Home Blog Page 2184

राज्यात चित्रपटाला लवकरच उद्योगाचा दर्जा -सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

0


पुणे दि.३०- राज्यात चित्रपटांची निर्मिती अधिक नियोजित पद्धतीने व्हावी आणि निर्मितीसाठी आवश्यक सहकार्य मिळणे शक्य व्हावे यासाठी लवकरच चित्रपटाला उद्योगाचा दर्जा देण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केले.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे राज्य शासनाच्या महासंस्कृती आणि पुणे फिल्म फाउंडेशनतर्फे आयोजित १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ‘पिफ’चे संचालक आणि दिग्दर्शक जब्बार पटेल, विश्वस्त मोहन आगाशे, उल्हास पवार, प्रा.समर नखाते, प्रकाश मकदुम, प्रा.सतीश आळेकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले आदी उपस्थित होते.

श्री.देशमुख म्हणाले, चित्रपटांसाठी चांगल्या पायाभूत सुविधा देण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. मुंबई फिल्मसिटी येथे चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि ओटीटी प्लॅटफॉर्मासाठी अधिकाधिक सुविधा देण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त इतर ठिकाणी चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे. पुण्यात चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक वातावरण आणि कुशल मनुष्यबळ लक्षात घेता अशा ठिकाणी पायाभूत सुविधांची निर्मिती गरजेची आहे. पुणे चित्रपट महोत्सवात त्यासाठी आवश्यक चांगल्या कल्पना पुढे येतील.

गेल्या दोन दशकापासून हे आयोजन होत आहे. कोरोनाचे संकट असतानाही महोत्सवाचे चांगले आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने चित्रपटांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. मुंबई चित्रपटांची राजधानी आहे आणि पुण्यात चित्रपटांसाठी अनुकूल वातावरण आहे. चित्रपट महोत्सवाच्यानिमित्ताने जगातील चित्रपट सृष्टिशी निगडित व्यक्ती एकत्र घेतात, कल्पनांची देवाणघेवाण करतात. हा महोत्सव भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात आयोजित व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आवश्यक दक्षता घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. पुढील वर्षी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन ३ ते १० मार्च २०२२ या कालावधीत होईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

प्रास्ताविकात श्री.पटेल यांनी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सहकार्याबद्दल राज्य शासनाला धन्यवाद दिले. राज्य शासनाने महोत्सवासाठी ४ कोटी रुपये देण्याचे मान्य केल्याने चांगले आयोजन शक्य झाल्याचे ते म्हणाले.

यावेळी श्री.देशमुख यांच्या हस्ते चित्रपट महोत्सवातील विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा ‘संत तुकाराम’ उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटासाठीचा पुरस्कार ‘पोरगं मजेत आहे’ या चित्रपटाला आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी ‘प्रभात’ पुरस्कार ‘शुड द विंड ड्रॉप’ या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. इतरही पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पुस्तकांचे गाव प्रकल्पाचा लवकरच राज्यभर विस्तार- सुभाष देसाई

0

मुंबई, दि. ९.
मराठी भाषा विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ‘पुस्तकांचे गाव’ या प्रकल्पाचा लवकरच राज्यभर विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली.
याच अनुषंगाने आज मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक तथा अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे, श्रीरामपूर येथील शब्दांलय प्रकाशनच्या प्रकाशिका सुमती लांडे उपस्थित होत्या.
मराठी भाषा विभागाच्यावतीने सातारा जिल्ह्यातील भिलार येथे ‘पुस्तकांचे गाव’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. हाच प्रकल्प राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचा मानस श्री. देसाई यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात सहा विभागीय स्तरांवर हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असून त्यासाठी तयारी करण्याच्या सूचना श्री. देसाई यांनी संबंधित विभागाच्या अधिकऱ्यांना केल्या. याद्वारे वाचकांना सर्वप्रकारचे ग्रंथ, कथा, कांदबरी, बालसाहित्य, नाटके आदी साहित्य या उपक्रमांद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

‘दिव्यांग व्यक्ति अस्मिता अभियान’ राज्यभरात व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

0

मुंबई, दि. 9 : राज्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र तसेच वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी दिव्यांग व्यक्ति अस्मिता अभियान व्यापक स्वरुपात राबविण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्ति अस्मिता अभियान आणि  वैश्विक ओळखपत्र वितरण कार्यक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे.  याबाबतची आढावा बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व अधिष्ठाता, दिव्यांग आयुक्तालयाच्या सहायक आयुक्त, आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख यावेळी म्हणाले की, दिव्यांग हक्क अधिनियम, 2016 नुसार सर्व 21 प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दिव्यांगाना प्रमाणपत्र राज्यभरात विशेष प्रयत्न केले जाणार असून यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग पुरेपूर सहकार्य करेल. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल.

महाराष्ट्रातील दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्याकरिता विशेष शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक असून यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे असे यावेळी खासदार श्रीमती सुळे यांनी सांगितले.

या अभियानामुळे राज्यस्तरावरील दिव्यांगाना विविध वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या योजना कार्यान्वित करणे सोयीचे होईल. तसेच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी देणे, विविध प्रोत्साहनपर योजना राबविणे, विविध प्रकारचे साहित्य, साधने आणि उपकरणांचा पुरवठा करणे सोयीचे होणार आहे. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती, परीक्षेतील सवलती मिळणे याबरोबरच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या संजय राऊत यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करावा- विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी

0


मुंबई, दि. ९ डिसेंबर – मुंबई महापालिका आणि महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचे विरोधी पक्ष म्हणून आम्ही वाभाडे काढतोय. म्हणूनच विरोधकांवर अशा प्रकारे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर सूडभावनेने कृती करण्याचा त्यांचा डाव आहे. आशिष शेलार यांना एक न्याय व संजय राऊत यांना काय बोलण्याचे फ्री लायसन्स दिले आहे का? कायद्यासमोर सगळे समान आहेत, त्यामुळे संजय राऊत यांच्याविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
प्रविण दरेकर यांच्यासह आमदार मंगलप्रभात लोढा, अतुल भातखळकर, सुनील राणे, प्रसाद लाड यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते आज सकाळी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात उपस्थित होते. आशिष शेलार यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात भाजपाचे नेते पोलिस ठाण्यात उपस्थित होते.यावेळी आशिष शेलारही उपस्थित होते. त्यावळी प्रसारमाध्यमांशी बोलतान दरेकर म्हणाले की, आज लोकांचे अनेक प्रश्न आहेत. दोन वर्षांच्या कालावधीत राज्याचा विकास पूर्णपणे ठप्प आहे. आम्ही महाविकास आघाडी सरकारचे वाभाडे काढतोय. कोरोनाच्या नावाखाली राज्य २५ वर्षे मागे गेले. पण आम्ही जर त्यांचे दोष दाखवले, त्यांच्यावर टीका केली, तर अशा प्रकारचा इश्यू करायचा व आमच्यावर गुन्हे दाखल करायचे, असे हिटलरशाही पद्धतीचे काम महाविकास आघाडी सरकारचे सुरू आहे. पण आम्ही याची पर्वा करत नाही. अशा संघर्षाला आम्ही तयार आहोत असा इशाराही त्यांनी दिला.
यशवंत जाधव यांच्यासाठी वेगळा न्याय, राऊत यांच्यासाठी वेगळा न्याय आणि विरोधी पक्षासाठी वेगळा न्याय. कायद्यासमोर सगळे समान आहेत. म्हणून अशा प्रकारे सूडबुद्धीने केलेली कारवाई आम्ही सहन करणार नाही. टोकाचा संघर्ष करावा लागला तरी भाजपा तो करेल असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी आज अत्यंत वाईट व आक्षेर्पाह भाषा वापरली आहे. मग त्यांचे वक्तव्य आक्षेपार्ह नाही का? त्यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही. आशिष शेलार जे आक्षेपार्ह बोललेच नाही, त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधून दबाव आणायचा, पोलिसांची इच्छा नसतानाही गुन्हा दखल करायला लावण्याचा प्रकार चुकीचा आहे, अशी टिकाही दरेकर यांनी केली.

‘आठवणींतले प्रबोधनकार’ पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रकाशन

0

मुंबई, दि. 9 : थोर समाजसुधारक केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘आठवणींतले प्रबोधनकार’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनातील प्रेरणादायी कार्यावर आधारित लघुपट तयार करण्यात येणार असल्याची माहितीही मराठी भाषा मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिली.

प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरू केलेल्या ‘प्रबोधन’ या नियतकालिकाचे यंदा शताब्दी वर्ष सुरु आहे. या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या जीवनावर आधारित ‘आठवणींतले प्रबोधनकार’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा येथील मुंबई मराठी पत्रकार भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री.देसाई बोलत होते.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहिणे आणि ते वाचणे हे धाडसाचे काम असल्याचे सांगून मराठी भाषा मंत्री श्री.देसाई म्हणाले, प्रबोधनकार ठाकरे यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ‘प्रबोधन’ नियतकालिकाची सुरूवात केली, त्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले असून त्यांचे योगदान न विसरण्यासारखे आहे. प्रबोधनकारांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकाची निर्मिती होतेय ही आनंदाची बाब आहे. ‘आठवणीतले प्रबोधनकार’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन श्री.देसाई यांनी यावेळी केले. प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘प्रबोधन’ या नियतकालिकाच्या अंकात प्रकाशित झालेल्या जवळजवळ १ हजार ५०० लेखांचा संग्रह तयार करून त्याचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनातील प्रेरणादायी कार्यावर आधारित लघुपट तयार करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. देसाई यांनी यावेळी दिली.

पुस्तकाचे प्रकाशक भास्कर जाधव म्हणाले, हे पुस्तक तरूण पिढीसाठी प्रेरणादायी आणि विचारांच्या पलीकडे जावून कार्य करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरू केलेल्या चळवळीला पुढे नेण्यासाठी तरूणांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असे श्री.जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य, ‘मार्मिक’ चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार मंदार म्हात्रे यांनी केले.

खरा इतिहास सांगण्याची जबाबदारी आपलीच! देशाला पुन्हा सोनिया गांधींचे नेतृत्व लाभेल-बाळासाहेब थोरात

0

पुणे-देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर देश उभारणीत काँग्रेस पक्षाचे योगदान व काम मोठे आहे. मात्र, हे योगदान आणि काम नागरिकांपर्यंत पोहचवण्यात आपण कमी पडतो. त्यामुळे देशाचा इतिहास बदलण्याचे काम केले जात आहे. हे थांबवण्यासाठी सर्वांनी नागरिकांपर्यंत खरा इतिहास पोहचविण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे मत राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. तसेच देशाला पुन्हा एकदा सोनिया गांधी यांचे नेतृत्व लाभेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहासारखा तरुणांमध्ये देशप्रेम वाढविणारा मोठा उपक्रम अतिशय कल्पकतेने केल्याबद्दल याचे संयोजक आबा बागुल यांचे त्यांनी कौतुक करून शाबासकी दिली.


सन 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयाला 50 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांच्यातर्फे सुवर्ण विजय द्विसप्ताहाचे आयोजन केले आहे. या द्विसप्ताहाअंतर्गत आयोजित केलेल्या ‘एक स्वाक्षरी शहीद जवानांच्या अभिवादनासाठी’ या उपक्रमात प्रथम स्वाक्षरी करून बाळासाहेब थोरात सहभागी झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी व माजी आमदार उल्हास पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, नगरसेवक अरविंद शिंदे, रफिक शेख, नगरसेविका लता राजगुरु, सुजाता शेट्टी, संजय बालगुडे, कमल व्यवहारे, रजनी त्रिभुवन, विरेंद्र किराड, नीता रजपूत, मुख्तार शेख, जयसिंग भोसले, नरेंद्रपालसिंग बक्षी, सौ. जयश्री बागुल, अमित बागुल तसेच ब्लॉक अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी प्रथम चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल (कै.) बिपिन रावत यांच्या प्रतिमेस बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून या शूर सेनानीला मनोभावे आदरांजली वाहिली.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, ‘दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 1971 साली झालेले भारत-पाकिस्तान युद्ध देशाला दिशा देणारे होते. या युद्धात आणि बांगलादेशच्या निर्मितीमध्ये इंदिरा गांधी यांनी मुत्सद्देगिरी दाखवत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत कौतुक करताना इंदिरा गांधी यांचा उल्लेख ‘दुर्गामाता’ असा केला होता. यावरून दोन्ही नेत्यांचा मोठेपणा दिसून येतो,’ असे ते म्हणाले.मात्र, आता असा मोठेपणा पहायला मिळत नाही असे सांगून ते म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यात आणि देश उभारणीत काँग्रेस आणि गांधी-नेहरू घराण्याचे असलेले योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांना चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. बातम्यांमधून बदनामी करण्याचे काम केले जात आहे. गांधी-नेहरूंच्या विरोधात बोलणार्‍या महिलेला 40 जवानांचे संरक्षण देऊन पद्मश्री पुरस्कार दिला जात आहे. त्यामुळे खरा इतिहास नागरिकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडायला हवी. ही जबाबदारी आपण योग्य पद्धतीने पार पाडली तर पुन्हा एकदा देशाला सोनिया गांधी यांचे नेतृत्व लाभेल आणि सोनियाचे दिवस येतील, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.


याप्रसंगी डॉ. कुमार सप्तर्षी यांनी असा द्विसप्ताह आयोजित केल्याबद्दल आयोजक आबा बागुल यांचे कौतुक करून म्हटले की, आपले राष्ट्र धर्मनिरपेक्ष विचारांवर उभे आहे, त्यामुळे ते आजवर टिकून आहे. धर्मावर आधारलेल्या अनेक राष्ट्रांचे अनेक तुकडे झाले आहेत. मात्र, आज आपल्या देशाची वाटचाल धर्माच्या आधारावर सुरू आहे. महात्मा गांधी, भारतीय राज्यघटना आणि स्वातंत्र्य लढा या तीन गोष्टी दत्तमूर्तीसारख्या आहेत. मात्र, आज देशातील काही लोक दत्ताच्या तीन चेहर्‍यांपैकी केवळ एकच चेहरा हवा, असे म्हणत केवळ संविधान मान्य करत आहेत. गांधी आणि स्वातंत्र लढा नाकारत आहेत असे सांगून ते म्हणाले की, ‘कंगना ही पोपट आहे, तिचा बोलविता धनी वेगळाच आहे. देशाच्या सर्वोच्च सैनिकाचा आणि सर्वांत उत्तम असलेल्या हेलिकॉप्टरचा अपघात होतो, हे देशाला शोभणारे नाही, असेही डॉ. सप्तर्षी म्हणाले.


याप्रसंगी उल्हास पवार म्हणाले की, ‘तरुण पिढीमध्ये इतिहासातून देशभक्तीची प्रेरणा निर्माण होण्यासाठी आबा बागुल यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. महात्मा गांधी आणि देशासाठी बलिदान देणार्‍यांचा अपमान केला जातो. मात्र याचा निषेध करण्यासाठी एकही साहित्यिक पुढे येत नाही, हे दुर्दैव आहे. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक आबा बागुल यांनी केले. ते म्हणाले, ‘देशातील युवा पिढीला पंतप्रधान इंदिरा गांधींचे नेतृत्व आणि भारतीय सैन्यदलाचे कर्तृत्व याची ओळख चांगल्या रीतीने होण्यासाठी अशा द्विसप्ताहाचे मी आयोजन केले आहे. यास पुणेकरांनी फार मोठा प्रतिसाद दिला याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी शहरातील 25 नामवंत चित्रकारांनी साकारलेल्या ‘इंदिरा गांधी व 1971 चे युद्ध’ या विषयावरील पेंटिंग्जच्या प्रदर्शनाची पाहणी त्यांनी भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलादालनात केली. 16 डिसेंबर या विजयदिनी वसंतराव बागुल उद्यानात 120 फूट लांब व 40 फूट उंच पाण्याच्या पडद्यावर 20 मिनिटांची थ्रीडी लेझर फिल्मचे उद्घाटन होणार आहे. याचा तीन मिनिटांचा टीझर याप्रसंगी दाखविण्यात आला. शेवटी विरेंद्र किराड यांनी आभार मानले. घनश्याम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत न्यायालयाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश

0

पुणे: महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, जिल्हा न्यायालयाने पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील सार्वजनिक शौचालय, अतिक्रमणावर केलेल्या कारवाई दरम्यान झालेल्या वादानंतर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन एक महिन्यांत अहवाल द्यावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी कोथरूड परिसरातील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तोडण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. या कारवाईवरुन मोठा वाद झाला होता. परिसरातील नागरिकांनी जागा सोडून जावे यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनीच ही कारवाई केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर एका व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल केले होती. यावर जिल्हा न्यायालयाने सुनावणी करताना पोलिसांना गुन्हा नोंद करुन तपास करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचारले असता त्यांनी म्हटले, या प्रकरणात आपण सविस्तर माहिती घेऊन आपली बाजू लवकरच मांडणार आहोत.

‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्णदशक सोहळ्याची सुवर्णझळाळी!

0

मनोरंजन विश्वात वेगवेगळे पुरस्कार सोहळे होतात, पण सातत्य राखणाऱ्या काही सोहळ्यांचं आकर्षण आणि उत्सुकता कायम सिनेसृष्टीसोबतच रसिकांनाही असते. झी टॅाकीजचा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा मराठमोळा पुरस्कार सोहळा सर्वार्थानं सर्वांच्याच आकर्षणाचं केंद्र बनला आहे. महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्णदशक सोहळा नुकताच मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील मान्यवरांच्या साक्षीने दिमाखात संपन्न झाला. सुवर्णदशक सोहळ्याची सुवर्णझळाळी आणि मराठमोळ्या ग्लॅमरचा जबरदस्त जलवा रसिकांना या सोहळ्यात अनुभवायला मिळणार आहे.

महाराष्ट्राचा फेवरेट कोण?‘ सुवर्णदशक पुरस्कार सोहळ्यासाठी हॅालच्या गेटवर उभारलेली सुवर्णदशक सोहळ्याच्या ट्रॉफ़ीची आकर्षक प्रतिकृती आणि तिथलं एकूणच वातावरण अत्यंत ग्लॅमरस व भारावून टाकणारं होतं. नामांकनं मिळालेल्या सर्वांच्याच मनात सुवर्णदशक सोहळ्यातील पुरस्कारावर कोणाचं नाव कोरलं जाणार? याची उत्सुकता होती. अखेर पुरस्कार सोहळा संपन्न झाला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे फेवरेट असणाऱ्या कलाकार, गायक, गायिका, संगीतकार, दिग्दर्शकांनी विजेतेपदाचा मान पटकावला. महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ची ट्रॅाफी अभिमानानं मिरवत विजेत्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी काहींचा आनंद गगनात मावेनासा झाला, तर काहीजण भावूक झाले. खुमासदार सूत्रसंचालन, खोचक बुलेटीन, धडाकेबाज परफॅार्मंसेस, निरनिराळे स्कीट्स, आगामी चित्रपटांचं प्रमोशन आणि आशीर्वादरूपी दिग्ग्जांचा करण्यात आलेला सन्मान याने  महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’चीरंगत उत्तरोत्तर वाढतच गेली. मराठी सिनेसृष्टीतील तारे-तारका आणि तंत्रज्ञांसोबत बॅालिवूडमध्ये ‘शो मॅन’ म्हणून ओळखले जाणारे सुभाष घई, तसंच हिंदी सिनेसृष्टीत यशस्वी असलेला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखही या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होता.

शुभकार्याची सुरुवात गणेशवंदेनेनं करण्याची भारतीय परंपरा आहे. या परंपरेनुसार कोणत्याही पुरस्कार सोहळ्याची सुरुवात गणेश वंदनेनं केली जाते. महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी आणि एनर्जेटिक अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी गणेश वंदनेसाठी निवडलेल्या गाण्यांवर धडाकेबाज परफॅार्मंस सादर केला. कोकणात झालेल्या विमानतळाच्या पार्श्वभूमीवर पौराणिक व्यक्तिरेखांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं प्रासंगिक प्रहसन चांगलंच रंगलं. यात महाभारतातील धृतराष्ट्र, दुर्योधन, शिखंडी यांसारख्या काही व्यक्तिरेखांच्या तसेच अरब, चायनीज नागरिकांच्या अवताराच्या माध्यमातून हे स्कीट पहायला मिळेल. भारत गणेशपुरे, अभिजीत चव्हाण, सुनील तावडे, रोहित चव्हाण, अंकुर वाढवे आदी कलाकारांनी या स्कीटच्या माध्यमातून उपस्थितांना हसवलं.

महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या दिमाखदार सोहळ्याची आपली काही वैशिष्ट्ये आहेत. सुवर्णदशक सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे यात मराठी सिनेउद्योगासाठी उल्लेखनीय ठरलेल्या मागील दहा वर्षांमधील आठवणींना उजाळा देण्यात आला. या निमित्तानं बरेच जण दहा वर्षांमध्ये आपण केलेल्या वाटचालीच्या आठवणीत रमले. अनोखं सूत्रसंचालन हे ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’चं खास आकर्षण असल्यानं त्याकडं सर्वांचंच लक्ष लागलं होतं. महेश मांजरेकर यांनी सुरू केलेल्या अनोख्या व खुमासदार शैलीतील सूत्रसंचालनाची परंपरा अनेक वर्षांनंतर आजही सुरू आहे. १४ वर्षांपूर्वी झालेल्या पहिल्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या सोहळ्याच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. त्या आठवणींनाही सुवर्णदशक सोहळ्याच्या निमित्तानं उजाळा मिळाला. पहिल्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ पुरस्कार सोहळ्यात मांजरेकरांनी आपल्या अनोख्या शैलीत कलाकारांच्या गुण-अवगुणांवर मिश्किल शैलीत भाष्य करत बोट ठेवलं होतं. सूत्रसंचालनातील गंमत आणि परंपरा सुवर्णदशक सोहळ्यातही कायम होती. सुवर्णदशक सोहळ्यात मांजरेकरांनी पुन्हा आपलं बुलेटीन सादर करत मागील वर्षांतील आठवणींना उजाळा दिला. मांजरेकरांनी दाखवलेल्या वाटेनं जात आज महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’च्या मुख्य सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वप्नील जोशी आणि अमेय वाघ या दोन हरहुन्नरी अभिनेत्यांनी सांभाळली आहे. दोघांमधील तू तू मैं मैं, खेचाखेची, चढाओढ, विनोद सारं काही भन्नाट जमलं आहे. वर्षा उसगांवकर, किशोरी शहाणे, वैभव तत्ववादी, ईशा केसकर यांच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर अमेयच्या जोडीला वैदेही परशुरामी आणि ललित प्रभाकर आले आणि तिघांनी मिळून ‘झोंबिवली’ या आगामी चित्रपटातील गाण्यावर डान्स केला. सुभाष घई यांच्यासह सुबोध भावे, पूजा सावंत, सुशांत शेलार यांनी आपल्या ‘विजेता’ चित्रपटाच प्रमोशन यावेळी केलं. या सोहळयासाठी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादिदी, रमेश देव, सचिन पिळगावकर, अंकुश चौधरी, अलका कुबल, अशोक शिंदे, मृणाल कुलकर्णी,  तेजस्विनी पंडीत, पूजा सावंत, नागराज मंजुळे, प्रवीण तरडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर क्रांती रेडकर, आकाश ठोसर, केतकी माटेगावकर, आर्या आंबेकर अशी अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती. हा नेत्रदिपक सोहळा लवकरच झी टॅाकीजवर प्रसारीत होणार आहे.

या सोहळयाविषयी बोलताना ‘झी’च्या मराठी मुव्ही क्लस्टरचे चीफ चॅनेल ऑफिसर श्री.बवेश जानवलेकर सांगतात, महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सोहळयाचे रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान आहे. ते स्थान अबाधित राखण्याचा आमचा कायमच प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. या वर्षी सुवर्णदशक सोहळा सादर करतानाही हिच भावना आमच्या संपूर्ण टिमच्या मनात होती. मला विश्वास वाटतो तो विश्वास सार्थ ठरविण्याचा आम्ही यावर्षीही जोरदार प्रयत्न केला आहे.’

मुंबईच्या महिला महापौरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा आरोप :आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

0

सत्तेचा दुरुपयोग करून हा खोटा गुन्हा दाखल केला-आशिष शेलार

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पेडणेकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान सत्तेचा दुरुपयोग करून आपल्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.

वरळीच्या बीडीडी चाळीतील दुर्घटनेनंतर आशीष शेलार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच सांगितले जाते. तिथे सिलिंडरचा स्फोट होऊन चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आणि पाठोपाठ त्याच्या वडिलांनाही प्राण गमवावे लागले. मुंबईच्या महापौर मात्र ७२ तास उलटल्यानंतर रुग्णालयात पोहोचल्या. याच मुद्द्यावरुन शेलार यांनी महापौरांना लक्ष्य केले होते. नायर रुग्णालयात गेलेल्या जखमींना तब्बल ४५ मिनिटे उपचारांविना तसेच ठेवले गेले. त्यांच्यावर औषधोपचार नाही किंवा विचारपूसही करण्यात आली नाही. या बेफिकिरीमुळे चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला, असे नमूद करत शेलार यांनी महापौरांवर टीका केली होती.

शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात भाजपा आमदार आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली असताना आशिष शेलार यांनी याबाबत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आपण कोणत्याही प्रकारे कोणत्याही महिलेची बदनामी केली नसून ही खोटी तक्रार आणि खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा आशिष शेलार यांनी यावेळी केला. तसेच, तपासामध्ये पूर्ण सहकार्य करणार असून न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास आहे, असं देखील ते म्हणाले.

“ही तक्रार खोटी, गुन्हा खोटा, कायदेशीर प्रक्रिया खोटी. या राज्यात पोलीस बळाचा दुरुपयोग, सत्तेचा दुरुपयोग केवढ्या मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो, याचं हे जिवंत उदाहरण आहे. मी कोणत्याही महिलेबाबत, महापौरांबाबत, कोणत्याही व्यक्तीबाबत अपमानास्पद, बदनामीकारक वक्तव्य, छेडछाड किंवा कोणताही गुन्हा केलेला नाही. सातत्याने दोन दिवस वेगवेगळ्या पोलीस स्थानकात दबावतंत्र करून, सत्तेचा दुरुपयोग करून हा खोटा गुन्हा दाखल केला आहे”, असं आशिष शेलार म्हणाले.

पुण्याच्या कॉंग्रेस भवन मध्ये ‘मोगरा तर फुलला’..

पुणे- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस मध्ये ‘ मोगरा फुलला’ चा भास होऊ लागला आहे. सोनिया गांधींचा वाढदिवस त्याकरिता दरवर्षीप्रमाणे होणारे कार्यक्रम आणि पाक विरुद्ध झालेल्या युद्धाच्या इंदिराजींच्या संग्रामाची सुवर्ण महोत्सवी आठवण युवा वर्गाला देणाऱ्या कार्यक्रमांची मंदियाळी सुरु असताना नेत्यांचे होणारे आगमन , आणि आलेली निवडणूक या पार्श्वभूमीवर आता ५ वर्षे कधीही न फिरकलेले माजी नगरसेवक, कार्यकर्ते देखील कॉंग्रेस भवनाच्या आवारातील गर्दीत दिसू लागले आहेत.शहरात राष्ट्रवादी आणि भाजपची अधून मधून झालेली जवळीक आणि याच दोन्ही पक्षांची एकमेकांवर जोरदार आघात करत वाढलेली ताकद बहुधा कॉंग्रेसला संजीवनी देणारी ठरेल असे वाटू लागल्याने ,आणि त्यात प्रदेश अध्यक्ष म्हणून लाभलेल्या नाना पटोले यांच्या स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेमुळे आता कार्यकर्त्यांचा हा गोतावळा वाढत असला तरी कॉंग्रेसला मागे खेचणाऱ्या गेल्या १० वर्षाच्या वादळात सातत्याने कॉंग्रेसची मशाल ज्वलंत ठेवण्यासाठी शहर अध्यक्ष रमेश बागवे आणि मोहन जोशी ,उल्हास पवार , आबा बागुल,अरविंद शिंदे,अभय छाजेड आणि पुत्र अविनाश बागवे यांच्या मदतीने सातत्याने घेतलेली मेहनत या गर्दीत आता ठळकपणे दिसून येणारी ठरते आहे. यांनी जेवढी आंदोलने गेल्या ५ वर्षात केली तेवढी आंदोलने कोणीच कधीच केली नव्हती . यातील ९५ टक्के आंदोलने हि सामान्य , मध्यमवर्गीय जनतेशी निगडीत असलेल्या अत्यंत जवळच्या प्रश्नांवर होती .तेव्हा कार्यकर्ते जमा करू पाहणाऱ्या याच नेत्यांना आता कॉंग्रेस भवनात उसळू पाहणारी गर्दी आणखी प्रेरणा देणारी ठरणार आहे. महापालिकेत आबा बागुल, अरविंद शिंदे आणि अविनाश बागवे यांच्या धडाडत्या तोफांपुढे १०० सैनिकांचा ताफा प्रभावहीन झाला तर कधी अधून मधून त्यांना साथ दिलेल्या एम आय एम , रिपब्लिकन आणि राष्ट्रवादीचाही चेहरा उघड पडला . त्यांच्या या लढ्यामुळे साहजिक त्यांना त्यांच्यावर सोडण्यात येणाऱ्या ‘सरकारी अस्त्रांचा ‘ हि सामना करावा लागलाच .पण अवघ्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आणि शिवाय एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंडे असलेली कॉंग्रेसची हि मंडळी बाजूला हटली नाहीत . आता ती देखील आता एकत्रित वावरायला लागल्याने कार्यकर्त्यांचे बळ हि वाढलेले दिसते आहे .एकूणच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुलू लागलेला मोगरा आणि त्यात आता आज होणारी कन्हैया कुमारांची सभा या मोगऱ्याचा सुगंध कसा, कुठवर ,किती दरवळत नेणार आहे ते मात्र येता काळच स्पष्ट करणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

0

पुणे, दि.8 : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत सासवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात 2021-2022 साठी अनुसूचित जाती, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

प्रवेशासाठी विद्यार्थी हा बाहेरगावचा परंतु सासवड ता.पुरंदर येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा. मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, सक्षम प्राधिकाऱ्याच्या सहीचे जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र निवासाचे प्रमाणपत्र, तसेच महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, मुलाचे आणि वडिलांचे आधारकार्ड, शिधापत्रिकेची सत्यप्रत अर्जासोबत जोडावी. कोविड-19 आजाराबाबत वडिलांचे/लाभार्थ्यांचे लेखी संमतीपत्रक असावे. शाळा अथवा महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू असल्याबाबत मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचे लेखी हमीपत्र देखील अर्जासोबत असणे आवश्यक आहे.

शासकिय वसतिगृहात विनामुल्य निवास व भोजनाची सुविधा आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दराने पुस्तके, इतर शैक्षणिक साहित्य आदीकरिता रक्कम आणि दरमहा निर्वाह भत्ता रक्कम 500 रुपये आधार क्रमांक जोडलेल्या विद्यार्थ्याच्या बचत खात्यावर जमा होते.

कोविड-१९ महामारीमुळे रिक्त जागेच्या ५० टक्केच जागा भरल्या जाणार आहेत. बाहेरगावाकडील परंतू सासवड ता.पुरंदर परिसरात शिक्षण घेणा-या गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरिता वसतिगृहात येऊन नोंदणी करावी, असे आवाहन वसतीगृह अधीक्षक व्ही.आर.जवळकर यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड 250 मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

0

पुणे, दि.8 : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत पिंपरी-चिंचवड, सेक्टर -4, स्पाईनरोड पथ क्रमांक-8, ॲक्वार्ड हॉस्पिटल मोशी प्राधिकरण येथील 250 मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात 2021-22 साठी अनुसूचित जाती, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

प्रवेशासाठी विद्यार्थी हा बाहेरगावचा परंतु पुणे, पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा. मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, सक्षम प्राधिकाऱ्याच्या सहीचे जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र निवासाचे प्रमाणपत्र, तसेच महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, मुलाचे आणि वडिलांचे आधारकार्ड, शिधापत्रिकेची सत्यप्रत अर्जासोबत जोडावी. कोविड-19 आजाराबाबत वडिलांचे/लाभार्थ्यांचे लेखी संमतीपत्रक असावे. शाळा अथवा महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू असल्याबाबत मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचे लेखी हमीपत्रदेखील अर्जासोबत असणे आवश्यक आहे.

शासकिय वसतिगृहात विनामुल्य निवास व भोजनाची सुविधा आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दराने पुस्तके, इतर शैक्षणिक साहित्य आदीकरिता रक्कम आणि दरमहा निर्वाह भत्ता रक्कम ८०० रुपये आधार क्रमांक जोडलेल्या विद्यार्थ्याच्या बचत खात्यावर जमा होते.

कोविड-19 महामारीमुळे रिक्त जागेच्या 50 टक्केच जागा भरल्या जाणार आहेत. बाहेरगावाकडील परंतू पुणे पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण परिसरात शिक्षण घेणा-या गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरिता वसतिगृहात येऊन नोंदणी करावी, असे आवाहन वसतीगृह अधीक्षक व्ही.आर.जवळकर यांनी केले आहे.

कामगारांना ५० किलोपेक्षा जास्त भार वाहू देऊ नये – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश

0

मुंबई, दि. 8 : विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या शरीरस्वास्थ्याला  व सुरक्षिततेला धोका पोहोचू नये त्यासाठी कामगारांकडून 50 किलो वजनापेक्षा जास्त मालाची हाताळणी करू नये, असे निर्देश सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत.

मंत्रालयात  सहकार व पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांना 50 किलो वजनाच्यावर भार वाहू न देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक सुनील पवार, सहायक निबंधक, अहमदनगर, शरीफ शेख, सहायक निबंधक सोलापूर श्री.माने, एपीएमसीचे संचालक अशोक वाळुंज, कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई उपसभापती धनंजय वाडकर, सचिव संदीप देशमुख, संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख, चंद्रकांत पाटील, माथाडी कामगार युनियनचे खजिनदार गुंगा पाटील, किराणा बाजार दुकाने मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ,व्यापारी राजीव मणियार व कामगार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पणन मंत्री श्री.पाटील म्हणाले, बाजार समित्यांमध्ये 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या,  शेतमालाची माथाडी कामगारांकडून चढ-उतार करणे आरोग्यांच्या दृष्टीने घातक आहे. माथाडी कामगारांकडून 50 किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांमधून मालाची चढ-उतार होणार नाही या बाबत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे निर्देश श्री.पाटील यांनी दिले.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर राज्यातून येणारा माल असतो. त्या संबंधित राज्याला सुद्धा 50 किलोपेक्षा अधिक गोण्या भरू नये अशा सूचना द्याव्यात आणि पणन व कामगार विभागाने राज्यातील सर्व बाजार समित्यांना यासंदर्भात कळवावे. त्याचबरोबर स्थानिक जिल्हा उपनिबंधक यांनी याबाबत अधिक जन जागृती करावी, असेही सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

३३ कोटी वृक्ष लागवाडीसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेबाबत तदर्थ समितीची बैठक

0

मुंबई, दि. 8 : राज्यात 33 कोटी वृक्ष लागवाडीसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेबाबत तदर्थ समितीचे प्रमुख वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

विधानभवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा सदस्य  नाना पटोले, विधानसभा सदस्य सुनिल प्रभु, उदयसिंग राजपूत, बालाजी कल्याणकर, अशोक पवार, अमित झनक, संग्राम थोपटे, विधिमंडळ सचिवालयचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, सहसचिव विलास आठवले, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, प्रधान वन संरक्षक जी.साईप्रकाश, प्रधान वनसंरक्षक  डॉ.वाय.एल.पी.राव, मुख्य वनसंरक्षक डॉ.रविकिरण गोवेकर, प्रधान मुख्य वन संरक्षक अर्थसंकल्प, नियोजन व विकास प्रदीप कुमार, अपर प्रधान मुख्य वन सरंक्षक एम.श्रीनिवास राव यावेळी उपस्थित होते.

शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

0

पुणे दि. 8: मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येरवडा (पुणे) या संस्थेला सर्व सोईसुविधायुक्त खासगी इमारत भाड्याने आवश्यक असून इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपालांनी केले आहे.

या वसतिगृहामध्ये इ. 11 वी ते 12 वी आणि पदविकापर्यंतच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींना मोफत प्रवेश दिला जातो. या संस्थेसाठी 5 हजार ते 5 हजार 500 चौ. फूट इतक्या क्षेत्रफळाची इमारत आवश्यक असून त्यामध्ये किमान 20 ते 25 खोल्या, 10 संडास, 10 बाथरुम, वीज, पिण्याचे पाणी, पाणी साठवणुकीची सोय आदी सुविधा तसेच इमारतीभोवती संरक्षक भिंत असणे आवश्यक आहे.

इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या पुणे शहराच्या जवळपासच्या भागातील इमारत मालकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, पुणे (दूरध्वनी 020-29706611) अथवा गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, येरवडा पुणे 06 (भ्रमणध्वनी क्र. 9561568459) येथे संपर्क साधावा.