Home Blog Page 2064

बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक उमेदवारांना प्रमाणपत्र समर्पणाबाबत आवाहन

0

मुंबई, दि. 2 : खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेत ५% आरक्षण ठेवलेले असून काहींनी बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारण करून क्रीडा विभागाकडून क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी केलेली आहे. तसेच कांही उमेदवारांनी शासकीय सेवेचा लाभ घेतला आहे ,अशा युवा उमेदवारांना भविष्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी एक संधी म्हणून “बोगस क्रीडा प्रमाणपत्र , बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना” हा शासन निर्णय  निर्गमित करण्यात आला आहे.

ज्या उमेदवारांनी क्रीडा संचालनालय व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांचेकडून बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी करून घेतली असेल, अशा उमेदवारांना तसेच त्या आधारे शासकीय, निमशासकीय व इतर कार्यालयामध्ये नोकरी धारण केली आहे अशा उमेदवारांनी मूळ क्रीडा  प्रमाणपत्र व मूळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे व्यक्तिश: अथवा पत्राद्वारे दि. ३१ मे २०२२ पूर्वी समर्पित करण्यात यावीत अशा उमेदवारांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.

मुदतीत बोगस क्रीडा प्रमाणपत्रे व मूळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल जमा न केल्यास संबंधित उमेदवार व संबंधीत क्रीडा संघटना यांचे विरूद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल. बोगस क्रीडा प्रमाणपत्रधारक उमेदवारांनी दि. ३१ मे २०२२ पर्यंत आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळूंगे बालेवाडी, पुणे येथे आपला अहवाल सादर करावा. असे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे  श्री ओम प्रकाश बकोरिया, यांनी केले आहे.

जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्याची शासनाची तयारी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. 2 : राज्यातील जनतेच्या हिताच्या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून त्या सोडवण्याची राज्य शासनाची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, राज्यमंत्री सतेज पाटील, संजय बनसोडे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरविल्यानुसार दि. ३ ते २५ मार्च दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यात आले असून येत्या ११ मार्च रोजी राज्याचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. सर्व बाबी नियमांचे पालन करण्याचे शासनाचे धोरण असून या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत राज्यपाल यांना पत्र पाठवून विनंती करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यापूर्वी ठरल्यानुसार नागपूर येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याचे निश्चित करण्यात आले होते, तथापि प्रवास आणि निवास व्यवस्थेदरम्यान संसर्ग वाढू नये यासाठी हे अधिवेशन मुंबईत घ्यावे असे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचे आयोजन

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन- 2022 च्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य शासनाच्या वतीने चहापानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य तसेच लोकभारतीचे कपिल पाटील, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह विधिमंडळ सदस्य उपस्थित होते. तत्पूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

प्रस्तावित विधेयके व अध्यादेश

प्रलंबित विधेयक- 1

प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळ मान्यता प्राप्त)- 4

प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळ मान्यता अपेक्षित)- 3

संयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके

सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 52 – महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये (शक्ति कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरूद्धच्या विवक्षित अपराधांसाठी) विधेयक, 2020 (गुन्ह्यास आळा घालणे आणि गुन्ह्यातील तपास जलद गतीने करण्यासाठी विशेष पोलीस पथके निर्माण करणे, अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र अनन्यसाधरण न्यायालये निर्माण करून ३० कामकाज दिवसांच्या कालावधीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे) (गृह विभाग) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत विचारार्थ दि. 15.12.2020, 23.12.2021).

सभागृहाच्या पटलावर ठेवावयाचे अध्यादेश

सन 2022 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 1.-  मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी (उपकर) आणि महाराष्ट्र ( नागरी  क्षेत्रे ) झाडांचे सरक्षण व जतन (सुधारणा) अध्यादेश, 2022 (बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 46.45 चौ.मीटर (500 चौ.फुट) किंवा त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी इमारती किंवा गाळ्यांचे मालमत्ता कर माफ करण्याबाबत.

सन 2022 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 2 .- मुंबई महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, 2022 (मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करणेबाबत)

प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त)

सन 2022 चे विधानसभा विधेयक क्र. 1: उद्योग ऊर्जा व कामगार विभाग – महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2022. (महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये कलम ३६  नंतर कलम ३६ (अ)  समाविष्ट करण्याचे व सदरहू सुधारणा १० पेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनांना लागू करण्यासाठी कलम-(१) मध्ये त्याबाबतची तरतूद करण्याचे तसेच सदर अधिनियमातील कलम 17 (छ) मधील आधार कार्ड क्रमांकाबाबतची तरतुद वगळण्याचे प्रस्तावित आहे).

सन 2022 चे विधानसभा विधेयक क्र. 2: नगर विकास विभाग – मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी (उपकर) आणि महाराष्ट्र (नागरी  क्षेत्रे ) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक, 2022 (बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 46.45 चौ.मीटर (500 चौ.फुट) किंवा त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी इमारती किंवा गाळ्यांचे मालमत्ता कर माफ करण्याबाबत.) (सन 2022 चा महा. अध्या. क्र .1 चे रुपांतरीत विधेयक)

सन 2022 चे विधानसभा विधेयक क्र. 3 – नगर विकास विभाग – मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2022 (मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करणेबाबत) (सन 2022 चा महा. अध्या. क्र. 2 चे रुपांतरीत विधेयक)

सन 2022 चे विधानसभा विधेयक क्र. 4 – उच्च व तंत्रशिक्षण विभाग – निकमार विद्यापीठ पुणे विधेयक 2022

प्रस्तावित विधेयके /अध्यादेश (मंत्रिमंडळाची मान्यता अपेक्षित)

सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक. – महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था (कामकाजाची भाषा) विधेयक, 2022 (स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाची भाषा मराठी असण्याबाबत).

सन 2022 चे विधानसभा विधेयक क्र.   – महाराष्ट्र विनियोजन विधेयक, 2022.

सन 2022 चे विधानसभा विधेयक क्र.   – महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, 2022.

सुप्रीम कोर्टातून मला दिलासा निश्चित मिळेल – गणेश बिडकर

0

१४ मार्चला संपतेय नगरसेवकांची मुदत — अन अपिलात जाण्यासाठी मिळाला १४ मार्च पर्यंतचा अवधी …

पुणे- नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून उच्च न्यायालयाने आपले सभागृह नेते पद काढून घेण्याचा निर्णय घेतल्याचे मला आजच आदेशासह समजले आहे. न्यायालयाच्या निर्णयाबाबत आपण काही बोलणार नाही पण न्यायालयानेच आपल्याला २ आठवड्यांची मुदत सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी दिलेली आहे. आपण या निर्णयावर अपील करणार असून आणि मला विश्वास आहे सर्वोच्च न्यायालयातून मला निश्चितच दिलासा मिळेल .अशी प्रतिक्रिया सभागृहनेते गणेश बिडकर यांनी आज येथे दिली . माझ्या वकिलांशी बोलून याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आणि न्यायलायला आम्ह्च्या वतीने आश्वस्थ करण्यात आल्याप्रमाणेच आपला महापालिकेतला कारभार असेल असेही ते म्हणाले.

दरम्यान १४ मार्च ला महापालिकेच्या या पंचवार्षिक सत्राची मुदत संपते आहे त्याच वेळी बिडकर यांची या सत्रातील कारकीर्दही संपुष्टात येणार आहे .

बेकायदेशीरपणे सभागृहनेतेपदाची निवड करणाऱ्या भाजपाने पुणेकरांची माफी मागावी – कॉंग्रेस

0

पुणे- उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेतील सभागृहनेते पदावर गणेश बिडकर यांची भाजपाने केलेली निवड बेकायदा ठरवून ती रद्द केल्याने आता पुणे शहर भाजपाने त्वरित पुणेकरांची माफी मागितली पाहिजे असा पवित्रा पुणे शहर कॉंग्रेस ने घेतला आहे. निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराला स्वीकृत सदस्य करून त्यास पालिकेत पदाधिकारी करून अशा पदाधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली निवडून आलेले १०० सदस्य ठेवणे ही लोकशाहीची क्रूर थट्टा आहे असा स्पष्ट आरोप यावेळी करण्यात आला . आज पुणे महापालीकेत शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड,विरेंद्र किराड, गोपाळ तिवारी आणि याचिकाकर्तेनगरसेवक रवींद्र धंगेकर,आणि त्यांचे वकील ऍड.हिनेश राठोड यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली .स्वीकृत नगरसेवक असल्याने गणेश बिडकर यांना पक्षाच्या नेत्यांनी बहाल केलेले सभागृह नेतेपद उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द केले आहे.डिसेंबर २०२० मध्ये भाजपने गणेश बिडकर यांची महापालिकेतील गटनेता म्हणून नियुक्ती केली. महापौरांनी त्यांना सभागृह नेतेपदी नियुक्तीचे पत्र दिले. दरम्यान,बिडकर हे महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले असून स्विकृत नगरसेवकाला सभागृहनेते पदी नियुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात कॉंग्रेसचे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. २८ फेब्रुवारीला या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने बिडकर यांचे सभागृह नेतेपद रद्दबादल ठरविले आहे या निकालाची प्रत आज महापालिकेला उपलब्ध झाली आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गणेश बिडकर यांचे सभागृह नेतेपद रद्द झाले आहे.

धंगेकर म्हणाले, ” भाजपाने पाशवी बहुमताच्या जीवावर बीडकर यांना सभागृहनेतेपद दिले, हा निर्णय बेकायदेशीर होता हे स्पष्ट झाले आहे. बीडकर यापुढे या पदावर बसणार नाहीत अशी हमी त्यांच्याच वकिलाने उच्च न्यायालयात दिली आहे.”मोहन जोशी म्हणाले, ” न्यायालयाच्या आदेशानंतर भाजपाने पुणेकरांची माफी मागितली पाहिजे, दिल्लीपासून ते पुण्यापर्यंत भाजपाचे नेते चुकीचेच काम करतात यानिमित्ताने समोर आले. महापालिका आयुक्तांनी बीडकरांना काम करण्यापासून रोखावे.””बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या भाजपाला यातून धडा मिळाला आहे. जर न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही तर आम्ही याविरोधात आंदोलन करू” असा इशारा शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिला.

महापालिकेची निवडणूक डोळ्यापुढे ठेऊनच पुण्यात पंतप्रधानांचा दौरा -कॉंग्रेस दाखविणार काळे झेंडे

0

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा निव्वळ महापालिकेची निवडणूक डोळ्यापुढे ठेऊनच भाजपने ठरविला असून आज पर्यंत महापालिकेसारख्या निवडणुकीसाठी पंतप्रधानांचा असा वापर कोणी केला नाही ,निव्वळ मते मागण्यासाठी ,पुन्हा मोदींच्या नावाचा वापर करण्याची वेळ शहर भाजपावर आली आहे,त्यांनी संसदेत महाराष्ट्राचा अवमान केला, त्यामुळे त्यांना आम्ही काळे झेंडेच दाखवणार व आंदोलन करणारच असे काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने जाहीर करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचाही निषेध यावेळी करणार असल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसभवनमध्ये प्रसारमाध्यम प्रतिनिधींबरोबर बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी आंदोलनाची माहिती दिली.प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी तसेच कमल व्यवहारे, पूजा आनंद, दत्ता बहिरट, रमेश अय्यर, विरेंद्र किराड यावेळी उपस्थित होते.


बागवे म्हणाले, महापालिकेतील सत्तेच्या मागील ५ वर्षात भारतीय जनता पार्टीला एकही प्रकल्प पुर्ण करता आला नाही. ते अपयश झाकण्यासाठी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोदी यांचा दौरा ठरवण्यात आला. मोदी यांनी लोकसभेत बोलताना महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवला असे अवमानकारक वक्तव्य केले. राज्यपाल भगतिसंग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतात हे सगळे महाराष्ट्राला संताप आणणारेच आहे. त्यामुळेच काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार आहे.
पोलिसांकडे याची रितसर परवानगी मागितली आहे, मात्र त्यांनी ती दिली नाही तरी आंदोलन करणारच असे मोहन जोशी व अन्य उपस्थितांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही असेच आंदोलन जाहीर केले आहे, महाविकास आघाडी असताना एकत्र का नाही असे विचारले असता बागवे, जोशी यांनी पक्षाच्या वतीने हे आंदोलन असल्याचे सांगितले.

‘पराक्रमी हिंदू राजांची मंदिरे’ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

0

मुंबई – अध्यात्मसाधनेसाठी तर मंदिरे आहेतच, परंतु मंदिरे म्हणजे समाजजीवनाची केंद्रे होती, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. दीपा मंडलिक लिखित ‘पराक्रमी हिंदू राजांची मंदिरे’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. दादर येथील सावरकर स्मारकामध्ये हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी रा. स्व. संघ सरसंघचालक डॉ. भागवत म्हणाले की, सर्व संस्कृतींमध्ये केवळ भारतीय संस्कृतीच भौतिकतेच्या पलिकडे जाऊ शकली. मंदिरांमध्ये पाठशाळा चालतात, मंदिरांबरोबर अर्थव्यवस्था, कृषिक्षेत्र, व्यापार, इ. चे संबंध जोडलेले असतात, म्हणून, पराक्रमी राजे भव्य मंदिरे निर्माण करीत असत. परंतु असे असूनही, त्यांनी मंदिरांवर स्वतः चा अधिकार ठेवला नाही, तर ही मंदिरे समाजाला अर्पण केली, असे भागवत यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, मंदिरे ही समाजाच्या धारणेची साधने होती, मंदिरांकडे पाहून आपल्या पराक्रमाचा गौरव कळतो, त्यामुळेच मंदिरांचा इतिहास आपल्यापासून जाणीवपूर्वक लपवला गेला. तिरुवनंतपुरम, कालहस्ती, सोमनाथ, इ. ठिकाणच्या मंदिरांच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख डॉ भागवत यांनी केला. तसेच, दीपा मंडलिक लिखित या पुस्तकातून मंदिरांकडे पाहण्याची आपली दृष्टी कशी असावी हे कळते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

स्वा. सावरकर स्मारकामध्ये प्रस्तुत पुस्तक प्रकाशित होत असल्याने आनंद होत असल्याची भावना पुस्तकाच्या लेखिका दीपा मंडलिक यांनी व्यक्त केली. पद्मनाभ स्वामी मंदिर, बृहदीश्वराचे मंदिर, चेन्नकेशव मंदिर, वेरूळ येथील मंदिरे, इ. अद्भुत रचना पाहिल्यावर त्यांच्या इतिहासाची माहिती देणारे पुस्तक लिहिण्याची गरज वाटल्याचे त्यांनी सांगितले. भारतीयांचे स्थापत्यशास्त्र अद्भुत आहे, परंतु या सर्व गोष्टींना आपल्याकडे इतिहासात त्रोटक स्थान मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काळाच्या ओघातही आपली मूल्ये टिकवून ठेवली, असे त्यांनी नमूद केले. पुरातत्त्ववेत्ते आणि मूर्तिशास्त्राचे अभ्यासक गो. बं. देगलूरकर म्हणाले की, मंदिरे, मूर्ती, इ. ची निर्मिती करणाऱ्या कलाकारांच्या बाबतीत आपल्याकडे मौन पाळले जाते. परंतु, मूर्ती-मंदिरे ही खरेतर भारतीय संस्कृतीची व्यवच्छेदक लक्षणे आहते. या विषयांचा अभ्यास करणाऱ्यांना ‘सनातनी’ विचारांचे म्हटले जाते. सनातन शब्दाचा अर्थ न कळल्यामुळे असे बोलले जाते. सनातन म्हणजे खरेतर नित्यनूतन असल्याचे सांगत शब्द जपून वापरायला हवेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. ‘पराक्रमी हिंदू राजांची मंदिरे’ हे पुस्तक दीपा मंडलिक यांनी अत्यंत बारकाव्यांसहित आणि अचूक लिहिले आहे, तसेच हे पुस्तक म्हणजे मंदिरावरील एक आदर्श पुस्तक आहे, असे देगलूरकर यांनी सांगितले. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भगवदगीता, इ. ग्रंथांचा संदर्भ देत त्यांनी सगुणोपासनेचे महत्त्व विशद केले आणि मंदिरांचा अभ्यास करताना अध्यात्म कळायला हवे, असा विचार मांडला. याप्रसंगी सूत्रसंचालक नीलिमा कुळकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले.

याप्रसंगी व्यासपीठावर ‘पराक्रमी हिंदू राजांची मंदिरे’ या पुस्तकाच्या लेखिका दीपा मंडलिक, पुरातत्त्ववेत्ते व मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, राजेंद्र प्रकाशनच्या संचालिका श्रीमती नीलिमा कुळकर्णी, उपस्थित होत्या, तर चित्रा वाघ यांनी सूत्रसंचालन केले. सूत्रसंचालिका नीलिमा कुळकर्णी यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहाय्य करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, पुस्तकाची सजावट, मुखपृष्ठ रचना, इ. पाहणारे सतीश कुळकर्णी, पुस्तकासाठी नकाशे तयार करणारे अनिश दाते, फोटोग्राफर नितीन चंदे, आदींचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.

प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश करावा – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. 2 :  सामान्य नागरिकांना चांगल्या प्रतीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश करा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाच्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. आरोग्य भवनमधील सभागृहात झालेल्या बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतीश पवार, संचालक डॉ साधना तायडे, सहसचिव श्री.आत्राम, लहाने, आदी उपस्थित होते.

अतिरिक्त अभियान संचालक डॉ. पवार यांनी प्रथम प्रकल्प अंमलबजावणी आराखड्याचे सादरीकरण केले. आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी आराखड्यात नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश करावा. त्यासाठी इतर राज्यांच्या आराखड्याचा अभ्यास करावा. आरोग्य क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यातील चांगल्या उपक्रमांची माहिती घेऊन त्याचा आराखड्यात समावेश करता येईल का याबाबत विचार करावा, अशा सूचना केल्या.

आरोग्य योजनांचे मूल्यमापन करण्यात यावे. कारण असे मूल्यमापन करणे आरोग्य सेवांत सुधारणा करण्यासाठी उपयुक्त ठरत असते. त्यामुळे विविध आरोग्य योजनांचे मूल्यमापन करुन त्यामध्ये सुधारणा करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्यासाठी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा समावेश करावा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, टेलिमेडिसीन, टेलिरेडिओलॉजी या तंत्रज्ञानाचा आराखड्यात समावेश करावा. जेणेकरून राज्यातील दुर्गम भागात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करता येईल, असे त्यांनी सांगितले.

बैठकीस सहसंचालक डॉ विजय कंदेवाड, डॉ.नितीन अंबाडेकर, संजय सरवदे,  श्रीमती रेहाना काझी, सहाय्यक संचालक श्रीमती करुणा सुरवाडे, राज्य प्रकल्प व्यवस्थापक डॉ. अभिजित अहिरे आदी उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मेट्रो मार्गाच्या कामाचा आढावा

0
  • मेट्रो 7 च्या पहिल्या टप्प्यादरम्यान मेट्रोची ट्रायल रन यशस्वी
  • मुंबईतील दुसरा मेट्रोमार्ग मार्चमध्ये कार्यान्वित करण्याची आदित्य ठाकरे यांची ग्वाही.

मुंबई दि. २ :- केंद्राकडून परवानगीची प्रक्रिया पूर्ण करून मुंबईतील दुसरा मेट्रो मार्ग मार्चमध्ये कार्यान्वित करू, अशी ग्वाही राज्याचे पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. एमएमआरडीएच्या माध्यमातून तयार होत असलेल्या अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व यादरम्यानच्या तयार मुंबई मेट्रो 7 च्या पहिल्या टप्प्याची ट्रायल रन आज पार पडली. आरे, दिंडोशी आणि कुरार या मेट्रो स्थानकदरम्यानच्या कामाची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी मुंबईसह एमएमआर क्षेत्रात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. यामधील वर्सोवा ते घाटकोपर हा पहिला मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबईत सर्वत्र मेट्रोमार्गाचे जाळे तयार करण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर मुंबई मेट्रोच्या दुसऱ्या मार्गाची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार असून मेट्रो मार्ग 7 चा पहिला टप्पा येत्या मार्च महिन्यात मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्यात येणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी आज केली.

अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व यादरम्यान तयार करण्यात येत असलेल्या मेट्रो 7 चा पहिल्या टप्याची ट्रायल रन आज घेण्यात आली. हा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची गरज असून ती प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. मार्च महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून आरे ते डहाणूकरवाडी असा मेट्रोचा 20 किलोमीटर लांबीचा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आज आदित्य ठाकरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आरे, दिंडोशी, कुरार अशा तीन स्थानकांदरम्यान ट्रायल रन घेऊन यावरील कामाची पाहणी केली. या मेट्रोमार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असून यादरम्यान सेवा सुरू करता येणे शक्य असल्याबाबत त्यांचे एकमत झाले. एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी झालेल्या कामांची माहिती त्यांना दिली. या ट्रायल रन नंतर बोलताना त्यांनी झालेली कामे समाधानकारक असून आता फक्त परवानगीची प्रक्रिया पूर्ण करणे बाकी असल्याचे सांगितले. ती प्रक्रिया येत्या काही दिवसात पूर्ण करून मुंबईतील दुसऱ्या मेट्रो मार्गाचा एक टप्पा सुरू करणे आपल्याला शक्य होईल असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आज झालेल्या या ट्रायल रनच्या वेळी राज्याचे पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री आणि आमदार रवींद्र वायकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास आणि एमएमआरडीएचे सर्व अधिकारी, अभियंते आणि मेट्रो मार्गावर काम करणारे कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रीय विधी विद्यापीठांना १५० कोटींचा निधी मंजूर – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

0

मुंबई, दि. 2 : राज्य शासनाने मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ 2014 च्या अधिनियमान्वये स्थापन केले असून त्यासाठी शासनाने मागील दोन वर्षात 150 कोटी निधी मंजूर केला आहे. नागपूर येथे वरणगाव परिसरात 60 एकर जागा नागपूर येथील विद्यापीठासाठी दिली आहे. याठिकाणी शैक्षणिक संकुल बांधून पूर्ण झाले आहे. या विद्यापीठांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

शासकीय विधी महाविद्यालय मुंबई, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर यांच्या विविध उपक्रमांचा आढावा आणि शासकीय विधी महाविद्यालय मुंबईच्या आझादी 75 अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमात भारतीय संविधानाच्या विविध तरतुदींवर आधारित माहिती पुस्तिकेचे प्रकाशन समारंभ झाला.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री.शुकरे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू विजेंदरकुमार, शासकीय विधी महाविद्यालय मुंबईच्या प्राचार्य अस्मिता वैद्य, बार कॉन्सिलचे सदस्य, प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणाले, राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या विकासकामांसाठी 150 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील 18 कोटी रुपये विविध विकासकामांसाठी मंजूर केले आहेत. पुढील आठवड्यात आणखी 12 कोटी रुपये दिले जाणार आहेत. विधी विद्यापीठाच्या विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

श्री. सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून राज्यातील विधी विद्यापीठांना आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच मुंबई विधी विद्यापीठासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल.    मुला-मुलींच्या वसतिगृह बांधकामासाठी 95 कोटी रुपये इतक्या खर्चास शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी 18 कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर केली आहे. वसतिगृहाचे काम युद्धपातळीवर सुरु असून लवकरच हे काम पूर्ण झाल्यावर विद्यार्थी तेथे राहू शकतील. या शैक्षणिक वर्षापासून पूर्ण क्षमतेने ऑफलाईन कॉलेज सुरु होण्यास मदत होईल. त्यासाठी या कामाला गती द्यावी, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी घेतला केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा

0

पुणे, दि. २: केंद्र शासनाच्या निधीतून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री तथा पुणे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे (दिशा) अध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांनी घेतला.

दिशा समितीची बैठक विधानभवन येथे पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, ऑनलाइनरित्या खासदार प्रकाश जावडेकर, गिरीष बापट, सुप्रिया सुळे यांच्यासह आमदार सिद्धार्थ शिरोळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी चिंचवड म.न.पा. आयुक्त राजेश पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू तसेच विविध कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

यंत्रणांनी योजनांच्या अंमलबजावणी तसेच कामे सुचविण्यासाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग घेतला जाईल याची दक्षता घ्यावी असे सांगून श्री. मुरलीधरन म्हणाले, भारत सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासह योजनांची पुढील वाटचाल ठरवणे आणि त्यांना गती देण्यासाठी या आढावा बैठकीस महत्व आहे. कोरोना परिस्थितीमुळे यापूर्वी विलंब झाला असला तरी यापुढे दर तीन महिन्यांनी ही बैठक घेण्यात येईल. बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवरील कार्यपूर्ती अहवाल पुढील बैठकीत उपलब्ध करुन देण्यात यावा जेणेकरून झालेल्या प्रगतीची माहिती मिळू शकेल.

केंद्रपुरस्कृत ५४ योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये पुणे मेट्रो, भारतमाला, प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजना, गरीब कल्याण अन्न योजना, अमृत योजना, नदी सुधार प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, श्यामाप्रसाद मुखर्जी ग्रामीण अभियान, भारत नेट, जलजीवन मिशन, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, बेटी बढाओ बेटी पढाओ, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना, मुद्रा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी सिंचन योजना, सर्व शिक्षण अभियान, राष्ट्रीय हरित भारत अभियान आदी योजनांचा समावेश आहे.

स्मार्ट सिटी योजनेच्या आढावा घेताना स्मार्ट सिटीच्या कामांच्या अंमलबजावणीमध्ये लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेतल्या जाव्यात. त्यातून चांगली कामे सुचवली जातात. त्यामुळे बोर्ड बैठकीला महत्व देतानाच सल्लागार समितीची बैठकही नियमितपणे घेण्यात यावी, असे निर्देश श्री. मुरलीधरन यांनी दिले.

भारतमाला योजनेंतर्गत रस्त्यांच्या सर्व प्रकल्पांसाठी भूमीसंपादन झाले असून त्यासाठी १ हजार २०० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधकाम साहित्याच्या महागाई वाढीमुळे ग्रामीण भागात अनुदानाच्या रकमेत वाढ करावी अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली.

बैठकीस दिशा समितीचे सदस्य जिल्ह्यातील नगरपरिषदांचे नगराध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती आदी उपस्थित होते.

राज्यात निर्बंधांत शिथीलता, नाट्यगृहे, सिनेमागृहे देखील १०० टक्के क्षमतेनं सुरू होणार!

0

‘अ’सूचीत १४ जिल्ह्यांचा समावेश- रेल्वे किंवा बसने प्रवास करताना लसीचे दोन डोस बंधनकारक

मुंबई, दि. 2 :- राज्यातील १४ जिल्ह्यांना पूर्ण लसीकरणाच्या टक्केवारीच्या आधारे ‘अ’ यादीत समाविष्ट करण्यात आले असून आणखी काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभाग तसेच कोविड कृती दल(टास्क फोर्से) यांच्यामार्फत राज्यातल्या कोविड स्थितीबाबत प्राप्त माहितीच्या आधारावर राज्यातल्या निर्बंधांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यासाठी प्रशासकीय घटक ‘अ’  आणि प्रशासकीय घटक ‘ब’ अशी विभागणी करण्यात आली आहे.

वेगवेगळ्या भागतील कोविडची सद्यस्थिती, त्या भागात असलेली जोखीम, तिथली लसीकरणाची स्थिती, पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी व्यापलेली बेडची संख्या या आधारावर  हे वर्गीकरण करण्यात आले आहे.

राज्य कार्यकारी समितीची 25 फेब्रुवारी रोजी  बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात  निर्देश देण्यात आले आहे. यांची अंमलबजावणी राज्यात शुक्रवार 4 मार्च 2022 मध्यरात्री 12.00 पासून केली जाणार आहे. हे  निर्देश पुढील आदेशांपर्यंत अमलात राहणार आहे.

व्यक्तीचे “पूर्ण लसीकरण” याची व्याख्या पूर्वीप्रमाणेच असेल आणि कोविड अनुषंगिक व्यवहार (सी ए बी) करणे बंधनकारक असेल. जर या आदेशामध्ये एखाद्या कार्यक्रमाचा उल्लेख नसेल तर अशा स्थितीत त्या कार्यक्रमासाठी भारत सरकारने जारी केलेले सगळी मार्गदर्शक निर्देश लागू पडतील. जर एखाद्या बाबतीत राज्य तसेच केंद्र सरकार, असे दोन्हींचे ही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या असतील, तर अशा स्थितीत जो निर्बंध जास्त कठोर असेल, त्याची अंमलबजावणी केली जाईल.

अ प्रशासकीय घटक

१-महानगरपालिकांना एक वेगळे प्रशासकीय घटक आणि जिल्ह्यातील इतर क्षेत्राला दुसरे एकल प्रशासकीय घटक म्हणून गृहीत धरले जाईल.

२- जे प्रशासकीय घटक खालील अटी पूर्ण करतील त्यांचा ‘अ’ सुचित समावेश  असेल

अ- पहिली लस घेतलेल्यांची संख्या 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असेल;

ब- दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 70 टक्केपेक्षा जास्त असेल;

क- पॉझिटिव्हिटी दर दहा टक्क्यांपेक्षा कमी असेल;

ड- ज्या ठिकाणी प्राणवायू आधारित बेडची संख्या किंवा आयसीयूमधील ४० टक्क्यांपेक्षा कमी बेड रुग्णांनी भरलेले असतील.

ब- वेग वेगळी स्थिती

सर्व ठिकाणी एक सारखी परिस्थिती नसेल आणि यामुळे जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रशासन या मापदंडांचा आकलन करून आपल्या क्षेत्रातील ‘अ’ किंवा ‘ब’ प्रशासकीय घटक सामान्य लोकांसाठी माहिती देतील आणि चालू स्थितीच्या आधारे एखाद्या प्रशासकीय घटकाला यादीमधुन वगळायचे की त्यात सामील करायचे, हे ठरवले जाईल. हा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन हे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या संमतीने घेतील. एकदा एखाद्या प्रशासकीय घटकाचा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला किंवा यादीतून वगळण्यात आले, तर त्या ठिकाणी निर्बंध/ शिथिलतेचे मापदंड तत्काळ बदलतील.

क- पूर्ण लसीकरणासाठी आवश्यकता

१-सार्वजनिक क्षेत्राशी निगडीत असलेले सर्व आस्थापनांच्या संपूर्ण स्टाफला पूर्णपणे लसीकरण असणे आवश्यक असेल;

२-होम डिलिव्हरी करणाऱ्या संपूर्ण स्टाफला पूर्णपणे लसीकृत असणे अनिवार्य असेल;

३-सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करणाऱ्या सर्वांसाठी पूर्ण लसीकरण आवश्यक असेल;

4 -सर्वसामान्य लोक जमा होतात अशा सर्व ठिकाणी म्हणजेच मॉल, थेटर, नाट्यगृह, पर्यटन स्थळ, उपहारगृह, क्रीडा सामने, धार्मिक स्थळ अशा ठिकाणी भेटी देणाऱ्या सर्व अभ्यागतांना पूर्णपणे लसीकरण असणे आवश्यक असेल;

5- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन अश्या सर्व ठिकाणी पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांना भेट देण्याची परवानगी देतील की जेथे जास्त लोकांचा संपर्क येतो आणि कोविड-१९ चा प्रसार होण्याची शक्यता आहे किंवा कोविड सुयोग्य व्यवहार करणे अत्यावश्यक आहे.

६-लोकांशी संपर्क येत असलेल्या कोणत्याही खाजगी, सार्वजनिक किंवा शासकीय कार्यालयांमध्ये किंवा आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्णपणे लसीकरण आवश्यक असेल.

७-औद्योगिक कार्यकलापात असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पूर्ण लसीकृत असणे अनिवार्य असेल.

ड ‘अ’ यादीतील प्रशासकीय घटकांमध्ये ज्या सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सणासुदीशी संबंधित कार्यक्रम, विवाह समारोह, अंतिम यात्रा किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी क्षमतेच्या पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत उपस्थिती मुभा देण्यात आली आहे परंतु एखाद्या ठिकाणी जर एक हजारापेक्षा जास्त लोक जमणार असेल तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनास त्याची माहिती द्यावी लागेल आणि ते यावर निर्बंध घालू शकतील. ज्या प्रशासकीय घटकांचा ‘अ’ यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही, त्या ठिकाणी वरील प्रमाणे कोणत्याही कार्यक्रमासाठी क्षमतेच्या 50 टक्के पर्यंत उपस्थितीस परवानगी असेल किंवा 200 जणांची उपस्थितीचे (जी कोणती कमी असेल) मुभा असेल.

ई- सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय विभागाच्या आदेशाच्या अधीन राहून ऑफलाइन वर्ग घेण्यास परवानगी असेल. अशा सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रशासकांना ऑफलाइन सहित ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. सर्व अंगणवाड्या व प्री-शाळांना वर्ग घेण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु अशा सर्व संस्था आणि आस्थापनांना कोविड सुयोग्य व्यवहाराचे अनुपालन करावे लागतील.

फ- सर्व प्रशासकीय घटकांसाठी सर्व प्रकारचे होम डिलिव्हरी सेवांसाठी मुभा असेल.

ग- ‘अ’ यादीत सामील असलेल्या प्रशासकीय घटकातील सर्व शॉपिंग कॉम्प्लेक्स, चित्रपटगृह, उपहारगृह, बार, क्रीडा संकुल, व्यायामशाळा, स्पा, जलतरण तलाव, धार्मिक स्थळ, नाट्यगृह, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क इत्यादींना शंभर टक्के क्षमतेने संचलन करण्यास परवानगी असेल. इतर प्रशासकीय घटकांना क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती ने संचलनास परवानगी देण्यात आली आहे.

ह- पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींना आंतरराज्य तसेच राज्य अंतर्गत प्रवास करण्यास परवानगी असेल. इतर राज्यांमध्ये ये- जा करणाऱ्या पूर्णपणे लसीकृत नसलेल्या लोकांना 72 तासाच्या आत मध्ये चाचणी करून आणलेले आर टी पी सी आर अहवाल दाखवणे बंधनकारक असेल. आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाची हरकत नसल्यास, अशा प्रकारच्या प्रवासासाठी कोणतेही ना हरकत प्रमाणपत्राची गरज नसेल.

आय- शासकीय व खाजगी कार्यालयांना पूर्ण क्षमतेने कार्य करण्याची परवानगी असेल.

जे- सर्व उद्योग आणि वैज्ञानिक संस्था पूर्ण क्षमतेसह काम करू शकतील.

के- या आदेशात सामील नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमासाठी फक्त ‘अ’ यादी मध्ये समावेश असेल तरच शंभर टक्के क्षमतेने संचलनाची परवानगी असेल आणि यादी ‘ब’ मध्ये समाविष्ट असलेल्या ठिकाणी 50 टक्के क्षमतेची अट लागू असेल. अन्वयार्थ लावण्यात वाद असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन अंतिम निर्णय घेतील.

एल- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनास राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या परवानगीने आणखी जास्त कठोर निर्बंध लादण्याची अनुमती असेल. जिल्हास्तरावर या प्रशासनाने वारंवार बैठका, किमान आठवड्यातून एक बैठक, घेऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घ्यावा.

एम- जिल्ह्यांना सुचित करण्यात येते की, त्यांनी  100 टक्के लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि लसीकरणाची गती वाढवावी. ‘अ’ यादी मध्ये समाविष्ट नसलेल्या प्रशासकीय घटकांतर्गत घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवावी. सध्या अठरा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांसाठी लसीकरण आवश्यक नसले तरी निकट भविष्यात त्यांनाही लस घेणे आवश्यक ठरू शकते. पात्र वयस्क लोकांनीही सावधगिरीचा उपाय म्हणून डोस घ्यावे. सर्व शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली आहे की नाही याची जिल्हा प्रशासनाने सहनिशा करून घ्यावी. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने  दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे.

एन- चालू कोविड परिस्थितीबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाने माहिती द्यावी. त्याचप्रमाणे चाचणीसाठीची मूलभूत सुविधा याबाबतची लोकांना माहिती द्यावी. त्यामुळे चुकीची माहिती प्रसारित होणार नाही आणि लोक घाबरणार नाही. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये लोकांना या कार्यात समाविष्ट करून घ्यावे आणि कोविड नियमांचे सुयोग्य वर्तन होत असल्याची खात्री करावी. समाजाला पुरावे आधारित माहिती वेळोवेळी द्यावी.

ओ- कोविड-१९ च्या परिस्थितीत कधीही बदल होऊ शकते. म्हणून जिल्हा प्रशासन तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सजग रहावे आणि दररोजच्या स्थितीबाबत माहिती द्यावी. पुढील आदेशापर्यंत हा आदेश लागू असेल.

‘अ’सूचीतील यादीमध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश असून यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

‘इन्शाअल्लाह’ आता स्टोरीटेल मराठीवर.

0

नाटककार अभिराम भडकमकर यांची महत्वाची साहित्यकृती असलेली ही कादंबरी नुकतीच स्टोरीटेल मराठीवर प्रकाशित झाली आहे. शीर्षकातूनच कुतुहल निर्माण करणारी ही कादंबरी श्रोत्यांना रसरशीत बागवानी बोली ऐकण्याचा समृद्ध अनुभव तर देतेच पण आजचा मुस्लीम मोहल्ला कसा आहे, आजच्या मुस्लीम तरुणांपुढे कोणते प्रश्न आहेत, त्यांच्या जगण्यातली अस्वस्थता याचंही नेमकं चित्रण करते. बागवानी बोलीचा अत्यंत सुरेख वापर हे या कादंबरीचं एक मोठं वैशिष्ट्य असल्याने ऑडिओबुकमधून आशय अधिक प्रभावीपणे पोहोचतो.   

इन्शाअल्लाह कादंबरी सुरु होते, ती कोल्हापुरातील एका मोहल्ल्यातून जुनैद हा विशीचा तरुण गायब होतो, त्या घटनेपासून. जुनैदसह त्याच मोहल्यातला आणखी एक तरुण आणि बाहेरून मोहल्यात आलेला तिसरा एक तरुण असे तिघे गायब होतात. काही दिवसांनी जुनैद वगळता इतर दोघांचा पत्ता लागतो, पण जुनैदचं काहीच कळत नाही. कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट घडवण्याचा कट पोलीस उधळून लावतात आणि या अयशस्वी कटात जुनैदचा सहभाग असल्याच्या संशयावरून ते त्याचा शोध घेऊ लागतात, पण जुनैद कुठेच सापडत नाही, तेव्हा तो कुठे जातो, त्याचं नेमकं काय होतं? या घटनेमुळे त्याची आई जमीलावर होणारा दु:खाचा आघात, जुनैदचा शोध घेण्याचा तिचा प्रवास, त्यातले खाचखळगे, आणि या सगळ्याला समांतर असणारा तिच्या मोहल्ल्याचा एक मोठा प्रवास, या प्रवासातली सांस्कृतिक स्थित्यंतरं असा बऱ्यापैकी मोठा पट या कादंबरीतून उलगडलेला आहे. जुनैदच्या शोधासह समांतर अशी अनेक उपकथानकंही कादंबरीत सहज गुंफलेली आहेत आणि हे करताना कथनाची वीण कुठेही सैल झालेली नाही, कादंबरीतलं प्रवाहीपण अखेरपर्यंत टिकून राहिलेलं आहे, ही एक कादंबरीची चांगली बाजू.   

कादंबरीकार अभिराम भडकमकर यांच्या ‘असा बालगंधर्व’ (२०१२) आणि ‘अॅट एनी कॉस्ट’ (२०१५) या दोन कादंबऱ्यांनंतरची ‘इन्शाअल्लाह’ ही तिसरी कादंबरी आहे. एरवी गुण्यागोविंदाने राहणाऱ्या हिंदू-मुस्लिम समाजांमध्ये ‘मजहब’ नावाचे जिहादी विष कालवून त्या एकसंध आणि निरभ्र समाजजीवनाची अत्यंत कुशलपणे कशी लक्तरे केली जातात, याचे दर्शन म्हणजे ही कादंबरी आहे. भडकमकर हे मुळात नाटककार असल्याने दृश्यमयता हे त्यांच्या लेखनाचं एक बलस्थान आहे. त्यामुळे कादंबरीतलं दृश्य नि दृश्य डोळ्यापुढे उभं राहतं. घटनांचा पट वेगानं पुढे सरकतो आणि त्याचा दृश्य परिणाम वाचनीयता आणखी वाढवतो. लेखकानं रंगवलेला मोहल्ला अगदी वाचकाच्या डोळ्यासमोर उभा राहतो किंवा वाचकाला बसल्याजागी स्वत:च त्या त्या ठिकाणी फिरून आल्यासारखं वाटावं इतकं रसरशीत आणि उत्कट चित्रण मोहल्ल्याचं केलेलं आहे.

प्रसिद्ध नाटककार लेखक अभिनेते अभिराम भडकमकर यांच्या ओघवत्या शैलीतलं  कादंबरीरूपी वास्तव ‘स्टोरीटेल ऑडीओबुक्स’ माध्यमातून ऐकण्यासाठी स्टोरीटेलची फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.

इन्शाअल्लाह स्टोरीटेलवर ऐकण्यासाठील लिंक

https://www.storytel.com/in/en/books/inshaallah-1561701

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

0

पुणे : वसतिगृहातील जुन्या आठवणी… केलेल्या कमवा व शिका, चार तास काम… सांस्कृतिक कार्यक्रमांत केलेली मौज मस्ती… वेगवेगळ्या क्षेत्रांत मिळवलेल्या यशाचं कौतुक आणि आज करीत असलेल्या कामाची, मुलाबाळांची माहिती एकमेकांना सांगताना चेहर्‍यावरचा विलक्षण आनंद ओसंडून वाहत होता.
निमित्त होतं, विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने आयोजित माजी विद्यार्थी ३३ व्या मेळाव्याचे. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी आणि कृषी व पाणलोट क्षेत्रात कार्यरत शिवाजी तळेकर, तर ज्येष्ठ माजी विद्यार्थी आणि मुंबई येथील जीएसटी उपायुक्त गणपत (अण्णा) वावरे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष राजू इंगळे आदी उपस्थित होते.
मेळाव्याच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करताना ज्येष्ठ कार्यकर्ते व कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्ते डॉ. संभाजी भावसार, कर्मचारी लक्ष्मी क्षीरसागर यांना, तसेच मंडळाचे देणगीदार कल्याणी टेक्नोफोर्जचे संचालक अनंत चिंचोळकर, माजी विद्यार्थी विजय कदम व अंजली साठे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. अरुण कोंडेजकर पुरस्कृत आदर्श विद्यार्थी पुरस्कार मयूर हाडवळे, ऍड. दौलत इंगवले व रत्नाकर मते पुरस्कृत आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार परवीन आतार व वैष्णवी देशमुख यांना प्रदान करण्यात आला.
यंदाच्या मेळाव्याचे प्रायोजकत्व सोलापूर जिल्ह्यातील माजी विद्यार्थ्यांकडे होते. मंडळाच्या सहकार्यवाह मनीषा गोसावी, सहखजिनदार गणेश काळे, सोलापूर टीममधील समन्वयक नंदकुमार तळेकर, गणेश ननवरे, डॉ. मोहन अमृळे, डॉ. प्रकाश दीक्षित, बबन अमृळे, प्रशांत शिंदे यांनी मेळावा यशस्वी करण्यात कठोर परिश्रम घेतले.
गणपत वावरे म्हणाले, “विविध पैलूंचे शिक्षण देणारी ही संस्था आहे. समाजाला आपण काहीतरी देणे लागतो, असा दृष्टीकोन समितीने दिला. इथे मिळालेल्या मूल्यांचा प्रशासकीय सेवेत काम करताना लाभ होतो. खेड्या-पाड्यात अजूनही अनेक गरजू विद्यार्थी आहेत. त्यांना शोधून आधार देण्याचे काम करावे लागेल. समितीतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी या कामात सक्रीय सहभाग घेऊन समितीचे हे काम पुढे न्यायला हवे.”
शिवाजी तळेकर म्हणाले, “समितीने कामाची प्रेरणा आणि आत्मविश्वास दिला. विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांमुळे संस्कृतीतील विविधता अनुभवली. नेतृत्व, शिस्त, संघर्ष, चिकाटी आणि स्वावलंबी वृत्ती जोपासायला समितीने शिकवले. सामाजिक बांधिलकीचे संस्कार देत आशावादी बनवले. कृषी व पाणलोट क्षेत्रात काम करताना समितीची शिकवण उपयोगी पडत आहे.”
प्रतापराव पवार म्हणाले, “समितीच्या कार्यात माजी विद्यार्थ्यांचा वाढणारा सहभाग आनंददायी आहे. गरजू मुलांची संख्या मोठी असल्याने समिती वसतीगृहाचा विस्तार करत आहे. या कामात माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे आहे.” रमाकांत तांबोळी यांनी माजी विद्यार्थी हा संस्थेचा कणा असून, संस्थेसाठी आव्हानात्मक कामे करण्यात माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यायला हवा. समितीसारख्या संस्था उभारण्याचे आव्हान प्रत्येक माजी विद्यार्थ्याने स्वीकारले पाहिजे, असा सल्ला दिला.
तुकाराम गायकवाड यांनी समितीच्या भावी योजना आणि आव्हाने विशद केली. नवीन वसतिगृहाच्या उभारणी विषयी माहिती दिली. राजू इंगळे यांनी मंडळाच्या उपक्रमाची माहिती दिली. आजी व माजी विद्यार्थ्यांच्या हितासाठी मंडळ पुढील काळात काम करणार असल्याचे नमूद केले. नंदकुमार तळेकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. कार्यवाह सुनील चोरे यांनी मंडळाच्या कार्याचे, तर खजिनदार संतोष घारे यांनी आर्थिक अहवालाचे वाचन केले. निसार चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष अनिल खेतमाळीस यांनी आभार मानले.

आमच्यामुळे भाजपा सत्तेत येऊ शकते- खा . रामदास आठवले

0

पुणे – …..पुणे महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत .पुण्यात रिपब्लिकन पक्षाच्या मदतीमुळे मागील वेळेस भाजपाची सत्ता आली होती. याही वेळी आमच्यामुळे भाजपा सत्तेत येऊ शकते परंतु यावेळी आम्हाला सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळाला पाहिजे असे मत रिपब्लिकन पक्षाचे नेते ,केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यातील जाहीर सभेत व्यक्त केले.महापालिका निवडनूकीच्या  निमित्ताने पुण्यात आज भीम छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्याम गायकवाड व नीलम गायकवाड यांचा रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश झाला त्यानिमित्ताने ताडीवाला रोड येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी  ते बोलत होते. 

            पुढे ते म्हणाले की पुण्यात आमच्या पक्षाची खूप मोठी ताकत आहे .या शहरात झोपडपट्टी ची संख्या मोठ्या प्रमाणात आहे .त्यामुळे यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीत संधी दिली जाणार आहे.आता सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज राहण्याचे आदेश दिले .येथील रहिवाश्यांना रेल्वेकडून सातत्याने त्रास दिल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी सांगितल्या .त्यावेळी आठवले यांनी रेल्वेकडून होणारा त्रास तत्काळ थांबिवला जाईल असे आश्वासन दिले .येथील रहिवाशी कित्येक वर्षापासून येथे राहत आहेत .त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणार असल्याचं त्यांनी जाहीर सांगितले.

जगाला आज बॏध्द विचाराची गरज

पुढे ते म्हणाले की आज रशिया आणि युक्रेन उद्धामुळे सारे जग संकटात आहे . उद्ध नको , बुद्ध हवा म्हणजेच भगवान गौतम बुद्धाच्या विचाराची गरज आज साऱ्या जगाला असल्याचे मत त्यांनी यावेळी  व्यक्त केले.  श्याम गायकवाड यांनी संपूर्ण देशभर आज नेते रामदास आठवले उपेक्षित ,वंचित लोकांसाठी काम करीत आहेत .त्यांच्या कार्यामुळे आपण आज  रिपबलिकन पक्ष्यात प्रवेश करीत असल्याचे सांगितले .            कार्यक्रमाचे अध्यक्ष व पुणे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनी पुण्यातील गरीब ,दलीत ,उपेक्षित समाजाच्या हितासाठी पक्ष्याचे कार्यकर्ते महापालिका मध्ये जाणे गरजेचे असल्याचे सांगितले .तसेच यावेळी किमान 20 नगरसेवक निवडून पक्षाची ताकद वाढवणार असल्याचा  संकल्प त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास उपमहापौर सुनीता ताई वाडेकर ,माजी उपमहापौर डॉ. सिद्धlर्थ धेंडे ,कार्यक्रमाचे संयोजक श्याम गायकवाड ,नीलिमा गायकवाड , रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण,प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव ,परशुराम वाडेकर ,मुस्लिम आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अयुब शेख ,मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे ,नगरसेविका हिमाली कांबळे ,महिपाल वाघमारे ,बसवराज गायकवाड ,असित गांगुर्डे ,अशोक कांबळे ,निलेश गायकवाड ,यशवंत नडगम ,संगीताताई आठवले यासह पुणे शहरातील कार्यकर्ते ,महिला व युवक मोठ्या संख्येने या जाहीर सभेस उपस्थित होते .

‘चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत टायगर्स संघाला विजेतेपद’

0

पुणे, दि. 2 मार्च 2022: फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी तर्फे आयोजित व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत टायगर्स संघाने डेक्कन चार्जर्स  संघाचा 23-15 असा पराभव करत विजेतेपद संपादन केले. 
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत टायगर्स संघाने डेक्कन चार्जर्स संघाचा 23-15 असा सहज पराभव करत विजेतेपद पटकावले. सामन्यात संघर्षपुर्ण लढतीत 100 अधिक गटात टायगर्सच्या प्रशांत गोसावी व ऋतू कुलकर्णी यांना डेक्कन चार्जर्सच्या आशिष पुंगलिया व जयदीप दाते यांच्याकडून 6-5(7-4) असा पराभव पत्करावा लागला. मात्र, 90 अधिक गटात टायगर्स संघाच्या परज नाटेकर व योगेश पंतसचिव या जोडीने डेक्कन चार्जर्सच्या अमोद वाकलकर व अजित सैल यांचा 6-4 असा पराभव करत आघाडी कायम राखली. त्यानंतर खुल्या गटात अभिषेक ताम्हाणे व केदार शहा यांनी आशिष पुंगलिया व मुकुंद जोशी यांचा 6-2 असा तर अखेरच्या खुल्या गटात टायगर्सच्या अनुप मिंडा व ऋतू कुलकर्णी यांनी ऋषिकेश पाटसकर व रक्षय ठक्कर यांचा  6-3 असा पराभव करून संघाला विजेतेपद मिळवून दिले.
स्पर्धेतील विजेत्या टायगर्स संघाला करंडक व 20000/- रुपये तर, उपविजेत्या डेक्कन चार्जर्स संघाला करंडक व 10,000/-रुपये अशी पारितोषिक देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मुकुंद जोशी आणि डॉ. अमित पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले.  
निकाल: अंतिम फेरी:
टायगर्स वि.वि. डेक्कन चार्जर्स 23-15(100अधिक गट: प्रशांत गोसावी/ऋतू कुलकर्णी पराभूत.वि. आशिष पुंगलिया/जयदिप दाते 5-6(4-7); 90अधिक गट: परज नाटेकर/योगेश पंतसचिव वि.वि.अमोद वाकलकर/अजित सैल 6-4; खुला गट: अभिषेक ताम्हाणे/ केदार शहा वि.वि आशिष पुंगलिया/मुकुंद जोशी 6-2 ; खुला गट: अनुप मिंडा /ऋतू कुलकर्णी वि.वि.ऋषिकेश पाटसकर/रक्षय ठक्कर 6-3.