पुणे- महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा हेमंत रासने यांची निवड झाली आहे.हेमंत रासने यांनी १० विरूद्ध ६ असा विजय मिळवून राष्ट्रवादीचे उमदेवार प्रदीप गायकवाड यांचा पराभव केला आहे. नगरसेवक हेमंत रासने यांची सलग चौथ्या वेळी अध्यक्षपदावर निवड झाली आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाची मुदत २८ मार्च रोजी संपली आहे. तर महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपणार आहे. त्यासाठी १ मार्च ते १४ मार्च या १४ दिवसांसाठी नवे स्थायी समिती अध्यक्ष निवडले गेले आहेत. एकापेक्षा अधिकवेळा स्थायी समिती अध्यक्षपद भूषवणारे रासने हे एकमेव नगरसेवक ठरणार आहेत.स्थायी समितीमध्ये भाजपचे १०, राष्ट्रवादीचे चार, शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी एक असे एकूण १६ सदस्य आहेत. पीएमपीचे व्यवस्थापक संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते. त्यामुळे रासने यांची निवड ही औपचारिकता होती. तरीही भाजपने दगाफटका होऊ नये यासाठी व्हीप काढला होता. रासने यांचा विजय निश्चित असल्याने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी कार्यकर्ते जमा झाले होते.
पॅराग्लायडींग हॉट बलून उड्डाणांना बंदी
पुणे दि.4: पंतप्रधान यांचा 6 मार्च रोजी पुणे शहरात दौरा होणार आहे. त्या अनुषंगाने व्हीव्हीआयपी यांच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षिततेसाठी पुणे शहर व जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलून इत्यादी उड्डाणांना निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
पंतप्रधान यांच्या दौऱ्यानिमित्त व्हीव्हीआयपी यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी ५ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ६ मार्चच्या मध्यरात्री १२ वा. पर्यंत पुणे शहर व जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलून अशा प्रकारची अवकाश उड्डाणे करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
आदेशाचे उल्लघंन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार दंडनियम कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
आर्यन पम्प्स एमएसएलटीए 15000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सहजा यमलापल्ली, झील देसाई यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
नागपुर, 4 मार्च 2022: नागपुर जिल्हा हार्ड कोर्ट टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व आयटीएफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या आर्यन पम्प्स एमएसएलटीए 15000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत सहजा यमलापल्ली, झील देसाई या भारतीय खेळाडूंसह रशियाच्या ऍना उरके, जर्मनीच्या एमिली सेबोल्ड या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
नागपूर,रामनगर येथील एमएसएलटीए टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत सहाव्या मानांकित जेनिफर लुईखेमचा 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. हा सामना 1 तास 27 मिनिट चालला. अव्वल मानांकित झील देसाई हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत सातव्या मानांकित समा सात्विकाचा 6-2, 6-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या मानांकित रशियाच्या ऍना उरकेने भारताच्या साई संहिता चमर्तीचा 6-3, 6-3 असा पराभव केला. तिसऱ्या मानांकित जर्मनीच्या एमिली सेबोल्डने पाचव्या मानांकित भारताच्या वैदेही चौधरीचे आव्हान 6-0, (5)6-7, 6-0 असे मोडीत काढले.
दुहेरीत उपांत्य फेरीत श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती व समा सात्विका या जोडीने वैदेही चौधरी व एमिली सेबोल्डया अव्वल मानांकित जोडीचा (3)6-7, 6-4, 13-11 असा तर, दुसऱ्या सामन्यात साई संहिता चमर्थी व सोहा सादिक यांनी निधी चिलूमुला व सौम्या विज या तिसऱ्या मानांकित जोडीचा 7-6(3), 3-6, 10-7 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: उपांत्यपूर्व फेरी: सहजा यमलापल्ली(भारत)वि.वि. जेनिफर लुईखेम(भारत)[6] 6-4, 6-4
झील देसाई(भारत)[1]वि.वि. समा सात्विका(भारत)[7] 6-2, 6-1ऍना उरके(रशिया)[2]वि.वि. साई संहिता चमर्ती(भारत) 6-3, 6-3
एमिली सेबोल्ड(जर्मनी)[3] वि.वि. वैदेही चौधरी(भारत)[5] 6-0, 6(5)-7, 6-0
दुहेरी: उपांत्य फेरी:
साई संहिता चमर्थी(भारत)/सोहा सादिक(भारत)वि.वि.निधी चिलूमुला(भारत)/सौम्या विज(भारत)[3]7-6(3), 3-6, 10-7
श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती(भारत)/समा सात्विका(भारत)वि.वि.वैदेही चौधरी(भारत)/एमिली सेबोल्ड(जर्मनी)[1] (3)6-7, 6-4, 13-11
सातत्य, प्रामाणिकता, मूल्यांची जपणूक महत्वाची: विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
पुणे : “वसतिगृह ही युवा परिवर्तनाची केंद्रे आहेत, असा आदर्श विद्यार्थी साहाय्यक समितीने आपल्या कार्यातून घालून दिला आहे. निवास-भोजनासह विद्यार्थ्यांची जडणघडण केंद्रस्थानी ठेवणाऱ्या समितीचे वसतिगृह व्यवस्थापन ‘मॉडेल’ म्हणून राज्यभर नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. इतर वसतिगृहात समितीच्या वसतिगृह व्यवस्थापनाची कार्यप्रणाली राबवण्यासाठी प्रयत्नशील आहे,” असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी केले. जिद्द, चिकाटी, सातत्य, प्रामाणिकता आणि मूल्यांची जपणूक जीवनात महत्वाची असल्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या फर्ग्युसन रस्त्यावरील आपटे वसतिगृहात विशाल सोळंकी यांनी वसतिगृह व्यवस्थापन अभ्यासक्रम याबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. प्रसंगी विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त रमाकांत तांबोळी, सुप्रिया केळवकर, तुषार रंजनकर, रत्नाकर मते, दिनकर वैद्य, चंद्रकांत कुलकर्णी, प्रभाकर पाटील, ज्योती गोगटे, मनोज गायकवाड, विनया ठोंबरे, अरुण अत्रे, सुनील चोरे, कुंदन पाठारे आदी उपस्थित होते.
विशाल सोळंकी म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या विकासात समितीचा मोलाचा वाटा आहे. हे कार्य समाजातील इतर संस्थांनी आत्मसात केले पाहिजे. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत समितीसारख्या संस्थाचा लाभ पोहोचावा, यासाठी राज्य शासन व शिक्षण विभागामार्फत सहकार्य करण्याचा प्रयत्न आहे. वसतिगृह माणूस घडवणारी केंद्रे व्हावीत, त्याचे व्यवस्थापन सुसूत्र असावे, प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय देणारे आणि स्वावलंबी, चारित्र्यवान बनवणारे असावे, यासाठी लवकरच वसतिगृह व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरु करण्यात येईल. समितीच्या कार्यात माजी विद्यार्थी कणा बनून काम करताहेत, ही आनंदाची बाब आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालये किंवा संस्थांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला, तर शिक्षण व्यवस्था सक्षम होण्यास नक्की मदत होईल.”
“आपण प्रत्येकाने सतत नवनव्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. सकारात्मक विचार, नियोजनबद्ध अभ्यासावर भर देताना सातत्य टिकवून ठेवले पाहिजे. करिअरच्या प्रगतीसोबतच माणूस म्हणून आपली जडणघडण महत्वाची असते. त्यामुळे संस्कार, मूल्ये जपायला हवीत. स्वतःतील क्षमतांना ओळखून त्यानुसार करिअरच्या वाटा निवडण्याची गरज असते. काळ बदलतोय, तशा संधीही बदलत आहेत. नवे कौशल्य, तंत्रज्ञान आत्मसात करायला हवीत. तुमच्यातील प्रत्येकजण समितीचा चेहरा आहे. येथून चांगले संस्कार घेऊन बाहेर पडल्यानंतर आपल्या गावखेड्यात, कामाच्या ठिकाणी समितीसारखे कार्य उभारण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.”
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, याबाबत विधिमंडळात सोमवारी विधेयक मांडणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
मुंबई, दि.४ : ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत ही महाविकास आघाडी शासनाची भूमिका आहे. ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मध्य प्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन सोमवारी विधिमंडळात विधेयक मांडणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
विधानपरिषदेत ओबीसी आरक्षण प्रश्नावर नियम २८९ अन्वये उपस्थित विषयावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी माहिती दिली.
सभागृहातील सर्वच सदस्य ओबीसी आरक्षणाच्या बाजूने असून निवडणुका कधी घ्यायच्या याचा अधिकार निवडणूक आयोगाला असून या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नयेत, यासाठी मध्य प्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे विधेयक सोमवारी विधिमंडळात मांडण्यात येणार आहे. या विधेयकाला सर्वांनी एकमताने पाठिंबा द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी करून राज्य शासनावर कोणाचा कसलाही दबाव नाही. शासनावर कुणीही दबाव टाकू शकत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
२० व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे भव्य सोहळ्यात उदघाटन
पुणे, दि. ३ मार्च : ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी जगाला आवाज दाखवला,’ अशा शब्दांमध्ये गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी भीमसेन जोशी यांना आदरांजली अर्पण केली. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २० व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (पिफ २०२२) आज पटकथाकार जावेद अख्तर आणि शास्त्रीय गायक पंडित सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी अख्तर बोलत होते.
‘पिफ’चे संचालक ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पुणे फिल्म फाउंडेशनचे सरचिटणीस रवी गुप्ता, विश्वस्त सतीश आळेकर, चित्रपट निवड समितीचे सदस्य समर नखाते, अभिजित रणदिवे यावेळी उपस्थित होते.
अख्तर म्हणाले, “आवाज कसा असू शकतो, हे भीमसेन जोशी यांनी दाखवले. आवाजाला त्यांनी मूर्त स्वरूपात जगाला दाखवले. आवाज जवळ येतो, लांब जातो. वर येतो, खाली जातो. आवाज सादर होतो. भीमसेन जोशी यांचे गाणे ऐकताना आवाजाचा वापर विलक्षण कसा असू शकतो, याचा अनुभव यायचा.” ते म्हणाले की कदाचित त्यांचे बोलणे हे अतिशयोक्तीचे वाटेल, पण ज्यांनी त्यांच्या मैफिलींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे, त्यांना त्याचा प्रत्यय आलेला आहे.
लता मंगेशकर यांच्याविषयी बोलताना अख्तर म्हणाले, की भारतीय चित्रपटातील गीते लोकांचे तत्त्वज्ञान सांगणारी होती. भारतीय परंपरेमध्ये गाणी होती तीच परंपरा चित्रपट गीतांनी पुढे नेली. त्यामध्ये लता मंगेशकर यांचे स्थान मोठे होते. जगातील सर्वांत जास्त गाणी त्यांची आहेत. भारतीय चित्रपटाच्या त्या अविभाज्य भाग आहेत. लता मंगेशकर गायच्या तेंव्हा या कविता आणि गीताचा अर्थ ध्वनित होताना जाणवायचा.
पुणे आणि पुणे चित्रपट बोलताना अख्तर म्हणाले, “पुणे हे ऐतिहासिक शहर आहे. ज्ञानाचे शहर आहे. सिनेमाच्या विकासात पुण्याचा मोठा सहभाग आहे. पुण्याने खूप महत्त्वाचे चित्रपट तयार केले. इथला प्रेक्षक खूप प्रगल्भ आहे. संस्कृती आणि कला महाराष्ट्र आणि पुण्यात रोमारोमांत भरली आहे. हे या पुणे चित्रपट महोत्सवातून दिसते. वेगवेगळ्या देशांमध्ये चित्रपट तयार होतात. वेगेवेगळे लोक आणि समान लोक अशा दोन विरोधाभासाच्या गोष्टी हे चित्रपट आपल्याला शिकवत असतात. हे या चित्रपट महोत्सवातून दिसते. हा चित्रपट महोत्सव प्रत्येकवर्षी मोठा होत असून, हॉलिवूडच्या बाहेर मोठा सिनेमा आहे, हे या महोत्सवातून दिसते.”
“भारतीय व्यावसायिक चित्रपटामध्येही सामाजिक राजकीय अर्थ असतो. समकालीन मूल्यांना पुढे घेऊन जाणारा हा नायक असतो. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात हा आशय येताना दिसतो. चित्रपट हे स्वप्नांसारखे असतात. आणि ती स्वप्ने लोकांची असतात. आणि ती भारतीय व्यावसायिक चित्रपटांमधून दिसतात. आता मोठ्या प्रमाणावर लोक मध्यमवर्गात आले आहेत. त्यांचा प्रभाव चित्रपटावर पडत आहे,” असेही अख्तर म्हणाले. तसेच भारतीय गीतकारांचं काम इतकं अद्वितीय आहे की त्यांना ऑस्कर, नोबेल सारखे पुरस्कार मिळावेत अशा शब्दांत त्यांनी गीतकारांचा गौरव केला आणि साहीर लुधियानवी, शैलेंद्र, मजरूह सुलतानपुरी आदी गीतकारांचा आवर्जून उल्लेख केला.
पंडित सत्यशील देशपांडे म्हणाले, “भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना जग हे भारताची ओळख म्हणून जाणते आणि भारत त्यांना स्वतःचा अभिमान मानतो. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हे एकमेव असे संगीत आहे, की ज्यात गायक ३ तास तीनही सप्तकांत गात असतो. मात्र त्याच्याकडे सामुग्री अल्प असते. अशा अतिशय अल्प सामुग्रीत सुरांना घेऊन जगाला स्तिमित करणारी प्रतिभा घेऊन पंडित भीमसेन जोशी गेल्या शतकात आले. त्यांनी कधी फ्युजन केले नाही. त्यांचा स्वर हा नेहमीच आश्वासक होता. प्रत्येकाला असे वाटायचे की ते आपल्याशीच बोलत आहे आणि आपल्यासाठीच गात आहेत. ते संगीताच्या प्रवासात श्रोत्यांना बरोबर घेऊन जायचे. त्यांनी विलक्षण स्वरनाट्य सादर केले. त्यांनी शब्दांचा अतिशय कमी आणि नेमका वापर केला. त्यांनी भक्तिसंगीताला शास्त्रीय संगीताचा आयाम दिला.”
प्रास्ताविक करताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, “जगभरात भयानक परिस्थिती असतानाही यावर्षी ‘पिफ’मध्ये १५७८ चित्रपट आले. त्यातून निवडलेले ६५ देशांतून आलेले ११० चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. भारत साहिर लुधियानवी, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि सत्यजित रे यांची जन्मशताब्दी साजरी करीत आहे. त्यांच्याच कारकिर्दीला यावेळच्या ‘पिफ’मध्ये सलाम करण्यात येत असून, त्यावर आधारित थीम यावर्षी ‘पिफ’साठे निवडण्यात आली आहे.” यावेळी त्यांनी चित्रपट महोत्सवाची विस्तृत माहिती दिली.
यावेळी भारतरत्न लता मंगेशकर यांना चित्रफितीमधून श्रद्धांजली वाहण्यात आली. पंडित बिरजू महाराज यांना अभिनेत्री शर्वरी जमेनीस हिने नृत्यांतून आदरांजली अर्पण केली. यशवंत जाधव यांनी पोवाडा आणि डॉ. गणेश चंदनशिवे यांनी पारंपरिक गोंधळ सादर केला. अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अभिनेता स्वप्निल जोशी यांनी सोहळ्याचे निवेदन केले.
उद्घाटन सोहळ्यानंतर स्वित्झर्लंडच्या मानो खलील यांच्या ‘नेबर्स’ हा चित्रपट दाखवण्यात आला.
—
‘मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी’ समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या भविष्यकालीन योजनांसाठी लेखी सूचना पाठविण्याचे ‘सारथी’चे आवाहन
मुंबई, दि. 3 : “मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी” (लक्षित गट) या समाजातील महिला, विद्यार्थी, तरुण, शेतकरी या विविध घटकांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने सारथी संस्थेने सन २०३० पर्यंत कोणकोणते उपक्रम प्राधान्याने राबविले पाहिजेत, याबाबत राज्यातून सूचना मागविण्यात येत आहेत.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेचा प्रस्तावित भविष्यकालीन योजनांचा आराखडा (Vision Document) – २०३० हा सर्वसमावेशक व व्यापक होण्यासाठी, सारथी संस्थेने सन २०३० पर्यंत कोणकोणते उपक्रम प्राधान्याने राबविले पाहिजेत याबाबत ३१ मार्च २०२२ पर्यंत सूचना लेखी स्वरुपात पाठवाव्यात असे आवाहन सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.
“मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी” या समाजातील बहुसंख्य लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. यास्तव या घटकांचे शेतीवरील अवलंबित्व कमी करुन त्यांना विविध क्षेत्रातील रोजगार अथवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करणे, शेतकरी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न वाढविणे, शेतकऱ्यांचा तसेच महिलांचा ताणतणाव क्लेश (Distress) कमी करण्यासाठी उपाययोजना करणे यासाठी या गटातील समाज हा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या प्रगत होण्यासाठी सुनियोजित उपाययोजना कालबद्ध पद्धतीने करण्याचा सारथी संस्थेचा मानस आहे.
राज्यातील “मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था दि. १९ फेब्रुवारी, २०१९ पासून कार्यरत आहे. सारथी संस्थेच्या उद्दिष्टांची कालबद्ध पूर्तता होण्यासाठी संस्थेचा “भविष्यकालीन योजनांचा आराखडा (Vision Document)- २०३०” तयार करणेबाबतचा उपक्रम सारथी संस्थेने हाती घेतला आहे. यात नाविन्यपूर्ण व कल्पक योजनांचा समावेश करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती, विचारवंत यांचे अभिप्राय प्राप्त करून घेण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
सारथी संस्थेमार्फत या समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. एम. फील व पीएच.डी अभ्यासक्रमासाठी नोंदणीकृत विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती, संघ लोकसेवा आयोग व राज्यसेवा आयोग पूर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क, विद्यावेतन व पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एकरकमी आर्थिक साहाय्य हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीचे फलित म्हणून संघ लोकसेवा आयोगाच्या २०१९ च्या नागरी सेवा परीक्षेमध्ये सारथी संस्थेने अर्थसाहाय्य व मार्गदर्शन केलेल्या २२ विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली आहे. त्यात ५ विद्यार्थी हे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS). ०८ विद्यार्थी हे भारतीय पोलीस सेवा (IPS) व ३ विद्यार्थ्यांची भारतीय महसूल सेवा (IRS) यामध्ये निवड झाली आहे. नवीन राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये या समाजघटकातील विद्यार्थ्यांचा प्रशासकीय सेवेत सहभाग वाढविण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग, तरुणांना रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने कौशल्यवृध्दी व कृषी प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण, प्रज्ञावान शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती,महिला सक्षमीकरणाकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याचा मानस आहे.
सारथी संस्थेच्या स्थापनेबाबतचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत काढलेल्या दि. ०४ जून, २०१८ या शासन निर्णयात संस्थेच्या उद्दिष्टांचा समावेश करण्यात आला आहे.तरी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक परिस्थितीनुरूप या समाज गटातील महिला, विद्यार्थी, तरुण, शेतकरी, जेष्ठ नागरिक इत्यादी विविध घटकांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने संस्थेने भविष्यात सन २०३० पर्यंत कोणकोणते उपयुक्त उपक्रम प्राधान्याने राबविले पाहिजेत, याबाबत आपल्या सूचना संस्थेस ईमेल आयडी sarthipune@gmail.com तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे, बालचित्रवाणी इमारत, गोपाळ गणेश आगरकर रोड,पुणे महाराष्ट्र-४११००४ येथे लिखित स्वरुपात पाठवाव्यात, तसेच अधिक माहितीसाठी https://sarthi-maharashtragov.in असे संकेतस्थळ आहे. तरी या उपक्रमातील सर्वांच्या सूचना व सहभागामुळे संस्थेचा प्रस्तावित भविष्यकालीन योजनांचा आराखडा (Vision Document) – २०३० सर्व समावेशक व व्यापक स्वरूपाचा होऊन, राज्यातील “मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असे आवाहन सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट
वाराणसी -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी येथे युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांचे युक्रेनचे अनुभव सांगितले. पंतप्रधानांना भेटलेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या संसदीय मतदारसंघातील वाराणसीचे लोकही होते. याशिवाय उत्तर प्रदेशातील इतर भागातील विद्यार्थ्यांशीही पंतप्रधान मोदींनी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान विद्यार्थ्यांशी अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने बोलताना दिसले. एवढेच नाही तर पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांसोबत फोटोही काढले.युक्रेनमध्ये अडकलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरु आहे.“आपला देश मजबूत होणे हाच या सर्व समस्यांवर उपाय आहे. देशात आधीपासून वैद्यकीय शिक्षणाबाबत धोरण योग्य असते तर दुसऱ्या देशात जावे लागले नसते. कोणत्याही पालकांना आपल्या मुलांना एकटे दुसऱ्या देशात पाठवावे असे वाटत नाही. आधीच्या काळात ३०० ते ४०० वैद्यकीय महाविद्यालये होती. आता आपण ७०० पर्यंत पोहोचलो आहोत. खाजगी महाविद्यालयेही दुप्पट झाली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व्हावे हा माझा प्रयत्न आहे. आम्ही जे प्रयत्न करोत आहोत त्यानुसार गेल्या ७० वर्षात जेवढे डॉक्टर बनले आहेत ते येत्या १० वर्षात तयार होतील,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
मुंबई ही भारताची क्रूझ राजधानी : अध्यक्ष, मुंबई पोर्ट ट्रस्ट
“फ्लोटिंग स्टोरेज री-गॅसिफिकेशन युनिटमुळे एलएनजीची मागणी आणि पुरवठा यातील तफावत दूर करण्यास मदत होईल”
मुंबई, 3 मार्च 2022
“पंतप्रधान गती शक्ती योजना मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीसाठी आमूलाग्र बदल घडवून आणणारी ठरेल,” असे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी आज 3 मार्च 2022 रोजी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. मुंबई पोर्ट ट्रस्टने पीएम गति शक्ती कार्यक्रमाच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने मल्टीमोडल कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी हाती घेतलेल्या अनेक प्रकल्पांची प्रगती आणि त्याचे परिणाम याबाबत सादरीकरण केले.


या संवादादरम्यान, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आगामी दोन प्रमुख प्रकल्पांची – मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल (MICT) आणि फ्लोटिंग स्टोरेज री-गॅसिफिकेशन युनिट (FSRU) याबाबत माहिती देण्यात आली.
मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल बद्दल बोलताना जलोटा म्हणाले की टर्मिनल एकावेळी 5000 ते 6000 क्रूझ प्रवासी हाताळू शकते. “टर्मिनल हा एक मोठा प्रकल्प आहे आणि ती काळाची गरज आहे,” असे ते पुढे म्हणाले. त्यांनी मुंबईसाठी या टर्मिनलचे फायदे विषद केले. “भारतात क्रूझ प्रवासी संख्या 2041-42 पर्यंत 40 लाख पर्यंत पोहचेल, त्यापैकी मुंबईला 30 लाख क्रूझ प्रवासी मिळतील. मुंबई ही भारताची क्रूझ राजधानी असेल,” असे ते पुढे म्हणाले.

जलोटा यांनी फ्लोटिंग स्टोरेज री-गॅसिफिकेशन युनिटच्या फायद्यांविषयीही माहिती दिली. “या प्रकल्पातून मुंबई आणि देशाच्या पश्चिम भागासाठी सुमारे पाच दशलक्ष मेट्रिक टन/वार्षिक एलएनजी उपलब्ध होईल; या प्रदेशात सुमारे 25 ते 30 दशलक्ष टन मागणी आहे तर सध्या फक्त 8 दशलक्ष मेट्रिक टन उपलब्ध आहे,” असे ते म्हणाले. या प्रकल्पामुळे मागणी आणि पुरवठा यातील तफावत कमी होण्यास मदत होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जलोटा यांनी गती शक्ती पोर्टल https://gatishakti.ncog.gov.in/port/login या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अनेक फायद्यांविषयी देखील सांगितले. हे पोर्टल पायाभूत सुविधा कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या समन्वित अंमलबजावणीसाठी रेल्वे आणि रस्ते मंत्रालयासह 16 मंत्रालयांना एकाच मंचावर आणते. पोर्टलमध्ये भारतमाला, सागरमाला,उडान सारख्या विविध मंत्रालये आणि राज्य सरकारांच्या पायाभूत विकास योजनांचा समावेश आहे. यात BiSAG-N (भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस अॅप्लिकेशन्स अँड जिओइन्फॉरमॅटिक्स) ने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.


“राज्य सरकारच्या विभागांसह कोणत्याही विभागाला या पोर्टलचा फायदा होऊ शकतो,” असे नमूद करून ते म्हणाले की पोर्टलने विविध विभागांकडून मंजुरी घेण्यास लागणारा वेळ कमी केला आहे. या मंचामुळे कोणत्याही प्रदेशासाठी पायाभूत सुविधा योजनांचा मसुदा तयार करणे सोपे होते याकडेही त्यांनी लक्ष वेधले.अध्यक्षांनी पोर्टलबाबत संबंधितांकडून सूचनाही मागवल्या.
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचा एल्गार सुरुच राहणार-विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
मुंबई, ३ :- देशद्रोही दाऊद इब्राहिम आणि बॉम्बस्फोटातील आरोपी शाहवली खान आणि सलील यांच्याशी जागेचा व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांची देशद्रोही प्रवृत्ती राज्यातील जनता पाहत आहे. याच मलिकांना आता न्यायालयाने कोठडी दिली आहे, त्यामुळे विधानपरिषदेत भाजपा व मित्र पक्षांनी मलिक यांच्या कृत्याचा निषेध केला. तसेच मलिकांची पाठराखण करणा-या सरकारचा धिक्कार केला व गदारोळ केला. नवाब मलिक मंत्रीपदाचा राजीनामा देत नाही तोपर्यंत देशद्रोह्यांना साथ देणा-यांच्या विरोधातील एल्गार सुरुच राहणार असा पवित्रा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विधानपरिषदेत घेतला.
आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या देशद्रोही बॉम्बस्फोटातील आरोपींशी संगनमत करून सामील असणाऱ्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची दरेकर यांनी जोरदार मागणी केली. त्यानंतर प्रसिध्दीमाध्यांशी बोलताना दरेकर म्हणाले, नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सभापतींकडे परवानगी मागितली परंतु, विरोधकांची मुस्कटदाबी करत नवाब मलिक व पर्यायाने दाऊदचे समर्थन राज्य सरकार करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची टिकाही दरेकर यांनी केली.
नवाब मलिक हे कौशल्य विकास व अल्पसंख्याक मंत्री आहेत. मात्र, ते सध्या कोठडीमध्ये आहेत. तेव्हा, अधिवेशनात जर या विभागांबाबत प्रश्न उपस्थित झाले तर त्याचे उत्तर जेलमधून मिळवायचे का की त्यांच्या विभागाची प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी जेलमध्ये स्क्रीन लावावी लागली असा टोलाही दरेकर यांनी लगावला.
याआधी सचिन वाझे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे समर्थन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहातून केले. परंतु, जनतेच्या आणि आमच्या मागणीसमोर सरकारला झुकावे लागले. यंदाही या सरकारला नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा लागेल. विधानसभा असो वा विधान परिषद आम्ही आक्रमकपणे मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहोत. जनतेच्या दरबारात नवाब मलिक राजीनामा देत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा एल्गार देशद्रोह्यांविरुद्ध सुरुच राहणार असा इशाराही दरेकर यांनी दिला.
आळंदीकरांकडून महापौर मुरलीधर मोहोळ यांचा नागरी सत्कार !
पुणे (प्रतिनिधी):श्री क्षेत्र आळंदी येथील येथील भामा आसखेड पाणी योजनेतून विशेष पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावल्याबद्दल महापौर मुरलीधर मोहोळ यांचा समस्त आळंदीकर नागरिक आणि महाराज मंडळीच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी हभप नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते महापौरांना वारकरी संप्रदायाचा फेटा, संत ज्ञानेश्वर महाराज मूर्ती भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, हभप चैतन्य महाराज लोंढे, आध्यात्मिक विकास आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख हभप संजय महाराज घुंडरे, माजी सभापती डी.डी. भोसले, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, सचिन पाचुंदे, शारदा वडगावकर, हभप भाऊमहाराज फुरसुंगीकर, माऊली वीर, नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, सागर बोरुंदिया, सचिन काळे, माजी नगरसेवक दिनेश घुले, अशोकराव उमरगेकर, नंदकुमार कुऱ्हाडे, वासुदेव घुंडरे, भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, अजित वडगावकर, भागवत आवटे, गुलाबराव खांडेभराड, माऊली बनसोडे, पांडुरंग ठाकुर, आसाराम महाराज बडे, पंडित महाराज क्षीरसागर, महाराज मंडळी आणि आळंदीकर नागरिक आणि आळंदीकर नागरिक तसेच महापौरांच्या मातोश्री आणि बंधू सुध्दा उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर माऊलींच्या क्षेत्र आळंदीत अर्थात अलंकापुरीत भामा आसखेड पाणी योजनेतून विशेष पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात मोलाची भूमिका निभावण्याची संधी मिळाली. खरे तर ही योजना मंजूर करण्यात मी केवळ निमित्तमात्र होतो, कारण आळंदीकरांच्या सामूहिक पाठपुराव्याचेच हे यश आहे. हभप नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते वारकरी संप्रदायाचा फेटा, संत ज्ञानेश्वर महाराज मूर्ती देऊन सन्मानित केले. आजवर अनेक सन्मान स्विकारण्याची संधी मिळाली, मात्र माऊलींच्या मंदीरात आणि आईच्या उपस्थितीत झालेला हा सन्मान कायम स्मरणात राहील.
‘आळंदी शहराला पाणी देण्याच्या या निर्णयाला खरंतर कोणाचाही विरोध नव्हता, तरीही प्रशासकीय पातळीवर ही मागणी पूर्ण करण्यासाठी विशेष पाठपुरावा करावा लागला. त्यानंतर कोणत्याही अटी-शर्तीशिवाय आळंदीला पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली, विशेष योगायोग म्हणजे त्याच दिवशी आळंदी शहराला जलसंपदा विभागाकडून स्वतंत्र पाण्याचा कोटा मंजूर करण्यात आला आणि आळंदीला स्वतःचे हक्काचे पाणी मिळाले. आळंदीतील नागरिक, भाविक आणि वारकऱ्यांना हा पाणीपुरवठा मंजूर झाला, याचे मला आत्मिक समाधान आहे आणि माझ्या महापौरपदाच्या कार्यकाळात कायम आठवणीत राहील, असा हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हभप चैतन्य महाराज लोंढे यांनी तर आभार संजय घुंडरे यांनी केले.
युक्रेनमधून 6200 हून अधिक भारतीय विशेष नागरी उड्डाणांद्वारे मायदेशी परतले आहेत
पुढील दोन दिवसांत 7400 हून अधिक भारतीय दाखल होण्याची शक्यता
नवी दिल्ली, 3 मार्च 2022
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन गंगा’ नावाने मोठी बचाव मोहीम राबवली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या निकट समन्वयाने, परराष्ट्र मंत्रालय भारतीय विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. इंडियन एअरलाइन्स देखील या बचाव मोहिमेत हातभार लावत आहे . चार केंद्रीय मंत्री- हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य एम सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंग युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये जाऊन या मोहिमेला मदत आणि देखरेख ठेवण्यासाठी गेले आहेत. भारतीय नागरी विमाने तसेच भारतीय हवाई दलाची विमाने अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत घेऊन येत आहेत .
22 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या बचाव कार्याअंतर्गत आतापर्यंत 6200 हून अधिक लोकांना परत आणले आहे, ज्यात 10 विशेष नागरी विमानांद्वारे आज येत असलेल्या 2185 व्यक्तींचा समावेश आहे. आजच्या उड्डाणांमध्ये बुखारेस्टहून(रुमानिया) 5, बुडापेस्टहून(हंगेरी) 2, कोसिसहून(स्लोवाकिया) 1 आणि झेझोहून(पोलंड) 2 विमानांचा समावेश होता. याशिवाय,भारतीय हवाई दलाची 3 विमाने आज आणखी काही भारतीयांना घेऊन येत आहेत. नागरी उड्डाणांची संख्या आणखी वाढवली जाईल आणि पुढील दोन दिवसांत विशेष विमानांद्वारे 7400 हून अधिक लोकांना मायदेशी आणले जाण्याची शक्यता आहे. उद्या 3500 आणि 5 मार्च रोजी 3900 हून अधिक लोकांना परत आणले जाण्याची शक्यता आहे.
उद्याच्या विशेष विमान सेवांचे तात्पुरते वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
| Date | Airline | From | To | ETA | Inbound flights |
| 04.03.2022 | Air India Express | Bucharest | Mumbai | 06:20 | 1 |
| Air India Express | Budapest | Mumbai | 08:30 | 1 | |
| Air India | Bucharest | New Delhi | 10:05 | 1 | |
| SpiceJet | Kosice | New Delhi | 11:20:00,14:10 | 2 | |
| Indigo | Budapest | New Delhi | 04:40, 08:20 | 2 | |
| Indigo | Rzeszow | New Delhi | 08:20, 05:20, 06:20 | 3 | |
| Indigo | Bucharest | New Delhi | 02:30, 03:40, 04:40 | 3 | |
| Indigo | Suceava | New Delhi | 04:05,05:05 | 2 | |
| Vistara | Bucharest | New Delhi | 15:45 | 1 | |
| Go First | Budapest | New Delhi | 04:00 | 1 |
विमान सेवांची एकूण संख्या: 17
ऑटोरिक्षांचे मीटर पुनः प्रमाणीकरण 31 मार्चपर्यंत करण्याचे आवाहन
पुणे, दि.3: प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती यांनी ऑटोरिक्षा चालकांनी गैरसोय टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीटर पुन:प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) करण्याकरीता 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून या मुदतीत सर्व ऑटोरिक्षा चालक, मालकांनी ऑटोरिक्षांचे मीटर पुनः प्रमाणीकरण व मीटर तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
मीटर तपासणीचे कामकाज फुलेनगर, आळंदी रस्ता चाचणी मैदान या ठिकाणी सुरु आहे. ऑटोरिक्षाधारक मीटर पुन:प्रमाणीकरण करुन न घेतल्यास त्यांच्यावर मुदत समाप्तीनंतर किमान 7 दिवस आणि कमाल 40 दिवस या मर्यादेत प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी 1 दिवस परवाना निलंबन केले जाईल. निलंबनाऐवजी तडजोड शुल्क जमा करण्यात इच्छुक ऑटोरिक्षाधारकांकडून प्रत्येक दिवसासाठी 50 रुपये आकारण्यात येईल जे किमान 500 रुपये आणि कमाल 2 हजार रुपये या मर्यादेत राहील, असे प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी कळवले आहे.
२५ लोकांच्या उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण हाही महाराजांचा अवमानच -राष्ट्रवादी शहर अध्यक्षांचा आरोप (व्हिडीओ)
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्यक्तिमत्त्व उठून दिसावं, त्यांची बडदास्त ठेवता यावी म्हणून महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा कार्यक्रम केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत करून पुन्हा छत्रपतींचा अवमान करण्यात येत असल्याची टिका राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज येथे केली .
जगताप यांनी आपल्या पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख अमोघ ढमाले यांचे मार्फत यांच्या मार्फत पाठविलेल्या इ प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे कि,’ पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पानिपत होणार आहे याची चाहूल लागताच भाजपच्या वतीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाचारण करण्यात येत आहे. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची एकही संधी स्वतः नरेंद्र मोदींनीही सोडली नाही. छत्रपतींच्या महाराष्ट्राने देशाला कोरोना दिला असे वक्तव्य करत त्यांनी छत्रपतींच्या स्वराज्याचा अवमान केला. संघाचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान केला. ही ‘छिंदम’ प्रवृत्ती भाजप आणि आरएसएस च्या नसानसांत भिनलेली आहे. असे असतानाही मतांचे राजकारण करण्यासाठी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आणि प्रतिमेचा आवर्जून वापर भाजपकडून होतो.महानगरपालिका आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदींचं व्यक्तिमत्त्व उठून दिसावं, त्यांची बडदास्त ठेवता यावी म्हणून हा कार्यक्रम केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत करण्याचा भाजपचा डाव आहे. पुणे जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे, पुणे शहरात शिवरायांचं बालपण गेलं, असं असताना पुतळ्याचे अनावरण भव्यदिव्य सोहळ्यात होणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता केवळ नरेंद्र मोदी व भाजप यांच्यापुरता हा सोहळा मर्यादित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.हा शिवद्रोह आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही येत्या ६ मार्च रोजी याचा तीव्र निषेध करणार आहोत याची भारतीय जनता पक्षाने नोंद घ्यावी.असेही जगताप यांनी म्हटले आहे.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको, मंत्रिमंडळाचीच भूमिका
मुंबई-ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाने सादर केलेला अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावला. या अहवालात राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी नसल्याची टिप्पणी न्यायालयाने केली. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांशिवाय ओबीसी आरक्षणासह निवडणुका होऊ शकणार नाहीत. याच संदर्भात आज दुपारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांना दिली.
काय म्हणाले छगन भुजबळ?
पत्रकारांनी भुजबळांना विचारले की, कोर्टात बाजू मांडताना वकील कमी पडले, त्यांना पुरेशी माहिती दिली नव्हती, असा आरोप करण्यात येतोय. या प्रश्नावर भुजबळ म्हणाले की, कोर्टाच्या निर्णयानंतर असे मुद्दे समोर येतच असतात. याचिकाकर्ते जे ओबीसीच्या भल्यासाठी विरोध करत असल्याचं म्हणत आहेत त्यात कसलं भलं आहे. परंतु यावर आम्ही पर्याय शोधत आहोत. याबाबत विधिज्ञांशी चर्चा करणार आहोत आणि नंतर पुढील भूमिका ठरवू. दरम्यान, विरोधकही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको ही भूमिका मांडत आहेत, यावर भुजबळ म्हणाले की, विरोधकांची जी भूमिका आहे तीच आमचीही भूमिका आहे.
