Home Blog Page 2060

24 तासांसाठी केंद्राने CBI आणि ED हटवावे, पाहा आम्ही काय करु-महापौर किशोरी पेडणेकर

0

मुंबई-देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ आज संपत आहे. या निमित्ताने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी दुपारी माध्यमांसमोर येऊन भाजप, राणे कुटुंब, केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. सीबीआय, ईडी यांसारख्या एजन्सीची भीती केंद्राने 24 तासांसाठी दूर करावी, आम्ही काय करू शकतो ते दाखवून देऊ, असे महापौर म्हणाल्या आहेत.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, जोपर्यंत मुंबईला नवा महापौर मिळत नाही तोपर्यंत मी मुंबईची सेवा करत राहणार आहे. जेव्हा मी महापौर झाले तेव्हापासूनच मनात होते की जेव्हा आपण सुखात पुढे राहतो, तेव्हा दु:खातही पुढे असायला हवे. हाच विचार करून मी पाच वर्षे काम केले. त्या पुढे म्हणाल्या की, कोविडच्या वेळी जेव्हा कोणी हॉस्पिटलमध्ये जायला घाबरत होते. तेव्हा मी कोविड केंद्रांवर जाऊन रुग्णांची स्थिती जाणून घेतली.

किशोरी पेडणेकर यांचा केंद्रावर निशाणा
दिशा सालियन प्रकरणी राणे कुटुंबीयांकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सीबीआयला द्यावेत. ते म्हणतात की, 24 तास पोलिसांना हटवले तर ते आम्हाला दाखवून देतील के ते काय चीज आहेत. आम्ही त्यांना 24 तास ईडी आणि सीबीआयला हटवायला सांगतो, आम्ही काय आहोत ते देखील दाखवून देऊ. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचे लोक ज्यांच्यावर कारवाई करतात, ते भाजपमध्ये येताच स्वच्छ होतात. मात्र, आम्ही लोकशाही मार्गाने काम करतो आणि यापुढेही करत राहू, असेही महापौर पुढे म्हणाल्या.

मला माझ्या कामासाठी पुरस्कार नको आहेत
त्या म्हणाल्या की, गोष्टींकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा आहे. उद्यापासून आमची नवी इनिंग सुरू होत आहे. माझ्या कार्यकाळात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या याबद्दल मी देवाचे आभार मानते. मी चांगलं काम केलं आणि त्यासाठी मला पुरस्कार मिळायला हवा असं मी म्हणत नाही. हे माझे कर्तव्य होते जे मी केले. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानते, असेही त्या म्हणाल्या. माझ्या प्रदीर्घ कार्यकाळात माझ्यावर कोणीही आरोप केलेले नाहीत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अचानक येऊन माझ्यावर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली.

जोपर्यंत नवीन महापौर मिळत नाही तोपर्यंत मुंबईचा चार्ज माझ्याकडे
त्या पुढे म्हणाल्या की, ‘मुंबईकर शिवसेनेच्या पाठीशी आहेत आणि यावेळीही बीएमसीमध्ये भगवाच फडकणार आहे. दुसरा महापौर येईपर्यंत मी काळजीवाहू महापौर राहणार आहे. मुंबईत कुठेही काही झालं तर तिथे जाईल.

दिशा प्रकरणात पुरावे असतील तर राणेंनी सीबीआयकडे द्यावे
दिशा सालियन प्रकरणावर महापौर किशोरी म्हणाल्या, ‘मालवणी पोलिस ठाण्यात दीर्घ चौकशी केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले होते की, दिशा सालियनच्या आईकडे महापौर आणि महिला आयोगाचे लोक गेले होते. ते म्हणाले की, आम्ही त्यांना चिथावणी दिली, त्यानंतर हा सर्व प्रकार घडला. आम्ही कोणालाही भडकावलेले नाही. ते म्हणतात की, त्यांच्याकडे पुरावे आहेत, तर त्यांनी ते सीबीआयला द्यायला हवेत. ते का थांबले ते मला समजत नाही. सीएम साहेबांनी त्यांना फोन केल्याचे राणे म्हणतात, पण हे सर्व निराधार आहे.

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि 222 धावांनी मिळवला विजय

0

सामन्यात जडेजाने घेतल्या 9 विकेट्स

मोहाली -रवींद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने मोहाली येथील पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा एक डाव आणि 222 धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. फॉलोऑन खेळण्यास भाग पाडल्यामुळे श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात 178 धावांत आटोपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 574/8 (घोषित) धावसंख्या केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव 174 धावांत आटोपला.

जडेजाने या कसोटी सामन्यात 175 धावांची नाबाद खेळी करत श्रीलंकेच्या पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 4 विकेट्स घेतल्या. रविचंद्रन अश्विनने कसोटीत 7 बळी घेतले. तो आता कपिल देवला मागे टाकून कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज बनला आहे. दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे.

टीम इंडियाचा हा कसोटी क्रिकेटमधील श्रीलंकेविरुद्धचा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी 2017 मध्ये नागपूर कसोटीत भारताने श्रीलंकेचा एक डाव आणि 239 धावांनी पराभव केला होता.

अश्विनने तोडला कपिलचा विक्रम
स्टार ऑफस्पिनर आर अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. मोहाली कसोटीच्या दुसऱ्या डावात चरिथ असलंका (9) च्या विकेटसह अश्विनने हा विक्रम केला आणि कपिल देवचा (434) विक्रम मोडला. भारतीय संघाकडून सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा विक्रम अनिल कुंबळे (619) यांच्या नावावर आहे.

श्रीलंकेने दुसऱ्या डावातही केली निराशा
फॉलोऑन खेळताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली आणि 10 धावांच्या आतच संघाने पहिली विकेट गमावली. लाहिरू थिरिमानेला आर अश्विनने खाते न उघडता बाद केले. दुसऱ्या स्लिपमध्ये रोहितने थिरिमानेचा झेल टिपला. लंचनंतर अश्विनने पाथुम निसांकाची (6) विकेट घेतली. पंचांनी निसांकाला नाबाद दिले, पण भारताने रिव्ह्यू घेतला आणि यश मिळवले. श्रीलंकेच्या फलंदाजाची धार घेत चेंडू ऋषभ पंतच्या हातात गेला.

यानंतर मोहम्मद शमीने भारतीय संघाला तिसरे यश मिळवून दिले. त्याने 27 धावांवर कर्णधार दिमुथ करुणारत्नेला विकेटच्या मागे झेलबाद केले. धनंजय डी सिल्वा आणि अँजेलो मॅथ्यूज यांनी चौथ्या विकेटसाठी 102 चेंडूत 49 धावा जोडून डाव सांभाळला. ही भागीदारी रवींद्र जडेजाने धनंजयला (30) बाद करून फोडली. त्यानंतर जडेजाने त्याच षटकात अँजेलो मॅथ्यूज (28) आणि सुरंगा लकमल (0) यांचे बळी घेतले.

जडेजा स्पेशल क्लबचा झाला भाग
मोहाली कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने एक विक्रम केला आहे. कसोटी सामन्यात शतकाव्यतिरिक्त एका डावात 5 बळी घेणारा तो भारताकडून चौथा खेळाडू ठरला आहे. आर अश्विनने हा पराक्रम तीनदा केला आहे. अश्विनने 2011 आणि 2016 मध्ये वेस्ट इंडिज आणि 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध हा विक्रम केला होता. विनू मांकडने 1952 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदा हा पराक्रम केला होता. त्याच वेळी, पॉली उमरीगरने 1962 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत शतक झळकावण्याव्यतिरिक्त 5 विकेट्स घेतल्या होत्या.

यासह सर जडेजा कसोटीत 150+ धावा करणारा आणि एका डावात 5 बळी घेणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

दोन्ही संघ:
भारत: 
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि जयंत यादव.

श्रीलंका: दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, पथुम निसांका, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, निरोशन डिकवेला, सुरंगा लकमल, विश्वा फर्नांडो, लसिथ एम्बुल्डेनिया आणि लाहिरू कुमारा.

प्रत्येक घरात सावित्रीसह एका ज्योतिबाची गरज – महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

0

मुंबई : “सावित्री घरोघरी आणि ज्योतिबाचा शोध जारी” ही वस्तुस्थिती एकंदर संपूर्ण जगभरातच दिसून येत आहे, त्यामुळे देश असो की विदेश महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम होण्यासाठी प्रत्येक घरात सावित्रीसह एका ज्योतिबाची तितकीच गरज असल्याचे परखड मत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मांडले. आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्ताने आयोजित ‘ब्रेक द बायस’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत ॲड. ठाकूर बोलत होत्या.

हाऊस ऑफ कॉमन्स, नॅशनल इंडियन स्टुडंटस अँड अल्युम्नी युनियन, युनायटेड किंगडम आणि बार अँड बेंच यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्ताने आयोजित ‘ब्रेक द बायस’ ही आंतरराष्ट्रीय परिषद आज पार पडली. यात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी, भारताच्या अतिरिक्त अधिवक्ता ऐश्वर्या भाटी, आंतरराष्ट्रीय वकील करुणा नंदी, सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकील गीता लुथरा, सर्वोच्च न्यायालयाच्या वकील तन्वी दुबे आणि नॅशनल इंडियन स्टुडंटस अँड अल्युम्नी युनियन, युनायटेड किंगडमच्या संस्थापिका सनम अरोरा आदि मान्यवर उपस्थित होते. यादरम्यान महिला धोरणकर्त्यांची भूमिका या विषयावर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला.

यावेळी  महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री म्हणून महिला धोरणकर्त्यांच्या भूमिकेतून ॲड. ठाकूर यांनी बोलत असताना अनेक मुद्दांवर आपली मते  मांडली. यावेळी त्या म्हणाल्या देश किवा विदेशात एक स्त्री म्हणून प्रत्येकीला नेहमीच संघर्ष करावा लागला आणि आजही लागतो. सर्वच स्तरावर अडचणी या वेगवेगळ्या आहेत. आज अर्थंसंकल्पात जेंडर बजेटवर सातत्याने भर देण्यात येतो, मात्र महिलांना त्यातून खरा न्याय देण्याचं काम महिला धोरणाच्या माध्यमातून होतं, महिला धोरणाचा मसुदा अंतिम टप्प्यात असून महिलांसोबत LGBTQIA+ समुदायाचा सहभाग यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच धोरणाची अंमलबजावणी फार महत्वाची आहे. त्यामुळे एकंदर सर्वच पातळीवर या धोरणाचा विचार करण्यात आला आहे, असे त्या म्हणाल्या.

महिला तसंच LGBTQIA+ साठी असलेलं हे धोरण म्हणजे पुरुषांचा विरोध असं याचं चित्र नाही. पूर्वी स्त्री-पुरुष एकाच रथाची दोन चाकं मानली जातात. ही गाडी सुरळीत चालावी म्हणून पुरुषांचा या प्रक्रियेतील सहभाग ही महत्त्वाचा आहे. कारण अजूनही स्त्री पुरुष समानता केवळ कागदावरच आहे.  त्यामुळे या महिला धोरणात पुरुष जनजागृतीसाठी विशेष बाब म्हणून एक परिशिष्ट असावं असा माझा मानस आहे. सावित्री घरोघरी आणि ज्योतिबांचा शोध जारी अशी स्थिती निर्माण होता कामा नये म्हणून ही महिला धोरणात प्रयत्न करणार आहे असेही ॲड. ठाकूर म्हणाल्या. यावेळी सहभागी व्यक्तिंनी महिला धोरणावर आपल्या सूचना काळविण्याची विनंतीही त्यांनी केली.

नॅशनल इंडियन स्टुडंटस अँड अल्युम्नी युनियन ही संस्था ब्रिटनमधील युवा भारतीयांच्या जनसमुहाचे प्रतिनिधित्व करते. या संस्थेच्या माध्यमातून दूरदृश्यप्रणालीद्वारे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

आर्यन पम्प्स एमएसएलटीए 15000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत सहजा यमलापल्ली हिला विजेतेपद

0

नागपुर,  6 मार्च 2022: नागपुर जिल्हा हार्ड कोर्ट टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व आयटीएफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या आर्यन पम्प्स एमएसएलटीए 15000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत सहजा यमलापल्ली हिने एकेरी गटाचे विजेतेपद संपादन केले. 
नागपूर,रामनगर येथील एमएसएलटीए टेनिस कोर्टवर पार।पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत पहिला सेट एमिलीने सहजा विरुद्ध 6-4 अशा फरकाने जिंकून आघाडी घेतली. पण याच क्षणी एमिली सामना खेळत असताना कोर्टवर घसरल्याने दुखापत झाल्यामुळे तिने माघार घेतली व त्यामुळे सहजाला विजय मिळाला. मागील आठवड्यात अहमदाबाद येथील स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या एमिलीला सलग दुसऱ्यांदा स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यात अपयश आले. 
स्पर्धेचे पारितोषिक वितरण नगरसेविका डॉ. प्रणिती फुके, आर्यन पंप्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत सुतार, एनडीएचटीएचे अध्यक्ष कुमार काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अशोक भिवापुरकर, एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देसाई, एमएसएलटीएचे खजिनदार व स्पर्धेचे संचालक सुधीर भिवापूरकर, विदर्भा इन्फोटेकचे अध्यक्ष प्रशांत उगेमुगे, विजय नायडू, विक्रम नायडू, डॉ दर्शन दक्षिणदास, गणेश पागे, बेहराम पटेल, शिव मोर आणि अली पंजवानी आदी मान्यवर उपस्थित होते. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: अंतिम फेरी: सहजा यमलापल्ली(भारत)वि.वि.एमिली सेबोल्ड(जर्मनी)[3] 4-6, सामना सोडून दिला.

…म्हणून मलाही पुण्यात राहायला यावेसे वाटतेय-रामदास आठवले

0

महाराष्ट्र हौसिंग सोसायटीत ‘हर्बल गार्डन’चे लोकार्पण
पुणे : “चांगल्या आरोग्यासाठी हर्बल गार्डन अतिशय उपयुक्त आहे. येथील औषधी वनस्पती, त्याचा येणारा सुवास, त्यामुळे मुलांना उद्यानात खेळताना आरोग्यदायी वातावरण उपलब्ध होणार आहे. ‘भाजप-रिपाइं’ युतीमुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. या विकासकामांसह हर्बल गार्डन, उद्याने यामुळे पुणे राहण्यासाठी अधिक चांगले बनत आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. पुण्याचा विकास पाहून मलाही मुंबई सोडून पुण्यात राहण्यास यावेसे वाटतेय, असे आठवले यांनी मिश्कीलपणे सांगितले.
माजी उपमहापौर नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या संकल्पना व विकास निधीतून उभारलेल्या ‘वीरचक्र सन्मानित कर्नल सदानंद साळुंके हर्बल गार्डन’चे लोकार्पण रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. प्रसंगी उपमहापौर सुनीता वाडेकर, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, कर्नल (नि.) सदानंद साळुंके, ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, अल्पसंख्याक आघाडीचे ऍड. आयुब शेख, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, स्थानिक नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी, फरझाना शेख, माजी नगरसेवक अशोक कांबळे, मंगेश गोळे आदी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, “१९७१ च्या युद्धात योगदान दिलेल्या कर्नल सदानंद साळुंके यांच्या नावाने हे औषधी उद्यान झाले, याचा आनंद आहे. या उद्यानातून आरोग्याला पूरक गोष्टी, तसेच मुलांना औषधी वनस्पतींविषयीचे ज्ञान मिळेल. गेल्या पाच वर्षात पुण्यात विकासकामांची मालिका सुरु आहे. रस्ते, पाणी, उद्याने, वाहतूक व्यवस्था, मेट्रो, उड्डाणपूल असे अनेक प्रकल्प उभारले जात आहेत. डॉ. धेंडे यांनी आपल्या भागातील इतर नगरसेवकांच्या सहकार्याने चांगले काम केले आहे. येत्या निवडणुकांत भाजप-रिपाइं युतीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही.”
जगदीश मुळीक म्हणाले, “या औषधी उद्यानाचा या भागातील नागरिकांना लाभ होईल. आरोग्याच्या दृष्टीने हे उद्यान अतिशय उपयुक्त आहे. ‘स्वप्नपूर्ती’ करण्याचे काम भाजप-रिपाइं युतीने केले. पुणे मेट्रोच्या उद्घाटनासह इतर उपक्रमांचे लोकार्पण व अनावरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले, याचा अभिमान वाटतो. गेल्या ५० वर्षात जितकी विकासकामे झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक पटींनी पाच वर्षात विकासाची कामे झाली. विरोधी पक्ष केवळ राजकारण करण्यात दंग असून, प्रशासक बसवून निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव आखत असले, तरी महापालिकेत भाजप-रिपाइंचीच सत्ता येणार आहे.”
डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी स्वागत प्रास्ताविकात उद्यानाची उभारणी, त्याचे महत्व याविषयी माहिती दिली. कर्नल सदानंद साळुंके यांनी आपल्या नावाने उद्यान उभारल्याबद्दल डॉ. धेंडे, महापालिका व स्थानिक नागरिकांचे आभार मानले. सुनीता वाडेकर, बाळासाहेब जानराव, शैलेंद्र चव्हाण, कर्णे गुरुजी यांनीही मनोगते व्यक्त केली. ऍड. आयुब शेख यांनी आभार मानले.

मुंबईतील ‘डबेवाला भवन’चे उद्घाटन

0

मुंबई, दि. ६: बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची लाईफलाईन म्हटले जाते. त्या नसा असतील तर मुंबईतील डबेवाले रक्त आहेत, अशा शब्दात पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील डबेवाल्यांच्या कार्याचे कौतुक केले.

मुंबई महानगरपालिकेच्या शेरली, बांद्रा व्हिलेज, बांद्रा (पश्चिम) येथील समाज कल्याण केंद्राची २८६.२७ चौ. मी. क्षेत्रफळाची जागा मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनला देण्यात आली आहे. या जागेतील ‘मुंबई डबेवाला भवन’ चे उद्घाटन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज झाले.

यावेळी उपमहापौर ॲड.सुहास वाडकर, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे, नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट चे अध्यक्ष उल्हास मुके आदी उपस्थित होते.

श्री ठाकरे म्हणाले, “मुंबईचे डबेवाले” शक्ती आणि भक्तीचे प्रतीक आहेत. मुंबईकरांना वेळेवर जेवण पोहोचवण्याचे काम ते अखंडपणे करीत असल्याने मुंबईकरांचा त्यांच्यावर विश्वास आहे. मुंबई कधी थांबत नाही आणि मुंबई चालवणाऱ्या घटकांमध्ये डबेवाल्यांचा समावेश आहे. कोविडच्या काळातही विविध प्रकारे त्यांनी मुंबईकरांची सेवा केल्याचे सांगून आज विविध ऑनलाईन सेवा देणाऱ्या संस्था अस्तित्वात आल्या असतानाही डबेवाल्यांच्या स्वतःच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे ते कुठेही मागे पडणार नाहीत, याची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. डबेवाल्यांसाठी भवन उभारण्याच्या दिलेल्या वचनाची पूर्तता झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांचे डबेवाल्यांशी नाते जोडले गेले असल्याचे सांगितले. डबेवाल्यांसोबतच्या स्वतःच्या आठवणी सांगून डबेवाल्यांसाठी स्वतंत्र भवन असावे, असा प्रस्ताव आल्यानंतर त्यास तातडीने मंजुरी दिल्याचे त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकादरम्यान सोपान मरे यांनी डबेवाला संघटनेची माहिती दिली. डबेवाल्यांची चौथी पिढी हे काम करीत असून सुमारे दीड लाख डबे पोहोचवण्याचे काम केले जाते. २००४ मध्ये इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी मुंबईत आल्यानंतर डबेवाल्यांचे केलेले कौतुक आणि २००८ मध्ये इंग्लंडच्या शाही लग्न सोहळ्यास असलेली उपस्थिती याची आठवणही त्यांनी सांगितली.

यावेळी डबेवाल्यांच्या प्रतिकृतीचे शिल्पकार नीरज गुप्ता, लॉकडाऊनमध्ये अन्नधान्य पुरवणाऱ्या युनायटेड वे चे उपाध्यक्ष अनिल परमार, मानधन न घेता सेवा देणारे डबेवाले संघटनेचे कायदेशीर सल्लागार रमेश मोरे, मार्गदर्शक सचिन शिवेकर यांचा श्री. ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

पीएम मोदींच्या विरोधात काळे कपडे परिधान करून राष्ट्रवादीची निदर्शने..पण दूरवरून …

0

पुणे-काही दिवसांपूर्वी संसदेत छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापालिकेतील पुतळ्याचे होत असलेल्या अनावरण, छत्रपती शिवराय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल संतापजनक विधाने करणाऱ्या राज्यपालाची या कार्यक्रमाला असणारी उपस्थिती या सर्व घटनांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज ससून हॉस्पिटल जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक स्थळी मुक आंदोलन केले. या आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी काळे कपडे परिधान करून उपस्थित होते या आंदोलनस्थळी महात्मा गांधी यांची देशभक्तीपर गीते लावून या सर्व घटनांचा निषेध करण्यात आला.
या मुक निदर्शनास शहराध्यक्ष प्रशांत जगताप , आ.जयदेवराव गायकवाड, शांतीलाल सुरतवाला,सौ राजलक्ष्मी भोसले, दिपक मानकर, विशाल तांबे, प्रदीप देशमुख ,सौ नंदा लोणकर ,चंद्रशेखर धावडे , राहूल तांबे , दिपक पोकळे सर्व सेल अध्यक्ष महिला ,युवक यांसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते.

या संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले,’ आज पुणे मेट्रोच्या अर्धवट कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होत आहे. निव्वळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ५४ किलोमीटर पैकी अवघ्या ५ किलोमीटरचे काम पूर्ण झाल्याचे भासवत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाचा घाट घातला आहे. एकीकडे देशातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नसताना सुद्धा केवळ उत्तर प्रदेश निवडणुका, त्या निवडणुकांचा प्रचार, आता पुन्हा पुणे महापालिकेची निवडणूक लक्षात घेता हा उद्घाटन सोहळा ही निव्वळ जनतेची फसवणूक सुरू असून पंतप्रधानांना निवडणुका व्यतिरिक्त कुठल्याही कामाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, या उद्घाटन सोहळ्यात सर्वसामान्य पुणेकरांना नाकारलेला प्रवेश, जे पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांनी जर काळे मास्क परिधान केले असतील, तर त्यांना सुद्धा बाहेर काढून देण्यात आले आहे .या गोष्टी सर्व सामान्य भारतीय म्हणून मनाला न पटणाऱ्या आहेत.

गो बॅक मोदी: काळे झेंडे दाखवून निदर्शने:मोदी भाजपा महाराष्ट्रद्रोही असल्याचा कॉंग्रेसचा आरोप

0

पुणे : महाराष्ट्रातील काँग्रेसने देशात कोरोना पसरविला या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील महाराष्ट्रद्रोही वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यांनी काळे झेंडे दाखवून आज रविवारी सकाळी जोरदार निदर्शने केली.पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्रद्रोही भूमिकेच्या निषेध करण्यासाठी अलका टॉकीजजवळील लोकमान्य टिळक चौकात काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली. संतप्त कार्यकर्त्यांनी मोदीकाळे झेंडे दाखवून निदर्शने गो बॅक असे फलक झळकविले.
.
पंतप्रधान मोदी आणि भाजपकडून महाराष्ट्रद्रोह वारंवार केला जात आहे. नैसर्गिक संकट अथवा कोविडची साथ महाराष्ट्राला मदत देताना मोदी सरकारने अन्याय केला, लोकसभेतील भाषणात बोलताना पंतप्रधानांनी कोरोना साथ महाराष्ट्रातील काँग्रेसमुळे देशात पसरली असे संतापजनक विधान केले, हे निषेधार्ह आहे, असे निदर्शनप्रसंगी झालेल्या सभेत काँग्रेस नेत्यांनी सांगितले.

पुणे मेट्रो ही काँग्रेसची संकल्पना आहे. या मेट्रो प्रकल्पाच्या मंजुरीसाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्य मंत्री पदाच्या काळात ठोस भूमिका बजावली, मेट्रोचे काम सुरू करण्यासाठी परवानगी मिळविली. त्यांना मेट्रो रेल उदघाटन समारंभाचे निमंत्रण दिले नाही, याचा सभेत निषेध करण्यात आला.

या निदर्शनामध्ये माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, कमलताई व्यवहारे, अभय छाजेड, संजय बालगुडे, दीप्ती चवधरी, वीरेंद्र किराड, पूजा आनंद,गोपाळ तिवारी, दत्ता बहिरट, रविंद्र धंगेकर, चंदूशेठ कदम,अविनाश बागवे, लता राजगुरु, अजित दरेकर,रमेश अय्यर, रामदास मारणे, प्रशांत सुरसे,अनिल सोंडकर,नरुद्दीन सोमजी, रजनी त्रिभुवन, शानी नौशाद, सुजित यादव, सचिन आडेकर, सतीश पवार, सोनाली मारणे, चैतन्य पुरंदरे, राहुल तायडे, अजित जाधव, संगीता तिवारी, राजू नामेकार, अमिर शेख, विजय खळदकर, भूषण रानभरे, शिलार रतनगिरी, प्रकाश पवार, चेतन आगरवाल, मेहबूब नदाफ, राजेंद्र शिरसाट, संदीप मोकाटे,आदी सामील झाले होते.

विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रातील सुधारणा नवयुवकांसाठी संधी नवीन भारताचे नेतृत्व युवकांकडे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0

पुणे, दि.६: देशात विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या सुधारणा नवयुवकांसाठी संधी  असून नवीन भारताचे नेतृत्व युवकांना करायचे आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

सिम्बॉयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ येथे ‘सिम्बॉयोसिस’च्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ‘सिम्बॉयोसिस आरोग्य धाम’चे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ‘सिम्बॉयोसिस’चे संस्थापक आणि अध्यक्ष प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.

संस्थेत सर्व राज्यातील विद्यार्थ्यांसोबतच जगातील ८५ देशातील विद्यार्थी शिकत असल्याचे समजून आनंद वाटल्याचे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम’ या विचारधारेचे ही संस्था प्रतिनिधित्व करत आहे. संस्था भारताच्या प्राचीन वारशाचे आधुनिक रुपात जतन करत आहे ही आनंदाची बाब आहे. संस्थेचे विद्यार्थी अशा पिढीचे प्रतिनिधित्व करत आहेत ज्यांच्यापुढे अमर्याद संधी उपलब्ध आहेत.

आपला देश जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असून ‘स्टार्टअप इकोसिस्टीम’चे जगातील तिसऱ्या क्रमांचाचे हब बनला आहे. ‘स्टार्टअप इंडिया’, ‘स्ट्रेंथन इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ अशा मोहिमा विद्यार्थ्यांच्या आकांक्षाना मूर्त रूप देत आहेत. आजचा भारत नवे सृजन करत आहे, सुधारणा करत आहे तसेच पूर्ण विश्वाला प्रभावित करत आहे, असेही प्रधानमंत्री म्हणाले.

नवीन भारताच्या निर्माणाचे नेतृत्व युवा पिढीकडे
कोरोना लसीच्या बाबतीत पूर्ण जगाला भारताने आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. युक्रेन संकटातही ‘ऑपरेशन गंगा’ राबवून भारताच्या नागरिकांना युद्धभूमीवरून सुरक्षित परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देश अनेक क्षेत्रात ग्लोबल लीडर बनण्याच्या मार्गावर आहे. मोबाईल उत्पादनामध्ये भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. देशात दोन मोठे संरक्षण कॉरिडॉर बनत आहेत जेथे आधुनिक शस्त्रास्त्रे देशाच्या संरक्षण गरजा भागवतील. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावात आपण नवीन भारताच्या निर्माणाकडे  वाटचाल करत असून याचे नेतृत्व युवा पीढीलाच करायचे आहे.

सॉफ्टवेअर उद्योगापासून आरोग्य क्षेत्रापर्यंत, कृत्रिम बुद्धीमत्ता पासून ऑटोमोबाईल, क्वांटम कंम्युटिंग, मशीन लर्नींग, ड्रोन तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर्स, स्पेस टेक्नॉलॉजी आदी क्षेत्रामध्ये सतत सुधारणा होत असून त्यामध्ये नवयुवकांसाठी अनेक संधी उपलब्ध होत आहेत. अनेक क्षेत्रे युवकांसाठी सुरू होत असून आपण  या संधींचा युवकांनी लाभ घ्यावा. युवकांनी स्टार्टअप सुरु करावेत असे सांगून विद्यापीठातील युवकांच्या माध्यमातून देशासमोरील आव्हाने तसेच स्थानिक समस्यांवरील उपाययोजना समोर आल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.

तंत्रज्ञान क्षेत्राचा अभ्यास करताना शेतकऱ्यांची मदत होऊ शकेल, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची मदत होऊ शकेल असे उत्पादन निर्माण करण्याचा विचार केला पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रात असल्यास आरोग्य क्षेत्र, गावातील आरोग्य सुविधा कशाप्रकारे मजबूत करता येतील याकडे लक्ष दिले पाहिजे.

सिम्बॉयसीसने प्रत्येकवर्षी एक ‘थीम’ घेऊन काम करावे
‘आरोग्य धाम’ हे पूर्ण देशासाठी एक मॉडेल म्हणून काम करु शकते. आपले ध्येय जेव्हा व्यक्तीगत ध्येयापासून देशाच्या ध्येयाकडे जातात तेव्हा राष्ट्रनिर्माणाची इच्छा वाढते. सिम्बॉयसिस संस्थेने यापुढे प्रत्येक वर्षी एक संकल्पना घेऊन त्यावर काम करावे, असे आवाहन करुन श्री. मोदी म्हणाले, ‘जागतिक हवामानबदल’ अशी संकल्पना घेऊन चालू वर्षात काम केले जाऊ शकते. यामध्ये येथील सर्वजण वर्षभर योगदान देऊ शकतील.  त्याचा अभ्यास, संशोधन, जनजागृती, त्यास सामोरे जाण्यासाठी उत्पादने तयार करणे, किनारपट्टी क्षेत्रात तसेच सागरी क्षेत्रावरील परिणाम आदींवर काम करता येऊ शकेल. त्याचप्रमाणे एक वर्ष ‘सीमा क्षेत्र’ ही संकल्पना घेऊन काम करता येऊ शकेल असेही त्यांनी सुचवले.

डॉ. मुजुमदार यांनी स्वागतपर मनोगतात माहिती दिली की, जगातील ८५ देशातील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. संस्थेने ग्रामीण भागातील युवकांना येथे शिक्षणाची चांगली सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. भारतात वैद्यकीय शिक्षण महागडे आहे ते परवडणारे कशा प्रकारे होईल त्याबाबत प्रयत्न झाले पाहिजेत. संस्था भारतीय परंपरेतील बुद्धीचातुर्य आणि परकीय देशांची सर्जनशीलता एकत्रित करुन पुढे जात आहे.

प्रारंभी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते  ‘आरोग्य धाम’ चे उद्घाटन करण्यात आले. तसेच सिम्बॉयोसिसच्या वाटचालीबाबत लघुचित्रफीत दाखवण्यात आली.

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

0

पुणे दि.६- पुणे शहर आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रप्रेमाच्या प्रेरणेसाठी प्रसिद्ध आहे. पुण्या ने शैक्षणिक, संशोधन आणि विकास, माहिती तंत्रज्ञान आणि वाहन उद्योग क्षेत्रात आपली ओळख प्रस्थापित केली आहे. त्यामुळे आधुनिक सुविधा गरजेच्या असून त्यासाठी सुरु करण्यात आलेल्या विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकार सहकार्य करेल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

एमआयटी महाविद्यालय मैदानावर आयोजित विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार प्रकाश जावडेकर, गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उषा ढोरे आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले, पुणे मेट्रो पुण्यातील वाहतूक व्यवस्थेला मजबूत करेल. जनतेला गर्दी आणि वाहतूकीच्या खोळंब्यापासून मुक्त करेल. पुण्यातील जनतेचे जीवनमान अधिक सुखकर करेल. कोरोना संकटकाळातही मेट्रो प्रकल्पाचा एक टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. पुणे मेट्रोसाठी सौर ऊर्जेचाही मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. त्यामुळे दरवर्षी २५ हजार टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल. या प्रकल्पासाठी कामगारांनी दिलेले योगदान सामान्य माणसासाठी उपयुक्त ठरेल.
नागरिकांनी मेट्रोने प्रवास करावा
देशात वेगाने शहरीकरण होत आहे. २०३० पर्यंत शहरी लोकसंख्या ६० कोटीपेक्षा अधिक होईल. शहराची वाढती लोकसंख्या संधी निर्माण करण्यासोबत आव्हानेही निर्माण करते. शहराच्या विस्तारासोबत रस्ते वाहतूकीला मर्यादा येतात. अशावेळी सार्वजनिक वाहतूक सुविधेचा विकास हाच सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे केंद्र सरकार अशा वाहतूक सुविधांवर आणि विशेषत: मेट्रो प्रकल्पावर विशेष लक्ष देत आहे.

आज देशातील दोन डझनापेक्षा अधिक शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आदी ठिकाणी मेट्रो रेल्वेचा विस्तार होत आहे. शहरातील सर्व स्तरातील नागरिकांनी मेट्रो रेल्वेत प्रवासाची सवय लावून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. मेट्रो प्रवासामुळे शहराला मदत होईल, असेही ते म्हणाले.

शहराला आधुनिक, स्वच्छ आणि सुंदर बनवावे लागेल
एकविसाव्या शतकात शहरांना अधिक आधुनिक बनवावे लागेल आणि नव्या सुविधांचे निर्माणही करावे लागेल. भविष्यातील शहरांच्या गरजा लक्षात घेऊन केंद्र सरकार काम करीत आहे. प्रत्येक शहरात पर्यावरण अनुकूल वाहतूकीला आणि त्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. सर्व सुविधांना आधुनिक बनविणारे एकात्मिक नियंत्रण केंद्र असावे. शहरात आधुनिक कचरा व्यवस्थापन पद्धत आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प असणे गरजचे आहे. जलस्त्रोतांच्या आणि ऊर्जेच्या पूर्ण कार्यक्षम उपयोगावर भर देणेही आवश्यक आहे, असेही प्रधानमंत्री म्हणाले.

पर्यावरणपूरक इंधनाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख
शहरात स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न होत आहे. पुण्याची ओळख ‘ग्रीन फ्युएल सेंटर’ म्हणून होत आहे. प्रदूषणपासून मुक्ती, कच्च्या इंधनाच्या बाबतीत परदेशावरील अवलंबित्व कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी इथेनॉल आणि जैविक इंधनावर भर देण्यात येत आहे. पुण्यात इथेनॉल ब्रँडीगशी निगडीत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा करा
पुण्याला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी महापालिकेने विविध प्रकल्प सुरू केले आहेत. पूर नियंत्रणासाठी हे प्रकल्प उपयुक्त ठरतील. मुळा-मुठा नदीची स्वच्छता आणि सुशोभिकरणासाठी केंद्र सरकार मदत करीत आहे. नद्या पुनरुज्जिवीत झाल्यास शहरातील नागरिकांना त्याचा लाभ होईल. शहरातील नागरिकांनी वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा करावा. नदीच्या प्रती श्रद्धा, पर्यावरण विषयक प्रशिक्षण आदी उपक्रमांनी नद्यांचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही प्रधानमंत्री मोदी यांनी केले.

पुणे महानगरपालिका परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा नव्या पिढीला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुण्याच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न -उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात होणारी विकासकामे इथल्या पायाभूत सुविधा मजबूत करणाऱ्या आणि शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या आहेत. पुण्याच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

ते म्हणाले, पुणे ही रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेबांची भूमी आहे. जिजाऊ मासाहेबांची सोन्याचा नांगर चालवून पुण्याच्या पुनर्निर्माणाचा शुभारंभ केला होता. राष्ट्रनिर्मितीचा आणि जनसेवेचा हा वारसा पुढे नेण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा सर्वांनी मिळून पुढे न्यायचा आहे.

पुणे मेट्रोसाठी जनतेला धन्यवाद
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी पुण्याच्या जनतेने अडचणी सहन केल्या आहेत. १२ किलोमीटर मार्गावर ही मेट्रो रेल्वे धावणार आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट विस्तारीकरणाबरोबरच पिंपरी-चिंचवड ते निगडी कॅरीडोर, स्वारगेट ते कात्रज, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खराडी ते स्वारगेट या जोड मार्गिकेचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचा काम चालू आहे. या प्रकल्पांसाठी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, ठाणे, नागपूर टप्पा २ च्या मेट्रो प्रकल्पासाठी केंद्राने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

विकासासाठी पर्यावरणाचा विचार करावा लागेल
मुळा-मुठा नदी सुशोभिकरण आणि जायका प्रकल्प शहरासाठी महत्वाचे आहेत. पुण्यात साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर मुळा-मुठा नदी सुशोभिकरणाचे काम करण्यात येणार आहे. नदी पात्रातील पाण्याचे स्त्रोत आणि जैवविविधतेला धक्का न लावता ही कामे करावी लागतील. पूर नियंत्रण रेषेचा विचारही होईल याकडे विशेष लक्ष देण्यात येईल.

इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती कमी करण्याचा विचार व्हावा
शासनाने पर्यावरण रक्षणासाठी ई-वाहन धोरण स्विकारले आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होऊन पर्यावरण रक्षणाला मदत होईल. सायकलचे शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या वाहनांच्या किंमती कमी करण्याबाबत विचार व्हावा, असे मतही श्री.पवार यांनी व्यक्त केले.

यावेळी श्री. फडणवीस यांनीदेखील विचार व्यक्त केले. श्री.मोहोळ यांनी स्वागतपर भाषणात पुणे शहरातील विविध प्रकल्पांची माहिती दिली. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती देऊन प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे स्वागत केले. उषा लक्ष्मण यांनी आर.के.लक्ष्मण यांची पुस्तके प्रधानमंत्री श्री.मोदी यांना भेट दिली.

पुण्यातील वाहतूक गतिमान करणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या १२ किमी मार्गिकेचे उदघाटन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या १२ किलोमीटर मार्गिकेचे उदघाटन करण्यात आले. त्यांनी गरवारे मेट्रो स्थानक येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रदर्शनाचेही उदघाटन केले. त्यानंतर त्यांनी आनंदनगर मेट्रो स्थानाकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.

केंद्र सरकार, राज्य शासन आणि पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत संयुक्तपणे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची उभारणी होत असून पहिल्या टप्यात पुणे येथील गरवारे ते वनाज आणि पिंपरी चिंचवड येथील पीसीएमसी ते फुगेवाडी असा एकूण १२ किलोमीटर मार्ग सुरू करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण १० स्थानके आहेत.

विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बालेवाडी येथे बांधण्यात आलेल्या आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी, १४० ई-बस आणि बाणेर येथील ई-बस डेपोचेही लोकार्पण आणि मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन आणि मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. मुळा-मुठा नदीच्या ९ किलोमीटरच्या पट्ट्यात नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. यामध्ये नदीकाठचे संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापन (इंटरसेप्टर सीवेज नेटवर्क), सार्वजनिक सुविधा, नौकाविहार सुविधा इत्यादी कामांचा समावेश असेल. मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करणाऱ्या प्रकल्पांतर्गत एकूण ११ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले जातील, त्यांची एकत्रित क्षमता सुमारे ४०० एमएलडी असेल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

0

पुणे, दि. ६:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिका येथे  करण्यात आले. या पुतळ्याची उंची सुमारे ९.५ फूट इतकी आहे.

यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रधानमंत्री मोदी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन स्वागत केले.

यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री  अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थोर  समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

मुंबई अशी सुंदर बनवेल… की प्रत्येकाला अभिमान वाटेल – पालकमंत्री आदित्य ठाकरे

0

मुंबई, दि. 5- मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत होती. आता एमएमआरडीए, महानगरपालिका यांसह सर्व संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून वाहतूक जंक्शनच्या जागेचा कल्पकतेने उपयोग करून वाहतूक सुरळीत केली जात आहे. याचबरोबर नागरिकांसाठीही सुविधा निर्माण केल्या जात आहेत. कलानगर प्रमाणेच मुंबईत सर्वत्र अशा सुविधा निर्माण करून मुंबई सुंदर बनविली जाईल, असे पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

वांद्रे पूर्व येथील कलानगर जंक्शनच्या सुधारणा व सौंदर्यीकरणाच्या कामाचा आज पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, आमदार झिशान सिद्दीकी, नगरसेवक रोहिणी कांबळे, स्थानिक लोकप्रतिनिधी, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास आदी उपस्थित होते.

कलानगर येथेच आपला जन्म झाल्याने या परिसरातील स्थित्यंतरे आपण पाहिली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याच्या सूचना केली होती. त्यानुसार कलानगर जंक्शनचे रूप बदलले असून याचा वाहनधारकांसह रहिवाशांना निश्चित लाभ होईल, असा विश्वास श्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. बीकेसी या जागतिक व्यापार केंद्राचे हे प्रवेशद्वार असल्याने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय सिस्टर सिटींचे झेंडे येथे उभारण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले.

एमएमआरडीएमार्फत उड्डाणपुलांच्या खाली आणि वाहतूक बेटावर सुशोभिकरणाचे हे काम करण्यात आले आहे. सुशोभिकरणाच्या या कामांमुळे अतिशय व्यस्त असणाऱ्या कलानगर जंक्शनवर वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना सुविधायुक्त अतिरिक्त जागा वापरण्यास मिळणार आहे.

कलानगर जंक्शनचे क्षेत्रफळ सुमारे ८६९० चौरस मीटर आहे. कलानगर जंक्शनवर मोठ्या संख्येने वाहतूक सुरू असते. त्यामुळे पादचाऱ्यांसाठीही ते धोकादायक होते. यावर मात करण्यासाठी एमएमआरडीएमार्फत या परिसराचा विकास करण्यात आला आहे. यामुळे वांद्रे रेल्वेस्थानक आणि वांद्रे कुर्ला संकुलाकडे जाणाऱ्या पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल.

कामाचे स्वरूप

कलानगर जंक्शन येथे उत्तर प्लाझा, दक्षिण प्लाझा आणि बेट प्लाझा अशा तीन बेटांचा विकास करण्यात आला आहे. यामध्ये लँडस्केपिंगसह आधुनिक पद्धतीचे पाण्याचे कारंजे, बसण्यासाठी ग्रेनाईटचे बाक, फूटपाथ आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत असलेल्या झाडांभोवती सुशोभिकरणाद्वारे कुंपण घालण्यात आले आहे. याशिवाय विद्युत शिल्प, विविध प्रकारची फुलझाडे, मुलांना खेळण्यासाठी जागा या बाबी सुद्धा येथील आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत.

यामुळे उड्डाणपुलांच्या खालील मोकळ्या जागेचा योग्य वापर होऊन नागरिकांसाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्तींना देखील या जागेचा सहज आणि सुरक्षितपणे वापर करता येईल याची दक्षता घेण्यात आली आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुलभता व्हावी यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यादृष्टीने बेटांवर पुरेशी विद्युत व्यवस्थाही उभारण्यात आली आहे.

मिलन-22 बहुपक्षीय नौदल सराव संपन्न

0

मुंबई-मिलन या नौदलाच्या 11 व्या युद्धसरावाचा 4 मार्च 2022 रोजी समारोप झाला. या सरावात 26 जहाजे, एक पाणबुडी आणि 21 विमानांचा सहभाग होता. भागीदार नौदलांमध्ये  सुसंगतता, आंतरकार्यक्षमता, परस्पर सामंजस्य आणि सागरी सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी नौदल परिचालनाच्या  तिन्ही आयामांमध्ये जटिल आणि प्रगत सराव आयोजित करण्यात आले.

सहभागी नौदलांमध्ये  आंतर- कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध सरावांच्या मालिकेने सागरी टप्प्याचा  प्रारंभ झाला. समुद्रामधील  पहिल्या दोन दिवसांच्या सरावांमध्ये सहभागी नौदलाच्या युद्धनौकांवर भारतीय लढाऊ विमानांच्या हल्ल्याचा सामना करणार्‍या अमेरिकेच्या  P8A विमानांच्या  अतिशय कठीण  हवाई युद्धविरोधी कवायतींचा समावेश होता. याव्यतिरिक्त, कमी उंचीवरील  हवाई लक्ष्यांवर शस्त्रास्त्रांद्वारे  गोळीबार केला गेला, ज्यात जहाजावरील कर्मचाऱ्यांची अचूकता आणि उच्च दर्जाची आंतरकार्यक्षमता दिसून आली. हेलिकॉप्टर ऑपरेशन दरम्यान, क्रॉस डेक लँडिंग ऑपरेशन केले गेले. सहभागी देशांच्या जहाजांनी भारतीय नौदलाच्या टँकरसह समुद्रात इंधन भरण्याचा  सराव केला, ज्यासाठी हातोटी आणि जहाज हाताळणी  कौशल्ये आवश्यक आहेत.

पुढील काही दिवसांमध्ये सराव आणखी खडतर करण्यात आला. त्यामध्ये  सध्या सुरू असलेले पुनर्भरण, विमानाच्या सहभागासह प्रगत पाणबुडीविरोधी सराव, पृष्ठभागावरील लक्ष्यांवर गोळीबार आणि जटिल परिचालन  अनुकरण यांचा समावेश होता.

मिलन 22 चा समारोप समारंभ एका अनोख्या स्वरूपात आयोजित करण्यात आला होता, ज्यात सहभागी जहाजांचे कमांडिंग अधिकारी हेलिकॉप्टर आणि बोटींनी आयएनएस  जलाश्ववर  दाखल झाले होते. समारोप  सोहळ्याला सहा विदेशी जहाजे आभासी माध्यमातून  उपस्थित होती. ईस्टर्न फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग आरएडीएम संजय भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. या समारंभात समुद्रात केलेल्या सरावांबाबत माहिती देण्यात आली.  सहभागी देशांच्या कमांडिंग ऑफिसर्सनी मिलन 22 च्या बंदर आणि सागरी टप्प्याच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल प्रशंसा  केली.

70 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या,झैद एन्टरप्रायझेसच्या मालकाला अटक

0

मुंबई 05 मार्च 2022

मुंबई प्रदेशाच्या रायगड सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी आज बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट घोटाळा उघड केला. या प्रकरणी 70 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या तयार करून बेकायदेशीररीत्या 13 कोटी रुपयांचे  इनपुट टॅक्स क्रेडीट मिळवणाऱ्या  कळंबोली स्थित मे. झैद एन्टरप्रायझेस या कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली.

मुंबई प्रदेश सीजीएसटीच्या  केंद्रीय गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर रायगडच्या सीजीएसटी आयुक्तालयातील कर चुकवेगिरी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या चौकशी अंती असे दिसून आले की झैद एन्टरप्रायझेस या कंपनीने अस्तित्वात नसलेल्या 10 कंपन्यांच्या नावाने खोट्या पावत्यांचा वापर करून इनपुट टॅक्स क्रेडिटचा (ITC) लाभ घेतला आहे किंवा तो इतरांना दिला आहे. या कंपनीचा मालक कंपनीचे व्यवहार जीएसटी पोर्टलवर नोंदविलेल्या पत्त्यावरून न करता सतत बदलत्या ठिकाणांहून करत होता. त्याचा माग काढण्यात आला आणि 15 किलोमीटर पाठलाग करून नवी मुंबईतील एका पेट्रोल पंपाजवळ त्याला पकडण्यात अधिकाऱ्यांना यश आले.

आरोपीला  04 मार्च 2022 रोजी सीजीएसटी कायदा 2017 मधील  कलम 69 अंतर्गत, केलेल्या गुन्ह्यासाठी कलम 132 अंतर्गत अटक करण्यात येऊन पनवेलच्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर हजर करण्यात आले आणि त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

वर उल्लेख केलेल्या कारवाईशिवाय, याच प्रकारच्या आधी घडलेल्या गुन्ह्यांचे विश्लेषण तसेच डेटा अनॅलिटीक्स आणि नेटवर्क विश्लेषण यांसारख्या साधनांचा वापर करून विभागाचे अधिकारी नवी मुंबईच्या तळोजा भागात नव्याने सुरु होत असलेल्या आणि येथून व्यवहार करत असलेल्या अशा अनेक बनावट कंपन्यांवर नजर ठेवून आहेत. अशा कंपन्या बनावट अथवा चोरीला गेलेल्या ओळखपत्रांच्या आधारावर जीएसटी नोंदणी करून घेतात अथवा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट निर्माण करणे, मिळवणे, वापरणे आणि इतरांना हस्तांतरित करणे यासाठी या ओळखींचा वापर करतात. मुंबई प्रदेशाच्या सीजीएसटी विभागाने कर-चुकवेगिरीविरुद्ध सुरु केलेल्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून अशा प्रकरणांमध्ये प्रामाणिक तसेच कायद्याचे पालन करणाऱ्या करदात्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्धेला तोंड द्यायला लावून आणि सरकारचा देय महसूल बुडवून कर-चुकवेगिरी करणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.

रायगड सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये  करचुकवेगिरीच्या प्रकरणांमध्ये सुमारे 700 कोटी रुपयांची कर चोरी उघडकीस आणली आणि त्यातील 405 कोटी रुपये वसूल केले, तसेच या संदर्भात 9 व्यक्तींना अटक देखील केली आहे. करचुकवेगिरी करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी सीजीएसटी विभाग डेटा अनॅलिटीक्स आणि नेटवर्क विश्लेषण यांसारख्या साधनांचा वापर करून विस्तृत प्रमाणात डेटा मायनिंग करत आहे. येत्या काळात सीजीएसटी विभाग बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या आणि कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यक्तींविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करणार आहे.

युक्रेनहून आज 3,000 भारतीयांना विशेष विमानांनी परत आणण्यात आले

0

आतापर्यंत 13 हजार 700 हून अधिक भारतीयांना विशेष विमानांनी मायदेशी परत आणण्यात आले आहे

नवी दिल्ली-

भारतीय नागरिकांच्या  सुटकेसाठी सुरु केलेल्या ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेअंतर्गत युक्रेनच्या शेजारी देशातून आज 15 विशेष विमानांनी सुमारे 3000 भारतीयांना  मायदेशी परत आणण्यात आले. यामध्ये 12 विशेष नागरी विमाने आणि भारतीय हवाई दलाच्या 3 विमानांचा समावेश आहे. 22 फेब्रुवारी 2022 पासून सुरु करण्यात आलेल्या विशेष विमानांनी आतापर्यंत 13 हजार 700 भारतीयांना  मायदेशी परत आणण्यात आले आहे. आतापर्यंत 55 विशेष नागरी विमानांनी भारतात परत आणलेल्या भारतीयांची संख्या आता 11,728 झाली आहे. तर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी आतापर्यंत केलेल्या 10 फेऱ्यांतून  युक्रेनच्या शेजारी देशांसाठी 26 टन मदत साहित्य नेले आणि 2056 भारतीय नागरिकांना परत आणले.

हवाई दलाच्या सी-17 या प्रकारच्या, अवजड माल वाहून नेऊ शकणाऱ्या 3 विमानांनी काल हिंडन हवाई तळावरून युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये जाण्यासाठी उड्डाण केले आणि ही विमाने आज सकाळी या तळावर परतली. या विमानांनी रुमानिया, स्लोव्हाकिया आणि पोलंड या देशांतून 629 भारतीय नागरिकांना परत आणले. या विमानांनी जाताना या देशांसाठी भारतातून 16.5 टन मदत सामग्री देखील नेली होती. एक नागरी विमान वगळता इतर सर्व नागरी विमाने आज सकाळी देशात परतली. कोशीचेहून निघालेले हे एक विमान आज संध्याकाळी उशिरा नवी दिल्ली येथे पोहोचेल असा अंदाज आहे. आज भारतीयांना मायदेशी घेऊन येणाऱ्या नागरी विमानांमध्ये बुडापेस्टहून येणाऱ्या 5, सुचावाहून येणाऱ्या 4, कोशीचेहून येणारे 1 आणि झेजोव्ह हून येणाऱ्या 2 विमानांचा समावेश आहे.

उद्या दिवसभरात 11 विशेष विमानांनी बुडापेस्ट,कोशीचे, झेजोव्ह आणि बुखारेस्ट या ठिकाणांहून 2200 हून अधिक भारतीयांना देशात परत आणण्यात येईल अशी अपेक्षा आहे.