पुणे-“देशाचे पंतप्रधान उद्या या ठिकाणी येत आहेत. त्यांचे काही कार्यक्रम होत असतील तर तक्रार करण्याचे कारण नाही. मेट्रो रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. एका महिन्यापूर्वी मेट्रोच्या प्रमुखांनी मला मेट्रो दाखवण्यासाठी नेले होते. जेथून मेट्रो धावणार आहे तेथून मी प्रवासही केला. त्यावेळी मेट्रोचे काम झालेले नाही हे माझ्या लक्षात आले. काम झालेले नसतानाही उद्घाटन होत आहे. माझी त्याबद्दल काही तक्रार नाही,” असे शरद पवार यांनी म्हटले.“पंतप्रधान मोदी नदी सुधारणाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. नदीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. पण सुधारणेचा कार्यक्रम मर्यादित ठेवतात आणि आजूबाजूला सोईसुविधा करतात. मी इंजिनियर नाही पण वर किती धरणे आहेत हे मला माहिती आहे. उद्या एखाद्यावेळेस वर ढगफुटी झाली आणि नदीचे पात्र कमी केले तर त्याचे पाणी कुठे जाईल याची माझ्यासारख्यांना चिंता आहे. पंतप्रधान येत आहेत म्हणजे त्यांनी विचार केला असेल, असे मी समजतो. पण संकट आले तर याचा फटका आजूबाजूच्या गावांना बसेल याचा काळजी मला आहे,” असे शरद पवार यांनी म्हटले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात मेट्रोच्या गरवारे स्थानकापासून आनंदनगर स्थानकापर्यंतचा प्रवास नरेंद्र मोदी मेट्रोतून करणार आहेत. त्यानंतर जवळील मोकळ्या मैदानावरून जाहीर कार्यक्रमाद्वारे ते पुणेकरांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यापासून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होणार असून राजकीय रणधुमाळी रंगणार आहे
.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या रविवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी महापालिकेतून कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय येथे पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन आणि मेट्रोने आनंदनगपर्यंतचा प्रवास करणार आहेत. त्यानंतर जवळील मोकळ्या मैदानावरून जाहीर कार्यक्रमाद्वारे ते पुणेकरांना संबोधित करणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जानेवारीमध्ये पिंपरी-चिंचवडला येऊन मेट्रो स्थानकांची पाहणी करून मेट्रोतून प्रवासही केला होता. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यावरुन शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.