मुंबई, दि. 3 : महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये कक्ष आरक्षणासाठी महिलांना विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. यानुसार दि. 6 ते 10 मार्च 2022 या पाच दिवसाच्या कालावधीत पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास येणाऱ्या महिला अतिथींना आणि त्यांच्या परिवारास पर्यटक निवास कक्ष आरक्षणावर 50 टक्के सूट देण्यात येणार आहे.
दरवर्षी 8 मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रामार्फत 2022 च्या जागतिक महिला दिनाचे बोधवाक्य (थीम) ‘आजची लैंगिक समानता, उद्याची शाश्वती’ (‘Gender Equality Today for The Sustainable Tomorrow’) हे ठेवण्यात आले आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये खंबीरपणे अग्रेसर असणाऱ्या महिलांना अधिक सक्षम करण्याकरिता तसेच त्यांच्याप्रती असलेला आदर, सन्मान व्यक्त करण्याकरिता एमटीडीसी प्रयत्नशील आहे.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यटन सचिव वल्सा नायर तसेच एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती जयश्री भोज यांच्या संकल्पनेतून महिलांसाठीची ही सवलत योजना राबविण्यात येत आहे.
राज्यात एमटीडीसीची 30 हून अधिक पर्यटक निवासे आणि उपहारगृहे असून यामध्ये एक हजारपेक्षा अधिक निवास कक्ष आहेत. ही सवलत केवळ रविवार दि. 6 मार्च ते गुरूवार 10 मार्च 2022 या कालावधीकरिताच देण्यात आलेली असून केवळ पर्यटक निवास कक्षाच्या आरक्षणावर असणार आहे. पर्यटक निवास आरक्षणासाठी महिला अतिथींना 50 टक्के आरक्षण सवलत देण्याकरिता आवश्यक प्रोमो कोड www.mtdc.co या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून त्यामुळे आरक्षणात पारदर्शकता राहणार आहे. महामंडळाद्वारे भाडेतत्वावर देण्यात आलेल्या पर्यटक निवासासाठी तसेच अतिरिक्त बेड, कॉन्फरन्स हॉल, लॉन्स, उपहारगृहांमधील नाश्ता आणि जेवण यासाठी ही सवलत लागू असणार नाही. या सवलतीस अनुसरून केलेले आरक्षण रद्द करता येणार नाही. तसेच ज्या महिलांच्या नावे आरक्षण असेल त्या महिलांनी पर्यटक निवासाच्या ठिकाणी आपल्या ओळखपत्रासह उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे.
‘अतिथी देवो भव’ या नीतीची अंमलबजावणी करणाऱ्या महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये आलेल्या महिला अतिथींचे स्वागत करण्यासाठी महामंडळ तत्पर आहे.
महामंडळाचे सर्व पर्यटक निवास सुरक्षित आणि आरामदायक असून निसर्गरम्य वातावरणात स्थित आहेत. शासनाने कोरोनाबाबतचे निर्बंध शिथील केले असल्याने महामंडळाची सर्वच पर्यटक निवासस्थाने मोठ्या प्रमाणावर आरक्षित होत असून महिलांसाठीच्या या सवलतीमुळे पर्यटनाचा आनंद द्विगुणित होणार आहे. महामंडळाकडून महिलांचा सन्मान केला जात असल्याने महिला पर्यटकांमधूनही समाधान व्यक्त होत असून अधिकाधिक महिला पर्यटकांनी या आरक्षण सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे उप महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी केले आहे.
वेश्याव्यवसाय सोडू इच्छिणाऱ्या महिलांच्या ‘क्लीन रेड’ प्रकल्पाच्या वर्षपूर्ती निमित्त छायाचित्र कथा प्रकाशन – सहेली संघातर्फे आयोजन पुणे : माणसाने माणसाला बरोबरीची वागणूक द्यायला हवी. वेश्या व्यवसाय करणारे आपल्यापेक्षा लहान ठरत नाही, हे जोपर्यंत आपल्याला वाटणार नाही तोपर्यंत आपली उन्नती होणार नाही. आज स्वच्छच्या माध्यमातून या महिला कचरा साफ करत आहेत, परंतु लोकांच्या मनात या महिलांबद्दल जो विचारांचा कचरा आहे. तो आपण सगळे मिळून साफ करुया, असे मत पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले.
पुण्यातील बुधवार पेठेतील सहेली संघाच्या वतीने क्लिन रेड प्रकल्पाच्या वर्षपूर्ती निमित्त छायाचित्र कथा प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सहेली संघ, ए.एस.आर सर्व्हिसेस आणि स्वच्छ च्या सहकार्याने क्लीन रेड हा एक वेगळा उपक्रम गेल्या एक वर्षापासून सुरू आहे.
वेश्याव्यवसाय सोडू इच्छिणार्या महिलांना सबळ रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या या प्रकल्पाला यशस्वीपणे १ वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहेली संघाच्या कार्यकारी संचालिका तेजस्वी सेवेकरी, सहेली संघाच्या अध्यक्षा महादेवी मादर, डॉ.हेमंत आपटे, ए.एस.आर सर्व्हिसेसचे तेजस भोसले, स्वच्छचे आलोक गोगटे, विलू पूनावाला चॅरीटेबल फाउंडेशनचे विजय कोल्हटकर उपस्थित होते.
डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी विविध योजना राबवून जर त्यांना सन्मानाचे स्थान मिळवून दिले, तर त्याही विचार करतील की दुस-या प्रकारे देखील मेहनतीच्या जोरावर पैसे कमवू शकतो. कोणतीही बाई या व्यवसायात आनंदाने जात नसते. त्यामुळे या महिलांसाठी काय करता येईल, याचा विचार देखील समाजातील नागरिकांनी करायला हवा.
तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, वेश्या व्यवसाय सोडून इतर काही काम मिळवण्याचा प्रयत्न अनेक महिला करत असतात पण समाजाकडून ,मिळणारी अवहेलना नकारात्मक दृष्टिकोन तसेच उपजीविकेचे ठोस पर्यायांचा अभाव यामुळे अनेक मर्यादा येतात. आयुष्याची गुंतागुंतीची रचना समजून घेऊन त्यांना इतर सबळ पर्याय मिळवून देणे हे नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. सहेली संघाने ही संकल्पना मांडून पुढाकार घेतला असताना अशा वेळेस तीन संस्था एकत्र येऊन ठामपणे उभ्या राहिल्या. अशावेळी ज्यांना स्वतःहून धंदा सोडून दुसरे काही काम करायचे आहे त्यांच्यासाठी सशक्त पर्याय उभा राहतो. या प्रक्रियेचा आविष्कार म्हणजे क्लिन रेड प्रकल्प आहे. यापुढेही अधिक चांगल्या पद्धतीने तिन्ही संस्था मिळून काम करत राहतील, असेही त्यांनी सांगितले. निलीमा करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.
पुणे, दि. ०३ मार्च २०२२: पश्चिम महाराष्ट्रामध्ये थकीत वीजबिलांचा भरणा करीत नसलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून मोठ्या वेगाने सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र मार्च महिन्यातील सर्वच दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा, पाणीपुरवठा व पथदिवे तसेच इतर वीजग्राहकांकडे २ हजार १७ कोटी ७४ लाख रुपये तसेच कृषिपंप वीजग्राहकांकडे ७ हजार ९६९ कोटी ९४ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. अतिशय आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून पश्चिम महाराष्ट्रातील कृषी व अकृषी वर्गवारीतील एकूण ९ हजार ९८७ कोटी ६८ लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांच्या वसूलीला वेग देण्यात आला आहे. तथापि वारंवार आवाहन करूनही थकबाकीचा भरणा करीत नाही अशा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई देखील वेगाने सुरु करण्यात आली आहे. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये महावितरणकडून विविध पथकांकडून ही कारवाई सुरु आहे.
या पार्श्वभूमिवर पश्चिम महाराष्ट्रातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र मार्च महिन्यातील प्रत्येक दिवशी सुरु ठेवण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी संबंधित कार्यालयांना दिले आहेत. त्यानुसार मार्च महिन्यातील सर्वच शनिवारी, रविवारी तसेच शुक्रवारी (दि. १८) या सार्वजनिक सुटीच्या दिवशी देखील इतर दिवसांप्रमाणेच वीजबिल भरणा केंद्र कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत. थकबाकीदार वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या चालू व थकीत बिलांचा भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. सोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधीत वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.
प्राप्तिकर विभागाने 25.02.2022 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी कंत्राटे घेणारे काही कंत्राटदार, एक प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे जवळचे सहकारी यांच्याविरोधात शोध मोहीम हाती घेत छापे टाकले. शोध मोहिमेदरम्यान मुंबईतील एकूण 35 हून अधिक परिसरात छापे टाकण्यात आले आहेत. या अंतर्गत कंत्राटदारांनी 200 कोटी रुपयांचे उत्पन्न दडवल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. शोध मोहिमेदरम्यान 2 कोटी रुपयांची अघोषित रोख रक्कम आणि दीड कोटी रुपये किमतीचे दागिने आतापर्यंत जप्त करण्यात आले आहेत.
शोध मोहिमेदरम्यान, अनेक संशयित कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे सापडले असून जप्त करण्यात आले आहेत. हे जप्त केलेले पुरावे कंत्राटदार आणि त्या व्यक्ती मध्ये जवळचे संबंध असल्याचे स्पष्ट करतात. सुमारे 3 डझन स्थावर मालमत्तांचे तपशील सापडले असून त्यांचे मूल्य 130 कोटींरुपयांपेक्षा अधिक आहे. त्यात त्यांच्या नावावर किंवा त्यांच्या सहकारी किंवा बेनामीदारांच्या नावावर घेतलेल्या मालमत्तांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय हवाला व्यवहारात त्यांचा सहभाग असल्याचे आणि अवैधरित्या कमावलेले पैसे काही परदेशी अधिकारक्षेत्रात पाठवल्याचे पुरावेही आढळले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या बेहिशेबी रोख पावत्या आणि देयके यांचा तपशील असलेली कागदपत्रे आणि एक्सेल फायली देखील सापडल्या आहेत आणि जप्त केल्या आहेत, ज्यांची नोंद खात्याच्या नियमित पुस्तकांमध्ये नाही.
कंत्राटदारांच्या बाबतीत, जप्त केलेल्या कागदपत्रांवरून खर्च वाढवून करपात्र उत्पन्न मोठ्या प्रमाणात दडपण्यासाठी त्यांनी अवलंबलेली कार्यपद्धती उघड होते. यासाठी उप-कंत्राट खर्चासाठी जास्त कंपन्या दाखवून पावत्या तयार करणे आणि खोट्या खर्चाचा दावा केला आहे. काही व्यवहारांमधून असे दिसून येते की या कंपन्यांकडून रोख रक्कम काढण्यात आली आहे आणि त्याचा वापर कंत्राटे देण्यासाठी आणि मालमत्तांमधील गुंतवणुकीसाठी बेहिशेबी पैसे देण्यासाठी केला गेला आहे. या गैरप्रकारांद्वारे कंत्राटदारांनी 200 कोटी रुपयांचे उत्पन्न दडवल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे.शोध मोहिमेदरम्यान 2 कोटी रुपयांची अघोषित रोख रक्कम आणि दीड कोटी रुपये किमतीचे दागिने आतापर्यंत जप्त करण्यात आले आहेत.पुढील तपास सुरू आहे.
प्रवाशांच्या पुढच्या प्रवासाच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने विमानतळाच्या टी-2 टर्मिनलवर सुरु केला विशेष मदत आणि आरक्षण कक्ष
मुंबई, 3 मार्च, 2022
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही विशेष मोहीम सुरु केली असून, या मोहिमेअंतर्गत 183 भारतीयांना घेऊन एअर इंडिया एक्सप्रेस IX 1202 हे विमान आज पहाटे मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. हे विमान तिथे अडकलेल्या प्रवाशांना घेऊन, रोमानियाच्या बुखारेस्ट इथून काल मध्यरात्री निघाले होते.
केंद्रीय रेल्वे आणि कोळसा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी विमानतळावर या प्रवाशांचे स्वागत केले. यावेळी या सर्व प्रवाशांचे नातेवाईक देखील विमानतळावर हजर होते.
या भारतीयांचे स्वागत केल्यावर दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ऑपरेशन गंगा अंतर्गत, युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले. सुमारे 17 हजार भारतीय, ज्यात बहुसंख्य विद्यार्थी आहेत, ते तिथे अडकले असून त्यापैकी सुमारे 4 ते 5 हजार नागरिकांना भारतात परत आणले गेले आहे, असे त्यांनी सांगितले. तिथे असलेल्या सर्व भारतीयांना मायदेशी परत आणेपर्यंत ही मोहीम सुरूच राहीलल, अशी माहितीही त्यांनी दिली.
परदेशातून मायदेशी येणाऱ्या प्रवाशांना आपापल्या गावी परत जाण्याची सोय करण्यासाठी भारतीय रेल्वेने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 वरच एक मदत आणि आरक्षण कक्ष स्थापन केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यनिहाय अशा या कक्षांद्वारे नागरिकांना त्यांच्या मूळगावी विनाकष्ट जाता यावे, या दृष्टीने त्यांना मदत केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी दानवे यांनी परत आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावी जाण्याची नीट सोय केली जावी अशा सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. या विमानातून परत आलेल्या एका विद्यार्थिनीने युद्धग्रस्त भूमीतून सुटकेचे चित्तथरारक अनुभव सांगितले. या कठीण परिस्थितीत, भारतीय दूतावास आणि तिथल्या नागरी सहकारी संस्थांनी केलेल्या मदतीबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली.
ऑपरेशन गंगा अंतर्गत उड्डाणे नुकतीच वाढवण्यात आली आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा नियंत्रण कक्ष तसेच युक्रेन, पोलंड, रोमानिया, हंगेरी आणि स्लोव्हाक इथे असलेल्या भारतीय दूतावासांचे नियंत्रण कक्ष 24 तास सुरु असून सर्व गरजू नागरिकांना आवश्यक ती मदत दिली जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्याशी काल दूरध्वनीवरुन संवाद साधला. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील स्थितीचे, विशेषतः खारकीवमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेविषयी चर्चा केली. भारतीय नागरिकांना युद्धजन्य प्रदेशातून सुरक्षित बाहेर काढण्याविषयी उभयतांमध्ये चर्चा झाली.
पुणे-राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या घोषणांना किंमत देत नसून, त्यांना गांभीर्याने घेत नाही. त्यांची बाहेर एक आणि महापालिकेत दुसरे अशी भूमिका असते. त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक त्यांचेच आदेश पाळत नाहीत. हे वारंवार सिद्ध झाले आहे. असे एकीकडे सांगत दुसरीकडे पुणे शहर कॉंग्रेसच्या पवित्र्यावर आक्षेप घेत भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी कॉंग्रेसला इशारा दिला आहे.
ते म्शहणाले,’हरातील सिग्नल यंत्रणांचे सुसूत्रीकरण, महापालिकेचे कोरोना काळातील कॉफी टेबल बुक, शहरात उभी राहत असणारी रुग्णालये यांच्या बाबतीत त्यांनी आंदोलने केली. परंतु त्यांच्या महापालिकेतील सर्वच सभासदांनी या ठरावांना एकमुखी पाठींबा देत जगताप यांना तोंडघशी पाडले. महापालिकेत एकशे बावीस नगरसेवक निवडून येतील या जगताप यांच्या विधानाची उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी खिल्ली उडविली. आता मोदींच्या विरोधात निदर्शने करण्याची जगताप यांची भाषा अशीच वल्गना करणारी आहे. कारण अजितदादा पवार यांनी मी पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे विधान करून जगताप यांना पुन्हा उघड्यावर पाडले आहे. आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही.
जगदीश मुळीक यांचा कॉंग्रेसला सवाल – ३ डिसेंबर २००६ रोजी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग कशासाठी आले होते ?
महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी कॉंग्रेसने सत्तेचा आणि पोलिसी बळाचा गैरवापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौर्यात निदर्शने करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला.
मुळीक म्हणाले, देशात महाराष्ट्र कॉंग्रेसमुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान शंभर टक्के सत्य आहे. त्यामुळे कोरोना देशभर वेगाने फैलावला. हे सत्य पचविण्याची ताकद कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वात नाही. त्यामुळेच अस्तित्व टिकविण्यासाठी नैराश्याच्या भावनेतून कॉंग्रेस टीका करीत आहे.
मुळीक पुढे म्हणाले, भाजपने पुण्यासाठी काय केले हा प्रश्न विचारण्याचे धाडस कॉंग्रेसचे नेते करतात याचे आश्चर्य वाटते. खरे तर कॉंग्रेसने पन्नास वर्षांत काय केले हा खरा प्रश्न आहे. पुणे मेट्रो काँग्रेसच्या काळात कागदावरच राहिली. राज्यात आणि केंद्रात भाजपचे शासन आल्यानंतर मेट्रोला गती मिळाली आणि केवळ पाच वर्षात पुण्यात मेट्रो धावू लागली. भाजपचे पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर आम्ही नक्की सत्तेत येऊ असा विश्वास वाटतो. मोदी यांचा दौरा पूर्णपणे शासकीय आहे. त्याला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने करू नये. अन्यथा २००७ च्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ३ डिसेंबर २००६ रोजी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग बीआरटीच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांचा हा दौरा राजकीय होता का असा प्रश्न विचारा लागेल.
लग्न ही जरी वैयक्तिक गोष्ट असली तरी भारतामध्ये कायद्याने त्यासाठी वयाची बंधने आहेत. भारतात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिनियम’ 2006’ करण्यात आला आणि 1 नोव्हेंबर 2007 पासून तो अमलात आला. सदर कायद्यानुसार वधु-वर सज्ञान म्हणजेच मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे असेल, तर विवाह ग्राह्य मानला जातो.
पाहूया या कायद्याचा इतिहास :-
1860 :- आयपीसी कलम 375 व 376, 10 वर्षाखालील मुलीशी व पत्नीशी समागम करण्यास बंदी. याला बालविवाहाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उचललेले पहिले पाऊल म्हणता येईल.
1894 :- म्हैसूर सरकारने बालविवाहाचा कायदा करुन 8 वर्षांखाली मुलीचे वय असल्यास विवाहाला बंदी केली.
1904 :- बडोदा सरकारने मुलीचे विवाहयोग्य वय 12 व मुलाचे वय 16 वर्षाचे ठरवले.
1927 :- इंदूर सरकारने मुलीची वयोमर्यादा 12 व मुलाची 14 वर्षे ठरवली.
1929 :- बालविवाह प्रतिबंधक कायदा (सारडा कायदा) या अन्वये मुलीचे वय 14 वर्षे व मुलाचे वय 18 वर्षे ठरवण्यात आले.
1955 :- हिंदू विवाह कायदा मुलीचे वय 15 वर्षाचे ठरले व मुलाचे 18 वर्षे. तसेच 1978 च्या कायद्यानुसार मुलीचे वय 18 व मुलाचे 21 वर्षे ठरले.
बालविवाह स्थिती :-
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण 2015-16 नुसार बालविवाहाचे प्रमाण भारतातील 26.8 टक्के आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भारतातील 4 पैकी एकापेक्षा जास्त स्त्रिया लग्नाचे कायदेशीर वय गाठण्यापूर्वी विवाह करतात.
महाराष्ट्राची सरासरी 26.3 टक्के आहे. मुंबई शहराची 10.3 टक्के आहे तर मुंबई उपनगरातील 17.8 टक्के आहे. जालना येथे बालविवाहाचे प्रमाण 47. 1 टक्के आहे. तर परभणीत 41 टक्के आहे. 2017 मध्ये राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने बालविवाहाच्या जास्त घटना घडतात, अशा 70 जिल्ह्यांची सूची केली होती. दुर्दैवाने त्यातील 17 जिल्हे महाराष्ट्रातील होते.
बालविवाहाची कारणे :-
मुलगी सामान्यत: एक ओझे मानली जाते आणि पारंपरिकरित्या समाजात तिचे लग्न लवकरात लवकर केले जाण्याची वृत्ती आहे. बालविवाहाचे समर्थन करताना मुलीचे पालक असे म्हणतात की लहान वयात जर मुलांचा विवाह करुन दिला तर, हुंडा कमी द्यावा लागतो. पण ते हे विसरुन जातात कि ‘हुंडा प्रतिबंधक कायदा, 1961’ नुसार हुंडा देणे आणि घेणे गुन्हा आहे. मुलींना आपला साथीदार शोधण्याची समज येण्याच्या आधीच तिचे लग्न केले तर पालकांसाठी आपल्या जातीतच, आपल्या तोलामोलाचं कुटुंब मुलीसाठी शोधण्यास सहजता असते.
मुलींना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्याचा एक मार्ग म्हणून पालक याकडे पाहतात. लवकर विवाह म्हणजे वधूची पवित्रता आणि कौमार्य याची खात्री करण्याचा एक मार्ग आहे. संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली सुध्दा अनेक बाल विवाह केले जातात. शिक्षणाचा अभाव, बाल विवाहाच्या दूष्परिणामाविषयी जागृतीचा अभाव. कायद्याची अंमलबजावणी आणि इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासनाकडून कार्यवाहीत उदासिनता ही बालविवाह सुरु असण्याची महत्वपूर्ण कारणे आहेत.
यांचा बालविवाह होण्याची शक्यता आहे :-
शाळेत अनियमित शिक्षण अर्धवट सोडलेल्या आणि नापास झालेल्या मुली. स्थलांतरित कुटुंबातील मुली, वयात येणारे मुले – मुली, घरातील कर्ती व्यक्ती मृत्यू पावल्यास, जास्त मुले असणारे कुटुंब, गरीब घरातील, मुला मुलींची जबाबदारी टाळणारी कुटुंब, कर्जबाजारी कुटुंबातील मुलगी, व्यसनी कुटुंबातील मुलगी, एखादी अत्याचारग्रस्त मुलगी, प्रेमात गुंतलेली मुलगी, सामाजिक परंपरा, रुढी या प्रभावामुळे होणारे लग्न, असुरक्षित वातावरण असल्यामुळे होणारे लग्न, दुर्लक्षित मुलींचे कुटुंब, निराधार मुली, वस्तीतील मुलीसोबत एखादी घटना, एखाद्या मुलीसोबत लैंगिक शोषणाची घटना अथवा एखादी मुलगी प्रेमविवाहात निघून गेली असल्यास अशा घटनेवरुन वस्तीत, गावात भीतीपोटी इतर मुलींचे लग्न.
बालविवाह का करु नये?
बालविवाह हा मुलाच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. बालविवाह झालेल्या मुलींचा शारीरिक विकास पुरेसा झालेला नसतो. अशा स्थितीत 18 वर्षे गाठायच्या आतच गर्भधारणा झाली तर बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेले शरीर, मन, घरातल्या कामाचे ओझे आणि त्यातच अपुरे पोषण या साऱ्यांचे वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर झाल्याखेरीज राहत नाहीत. लहान वयात लग्न झाल्यामुळे आपल्या लैंगिकतेविषयी पुरेसे ज्ञान या मुलींना नसते. कुटुंब नियोजन, गर्भधारणा आणि गर्भारपणात घ्यायची काळजी हे तर फारच दूरचे विषय असतात. बालविवाह हा कायद्याने गुन्हा तर आहेच पण आजच्या काळात हे असे घडणे म्हणजेच मागासलेपणाचे लक्षण आहे.
दिनांक 3 जून 2013 व दिनांक 18 ऑगस्ट 2016 च्या अधिसूचनेनुसार ग्रामसेवक व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना अंगणवाडी ताई सहाय्य करतात. याशिवाय पोलीस, ग्रामसेवक, ग्रामसेविका, शिक्षक व समाज म्हणून आपल्या प्रत्येकाची बालविवाह रोखण्याची जबाबदारी आहे.
शिक्षा :-
बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याने बालविवाह होत असल्याची तक्रार लगेच बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कलम 13 नुसार प्रथम श्रेणी न्यायपीठासमोर तक्रार अर्ज दाखल करुन बालविवाह रोखण्याबाबत आदेश मिळावेत. बालकल्याण समिती सुध्दा निर्णय घेऊ शकते. बालविवाह अधिकारी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी आणि सीआरपीसीच्या कलम 151 नुसार पोलिसांना अपराध रोखण्यासाठी अटक करण्याचे सर्वतोपरी अधिकार आहेत.
18 वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधुशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणाऱ्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बालविवाह झाल्यास, संबधित वर व वधू यांचे आईवडील किंवा पालक, अन्य नातेवाईक मित्र परिवार असे सर्व, ज्यांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, व जे अशा विवाहात सामील झाले होते अशा सर्वाना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. मात्र संबंधित स्त्री गुन्हेगारांना कैदेची शिक्षा होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कायद्याने अल्पवयीन ठरविलेल्या व्यक्तिचे लग्न झाल्यास पोस्को, 2012 कायद्यानुसार सुध्दा गुन्हा दाखल होऊ शकतो.
(संकलन – संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, बीड)
मुंबई-अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबीयांकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत 7 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर काही वेळापूर्वी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. मलिक यांच्या पुढील कोठडीबाबत न्यायालयात दोन तास युक्तिवाद सुरू होता. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग ईडीच्या वतीने हजर झाले, तर अमित देसाई आणि तारक सय्यद यांनी मलिक यांची बाजू मांडली.
कोर्टातील सुनावणीदरम्यान अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी 1993च्या बॉम्बस्फोटांशी संबंधित एक गोपनीय जबाब कोर्टासमोर ठेवला आहे. मलिक आजारी असल्याने आणि रुग्णालयात दाखल असल्याने त्यांचे जबाब नोंदवता येणार नाहीत, असे सांगून एएसजी यांनी न्यायालयाला त्यांच्या कोठडीत सहा दिवसांची वाढ करण्यास सांगितले. ही बाब लक्षात घेऊन न्यायालयाने मलिक यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.
नवाब मलिक यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात असलेल्या नवाब मलिक यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि ईडीने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला मनी लाँड्रिंगचा खटला रद्द करण्याची मागणी केली. मलिकांनी आपल्या याचिकेत आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे आणि त्यांची तत्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे.
मलिक यांच्यानंतर आता त्यांच्या कुटुंबाभोवतीचा फास आवळला जात आहे. आज त्यांचा मुलगा फराज मलिक याला चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आले. मात्र, मंगळवारी पत्र पाठवून फराजने ईडीकडे एक आठवड्याची मुदत मागितली होती.
मलिक यांना सोमवारी संध्याकाळी रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
25 फेब्रुवारी रोजी पोटदुखीच्या तक्रारीनंतर मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या नवाब मलिक यांना सोमवारी संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर त्यांना पुन्हा मुंबईतील बॅलार्ड स्टेट येथील ईडी कार्यालयात आणण्यात आले. ते ३ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत होते, जी आता वाढवून 7 मार्चपर्यंत करण्यात आली आहे.
मलिक यांनी तपासात सहकार्य न केल्याचा आरोप
ईडीच्या कोठडीत चौकशीदरम्यान नवाब मलिक चौकशीत सहकार्य करत नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना दाखल करण्यात आल्याचे वृत्त आले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत ईडीकडून एम्स दिल्लीचे खासगी डॉक्टर आणि तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार असल्याचेही अपडेट करण्यात आले. दरम्यान, नवाब मलिक यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. मलिक यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. फराज आणि अमीर अशी मुलांची नावे आहेत, तर निलोफर आणि सना अशी मुलींची नावे आहेत.
नवाब मलिक यांच्यावर हे आहेत आरोप
मुंबईतील ईडीचे सहायक संचालक नीरज कुमार यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, नवाब मलिक हे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट, 2002 च्या तरतुदींनुसार शिक्षापात्र गुन्ह्यात दोषी आढळले आहेत. म्हणून मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 (15 ऑफ 2003) च्या कलम 19च्या उप-कलम (1) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, मी मोहम्मद नवाब मोहम्मद इस्लाम मलिकला अटक करतो. नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी 14.45 वाजता अटक करण्यात आली.
मुंबई -महाविकास आघाडी सरकारच्या ढिलाईमुळे व बेफिकीरमुळेच ओबीसी राजकीय आरक्षण गमावले असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केले.
ते म्हणाले की, शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सुरुवातीपासून बेपर्वाई व ढिलाई केली. मार्च २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द करणारा निकाल दिल्यानंतरही हे सरकार जागे झाले नाही. त्यानंतर जरी तातडीने सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कारवाई केली असती व एंपिरिकल डेटा गोळा केला असता तर ओबीसींना आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण परत मिळाले असते. महाविकास आघाडी सरकार सदैव टाळाटाळ करत राहिले. आताही सर्वोच्च न्यायालयात दाद मागताना सादर केलेला अहवाल कच्चा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यांनी सांगितले की, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळूच नये या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार ढिलाई आणि वेळकाढूपणा करत राहिले आहे. भाजपा हे मान्य करणार नाही. आघाडी सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार कारवाई करून ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून दिले पाहिजे. हे आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत.
हे अभ्यासक्रम सादर करणाऱ्या पहिल्या व आघाडीच्या विद्यापीठांमध्ये ‘आयएसयूएम’चा समावेश ~
~ भारतातील क्रीडा शिक्षणात आदर्श बदल घडवून आणण्यासाठी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी घेतलेल्या पुढाकाराचे व केलेल्या प्रयत्नांचे ‘आयएसयूएम’ हे फलित ~
पुणे : भारतातील तरुणांसाठी मान्यताप्राप्त पदवीला पर्याय म्हणून क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापन या विषयांमध्ये बॅचलर्स आणि मास्टर्स या पदव्यांचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठ अनुदान मंडळाने (यूजीसी) घेतला, त्याचे स्वागत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र, पुणे या संस्थेने केले आहे. क्रीडा शिक्षणाचे नामकरण करण्याची गरज लक्षात घेऊन समकालीन व भविष्याभिमुख अध्यापनशास्त्रात बदल निर्माण करण्यात महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सादर करून भारतात एक संघटित व संरचित “स्पोर्ट्स-एड” क्षेत्र निर्माण करण्यात अग्रेसर ठरलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दूरदृष्टीतून आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या पुढाकारातून साकार झालेले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र हे राज्य सरकारच्या अथक प्रयत्नांचे फळ आहे. भारतातील क्रीडा शिक्षणाच्या विविध घटकांना योग्य ती मान्यता मिळविण्यासाठी सुनील केदार यांनी ‘यूजीसी’च्या अधिकाऱ्यांसोबत जवळून काम केले आहे. ‘बॅचलर्स इन स्पोर्ट्स सायन्स अॅंड स्पोर्ट्स मॅनेजमेंट’ या पदवीला मान्यता मिळाल्याने देशातील क्रीडा नैपुण्याच्या परिसंस्थेमध्ये व्यावसायिता निर्माण होईल आणि १० अब्ज डॉलर मूल्याच्या क्रीडा व्यवस्थापन उद्योगात संधी उपलब्ध होण्यास प्रोत्साहन मिळेल. तसेच, यापूर्वी वित्तीय सेवा व माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांत ज्याप्रमाणे महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य ठरले, त्याचप्रमाणे क्रीडा प्रतिभा समृद्ध करणारे एक अग्रणी राज्य म्हणून ते उदयास येईल.
माहाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणाले, “विविध क्रीडा प्रकारांतील विज्ञान व व्यवस्थापन यांत कुशल व्यावसायिक निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने आपल्याकडे यापूर्वी क्रीडा शिक्षणामध्ये पुनर्कल्पना आणि परिवर्तन घडवून आणण्याचे एकमेव धोरण होते. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन झाल्याने आता तंत्रज्ञान, व्यवस्थापन, क्रीडा प्रशासन यातील विविध पैलूंचा समावेश करून क्रीडा शिक्षणात क्रांती घडवून आणणे आणि क्रीडा क्षेत्रात भारतातर्फे पराक्रम गाजवू शकतील, असे भविष्यातील क्रीडा व्यावसायिक तयार करणे, हे आमचे ध्येय तयार झाले आहे. ‘यूजीसी’च्या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत. यापुढे व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला भारतीय क्रीडा उद्योगाच्या दीर्घकालीन विकासासाठी त्यातील प्रतिभा, नोकऱ्या आणि क्रीडा बौद्धिक संपत्ती (आयपी) तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झेप घेता येईल, अशी अपेक्षा आम्ही बाळगतो.”
पुण्यातील ‘आयएसयूएम’चे सक्षम अधिकारी ओम प्रकाश बकोरिया म्हणाले, “भारतातील क्रीडा परिसंस्थेसाठी ही एक महत्त्वाची घडामोड ठरणार आहे. क्रीडा विज्ञान आणि व्यवस्थापनातील भविष्यासाठीचे तयार अभ्यासक्रम सादर करणार्या भारतातील काही विद्यापीठांपैकी एक असल्याचा आम्हाला आनंद आहे. देशातील तरुणांच्या करिअरला चालना देणाऱ्या प्रमुख अभ्यासक्रमांमध्ये आता क्रीडा हा विषयही महत्त्वाचा ठरेल. अर्थात, या तरुणांना आपण क्रीडा शास्त्रात व्यावसायिक पद्धतीने घडविले पाहिजे. आमचे उद्योग तज्ज्ञ त्यांना क्रीडा व्यावसायिक बनण्यात मदत करतीलच. पुढील पाच वर्षांत क्रीडा उद्योग १० अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने संपूर्ण क्रीडा समुदायाला नियोजित पद्धतीने उभे करण्यासाठी आपल्याला भविष्यात एक मजबूत ‘टॅलेंट फ्रेमवर्क’ तयार करणे आवश्यक आहे”
महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने पुण्यात गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना झाली. भारताचे माजी डावखुरे फिरकीपटू नीलेश कुलकर्णी हे या प्रकल्पात सरकारच्या प्रमुख सल्लागारांपैकी एक आहेत. त्यांनी या संस्थेची मुख्य धोरणे निश्चित करण्यात आणि प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्यात मदत केली आहे.
“भारतातील क्रीडा शिक्षणाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या कामाची ‘यूजीसी’ने दखल घेतली, याचा मला आनंद आहे. आपल्याला क्रीडा क्षेत्रातील विविध डोमेन्समध्ये पुढील स्तरावरची प्रगती साध्य करायची असेल, तर त्यातील पदव्यांसाठी मान्यता मिळणे ही काळाची गरज होती. महाराष्ट्र सरकारमध्ये मानद सल्लागार म्हणून मी काम केले आहे आणि गेल्या काही वर्षांत मला क्रीडा विज्ञान व व्यवस्थापन या क्षेत्रासाठी शैक्षणिक प्रमाणीकरणाची कमतरता जाणवली होती. ही बाब चिंताजनकच होती. याकरीता यातील अभ्यासक्रम काळजीपूर्वक तयार करून तो विकसीत करणे आणि क्रीडा शिक्षणात वैविध्य आणण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये धोरणात्मक सहयोग निर्माण करणे याची गरज होती. ‘आयएसयूएम’ची स्थापना केल्याने या प्रक्रियेत जलद प्रगती करण्याचे आमचे ध्येय साकार होणार आहे,” असे कुलकर्णी यांनी ‘यूजीसी’च्या अधिसूचनेबाबत म्हटले.
आयएसयूएम, पुणे या संस्थेने जगातील काही नामांकित विद्यापीठे आणि संस्थांशी करार केला आहे. ही विद्यापीठांची यादी पुढीलप्रमाणे :
अनु क्र.
विद्यापीठाचे नाव
१
लफबरो युनिव्हर्सिटी
२
युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिना
३
नॉर्वेजियन स्कूल ऑफ स्पोर्ट सायन्सेस
४
युनिव्हर्सिटी ऑफ क्वीनलॅन्ड
५
युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्क
६
यॉर्क युनिव्हर्सिटी कॅनडा
७
युनिव्हर्सिटी ऑफ कोपनहेगन, डेन्मार्क
८
जर्मन स्पोर्ट युनिव्हर्सिटी कलोन
९
मास्ट्रिच युनिव्हर्सिटी – नेदरलॅंड
१०
युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी
११
ओहियो युनिव्हर्सिटी
१२
युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ फ्लोरिडा
१३
डीकीन युनिव्हर्सिटी
१४
जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी
१५
साऊथईस्टर्न ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटी
क्रीडा प्रतिभा व्यवस्थापन क्षेत्रात विविध डोमेन्समध्ये पात्र व्यावसायिकांना मोठी मागणी असून ४० लाखांहून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. ‘यूजीसी’च्या मान्यतेमुळे आता माजी खेळाडूंना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्याकरीता कुशल व्यावसायिकांच्या निर्मितीसाठी क्रीडा शिक्षण क्षेत्राला चालना मिळेल.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात वसलेले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ ही शारीरिक व क्रीडा शिक्षण, क्रीडा विज्ञान व क्रीडा वैद्यक, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यमे व संज्ञापन, क्रीडा शिकवणी व प्रशिक्षण या विषयांचे अभ्यासक्रम राबविणारी पहिलीच शिक्षणसंस्था आहे. पहिल्या टप्प्यात, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी, क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापनातील ३ वर्षांचा अभ्यासक्रम, तसेच क्रीडा शिकवणी व प्रशिक्षण असा ३ महिन्यांचा कार्यक्रमही सुरू करण्यात आला आहे. या संस्थेने क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन व क्रीडा व्यवस्थापन यांसारख्या अभ्यासक्रमांमध्ये ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम’ या संस्थांचेदेखील सहकार्य मागितले आहे; जेणेकरून एकत्रित आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करता येईल.
अक्षर रसिक सुलेखन वर्ग आणि व्हिनस ट्रेडर्सतर्फे आयोजित मराठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा पारितोषिक वितरण पुणे : शालेय वयात केलेले सुलेखन संस्कार हे आयुष्यभर टिकतात. या कलेमुळे योग्य वयात मुलांना नीटनेटकेपणाची सवय लागते. सुंदर हस्ताक्षरामुळे मनाचे अंतरंग जाणले जाते, असे मत व्यंगचित्रकार चारूहास पंडित यांनी व्यक्त केले. अक्षर रसिक सुलेखन वर्ग आणि व्हिनस ट्रेडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा दिनानिमित्ताने मराठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल आशिष प्लाझाच्या सभागृहात पार पडला. यावेळी अक्षर रसिक सुलेखन वर्गाचे शैलेश जोशी व व्हिनस टेÑडर्सचे सुरेंद्र करमचंदांनी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुण्यातील २५ शाळांमधून इयत्ता ३री ते ८वी पर्यंतच्या तब्बल १५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. त्याबद्दल शाळांच्या मुख्याध्यापकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. रमणबाग प्रशालेतील कार्तिक थोरवे, पुष्कर जाधव, आर्य विद्या मंदिरमधील दर्शाली गायकवाड, शिवांजली देशमुख, हुजूरपागा प्रशालेतील हर्षदा फाळके, स्वरा घोलप, त्राक्षी तेली, एन.ई.एम.एस. मधील स्वरा चौधरी, तन्वी दिघे, रणवीर ठाकूर, गरवारे प्रशालेतील मंजिरी राऊत, सुंदर गव्हाणे, आपटे प्रशालेतील स्नेहल जुंदारे, कस्तुरी यादव, मा.स.गोळवलकर गुरुजी माध्यमिक शाळेतील मंजिरी जाधव, नू.म.वि. मुलींच्या शाळेतील श्रेया भुजबळ, संस्कृती चव्हाण, वैद्य प्रा.शाळेतील जिया धुमाळ, डी.ई.एस.प्रायमरीमधील अक्षरा जोशी, शर्वरी म्हसकर, हुजूरपागा प्राथमिक शाळेतील प्रतिक्षा सन्नके, नवीन मराठी शाळेतील अक्षया तांदळे, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता येतेहेल गौरव कसबे, शार्दुल महाजन यांनी आपापल्या गटात विजेतेपद मिळविले. याशिवाय हुजूरपागा प्रशालेतील आकांक्षा वरे, रेवा निकम, फुले प्रशालेतील रचना पांगले, राठी प्रशालेतील दुर्वा चंदनशिवे, अक्षरा जाधव, गोळवलकर प्रा. शाळेतील अनुश्री वेंगुर्लेकर, भार्गवी एकबोटे, रेणुका स्वरुपमधील मिहिका महाडिक, खादिजा सत्तार, महेश विद्यालय मराठी मधील आराध्य कंधारे, ॠतुजा मोरे, योगेश म्हस्के, महेश विद्यालय इंग्रजीमधील पियुश पवार, प्राप्ती सेन, तन्वी काटकर, डी.ई.एस. माध्यमिक मधील ज्ञानदा कुलकर्णी, वेद कडेकर, ग.रा.पालकर प्रशालेतील ज्ञानेश्वर निकम, प्राची शिंदे, अहिल्यादेवी प्रशालेतील यज्ञा तांबट, कार्तिकी तापकीर, कन्या शाळेतील काशीबाई हिरेबैनूर, संस्कृती मनोहरे आणि एस.एस.पी.एम.डे स्कूलमधील दिव्यांका देवकुळे, अक्षरा नलावडे हे आपापल्या गटात अव्वल होते. स्पर्धेत १६ मराठी माध्यमाच्या शाळा तर ९ इंग्लिश माध्यमाच्या शाळा सहभागी झाल्या होत्या. गेली ४७ वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात नाव मिळवलेले व्हीनस ट्रेडर्स आणि २५ वर्षांपासून सुलेखन क्षेत्रात अलौकिकपणे नाव मिळवलेले अक्षर रसिक सुलेखन वर्ग हे मराठी लेखन वृद्धीच्या दृष्टीने स्पर्धेद्वारे प्रयत्न करीत आहेत.
पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचच्या वतीने डॉ. राधा मंगेशकर यांच्या ‘एकटीचा सफरनामा’ या पुस्तकाविषयी संवाद
पुणे: जेव्हा मी एकटीने फिरायला सुरवात केली, तेव्हा मला ते आवडू लागले. त्यामुळे माझी निर्णय घेण्याची क्षमता वाढली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माझ्यातले भय पूर्णपणे नष्ट झाले, आत्मविश्वास वाढला. हे कळले कि, प्रवासातील अनुभवाने तुमच्यातील सहनशीलता आणि आत्मविश्वास वाढतो, असे मत युवा गायिका डॉ. राधा मंगेशकर यांनी व्यक्त केले.
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचच्या वतीने डॉ.राधा मंगेशकर यांच्या ‘एकटीचा सफरनामा’ या पुस्तकाविषयी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार, साधना सरपोतदार, शर्मिला सरपोतदार, अभय सरपोतदार समन्वयक अजित कुमठेकर यांनी केले. यावेळी मसापचे प्रकाश पायगुडे, आनंद सराफ , इस्कॉनचे संजय भोसले, पं. वसंतराव गाडगीळ, गेट सेट गो चे अमित कुलकर्णी, मँगो हॉलिडे चे मिलिंद बाबर, चैतन्य पराठाच्या संचालिका समीरा जांगिरा, सतीश पाकणीकर, नारगोळकर काका, सुलभा तेरणीकर, धनंजय दातार, अविनाश निमसे , अमृत पुरंदरे आदी मान्यवर उपस्थित होते. रुपाली पाथरे यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ राधा मंगेशकर म्हणाल्या, एकटीने फिरताना सर्वप्रथम याची जाणीव झाली, तुम्ही एकटे फिरता म्हणजे तुम्हाला एकटेपणा जाणवतोय असे नाही. जेव्हा तुम्ही एखादे सुंदर ठिकाण, वास्तु किंवा तेथील कलाकृती पाहता तेव्हा तुमचे स्वतःचे ओरिजनल विचार तुम्हाला कळतात. त्या भावनांमध्ये कोणाचेही विचार लादलेले नसतात. त्यामुळे तुम्ही अधिक स्वतंत्र विचार करु लागता. पुढे त्या म्हणाल्या, खजुराहो लेण्या म्हणजे केवळ कामशिल्पे अशी उभी केलेली प्रतिमा हे अत्यंत दुर्दैवी आहे. तेथे केवळ १० टक्के शिल्प ही कामशिल्प असून उर्वरित सर्व शिल्प धर्म, अर्थ आणि ज्ञानाने भरलेली आहेत असेही त्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय व जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना प्रतिबंधक कार्याची दखल
मुंबईचे कार्य अन्य शहरांसाठी पथदर्शक
मुंबई, दि. 3 : कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनामार्फत अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली. राज्याने केलेल्या कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय व जागतिक आरोग्य संघटना या स्तरांवर दखल घेण्यात आली. या संबंधात मुंबई शहर हे अन्य शहरांसाठी पथदर्शक शहर ठरले. या कठीण काळात राज्य शासनाने समाजातील दुर्बल घटकांचे दु:ख कमी करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. राज्यातील जनतेला आर्थिक लाभ व अन्न सुरक्षा देणाऱ्या योजनांवर विशेष भर देण्यात आला, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.
राज्य शासनाने आर्थिक चणचण असूनदेखील आर्थिक कार्ये पुन्हा सुरू करण्याची व्यवस्था केली, औद्योगिक गुंतवणूक आकर्षित केली आणि त्याचवेळी पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेतला, असे राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले.
विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या अभिभाषणाने राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झाले. राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी अभिभाषणाच्या वाचनाची सुरुवात केली, नंतर अभिभाषण पटलावर ठेवण्यात आले. यावेळी सभागृहात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषदेचे सदस्य उपस्थित होते.
पटलावर ठेवण्यात आलेल्या अभिभाषणात राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी नमूद केले की, गेल्या दोन वर्षांपासून कोविड-19 या सार्वत्रिक साथरोगाशी राज्य लढा देत आहे. राज्याने आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाटांचा सामना केला. कोरोनाची दुसरी लाट ही अधिक तीव्र होती. या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी माझे शासन संपूर्ण तयारीत होते. जेव्हा पुढची लाट मार्च ते जून 2021 दरम्यान राज्यात आली तेव्हा 6 हजार 500 सुविधा केंद्रांमध्ये 4 लाख 50 हजार विलगीकरण खाटा, 40 हजार आयसीयू खाटा, 1 लाख 35 हजार ऑक्सिजन खाटा व 15 हजारहून अधिक व्हेंटिलेटर या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. 600 हून अधिक प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता हा अल्पकालीन अडथळा होता. सुमारे दोन आठवड्यापर्यंत असलेली दररोजची अंदाजे 450 मेट्रिक टन इतकी ऑक्सिजनची तूट ही भारतीय हवाई दल व भारतीय रेल्वे यांच्या सहकार्याने दूर केली. राज्याची द्रवरूप ऑक्सिजनची साठवण क्षमता वाढवण्यासाठी माझ्या शासनाने विविध निर्णय घेतले. एप्रिल व मे २०२१ मधील तीव्र लाटेतील तीन दिवसांच्या सर्वाधिक मागणीइतकी साठवण क्षमता निर्माण करण्याचा निर्णय घेतला. अतिरिक्त ५ हजार मेट्रीक टन साठवण क्षमतेचे नियोजन केले होते. त्यापैकी २ हजार ७०० मेट्रीक टन साठवण क्षमता आधीच तयार करण्यात आली होती.
मिशन ऑक्सिजन स्वावलंबन याअंतर्गत माझ्या शासनाने ऑक्सिजन उत्पादन प्रोत्साहन धोरण अंमलात आणले आहे. आजमितीस एकूण 1 हजार 870 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून 114 नवीन ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प राज्यात उभारले जात आहेत. यामुळे आपली ऑक्सिजन उत्पादन क्षमता 1 हजार 480 मेट्रिक टनांनी वाढेल आणि यात आपण स्वावलंबी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आर्थिक क्षेत्रावर आघाडी, औद्योगिक गुंतवणूक आकर्षित
कोविड-19 सार्वत्रिक साथरोगामुळे आलेल्या आर्थिक मंदीमुळे शासनाला आर्थिक निर्णय घेणे अधिक आव्हानात्मक झाले होते. केंद्र सरकारकडून राज्याला 18 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रदेय असलेली वस्तू व सेवा कराची 29 हजार 942 कोटी रुपयांची नुकसानभरपाई न मिळाल्यामुळे हे आव्हान आणखी तीव्र झाले. तथापि, राज्य शासनाने ही आर्थिक चणचण असून देखील आर्थिक कार्ये पुन्हा सुरू करण्याची व्यवस्था केली, औद्योगिक गुंतवणूक आकर्षित केली आणि त्याच वेळी पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेतला, असे राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, महाराष्ट्राने कोविड-19 मुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या पात्र वारसाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 1 लाख 40 हजारपेक्षा अधिक प्रकरणांमध्ये प्रत्येकी 50 हजार रुपयांची भरपाई प्रदान केली आहे. तसेच आजपर्यंत महाराष्ट्रातील जवळपास 91 टक्के प्रौढ लोकसंख्येला कोविड-19 लसीची किमान एक मात्रा मिळाली आहे आणि 70 टक्के प्रौढ लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण झालेले आहे. 15 ते 18 वर्षे वयोगटातील 57 टक्यांपेक्षा अधिक मुलामुलींना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना, आघाडीवरील कोरोना योद्ध्यांना व 60 वर्षे वयावरील नागरिकांना लस प्रभाववर्धक मात्रा देण्यास देखील सुरुवात झालेली आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नवनवीन उपाययोजना
माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही अभिनव आरोग्य तपासणी मोहीम मागील वर्षापासून राबविण्यात येत आहे. माझ्या शासनाने लसीकरणाची व्याप्ती आणखी वाढवण्यासाठी अनेक नवनवीन उपाययोजना हाती घेतल्या आहेत. डिसेंबर 2021 मध्ये ‘हर घर दस्तक’ मोहीम राबविण्यात आली आणि लसीकरण पथकांनी सुमारे 35 हजार गावांना व जवळपास 55 लाख कुटुंबांना भेटी दिल्या. या मोहिमेमध्ये दिलेल्या लसीच्या पहिल्या मात्रेची संख्या 1 कोटी 25 लाखांपेक्षा अधिक आणि लसीच्या दुसऱ्या मात्रेची संख्या 28 लाखांपेक्षा अधिक होती. महाविद्यालयात जाणाऱ्या युवकांसाठी 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत युवा स्वास्थ्य मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत 1 लाख 8 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या परिसरातच कोविड-19 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
कोविड-19 संसर्गाची तिसरी लाट डिसेंबर 2021 च्या तिसऱ्या आठवड्यात सुरू झाली. पूर्वनियोजन व लसीकरण मोहीम यांमधील राज्याच्या अत्यंत सक्रिय भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या आरोग्य सुविधांवर कोणताही लक्षणीय भार पडला नाही. डिसेंबर 2021 व जानेवारी 2022 या महिन्यांमध्ये राज्यात सुमारे 10 लाख 50 हजार इतक्या कोविड-19 नवीन रुग्णांची नोंद झाली असली तरी मृत्युचे प्रमाण 0.1 टक्यापेक्षा कमी होते, असे त्यांनी सांगितले.
कोविड-19 नामनिर्देशित शासकीय रुग्णालयांमध्ये सर्व कोविड-19 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत सूचीबद्ध केलेल्या खाजगी रुग्णालयांकरिता वाजवी दर निश्चित करण्यात आले आहेत. कोविड-19 रुग्णांची काळजी घेताना आपला जीव गमावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येकी 50 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. आतापर्यंत अशा 195 लाभार्थ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली असून आणखी 64 प्रकरणे सध्या विचाराधीन आहेत.
कोरोना संकटकाळात दुर्बल घटकांना मदत
माझ्या शासनाने कोविड-19 सार्वत्रिक साथरोगामुळे आईवडील गमावलेल्या मुला-मुलींना 5 लाख रुपयांचे एकरकमी आर्थिक सहाय्य दिले आहे. कोविड-19 सार्वत्रिक साथरोगामुळे पतीचे निधन झालेल्या विधवांना, विद्यमान शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी वात्सल्य अभियान सुरू केले आहे. कोविड-19 सार्वत्रिक साथरोगामुळे कुटुंबातील कर्तापुरुष गमावलेल्या ग्रामीण भागातील विधवांना उपजीविकेची सन्मानजनक साधने व रोजगार उपलब्ध होण्याकरिता, माझ्या शासनाने वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना सुरू केली आहे. कोविड-19 सार्वत्रिक साथरोगाच्या दुसऱ्या लाटेच्या कालावधीत प्रत्येक ऑटोरिक्षा चालकाला 1 हजार 500 रुपये आर्थिक सहाय्य दिले आहे.
सार्वत्रिक साथरोगाचा प्रतिबंध करण्यासाठी उत्तम कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजनेअंतर्गत 30 लाख रुपयांपासून 1 कोटी रुपयांपर्यंत पुरस्कार देण्याचे माझ्या शासनाने घोषित केले आहे. माझ्या शासनाने सार्वत्रिक साथरोगामुळे आर्थिक ताण सहन कराव्या लागलेल्या राज्यभरातील 56 हजार कलाकारांना व 847 संघटनांना 35 कोटी रुपये इतके एकरकमी आर्थिक सहाय्य दिले आहे, असे राज्यपाल म्हणाले.
शासनाने नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चची स्थापना करण्यास मान्यता दिली असून ही अशा प्रकारची देशातील पहिलीच संस्था आहे. याद्वारे 17 पदव्युत्तर पदवी व 11 अतिविशेषोपचार पाठ्यक्रम चालविले जातील आणि या ठिकाणी 615 खाटांचे रुग्णालय देखील असेल.
सीमावर्ती क्षेत्रातील मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी उभे राहण्याचा निर्धार
महाराष्ट्राच्या सीमावर्ती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेच्या हक्कांसाठी उभे राहण्याचा माझ्या शासनाचा निर्धार आहे. 16 डिसेंबर 2021 रोजी बेंगळुरूमध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा आणि बेळगावमधील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाई फेकल्याच्या कृत्याचा माझे शासन तीव्र निषेध करीत आहे. विवादग्रस्त सीमावर्ती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक शासनाने केलेली दडपशाहीची कृत्ये निंदनीय आहेत, असे ते म्हणाले.
कोविड-19 सार्वत्रिक साथरोगाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत मंदी असून देखील शासनाने मॅग्नेटिक महाराष्ट्र-2 अंतर्गत 98 गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या असून त्यामध्ये 1 लाख 89 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा आणि 3 लाख 30 हजार रोजगार निर्मितीचा अंतर्भाव आहे.
हवामान बदलाच्या संकटाचा सामना आणि पर्यावरणाचे रक्षण
माझी वसुंधरा अभियान-एक अंतर्गत माझ्या शासनाने 21 लाख 94 हजार झाडे लावली आणि 1 हजार 650 नवीन हरित क्षेत्रे निर्माण केली. परिणामी 3 लाख 71 हजार टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी होण्यास मदत झाली. माझी वसुंधरा अभियान-दोन यास राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून त्याअंतर्गत सुमारे 12 हजार नावे नोंदविली आहेत. शालेय मुलामुलींमध्ये हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शासन इयत्ता पहिली ते आठवीसाठी पर्यावरण अभ्यासक्रम विकसित करीत आहे. नीती आयोगाने शासनाचे इलेक्ट्रिक वाहन धोरण मान्य केले आहे व त्याची प्रशंसा केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत 157 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शासनाने 7 हजार इलेक्ट्रिक वाहन मालकांना त्यांच्या वाहनांची किंमत कमी करून प्रोत्साहन दिले आहे. इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत आघाडीच्या उद्योगसमूहांकडून 9 हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यातून सुमारे 10 हजार रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे, असे राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले.
हवामान बदलाच्या प्रभावाशी जुळवून घेण्यासाठी व प्रभाव कमी करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री यांच्या सहअध्यक्षतेखाली महाराष्ट्र वातावरणीय बदल परिषदेची स्थापना केली आहे. स्कॉटलंड येथे झालेल्या 26 व्या कॉप परिषदेमध्ये हवामान बदलाचा सामना करण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची दखल घेतल्याने अंडर 2 कोलिशन लीडरशिप अवॉर्ड, 2021 चा भाग असलेला प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व पुरस्कार माझ्या शासनाने जिंकला आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की, हा पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे, असे ते म्हणाले.
माझ्या शासनाने गरजू लोकांना भोजन पुरविण्याकरिता शिवभोजन योजना सुरू केली आहे. सार्वत्रिक साथरोगाच्या कालावधीत 2 कोटी 70 लाख थाळ्या मोफत पुरविल्या आहेत आणि 3 कोटी 68 लाख थाळ्या प्रत्येकी 5 रुपयांत पुरविल्या आहेत. सध्या राज्यात 1 हजार 526 केंद्रे कार्यरत असून फेब्रुवारी 2022 पर्यंत 8 कोटींपेक्षा अधिक शिवभोजन थाळ्या वितरित करण्यात आल्या आहेत.
किमान आधारभूत किंमत, शेतकऱ्यांना दिलासा
2020-21 या हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून 20 लाख 36 हजार मेट्रिक टन धानाची व भरडधान्याची विक्रमी खरेदी केली आहे. 2020-21 च्या खरीप हंगामामध्ये 50 क्विंटलपर्यंतच्या धानासाठी प्रति शेतकरी, प्रति क्विंटल 700 रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम दिली आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत एकूण 1 हजार 200 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. माझ्या शासनाने किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सुमारे 1 कोटी 25 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आणि सुमारे 5 लाख शेतकऱ्यांना 7 हजार 97 कोटी रुपये प्रदान केले. त्याचप्रमाणे 1 लाख 34 हजार शेतकऱ्यांकडून रुपये 1 हजार 148 कोटी किंमतीचा 23 लाख 52 हजार क्विंटल हरभरा खरेदी केला. शासनाने गेल्या वर्षी शेतकऱ्यांना 9 हजार 445 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम प्रदान केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
शासनाने सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या शेतकऱ्यांना शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत परिपूरक अर्थसहाय्य म्हणून 200 कोटी रुपये वितरित केले आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या सेंद्रिय कृषी उत्पादनांच्या प्रमाणीकरणासाठी अकोला येथे महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण संस्थेची स्थापना केली आहे.
आपत्तींना तत्परतेने व प्रभावीपणे प्रतिसाद
रत्नागिरी, रायगड व इतर क्षेत्रांमध्ये आलेल्या तौक्ते चक्रीवादळापासून ते महापुरासारख्या अनेक नैसर्गिक आपत्तींना राज्याने तोंड दिले आहे. या आपत्तींमध्ये 461 जणांचा मृत्यू झाला आणि 7 हजार 360 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची सार्वजनिक मालमत्ता नष्ट झाली. शासनाने या आपत्तींना तत्परतेने व प्रभावीपणे प्रतिसाद दिला आणि याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 15 हजार कोटी रुपये आणि राज्याच्या अर्थसंकल्पातून अतिरिक्त 5 हजार 500 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. शासनाने भविष्यातील नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता कोकण प्रदेशासाठी 3 हजार 200 कोटी रुपयांचे पॅकेज देखील मंजूर केले आहे, असे ते म्हणाले.
शासनाने अत्याचार व ॲसिड हल्ल्यातील पीडित महिलांना व मुलींना मनोधैर्य योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले आहे. त्याचबरोबर अनाथ झालेल्या मुला-मुलींना शिक्षणात व नोकरीत एक टक्का आरक्षण देण्यात आले आहे.
‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत देशात सर्वाधिक कार्यक्रम
आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी 500 कोटी रुपये मंजूर केले आहेत. शासनाने आझादी का अमृत महोत्सव याअंतर्गत ग्रामपंचायतस्तरावर देशातील सर्वाधिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. केंद्र सरकारने आझादी का अमृत महोत्सवनिमित्त 20 ते 25 डिसेंबर 2021 या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा केला. केंद्र सरकारच्या सुशासन निर्देशांक अहवालानुसार 2019-20 व 2020-21 यावर्षी माझ्या शासनाचा देशात दुसरा क्रमांक आला याचा मला अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी काढले.
रस्ते विकासासाठी विविध प्रकल्प
शासनाने आशियाई विकास बँकेकडून अर्थसहाय्य मिळालेल्या 5 हजार कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पास मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत सुमारे 1 हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांची दर्जावाढ व काँक्रिटीकरण करण्यात येईल. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यास देखील मान्यता देण्यात आली असून त्याअंतर्गत 10 हजार कोटी रुपये खर्चातून 2 हजार कि.मी. रस्त्यांची दर्जावाढ करण्यात येईल. 8 हजार 654 कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या विकासाकरिता हायब्रीड ॲन्युईटी योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत एकूण 138 पॅकेजेस निश्चित करण्यात आले असून 3 हजार 675 कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. शासनाने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या 701 कि.मी. लांबीच्या महामार्गाचे 77 टक्के बांधकाम पूर्ण केले आहे. हा महामार्ग नागपूर ते गोंदिया व गडचिरोली ते नागपूरपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी पर्यंतच्या सागरी महामार्गाचे चौपदरीकरण व काँक्रिटीकरण पूर्ण करण्याचे काम देखील हाती घेतले आहे. मुंबईतील सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे 50 टक्के काम पूर्ण केले असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईमधील वाहतूक अधिक वेगवान व सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पुणे शहरातील रिंग रोडसाठी भूसंपादन कार्य हाती घेतले आहे. शासनाने पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या आर्थिक सहभागास मान्यता दिली आहे, असे ते म्हणाले.
कोरोना संकटकाळातही विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू
कोविड-19 सार्वत्रिक साथरोगाच्या काळात वर्गात प्रत्यक्ष भरणाऱ्या शाळा बंद असूनही शासनाने माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी व अभ्यासमाला या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवले. इयत्ता 1 ली ते 12 वीसाठी दिक्षा ॲपद्वारे दररोज विषयनिहाय अभ्यास साहित्य प्रसारित केले. सन 2020-21 मध्ये दिक्षा ॲपच्या वापरात महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले. शासनाने शाळा सुरू होण्यापूर्वीच इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे घरपोच वाटप केले आहे. सर्व शाळांमध्ये द्विभाषिक पुस्तके सुरू केली जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 488 शाळांचा राज्यातील आदर्श शाळा म्हणून विकास करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
शासनाने संशोधन क्षमता सुधारण्यासाठी राज्यातील सहा विद्यापीठांमध्ये तंत्रज्ञान विकास व तंत्रज्ञान हस्तांतरण केंद्रे स्थापन केली आहेत. राज्यात तीन समूह विद्यापीठे, दोन नवीन आदर्श पदवी महाविद्यालये व एक नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन केले जात आहे.
वन हक्क अधिनियमाची यशस्वी अंमलबजावणी
शासनाने वन हक्क अधिनियम 2006 ची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. आतापर्यंत 1 लाख 82 हजार 483 हेक्टर जमिनीचा समावेश असणारे 1 लाख 92 हजार 845 वैयक्तिक वन हक्क दावे तसेच 12 लाख 73 हजार 797 हेक्टर जमिनीचा समावेश असणारे 8 हजार 220 सामूहिक वन हक्क दावे मान्य करण्यात आले आहेत.
शासनाने अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह सुविधा मिळण्यासाठी त्यांच्या कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्न मर्यादेत 2 लाख 50 हजार रुपयांवरून 8 लाख रुपये वाढ केली आहे. अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांकरिता पोलीस शिपाई भरतीसाठी भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण योजना देखील सुरू केली आहे.
95 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी
डिजिटल स्वाक्षरी केलेल्या सात-बारा उताऱ्यांच्या प्रती नि:शुल्क वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यात 15 ऑगस्टपासून ई-पीक पाहणी प्रकल्प सुरू केला असून आतापर्यंत 95 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शासनाने रोजगार हमी योजनेशी संबंधित असलेल्या फळबाग योजनेनुसार मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत सुमारे 1 लाख 50 हजार शेततळी पूर्ण केली आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या वनस्पतींच्या पुनरुज्जीवनासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
शासनाने धनगर समाजाच्या विकासासाठी 13 योजना मंजूर केल्या आहेत. या वर्षी धनगर समाजातील 5 हजार 300 विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. शासनाने दरवर्षी 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भिमा येथे शौर्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी
2021 मध्ये नागरी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर होते हे सांगण्यास खूप आनंद होत आहे असे नमूद करुन राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, मुंबईतील वरळी, ना. म. जोशी मार्ग व नायगाव येथील बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले आहे. बी.डी.डी. चाळींमध्ये राहत असलेल्या अंदाजे 15 हजार 500 भाडेकरूंना 500 चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे. शासनाने राज्यातील 391 शहरांमध्ये व नगरांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची (नागरी) अंमलबजावणी केली आहे. या योजनेअंतर्गत 15 लाख 38 हजार निवासी घरे मंजूर करण्यात आली आहेत. माझ्या शासनाने या योजनेसाठी राज्य शासनाचा हिस्सा म्हणून आतापर्यंत 1 हजार 739 कोटी रुपये दिले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 500 चौरस फुटापर्यंत चटईक्षेत्र असलेल्या निवासी सदनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यामध्ये एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली लागू केली असून यामुळे राज्यातील नागरिकांना घर बांधणी परवानगी मिळणे सुलभ होईल, असे त्यांनी सांगितले.
शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत 9 प्रकल्प पूर्ण केले असून 2 लाख 64 हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण केली आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 19 प्रकल्प पूर्ण केले असून 3 लाख 77 हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण केली आहे. एकूण 2 हजार 636 मेगावॅट स्थापित क्षमतेचे 34 जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित केले आहेत आणि एकूण 160 मेगावॅट स्थापित क्षमतेचे 39 लघु जलविद्युत प्रकल्प खाजगीकरणातून कार्यान्वित केले आहेत. शासनाने जल जीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील 97 लाख 58 हजार घरांना नळजोडण्या पुरविल्या आहेत.
महिला व बालकांविरुद्धच्या अपराधांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्याकरिता आणि अशा प्रकरणांचे जलदगतीने अन्वेषण करण्यासाठी व जलदगतीने न्यायचौकशी करण्यासाठी राज्य विधानमंडळाने गेल्या अधिवेशनात शक्ती विधेयक संमत केले आहे. शासनाने वडगाव-मावळ येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) तसेच अलिबाग येथे कुटुंब न्यायालय स्थापन केले आहे.
शासनाने सर्व शासकीय विभागांमध्ये मराठीचा वापर करणे अनिवार्य करण्यासाठी महाराष्ट्र राजभाषा अधिनियमात सुधारणा केली आहे. मराठी भाषेशी संबंधित असलेल्या कामकाजाचे संनियत्रण करण्यासाठी एक राज्यस्तरीय समिती आणि अनेक जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
या अधिवेशनामध्ये नवीन वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय प्रस्ताव, विनियोजन विधेयके आणि इतर विधिविधाने मांडण्यात येतील. महाराष्ट्राला अधिकाधिक समृद्धीकडे नेण्यासाठी विधीमंडळ सदस्य कामकाजात सहभाग घेतील व या प्रस्तावांवर आपली अभ्यासपूर्ण मते मांडतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पुणे, दि. ०३ मार्च २०२२: पुणे व पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रामधील चालू तसेच कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या १ हजार ७७० कृषिपंप वीजग्राहकांनी कृषिपंप वीजजोडणी धोरणाचा लाभ घेत वीजबिलांमधून थकबाकीमुक्ती मिळविली आहे. या कृषी ग्राहकांना थकबाकीच्या रकमेत तब्बल १ कोटी ६१ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. थकबाकीच्या रकमेत सुमारे ६६ टक्के सवलत घेऊन थकबाकीमुक्त होण्याची संधी येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत उपलब्ध आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्र व लगतच्या परिसरामध्ये चालू व कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ६ हजार ८३२ कृषिपंप ग्राहकांकडे वीजबिलांपोटी २६ कोटी ५० लाख रुपयांची मूळ थकबाकी होती. कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार त्यातील व्याज, विलंब आकार व महावितरणकडून निर्लेखन तसेच वीजबिल दुरुस्तीचे एकूण ८ कोटी ४८ लाख रुपये माफ करण्यात आले आहे. सद्यस्थितीत या कृषिपंप ग्राहकांकडे १८ कोटी रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यापैकी ५० टक्के थकबाकी व चालू वीजबिलांचा येत्या ३१ मार्चपर्यंत भरणा केल्यास या ग्राहकांना आणखी ९ कोटी रुपयांची अतिरिक्त सवलत मिळणार आहे.
आतापर्यंत २ हजार ३४९ कृषिपंप ग्राहक थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिल व थकबाकीचा एकूण ३ कोटी ७७ लाख रुपयांचा भरणा केला आहे. थकबाकीमुक्ती योजनेनुसार त्यांना एकूण २ कोटी ८८ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. योजनेत सहभागीपैकी १ हजार ७७० कृषी ग्राहक वीजबिलांमधून पूर्णतः थकबाकीमुक्त झाले आहेत. या थकबाकीमुक्त ग्राहकांनी चालू व ५० टक्के थकबाकी असा एकूण २ कोटी ७६ लाख रुपयांचा भरणा केला. त्यामुळे थकबाकीमध्ये त्यांना ५० टक्के म्हणजे १ कोटी ६१ लाख ५४ हजार रुपयांची सवलत देण्यात आली. महावितरणच्या आकुर्डी उपविभागातील १४३, औंध-६६, भोसरी एक व दोन- १६१, चिंचवड- ४७, दापोडी- ६, गणेशखिंड-३०, खडकी- २, प्राधीकरण- २२५, सांगवी- २४४, वारजे- २४, धनकवडी- ३८, हडपसर- ६६, हडपसर एक-३५५, स्वारगेट व मार्केडयार्ड- ३, नगररोड- २०, सेंट मेरी- २४, विश्रांतवाडी- १०८, वडगाव शेरी- २३ तर वडगाव धायरी उपविभागातील १८४ कृषिपंप ग्राहक योजनेचा लाभ घेत थकबाकीमुक्त झाले आहेत.
महावितरणच्या वारजे उपविभागाचे कर्मचारी संगीता शेलार व राहुल रोकडे यांनी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या सुमारे १०० थकबाकीदार कृषिपंप ग्राहकांशी थेट संपर्क साधून त्यांना थकबाकीमुक्ती योजनेची माहिती दिली. यामध्ये २४ ग्राहकांनी योजनेचा लाभ घेत वीजबिल कोरे केले आहे. त्यातील थकबाकीमुक्त ग्राहक श्री. ज्ञानोबा ढोणे यांचा अधीक्षक अभियंता श्री. सतीश राजदीप यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन प्रातिनिधिक गौरव करण्यात आला. महानगर क्षेत्र व लगतच्या चालू तसेच कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या कृषिपंप ग्राहकांनी येत्या ३१ मार्चपर्यंत सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम भरून थकबाकीमुक्त व्हावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
सशस्त्र दलांसाठी दर्जेदार, परवडणारी घरे आता ‘उडचलो’च्या माध्यमातून सर्वोत्तम सवलतीच्या दरात उपलब्ध .
सशस्त्र दलांना सर्वाधिक हव्या असलेल्या ५ प्रमुख शहरांमध्ये प्रवेश करण्याची ‘उडचलो’ची योजना .
रिअल इस्टेट व्यवसायाचे नेतृत्व करण्यासाठी मुख्य व्यवसाय अधिकारी म्हणून अभिजित दास यांची नियुक्ती .
पुणे – केवळ भारताच्या सशस्त्र दलांना सेवा देणाऱ्या ‘उडचलो’ या कन्झ्युमर टेक कंपनीने आता रिअल इस्टेट व्यवसायात प्रवेश केला आहे. कंपनीने याबाबतची घोषणा आज केली. संरक्षण खात्यातील आजी व माजी कर्मचारी आता ‘उडचलो’च्या माध्यमातून सवलतीच्या बाजारभावात परवडणारी घरे खरेदी करू शकतील. ‘‘उडचलो अॅश्युरिटी’ अशी हमी या ब्रँडतर्फे देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, ‘उडचलो’द्वारे होणारी रिअल इस्टेटची सर्व खरेदी ही गुणवत्तापूर्ण, परवडणारी व फायदेशीर असणार आहे. संरक्षण खात्याचे कर्मचारी आता ‘उडचलो’च्या माध्यमातून वास्तविक बाजारभावापेक्षा किमान १० टक्के सवलतीत मालमत्ता खरेदी करू शकतील.
सशस्त्र दलांचे प्राधान्य असलेल्या सर्व शहरांमध्ये हा उपक्रम सादर करण्यात येत आहे. यांमध्ये सर्वप्रथम पुणे शहरात ही सेवा देण्यात येईल आणि त्यानंतर चंडीगढ, दिल्ली-एनसीआर, बंगळुरू आणि जयपूर यांसारख्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याची योजना ‘उडचलो’ने आखली आहे. या ब्रँडतर्फे या शहरांमधील नामांकित विकसकांशी चर्चा करण्यात येत असून त्यातून खरेदीचे अधिक चांगले पर्याय आणि ग्राहकांसाठी घरखरेदीची सुरळीत प्रक्रिया या गोष्टी सुनिश्चित होतील.
पुणे शहरासाठी ‘उडचलो’ने प्रख्यात ‘न्याती डेव्हलपर्स’शी हातमिळवणी केली आहे. या विकसकाकडील सुमारे एक लाख चौरस फूट क्षेत्र सवलतीच्या दरात आजी व माजी कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. या विकसकाने वाघोली येथील एक टॉवर सशस्त्र दलांसाठी डिझाइन करून समर्पित केला आहे. शाळा, रुग्णालये, बाजारपेठा व इतर आवश्यक गोष्टींसह अनेक सुविधा या प्रकल्पातील मालमत्तेच्या सान्निध्यात उपलब्ध आहेत.
‘उडचलो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार म्हणाले, “व्यवसायामध्ये वैविध्य आणण्याची ही कृती आम्ही विचारांती आणि बऱ्याच संशोधनानंतर अमलात आणत आहोत. गेल्या वर्षी ‘उडचलो’च्या कर भरण्याच्या सुविधेद्वारे जितका कर भरला गेला, त्यातील ९९ टक्के प्रकरणांमध्ये, प्राप्तीकर कायद्याच्या कलम २४नुसार घरमालकांना मिळू शकणाऱ्या करकपातीचा, प्रत्येकी २ लाख रुपयांपर्यंतचा लाभ संबंधितांनी घेतला नव्हता. याशिवाय, प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) अंतर्गत मिळणारे लाभही देशासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या आपल्या सैनिकांनी कधी मिळवले नाहीत. ‘देशसेवा करणाऱ्यांना सेवा’ या आमच्या ब्रीदवाक्याशी आम्ही ठाम आहोत. आताच्या आमच्या उपक्रमामुळे, संरक्षण दलातील या समुदायाला अधिकाधिक फायदे होतील, या दृष्टीने बचतीचे सर्व पर्याय अवलंबण्यात येतील. सर्वसामान्य नागरी रहिवाशांच्या तुलनेत, सशस्त्र दलाच्या सेवेत असणाऱ्यांना घरखरेदी करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते, कारण त्यांच्या गरजा विशिष्ट स्वरुपाच्या असतात. योग्य मालमत्ता कशी ओळखायची; कर्जाची सुविधा कशी मिळवायची; शाळा, लष्कराच्या छावण्या, रुग्णालये आणि इतर सुविधांचे सान्निध्य कसे ओळखायचे आणि सर्वात महत्त्वाचे, म्हणजे बिल्डर कायदेशीर औपचारिकता पूर्ण करेल का; आपल्या सुटीच्या काळात तो कायदेशीर तरतुदींचे पालन नेमकेपणाने करेल का, असे अनेक प्रश्न या कर्मचाऱ्यांपुढे उभे असतात. या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक पद्धतीने देणाऱ्या, सर्व गरजा पूर्ण करणाऱ्या विकसकांशी ‘उडचलो’ची टीम संपर्क साधेल आणि सर्वोत्तम दर्जाची घरे अतुलनीय किंमतींत, विनासायास उपलब्ध करून देईल. याकरीता ‘उडचलो’ कटिबद्ध आहे.”
‘उडचलो’चे मुख्य व्यवसाय अधिकारी अभिजीत दास हे कंपनीच्या रिअल इस्टेट व्यवसायाचे नेतृत्व करणार आहेत. अभिजित हे यापूर्वी रिअल इस्टेट, वित्तीय सेवा आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उद्योगांमध्ये नवउद्योजक आणि कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह या पदांवर कार्यरत होते. पूर्व भारतातील जेएलएल व्यवसायाच्या उभारणीत त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांना रिअल इस्टेट उद्योगाचे विस्तृत ज्ञान आहे. त्यांच्या या विपुल ज्ञानामुळे व कौशल्यामुळे ‘उडचलो’ला नवीन व्यवसाय विभाग वाढवण्यात मदत होईल. ‘उडचलो’ला या व्यवसायाचा विस्तार करायचा आहे आणि या विभागातील ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करायच्या आहेत.
आपल्या या नियुक्तीबद्दल बोलताना ‘उडचलो’च्या रिअल इस्टेट विभागाचे मुख्य व्यवसाय अधिकारी अभिजित दास म्हणाले, “रिअल इस्टेट क्षेत्राच्या गरजा आणि संरक्षण दलांच्या मागण्या यांकडे बऱ्याच काळापासून दुर्लक्ष झाले आहे. ‘उडचलो’ने या क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे, हा विशिष्ट ग्राहकवर्ग आता प्रमुख शहरांमधील काही उत्कृष्ट विकासकांच्या सर्वोत्तम सवलतींचा लाभ घेऊ शकेल. ‘उडचलो’च्या या उपक्रमात सहभागी होण्याबाबत मी खूप उत्साहित आहे. या बाजारपेठेत परिवर्तन घडवून आणण्यास आणि आपल्या जवानांना सेवा पुरविण्यास आम्ही आतुर झालो आहोत.”
‘उडचलो’ ही कंपनी २०१५ पासून लष्करी जवानांना सेवा पुरविण्यास समर्पित दृष्टीने काम करीत आहे. सोयीस्कर प्रवासाची सोय करून देणे, दैनंदिन सुविधांची बिले भरणे, वित्तीय सेवा पुरवणे आणि ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे व्यवहार करणे अशी कामे ही कंपनी करीत असते. रिअल इस्टेट या नवीन क्षेत्रात प्रवेश करून ‘उडचलो’ कंपनी ३० लाख जवानांपर्यंत पोहोचणार आहे. सध्या हे कर्मचारी घरांच्या बाबतीत केवळ ‘एडब्ल्यूएचओ’ आणि ‘एअर फोर्स नेव्हल हाऊसिंग बोर्ड’ या संस्थांवर अवलंबून होते. या विभागाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दर्जेदार आणि परवडणारी घरे उपलब्ध करण्याचे काम या संस्थांमधून आतापर्यंत होत होते.
‘उडचलो’मधील टीम बांधकामाच्या प्रगतीचे बारकाईने निरीक्षण करेल आणि कायदेशीर, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर इत्यादी विविध मापदंडांवर अंतर्गत व बाह्य लेखापरीक्षकांकडून त्याचे मूल्यांकन करेल.