पुणे:“बदलत्या काळानुसार विद्यापीठांनी आपली शैक्षणिक भूमिका बदलून वैश्विक शिक्षण देण्याची जबाबदारी स्विकारावी. त्यासाठी योग्य नियोजन आणि आराखडा तयार करावा. जेणे करुन विद्यार्थ्यांना ज्ञान, संशोधन, नवनर्मिती, प्रकल्प, नव्या कल्पनांच्या माध्यमातून सामाजिक विकास साधता येईल.”असे विचार हनी बी नेटवर्कचे संस्थापक प्रा.अनिल गुप्ता यांनी व्यक्त केले.
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज, युनाइटेड नेशन आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम विभागीय ऑनलाईन दोन दिवसीय कुलगुरूंची परिषद २०२१-२२ (तखउए उकअछउएङङजठडफ चएएढ २०२१-२२)च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी एआययूचे अध्यक्ष व चेन्नई येथील अमेटी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू कर्नल डॉ.जी. थिरूवसगम, महासचिव श्रीमती डॉ.पंकज मित्तल, महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस आणि कुलसचिव डॉ. प्रशांत दवे हे उपस्थित होते.
प्रा.अनिल गुप्ता म्हणाले,“नवकल्पना ही प्रगतीचे लक्षण असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना उंच भरारी घेता येते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देणे हे देशच्या विकासासाठी महत्वाचे असते. विद्यार्थ्यांचे प्रकल्प आणि संशोधन हे नाविण्यपूर्ण असावे. वेगवेगळ्या भाषेतील संशोधनांना संग्रहित करुन त्याचा उपयोग लोककल्याणासाठी करावा. विद्यार्थ्यांनी कौशल्यांना अद्यावत करुन जास्तीत जास्त भाषेचे ज्ञान अवगत करावे.”
तसेच, विद्यापीठांनी पाण्याची आवश्यकता ओळखून त्यासाठी वेगळे आर्थिक नियोजन करावे. पाण्याचा पुर्नवापर कसा करता येईल यावर संशोधन करावे. कोविड १९ नंतर अध्ययन क्षेत्राची मोठी हानी झाली. देशातील कित्येक खेड्यातील विद्यार्थ्यांनाकडे स्मार्ट फोन नसल्याने ते शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. घरो घरी ज्ञान गंगा पोहोचविण्यासाठी आपण कमी पडलो हे सत्य स्विकारावे. आता विद्यापीठांनी आपली भूमिका बदलून रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे नियोजन आखावे.”
कर्नल डॉ.जी. थिरूवसगम म्हणाले,“वातावरण बदल, गरीबी, भुक यासारख्या गोष्टी या शाश्वत विकासाच्या उद्दीष्टापुढील मोठे आव्हान असणार आहेत. समाजाला सदृढ जीवन आणि शांती स्थापन करणे ही सध्याच्या शिक्षणापुढील उद्दीष्ट्ये असावयास हवे. तांत्रिक कौशल्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जावे. त्यामध्ये मानवी मूल्य आणि शांतीचा समावेश अभ्यासक्रमात असायला हवा. देशातील हजारो विद्यापीठांनी रोजगारक्षम शिक्षण दयावे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ जगातील सर्व विद्यापीठांनी एकत्रित येऊन ग्लोबल मॅनेजिंग कॉन्सीलची स्थापना करणे गरजेचे आहे. उच्च शिक्षणात संशोधन व नवनिर्मितीवर भर देण्याची आवश्यकता आहे. समाजाला उपयोग होईल असे शिक्षण विद्यार्थ्यांना देणे ही विद्यापीठाची जवाबदारी आहे. ज्ञान आणि विज्ञानाच्या समन्वय होऊन समाजामध्ये सुख, समाधान आणि शांती नांदेल. त्याकरीता मुल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धतीचा अवलंब केल्यास सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडेल.”
डॉ. अभय वाघ म्हणाले,“ देशाला विकासाचा आकार देण्यासाठी उच्च शिक्षण खूप महत्वाचे आहे. वर्तमान काळात मातृभाषेतून शिक्षण देण्याची नवी पद्धत सुरू केल्यानंतर त्याला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी पॉलिटेक्नीकमध्ये १८० कॉलेजने सहभाग दर्शविला आहे. यामध्ये संशोधनाला अधिक प्रतिसाद देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. तसेच सामाजिक, आर्थिक व पर्यावरण गोष्टीवर अधिक भर दयावा. विद्यापीठांनी आधुनिक काळात डिजिटल, व्होकेशनल, संशोधन, भाषा आणि कला यावर भर दयावा.”
श्रीमती डॉ. पंकज मित्तल म्हणाल्या,“उच्च शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शाश्वत विकासाचे उद्दीष्टये पूर्ण करण्यासाठी औद्योगिकरण, रोजगार निर्मिती, शांतता, भागिदारी आणि समृद्धीला चालना द्यावी. या करीता ही कुलगुरूंची दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. याचा उपयोग विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना होईल.”
राहुल विश्वनाथ कराड यांनी आपले विचार मांडले.
या परिषदेला महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांनी या दिलेला संदेश डॉ. अभय वाघ यांनी वाचून दाखविला.
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व डॉ. प्रशांत दवे यांनी आभार मानले.
वैश्विक शिक्षण देण्याची जबाबदारी विद्यापीठांवर-प्रा. अनिल गुप्ता
बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करणार
मुंबई-राज्यातील बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
यानुसार बाजार समितीवर संचालक निवडून देण्यासाठी ज्या बहुउद्देशिय सहकारी संस्था त्यांच्या सदस्यांना पीक कर्ज वितरीत करतात त्यांनाच मतदानाचा अधिकार देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. बाजार समितीवर नियुक्त करावयाच्या अशासकीय प्रशासकीय मंडळाची संख्या ७ पेक्षा जास्त सदस्यांचे असणार नाही. बाजार समितीच्या बाजार आवारात नियमनात नसलेल्या शेतमाल व अन्य उत्पादनाच्या खरेदी-विक्रीवर बाजार समितीला उपयोगिता शुल्क (User charges) घेण्याचा हक्क असेल.
बाजार समितीवर देखरेख शुल्क वसुलीसाठी बाजार समितीवर शासनाचा कर्मचारी नियुक्त करण्याची तरतूद वगळण्यात येईल व देखरेख फी “५ पैसे” ऐवजी “१० पैसे” अशी सुधारणा प्रस्तावित आहे. बाजार समितीवर सचिव नियुक्त करण्यासाठी सद्याची राज्य पणन मंडळाने सचिव म्हणून नियुक्त करावयाच्या व्यक्तींची यादी तयार करण्याबाबतची तरतूद वगळण्यात येईल. बाजार समितीवर सचिव म्हणून सहकार अधिकारी श्रेणी-२ ह्या पेक्षा वरच्या दर्जाचा अधिकारी शासनाला नेमता येईल.
राज्य कृषि पणन मंडळास त्यांना देय रक्कमाबाबत वाद उद्भवल्यास न्यायाधिकरणाकडे दाद मागता येईल अशी सुधारणा करण्यात येईल.
कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाची स्थापना करणार
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागातंर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद या संस्थाचे विलीनीकरण करून महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या स्थापनेमुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींप्रमाणे शालेय शिक्षणासोबत कौशल्य शिक्षणाचे अभ्यासक्रम सुरू करता येणार आहेत. नॅशनल स्कील क्वॉलिफीकेशन फ्रेमवर्कवर आधारित कौशल्य विषय तसेच संस्थांनी तयार केलेले टेलर मेड प्रमाणपत्र स्वरुपाचे कौशल्य अभ्यासक्रम/विषय देखील संस्थांना सुरू करता येतील. जागतिकीकरणाच्या काळात आधुनिक तंत्रक्षेत्रे विचारात घेता कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याकरिता महाराष्ट्र राज्य कौशल्य,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे महत्त्वपूर्ण योगदान राहील.
स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांना इरादापत्रासाठी मुदतवाढ
कोविडमुळे स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांना इरादापत्रासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
इरादापत्रातील अटी व शर्तींची पूर्तता करू न शकल्यामुळे मार्च २०२० पासून पुढील एक वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांचे इरादापत्र कार्यान्वित होते त्यांना ९ महिन्यांचा भरपाई कालावधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मौजा वारंगा येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी वसतीगृह व निवासी इमारती
नागपूर जिल्ह्यातील मौजा वारंगा येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठीचे वसतीगृह व इतर निवासी इमारती बांधण्यासाठी ९५.१५ कोटी रुपये निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली
मौजा वारंगा येथे यासाठी 60 एकर जागा देण्यात आली असून या जागेवर विद्यापीठातील अधिकाऱ्यांची निवासस्थाने, मुलामुलींची वसतीगृहे, बँक, वाहनतळ आदी सुविधा उभारण्यात येतील.
कंपनी एकत्रिकरण, विलगीकरणाच्या दस्तांवर मुद्रांक शुल्क आकारण्याच्या अधिनियमात सुधारणा
कंपनी एकत्रिकरण तथा विलगीकरणाच्या अनुषंगाने होणाऱ्या दस्तांवर मुद्रांक शुल्काची आकारणी करण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
कंपनी एकत्रिकरण तथा विलगीकरणाच्या अनुषंगाने होणाऱ्या दस्तांवर तथा निर्गमित होणाऱ्या आदेशांवर मुद्रांक शुल्काची आकारणी करता यावी यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे. यामुळे अशा दस्तांवर देय होणाऱ्या मुद्रांक शुल्काची वसुली होऊन शासनाच्या महसूलामध्ये वाढ होणार आहे. याकरिता महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील संबंधित कलमांमध्ये व अनुच्छेदामध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.
लसीकरण वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
जगभर ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार, मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता
मुंबई-ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून गेल्या 12 तासात संपूर्ण जगात ओमायक्रॉनच्या रुग्णात 45 टक्के वाढ झाली असून 54 देशात याचा प्रसार झाला आहे. त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण देखील वेगाने वाढले पाहिजे, यादृष्टीने जेथे लसीकरण कमी आहे तिथे ते वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
महाराष्ट्राने सध्या 12 कोटीं 3 लाख 18 हजार 240 डोसेस दिले असून 4 कोटी 37 लाख 46 हजार 512 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. 7 कोटी 65 लाख 71 हजार 728 लोकांनी एक डोस घेतला आहे.
18 ते 44 वयोगटात 76.69 लोकांनी कमीत कमी 1 डोस तर 45 पेक्षा अधिक वयोगटातील 85.25 टक्के लोकांनी एक डोस घेतलेला आहे.
गेल्या 12 तासात संपूर्ण जगात ओमायक्रॉनच्या रुग्णात 45 टक्के वाढ झाली असून 54 देशात याचा प्रसार झाला आहे.
फ्रान्समध्ये दैनंदिन रुग्ण 40 हजारच्या पुढे आढळत असून जर्मनीत ही संख्या 50 हजाराच्या आसपास आहे. ऑस्ट्रीयामध्ये देखील कोविड सुरु झाल्यापासून सगळ्यात मोठी लाट आली असून दररोज 7 हजारच्या आसपास नवीन रुग्ण आढळत आहेत.
अमेरिकेत देखील नोव्हेंबर 2020 सारखी परिस्थिती उद्भवली असून दररोज एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. दक्षिण आफ्रिकेत गेल्या 2 आठवड्यात नवीन रुग्णात मोठी वाढ झाली असून दररोज दुपटीने रुग्ण आढळत आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील काळजी घेण्याची गरज असून आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळले गेलेच पाहिजे यावर भर देण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये इंटर्नशिप
मुंबई-राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150 विद्यार्थ्यांना एक वर्ष कालावधीसाठी विद्यावेतनावर इंटर्न म्हणून घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था कार्यरत आहेत. तेथे बी. एस्सी व एम. एस्सी (फॉरेन्सिक सायन्स) पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने शासकीय न्यायसहायक विज्ञानसंस्था व न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्यामध्ये समन्वय निर्माण करून प्रतिवर्षी न्यायसहायक विज्ञान संस्थांमधील पदवी व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण 150 विद्यार्थ्यांना इंटर्नशिप उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना एका वर्षाच्या इंटर्नशिप कालावधीत प्रतिमाह अनुक्रमे प्रत्येकी दहा हजार व पंधरा हजार विद्यावेतन देण्यात येणार आहे. राज्यातील तीन न्यायसहायक विज्ञान संस्थाकडून दरवर्षी विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात येईल. महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) यांच्या नियंत्रणाखाली हे विद्यार्थी राहतील.
इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या विद्यार्थाना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक सहायक (गट-क) व वैज्ञानिक सहायक (सायबर गुन्हे व तासी) (गट-क) या पदासाठी नेमून दिलेली कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडणे आवश्यक असेल. यशस्वीरीत्या इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाकडून प्रमाणपत्र देण्यात येईल.
राज्यात बैलगाडी शर्यत सुरु होणारच – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार
मुंबई,दि. 7 : राज्यातील बैलगाडी शर्यतीस प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. बैलगाड्या शर्यती हा राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. राज्यात या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून राज्यात बैलगाड्या शर्यत सुरु होणार आसल्याचा विश्वास पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्यातील बैलगाडी शर्यत सुरू व्हावी याकरिता शासन प्रयत्नशील असून याबाबत सुरुवातीपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. सन 2014 पासून बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. तत्कालीन सरकारने त्यासंदर्भात 2017 मध्ये कायदा लागू केला. परंतु पाठपुराव्याअभावी 2017-2018 पासुन आजवर कोणतीही ठोस सकारात्मक घटना यादरम्यान झाली नाही आणि शर्यती बंदच राहिल्या.
ऑगस्ट 2020 मध्ये बैलगाडा चालक,शेतकरी,पशुपालक आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली आणि या विषयास पुन्हा चालना मिळाली. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याबरोबर यावर्षी पुन्हा प्रयत्न सुरू करण्यात आले. यासाठी दि.24 ऑगस्ट 2021 रोजी सर्व बैलगाडा मालक,पशुपालक यांची मंत्रालयाच्या प्रांगणात बैठक घेण्यात आली.
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या पाठपुराव्याला यश
बैलगाडा शर्यतीसंदर्भात वरिष्ठ अधिवक्ता आणि राज्य शासनाचे वकील यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यासाठी श्री. केदार यांनी दिल्लीत वारंवार बैठका घेऊन यासंदर्भात पाठपुरावा केला. राज्यात बैलगाड्या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन प्रयत्न केले.
श्री.केदार यांनी राज्याचे महाधिवक्ता श्री. आशुतोष कुंभकोणी यांचेशी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात दोन वेळा भेट घेऊन चर्चा केली. आणि सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करण्याबाबत नियोजन केले. सप्टेंबर-ऑक्टोंबर या महिन्यात 22 पेक्षा जास्त वेळा सर्वोच्च न्यायालयात Mentioning केले. वरिष्ठ अधिवक्ता शेखर नाफडे यांनी मुख्य न्यायाधीशांचे समक्ष दाद मागितली व इतर राज्यात शर्यती सुरू आहेत व महाराष्ट्रात बंद आहेत अशा अन्यायकारक निर्णयास स्थगिती देण्याबाबत विनंती केली.
श्री.केदार यांनी वरिष्ठ अधिवक्ता शेखर नाफडे यांच्या दि. 13 नोव्हेंबर 2021 व दि. 14 नोव्हेंबर 2021 रोजी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेतली. दि 14 नोव्हेंबर 2021 रोजी वरिष्ठ अधिवक्ता मुकूल रोहतगी यांचेशी चर्चा केली. यावेळी राज्याचे अधिवक्ता सचिन पाटील यांचेशी देखील चर्चा करून त्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले.
या सर्व प्रयत्नांची फलश्रृती म्हणून सर्वोच्च न्यायालयाने 4 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच दि. 29 नोव्हेंबर 2021 रोजी सुनावणी घेतली. न्यायालयीन प्रक्रियेनुसार न्यायालयाने सर्व संबंधीत प्रभावीत राज्याचे म्हणणे ऐकून घेण्याचे निर्देश दिले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबीत असलेल्या जनहित याचिकेस सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली. जेणेकरून यावर अंतरीम निर्णय घेता येवु शकेल.
या प्रकरणाची दुसरी सुनावणी 6 डिसेंबर रोजी झाली. यावेळी मागील सुनावणी दरम्यान तामिळनाडू व कर्नाटकचे वकील हजर होते. न्यायालयाने यावेळी सर्व प्रभावित राज्याचे म्हणणे ऐकून घेतले व स्पष्ट केले की त्या राज्यांच्या अंतर्गत आदेशामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. परंतु याचवेळी PETA या संस्थेने काही मुद्दे उपस्थित केले असल्याने त्यांचेही म्हणणे ऐकून घेण्याबाबत आणखी एक सुनावणी घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत.
श्री.केदार म्हणाले, यासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया 4 वर्ष प्रलंबित व बंद पडलेली होती. ती या शासनाने सुरू केली. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय येईल, असा विश्वास वाटतो. बैलगाडी मालक व पशुपालक सुजाण असून त्यांनी पोकळ भुलथापांना बळी पडू नये,असे अवाहनही श्री.केदार यांनी केले.
राज्यात ५०५१ कोटींचे गुंतवणूक करार; ९ हजार जणांना नोकरीची नवी संधी – उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई, दि. ७ : दुबई वर्ल्ड एक्स्पोच्या अभूतपूर्व यशानंतर उद्योग विभागाने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा वेग कायम ठेवला असून विविध १२ कंपन्यांसोबत सुमारे ५०५१ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन व विविध कंपन्यांचे उद्योजक यावेळी उपस्थित होते.
या निमित्ताने मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० या उपक्रमांतर्गत एकूण १.८८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करून ३ लाख ३४ हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध करण्यात राज्य यशस्वी ठरल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नमूद केले. झालेल्या १२ सामंजस्य करारातून राज्यात ९००० पेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण होतील, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला.
गुंतवणूक करार पूर्णत्वास येण्यासाठी उद्योग विभागाने कंबर कसली आहे. या गुंतवणुकीद्वारे राज्याचा सर्वांगिण औद्योगिक विकास साधण्यात येणार आहे. या करारातून संरक्षण, अंतराळ संशोधन, माहिती-तंत्रज्ञान, जैव-इंधन, इलेक्ट्रीक वाहन निर्मिती, निर्यात प्रधान उद्योग, अन्न प्रक्रिया, स्टील, इथेनॉल, औषध निर्माण आदी क्षेत्राला चालना मिळणार आहे. या गुंतवणूकदारांमध्ये ग्रासिम इंडस्ट्रिज, सोलार एव्हीएशन, पद्मावती पेपर्स, देश ॲग्रो, डी डेकॉर या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.
अनेक दशकांपासून महाराष्ट्र राज्य औद्योगिकरणात आघाडीवर आहे. राज्याने आपल्या पायाभूत सुविधांचा वेग वाढविला असून शासनाच्या कृतिशील धोरणामुळे आणि प्रगतीशील दृष्टिकोनामुळे कोरोना काळातही राज्यात औद्योगिक गुंतवणूकीचा ओघ सतत वाढता ठेवला आहे, असे श्री. देसाई म्हणाले.
या सामंजस्य कराराच्या निमित्ताने राज्यात धोरणात्मक गुंतवणुकीद्वारे रोजगाराच्या संधींना बळकटी देण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना यश येत असून त्यात सातत्य ठेवण्याचा उद्योग विभागाचा प्रयत्न असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.
झालेले सामंजस्य करार :-
( कंपनी,सेक्टर,ठिकाण,गुंतवणूक,रोजगार या क्रमाने )ग्राझिम इंडस्ट्रिज लिमिटेड, केमिकल, महाड, १०४०, ५००. एसएमडब्लू प्रा. लि., अलॉय स्टील, देवळाली, १५८२, १५००. गॅँट क्यू स्टील, इंजिनिअरिंग, सुपा, १२५, १३०. सोलर एव्हीएशन प्रा. लि., सोलर, नवी मुंबई, ५००, ४५००. डागा ग्लोबल केमिकल प्रा. केमिकल, अति. कुरकुंभ, १४२, ३९०, पद्मावती पल्प अँड पेपर्स क्राफ्ट पेपर्स, अति. अंबरनाथ, २००, ४००. वंसुधरा ब्रदर्स प्रा, लि., मेडिकल, ऑक्सिजन, अति. लोटे परशुराम, १३२, ११५. एअर लिक्विड, फ्रान्स, ऑक्सिजन, बुटीबोरी १२०, ५०. सुफलाम इंडिस्टिज प्रा., इथेनॉल निर्मिती, देवरी ४००, ४००. एलजी बालकृष्णन, अँड ब्रदर्स प्रा. लि., ऑटोमोबाईल, अति. बुटीबोरी ३६०, ५००. देश ऍग्रो प्रा. लि., अन्न व प्रक्रिया, अति. लातूर, २००, १६०. डी डेकॉर एक्सपोर्ट्स, टेक्सटाइल्स, तारापूर, २५०, ६००
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा – भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी
पुणे-सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला असला तरी या निर्णयामुळे गंभीर पेच निर्माण होणार असून आयोगाने ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सर्वच जागांवरील निवडणूक रद्द केली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी केली.
आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे की, ओबीसींच्या आरक्षित जागा वगळून अन्य जागांवरील निवडणूक घेता येईल. पण न्यायालयाने ही निवडणूक घेतलीच पाहिजे असे काही म्हटलेले नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या २७ टक्के जागा वगळून ऊर्वरित ७३ टक्के जागांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेऊ नये. अशा निर्णयामुळे केवळ सामाजिकच नाही तर गंभीर राजकीय पेच निर्माण होत आहे. आयोगाने सर्वच निवडणूक प्रक्रिया रद्द करावी.
त्यांनी सांगितले की, एखाद्या नगरपंचायतीमधील एकूण १७ जागांपैकी ओबीसी आरक्षित पाच जागांची निवडणूक वगळून ऊर्वरित १२ जागांची निवडणूक घेतली तर त्या बारा नगरसेवकांकडूनच नगराध्यक्ष निवडला जाईल. अर्थात शहरातील पाच वॉर्डातील मतदारांना त्यामध्ये काहीच भूमिका असणार नाही. एकूण सदस्य संख्येच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी सदस्य उपलब्ध असल्यास अशा प्रकारे नगराध्यक्ष किंवा त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रमुख निवडण्यास कितपत कायदेशीर वैधता राहील याबाबतही शंका आहे.
ओबीसींच्या जागा वगळून निवडणूक घेतली तर ओबीसी आरक्षणाचा निर्णय होऊन त्या जागांवर कधी निवडणूक होणार याबद्दलही अनिश्चितता आहे. एकूण या बाबी ध्यानात घेता निवडणूक आयोगाने राज्यात सध्या चालू असलेली सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, असेही ते म्हणाले.
ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ नयेत !: नाना पटोले
ओबीसी आरक्षणासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटणार
आरक्षणासंदर्भातील आरएससची भूमिका भाजपाने आधी स्पष्ट करावी.
मुंबई, दि. ७ डिसेंबर २०२१-
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ नयेत हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकले पाहिजे यासाठी सर्वपक्षीय बैठक झाली होती. या बैठकीतच आरक्षण टिकावे यावर चर्चा होऊन ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण ठेऊन निवडणुका घ्याव्यात व त्याबाबतचा अध्यादेश काढण्याचा निर्णय झाला. या अध्यादेशाला आगामी अधिवेशनात कायद्याचे स्वरुप द्यावे असा निर्णय झाला. सुप्रीम कोर्टाने अध्यादेशाला स्थगिती दिली आहे, यावरील पुढील सुनावणी १३ तारखेला होत असून त्यावेळी राज्य सरकार आपली भूमिका मांडेल आणि त्यातून निश्चित मार्ग निघेल असे आम्हाला वाटते.
ओबीसींच्या आरक्षणाचा गुंता तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमुळेच वाढला आहे. भाजपाची याबद्दलची दुट्टपी भूमिका आहे. एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समान नागरी कायद्यासाठी आग्रही आहे तर दुसरीकडे भाजपा ओबीसींच्या आरक्षणासाठी लढत आहे असे दाखवून लोकांची दिशाभूल करत आहे. भाजपा व आरएसएस यांचा अजेंडाच मुळात आरक्षण संपवण्याचा आहे. आरएसएसची आरक्षणाबद्दलची भूमिका आधी भाजपाने स्पष्ट करावी व मग आंदोलनाबदद्ल त्यांनी बोलावे. त्यांचा छुपा अजेंडा सर्वांना माहित आहे, त्यांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे. भाजपा बहुजनांची दिशाभूल करत आहे. काँग्रेस सुरुवातीपासूनच आरक्षणाच्या बाजूने आहे आणि ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत हीच काँग्रेसची भुमिका आहे, असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
कन्हैयाकुमार यांच्या हस्ते गुरुवारी सेवा-त्याग-कर्तव्य सप्ताहाचा समारोप
पुणे : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सतराव्या सेवा-त्याग-कर्तव्य सप्ताहाचा समारोप गुरुवार, दि. ९ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे युवा नेता कन्हैयाकुमार यांच्या हस्ते होणार आहे. लोकशाही बचाव सभा असून, या सभेला कन्हैयाकुमार मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पटोले, तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सप्ताहाचे संयोजक मोहन जोशी आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी दत्ता बहिरट, प्रशांत सुरसे उपस्थित होते.
मोहन जोशी म्हणाले, ” सोनिया गांधी यांची त्यागवृत्ती कायमच प्रेरणा देणारी आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून २००४ सालापासून सेवा-त्याग-कर्तव्य सप्ताह आयोजित केला जातो. विविध सामाजिक कार्यक्रम यामध्ये होतात. यंदा महागाईवरील रांगोळी स्पर्धा, बालअत्याचारविरोधी जागृती, १९७१ च्या युद्धातील वीरांचा, वीरमाता आणि वीरपत्नींचा सन्मान, मान्यवरांचे व्याख्यान, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ज्येष्ठांचा सन्मान, महाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, क्रीडा स्पर्धा, प्रदर्शने आदी विशेष कार्यक्रम झाले आहेत.”
समारोप कार्यक्रमाला बहुसंख्येने कार्यकर्ते, नागरिक उपस्थित राहणार असल्याने होणारी गर्दी लक्षात घेता नदीपात्रात गाड्यांच्या पार्कींगची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच कोविड प्रतिबंधक निर्बंधांचे पालन करत हे सर्व कार्यक्रम पार पडत आहेत, असे मोहन जोशी यांनी स्पष्ट केले.
जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि.7 : जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीने कामकाजाला गती देऊन राज्यात जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री यांच्या समिती कक्षात ‘जादूटोणा विरोधी कायदा’ प्रभावीपणे राबविण्याबाबत बैठक पार पडली.या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, वित्तीय सुधारणाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, सामाजिक न्याय विभागाच्या अप्पर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे, उपसचिव नियोजन श्री.भांडारकर, विधी व न्यायच्या उपसचिव सुप्रिया धावरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) गणेश रामदासी, जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार समितीचे सहअध्यक्ष प्रा.श्याम मानव, शशिकांत गमरे, मधुकर कांबळे यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,नरबळी आणि इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांनी प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत 2013 मध्ये हा अधिनियम संमत करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे.राज्यात’जादुटोणा विरोधी कायद्याची’प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.या कायद्याची अंमलबजावणी करणा-या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी प्रभावीपणे काम करावे. आजही अंधश्रध्देमुळे अनेक गरीब, असहाय्य लोकांची फसवणूक होत असते अशा लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे,जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीचे गठन करण्याबाबत सामाजिक न्याय विभागाने कार्यवाही करावी.गृह विभागाने आलेल्या तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करावी.प्रा.श्याम मानव यांनी केलेल्या सूचनांबाबत शासन सकारात्मक असून राज्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून सर्व निर्णय घेण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
जादूटोणा विरोधी कायद्याच्या समित्यांचे पुनर्गठन लवकरच करणार :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे म्हणाले,जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीचे पुनर्गठन करण्यात येईल.या कायद्याची माहिती तसेच जनजागृती करणे तसेच जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांच्याशी चर्चा करून त्यांनी विभागासंदर्भात मांडलेल्या मुद्यांबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही यावेळी मंत्री श्री. मुंडे यांनी दिली. या कायद्याच्या प्रचारामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारा,मानवता जोपसणारा,समता -बंधुता-स्वातंत्र्य या मूल्यांना स्वीकारणारा समाज निर्माण होण्यास मदत होईल असेही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार समितीचे सहअध्यक्ष प्रा.श्याम मानव यांनी जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीचे पुर्नगठन,या समितीने पहिल्या टप्प्यात केलेली कामे,समितीच्या कामकाजासाठी शासनाकडून वित्त,गृह,महसूल,सामाजिक न्याय विभाग,विधी व न्याय विभाग,माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या जबाबदाऱ्या या संदर्भात सविस्तर सूचना बैठकीत केल्या.
संभाजी पुलावरून जाणाऱ्या गणेश मंडळांना ठेवावे लागणार उंचीचे भान – मेट्रोचे पूर्वीप्रमाणेच काम सुरु
- वर खाली होणारा हायड्रोलिक मेट्रो मार्ग करण्याचा पर्याय व्यवहारी नसल्याचा दावा
पुणे-छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या कामासाठी गणेशोत्सव मंडळांनी आणि मेट्रोने सुचवलेले पर्याय व्यवहार्य नसल्याचा अहवाल मेट्रो तांत्रिक तज्ञांकडून प्राप्त झाला असून यापेक्षा अधिक काळ मेट्रोचे काम बंद ठेवणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने उचित नाही. म्हणूनच मेट्रोचे काम पुन्हा सुरु केले असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
ते म्हणाले,’गणेश विसर्जन मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रो मार्ग अडथळा ठरेल, असा आक्षेप काही गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. त्यावर मेट्रोचे काम थांबवून महापौर मोहोळ यांनी गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते, मेट्रो अधिकारी आणि तज्ञांच्या तीन बैठका घेतल्या होत्या. शिवाय महापौर मोहोळ यांनी कार्यकर्त्यांकडून पर्यायही मागवला होता. या पर्यायांचा अभ्यास मेट्रोने अभ्यास केल्यानंतर मेट्रोने सुचविलेले दोन्ही पर्यायही व्यवहार्य नसल्याचा निष्कर्ष निघाला होता. त्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी काम सुरु करण्यास सांगितले आहे.
याबाबत महापौर मोहोळ म्हणाले, ‘विकासाची कामे करत असताना संस्कृती जपणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहेच. मीही स्वतः आधी गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्त्या आणि नंतर लोकप्रतिनिधी आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाने आजवर समाजभान जपत झालेले बदल स्वीकारले. काळानुरूप बदलत, परंपराही जपत पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाने जगाच्या नकाशावर छाप उमटवली. मेट्रोच्या अर्थात शहर विकासाच्या मुद्द्यावरही कार्यकर्ते साथ देत मेट्रोच्या कामाला साथ देऊन पुण्याच्या प्रगतीचे साक्षीदार होतील.’
गणेशोत्सव मंडळांनी दिलेल्या पर्यायात मेट्रो मार्ग खंडित करण्याचा पर्याय होता. मात्र देशभरातील कोणत्याही मेट्रोने असा पर्याय कुठेही अवलंबला गेला नाही. याबाबत मेट्रो मार्ग सलग ठेवण्याची मेट्रोची भूमिका होती. तर मेट्रोने सुचवलेल्या पहिल्या पर्यायानुसार पुलाच्या आजूबाजूचे ३९ पिलर पाडून नव्याने बांधावे लागणार होते. त्यासाठी ७० कोटी रुपयांचा खर्च आणि २४ महिन्यांचा अतिरिक्त कालावधी लागणार होता. दुसऱ्या पर्यायानुसार १७ पिलर पाडून नव्याने बांधणे हाही होता. त्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी आणि २३ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च होणार होता. त्यामुळे व्यावहारिक विचार करता आणि कामाची सद्यस्थिती लक्षात घेता दोन्ही पर्याय योग्य नसल्याचे मेट्रोच्या तांत्रिक तज्ज्ञांचे म्हणणे होते. या सर्व बाबी लक्षात घेता, आहे त्या परिस्थितीत काम सुरु करण्याचा पर्याय अधिक योग्य वाटला’, असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.
इम्पेरीकल डेटाचा बाऊ करून ओबीसी आरक्षणापासून दूर पळण्याचा सरकारचा प्रयत्न – प्रविण दरेकर
सोलापूर, दि. ७ डिसेंबर – सत्ताधारी पक्षाकडून दुसरी अपेक्षाच करता येत नाही. इतर राज्यांमध्ये इम्पेरीकल डेटा केंद्र सरकारने दिला का? इम्पेरीकल डेटासंबंधी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मागितला होता त्याचे काय उत्तर आलेय ते नाना पटोले यांनी वाचावे. सरकार ही संस्था आहे. त्यांनी त्या वेळेला उत्तर दिले आहे. मग आता उत्तर कसे बदलेल? आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना डेटा मिळण्यात अडचणी होत्या. आता डेटाचा बाऊ करून ओबीसी आरक्षण देण्याच्या विषयापासून दूर पळण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.
प्रसारमा ध्यमाशी बोलताना दरेकर म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सरकारसोबत सर्व विरोधी पक्ष आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाला आरक्षण देण्याच्या सर्व भूमिकांशी सरकार सहमत आहे. शेवटी निवडणुका हा विषय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतो. म्हणून निवडणुका पुढे ढकलायच्या आणि त्या किती पुढे ढकलायच्या याचा सर्वस्वी निर्णय आयोग घेईल, असे मतही दरेकर यांनी व्यक्त केले.
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती
मुंबई, दि. 7 : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 21 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
श्री. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांच्या अधीन राहूनच या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या.
सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानंतर आता या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या आहेत; परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरू राहील. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जागांच्या स्थगित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री. मदान यांनी सांगितले.
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा
भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद- 23 (एकूण जागा 105)
· भंडारा व गोंदियातील 15 पंचायत समित्या- 45 (एकूण जागा 210)
· राज्यातील 106 नगरपंचायती- 344 (एकूण जागा 1,802)
· महानगरपालिका पोटनिवडणुका- 1 (एकूण 4 जागा)
चित्रपट प्रवाही असणं महत्त्वाचं
पुणे, दि. ७ डिसेंबर, २०२१ : दोन सीन असो किंवा कथा, चित्रपट प्रवाही असेल तर प्रेक्षक खिळून राहतोच मात्र त्याही पलीकडे तो ख-या अर्थाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचत दिग्दर्शक काय म्हणतोय हे सांगण्याचा प्रयत्न करतो, असे विचार ‘कँडिड टॉक्स’ या कार्यक्रमात मांडले गेले.
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्यावतीने सुरू असलेल्या १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे ‘कँडिड टॉक्स’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कलात्मक संचालक समर नखाते यांनी आज ‘पोरगा मजेतंय’, ‘मेफ्लाय’, ‘गोदाकाठ’, ‘गॉड ऑन द बाल्कनी’, ‘फिरस्त्या’ या चित्रपटांच्या टीमशी संवाद साधला.
‘पोरगा मजेतंय’‘या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने, कलाकार शशांक शेंडे, ‘मेफ्लाय’ चित्रपटाचे दिग्दर्शक किरण निर्मल, अभिनेते विठ्ठल जोगदंड, निर्माते स्वप्नील कोल्हे, ‘गोदाकाठ’ या चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, अभिनेत्री मृण्मयी गोडबोले, निर्माते कृष्णा सोरेन, ‘गॉड ऑन द बाल्कनी’चे दिग्दर्शक बिस्वजीत बोरा, ‘फिरस्त्या’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विठ्ठल भोसले, अभिनेते हरीश बारस्कर, समर्थ जाधव, सिनेमॅटोग्राफर गिरीश जांभळीकर व निर्मात्या डॉ. स्वप्ना भोसले आदी उपस्थित होते.
कोविड काळात आलेली अनिश्चितता, त्यातून बाहेर पडू की नाही याची आंतरिक भीती, धडपड हे एके बाजूला अनुभवीत असताना व्यक्त होण्याची व डोक्यातील कथा मांडण्याची संधी ‘पोरगं मजेतंय’ या चित्रपटाने आम्हाला दिली. असे सांगत चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने म्हणाले, “मुलगा वडील या नात्यातील धागा दाखविण्याचा प्रयत्न या चित्रपटात आम्ही केला आहे. आयुष्यातील प्रवासाद्वारे चित्रपटातील प्रवाहीपणा अधोरेखित केला असून निसर्ग आणि मानवी भावना यांचा मिलाफ साधत एक कथा गुंफण्याचा आणि ती प्रेक्षकांसमोर आणण्याचा हा आमचा प्रयत्न आहे.”
चित्रपटाच्या लेखनापासून सहभागी होण्याचे प्रिव्हिलेज दिग्दर्शकाने मला दिल्याने एक प्रकारची लक्झरी एक अभिनेता म्हणून माझ्या वाट्याला आली. ‘पिफ’मध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर डोकं मोकळं झाल्याची भावना आता अनुभवीत आहोत, असे अभिनेते शशांक शेंडे यांनी आवर्जून सांगितले.
‘मेफ्लाय’ हे एका किड्याचे नाव असून त्याची जीवनयात्रा केवळ २४ तास इतकीच असते, हेच रूपक घेत कथेतील नायकाचा घर सोडून बाहेर गेल्यानंतरचा प्रवास, त्याच्या मनातील हिंदोळा, आठवणींचा पट उलगडण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिग्दर्शक किरण निर्मल यांनी सांगितले.
नदीचा प्रवाह जसा प्रवाही असतो तसे दोन व्यक्तींचे जीवनही प्रवाही असते. प्रीती आणि सदानंद या दोन व्यक्तीरेखांचा प्रवास दाखविण्याचा प्रयत्न ‘गोदाकाठ’ या चित्रपटात केलेला आहे. चित्रपट करताना घाई नव्हती आम्ही आमचा वेळ घेऊन चित्रपट चित्रित केला. चित्रपटात प्रत्येक ऋतु दाखवायचे असल्याने आम्ही तो वेळ चित्रपटाला दिला, असे गजेंद्र अहिरे यांनी सांगितले. पुरेसा वेळ दिल्याने चित्रपट निर्मितीची प्रक्रिया आम्ही ख-या अर्थाने एन्जॉय केली. व्यक्तीरेखा जगण्याचा प्रयत्न केला, असे अभिनेत्री मृण्मयी गोडबोले हिने नमूद केले.
आसाममधील एका गावात राहणा-या खगेन या नायकाची बायको नुमली जंगली हत्तींच्या हल्ल्यात जखमी होते व तिचा रुग्णालयात मृत्यू होती. तिचा मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खगेन आपल्या दुचाकीवर मृतदेह नेत असताना दोन पत्रकार ते पाहतात आणि पुढील कथा घडते अशी ‘गॉड ऑन द बाल्कनी’ या आसामी चित्रपटाची कथा असून दिग्दर्शक बिस्वजीत बोरा म्हणाले, “माध्यमांचा चेहरा दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. माध्यमे आपल्या दु:खाचा जो काही बाजार मांडत आहेत हे नायकाला नकोसे होते. यातून सामान्यांची अवस्था दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.” चित्रपटाची कथा लिहिताना अभिनेता सुनील शेट्टी याला आवडली होती. मात्र पुढे जेव्हा ती पूर्ण झाली तेव्हा मला माझ्या आसाममधील नायक समोर आला. केवळ कथेला समर्पक नायक असावा या उद्देशाने मी आसाममधील नायक निवडला, अशी आठवण देखील बोरा यांनी सांगितली.
आर्थिक व सामाजिकरित्या खालच्या स्तरातील नायक, निरक्षर मात्र तरीही दूरदृष्टी असलेले त्याचे वडील यांची आणि मुलाच्या प्रेरणादायी प्रवासाची कथा ‘फिरस्त्या’ या चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक विठ्ठल भोसले यांनी दिली.
नायकाची परिस्थितीला संयमाने सामोरे जातानाची वाटचाल यामध्ये पहायला मिळते. स्वत:चा संघर्ष डोळ्यासमोर ठेवत ही कथा लिहिली. मात्र दृश्य माध्यमातून ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल या विचाराने चित्रपट तयार केला असे सांगत भोसले म्हणाले, “व्यक्तीरेखा साकारणा-या योग्य चेह-याच्या शोधात मी होतो. मुख्य भूमिकेतील अभिनेत्रीसाठी तर खूप शोध घेतला. शेवटी जशी हवी होती तशी व्यक्तीरेखा साकारणारे कलाकार जोडले गेले याचा आनंद आहे.” चित्रपट करताना घरच्यांची समर्पक साथ ही महत्वाची असते असेही भोसले यांनी सांगितले.
राष्ट्रपतींची हवाई दलाच्या पुणे तळाला भेट
पुणे, 7 डिसेंबर 2021
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव’ निमित्त 7 डिसेंबर 21 रोजी, पुणे येथील हवाई दलाच्या तळाला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि श्रीमती सविता कोविंद यांचे आदरातिथ्य करण्याचा विशेष सन्मान प्राप्त झाला.

हवाई तळावर आगमन झाल्यानंतर ,दक्षिण पश्चिम हवाई दल कमांडचे हवाई दल अधिकारी कमांडिंग इन चीफ एअर मार्शल विक्रम सिंग आणि दक्षिण पश्चिम हवाई दल कमांडच्या हवाई दल पत्नी कल्याण संघटना (प्रादेशिक) च्या अध्यक्ष डॉ. (श्रीमती) आरती सिंग यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर,पुणे हवाई दल तळाचे दल अधिकारी कमांडिंग एअर कमोडोर एच असुदानी हे राष्ट्रपतींना संचलनाची पाहणी करण्यासाठी घेऊन गेले. या संचलनामध्ये एसयू-30 एमकेआय विमान आणि ‘मेड इन इंडिया’ आकाश क्षेपणास्त्र प्रणालीचा समावेश होता. माननीय राष्ट्रपतींनी मोठ्या संख्येने लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरचा समावेश असलेल्या चित्तथरारक हवाई कसरती पाहिल्या. ‘भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे’ दर्शविणारा ’75’ हा आकडा पुण्याच्या आकाशात साकारणारा जॅग्वार विमानाचा फ्लाय पास्ट हे हवाई कसरतींचे वैशिष्ट्य होते.
राष्ट्रपतींनी अत्याधुनिक एसयू -30 एमकेआय विमानाच्या सिम्युलेटरमधून ‘उड्डाण’केले आणि त्यांना लढाऊ विमानाची असामान्य क्षमता दाखवण्यात आली.हवाई तळावरून प्रस्थान करण्यापूर्वी, त्यांनी पुण्यातील हवाई दल तळाचा आढावा घेतला आणि हवाई कसरतींमध्ये सहभागी झालेल्या विमान दलातील सदस्यांशी आणि हवाई दलातील योद्ध्यांशी संवाद साधला.
