Home Blog Page 2185

प्रभावी जनसंपर्कासाठी नवमाध्यमांची ओळख गरजेची : माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर

0

पुणे दि. 8 : जनसंपर्कातील नव्या प्रवाहांचे ज्ञान सातत्याने अद्ययावत करणे आवश्यक असून शासकीय योजना, धोरण आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करावा असे आवाहन पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांनी केले.

‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ अंतर्गत विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय पुणेच्या संयुक्त विद्यमाने विभागीय माहिती कार्यालय पुणे तसेच पुणे व सातारा जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित ‘समाज माध्यम कार्यशाळे’च्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते.

डॉ. पाटोदकर पुढे म्हणाले, शासनाचे प्रसिद्धी आणि जनसंपर्काचे माध्यम म्हणून काम करताना माहिती व जनसंपर्क विभागाला बातमीची विश्वासार्हता, अचूकता जपत ती वेगानेही माध्यमांकडे पाठवण्याचे भान राखावे लागते. वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि आता समाजमाध्यमाद्वारे संदेशवहन वेगाने होते. एखादी बातमी, संदेश लक्ष्याधारित (फोकस्ड) पद्धतीने पोहोचवायचा असेल तर त्यासाठी समाजमाध्यमांमधील बारकावे शिकून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल असे डॉ. पाटोदकर म्हणाले.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी उपस्थितांना ट्वीटर, फेसबुक, कू या समाजमाध्यमांबाबत तपशीलवार माहिती दिली. प्रास्ताविक माहिती अधिकारी सचिन गाढवे यांनी तर आभारप्रदर्शन माहिती सहायक गीतांजली अवचट यांनी केले. या कार्यशाळेस माहिती सहायक रोहिदास गावडे यांच्यासह सुहास सत्वधर, मिलिंद भिंगारे, सचिन बहुलेकर, जयश्री रांगणेकर, वैभव जाधव, राहूल पवार, विशाल कार्लेकर, सुजीत भिसे, वर्षा कोडलिंगे, सुमेध मनोर आदी उपस्थित होते.

दुर्देवी, विषण्ण करणारी दुर्घटना- मुख्यमंत्री ठाकरे

0

पुणे-भारताच्या तिन्ही दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या आणि हेलिकॉप्टर मधी त्यांच्या सहकाऱ्यांच्या निधनाने राष्ट्रपती,पंतप्रधानांपासून विविध स्तरावरून दुखः व्यक्त करण्यात येत आहे .महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे कि,’भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आज आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. या अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची माहिती कळल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. ते यातून वाचतील असे सारखे वाटत होते पण शेवटी ती  दुर्दैवी बातमी आलीच. अनेक आघाड्यांवर शौर्याने आणि धडाडीने नेतृत्व करणाऱ्या संरक्षण दलाच्या प्रमुखांचा त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत असा मृत्यू होणं नियतीलाही मान्य असणार नाही. मी जनरल रावत आणि त्यांची पत्नी तसेच अन्य लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळं खूप व्यथित झालो आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या कुटुंबियांप्रतिही मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे. ही दुर्घटना अत्यंत विषण्ण करणारी, दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात.

आपल्या शोक संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, भारताचे संरक्षण दल हे सुसज्ज आणि बलशाली आहे. या तीनही दलांचे असे संयुक्त प्रमुखपद भूषवण्याचा पहिला गौरवही दिवंगत जनरल रावत यांना मिळाला. त्यांची कारकिर्दही त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि पदाला साजेशीच अशी होती. संरक्षण दलाला तडफदार आणि सर्व आघाड्यांवर ठसा उमटविलेल्या अनुभवी असे नेतृत्व मिळाल्याने आपल्या तीनही दलांचे मनोबल उंचावले होते,  त्याचे प्रत्यंतरही अलिकडच्या तीनही दलांच्या कामगिरीतून दिसत होते.
दुर्घटनेत दिवंगत रावत यांच्या पत्नीसह सुरक्षा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ब्रिगेडीयर आणि लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही अंत झाला आहे, हे अत्यंत दुःखद आहे. सुरक्षेतील कुशल, अनुभवी आणि धडाडीचे नेतृत्व गमावणे हे देशाच्या दृष्टीने मोठे नुकसान आहे. एकंदर दुर्घटनाच सबंध देशासह आपल्या सर्वांचे मन विषण्ण करणारी आहे. या सर्व शूरवीरांच्या आत्म्याला शांती लाभावी तसेच या सर्वांच्या कुटुंबियांना हा दुर्देंवी आघात सहन करण्याची शक्ती मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

अखेर उपचार सुरु असताना देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपीन रावत यांचं निधन

0

नवी दिल्ली- चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं एमआय १७ ५ व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळले. इथल्या डोंगरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तिथे तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अपघातात सीडीएस बिपीन रावत हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूच्या कोइम्बतूर आणि सुलूरदरम्यानच्या कुन्नूर या ठिकाणी हा अपघात झाला. इथल्या निलगिरीच्या डोंगळाळ प्रदेशामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण प्रवास करत होते. यात लष्कराच्या काही वरीष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये होते. मात्र, हेलिकॉप्टर अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यामुळे रावत यांच्या पत्नीचंही या अपघातात निधन झाल्याचं स्पष्ट झालं आहे.घटनास्थळावरून एकूण ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. उरलेल्या ३ जणांची प्रकृती गंभीर सांगितली जात होती. जखमी झालेल्या व्यक्ती ८० टक्क्यांहून जास्त प्रमाणात भाजल्याची देखील माहिती समोर आली होती. त्यामध्ये जनरल बिपीन रावत यांच्यावर देखील उपचार सुरू होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचं निधन झाल्याचं अखेर जाहीर करण्यात आलं आहे.

सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंग्टन येथील सशस्त्र दलाच्या महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी गेले होते. या ठिकाणी रावत यांचे व्याख्यान होते. हा कार्यक्रम आटोपून ते कुन्नूरला परतत होते. तेव्हा निलगिरी पर्वत रांगामध्ये आज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली. तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. त्यामुळे वातावरण खराब आहे. यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
बिपिन रावत यांचा अल्पपरिचय.
जन्म.१६ मार्च १९५८ रोजी डेहराडून येथे.
बिपिन रावत हे देशातील पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस अधिकारी) होते. सीडीएसचे काम लष्कर , हवाई दल आणि नौदल यांच्यात समन्वय साधणे आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी ते एक होते. तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे होती.
बिपिन रावत यांचे वडील एल एस रावत हेदेखील लष्करात होते आणि ते लेफ्टनंट जनरल एल एस रावत म्हणून ओळखले जात होते. बिपिन रावत यांचे बालपण सैनिकांमध्ये गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिमल्यातल्या सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीत प्रवेश घेतला आणि डेहराडूनला गेले. त्यांची तिथली कामगिरी पाहून त्यांना पहिलं सन्मानपत्र मिळालं, ज्याला SWORD OF HONOURनं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही केला.
बिपिन रावत अमेरिकेतून परतले आणि त्यानंतर त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रयत्नांना १६ डिसेंबर १९७८ रोजी यश मिळाले. त्यांना गुरखा ११ रायफल्सच्या ५ व्या बटालियनमध्ये सामील करण्यात आलं. येथून त्यांचा लष्करी प्रवास सुरू झाला. इथे रावत यांना सैन्याचे अनेक नियम शिकण्याची संधी मिळाली. रावत यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की गोरखामध्ये राहून त्यांना जे काही शिकता आले ते इतरत्र कुठंही शिकायला मिळालं नाही. इथं त्यांनी लष्कराची धोरणं समजून घेतली आणि धोरणं तयार करण्याचं कामही केलं. इथं त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर क्रॉप्स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आय एम ए देहराडून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवर काम केलं.
सैन्यात असताना बिपिन रावत यांना सैन्यात अनेक पुरस्कारही मिळाले होते. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली होते. त्यांच्या सेवेत जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
रावत यांनी आपल्या आयुष्यातील ३७ वर्षे लष्करासाठी समर्पित केली होती. त्यांच्याकडे आणखी अनेक जबाबदाऱ्या होत्या आणि ते देशाच्या सुरक्षा मंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांपैकी एक काम करत होते. बिपिन रावत म्हणत असतत, की त्यांनी एकट्याने काहीही केलं नाही. टीम वर्कमुळेच यश मिळालं. त्यांनी गोरखा बटालियनपासून सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी सैन्यात अनेक पदांचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते लष्करप्रमुख झाले, आता ते भारतातील पहिले सीडीएस अधिकारी म्हणूनही काम करत होते.
मधुलिका रावत या बिपीन रावत यांच्या पत्नी होत. मधुलिका रावत यांचे ही या अपघातात निधन झाले आहे.

कला हे लोकनेते शरद पवार साहेबांचे औषध – विठ्ठलशेठ मणियार

0
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दीवा प्रतिष्ठानच्या वतीने व दीपक मानकर पुढाकाराने आयोजित ‘चित्र शिल्प संवाद’ कार्यक्रमाचे दिमाखदार उद्घाटन

पुणे : शरद पवार साहेब वयाची 81 वर्षे उलटली तरी राज्यासह देशातील विविध कार्यक्रमात सहभागी होत असतात. दोन – तीन तासांचा प्रवास करूनही कार्यक्रमात टवटवीत फुलाप्रमाणे असतात, कारण साहेबांचे संगीत, कला, साहित्य यावर असणारे प्रेम. कायम प्रफुल्लित असण्यामागे कला हेच पवार साहेबांचे औषध आहे असे मत ज्येष्ठ उद्योजक विठ्ठलशेठ मणियार यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दीवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत चित्रकार आणि शिल्पकार यांचा सहभाग असणारा “चित्र-शिल्प संवाद” हा एक आगळा वेगळा उपक्रम दि. 8 ते 12 डिसेंबर 2021 या काळात पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन बालगंधर्व रंगमंदिर येथे विठ्ठलशेठ मणियार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, आयोजक ‘दीवा प्रतिष्ठान’चे संस्थापक दीपक मानकर, महापालिका विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, दीवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष करण मानकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस कला व सांस्कृतिक विभाग जिल्हा अध्यक्षा प्रिया बेर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस कला व सांस्कृतिक विभाग पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सुरेखा कुडची, ज्येष्ठ चित्रकार मुरलीधर लाहोटी, शिल्पकार विवेक खटावकर, बापूसाहेब झांजे, दत्ता सागरे, निलेश आर्टिस्ट आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना विठ्ठलशेठ मणियार म्हणाले की, पवार साहेबांचे कार्य कर्तृत्व महाराष्ट्राला सांगायची गरज नाही. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दीपक मानकर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. या प्रदर्शनात पवार साहेबांचे अनेक दुर्मिळ फोटो त्यांनी जमा केल्याचे दिसते. पवार साहेबांच्या कला, संगीत, साहित्य विश्वातील आठवणींना उजाळा दिला. तसेच हे चित्र शिल्प प्रदर्शन बारामती येथे पवार साहेबांसाठी घ्यावे असे निमंत्रण मणियार यांनी दीपक मानकर यांना दिले.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, कलाकारांच्या कलेचे मोल लावता येत नाही. माणसाच्या किमान गरजा संपल्या की कलेची गरज निर्माण होते. अवघड परिस्थितीत सकारात्मक विचार करण्यासाठी कला आणि कलाकार खुप मदत करतात. आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कलाकारांना राजाश्रय देण्याचा शिष्टाचार आहे. आज शरद पवार यांच्या काळातही हा शिष्टाचार सुरू आहे. पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी कलाकारांना मानधन देऊन त्यांचा सत्कार केला तसेच यामध्ये सातत्य राहावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

प्रशांत जगताप म्हणाले, आपल्या सर्व सामान्य माणसाशी नाळ बांधून ठेवलेला नेता म्हणजे शरद पवार साहेब. ज्येष्ठ राजकारणी वयाच्या एका टप्प्यावर आल्यानंतर आता बास असे म्हणतात; पण वयाच्या 81 वर्षी ही पवार साहेब भारतभर फिरत आहेत. महाराष्ट्र हे कधीही विसरणार नाही. राजर्षी शाहू महाराज यांच्या पासून राज्यात कलाकारांना राजाश्रय देण्याचा प्रघात आहे. त्यानंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि त्यानंतर शरद पवार यांनी हा वारसा पुढे चालू ठेवला आहे. पवार साहेब यांनी राजकारणापलीकडे जाऊन अनेक कलाकार तसेच विविध साहित्य संमेलने यांना मदत केलेली आहे.

अंकुश काकडे म्हणाले, वाढदिवस म्हटले की अलीकडे फक्त फ्लेक्स बाजी असते. परंतू दीपक मानकर गेल्या 15 वर्षांपासून पवार साहेबांचा वाढदिवस वेगवेगळे विधायक कार्यक्रम घेवून साजरे करीत आहेत. मागील दोन वर्षात कोरोनामूळे उध्वस्त झालेले सामान्य जनतेसह कलाक्षेत्रातील अनेक संसार दीपक भाऊंनी पुन्हा उभे करून दिले. कलाकारांना राजाश्रय मिळावा असे अनेकजण म्हणतात पण किती लोक त्यासाठी प्रयत्न करतात? या उपक्रमातून दीपक भाऊंनी आज अनेक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

प्रास्ताविक भाषणात दीपक मानकर म्हणाले की, शरद पवार साहेब माझे दैवत आहेत. साहेबांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा माझा प्रयत्न आहे. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील चित्रकार, शिल्पकार यांना एकत्रित करून वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे, या प्रदर्शनातील चित्रे आणि शिल्प बारामती येथे एका हॉल मध्ये ठेवण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून साहेबांना भेटायला येणाऱ्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना ते बघायला मिळेल.
यावेळी विवेक खटावकर, प्रमोद कांबळे, प्रिया बेर्डे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार योगेश सुपेकर यांनी मानले.

पहिले शिल्प महापौरांचे

‘चित्र शिल्प संवाद’ या उपक्रमात 30 हुन अधिक दिगग्ज कलाकार सहभागी होणार आहेत. चित्र-शिल्प संवाद उपक्रमाच्या उद्घाटनानंतर शिल्पकार विपुल खटावकर आपले प्रात्यक्षिक सादर करणार होते. दीपक मानकर यांनी उपक्रमातील पहिले शिल्प पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे साकारण्याचा मानस व्यक्त केला आणि महापौर मोहोळ यांनीही तात्काळ संमती दिली व विपुल खटावकर यांनी महापौरांचे शिल्प साकारले.

जिल्ह्यात एकाच दिवशी १ लाख २४ हजार मोफत सातबारा वाटप

0

पुणे दि.८- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाच्या मोफत ७/१२ वाटप मोहिमेचा एक भाग म्हणून ७ डिसेंबर (७-१२) रोजी जिल्ह्यातील ६६३ गावात एकाच दिवसात १ लाख २४ हजार मोफत सातबारा वितरण करण्यात आले.

जिल्ह्यात २ ऑक्टोबरपासून १२ लाख ३४ हजार खातेदारांपैकी ११ लाख ५६ हजार अर्थात ९३ टक्के खातेदारांना ७/१२ वितरण करण्यात आले आहे. मंगळवारी आयोजित विशेष मोहिमेत तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी सजांच्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांना ऑनलाईन ७/१२ घेण्याबाबत मार्गदर्शन केले. ही सुविधा https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. १५ रुपये शुल्क ऑनलाईन अदा करून अधिकाधिक शेतकऱ्यांनी हवे असलेले ७/१२डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

जिल्ह्यात ई-पीक पाहणी ॲपद्वारे ४ लाख ३० हजार शेतकऱ्यांनी पीकपाहणीची नोंदणी केली आहे. जिल्ह्यात मुळशी, खेड, पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर वगळता इतर सर्व तालुक्यात रब्बी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी झालेल्या पिकांची नोंद ‘ई-पीक पाहणी (E-Peek Pahani)’ या मोबाईल ॲपवर अपलोड करावी असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
0000

पुणे जिल्हा बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार बिनविरोध; सतीश काकडेंची माघार

0

पुणे : पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने अजित पवार यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाली. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामध्ये बारामती तालुक्यातून अ वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांचाही अर्ज दाखल करण्यात आलेला होता. मात्र आज सतीश काकडे यांनी आपला अर्ज माघारी घेतल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.यावेळी सतीश काकडे म्हणाले, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. पुणे या बँकेचे संचालक मंडळ निवडणुकीसाठी ‘अ’ वर्ग सोसायटी प्रतिनिधी या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावर माझी आणि अजित पवार यांची सोमेश्वर कारखान्याच्या विषयावर चर्चा झाली. त्यावर पवारांनी काही विषय मार्गी लावले आहेत व इतर सर्व विषय मार्गी लाऊन देतो, असे आश्वासन दिलेले आहे. पुणे जिल्हा बँक ही जिल्ह्याचा आर्थिक कणा असल्याने त्या बँकेवर प्रतिनिधी म्हणून अजित पवारांसारखा कणखर नेता असणे अत्यंत गरजेचे आहे. आपण पाहतो की बऱ्याच जिल्हा बँका सक्षम नेतृत्व नसल्यामुळे अडचणीत गेलेल्या आहेत त्यांच्याकडे शेतकऱ्यांना पिक कर्जवाटप करण्यासाठी सुध्दा पैसे नाहीत. त्यामुळे अजित पवार सारखा आभ्यासू नेता जर बॅंकेमध्ये असेल तर बॅंक अडचणीत जाणार नाही, असंही काकडे म्हणाले.मी कोणत्याही पक्षामध्ये नाही किंवा मी कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी पुणे जिल्हा बँकेसाठी निवडणुक अर्ज भरला नव्हता. मी आत्तापर्यंत पारदर्शक पध्दतीने शेतकऱ्यांसाठी काम करीत आलेलो असुन यापुढेही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करीत राहणार आहे. त्यामुळे मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही व आवश्यकताही नाही.

शनिवारवाडा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खुला : पोलीस आयुक्तांची मान्यता….

0

आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश.
पुणे- भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन सवाई गंधर्व महोत्सवास 50% उपस्थिती सह परवानगी द्यावी तसेच शनिवारवाडा देखील कार्यक्रमासाठी खुला करावी अशी मागणी केली.यावेळी सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, महोत्सवाचे संयोजक श्रीनिवास भीमसेन जोशी व भाजपा प्रवक्ता संदीप खर्डेकर उपस्थित होते, महामारीच्या काळातील नियम व बंधने पाळून राजकीय नसलेले सांकृतिक कार्यक्रम करण्यास यावेळी पोलीस आयुक्तांनी अनुकुलता दाखविली .अशी माहिती शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी येथे दिली

ते म्हणाले,’या दोन्ही विषयांवर सकारात्मकता चर्चा झाली. ओमीक्रोन च्या प्रादुर्भावामुळे नव्याने बंधने आली असली तरी नियम बदलत असतात, मात्र सध्या चा ओमीक्रोन चा धोका बघता 25% उपस्थिती चे बंधन आहे, पण तरीही महोत्सव चांगल्या वातावरणात आणि नियमांच्या अधीन राहून रसिकांच्या उपस्थितीत यशस्वी पणे पार पडेल असा विश्वास आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.तसेच एल्गार परिषदेनंतर कोणतेही संयुक्तिक कारण नसताना शनिवारवाड्यावर सरसकट कार्यक्रम करण्यास परवानगी नाकारली जाते हे अयोग्य असल्याने त्याबाबत ही निर्णय घ्यावा असे आग्रही मत आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडले. त्याबाबत ही आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली व अराजकीय कार्यक्रमाना परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्याचे मान्य केले.

मेट्रोच्या भुयारी मार्गाच्या कामाची पहाणी आ. शिरोळे यांनी केली

0

पुणे :मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान चालू असलेल्या भुयारी मार्गाची पहाणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज बुधवारी केली. भुयारी मार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल, असे आ. शिरोळे यांनी सांगितले.

शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गामध्ये मेट्रोची ५ स्टेशन्स होणार असून शिवाजीनगर सिव्हील कोर्ट येथील स्टेशनच्या कामाची पहाणी मेट्रोच्या अधिकाऱ्यांसमवेत केली. शिवाजीनगर बस स्थानक आणि शिवाजीनगर सिव्हील कोर्ट या भुयारी स्टेशनचे काम जून २०२२पर्यंत पूर्ण होईल, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी आ. शिरोळे यांना सांगितले.

शिवाजीनगर सिव्हील कोर्ट ते स्वारगेटला जाणारा मुठा नदी खालील मेट्रोचा भुयारी मार्ग जमिनीच्या पातळीपासून सुमारे ३० मीटर खाली बनविण्यात येत आहे. तो नदीच्या तळाच्या १० मीटर खाली आहे. भुयारी मार्गाचे काम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात येत आहे. मेट्रोचे काम अतिशय वेगाने चालू आहे, याबद्दल आ. शिरोळे यांनी समाधान व्यक्त केले.

पुण्याच्या मेट्रोला २०१६ साली तत्कालीन मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीत मंजुरी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे भूमीपूजन करण्यात आले. या कामाचे प्रत्यक्ष परिणाम पुणेकरांना दिसू लागले आहेत. पुणेकरांनी भाजपवर विश्वास दाखविला त्याची ही पावती आहे, अशी प्रतिक्रिया आ. शिरोळे यांनी व्यक्त केली.

तामिळनाडूत लष्करी हेलिकॉप्टर कोसळले, 14 पैकी 13 जणांचे मृतदेह सापडले

0

CDS जनरल रावत अत्यावस्थ

चेन्नई -सीडीएस जनरल बिपीन रावत यांना घेऊन जाणारे लष्कराचे Mi-17 हेलिकॉप्टर तामिळनाडूत कोसळले. कुन्नूरच्या जंगलात बुधवारी दुपारी 12:20 च्या सुमारास कोसळताच हेलिकॉप्टरला आग लागली. यामध्ये जनरल रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि लष्करी अधिकाऱ्यांसह 14 जण होते. यातील 13 जणांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडले.

जनरल बिपीन रावत यामध्ये गंभीर प्रकारे भाजल्या गेले. त्यांना वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चीफ ऑफ आर्मी स्टाफ (CDS) रावत यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशची माहिती मिळताच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रावत कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर संरक्षण मंत्री गुरुवारी हेलिकॉप्टर क्रॅशच्या घटनेवर संसदेत माहिती देणार आहेत.

यात रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचाही समावेश होता. त्यातील 11 जणांचे मृतदेह सापडले असून रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वृत्तसंस्था एनएनआयच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर सुलूर हवाई तळावरून वेलिंग्टनला जात होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. सध्या घटनास्थळी डॉक्टर, लष्करी अधिकाऱ्यांसह कमांडो उपस्थित आहेत. घटनास्थळी सापडलेल्या मृतदेहांची अवस्था अतिशय वाइट होती. ते पूर्णपणे भाजले होते.या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात हेलिकॉप्टर पूर्णपणे उद्ध्वस्थ झाल्याचे दिसत आहे. क्रॅश होताच हेलिकॉप्टरमध्ये आगीचा भडका उडाला.

जनरल बिपीन रावत यांच्याबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही. जनरल बिपिन रावत 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत लष्करप्रमुख पदावर होते. यानंतर 1 जानेवारी 2020 मध्ये त्यांना चीफ ऑफ डिफेंस स्टाफ हे पद देण्यात आले.

Mi-17 चा एका महिन्यात दुसरा अपघात
लष्करी हेलिकॉप्टर Mi-17 हेलिकॉप्टर क्रॅश होण्याची एकाच महिन्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 19 नोव्हेंबर रोजी अरुणाचल प्रदेशात Mi-17 हेलिकॉप्टर कोसळले. यात प्रवास करणाऱ्या सर्व 12 जणांचा मृत्यू झाला

डीईएसमध्ये हस्तकौशल्य सप्ताहानिमित्त प्रदर्शन

0

पुणे, ता. ८ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पूर्व प्राथमिक शाळेत राष्ट्रीय हस्तकौशल्य सप्ताहा निमित्त (८ ते १३ डिसेंबर) ‘टाकाऊतून टिकाऊ’ या विषयावर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन गरवारे बालभवनच्या ओरिगामीमध्ये कुशल असणाऱ्या तज्ज्ञ शिक्षिका नेहा सुगवेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या विषयावरील विविध वस्तू बनविण्याचे विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पालकांच्या सहाय्याने तयार केलेल्या वस्तू प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. तसेच मुलांसाठी टॅटू काढणे, मेहंदी काढणे आणि विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रदर्शन ११ डिसेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर

0
प्रमुख व्याजदरात कुठलाही बदल नाही

रेपो दर 4 टक्क्यांवर कायम

रिव्हर्स रेपो दर ही 3.35 टक्क्यांवर कायम

मार्जिनल स्टँडिग फॅसिलिटी आणि बँक दर कोणत्याही बदलाविना 4.25 टक्क्यांवर कायम

मुंबई, 8 डिसेंबर 2021

आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेने आज द्वै मासिक पतधोरण आढावा जाहीर केला असून प्रमुख व्याज दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचीपत्रकार परिषदेत माहिती दिली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण आढावा जाहीर केला. रेपो दर कोणत्याही बदलाविना 4.0 टक्क्यांवर, मार्जिनल स्टँडिग फॅसिलिटी आणि बँक दर कोणत्याही बदलाविना 4.25 टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो दरही कोणत्याही बदलाविना 3.35 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादन 9.5% दराने वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जीडीपी वृद्धीचा दर 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत 6.6 टक्के,  2021-22 च्या चौथ्या तिमाहीत 6.0 टक्के, 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत 17.2 टक्के, 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत 7.8 टक्के राहू असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

2021-22 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक चलनवाढ 5.3 टक्के राहील असा अंदाज आहे.  हा दर 2021-22 तिसऱ्या तिमाहीत 5.1टक्के, 2021-22 चौथ्या तिमाहीत 5.7 टक्के, 2022-23 पहिल्या तिमाहीत 5.0 टक्के, 2022-23 दुसऱ्या तिमाहीत 5.0 टक्के राहील असा अंदाज आहे.

भारतीय अर्थव्यवस्था कोविडच्या या अदृश्य शत्रूचा सामना करण्यासाठी आता अधिक चांगल्या प्रकारे सज्ज आहे असे दास यांनी सांगितले. 2020-21च्या पहिल्या तिमाहीमध्ये सर्वात मोठ्या घसरणीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेने स्वतःचे पुनरुज्जीवन केले आहे तसेच 2021-22च्या पूर्वार्धात जीडीपी 13.7 टक्क्यांपर्यंत विस्तारला आहे असे ते म्हणाले. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आरबीआयने अभूतपूर्व प्रमाणात व्यापक धोरणात्मक कृती केल्याचं ते म्हणाले.

पतधोरणाची समावेशक भूमिका ही  पुनरुज्जीवन तसेच शाश्वत वृद्धी कायम राखण्यासाठी परिस्थितीनुसार तशीच ठेवली जाईल आणि अर्थव्यवस्थेवरील कोविड19 च्या परिणामांना तोंड देण्यासाठी पुढेही  सुरू राहिल, त्याचवेळी चलनफुगवटा नियंत्रणात राखण्याची काळजी घेतली जाईल, असे दास यांनी स्पष्ट केले.

देशातील अनेक क्षेत्रांनी महामारीपूर्व उत्पादनांची पातळी ओलांडली आहे. चलनफुगवट्याचे प्रमाण 4 टक्के लक्ष्याला अनुसरून आहे. बाह्य अर्थसाहाय्याची गरज अतिशय कमी आहे.

जागतिक उलथापालथीला तोंड देण्यासाठी अतिरिक्त साठा पुरेसा ठरण्याची अपेक्षा आहे. कर महसुलामुळे सार्वजनिक अर्थसाहाय्याला बळकटी मिळाली आहे असे दास यांनी नमूद केले.

कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे करसंकलनात आलेले अडथळे आता दूर होत आहेत, मात्र अर्थव्यवस्था स्वयंसिद्ध आणि टिकाऊ होण्याइतकी मजबूत झालेली नाही यामुळे धोरणात्मक मदतीची गरज अधोरेखित होते, असे त्यांनी नमूद केले.

ओमायक्रोन व्हेरियंट आल्याने आणि अनेक देशात कोविड संसर्गात नव्याने वाढ होत असल्याने नुकसान होण्याचे धोके वाढले आहेत. वीज आणि वस्तूंच्या वाढत्या किमती, जागतिक पुरवठा प्रणालीतील अडथळे सुद्धा समस्या निर्माण करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

रब्बी हंगामाच्या दमदार सुरवातीमुळे, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत मोफत अन्नधान्य वाटपाला मार्च 2022 पर्यंत देण्यात आलेली मुदतवाढ, यामुळे शेतीतला रोजगार वाढत आहे, असे ते म्हणाले.

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडून अतिरिक्त उपाययोजनांची घोषणा यावेळी करण्यात आली. यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • बँकांच्या परदेशी शाखा आणि उपशाखांना भांडवलाचा पुरवठा आणि या संस्थांसाठी नफ्याचे राखीव प्रमाण, परतावा आणि हस्तांतरण
  • बँकांच्या गुंतवणूक पोर्टफोलियोसाठी असलेल्या व्यवहार्य मापदंडांचा आढावा घेण्यासाठी चर्चा पत्रिका-ऑक्टोबर 2000पासून स्थानिक आर्थिक बाजारपेठा आणि जागतिक निकष याविषयीच्या घडामोडी लक्षात घेऊन सार्वजनिक अभिप्रायांसाठी आरबीआय सध्याचा आराखडा लागू केल्यावर चर्चा पत्रिका प्रसिद्ध करणार
  • शुल्क भरणा प्रणालीसाठी चर्चा पत्रिका-डिजिटल माध्यमातून विविध प्रकारच्या शुल्काचा भरणा करताना आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्काविषयी ग्राहकांच्या चिंतांसंदर्भात एक समग्र दृष्टीकोन ठेवण्यासाठी आणि डिजिटल शुल्क भरणा प्रक्रिया परवडण्याजोगी करण्यासाठी चर्चापत्रिका प्रसिद्ध केली जाणार
  • यूपीआय: सुलभीकरण, व्याप्ती वाढवणे आणि मर्यादांचा विस्तार यासाठी आरबीआयने डिजिटल पेमेंट्सच्या विस्तारासाठी आणि ही व्यवस्था अधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी 3 उपाययोजना जाहीर केल्या आहेत (i)ग्राहकांसाठी व्यवहार सुलभता
  • (ii)वित्तीय बाजारपेठांमध्ये किरकोळ ग्राहकांना अधिकाधिक सहभागी होता येईल अशा सुविधा देणे (iii)सेवा पुरवठादारांच्या क्षमता वाढविणे
  • फिचर फोन वापरकर्त्यांसाठी यूपीआय सुविधा-आरबीआयने फिचर फोन वापरकर्त्यांसाठी यूपीआय आधारित पेमेंट उत्पादने सुरु करणार असून आरबीआय च्या किरकोळ पेमेंटमधील नियामक सॅन्डबॉक्समधल्या अभिनव उत्पादनांचा लाभ करून दिला जाणार
  • युपीआय सुलभीकरण-कमी मूल्याच्या यूपीआय व्यवहारांसाठी यूपीआय ऍप्लिकेशन्समध्ये ऑन डिव्हाईस वॉलेट यंत्रणेच्या माध्यमातून आरबीआय प्रक्रियेचा ओघ सुलभ करणार
  • यूपीआय मर्यादेत वाढ-जी- सेक आणि प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) ऍप्लिकेशन्समध्ये गुंतवणुकीच्या थेट किरकोळ योजनेसाठी यूपीआयद्वारे शुल्काचा भरणा करण्यासाठी त्याच्या मर्यादेत आरबीआयने दोन लाखांवरून पाच लाख रुपयांपर्यंत वाढ करणार
  • बाह्य व्यावसायिक कर्जाची सुविधा(ईसीबी)/ व्यापार कर्ज-लिबॉरवरून पर्यायी संदर्भ दराकडे (एआरआर) संक्रमण-आपण लिबोरकडून संक्रमित होत असताना ईसीबी आणि व्यापार कर्जासाठी कोणत्याही व्यापक प्रमाणात स्वीकृत आंतरबँक दर किंवा एआरआरचा वापर करता यावा यासाठी आरबीआय मार्गदर्शक तत्वे जारी करणार

“स्वदेशीकरणाप्रति नौदलाची वचनबद्धता ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना आहे,”- राष्ट्रपती

0

भारतीय नौदलाच्या 22 व्या क्षेपणास्त्र युद्धनौका तुकडीला “राष्ट्रपती स्टॅण्डर्ड ” सन्मान प्रदान

मुंबई, 8 डिसेंबर 2021

राष्ट्रपती  राम नाथ कोविंद यांनी आज मुंबईत एका समारंभात भारतीय नौदलाच्या  22 व्या क्षेपणास्त्र युद्धनौका तुकडीला राष्ट्रपती स्टॅंडर्ड हा सन्मान प्रदान केला. राष्ट्रासाठी केलेल्या सेवाकार्यासाठी सर्वोच्च अधिकाऱ्यांनी लष्करी तुकडीला दिलेला सर्वोच्च सन्मान म्हणजे प्रेसिडेंट’स स्टॅंडर्ड पुरस्कार आहे.

यावेळी बोलताना राष्ट्रपती  कोविंद म्हणाले,  “राष्ट्रपती स्टॅण्डर्ड सन्मान प्रदान करणे म्हणजे या तुकडीच्या विद्यमान आणि माजी अधिकारी तसेच नाविकांनी राष्ट्राप्रती केलेल्या अतुलनीय सेवा आणि समर्पणाला दिलेली पावतीच आहे.” पन्नास वर्षांपूर्वी 1971  च्या युद्धात पाकिस्तान नौदलाची जहाजे बुडवण्यात 22 व्या क्षेपणास्त्र तुकडीने बजावलेल्या भूमिकेची त्यांनी आठवण करून दिली. “खरे तर, प्रामुख्याने देशाच्या किनार्‍याच्या संरक्षणासाठी आणलेल्या या युद्धनौका आपल्या नौदलासाठी युद्धातील सर्वात शक्तिशाली लढावू ताकद ठरली. ही लढाई आपल्या नौदलाच्या जवानांच्या कुशाग्रतेचे आणि शौर्याचे प्रतीक ठरली आहे” असे   कोविंद म्हणाले.

आत्मनिर्भर भारत व्हिजनचा एक भाग म्हणून भारतीय नौदलाच्या स्वदेशीकरणाप्रती असलेल्या बांधिलकीबद्दल आनंद व्यक्त करताना राष्ट्रपती म्हणाले, “नौदलाची ही वचनबद्धता छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली आहे, ज्यांना अनेक इतिहासकार भारताच्या युद्धासाठी सज्ज नौदलाचे संस्थापक मानतात. 17 वे शतक आत्मनिर्भर भारताचा भाग म्हणून  स्वदेशीकरणाबाबत भारतीय नौदलाच्या वचनबद्धतेबद्दल आनंद व्यक्त करत राष्ट्रपती म्हणाले,  17 व्या शतकात  भारतात,  युद्धासाठी सज्ज अशा नौदलाची उभारणी करणारे, नौदलाचे संस्थापक,  द्रष्टे राजे म्हणून अनेक इतिहासकार ज्यांना मानतात अशा छत्रपती शिवाजी महाराजांना नौदलाची वचनबद्धता ही  मानवंदनाच आहे.”

हिंद-प्रशांत क्षेत्रात येणाऱ्या भू-राजकीय आव्हानांचा सामना करण्यात, महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी भारताला मिळाली आहे असे राष्ट्रपती म्हणाले. “बहुतांश जागतिक सागरी व्यापार  हिंद महासागर क्षेत्रातून होतो. त्यामुळे या प्रदेशात शांतता आणि सुव्यवस्था राखणे केवळ आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण जागतिक समुदायासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे ” असे ते म्हणाले.  आज, जगातील सर्वात मोठ्या नौदलांपैकी एक असलेल्या भारतीय नौदलाकडे आपले सागरी शेजारी हिंद महासागर प्रदेशातील एक पसंतीचे सुरक्षाविषयक भागीदार म्हणून अपेक्षेने पाहत आहेतअसे कोविंद म्हणाले.

देशात आणि देशाबाहेर मानवतावादी संकटे किंवा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करण्यात  भारतीय नौदल आघाडीवर आहे,असे सांगत कोविड-19 च्या संकटात भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यात तसेच महाराष्ट्र-गुजरात किनारपट्टीवर धडकलेल्या  तौक्ते चक्रीवादळादरम्यान बचाव कार्यातही भारतीय नौदलाने बजावलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. 

 राष्ट्रपती स्टॅण्डर्ड सन्मान  समारंभादरम्यान  परिपूर्ण पथसंचलन झाले  ज्याची सुरुवात नौदलाच्या  सशस्त्र दलाने  राष्ट्रपतींना  सलामी देऊन केली , त्यानंतर  राष्ट्रपती स्टॅण्डर्ड प्रदान करण्यात आले.  नौदलाच्या  जवानांच्या कवायती  आणि मार्कोस आणि नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या  प्रात्यक्षिकाने समारंभाचा समारोप झाला. या समारंभाला महाराष्ट्राचे राज्यपाल  भगतसिंग कोश्यारी, नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार, व्हाइस ऍडमिरल  अजेंद्र बहादूर सिंग, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड आणि लष्करातील तसेच इतर क्षेत्रातील अनेक  मान्यवर  उपस्थित होते.

22 व्या क्षेपणास्त्र युद्धनौका तुकडीबाबत

क्षेपणास्त्र युद्धनौकेवरील 22 व्या तुकडीची औपचारिक स्थापना ऑक्टोबर 1991 मध्ये मुंबईत दहा वीर श्रेणी आणि तीन प्रबळ श्रेणीच्या क्षेपणास्त्र नौकांसह करण्यात आली होती. मात्र , ‘किलर्स’ चा उदय 1969 पासूनचा आहे . भारतीय नौदलाची ताकद वाढवण्यासाठी तेव्हाच्या USSR (युनायटेड सॉव्हरेन सोशालीस्ट  रिपब्लिक ) मधून OSA I या श्रेणीच्या क्षेपणास्त्र नौकांचा समावेश करण्यात आला .

04-05 डिसेंबर 1971 च्या रात्री, भारतीय नौदलातील सर्वात तरुण योद्धांनी पाकिस्तानच्या नौदलावर विनाशकारी आक्रमण केले. भारतीय नौदलाची जहाजे निर्घात , निपट आणि वीर यांनी त्यांची स्टाईक्स ही युद्धनौका रोधी क्षेपणास्त्रे डागली आणि पाकिस्तान नौदलाची खैबर आणि मुहाफिझ ही जहाजे बुडवली, ऑपरेशन ट्रायडंट असे सांकेतिक नाव असलेले, हे ऑपरेशन नौदलाच्या आधुनिक इतिहासातील सर्वात यशस्वी ऑपरेशन्सपैकी एक मानले जाते, ज्यामध्ये भारतीय सैन्याची कोणतीही जीवितहानी झाली नाही.

भारतीय नौदलाने दिनांक 8/9 डिसेंबरच्या रात्री आणखी एक धाडसी हल्ला केला, जेव्हा आयएनएस  विनाशने दोन फ्रिगेट्सच्या मदतीने चार स्टाईक्स क्षेपणास्त्रे डागली आणि  पाकिस्तान नौदल ताफ्याचा टँकर डाका बुडवला तसेच  कराची येथील किमारी ऑइल स्टोरेज सुविधेचे मोठे नुकसान केले. अशा   जहाजे आणि स्क्वाड्रनमधील जवानांच्या या स्पृहणीय कर्तृत्वामुळेच त्यांना ‘किलर’ ही पदवी मिळाली

 राष्ट्रपती स्टॅण्डर्ड सन्मान सोहळ्याच्या या अविस्मरणीय प्रसंगी, “किलर स्क्वाड्रन “या तुकडीचा   भाग असलेले काही ज्येष्ठ अधिकारी सैनिकही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांचीही  राष्ट्रपती आणि प्रमुख अतिथींनी प्रशंसा केली.

अभिनयाबरोबरच चित्रीकरणाचे ठिकाण कथा सांगण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडते

0

पुणे, दि. ८ डिसेंबर, २०२१ : चित्रपटांमध्ये व्यक्तीरेखांना न्याय देणारे नायक नायिका महत्त्वाचे असतातच, यांबरोबर चित्रीकरणाचे ठिकाण (लोकेशन्स) हे देखील महत्त्वाची भूमिका पार पाडते, असा सूर लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आज झालेल्या ‘कँडिड टॉक्स’ या कार्यक्रमादरम्यान उमटला.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सुरू असलेल्या १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत एनएफएआय येथे ‘कँडिड टॉक्स’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कलात्मक संचालक समर नखाते यांनी आज ‘बारा बाय बाय’, ‘लैला और सात गीत’, ‘ब्रिज’, ‘जून’, ‘आरके’ या चित्रपटांचे दिग्दर्शक व टीम यांच्याशी संवाद साधला.

‘बारा बाय बाय’ चित्रपटाचे दिग्दर्शक गौरव मदान, निर्माते, पटकथाकार, सिनेमॅटोग्राफर सनी लाहिरी, ‘लैला और सात गीत’ चित्रपटाचे दिग्दर्शक पुष्पेंद्र सिंग, ‘ब्रिज’ चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिपाल कोलिता, ‘जून’ चित्रपटाचे दिग्दर्शक वैभव खिस्ती, सुहृद गोडबोले, अभिनेत्री रेशम, ‘आरके’ चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते रजत कपूर आदी या वेळी उपस्थित होते.

‘बारा बाय बाय’ चित्रपटाचा नायक हा वाराणसीच्या मनकर्णिका घाटावर डेथ फोटोग्राफी करणारा शेवटचा छायाचित्रकार आहे. प्राचीन वाराणसी शहर ज्या प्रमाणे विकासामुळे बदलत आहे तसेच स्मार्टफोनच्या जमान्यात नायकाची ओळखही पुसल्या जात आहे. शहर आणि त्याच्या आयुष्यात होणा-या या स्थित्यंतरापासून आपल्या कुटुंबाला बाजूला ठेवायची नायकाची इच्छा आणि त्याचा प्रवास या चित्रपटात दाखवायचा प्रयत्न केला असल्याचे सांगत दिग्दर्शक गौरव मदान म्हणाले, “मुख्य भूमिकेतील कलाकारांबरोबरच चित्रपटातील लोकेशन्सचा आम्ही विशेष विचार केला. भारतीय चित्रपट सृष्टीत वाराणसीचे घाट व ते शहर दाखविल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र घाटाची, त्याच्याशी निगडीत जीवनाची, व्यक्तींची कथा सांगण्याचा आमचा प्रयत्न होता.”

चित्रपटातील पात्र व कथा डोक्यात होतीच तरीही आम्ही दिवसभर वाराणसी शहर फिरायचो आणि मग लिहित जायचो. यामुळे लोकेशन्सनुसार कथा साकारली गेली. या प्राचीन शहराची आजची विदारक अवस्था जवळून पाहता आली. शहराचे स्वत:चेच असे विविध रंग चित्रपटामध्ये अनुभविता येतील, असेही मदान यांनी सांगितले.

१४ व्या शतकात काश्मीरमधील संत लल्लेश्वरी देवी किंवा लाल देड यांच्या कवितांवर प्रेरित ‘लैला और सात गीत’ हा चित्रपट काश्मीरमधील भटक्या मेंढपाळ समाजातील लैलाची कथा प्रेक्षकांना सांगतो. चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक पुष्पेंद्र सिंग म्हणाले, “काश्मीरचे सौंदर्य, हिमालयाच्या पर्वतरांगा यांच्या पार्श्वभूमीवर घटणारी लैलाची कथा स्त्रीवादी विचारांसोबतच निसर्गाशी असलेले मानवी नाते अलगदपणे उलगडण्याचा प्रयत्न करते. संगीत व चित्रकारणाचा परिसर हा कथेला एका उंचीवर नेऊन ठेवतो.”

मी स्वत: अभिनयाचे औपचारिक धडे गिरवले असले तरी माझ्या चित्रपटात याआधी अभिनय न केलेल्यांना प्राधान्य देणे मी पसंत करतो असे सांगत नजीकच्या भविष्यात काश्मीरच्या लोकेशन्समध्येचे पुढील दोन प्रोजेक्ट करण्याचा मानस असल्याचे सिंग यांनी बोलून दाखविले.

ब्रह्मपुत्रा नदीची एक उपनदी असलेल्या नदीच्या काठावर वसलेल्या गावात किशोरवयीन मुलीची संघर्षमय कथा सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शक क्रिपाल कोलिता यांनी आपल्या ‘ब्रिज’ या आसामी चित्रपटात केला आहे.

याबद्दल सांगताना ते म्हणाले, “आसाममध्ये दरवर्षी पुराचे संकट येते. गेल्या काही वर्षांत ही तीव्रता वाढली आहे. आज असलेले आपले घर, संसार उद्या येणा-या नदीच्या पुराने उध्वस्त होतो. तरीही येथील लोक नदीला आई मानत तिची पूजा करतात. जीवनातील संघर्ष हा कोणालाही चुकलेला नाही, मात्र त्यातून पार होत नव्या दिवसाची वाट दाखविणारा विचार चित्रपटातून दाखविला आहे.” चित्रपट आसाममध्ये चित्रित झाला असून आसामचे व ब्रह्मपुत्रा नदीचे सौंदर्य यामध्ये पहायला मिळते.

‘जून’ चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यामध्येच करण्याचा आमचा सुरुवातीचा विचार होता. मात्र नंतर कथेला अनुसरून ते चित्रीकरण औरंगाबाद शहरात करण्याचा निर्णय झाला असे सांगत चित्रपटाचे दिग्दर्शक वैभव खिस्ती म्हणाले, “पात्रांना एक कोंदण देतं शहर दाखवीत कथा सांगण्याचा प्रयत्न केला. स्वत:च्या ताणात असलेला नील व अपघाताने त्याच्या आयुष्यात आलेली नेहा यांची ही गोष्ट आहे.”आजच्या पिढीतील नातेसंबंध हे गुंतागुंतीचे, अनेक पदर असलेल्या असतात हे चित्रपटात दाखविले असल्याचे सुहृद गोडबोले यांनी सांगितले.

‘आरके’ चित्रपटाचे दिग्दर्शक रजत कपूर यांनी स्वत: चित्रपटात देखील ‘आरके’ नावाच्या नायकाची व्यक्तीरेखा साकारली आहे. या वेळी नायकाचे प्रतिबिंब गायब होते आणि ते शोधण्याचा आणि ते सापडल्यानंतरचा प्रवास चित्रपटात दाखविला आहे. याबद्दल सांगताना कपूर म्हणाले, “चित्रपट तयार करत असताना दिग्दर्शकाने अंत:प्रेरणेला महत्त्व द्यायला हवे. तुमच्या कल्पनांना कोणतेही लॉजिक नसते, त्यामुळे लॉजिक बाजूला ठेऊन काम केले तर त्यामध्ये असलेला तारतम्य भाव आपोआप समोर येतो.”

चित्रपटाच्या एडीटिंगसाठी मला तब्बल साडे चार महिने लागले. त्यासाठी मी रोज सकाळी एकदा चित्रपट पाहायचो आणि त्यातील बदलावर दिवसभर काम करायचो. काल चित्रपटाचा भारतातील प्रिमीअर पिफ मध्ये पार पडला याचा विशेष आनंद आहे. असेही त्यांनी नमूद केले.

३६ वी राष्ट्रीय संशोधन परिषद पुण्यात

0

पुणे : सहकाराचे सक्षमीकरण व्हावे आणि या क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढावा, याउद्देशाने पुण्यामध्ये ३६ व्या राष्ट्रीय संशोधन परिषदेचे आयोजन दिनांक १० व ११ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. इंडियन सोसायटी फॉर स्टडिज इन को -आॅपरेशन, पुणे (आयएसएससी) तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात ही परिषद आहे. देशभरातून ६० पेक्षा अधिक संशोधक आपले शोधनिबंध या परिषदेत सादर करतील. तसेच देशभरातून सहकारातील कार्यकर्ते, प्राध्यापक व संशोधक या परिषदेत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयएसएससीचे मानद सचिव प्रा.अनिल कारंजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला संस्थेतर्फे अ‍ॅड.सुभाष मोहिते, अ‍ॅड.जयंत कुलकर्णी, प्रा.डॉ.मुकुंद तापकीर, संजीव खडके आदी उपस्थित होते. इंडियन सोसायटी फॉर स्टडिज इन को-आॅपरेशन, पुणे (आयएसएससी) यांच्यासह पद्मश्री डॉ.विखे पाटील सावित्रीबाई फुले अध्यासन पुणे विद्यापीठ आणि वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून  ही परिषद होत आहे.

परिषदेचे उद््घाटन शुक्रवार, दिनांक १० डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे. परिषदेचे उद््घाटन भारतीय राष्ट्रीय सहकार परिषदेचे अध्यक्ष दिलीपभाई संघानी (माजी मंत्री, गुजरात) यांच्या हस्ते होईल. यावेळी राज्यमंत्री विद्याधर अनास्कर, माजी सनदी अधिकारी डॉ.एस.के.गोयल, आयएसएससीचे अध्यक्ष जी.एच.अमीन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसीय परिषदेत सहकाराविषयी व युवकांच्या सहभागासाठी अनेक संशोधन प्रकल्प देखील सादर होणार आहेत. तसेच संस्थेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देण्यात आलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण होईल. यावेळी आर्थिक सहाय्य वितरण देखील होणार आहे.

सहकाराची सहकारी संस्था सक्षम करण्यासाठी आयसीटीचा उपयोग, सहकारी संस्थांची स्वायत्तता आदी विषयांवर चर्चा व मार्गदर्शन परिषदेत होणार आहे. परिषदेचा समारोप शनिवार, दिनांक ११ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजता वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात होणार आहे. यावेळी राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे, आयएसएससीचे अध्यक्ष जी.एच.अमीन, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिटयूटच्या संचालक डॉ.हेमा यादव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.एन.एस.उमराणी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार अनुराधा भोसले यांना जाहीर- गिरीश प्रभुणे, भाऊसाहेब जाधव आणि प.पू.प्रेमल माताजी यांना यंदाचा गुरुमहात्म्य पुरस्कार

0

पुणे : सामाजिक क्षेत्रात फासेपारधी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणारे पद्मश्री गिरीश प्रभुणे, शैक्षणिक क्षेत्रात मराठवाडा मित्र मंडळाच्या माध्यमातून कार्यरत असलेले डॉ.बी.जी. उर्फ भाऊसाहेब जाधव आणि धार्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प.पू. सद्गुरु प्रेमल माताजी यांना कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे देण्यात येणारा गुरुमहात्म्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार बालकामगारांसाठी कार्यरत असलेल्या कोल्हापूरच्या अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले यांना श्री दत्तजयंती उत्सवात देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
पत्रकार परिषदेला ट्रस्टचे राजू बलकवडे, अक्षय हलवाई, अ‍ॅड.रजनी उकरंडे, युवराज गाडवे, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार आदी उपस्थित होते. यांसह ट्रस्टचे विश्वस्त डॉ.पराग काळकर, अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ यांनी देखील उत्सवाचे नियोजन केले आहे. ट्रस्टचे यंदा १२४ वे वर्ष आहे. 

भाऊसाहेब जाधव
गिरीश प्रभुणे


उत्सवाची सुरुवात सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प.पू.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित लोकमंगल वर्धक घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण दत्तभक्त करणार आहेत. कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि प.पू. नाना महाराज तराणेकर प्रणीत अखिल भारतीय त्रिपदी परिवार, इंदोर तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात रविवार, दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प.पू.श्री.गुरू षठब्रम्ह १०८ ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य स्वामीजी, वाई हे उपस्थित राहणार आहेत. तर, अखिल भारतीय त्रिपदी परिवार, इंदोरचे प.पू. बाबामहाराज तराणेकर यांचे आॅनलाईन प्रवचन होणार आहे. 
* दत्तजयंती उत्सवात सप्तस्वरोत्सव व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन :-
दत्तजयंती सोहळ्यातील मुख्य कार्यक्रम असलेला गुरुमहात्म्य पुरस्कार व लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा सोमवार, दिनांक १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमाळकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे माजी अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी स्वरतीर्थ स्व.सुधीर फडके यांच्या चिरस्मरणीय श्रवणीय गीतांचा बहारदार कार्यक्रम असलेला बाबूजी व मी हा ज्येष्ठ गायक व संगीतकार श्रीधर फडके आणि सहकारी सादर करणार आहेत. 
बुधवार, दिनांक १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्रावर आधारित मोगरा फुलला हा कार्यक्रम व्याख्याते गणेश शिंदे व गायिका सन्मित्रा शिंदे सादर करणार आहेत. यावेळी गरजू विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्थसहाय्य प्रदान समारंभ असून पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. तसेच श्री गुरुदत्त दिनदर्शिका रौप्य महोत्सवी वर्ष २०२२ चे प्रकाशनही कार्यक्रमात होणार आहे. श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या मानद सचिवपदी निवड झाल्याबद्दल  अण्णा थोरात व सदस्यपदी निवड झाल्याबद्दल दत्तमंदिराचे माजी विश्वस्त बी.एम.गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.  
दत्तजयंती उत्सवांतर्गत मंदिरासमोरील मंडपात दररोज दुपारी १ ते रात्री ९ दरम्यान भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. कोविड प्रतिबंधक अनुरूप व्यवहाराच्या शासकीय नियमावली नुसार मुखपट्टी अनिवार्य असेल, दर कार्यक्रमानंतर उत्सव मंडपाचे निर्जंतुकीकरण, अभ्यागतांचे प्रवेशद्वारावर तापमान मापन, इ. कार्यप्रणालीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल. दत्तजयंती सोहळा व सप्तस्वरोत्सवाकरीता प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.