Home Blog Page 1977

रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक लोकांसाठी खुले करणार – डॉ. नीलम गो-हे

पुणे – स्वातंत्र्य़वीर सावरकर यांनी रत्नागिरीतील ज्या कारागृहात तेरा वर्षे शिक्षा भोगली, त्या कोठडीते त्यांचे स्मारक करण्यात आले आहे. तथापि ती कोठडी कारागृहात असल्याने लोकांना त्या स्मारकाला भेट देणे सहज शक्य होत नाही. त्यामुळे रत्नागिरीतील कारागृहातील सावरकरांचे स्मारक लोकांसाठी खुले व्हावे यासाठी आपण प्रयत्न सुरू केले आहेत असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी येथे सांगितले. तसेच फ्रांसमधील मार्सिलिस येथेही सावरकरांचे स्मारक व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 139 व्या जयंती आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संवाद पुणे आणि बढेकर ग्रूप यांनी, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित केलेल्या “महानायक सावरकर क्रांती सूर्याची तेजस्वी गाथा” या सांस्कृतिक कार्यक्रमात डॉ. गो-हे बोलत होत्या. यावेळी त्यांच्या हस्ते ‘सावरकर विचारधारा युव पुरस्कार’ अभिनेत्री व लेखिका अपर्णा चोथे यांना प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर बढेकर ग्रूपचे प्रवीण बढेकर, संवादचे सुनील महाजन, निकिता मोघे उपस्थित होते.

डॉ. गो-हे म्हणाल्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सावरकर भक्त असल्याने त्यांचे संस्कार आमच्यावर झाले आहे. सावरकरांच्या स्मारकांबद्दलची महिती इंटरनेटवर मिळते पण त्या रत्नागिरीच्या स्मारकाचा उल्लेख नसल्याचे आपल्या निदर्शनास आले. त्यामुळे रत्नागिरीला जाण्याची संधी मिळाली तेव्हा आपण त्या कारागृहातील कोठडीला भेट दिली. त्याची अतिशय चांगली व्यवस्था कारागृह प्रशासनाने ठेवली आहे. तसेच तेथे एक प्रदर्शनही उभे केले आहे. मात्र या दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी आहेत तो भाग सध्या कारागृहाचाच भाग असल्याने लोक सहजपणे बघण्यासाठी तेथे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे हे स्मारक लोकांसाठी खुले करण्याबाबत आपण कार्यवाही सुरू केली आहे. त्याबरोबरच ज्या मार्लेलिस बंदरात सावरकर पोचले तेथेही त्यांचे एक स्मारक व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.

प्रवीण बढेकर म्हणाले, सावरकरांनी वयाच्या 26 व्या वर्षापर्यंत 26 पुस्तके लिहिली असल्याचे आपल्या वाचनात आले. यातूनच प्रेरणा घेऊन आपण वयाच्या 26 व्या वर्षी स्वतंत्र्य व्यवसाय सुरू करण्याचे धाडस केले. आज मी सावरकरांचे विचार लोकांसमोर मांडण्याइतका मोठा नाही पण त्यांचे विचार लोकांपर्यंत पोचवणा-यांना मदत करण्याइतका एक सावरकरप्रेमी म्हणून नक्कीच सक्षम आहोत. त्यामुळेच या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. पुढेही सावरकरांचे विचार पोचवण्यासाठी मदत करत रहाणार.

पुरस्कार प्राप्त अपर्णा चोथे म्हणाली, मी वैद्यकीय शिक्षण घेतले असले तरी आवड म्हणून कलेचे क्षेत्र निवडले आहे. लेखन व अभिनय करताना सावरकर बंधूंच्या पत्नींविषयी लिहिलेली “त्या तिघी” ही कादंबरी वाचनात आली. त्यातून मला या तिघींवर एक पात्री प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाली. आजवर याचे 25 प्रयोग झाले आहेत. सावरकरांच्या पत्नींबद्दलची वास्तवता समाजापर्यंत पोचवण्याचे माझे प्रयत्न मी थांबवणार नाही. माझ्या या प्रयत्नांना राजाश्रय व लोकाश्रय द्यावा असे आवाहन त्यांनी सावरकरप्रेमींना केले.

प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी या कार्यक्रमाची संकल्पना विषद करून, डॉ. नीलम गो-हे यांनी राज्यातील नाट्यगृह व कलाकारांसाठी कसा पुढाकार घेतला हे सांगून सर्वांचे स्वागत केले. आभारप्रदर्शन निकिता मोघे यांनी केले.

पुरस्कार वितरणानंतर निकिता मोघे निर्मित “महानायक सावरकर” हा गीतांचा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमात जयोस्तुते नमोस्तुते….., हे हिंदूनृसिहा प्रभो शिवाजीराजा…., जय जय शिवराया…..ही सावरकांनी लिहिलेली शिवछत्रपतीची आरती, ने मजसी ने परत मातृभीला…, अनादी मी अनंत मी…., शतजन्म शोधिताना…..अशी सावरकांच्या लेखणीतून उतरलेली काही लोकप्रिय गीते सादर करण्यात आली. कार्यक्रमाची संहिता व निवेदन ऋचा थत्ते यांनी केले. गीते सुजित सोमण, श्रृती देवस्थळी, हेमंत वाळूंजकर यांनी सादर केली. त्यांना साथसंगत दर्शना जोग, अमृता ठाकूर देसाई, ऋतूराज कोरे, केदार मोरे, राजेंद्र सबनीस यांनी केली

संपदा मेहता यांची केंद्रीय वित्त मंत्रालयात नियुक्ती,सलाम पुणे कडून अभिनंदन आणि शुभेछ्या

नवी दिल्ली- भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी ( IAS) संपदा मेहता यांची नुकतीच देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या,केंद्र सरकारच्या श्रीमती.निर्मंला सितारामन, यांच्या अखत्यारीत येणाऱ्या अर्थमंत्रालयात,संचालक, राजस्व (महसूल) विभाग,वित्त मंत्रालय,भारत सरकार या पदावर नवी दिल्ली,येथे नियुक्ती करण्यात आली आहे.या भुषणास्पद नियुक्ती बद्दल त्यांचे सलाम पुणे च्या वतीने अध्यक्ष शरद लोणकर यांनी मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन,व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत ज्या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक करून त्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांमधील कोणी घेतलेली अशी उत्तुंग भरारी निश्चितच आनंद देणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संपदा मेहता यांनी या पुर्वी महत्वाच्या मुंबई‌ जिल्हाधिकारी,GST Joint Commissioner ( सह आयुक्त ), तसेच पुणे, जळगाव, गडचिरोली, नाशिक,हीगोंली, नवी मुंबई ,कोकण विभाग, ई.ठीकाणी विविध पदांवर ‌काम केले आहे.

शाश्वत विकासात पशुसंवर्धन विभागाची महत्त्वाची भूमिका- उपसभापती नीलम गोऱ्हे

पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव पुरस्काराचे वितरण

पुणे दि.२९:राज्यात पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून विविध योजना आणि कार्यक्रमांचे प्रभावी नियोजन केले जात आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न वाढीसह कृषी उत्पादन वाढविण्यासाठी पशुसवंर्धन विभागामार्फत वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. शाश्वत विकासात पशुसंवर्धन विभागाची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले.

पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयात ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने आयोजित पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आर. टी. वझरकर, उपाध्यक्ष डॉ.रामनाथ सडेकर, सचिव डॉ. वि. वै.देशपांडे उपस्थित होते.

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेतकरी, शेजमजुराला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करणे आवश्यक आहे, शेळीपालन हा त्यावर महत्वाचा पर्याय आहे. दुष्काळी भागात शेतकरी कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी शेळीपालन महत्त्वाचा पर्याय असल्याने शेळीपालनाला प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शेळीपालन करताना चारा व खाद्य व्यवस्था महत्वाची आहे. शेळीपालनाला महिला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. पशुसंवर्धन विभागाने महिलांना मार्गदर्शन आणि साहाय्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा, याबाबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पशुवैद्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून पथदर्शी कार्य सुरू असल्याचा उल्लेख करून डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, पशुवैद्यकाचे योगदान मोठे आहे. पशुसंवर्धन क्षेत्रात त्यांनी केलेले संशोधनही अत्यंत महत्वपूर्ण आहे. पशुसंवर्धन क्षेत्रातील उद्योजक तसेच या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी यापुढेही अधिकाधिक योगदान द्यावे. पशुवैद्य प्रतिष्ठानच्या कार्यासाठी तसेच पशुवैद्यकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल,असेही त्या म्हणाल्या.

कोरोना कालावधीत राज्यांतील अनेक महिलांचे पती गमावले आहेत, त्यातील शेतकरी महिलांना खते व बियाणे मोफत देण्याची मागणी केली आहे, त्याला सर्वच यंत्रणांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्राणी आणि पाणी संदर्भातील स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पशुसंवर्धन क्षेत्रात सुरू असलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी पशुवैद्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्या खासदार गिरीश बापट यांची केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडे मागणी


पुणे ता.२८ : ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्यावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री अनुराग ठाकूर हे काल पुणे दौऱ्यावर आले असता त्यांना केली.
यावेळी खासदार बापट यांनी सांगितले महाराष्ट्र राज्यामध्ये ढोल-ताशा या खेळाला आगळे महत्त्व आहे. जसा पंजाबचा भांगडा, गुजरातचा गरबा, तसा महाराष्ट्राचा ढोल-ताशा कोणताही उत्सव असो वा देवकार्य, मंगलकार्य वा मिरवणूक त्यासमोर ढोल-ताशांचे वादन हे अपरिहार्यच अगदी कुस्तीच्या मैदानात देखील पैलवान मंडळींमध्ये जोश निर्माण करण्यासाठी हलगीचे वादन केले जाते. पुरातन काळापासून ढोल-ताशा हे रणवाद्य तसेच मंगलवाद्य म्हणून अनेक ठिकाणी त्याचे वादन केले जाते. सैन्यांमध्ये जोश आणि उत्साह निर्माण करण्याची ताकद या वाद्यांमध्ये आहे. तसेच स्थानिक उत्सवामध्ये देवादिकांच्या मिरवणुकांमध्ये मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी ढोल-ताशाचे वादन केले जाते. ढोल-ताशा या वाद्यांना पुरातन संदर्भ आहेत. ढोल, ताशा, शिंग, दुंदुभी वाद्य ऐतिहासिक कालापासून वापरात आहेत. याचा शोध घ्यायचा झाल्यास नेमका निर्मितीचा काळ निश्चित करता येत नाही.
आपल्या सर्व देवादिकांच्या हातामध्ये शस्त्रा बरोबर वाद्यांचा देखील समावेश आहे. सरस्वतीची विना, कृष्णाचा शंख, आणि बासरी, शंकराचा डमरू अशी उदाहरणे आपल्या समोर आहेत. ढोल-ताशा ही लोकवाद्य या प्रकारात मोडतात. महाराष्ट्रात घराघरात मंगलकार्य असेल तर तसा पुरणा-वरणाचा नैवद्य दाखवला जातो. तव्दत मंगल कार्यासाठी ढोल-ताशांचे वादन केले जाते. संपूर्ण महाराष्ट्रात ढोल-ताशांची माहिती असे नाही, तर आता गुजरात, गोवा, सेलवासा, आंध्र प्रदेश अशा राज्यातून देखील ढोल ताशा खेळाचा प्रकार आणि प्रसार होतो आहे. आपल्या देशाचे कर्तुत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले असता, त्यांचे स्वागत देखील ढोल-ताशा खेळाने झाले आणि माननीय पंतप्रधानांनी स्वतः ढोल वादनाचा आनंद घेतला.
2019 साली अमेरिकेमध्ये डल्लास येथे BMM Convocation ढोल ताशा खेळांची स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये सुमारे ६ संघातील १०० वादकांनी सहभाग घेतला होता. त्याचे परीक्षण पुण्यातून ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रातर्फे करण्यात आले होते. आता या ढोल ताशा खेळाची व्याप्ती केवळ भारतापुरती मर्यादित राहिली नसून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या ठिकाणी देखील लोकप्रिय होत आहे. पुण्यनगरीत सुमारे २०० ढोल-ताशांचे संघ असून सुमारे 25००० वादक आपली वादन कला याद्वारे लोकांपुढे सादर करतात. नाशिक, मुंबई, ठाणे, अमरावती, नागपूर, कोल्हापूर येथील ढोल-ताशा खेळ विशेष प्रसिद्ध आहे.
ढोल-ताशां खेळाला अद्यापि खेळ म्हणून राज मान्यता मिळाली नाही ही सर्व वादकांची खंत आहे. हे संपूर्ण चराचरात मंगलमांगल्य निर्माण करण्याचे काम ही ढोल-ताशा खेळाची वादक मंडळी आपल्या वादनातून करत असतात. अनेक समारंभात जाण निर्माण करण्याची ताकद या खेळा आहे. ढोल-ताशा वादनासाठी झांजा, ध्वज, लेझीम वाचविण्यासाठी प्रचंड ताकदीची उत्साहाची आणि एनर्जीची आवश्यकता असते. ७ ते ८ तास न थांबता, न थकता आणि घामाने वादन करणे हे कुठल्याही खेळाशी म्हणजेच क्रिकेट, फुटबॉल, हॉकी खेळातील दमणुकीशी साधणारे आहे. याव्यतिरिक्त अबालवृद्धांना या ढोल-ताशा वादनाने मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. काही मंडळी वादनाचा आनंद घेतात, काही मंडळी या तालावर थिरकण्याचा, नाचण्याचा आनंद घेतात, तर उर्वरित मंडळी यातून निर्माण होणाऱ्या कर्णमधुर लोकसंगीताचा आनंद घेतात. यामुळे महाराष्ट्रातील लोकप्रिय अशा लोक संगीताशी संबंधित ढोल-ताशा या खेळास खेळ म्हणून सरकार दरबारी मान्यता मिळावी, अशी विनंती खासदार बापट यांनी केली.

अंदमान सुटकेनंतर समाजसुधारक सावरकरांचा जन्म -शरद पोंक्षे

पुणे : अंदमानातून सुटल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय केले? हा प्रश्न विचारला जातो. आंतरजातीय विवाह, विहिरी खुल्या करणे, मंदिर प्रवेश, एकत्रित सहभोजन अशा अनेक चळवळी सावरकरांनी उभ्या केल्या. सावरकर हा एक विचार आहे. त्यांना स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे झाली तरीही केवळ माफीवीर म्हणूनच बोलले जाते, हे दुर्देव आहे. सन १९२४ ते १९३७ हा अंदमान सुटकेनंतरचा काळ म्हणजे सावरकरांचा समाजसुधारक म्हणून जन्म झाल्याचा काळ असल्याचे प्रतिपादन व्याख्याते व सावरकरप्रेमी शरद पोंक्षे यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर जयंती समिती पुणे तर्फे व्याख्याते व सावरकरप्रेमी शरद पोंक्षे यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन याविषयावरील व्याख्यानाचे आयोजन सदाशिव पेठेतील भरत नाटय मंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, अभिनेते व दिग्दर्शक प्रविण तरडे, विवेक जोशी, प्रकाशक पार्थ बावस्कर, समितीचे सूर्यकांत पाठक, विद्याधर नारगोळकर, विश्वनाथ भालेराव, मकरंद माणकीकर, श्रीकांत जोशी, प्रकाश दाते, अतुल व्यास, उल्हास पाठक, अजय कुलकर्णी, सुजाता मवाळ, विश्वजीत देशपांडे, संयोगिता पागे, पल्लवी गाडगीळ आदी उपस्थित होते. शब्दांमृत प्रकाशन तर्फे शरद पोंक्षे यांच्या दुसरं वादळ या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी झाले.

शरद पोंक्षे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांना टिळकांची कॉंग्रेस मान्य होती. मात्र गांधीजींची कॉंग्रेस मान्य नव्हती. सन १९३७ साली सावरकर राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये गेले असते, तर त्यांच्यावर आज कोणतेही आरोप झाले नसते. हिंदी राष्ट्रवाद आणि मुस्लिमांचे पराकोटीचे लांगुलचालन या दोन कारणांनी त्यांनी कॉंग्रेसमध्ये जाण्यास नकार दिला. हिंदू राष्ट्रवादावरच हे राष्ट्र उभे राहिल, हा सावरकरांचा विचार होता.

ते पुढे म्हणाले, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदी असताना सावरकरांचा पोस्टाचे तिकीट काढून गौरव केला होता. तसेच त्यांच्या स्मारकासाठीही रुपये १५ हजार रुपये स्वत:च्या खात्यातून दिले होते. हा इतिहास इंदिरा गांधी यांच्या दिल्लीतील नातवाला माहिती नाही. आपण सारे मनुष्य जातीचे आहोत, हा सावरकरांचा विचार होता.

व्यावसायिक दृष्टया जाती आहेत, जन्मानुसार नाही. या व्यवसायांना ब्रिटीशांनी जात लावली व जातीचे राजकारण केले. सावरकरांनी हेच संपवायचा प्रयत्न केला. हिंदू धर्मप्रेम आणि हिंदू राष्ट्रनिर्मीतीचा विचार की सावरकर कॉंग्रेसमध्ये गेले नाहीत, हा त्यांचा गुन्हा होता? वेद, पुराण, कुराण, बायबल हे पूजनीय आहेतच. पण विज्ञान हा धर्मग्रंथ व्हायला हवा. हिंदू राष्ट्र हे माणुसकीचे राष्ट्र आहे. तेथे माणुसकी हाच धर्म आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्रात अहिंदू सर्वात जास्त सुखी राहतील, असेही त्यांनी सांगितले.

विक्रम गोखले म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे केवळ पुतळे उभारुन चालणार नाही, तर त्यांचा विज्ञानविचार आपण स्विकारायला हवा. कोणत्याही जाती-धर्माचे असले, तरी देशावर प्रेम करणारे एकसंध व्हायला हवे. आज देश अडचणींच्या ठिकाणी उभा असून भविष्यात संकटातून जाणार आहे. त्यामुळे स्वत:चे संरक्षण प्रत्येकाला करता आला पाहिजे, तरच आपण संकटांचा मुकाबला करु शकू.

सूर्यकांत पाठक म्हणाले, सावरकरांच्या सखोल विचारांनी समाजाला ताकद मिळेल. सावरकर हे तेजस्वी, तत्वज्ञानी व एक विचार आहेत. त्यामुळे समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे शहरात आज ४४२ ठिकाणी सावरकर जयंती साजरी करण्यात आली. पुढील वर्षी सावरकरांचे विविध पैलू मांडणा-यांना सावरकरांच्या नावाने समितीतर्फे पुरस्कार दिला जाईल, असा संकल्पही त्यांनी यावेळी सांगितला. प्रविण तरडे, पार्थ बावस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीकांत जोशी यांनी प्रास्ताविक केले. राधिका देशपाडे यांनी सूत्रसंचालन केले. मकरंद माणकीकर यांनी आभार मानले.

पंतप्रधान 30 मे रोजी ‘पीएम-केअर्स फॉर चिल्ड्रेन’ योजनेंतर्गत लाभ जारी करणार

0

मुंबई-

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मे 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता  व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत लाभ जारी करतील. शाळेत जाणाऱ्या मुलांना पंतप्रधान शिष्यवृत्ती रक्कम  हस्तांतरित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान मुलांसाठी पीएम केअर्सचे पासबुक आणि आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड मुलांना वितरित केले जाईल.

11 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत कोविड-19 महामारीमुळे दोन्ही पालक किंवा  कायदेशीर पालक/दत्तक पालक गमावलेल्या मुलांना आधार देण्यासाठी पंतप्रधानांनी 29 मे 2021 रोजी पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना सुरू केली होती. मुलांची सर्वसमावेशक काळजी आणि संरक्षण यासाठी शाश्वत पध्दतीने त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करणे,  शिक्षण आणि शिष्यवृत्तीद्वारे त्यांना सक्षम बनवणे, वयाची 23 वर्षे पूर्ण झाल्यावर 10 लाख रुपये आर्थिक सहाय्य पुरवून  स्वयंपूर्ण अस्तित्वासाठी सुसज्ज बनवणे आणि आरोग्य विम्याद्वारे त्यांचे निरामय आरोग्य सुनिश्चित करणे हे या  योजनेचे उद्दिष्ट आहे. मुलांची नोंदणी करण्यासाठी pmcaresforchildren.in हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. पोर्टल ही सिंगल विंडो प्रणाली आहे जी मुलांसाठी मान्यता प्रक्रिया आणि इतर सर्व सहाय्य सुलभ करते.

पुण्यातील उद्योगजगताने क्रीडा क्षेत्रासाठी सीएसआरअंतर्गत भरीव मदत करण्याचे अनुराग ठाकूर यांचे आवाहन

पुणे-29 मे 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार क्रीडा क्षेत्र आणि खेळाडूंना विशेष प्रोत्साहन देत आहे. त्यामुळेच भारताला टोकियो ऑलिम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भरभरुन यश मिळाले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा व युवा व्यवहार तसेच माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. अनुराग ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी संध्याकाळी पुणे येथे तक्षशिला या अद्ययावत क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. 2013-14 मध्ये क्रीडा क्षेत्रासाठी 1200 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद होती, त्यात वाढ करुन 3000 कोटी रुपयांपेक्षा अधिक तरतूद केली आहे. खेलो इंडियासाठीची अर्थसंकल्पीय तरतूद गेल्यावर्षी 600 कोटी रुपये होती ती यावर्षी 950 कोटी रुपये केली आहे. त्याचे दृश्य परिणाम दिसून येत असल्याचे मंत्री म्हणाले. पुणे येथे अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी लोकप्रतिनिधी, आयुक्त आणि इतर संस्थांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान स्वतः क्रीडापटूंशी संवाद साधतात. त्यांना प्रोत्साहन देतात. पंतप्रधानांनी टोकिओ ऑलिम्पिकमधील केवळ पदकविजेत्या खेळाडूंशी नाही तर सहभागी झालेल्या सर्व क्रीडापटूंशी संवाद साधला, असे अनुराग ठाकूर म्हणाले. कोविड-19 च्या आव्हानात्मक परिस्थितीतही सरकारने खेळाडूंना प्रशिक्षणासाठी आवश्यक सोयी-सुविधा पुरवल्या, परदेशातील प्रशिक्षणाचा खर्च उचलला. एवढेच नाही तर सरकार ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम’ योजनेच्या माध्यमातून खेळाडूंना निवासव्यवस्था, प्रशिक्षण, संतुलित आहार पुरवते तसेच दर महिन्याला 50,000 रुपये देते, अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. मीराबाई चानूचे उदाहरण त्यांनी याप्रसंगी दिले.

अनुराग ठाकूर यांनी युवकांना “खेलोगो तो खिलोगे” हा पंतप्रधानांचा मंत्र आत्मसात करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीपासूनच खेळासंबंधीच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या तर बालकांना खेळांमध्ये रुची निर्माण होते. त्याला योग्य वेळी प्रोत्साहन दिल्यास तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करतो, असे मंत्री म्हणाले. खेळामुळे व्यक्तिमत्व विकास घडून येतो, नेतृत्वगुण विकसित होतात, शारिरीक आणि बौद्धिक आरोग्य प्राप्त होते. एवढेच नाही तर नियमित व्यायाम आणि खेळामुळे आपण आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करु शकतो, असे मंत्री म्हणाले.

पुण्यातून जास्तीत जास्त क्रीडापटूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी उद्योगजगताने कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसाआर) च्या माध्यमातून भरघोस मदत करुन सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी याप्रसंगी केले.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (Sports Authority of India) कुस्तीपटूंना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रातील तालमींकडे लक्ष पुरवले आहे, असे त्यांनी प्रसिद्ध अशा गुलशाची तालीम येथील सत्कारसोहळ्यात सांगितले. राज्याची ओळख असलेल्या ढोल-ताशा पथकाला राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सादरीकरणाची संधी देणार असल्याचे अनुराग ठाकूर यांनी याप्रसंगी सांगितले.   

तक्षशिला क्रीडा संकुलाविषयी माहिती

आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे क्रीडापटू घडवण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिकेने सुमारे 2 कोटी 10 लाख रुपयांची गुंतवणूक करून विमान नगर इथे तक्षशिला क्रीडा संकुल उभारले आहे.

*          बास्केट बॉल, वॉली बॉल आणि कबड्डी या खेळांसाठी क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा विकसित करण्यात येत आहेत.

*           क्रीडापटूंसाठी उत्तमोत्तम दर्जाच्या सुविधांसह या संकुलात खुले जिम्नॅशियम आणि फुटबॉलचे मैदान

*           क्रीडा संकुलाच्या शेजारील आंतरराष्ट्रीय स्तरीय स्केटिंग सुविधेला अत्याधुनिक पुलाच्या आधारे संकुलाशी जोडून घेण्यात आले आहे.

*          1500 प्रेक्षक बसू शकतील असे प्रेक्षागृह संकुलातील जवळपास एक एकर जमिनीवर लवकरच बांधले जाणार आहे.

*           400 क्रीडापटूंना प्रशिक्षित करता येईल अशा व्यवस्था लवकरच सुरु करण्यात येत आहे.

17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव: जाणून घ्या कोण आहेत ज्यूरी सदस्य

मुंबई, 29 मे 2022

सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज मुंबईत सुरुवात होत आहे. या महोत्सवात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात, 119 चित्रपट दाखवले जातील, तसेच स्पर्धा क्षेत्रांत, 264 चित्रपट दाखवले जाणार आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातल्या चित्रपटांसाठी आलेल्या प्रवेशिकांममधून उत्तम चित्रपट निवडण्याचे काम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ज्यूरी सदस्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक केले आहे. या महोत्सवासाठी ज्यूरी म्हणून काम पाहिलेल्या मान्यवर ज्यूरी सदस्यांविषयी माहिती जाणून घेऊया.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा गट- ज्यूरी सदस्य

  1. एस. नालामुथू (भारत)
  2. अनंत विजय (भारत)
  3. मीना रॅड (फ्रान्स)
  4. जीन पिएर सेरा (फ्रान्स)
  5. डॅन वॉलमन (इस्राएल)

एस. नालामुथू : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय काही पुरस्कारांसह पाच वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते वन्यजीव चित्रपटकार. ‘जॅक्सन होल वन्यजीव चित्रपट महोत्सवा’चे नियमित परीक्षक आणि ‘इंडियन पॅनोरमा चित्रपट महोत्सव’ (2021) चे परीक्षक मंडळाचे अध्यक्ष. ‘लिविंग ऑन द एड्ज’ ही पांडा पुरस्कार विजेती पर्यावरणीय मालिका, ‘टायगर डायनेस्टी’ (2012-13), ‘टायगर क्वीन’ (2010), ‘द वर्ल्ड फेमस टायगर’ (2017), बीबीसी वर्ल्डसाठी व अॅनिमल प्लॅनेटसाठी अनुक्रमे ‘अर्थ फाईल’ (2000) व ‘द वर्ल्ड गॉन वाईल्ड’ (2001) माहितीपट ही काही विशेष उल्लेखनीय कामे.

अनंत विजय :  चित्रपट, संस्कृती व साहित्याचे राजकारण या विषयांवर  20 वर्षांपेक्षा जास्त काळ लेखन, मुद्रित व टीवी पत्रकारिता. ‘दैनिक जागरण’ वर्तमानपत्रात 12 वर्षे सातत्याने साप्ताहिक सदर लेखन सुरू. हिंदी भाषेचा अभ्यास व आवडीमुळे विविध साहित्य महोत्सवांचे आयोजक, हिंदी साहित्यविषयक संपादकीय मंडळांवर सल्लागार. वर्ष 2019 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष आणि कोकणी चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष.

मीना रॅड : इराणी वंशांच्या फ्रान्स स्थित माहितीपटकार, निर्मात्या व पत्रकार. बीबीसी, रेडिओ फ्रान्स, फ्रान्स प्रेससाठी मध्य आशियाई देशांमधील राजकीय, सांस्कृतिक विषयांवरील पुरस्कार विजेत्या पत्रकारितेने कारकीर्दीची सुरूवात. जीन रूश यांच्या कार्याने प्रेरित चित्रपटकारांना एकत्र आणण्यासाठी 2014 पासून पॅरीस इथे होणाऱ्या ‘अपाय वॅरेन महोत्सवा’च्या संचालक. ‘फॉर मी द सन नेव्हर सेट्स’ (2012) ह्या पहिल्याच माहितीपटाला तेहरानमधील ‘सिनेमा वेरिटे चित्रपट महोत्सवा’त सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार.

जीन पिएर सेरा : जागतिक ख्यातीचे निर्माते, दिग्दर्शक. स्ट्रासबर्ग इथे ‘द सेंटर ड्रामाटिक द लेस्त’मधून रंगमंच कारकीर्दीची सुरुवात. 1970 मध्ये पुरस्कार विजेत्या तीन लघुपटांनी चित्रपट कारकीर्दीची सुरुवात. सेर्ज लरॉय, रॉजर हानिन आणि लिलिअॅन द कर्माडेक यांच्यासह सहाय्यक दिग्दर्शक. ‘ओजूरिएन फ्रान्स’ हा त्यांचा कार्यक्रम जगातील  180 वाहिन्यांवरून प्रसारित. त्यांची निर्मिती असलेले 30 पेक्षा जास्त चित्रपट व माहितीपट जगभरातील पुरस्कारांचे विजेते.

डॅन वॉलमन : चित्रपटनिर्माते, रंगमंच दिग्दर्शक. पहिलाच चित्रपट ‘द ड्रीमर’ (1970) चा कान चित्रपट महोत्सवात प्रवेश. ‘फ्लॉक’ (1972), ‘माय मायकेल’ (1974), ‘अॅन इस्राएली लव स्टोरी’ (2008) आणि ‘वॅली ऑफ स्ट्रेंथ’ (2010) हे काही विशेष उल्लेखनीय चित्रपट. चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी अलिकडेच ‘जेरुसलेम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त ‘लाइफटाईम अचिवमेंट’ आणि ‘शिकागो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त ‘सिल्वर ह्युगो’ पुरस्कारांनी सन्मानित. तत्पूर्वी, ‘एरिक आइन्स्टाईन पुरस्कार’ (2015) व ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त ‘लाइफटाईम अचिवमेंट’नेही सन्मानित.   

राष्ट्रीय स्पर्धा गट- ज्यूरी सदस्य

  1. संजीत नार्वेकर (भारत)
  2. सुभाष सेहगल (भारत)
  3. जयश्री भट्टाचार्य (भारत)
  4. अॅश्ली रत्नविभूषण (श्रीलंका)
  5. तारीक अहमद (बांग्लादेश)

संजित नार्वेकर :  विविध माध्यमांमध्ये 40 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट इतिहासकार, लेखक, प्रकाशक आणि माहितीपटकार. माजी संपादक ‘स्क्रीन’ (1980-91), ‘टी.वी. अँड विडिओ वर्ल्ड’ (1994-95), ‘डॉक्युमेंटरी टुडे’ (2007-12). राष्ट्रीय समीक्षक परीक्षक मंडळ, मिफ्फ (2006), चित्रपट लेखन पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (1999) साठी परीक्षक. ‘मराठी सिनेमा इन इंट्रोस्पेक्ट’ (1995) ह्या पुस्तकाला सिनेमाविषयक उत्कृष्ट पुस्तक म्हणून सुवर्ण कमळ.

सुभाष सेहगल : भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी उद्योगात 250 पेक्षा जास्त चित्रपटांचे संकलक. विद्यार्थीदशेत ‘फिल्म अँड टेलिविजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मध्ये संकलन विषयात सुवर्ण पदक विजेते. मुंबईतील चित्रपट उद्योगासह हिंदी व पंजाबी चित्रपटांच्या संकलनासाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कारांचे विजेते.

जयश्री भट्टाचार्य : अग्रगण्य रंगमंच कलाकार, चित्रपटकार, पुरस्कार विजेते माहितीपट, लघु व चित्रपटांच्या दिग्दर्शिका. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून आत्या अभिनेत्री केया च्रकवर्ती यांच्याकडून रंगमंचविषयक धडे घेण्यास सुरुवात. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये शिक्षक व ईशान्य भारतात काही रंगमंच कार्यशाळांचे आयोजन. बुद्धदेव दासगुप्ता व ऋतूपर्णो घोष यांच्या उत्तोरा (2000) चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शनाने चित्रपट कारकीर्दीची सुरुवात. ‘मोंदो मेयेर उपाख्यान’ (2002), ‘चोखेर बाली’(2003), ‘शुभो महुरत’(2003) ही काही विशेष उल्लेखनीय कामे.

अॅश्ली रत्नविभूषण : पत्रकार, लेखक, चित्रपट समीक्षक. श्रीलंकेतील ‘आशियाई चित्रपट केंद्रा’चे संचालक व ‘सिनेसिथ’ पत्रिकेचे संस्थापक संपादक. श्रीलंकेतील चित्रपट जगासमोर उलगडून मांडणारे अग्रणी. श्रीलंकेतील चित्रपटाची सुरुवातीची वर्षे आणि दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगविषयक शोधनिबंधांचे व श्रीलंकेतील चित्रपटाचा इतिहासविषयक लेखक. ‘नेटवर्क फॉर द प्रोमोशन ऑफ एशिया पॅसिफिक सिनेमा’चे विद्यमान सदस्य आणि परीक्षक समन्वयक.

तारीक अहमद : 25 वर्षांच्या कारकीर्दीत अनेक माहितीपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांची निर्मिती व दिग्दर्शन करणारे चित्रपटकार आणि निर्माते. सिनेमाविषयक पुस्तकांचे लेखक. तळागाळातील व्यावसायिकांना संधी देणाऱ्या माध्यमे व संवाद संस्थेचे दशकभरासाठी नेतृत्व. ह्या माध्यमातील अनुभव व ज्ञानाधारे बांग्लादेशात स्थानिक व आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत विविध उल्लेखनीय माहितीपट साकार.

डॉक्टरांनी वर्षातील एक महिना किंवा एक पक्षमास देशकार्यासाठी द्यावा  – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

मुंबई दि. 29 : सेवा शब्द उच्चारणे अतिशय सोपे आहे, परंतु सेवा करणे अतिशय कठीण काम आहे. समाज आपल्याला खूप काही देत असतो. त्यामुळे आपण समाजाचे फार मोठे देणे लागतो. यास्तव, डॉक्टरांनी तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर्षभरातील किमान एक महिना किंवा एक पक्षमास देशासाठी दिल्यास त्यांना आत्मिक आनंद लाभेल व त्यांचा अनुभव देखील वाढेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

‘सेवांकुर भारत’ या संस्थेच्यावतीने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी या हेतूने सारागूर, म्हैसूर ‘एक आठवडा देशासाठी’ या शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. शिबिरात सहभागी झालेल्या ९५ वैद्यकीय विद्यार्थ्यांनी तसेच डॉक्टरांनी राज्यपाल कोश्यारी यांची नुकतीच राजभवन येथे भेट घेऊन आपले अनुभवकथन केले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

यावेळी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. इंदिरा हिंदुजा, डॉ. यतींद्र अष्टपुत्रे, डॉ. अश्विनीकुमार तुपकरी, डॉ. आरती आढे, महादेव पडवळ आदी उपस्थित होते.

सेवांकुर भारत या संस्थेने औरंगाबाद येथे सुरुवात करुन आज देशभरातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच डॉक्टरांचे संघटन झाल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आठवडी शिबीर आयोजित करून ‘सेवांकुर’च्या माध्यमातून समाजसेवेची भावना रुजवली जाते हे स्तुत्य कार्य असून सेवांकुरच्या कार्याचा वटवृक्ष व्हावा, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

डॉक्टरांनी डॉक्टरी पेशाचे ज्ञान घेताना उत्तम वक्ते, उत्तम शिक्षक तसेच उत्तम नेते देखील झाले पाहिजे असे सांगून उत्तम नेतृत्वगुण अंगी येण्यासाठी अधिक सेवा करणे आवश्यक असते, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी डॉ.आरती आढे, डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. शालिवाहन गोपछडे, डॉ. रोहित गट्टेवार,
डॉ. प्रीती होळंबे तसेच शिबिरात सहभागी झालेल्या इतर वैद्यकीय विद्यार्थी व तज्ज्ञांनी शिबिरातील अनुभव कथन केले. राज्यपालांशी झालेल्या भेटीच्या वेळी शिबिरात सहभागी झालेल्या ६९ वैद्यकीय महाविद्यालयांमधील ९५ वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते.

0000

१५ ऑगस्ट पासून एक रुपयामध्ये १० सॅनिटरी नॅपकीन – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

0

मुंबई : मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकीन देण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील ६० लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. ही योजना १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातील महिलांसाठी योजना

मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व जागतिक प्रश्न आहे. गेल्या वर्षात मासिक पाळीच्या वेळी काळजी न घेतल्याने व अस्वच्छतेमुळे जगभरातील आठ लाख महिलांचा मृत्यू झाला आहे. स्त्रियांच्या होणाऱ्या मृत्यूमागे हे सर्वात मोठे कारण असून, हा प्रश्न सोडविण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी नाममात्र एक रुपयामध्ये ग्रामविकास खात्याकडून ही नवीन योजना राबवण्यात येणार आहे.

जगातील व राज्यातील आकडेवारी……. 

भारतात दरवर्षी १२० दशलक्षाहून अधिक महिलांना मासिक पाळीचा त्रास होऊन आजारांचा सामना करावा लागतो. भारतात ३२० दशलक्ष मासिक पाळी होणाऱ्या स्त्रियांपैकी केवळ १२ टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकीन वापरतात. यामुळे चार वर्षे भारतात ६०,००० हून अधिक स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोगामुळे होणारा मृत्यू पैकी दोन तृतीयांश मृत्यू मासिक पाळीबद्दलच्या समजूतीमध्ये निष्काळजीपणामुळे होतो. हीच आकडेवारी महाराष्ट्रात पाहायला गेले तर केवळ 66 टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरतात. याबद्दलही शहरी भागाचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागातील फक्त १७.३० टक्के स्त्रियांपर्यंत सॅनिटरी नॅपकिनची सुविधा पोहोचत असते. या समस्येच्या मुळाशी गेले असता सॅनिटरी पॅड वापरण्याबाबत जागृकता नसणे, सॅनेटरी पॅड खरेदी करण्याची समस्या उद्भवणे अशा अनेक प्रश्नांना स्त्रिया सामोरे जात असतात.

दारिद्र्य रेषेखालील 19 वर्षावरील सर्व महिलांसाठी योजना…..

सध्या महाराष्ट्रात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेत फक्त १९ वर्षाखालील युवतींना सहा रुपयात सहा नॅपकिन्स असलेले कीट पुरवण्यात येतात. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. म्हणून हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत दारिद्र्यरेषेखालील सर्व युवती व महिलांना या समस्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना व बचत गटांमधील महिलांना एक रुपये नाममात्र किमतीमध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये……

१. राज्यातील ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिला व आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेतील सर्व महिला वगळून इतर दारिद्र्यरेषेखालील सर्व वयोगटातील युवती व महिलांना दर महिना एक रुपये नाममात्र शुल्कात १० सॅनिटरी नॅपकिन असलेले एक पाकीट महिलांना मिळणार.

२. स्थानिक पातळीवर गावस्तरावरच गावातील ग्रामसंघामार्फत महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून दिले जाणार.

३.शासन स्तरावर दर करार करण्यात येणार.

४. योजनेअंतर्गत महिलांना सॅनिटरी नॅपकीन किट याचा वापर करण्याबाबत, वैयक्तिक स्वच्छते संदर्भात जागृती व प्रचार करणार.

५. सॅनिटरी नॅपकिन व्यवस्थापन व विल्हेवाट.

६. या योजनेत जवळपास ६० लाख पेक्षा जास्त लाभार्थी महिला असल्याने सॅनिटरी नॅपकिनचे विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक गाव स्तरावर मशीन बसवण्यात येणार आहे. या मशीनमार्फत महिलांनी सॅनिटरी नॅपकिन ची विल्हेवाट लावावी, यासाठी जनजागृतीही करण्यात येणार आहेत. ही सर्व मशीन जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या स्वनिधीतून तसेच शासकीय निधी देणग्या तसेच सीएसआर निधीच्या माध्यमातून बसविण्यात येणार आहे.

या योजनेवर एका व्यक्तींसाठी अंदाजे चार रुपये गृहीत धरल्यास लाभार्थ्यांची संख्या ६० लाख अंदाजे असून वार्षिक २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

भारतात आधी टेस्लाची कार विक्री, नंतर प्लांट उभारू .. टेस्लाची भारतात एंट्री कशी होणार ? एका कार वर किमान ३१ लाखाचा कर ?

https://twitter.com/madhusudhanv96/status/1530218419538173952

गेल्या महिन्यात केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की जर टेस्लाने भारतात इलेक्ट्रिक वाहने तयार केली तर कंपनीलाही त्याचे फायदे मिळतील. यापूर्वी 26 एप्रिल रोजी गडकरी म्हणाले होते की जर टेस्ला भारतात ईव्ही बनवण्यास तयार असेल तर ‘काही अडचण नाही’, परंतु कंपनीने चीनमधून कार आयात करून भारतात विकणे योग्य नाही.एलन मस्क भारतात कार बनवायला तयार असतील तर हरकत नाही… भारतात या, कार बनवायला सुरुवात करा, भारत एक मोठी बाजारपेठ आहे, ते भारतातून कार निर्यात करू शकतात. रायसीना डायलॉगमध्ये त्यांनी ही माहिती दिली.

टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी ट्विटद्वारे टेस्ला भारतात बनवण्याबाबत आपली अट घातली आहे. त्याच्या ट्विटवरून असे दिसून आले आहे की, त्यांना प्रथम भारतात टेस्ला कारची विक्री करायची आहे, त्यानंतरच ते एक उत्पादन कारखाना सुरू करण्याचा विचार करतील.

इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांनी पुन्हा एकदा भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्याची गरज व्यक्त केली आहे. ट्विटरवरील एका पोस्टला उत्तर देताना ते म्हणाले, “टेस्ला अशा कोणत्याही ठिकाणी उत्पादन प्रकल्प उभारणार नाही जिथे त्याला कार विकण्याची आणि सेवा देण्याची परवानगी नाही.”

एलन मस्कचे उत्तर तेव्हा आले जेव्हा ट्विटर युजर मधु सुधन व्ही यांनी टेस्लाबद्दल काय असे विचारले? टेस्ला भविष्यात भारतात प्लांट उभारणार आहे का?गेल्या वर्षी, अवजड उद्योग मंत्रालयाने टेस्लाला सांगितले होते की, प्रथम भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू करावे, त्यानंतर कोणत्याही कर सवलतीचा विचार केला जाईल. सध्या, टेस्ला कार भारतात आयात केल्यास $40,000 किंवा 60-100% कर आकारला जातो. हा कर कारचे इंजिन आकार, किंमत, विमा आणि मालवाहतूक यावर निश्चित केला जातो.

फर्ग्युसनमध्ये सावरकरांना अभिवादन

पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) फर्ग्युसन महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. सावरकर विद्यार्थीदशेत 1902 ते 1905 या कालावधीत महविद्यालयाच्या वसतिगृहात राहात होते.
वसतिगृहातील ही खोली आज सर्वांना दर्शनासाठी खुली होती. सावरकरांचा अर्धपुतळा, साहित्य संपदा, पलंग, खुर्ची आदी साहित्याचे जतन करण्यात आले आहे. सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग विषद करणारी भित्तीचित्रे रेखाटण्यात आली आहे.
डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपाध्यक्ष महेश आठवले, प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्राजक्ता प्रधान, उपप्राचार्य स्वाती जोगळेकर, प्रा. आनंद पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अजित कुंटे या दिव्यांग विद्यार्थ्याला ‘स्वा. सावरकरांची विज्ञाननिष्ठा’ या जयंत नारळीकर यांनी लिहिलेल्या लेखाचे अभिवाचन केले. दिवसभर सावरकर भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

जेसीबीच्या खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तोडली;टिळक रोड परिसरातील खंडित वीजपुरवठा अखेर सुरळीत

पुणे, दि. २८ मे २०२२: शहरातील टिळक रोडवर सुरु असलेल्या ड्रेनेज पाइपलाईनच्या कामासाठी जेसीबीद्वारे खोदकाम करताना शुक्रवारी (दि. २७) रात्री ११.५५ वाजता महावितरणची उच्चदाब भूमिगत वीजवाहिनी तोडण्यात आली. त्यामुळे सदाशिव पेठ, टिळक रोड व नवी पेठच्या काही भागातील सुमारे १८०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्रभर दुरुस्ती काम केल्यानंतर शनिवारी (दि. २८) सकाळी ११.३० च्या सुमारास या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, टिळक स्मारक मंदिराजवळ ड्रेनेजचे पाईपलाईन बदलण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी जेसीबीने खोदकाम करण्यात येत आहे. त्यामध्ये शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास महावितरणची भूमिगत वीजवाहिनी तोडण्यात आल्याने सदाशिव पेठ, टिळक रोड व नवी पेठ परिसरातील २५ रोहित्रांवरील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणने सर्वप्रथम २५ पैकी १२ रोहित्रांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु केला. परंतु १३ रोहित्रांवरील सुमारे १८०० ग्राहकांना पर्यायी वीजपुरवठा करणे शक्य झाले नाही. महावितरणकडून तातडीने भूमिगत वाहिनीची तपासणी करण्यात आली व तोडलेल्या वीजवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. यामध्ये दोन ठिकाणी जॉईंट द्यावे लागले. दुरुस्ती व चाचणी झाल्यानंतर शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास सर्वच रोहित्रांवरील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

वीज क्षेत्रात आर्थिक शिस्त महत्वाची; वीजबिलांचा भरणा केल्याशिवाय तरणोपाय नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. २८ मे २०२२: वीजक्षेत्रात आर्थिक शिस्त अतिशय महत्वाची आहे. दिवसेंदिवस विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासाठी पायाभूत यंत्रणा उभारण्यात येत आहे. मात्र वीजबिलांची वसूली झाली नाही तर यंत्रणांचे विस्तारीकरण व सक्षमीकरण तसेच सुरळीत वीजपुरवठा करण्यामध्ये आर्थिक अडचणी येतात. महावितरणची सद्यस्थितीत अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे दर्जेदार वीजपुरवठा व आवश्यक वीजयंत्रणा उभारण्यासाठी वीजबिलांचा भरणा केल्याशिवाय तरणोपाय नाही असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीचे अध्यक्ष ना. श्री. अजित पवार यांनी शनिवारी (दि. २८) व्यक्त केले.

येथील नवीन सर्किट हाऊसच्या सभागृहात आयोजित जिल्हा विद्युत नियंत्रण समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री ना. श्री. पवार बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री अशोक पवार, चेतन तुपे, भीमराव तापकिर, सिद्धार्थ शिरोळे, संजय जगताप, सुनील टिंगरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार (पुणे) जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महावितरणचे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार (पुणे परिमंडल) व श्री. सुनील पावडे (बारामती परिमंडल), श्री. जयंत विके (महापारेषण) तसेच समितीचे अशासकीय सदस्य सर्वश्री प्रवीण शिंदे, प्रदीप कंद, अरूण बोऱ्हाडे, रवींद्र गायकवाड, रमेश अय्यर, सुनील गायकवाड आदींची उपस्थिती होती.

या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री ना. श्री. पवार यांनी लोकप्रतिनिधी तसेच समितीच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्दयांच्या अनुषंगाने सूचना देत जिल्ह्यातील वीजविषयक कामांचा आढावा घेतला. राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरणातून व्याज, विलंब आकार माफीसह मूळ थकबाकीमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थकबाकीमुक्तीसाठी मोठी संधी आहे. सोबतच थकबाकी व वीजबिलांचा भरणा केल्यानंतर ग्रामपंचायती व जिल्ह्यांमध्ये आकस्मिक निधी जमा होत आहे. त्यातून उपकेंद्रांपासून ते नवीन वीजजोडणी देण्यापर्यंत सर्वच वीजयंत्रणा उभारण्याचे कामे सुरु आहे. लोकप्रतिनिधींनी देखील नागरिकांना वीजक्षेत्रातील आर्थिक शिस्त व बिल भरण्याची आवश्यकता समजून सांगावी असे आवाहन उपमुख्यमंत्री ना. श्री. अजित पवार यांनी केले.

मुख्य अभियंता व समितीचे सदस्य सचिव श्री. सचिन तालेवार यांनी पुणे जिल्ह्यातील वीजविषयक विविध योजनांचे सादरीकरण केले. समितीच्या मागील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार वाघोली परिसरात दोन नवीन उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत व या दोन्ही उपकेंद्रांना पाच नवीन उच्चदाब वीजवाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात कृषिपंपांना १२ हजार ३८८ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत तर ३९८४ वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया सुरु आहे. कृषिपंप थकबाकी व चालू वीजबिलांच्या भरण्यातून नवीन वीजयंत्रणा उभारण्यासाठी पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर प्रत्येकी १४३ कोटी ५३ लाख असा एकूण २८७ कोटी ६ लाखांचा कृषी आकस्मिक निधी जमा झाला आहे. आतापर्यंत ११० कोटी ९७ लाख रुपये खर्चाच्या २१०५ कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. तर ५८ कोटी ९१ लाख रुपयांच्या १९६१ कामांचे आदेश देण्यात आले आहे व त्यातील १३ कोटी ८० लाख रुपयांची ४७६ कामे पूर्ण झाली आहेत. पुणे जिल्ह्यासाठी आरडीएसएस योजनेअंतर्गत ११०८ कोटी रुपयांचा तयार केलेला डीपीआर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी दिली.

या बैठकीत लोकप्रतिनिधी तसेच समितीच्या अशासकीय सदस्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. त्या संदर्भात मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार व श्री. सुनील पावडे यांनी निवेदन करीत प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली. यावेळी पुणे जिल्ह्यातील महावितरण व महापारेषणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थिती होते.

सावरकर जयंतीनिमित्त सामुदायिक व्रतबंध

पुणे-‘मी सावरकर’ आणि ‘स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थांच्या वतीने सावरकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सकल हिंदू सामुदायिक व्रतबंध कार्यक्रमात 35 बटूंची मुंज करण्यात आली.अभिनेते शरद पोंक्षे, गायक शौनक अभिषेकी, व्हाईस एअर चिफ मार्शल, (निवृत्त) भूषण गोखले, माजी आमदार डॉ. मेधा कुलकर्णी, शिवा मंत्री चार्वी सावरकर, अजित गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष धनंजय बर्वे, रणजीत नातू, प्रविण गोखले, शैलेश काळकर, रविंद्र ढवळीकर, अमेय कुंटे यांनी संयोजन केले.  पोंक्षे म्हणाले, ‘सावरकरांनी जातीवाद संपविण्यासाठी केलेले कार्य महत्त्वाचे आहे. ज्या ज्या वेळी जातीयवाद वाढतो, त्या त्या वेळी विविध संघटना तो संपविण्यासाठी पुढे येतात. मी सावरकर संस्थेने केलेला सकल हिंदू सामुदायिक व्रतबंध हे जातीयवाद वाद संपविण्यासाठी उचललेले पहिले पाऊल आहे. ज्या दिवशी समाजातील जातीभेद नष्ट होईल तो देशासाठी सर्वोत्तम दिवस असेल. त्यासाठी समविचारी संस्थांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे.’ संस्थेचे अध्यक्ष बर्वे म्हणाले, ‘पूर्वी हिंदू संस्कृतीत काही विशिष्ट समाजामध्येच व्रतबंध हा संस्कार केला जायचा. परंतु स्वा. सावरकरांनी सामाजिक समानतेचा पुरस्कार करुन काही सामाजिक सुधारणा घडवून आणण्यास सुरुवात केली. त्यांनी जातीभेदांना छेद देत सकल हिंदू समाजाकरीता मंदिरे उभारली आणि सर्व समाजातील मुलांच्या मुंजी ही लावल्या. त्याच धर्तीवर आज व्रतबंधाचा सामुदायिक कार्यक्रम आयोजित केला होता.’आज सकाळी पारंपरिक पद्धतीने व्रतबंधाचे सर्व विधी पार पडले. दुपारी भोजन आणि संगिताचा कार्यक्रम आयोजित केला होता. संध्याकाळी कार्यालयापासून म्हात्रे पुलाजवळील महादेव मंदिरापर्यंत भिक्षावळ यात्रा काढण्यात आली. तिथे सर्व बटूंना मोहनबुवा रामदासी यांच्याद्वारे भिक्षा देण्यात आली.