Home Blog Page 2061

‘एम्प्रेस ऑफ पुणे 2022’ सौंदर्य स्पर्धा पुण्यात दिमाखात संपन्न

0

पुणे-दिवा पेजंट्स’चे संचालक कार्ल व अंजना मस्कारेन्हास यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘एम्प्रेस ऑफ पुणे 2022’ ही सर्वोत्कृष्ट सौंदर्य स्पर्धा नुकतीच पुण्यात दिमाखात संपन्न झाली. यंदा या स्पर्धेत मिस व मिसेस या श्रेणींमध्ये ३० अंतिम स्पर्धकांनी आपली बुद्धिमत्ता तथा सौंदर्याचा आविष्कार घडवला. ही महाअंतिम फेरी हयात रीजेन्सी पुणे (आतिथ्य प्रायोजक) येथे पार पडली. कार्यक्रमाचे सादरीकरण विनय अरान्हा यांनी ‘कॉस्मेटोप्लास्ट’च्या सहकार्याने केले.

‘दिवा’ने या स्पर्धकांची उत्कृष्ट तयारी करुन घेतली होती. अंजना व कार्ल यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली त्यांना स्वपरिचय फेरी, आवाजातील चढउतार, रंगमंचावरील वावर, प्रश्नोत्तर सत्र अशा कौशल्यांत पारंगत करण्यात आले.

परीक्षक मंडळात प्रसिद्ध चित्रपट तारे तथा नामवंतांचा समावेश होता. त्यात विनय अरान्हा (रोझरी फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक), डॉ. विक्रमादित्य साळवी (कॉस्मेटोप्लास्टचे व्यवस्थापकीय संचालक), दीपशिखा नागपाल (अभिनेत्री), दीप्ती चाको बांगेरा (मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन २०२१ – प्लस विजेत्या), डॉ. फर्झाना लकडावाला (मिसेस महाराष्ट्र २०२१ सेकंड रनर अप) आणि कार्ल मस्कारेन्हास (दिवाचे संचालक) यांनी सहकार्य दिले.

आंतरराष्ट्रीय सूत्रसंचालक व गायिका दिलरुबा पांडे यांनी आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकवृंदाला मंत्रमुग्ध केले.

मिसेस श्रेणीतील विजेते :

–    मिताली करंदीकर – विजेत्या

–    प्रियांका गादिया – फर्स्ट रनर अप

–    दीपाक्षी श्रिंगारे – सेकंड रनर अप

मिस श्रेणीतील विजेते :

–    लावण्या पाटी – विजेत्या

–    अंजली बावस्कर – फर्स्ट रनर अप

प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक पूजा सिंग यांनी कार्यक्रमाचे दिग्दर्शन व नृत्य संयोजन केले. त्यांना मृणाली तायडे व अश्विनी नलावडे यांची प्रभावी साथ लाभली.

पुण्याची सर्वोत्कृष्ट दर्जाची सौंदर्य स्पर्धा ठरलेल्या या कार्यक्रमाने उपस्थित असेल्या सर्वांना डेअर*ड्रीम*डॅझल (धाडस करा-स्वप्न पाहा-स्तिमित करा) ही प्रेरणा दिली.

महिला सक्षमीकरणासाठी ग्रामसभा

0

आंतरराष्ट्रीय महिला दिन हा सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या महिलांना सक्षम करण्यासाठी साजरा केला जातो. यावर्षी ‘उद्याच्या उज्वल भवितव्यासाठी आजची लिंग समानता’ ही संकल्पना समोर ठेवून हा दिवस जगभरात साजरा करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम यापूर्वीदेखील राबविण्यात आले आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने गावतपातळीवर विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी महाफेरफार अभियानांतर्गत प्रॉपर्टी कार्डवर (8 अ) महिलांची नावे समाविष्ट करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषदेच्या आवाहनाला अनेक घरांमधून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे.

विशेष ग्रामसभांमध्ये महिलांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. महिलांची नावे समाविष्ट करण्यासाठी प्रॉपर्टी कार्डमधील उत्परिवर्तनांचे अर्जही स्वीकारण्यात येतील. स्वामित्व योजनेंतर्गत सर्वेक्षण पूर्ण झालेल्या गावांमध्ये नकाशासह अद्ययावत प्रॉपर्टी कार्ड महिलांना देण्यात येणार आहे. मालमत्तेची मालकी हा सक्षमीकरणाचा महत्त्वाचा पैलू असून त्यादिशेने वाटचाल करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.

पुणे जिल्ह्यात सुमारे अडीच लाख महिला बचत गटात सहभागी आहेत. ग्रामसभेच्या माध्यमातून गावात ‘एक क्लस्टर एक उत्पादन’ कार्यक्रमालाही गती देण्याचा प्रयत्न आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यपदांपैकी 50 टक्याहिपेक्षा जास्त पदे महिलांकडे आहेत. ग्राम रोजगार सेवक, जलसुरक्षा, तंटामुक्त गाव  आदी ग्रामसभांनी निवडून दिलेल्या कार्यकारी पदांवर महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी महिला विशेष ग्रामसभेला अशा व्यक्तींना नामनिर्देशित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मनरेगा अंतर्गत कामगार अर्थसंकल्प आणि मुद्रांक शुल्क, मालमत्ता कर आणि 15 व्या वित्त आयोगाचा वापर करून ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पावर ग्रामसभेत चर्चा होणार आहे. महिलांना अर्थसंकल्प समजावा आणि महिलांना त्यांच्या दैनंदिन श्रमाची उत्पादकता वाढविण्यास मदत होईल व्हावी असे प्रयत्न आहेत. आर्थिक चर्चेमुळे भविष्यातील नियोजन प्रक्रियेत महिलांच्या विशिष्ट गरजा भागविण्यास मदत होईल.

ग्रामसभेला घरगुती हिंसाचार, बाल लैंगिक अत्याचार, कार्यक्षेत्रावरील लैंगिक छळ रोखणे, सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी असुरक्षित क्षेत्रे यांच्याविरुद्ध सक्रिय कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. विवाहातील हुंडा प्रथेला प्रतिबंध करणे, अल्पवयीन मुलींचे विवाह करणे आणि लिंग-निवडक गर्भपात किंवा स्त्री अर्भकांचा मृत्यू रोखणे आदी बाबींसंदर्भातदेखील ग्रामसभेच्या माध्यमातून जनजागृती घडवून आणण्यात येणार आहे.

महिलांना दूरच्या अंतरावरून पाणी आणण्याच्या घरगुती जबाबदाऱ्यांपासून मुक्त करणे आणि गावाचा परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासासाठी शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीलाही गती देण्यात येत आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून अंगणवाडी, जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळा आणि आरोग्य केंद्रे – उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय यांच्या कामकाजावर चर्चा घडवून त्यांच्या कामांचे विश्लेषणदेखील करण्यात येणार आहे. एकंदरीतचमहिलांसाठीच्या विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून महिलांच्या समस्या दूर करीत त्यांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. या अनुभवातून महिलांच्या उन्नतीसाठीची पुढील दिशा निश्चितपणे गवसेल असा विश्वास वाटतो.

–     आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

पवारांचा मेट्रोशी काडीचा संबध नाही-गिरीश महाजनांनी घेतला समाचार

0

नाशिक -शरद पवार हे गतवेळी त्यांचा काही संबंध कारण नसताना मेट्रोतून फिरून आले होते. मी किती चांगलं काम करतो हा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्या मेट्रोचा आणि त्यांचा काडीचा संबंध नाही. पण ते मेट्रोमधून का फिरले. मला वाटतं हे सगळे राजकीय आरोप-प्रत्यारोप आहेत.” असं म्हणत शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन होईल. या पार्श्वभुमीवर शरद पवार यांनी एक दिवस आधी शनिवारी पुणे येथे एका कार्यक्रमात माध्यमाशी संवाद साधला. मेट्रोचं काम पूर्ण झालं नाही तरी उद्घाटन होतय, असं पवारांनी वक्तव्य केलं. शरद पवारांच्या या विधानाचा खरपूस समाचार भाजप नेते गिरीश महाजन यांनी घेत त्यांना प्रत्युत्तर दिलं.

नाशिक येथे भाजप नेते आमदार गिरीश महाजन म्हणाले “शरद पवार यांच्या वक्तव्याला कुठेही काही अर्थ नाही. शरद पवार हे गतवेळी त्यांचा काही संबंध नसताना, काही कारण नसताना मेट्रोतून फिरून आले होते. मी किती चांगलं काम करतो हा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्या मेट्रोचा आणि त्यांचा काडीचा संबंध नाही. पण ते मेट्रोमधून का फिरले. मला वाटतं हे सगळे राजकीय आरोप-प्रत्यारोप आहेत

त्यांचा प्रयत्न हाच आहे की, पंतप्रधान येत आहेत. पुणे भाजपमय, मोदीमय झालं. त्यामुळे त्यांना साहाजिकच वाईट वाटतंय. म्हणून त्यांना असं विधान करावं लागतंय.”

काय म्हणाले होते शरद पवार

मेट्रो प्रकल्पाच्या व अन्य विकासकामाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी उद्या पुण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलले.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी पुण्यात मेट्रोच्या उद्घाटनासाठी येत आहेत. पण ते अर्धवट कामाचे उद्घाटन करतील. अजूनही मेट्रोचे काम पूर्ण झालेले नाही. याचा विचार पंतप्रधानांनी केला असावा’, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. प्रकल्पांची उद्घाटने करण्यापेक्षा युक्रेनमधील मुलांना सोडवून आणणे अधिक गरजेचे आहे.

‘रशिया व युक्रेनमधील युद्धाचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसला आहे. भारतातील अनेक विद्यार्थी आजही युद्धग्रस्तयुक्रेनमध्ये अडकले आहेत. कोणी काय केले, काय केले नाही यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. आपल्या विद्यार्थ्यांना कसे युक्रेनमधून वाचवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत, पण ते अधिक जोमाने प्रयत्न करण्याची गरज आहे. पुण्यात सध्या काही महत्त्वाचे प्रकल्प येत आहेत. मेट्रो प्रकल्प पूर्ण व्हायला अनेक वर्षे लागणार आहेत. त्याचे आपण उद्घाटन करत आहोत. नदी सुधार प्रकल्पाचेही उद्घाटन होत आहे. ही कामे महत्त्वाची आहेत, पण आता भारतीय विद्यार्थ्यांना सोडवून आणण्याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे.

साहिर हा लोकांचा कवी – जावेद अख्तर

0

‘पिफ २०२२’मध्ये विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानाला मोठा प्रतिसाद  

पुणे, दि. ५ मार्च – साहिर लुधयानवी यांनी माणसांची गाणी लिहिली त्यातून मानवी मूल्यांचे तत्त्वज्ञान उभे केले, असे मत गीतकार-पटकथाकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केले. 

‘पीव्हीआर आयकॉन’ चित्रपटगृहामध्ये २० व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (‘पिफ २०२२’) विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानामध्ये अख्तर बोलत होते. चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यावेळी उपस्थित होते.   

अख्तर म्हणाले, “साहिर लुधियानवी यांनी आपल्या गीतांमधून सामान्य माणसाला मध्यवर्ती ठेवले आणि त्यांनी आपल्या प्रेम गीतांमध्ये निसर्गाला सामावून त्यांनी घेतले. त्यामुळे त्या गोष्टींना मोठा आयाम मिळायचा. त्यातून नवे विचार यायचे. शैलेंद्र, साहिर हे केवळ गीतकार नव्हे तर लोकांचे तत्त्वज्ञ होते.” 

अख्तर पुढे म्हणाले, की साहिर हे एका वेगळ्याच धाटणीचे होते. साधेपणा, हुशारी, सर्जनशीलता या गोष्टी उत्तम लेखक म्हणून तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. हे सगळे साहिर यांच्याकडे होते. तुमच्या भावना प्रामाणिक असतील, हृदयातून निघालेल्या गोष्टी असतील तर त्या लोकांना प्रभावित करतात. कामामध्ये गुणवत्ता असणे गरजेचे असते, जे साहिर यांनी कामातून दाखवले. त्यांच्या कविता आणि चित्रपटातील गाणी एकमेकांपासून अजिबात वेगळी नव्हती. त्यांच्या कविता आणि साहित्य हे  चित्रपटातील गाणी झाली.

“साहिर आणि त्या काळातले अनेक लेखक हे एका तत्त्वज्ञानातून आले होते. साहिर मुन्शी प्रेमचंद यांनी स्थापन केलेल्या आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या मार्गदर्शन लाभलेल्या प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनमध्ये होते. या संघटनेतून जे लेखक, कवी आले त्यांनी विषमता, गुलामी आणि वसाहतवाद यांच्याविरुद्ध लेखणी चालवायची शपथ घेतली. त्यातून प्रेम आणि मानवतेच्या कविता, गाणी निर्माण झाली”, असे अख्तर म्हणाले. 

विजय तेंडुलकर यांच्या नावाने आपण जुहूमध्ये खासदार निधीतून रंगमंच तयार केल्याचे सांगून अख्तर म्हणाले, “आम्हाला पूर्वी असे असे वाटायचे हिंदी, उर्दू आणि बंगाली याच समृद्ध भाषा आहेत. पण मी जेंव्हा ‘गिधाडे’ हे नाटक बघितले तेंव्हा माझे डोळे उघडले. जे मराठीत होते, ते खूप पुढचे सांगणारे होते. भाषा ही संवाद साधण्यासाठी असून सुद्धा कधी कधी तीच संवादामधील भिंत बनते. त्यामुळे आपण इतर भाषांमध्ये काय चालले आहे, हे पहिले पाहिजे. विजय तेंडुलक अतिशय सभ्य, शांत मृदू स्वभावाचे होते पण त्यांनी स्वभावाच्या विपरीत नाटके लिहिली. त्यांच्या लेखनातून आग यायची.  तेंडुलकर, इस्मत चुगताई, कृष्ण चंद्र हे भारतातील खूप मोठे लेखक-नाटककार होते.”

अख्तर म्हणाले, की खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये माणूस व्यक्तिवादी झाला आहे. आपण समाज म्हणून एकत्र असण्याचे दिवस गेले आहेत. लोकांचे दुःख स्वीकारण्याचे एक मूल्य होते. ते मूल्य आता समाज म्हणूनच मागे गेले आहे. आताची मूल्य व्यवस्थाच बदलली आहे. समाजाचा प्रभाव चित्रपटांवर खूप पडला आहे. आत्ताच्या चित्रपटांमध्ये दुःखाची गाणी नसतात. सगळे काही ठीक असल्याचे दाखवले जात आहे. समाज एक प्रकारच्या दिखाव्यामध्ये जगत आहे. 

या व्याख्यानाला युवा-युवतींनी मोठा प्रतिसाद दिला आणि जावेद अख्तर यांना विविध विषयांवर प्रश्न विचारून बोलते केले. 

अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्राजक्ता चव्हाण यांची निवड

0

पुणे : अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी पुण्यातील फार्मासिस्ट प्राजक्ता दशरथ चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेश सचिव रोहित वाघ यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले. असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पंकज चौधरी, पश्चिम महाराष्ट्र अध्‍यक्ष प्राचार्य महेश मराठे यांच्या शिफारशीनुसार सर्वानुमते चव्हाण यांची निवड झाली आहे.

फार्मासिस्टवर होणाऱ्या अन्यायाविरोधात चव्हाण पश्चिम महाराष्ट्र विभागातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रभर काम करतात. कोरोना काळामध्ये सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी बजावलेल्या कर्तव्याची दखल घेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल शैक्षणिक, अध्यात्मिक व राजकीय क्षेत्रामधून त्यांचे अभिनंदन होत आहे. भविष्यात फार्मासिस्टच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी प्राजक्ता चव्हाण प्रयत्नशील राहतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे यांनी व्यक्त केला आहे.

निवडीबद्दल आनंद व्यक्त करत प्राजक्ता चव्हाण म्हणाल्या, “फार्मासिस्टना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ही निवड उपयुक्त ठरेल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करील.” 

“काम झालेले नसतानाही मेट्रोचे उद्घाटन”; पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यावरुन शरद पवारांचा टोला

 पुणे-“देशाचे पंतप्रधान उद्या या ठिकाणी येत आहेत. त्यांचे काही कार्यक्रम होत असतील तर तक्रार करण्याचे कारण नाही. मेट्रो रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. एका महिन्यापूर्वी मेट्रोच्या प्रमुखांनी मला मेट्रो दाखवण्यासाठी नेले होते. जेथून मेट्रो धावणार आहे तेथून मी प्रवासही केला. त्यावेळी मेट्रोचे काम झालेले नाही हे माझ्या लक्षात आले. काम झालेले नसतानाही उद्घाटन होत आहे. माझी त्याबद्दल काही तक्रार नाही,” असे शरद पवार यांनी म्हटले.“पंतप्रधान मोदी नदी सुधारणाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. नदीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. पण सुधारणेचा कार्यक्रम मर्यादित ठेवतात आणि आजूबाजूला सोईसुविधा करतात. मी इंजिनियर नाही पण वर किती धरणे आहेत हे मला माहिती आहे. उद्या एखाद्यावेळेस वर ढगफुटी झाली आणि नदीचे पात्र कमी केले तर त्याचे पाणी कुठे जाईल याची माझ्यासारख्यांना चिंता आहे. पंतप्रधान येत आहेत म्हणजे त्यांनी विचार केला असेल, असे मी समजतो. पण संकट आले तर याचा फटका आजूबाजूच्या गावांना बसेल याचा काळजी मला आहे,” असे शरद पवार यांनी म्हटले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात मेट्रोच्या गरवारे स्थानकापासून आनंदनगर स्थानकापर्यंतचा प्रवास नरेंद्र मोदी मेट्रोतून करणार आहेत. त्यानंतर जवळील मोकळ्या मैदानावरून जाहीर कार्यक्रमाद्वारे ते पुणेकरांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यापासून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होणार असून राजकीय रणधुमाळी रंगणार आहे

.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या रविवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी महापालिकेतून कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय येथे पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन आणि मेट्रोने आनंदनगपर्यंतचा प्रवास करणार आहेत. त्यानंतर जवळील मोकळ्या मैदानावरून जाहीर कार्यक्रमाद्वारे ते पुणेकरांना संबोधित करणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जानेवारीमध्ये पिंपरी-चिंचवडला येऊन मेट्रो स्थानकांची पाहणी करून मेट्रोतून प्रवासही केला होता. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यावरुन शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनायास : एक काव्यसंग्रह चे प्रकाशन रविवारी

0

पुणे : आयुष्यात येणारी सुख- दु:खे, जीवनाचे ध्येय, त्याकडे पाहण्याचा मानवी दृष्टीकोन, जीवनातील मित्र-मैत्रिणींचे महत्त्व व त्यांचे मनात असणारे स्थान अशा अनेक विषयांच्या माध्यमातून मानवी जीवनातील भाव-भावनांचे सहज वर्णन आणि विश्लेषण असलेल्या “अनायास” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवार, दिनांक ६ मार्चला गोखले इन्स्टिटयूटमध्ये होणार आहे.

“अनायास” हा काव्यसंग्रह रेखा मंत्री व रवी काबरा यांच्या लेखणीतून साकारला आहे. काव्यसंग्रहाचे विमोचन प्रसिद्ध लेखिका डॉ.नीला बोरवणकर व औरंगाबादचे उद्योजक प्रकाश राठी यांच्या हस्ते होणार आहे.

” अनायास ” च्या माध्यमा द्वारे हिंदी साहित्य रसिकांना हिंदी कविता वाचण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. पुस्तकाच्या विक्रीतून गोळा होणारा निधी गरजू व्यक्ती व सामाजिक संस्थांना मदत म्हणून देण्यात येणार आहे.

सकाळी 11 वाजता पंतप्रधान पुणे महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण, साडेअकरा वाजता मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन

0

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च 2022 रोजी पुण्याला भेट देतील आणि पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करतील. तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही ते करणार आहेत.

सकाळी 11 वाजता पंतप्रधान पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. हा पुतळा 1850 किलोग्रॅम गन मेटलचा बनवलेला असून त्याची उंची सुमारे 9.5 फूट आहे.

सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. पुण्यातील नागरी वाहतुकीसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण 32.2 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांब मार्गाचे  उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. हा संपूर्ण प्रकल्प 11,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला जात आहे. ते गरवारे मेट्रो स्थानकात प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पाहणी करतील आणि तिथून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास करतील.

दुपारी 12 वाजता पंतप्रधान अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणीही ते करणार आहेत. नदीच्या 9 किमी पट्ट्यात 1080 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून पुनरुज्जीवन केले जाईल.  यामध्ये नदीकाठचे  संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापन (इंटरसेप्टर सीवेज नेटवर्क), सार्वजनिक सुविधा, नौकाविहार सुविधा इत्यादी कामांचा समावेश असेल. मुळा-मुठा नदीचे  प्रदूषण कमी करणारा प्रकल्प 1470 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चासह  “एक शहर एक ऑपरेटर” या संकल्पनेवर राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 11 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले जातील, त्यांची एकत्रित क्षमता सुमारे 400 एमएलडी असेल. बाणेर येथे  100 ई-बस आणि ई-बस डेपोचेही पंतप्रधान लोकार्पण करतील.

पुण्यात बालेवाडी येथे बांधण्यात आलेल्या आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण म्हणजे मालगुडी गावावर आधारित छोटेखानी प्रतिकृती (मॉडेल) आहे जी ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून जिवंत केली जाणार आहे. व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांनी काढलेली व्यंगचित्रे संग्रहालयात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यानंतर, दुपारी 1:45 वाजता, पंतप्रधान सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ करतील.

वाचन संस्कृती जपण्याची गरज-खासदार प्रकाश जावडेकर

0

पुणे, ता. ५ मार्च : टीव्ही आल्यावर वाचन संस्कृती कमी झाली. वाचन हेच ज्ञानाचा आधार आहे. तो जपला पाहिजे. झपाट्याने वाचन केले पाहिजे. अभ्यासाव्यतिरिक्त पूरक वाचन आवश्यक आहे. वाचनाच्या संस्कारांमुळे माणूस चांगला बनतो. त्यासाठी वाचन संस्कृती जपण्याची गरज असून ती वाढविण्यासाठी सिटी लायब्ररीसारखे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे मत खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

पुणे महापालिका आणि जावडेकर यांच्या खासदार निधीतून घोले रस्त्यावर उभारण्यात येणार्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सिटी लायब्ररी’ प्रकल्पाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. जावडेकर यांनी प्रकल्पासाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांच्या प्रयत्नातून प्रकल्प साकारत आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सुनीता वाडेकर, शिक्षण समितीच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक सुशील मेंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जावडेकर पुढे म्हणाले, ‘पुणे विद्येचे माहेरघर आहे. देश-विदेशातून विद्यार्थी आणि पर्यटक शहरात येत असतात. त्या सर्वांसाठी हे प्रेक्षणीय स्थळ आणि पुण्याचे वैभव ठरेल असा विश्वास वाटतो. या ठिकाणच्या मामाराव दाते मुद्रणालयाचे सिंहगड रस्त्यावर स्थलांतर करण्यात आले आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे मुद्रण व्यवसायात आमूलाग्र बदल झाले आहेत. कमी जागेत मुद्रणालयाचे उत्तम व्यवस्थापन होऊ शकेल.’

शिरोळे म्हणाले, ‘वस्ती विभागांमध्ये विद्यार्थी कठीण परिस्थितीत शिक्षण घेत असतात. अभ्यासासाठी आवश्यक सुविधा नसल्यामुळे त्यांची एकाग्रता होत नाही. त्यामुळे खूप जिद्दीने अभ्यास करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांसाठी हा प्रकल्प उपयोगी ठरेल. या प्रकल्पामुळे भावी पिढीतील विद्यार्थ्याची स्वप्नपूर्ती होऊ शकेल.’

एकबोटे म्हणाल्या, ‘ग्रंथालये समाजाचा आत्मा आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना ५० हजाराहून अधिक पुस्तके उपलब्ध होतील. पहिल्या टप्प्यात ४०० विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा मिळणार आहे. दुसर्या टप्प्यात आणखी ४०० विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. डिजिटल लायब्ररीची सुविधा देणार आहोत. अशाप्रकारची राज्यातील महापालिकेचे व्यवस्थापन असणारी पहिलीच लायब्ररी ठरणार आहे.’

डॉ. वैजयंती जाधव यांनी सूत्रसंचालन, एकबोटे यांनी प्रास्ताविक आणि उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी आभार मानले.

छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा गुलाब वाघमोडे स्वागताध्यक्षपदी दत्तात्रय कड यांची निवड

0

पुणे – तेरावे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.गुलाब वाघमोडे यांची तर स्वागताध्यक्षपदी दत्तात्रय कड यांची निवड करण्यात आली आहे , अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सासवड येथे शनिवार दि 12 मार्च 2022 रोजी संमेलन होणार आहे . संमेलनाच्या संयोजन बैठकीला डॉ भालचंद्र सुपेकर, राजाभाऊ जगताप, प्रसिद्धी प्रमुख दत्तानाना भोंगळे, सुनील लोणकर, श्यामकुमार मेमाणे, गंगाराम जाधव, नंदकुमार दिवसे, बहुजन हक्क परिषदेचे सुनील धिवार, रवींद्र फुले, अमोल बनकर, दत्ता होले, श्री खेनट, अरविंद जगताप, प्रवीण कदम आदी उपस्थित होते. श्री वाघमोडे साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात गेली तीस वर्षे काम करीत आहेत. रानभैरी या त्यांच्या आत्मकथन ग्रंथाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आहे . भटके विमुक्त जागृती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सामाजिक प्रश्नावर सहभाग घेतला होता. मुंबई विद्यापीठात महिलांच्या समस्या वर आयोजित चर्चा सत्रात वीस देशातील प्रतिनिधी मध्ये त्यांचा समावेश होता . परिवर्तन चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. कलंक, माणूस शोधताना या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले असून नियतकालिके, वृत्तपत्र मध्ये त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केले आहे . भारिप बहुजन महासंघाचे ते पुणे लोकसभेचे 2009 चे उमेदवार होते. यापूर्वी प्रा नामदेवराव जाधव, भा.ल. ठाणगे . रा.आ.कदम.अनंत दा रवटकर, डॉ ताकवले, बाबासाहेब सौदागर, आकाश सोनवणे, श्रीराम पचींद्रे छिन्द चींद्रे,शरद गोरे, डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. श्री कड हे सामाजिक क्षेत्रात गेली वीस वर्षे काम करीत असून ग्रंथालय चळवळ रुजविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पुरंदर तालुका संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष म्हणूनही ते काम करीत आहेत . ते सिव्हील इंजिनिअर असून पुणे जिल्हा ग्रंथालय संघावर पदाधिकारी आहेत. श्री कड म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीत राज्यातून येणाऱ्या साहित्यिकांचे स्वागत आहे. संमेलन यशस्वी होण्याचा आम्ही प्रयत्न करू.
दरवर्षी जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. संमेलनात राज्यभऱातून लेखक, कवी सहभागी होतात. क-हा नदीच्या काठावर रंगणा-या या साहित्य संमेलनात पुस्तकांचे प्रकाशन, पुरस्कार वितरण, कथाकथन,कविसंमेलन, परिसंवाद असे कार्यक्रम होणार आहेत .

पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी अकॅडमी ऑफ इलर्निंगमधील विद्यार्थी लवकरच अमेरिकेत शैक्षणिक एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत जाणार- आबा बागुल

0

पुणे – पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंग स्कूल ही भारतासह अमेरिकेत देखील प्रसिद्ध  असून अमेरिकेतून आलेल्या ३० शिक्षकांच्या गटाने दिलेला शाळेच्या रिपोर्टच्या आधारे अमेरिकेच्या मुंबईतील  कॉन्सलेटजनरल ऑफिसचे व्हॉइस कॉन्सुल फॉर पॉलिटिकल अफेर्स  कॉड़ी एतलें यांनी आज शाळेला भेट दिली.पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी त्यांचे स्वागत केले. 

आबा बागुल व कॉड़ी एतलें यांच्यात सुमारे २ तास चर्चा झाली.आर्थिक दुर्बल घटकातील व गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने सुरु केलेल्या या शाळेने गेल्या १२ वर्षात घेण्यात आलेले विविध  उपक्रम,शाळेची गुणवत्ता,१०० टक्के निकालाची परंपरा तसेच शाळेतील विद्यार्थी ते नासामध्ये काम करण्याची संधी,इंजिनिअर,स्पर्धा परीक्षेतून आयपीएस होण्यापर्यंत विविध क्षेत्रात या शाळेचे विद्यार्थी काम करत आहेत.शाळेतील ५०० विद्यार्थी आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहेत.तसेच शाळेत विद्यार्थ्यांवर विशेष शैक्षणिक लक्ष देण्यात येत असून रोजचा अभ्यासक्रम,क्रीडा व इतर घेतले जाणारे उपक्रम,बुद्धिमत्ता टेस्ट अश्या विविध प्रकारच्या संदर्भात सविस्तर माहिती आबा बागुल यांनी कॉड़ी एतलें यांना दिली. 

पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कूलचा शैक्षणिक प्रयोग हा आदर्श मॉडेल आहे.शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक यांचे शैक्षणिक एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत येथील विद्यार्थी अमेरिकेमध्ये व अमेरिकेतील विद्यार्थी राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंगमध्ये काही दिवसाचा शैक्षणिक दौरा करतील.यासाठी राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंग स्कूलची निवड करण्यात आली असून तसा  प्रस्ताव तयार करून असे प्रपोझल मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करीत आहे  असे उद्गार अमेरिकेच्या मुंबईतील कॉन्सलेट जनरल ऑफिसचे व्हॉइस कॉन्सुल फॉर पॉलिटिकल अफेर्स कॉड़ी एतलें यांनी आज काढले. 

राजकीय व्यक्तीने पुढाकार घेऊन अश्या पद्धतीने आणि तेही महानगरपालिकेच्या माध्यमातून अश्या प्रकारची शाळा उभारणे ही खरंच कौतुकास्पद बाब आहे.यामुळे गरीब विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळण्याचा चांगला मार्ग उपलब्ध झाला आहे,त्यांनी शाळेचे गेल्या १२ वर्षांचे  रिझल्ट अभ्यासले ते दरवर्षी १०० टक्के आहेत ते देखील कौतुकास्पद आहेत.अभ्यासाबरोबरच इतर सुख सोइ देणारी शाळा  सुरु केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल व पुणे महानगरपालिकेचे त्यांनी अभिनंदन केले. या प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले.या शाळेशी एक्सचेंज प्रोग्रॅम संदर्भात लवकरच पत्र व्यवहार करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल अश्विनी थेटे व शिक्षक उपस्थित होते. 

आबा बागुल यांनी त्यांच्या प्रस्तावाचे स्वागत केले व या एज्युकेशनल  एक्सचेंज प्रोग्रॅमचा मी पाठपुरावा करून  पुणे महानगरपालिका ,राज्य व केंद्र शासनाची मान्यता, विद्यार्थ्यांची निवड, सोबत जाणाऱ्या शिक्षकांची निवड, सर्वांचे पासपोर्ट विझा तसेच विमान प्रवास तेथील सर्व खर्च या संदर्भात तपशीलवार प्रकल्प तयार करून  एक्सचेंज  प्रोग्राम  अंतर्गत राजीव गांधी अकॅडमी  ऑफ इ  लर्निंगमधील विद्यार्थी अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवण्याकरिता पाठपुरावा करणार असल्याचे आबा बागुल म्हणाले. तर प्रिन्सिपल अश्विनी थेटे यांनी आभार मानले.

एसटीचे विलिनीकरण शक्य नाही त्रिसदस्यीय समितीची शिफारस

0

मुंबई,  दि. ४ मार्च २०२२ –  एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे शक्य नाही, अशी राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने शिफारस केली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी आज दिली. त्यामुळे संपकाळात ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई किंवा बडतर्फीची नोटीस बजावली आहे ती मागे घेण्यात येईल, असे सांगतानाच कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता सर्व संपकरी कामगारांनी १० मार्च २०२२ पर्यंत कामावर रुजू व्हावे, असे आवाहन त्यांनी श्री.परब यांनी केले.

तसेच जे कर्मचारी सेवेतून बडतर्फ झाले आहेत, त्यांनी अपील करावे आणि ज्यांचा अपिल करण्याचा कालावधी संपलेला असेल अशा कामगांराना १५ दिवसांची मुदतवाढ वाढवून देण्यात येईल, असेही ॲड.परब यांनी स्पष्ट केले.

राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या ४ महिन्यांहून अधिककाळ बेमुदत संपावर आहेत. संपाच्या मुद्यावर माननीय मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. माननीय न्यायालयाने एसटीच्या विलिनीकरणाच्या निर्णयासंदर्भात राज्य सरकारला त्रिसदस्यीय समिती नेमण्याचे निर्देश दिले होते. राज्य सरकारने नेमलेल्या समितीने नुकताच आपला अहवाल न्यायालयात सादर केला होता. सदर अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला.  मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा अहवाल सादर केला. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी अॅड. परब बोलत होते.

या अहवालामध्ये एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करावे ही एसटी कामगारांची मागणी त्रिसदस्यीय समितीने अमान्य केलेली आहे. त्यासाठी समितीने प्रशासकीय, आर्थिक आणि कायदेशिरबाबींवर सखोल अभ्यास करुन त्यांनी आपल मत हे माननीय उच्च न्यायालयाला कळविलेले आहे. या सर्व तिन्ही बाबींवर महामंडळात एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण होणार नाही हे स्पष्टपणे नमूद केले असल्याचे श्री. परब यांनी सांगितले.

विलिनीकरणामुळे पगाराचा प्रश्न सुटेल, पगार वेळेत होईल, असे प्रश्न कामगारांच्या मनात होते. परंतु, राज्य सरकारने हा संप चालू असतानाच ज्यांची एसटीत १ ते १० वर्षांपर्यंत सेवा झाली आहे त्यांच्या मुळ पगारात ५ हजार रूपये तर ज्यांची १० ते २० वर्षे सेवा झाली आहे त्यांच्या मुळ पगारात ४ हजार रूपये तसेच जे कामगार २० वर्षाहून अधिककाळ सेवेत आहेत, अशा कामगारांच्या मुळ पगारात २५०० रूपयांची वाढ करण्यात आली आहे.  तसेच  ही वाढ करून कामगारांचे पगार १० तारखेच्या आत होतील याची हमी राज्य सरकारने घेतली आहे.

विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर जाण्याऐवजी आपण कामावर या… अशी विनंती केली होती. एसटी बंद करून किंवा एसटीचं नुकसान करून आपल्या मागण्या पदरात पाडून हे कोणालाही परवडणारे नाही. कारण एसटी ही सर्व सामान्यांची, ग्रामीण जनतेची गरज आहे. ग्रामीण भागांतून तालुक्याच्या ठिकाणी कॉलेज, शाळेमधील मुलं, ज्येष्ठ नागरिक एसटीचा वापर करीत असतात. एसटी ही गरिब माणसाची जीवनवाहिनी आहे, ती तुम्ही बंद करू नका असे वारंवार आवाहन सरकारने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी २८ हजारांहून अधिक कामगार कर्तव्यावर रूजू झाले असून अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात कर्मचारी कामावर आलेले नाहीत, असे सांगतानाच जे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत, परंतु ज्यांच्यावर कारवाई झालेली नाही, अशा कर्मचाऱ्यांनी ताबडतोब कामावर यावे. तसेच ज्या कामगारांवर निलंबनाची कारवाई आणि बडतर्फीची नोटीस दिली गेली आहे, त्या कामगारांवरील निलंबनाची कारवाई आणि बडतर्फीची नोटीस मागे घेतली जाईल. तसेच ज्यांना बडतर्फ केले आहे त्यांनी देखील अपील करावे. त्यांचे अपिल कायदेशिर प्रक्रियेअंती निकाली काढण्यात येईल, असेही श्री.परब यांनी यावेळी सांगितले.

सार्वजनिक औषध चाचणी प्रयोगशाळांना विहित नमुन्यात अहवाल देण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. ४ : सार्वजनिक औषध चाचणी प्रयोगशाळांना अन्न व औषध प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांच्याकडे चाचणीसाठी प्राप्त होणाऱ्या सर्व औषध नमुन्यांच्या योग्य प्रकारे नोंदी ठेवून चाचणीअंती विहित नमुन्यात चाचणी अहवाल द्यावा आणि जे नमुने अप्रमाणित दर्जाचे आढळून येतील अशा नमुन्यांबाबत विना विलंब संबंधित परवाना प्राधिकारी, अन्न व औषध प्रशासन यांना कळविण्यात यावे. ज्या प्रयोगशाळेद्वारे या तरतुदीचे उल्लंघन केले जाईल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सह आयुक्त तथा नियंत्रण प्राधिकारी, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई, यांनी कळविले आहे.

औषधे व सौदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 च्या तरतुदीनुसार सार्वजनिक औषध चाचणी प्रयोगशाळांना औषध नियंत्रक, भारत सरकार यांच्या मान्यतेने अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्याद्वारा परवाने मंजूर करण्यात येतात. या परवानाधारक सार्वजनिक औषध चाचणी प्रयोगशाळांनी चाचणीसाठी औषधे स्विकारणे, चाचणी करणे आणि चाचणीबाबत विहित नमुन्यात अहवाल देणे याबाबत या कायद्या अंतर्गत स्पष्ट तरतुदी आहेत. मात्र असे निदर्शनास आले आहे की, मे. इमेन्स कल्चर प्रा.लि., सिरीयल नं. 14 धाडगे इंडस्ट्रीयल इस्टेट, नांदेड, पुणे, या सार्वजनिक औषध चाचणी प्रयोगशाळा यांनी औषधांची चाचणी करुन ते अप्रमाणित आढळून येऊन सुद्धा चाचणीचा अहवाल कायदा व त्याअंतर्गत नियम 150-E (1) च्या तरतुदीनुसार विहित नमुन्यात दिलेला नाही. तसेच त्यांच्याद्वारा चाचणीअंती अप्रमाणित आढळून आलेल्या नमुन्याबाबत उक्त कायदा व त्याअंतर्गत नियम 150-E (g) च्या तरतुदीनुसार परवाना प्राधिकारी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांना कळविणे गरजेचे असूनसुद्धा परवाना प्राधिकारी यास कळविले नसल्याने या सार्वजनिक औषध प्रयोगशाळेवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे.

खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

0

पुणे दि.४: २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावी परिक्षेत प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांनी क्रीडा सवलत गुणांसाठी २५ मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालमार्फत पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण यांना दिलेल्या दिनांकानुसार १५ मार्च ते  २५ मार्च  या कालावधीत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात प्रस्ताव विहित नमुन्यात सादर करावा.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस (दहावी) प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांच्या बाबतीत सातवी व आठवीमध्ये या विद्यार्थ्याचे क्रीडा स्पर्धेतील जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय सहभाग व प्राविण्य जे असेल त्यातील सर्वोच्च कामगीरीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये (बारावी) प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्याच्या बाबतीत नववी व दहावीत क्रीडा स्पर्धेतील जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, सहभाग व प्राविण्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. परंतु सदर खेळाडूने दहावीत सदर प्रमाणपत्रावर क्रीडा सवलत गुण घेतले असल्यास यावर्षी तो क्रीडा सवलत गुण घेण्यास पात्र असणार नाही.

एकविध खेळ संघटना क्रीडा संचालनालयाने मान्यता दिलेल्या राज्यस्तर तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी व प्राविण्य खेळाडूच क्रीडा सवलत गुणास पात्र राहणार आहेत.

दहावी  व बारावीमध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांने एकापेक्षा जास्त स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले असेल तर सदर खेळाडूची सर्वोच्च कामगिरी असलेल्या एकाच खेळाचे प्रमाणपत्र प्रस्तावासोबत सादर करावे लागणार आहे. अर्ज सादर करताना शाळेमार्फत त्यांचे पत्रासोबत सादर करावे तसेच २५ मार्चपर्यत कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करावा. प्रस्तावासोबत दहावी व बारावीचे परीक्षा प्रवेशपत्र, मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केलेले खेळाचे प्राविण्य, सहभाग प्रमाणपत्र, क्रीडा सवलत गुण अर्ज विहित नमुना, बारावीच्या विद्यार्थ्यासाठी दहावी गुणपत्रकाची प्रत आवश्यक असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

पुणे मेट्रो कॉंग्रेसची देणगी,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निमंत्रण का नाही ? माजी आमदार मोहन जोशी यांचा सवाल

0

पुणे :शहरामध्ये मेट्रो रेल्वे आणण्याचे मोठे श्रेय काँग्रेस पक्षाचे आहे, हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे आणि मेट्रोचा पाठपुरावा करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मेट्रोच्या उदघाटन सोहळ्याचे निमंत्रण का नाही ? असा काँग्रेसचा सवाल असून भाजपने कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

शहरातील विविध योजनांचा गाजावाजा भाजपने सुरु केलेला आहे. पण, या योजनांचा पाया काँग्रेसने घातला हे पुणेकर जाणून आहेत. येत्या रविवारी मेट्रोचे उदघाटन होत आहे. हा मेट्रो प्रकल्पही काँग्रेसनेच आणला. २००१साली स्थायी समितीत मेट्रोची मंजुरी झाली तेव्हा काँग्रेसच्या संगीता देवकर स्थायी समितीच्या अध्यक्ष होत्या. खासदार सुरेश कलमाडी यांच्या सूचनेवरून हा प्रस्ताव आला होता. त्यानंतर १५ ऑगस्ट २००८ साली दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पुणे मेट्रोसाठी प्रारुप आराखडा बनविण्याचे काम हाती घेतले. जून २०१२मध्ये राज्य सरकारने मेट्रो प्रकल्पाला मंजुरी दिली आणि त्याच महिन्यात काँग्रेस आघाडी सरकारने प्रकल्प आराखडा केंद्र सरकारला सादर केला. २०१३साली तत्कालीन केंद्रीय नगरविकासमंत्री कमलनाथ, कृषीमंत्री शरद पवार यांच्यासमवेत खासदार सुरेश कलमाडी यांनी प्रदीर्घ बैठक घेतली आणि केंद्राकडे पुणे मेट्रो मंजुरीची मागणी केली.

केंद्र सरकारच्या २०१३च्या अंदाजपत्रकात पुणे मेट्रोसाठी ९कोटी९९लाख रुपयांची तरतूद प्रथमच करण्यात आली. ७ डिसेंबर २०१६ रोजी मेट्रो प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळाली. हा घटनाक्रम पाहाता काँग्रेस पक्षाने सन २०००पासून पुण्याला मेट्रो मिळावी यासाठी अथक प्रयत्न केले हे दिसून येईल. शिवाय, केंद्राच्या अंतिम मंजुरीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध खात्यांच्या परवानग्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः लक्ष घालून मिळविल्या. पण भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या विरोधामुळे मेट्रोला उशिर झाला आणि २०१४ ऐवजी २०१६मध्ये केंद्राची मंजुरी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मेट्रोचे उदघाटन करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मग, पृथ्वीराज चव्हाण यांना निमंत्रण का देण्यात आलेले नाही? असा सवाल मोहन जोशी यांनी केला आहे. आमदार म्हणून मी सुद्धा विधीमंडळात पुण्याच्या मेट्रोच्या मागणीचा मुद्दा वारंवार मांडलेला आहे. असेही जोशी यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यातील कार्यक्रमांना भाजपने पक्षीय स्वरुप देऊन निवडणुकीचा प्रचार चालविला आहे ते निषेधार्ह आहे. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मेट्रो उदघाटन कार्यक्रमाचे निमंत्रण न देऊन भाजपच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे. भाजपने काही नेत्यांना हायजॅक केलेच आता कामाचे श्रेयही हायजॅक करू पहात आहेत,अशी टीका माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.