्रेस कार्यकर्त्याची हत्या

0

पुणे-पुण्यातील भारती पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर भरदिवसा एका तरुणावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या गोळीबारात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. समीर मुनीर शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, तो काँग्रेसचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास समीर हा भारती पोलीस चौकीपासून काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलजवळ थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरून तिघेजण आले. त्यातील एकाने पिस्तूलमधून समीरवर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये समीरखाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचे पालन आवश्यक -नारायण राणे

0

पुणे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय देणारी एक समतोल अशी घटना लिहिलेली आहे. आपण सर्वानी बाबासाहेबांच्या विचारांचे अनुसरण केल्यामुळेच आपला देश प्रगत होईल असे प्रतीपादन, केंद्रींय  सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री, श्री. नारायण राणे यांनी आज पुण्यात केले.

सिंबायोसिस संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक यांच्यातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त आज दिनांक 6 डिसेंबर 2021 रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.  या अभिवादन सभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री. नारायण राणे, तसेच सन्माननीय अतिथी म्हणून विधानसभा विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस, उपस्थित होते. 

कार्यक्रमात बोलताना श्री. नारायण राणे म्हणाले कि, आजचा दिवस हा अत्यंत प्रेरणादायी आहे. बाबासाहेबांचे विचार संग्रहालय आणि स्मारकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वपूर्ण कार्य सिंबायोसिस करीत आहे.

श्री. देवेंद्र फडणवीस, अभिवादन सभेत आपल्या भाषणात म्हणाले की, आपण सर्वानी संकुचित वृत्ती सोडून व्यापक विचार करायला शिकले पाहिजे. बाबासाहेबानी सांगितलेल्या मार्गावर आपण सर्वजण एकदिशेने गेल्यास आपला देश हा नक्कीच विकसित देश बनू शकेल.आपल्या देशासमोर असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे ही संविधानात सापडतात. समाजातील कोणताही घटक कोणत्याही प्रकारे मागे राहणार नाही याचा विचार बाबासाहेबानी लिहिलेल्या संविधानात केलेला आहे. देशातील सांस्कृतिक एकात्मता जपण्याचे काम बाबासाहेबांनी संविधानातून केले आहे.

डॉ. शां. ब. मुजुमदार, संस्थापक व अध्यक्ष सिंबायोसिस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची प्रशंसा केली. 

या अभिवादन सभेसाठी पुण्याचे महापौर, श्री मुरलीधर मोहोळ हे उपस्थित होते. सौ. संजीवनी मुजुमदार, मानद संचालिका, सिंबायोसिस संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक,यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका, सिंबायोसिस यांनी आभार प्रदर्शन केले.

बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी ‘१०९८’चा प्रभावी वापर व्हावा : सहस्रबुद्धे

0

पुणे : बाल लैंगिक अत्याचारांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. समाजामध्ये जागृती करून लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखायला हव्यात. ‘१०९८’ ही चाईल्ड हेल्पलाईन गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. समाजातील प्रत्येकाने या हेल्पलाईनचा प्रभावी वापर केला, तर बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना थांबतील, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा सहस्रबुद्धे यांनी केले.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहांतर्गत बाल लैंगिक अत्याचारविरोधी जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शनिवार पेठेतील कन्या शाळेत महारांगोळी काढून प्रबोधनात्मक पोस्टर्स हातात घेऊन दिवे व मशाली प्रज्वलीत करत प्रतिज्ञा घेण्यात आली. चाईल्ड हेल्पलाईन ‘१०९८’चे महत्व सांगण्यात आले. यावेळी सप्ताहाचे संयोजक मोहन जोशी, प्रशांत सुरसे, पियुष शहा, सारिका आगज्ञात यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मोहन जोशी म्हणाले, “या सप्ताहात दरवर्षी सामाजिक कार्यक्रम हाती घेऊन त्याचे मोहिमेत रूपांतर केले जाते. बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना वेदनादायी आहेत. अशा घटना रोखण्यासाठी त्याविरोधात जागृती होणे आवश्यक आहे. काँग्रेसच्या वतीने १०९८ ही चाईल्ड हेल्पलाईन सर्वदूर पसरवण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येतील.”

पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात एमसीए वेस्ट झोनच्या 200धावा;-रणजीत निकमची अर्धशतकी खेळी

0

पुणे, दि.6 डिसेंबर 2021- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात रणजीत निकम(65 धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर एमसीए वेस्ट झोन संघाने एमसीए सेंट्रल झोन संघाविरुद्ध 200धावा केल्या. तर, अन्य लढतीत एमसीए साऊथ झोन संघाने पहिल्या डावात ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमीपुढे 187 धावांचे आव्हान उभे केले.

पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत तीन दिवसीय लढतीत पहिल्या दिवशी एमसीए वेस्ट झोन संघाने प्रथम फलंदाजी करताना 47 षटकात 9बाद 200धावा केल्या. कर्णधार रणजीत निकमने सयंमी फलंदाजी करत 58चेंडूत 11चौकार व 1षटकारासह 65धावांची खेळी केली. रणजीत निकमने प्रथमेश बाजारी(16धावा)च्या साथीत पाचव्या गड्यासाठी 57चेंडूत 41 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. त्यानंतर सुधाकर भोसले नाबाद 35धावा व अजित बागाडी नाबाद 1 धावांवर खेळत आहे. एमसीए सेंट्रल झोनकडून शोएब सय्यद(3-51), व्यंकटेश काणे(3-71), ऋषिकेश सोनावणे(2-12) यांनी सुरेख गोलंदाजी केली. दोन्ही संघातील अजून दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे.

ब्रिलियंटस अकादमी मैदानावर झालेल्या लढतीत पहिल्या डावात ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमीच्या कन्हैया लड्डा(3-25), योगेश कारे(2-47), हार्दिक अडक(1-12), सोहम लेले(1-12)यांच्या अचूक गोलंदाजीपुढे एमसीए साऊथ झोन संघाचा डाव 57 षटकात 187धावावर कोसळला. यात अझहर अलगूरने सर्वाधिक 56धावा, ओंकार यादवने 45धावा केल्या. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी 167चेंडूत 88धावांची भागीदारी केली. याच्या उत्तरात ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी संघाने आज दिवस अखेर 30.2 षटकात 9बाद 105धावा केल्या. यात राज अवतरामानी नाबाद 32धावांवर खेळत आहे. एमसीए साऊथ झोनकडून निखिल कदम(3-34), अझहर अलगूर(2-8), सुयश कुलकर्णी(2-20), बाळकृष्ण काशीद(2-22) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. दोन्ही संघातील अजून दोन दिवसांचा खेळ बाकी आहे.

निकाल: पीवायसी मैदान: पहिला डाव: एमसीए वेस्ट झोन: 47 षटकात 9बाद 200धावा(रणजीत निकम 65(58,11×4,1×6), सुधाकर भोसले नाबाद 35(71,3×4), ओंकार मोहिते 25, प्रथमेश बाजारी 16, सिद्धार्थ म्हात्रे 15, क्षितिज पाटील 12, अजित बागाडी नाबाद 1,शोएब सय्यद 3-51, व्यंकटेश काणे 3-71, ऋषिकेश सोनावणे 2-12) वि.एमसीए सेंट्रल झोन:

ब्रिलियंटस मैदान: पहिला डाव: एमसीए साऊथ झोन: 57 षटकात सर्वबाद 187धावा(अझहर अलगूर 56(78,6×4,3×6), ओंकार यादव 45(137), शिवराज माने 22(24), रोहन थोरात नाबाद 26(24), कन्हैया लड्डा 3-25, योगेश कारे 2-47, हार्दिक अडक 1-12, सोहम लेले 1-12) वि.ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी: 30.2 षटकात 9बाद 105धावा(राज अवतरामानी नाबाद 32(55), शुभ्र देवगुंडे 11(30), सोहम लेले 10(18), प्रतीक भुईम्बर 12(18), निखिल कदम 3-34, अझहर अलगूर 2-8, सुयश कुलकर्णी 2-20, बाळकृष्ण काशीद 2-22);

डीव्हीसीए मैदान: पहिला डाव: युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 43.5 षटकात सर्वबाद 171धावा(संदीप शिंदे 71(72,11×4,2×6), अद्वैय शिधये 22(42), सौरभ सिंग 21(46), प्रद्युम्न महाजन 12(15), सोहम जमाले 3-0, मनोज यादव 3-48, राहुल वारे 2-30) वि.डीव्हीसीए: 17. 1 षटकात 4 बाद 57धावा(आदित्य एकशिंगे 21(28), मिझान सय्यद नाबाद 14(27), हर्षवर्धन पवार नाबाद 2, आनंद ठेंगे 4-28)