मुंबई, दि. 30 : पुस्तक समीक्षक आरशाचे काम करतात. पुस्तक परीक्षणामुळे वाचकांची संख्या वाढते तसेच लेखकालादेखील लिखाणातील त्रुटी दिसून येते. परीक्षणाअभावी चांगली पुस्तकेदेखील दुर्लक्षित राहतात. त्यामुळे साहित्य प्रचार-प्रसारामध्ये पुस्तक समीक्षकांचे काम महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागातील वरिष्ठ प्राध्यापक करुणाशंकर उपाध्याय लिखित ‘कथा साहित्य का पुनर्पाठ’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते नुकतेच राजभवन मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
अकॅडेमिस्तान, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून आयोजित प्रकाशन सोहळ्याला समाज सेविका सुमिता सुमन सिंह, अकॅडेमिस्तानचे संस्थापक दीपक मुकादम, वीरेंद्र याज्ञिक व ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते.
मराठी, हिंदी, बंगाली यांसह भारतीय भाषांमध्ये एकापेक्षा एक सरस साहित्य कृती निर्माण झाल्या आहेत. मराठी वृत्तपत्रे पुस्तक साहित्य परीक्षणाला विशेष महत्त्व देतात. अनेक महिला समीक्षकदेखील मराठी वृत्तपत्रांमध्ये पुस्तक परीक्षणे लिहिताना दिसतात. त्या तुलनेत हिंदी वृत्तपत्रांमध्ये पुस्तक परीक्षणे कमी असतात असे मत नोंदवताना परीक्षणामुळे वाचकांमध्ये पुस्तक वाचनाची इच्छा जागृत होते असे राज्यपालांनी सांगितले. नुकताच गीतांजली श्री यांच्या ‘रेत समाधी’ या कादंबरीला साहित्य जगतातील प्रतिष्ठेचे बुकर पारितोषिक मिळाले हा सर्व भारतीय भाषांचा सन्मान असल्याचे राज्यपालांनी सांगितले. .
भारतात शास्त्रीय तसेच साहित्यिक समीक्षा – मीमांसेची एक मोठी परंपरा आहे. समीक्षक व टीकाकारांमुळेच साहित्य कृतींकडे वाचक व समाजाचे लक्ष जाते. समीक्षक लेखकाच्या साहित्यातील सारगर्भित अर्थ दर्शवतो, असे सांगताना ‘कथा साहित्य का पुनर्पाठ’ नेमके हेच कार्य करीत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
भारतात उच्च कोटीचे साहित्य निर्माण होते. परंतु त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर समीक्षा होत नाही. भारतीय भाषांमधील पुस्तकांचा वेळेवर इंग्रजी भाषेत अनुवाद झाला तर आपल्या अनेक साहित्य कृतींना नोबेल पारितोषिक मिळेल असे मत लेखक डॉ. करुणाशंकर उपाध्याय यांनी व्यक्त केले.
देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना लिहिलेल्या या पुस्तकात सन १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर सुरु झालेल्या हिंदी पुनर्जागरणापासून समकालीन लेखक व कादंबरीकार यांच्या लिखाणाचे विश्लेषण करण्यात आले आहे, असे उपाध्याय यांनी सांगितले.
मुंबई, दि. 30 : ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेंतर्गत कोरोना महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना मदत केली जाते. प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपस्थितीत केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरूगन यांच्या हस्ते या योजनेअंतर्गत दिलेल्या लाभाचे सर्व कागदपत्रांचे किट या मुलांना वितरित करण्यात आले.
मुंबई शहर जिल्ह्यातील कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत दिलेल्या लाभाचे कागदपत्र वितरित करण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार मनिषा कायंदे तसेच दोन्ही पालक गमावलेली बालके उपस्थित होते.
वलखमा फातमा आमिर आलम मिर्झा या बालिकेने जानेवारी २०२२ मध्ये १८ वर्ष पूर्ण केली असून या बालिकेसह मुंबई शहर जिल्ह्यातील १८ अनाथ बालके अशी एकूण १९ बालके जिल्हाधिकारी कार्यालयातून सहभागी झाली.
या किटमध्ये पी एम केअर फॉर चिल्ड्रेन या योजनेबाबत थोडक्यात माहिती, या योजनेचे पासबुक, जनआरोग्य कार्ड, प्रधानमंत्री यांचे या मुलांना पत्र तसेच बालकाचे पीएम केअर प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे.
केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरूगन म्हणाले, मुलांची सर्वसमावेशक काळजी आणि संरक्षण यासाठी शाश्वत पद्धतीने राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करणे, शिक्षण आणि शिष्यवृत्तीद्वारे त्यांना सक्षम बनवणे, वयाची 23 वर्षे पूर्ण झाल्यावर 10 लाख रुपये आर्थिक सहाय्य पुरवून स्वयंपूर्ण अस्तित्वासाठी सुसज्ज बनवणे आणि आरोग्य विम्याद्वारे त्यांचे निरामय आरोग्य सुनिश्चित करणे यासाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रेन ही योजना आहे,असेही राज्यमंत्री एल. मुरूगन यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. राजीव निवतकर यांनी यावेळी प्रत्येक बालकांशी संवाद साधला.
या कार्यक्रमास बाल कल्याण समितीचे अध्यक्ष मिलिंद बिडवई, बाल न्याय मंडळाच्या सदस्या उर्मिला जाधव, सविता रंधे, युनिसेफच्या अल्फा व्होरा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मुंबई शहर, शोभा शेलार व प्र. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सविता ठोसर उपस्थित होते.
मुंबई -माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपटांच्या 17 व्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे (MIFF-2022) आज, 29 मे, 2022 रोजी मुंबईतील नेहरू सेंटर, वरळी येथे रंगतदार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उदघाटन झाले.
हा महोत्सव पहिल्यांदाच ऑनलाइन स्वरूपात सादर होत असून ऑनलाइन आणि प्रत्यक्ष अशा मिश्र स्वरूपात रसिकांना त्याचा आनंद घेता येईल. चित्रपट प्रेमींना स्पर्धा आणि प्रिझम श्रेणीतले चित्रपट त्यांच्या वैयक्तिक संगणकांवर पाहता येतील ऑनलाइन नोंदणी सर्वांसाठी विनाशुल्क आहे.
मिफ्फ महोत्सवात बांग्लादेशची ‘‘कंट्री ऑफ फोकस’ म्हणून निवड, समीक्षकांनी गौरवलेल्या ‘हसीना-अ डॉटर्स टेल’ या चित्रपटाचाही या पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे.
ज्येष्ठ माहितीपट निर्माते आणि सुप्रसिद्ध सिनेलेखक संजीत नार्वेकर यांना यंदाचा ‘डॉ व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
ज्येष्ठ माहितीपट निर्माते आणि सुप्रसिद्ध सिनेलेखक संजीत नार्वेकर यांना यंदाचा ‘डॉ व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून सिनेसृष्टीत त्यांनी दिलेले योगदान, विशेषतः चित्रपटांचा इतिहास आणि माहितीपट निर्मिती चळवळीविषयी त्यांनी केलेल्या रंजक लिखाणाबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांनी सिनेमा विषयाशी संबंधित 20 पेक्षा अधिक पुस्तकं लिहिली आणि संपादित केली आहेत. त्यांच्या “मराठी सिनेमा इन रेट्रॉस्पेक्ट’ सुवर्णकमळ पुरस्कारही मिळाला आहे.
माहितीपट आणि अॅनिमेशन उद्योग विकसित करण्याची भारतात प्रचंड क्षमता आणि कलागुण – पीयूष गोयल
भारतात अॅनिमेशन पटांचा उद्योग विकसित करण्याची प्रचंड क्षमता आहे, आपल्याकडे या क्षेत्रातले अनेक गुणवंत कलाकार आहे, त्यामुळे आपण भविष्यात या चित्रपट निर्मितीकडे लक्ष द्यायला हवे, यातून देशातल्या युवकांच्या कलागुणांना वाव मिळेल, तसेच मोठ्या रोजगारनिर्मितीलाही वाव मिळेल. असं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यावेळी म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी लता दीदी आणि व्ही शांताराम यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांच्या कथाकथनात प्रेक्षकांना मुख्य प्रवाहातील चित्रपटांइतकेच गुंतवून ठेवण्याची क्षमता आहे .माहितीपटांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याकडे काही प्रस्ताव आहेत आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी, त्यांना वाणिज्यिक आणि व्यापारी दृष्टीने चालना देण्याच्या दृष्टीने विविध मंत्रालयांना एकत्र आणून सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहेत, असं गोयल यांनी सांगितले.
माहितीपट – संस्कृती आणि सीमांच्या पलीकडे जाण्याचे साधन – अनुराग ठाकूर
“माहितीपटांचा प्रभाव मोठा असून समाजात बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणा देण्यासोबतच संस्कृती आणि सीमा ओलांडणारे ते एक साधन असल्याचे, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, अनुराग ठाकूर यांनी महोत्सवादरम्यान एका व्हिडिओ संदेशात सांगितले. जगभरातील माहितीपट, लघुपट आणि ऍनिमेशनपट निर्मात्यांना परस्परांना भेटण्यासाठी, विचार जाणून घेण्यासाठी सहनिर्मिती, विपणन याबाबतच्या संधींची माहिती जाणून घेण्यासाठी आणि जागतिक चित्रपटांचा आवाका समजून आपला दृष्टिकोन अधिक व्यापक करण्याची संधी हा मंच पुरवत असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी झाल्याबद्दल अनुराग ठाकूर यांनी पीयूष गोयल,इतर सर्व मंत्री आणि चित्रपट निर्माते शाजी करुण जी यांचे आभार मानले. काही कारणांनं या महोत्सवाला प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ एल. मुरुगन, यांनी आपल्या भाषणात, मराठीत उपस्थितांचे स्वागत करत प्रेक्षकांची दाद मिळवली. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि डॉ आंबेडकर यांच्या या भूमीत हा महोत्सव होत असल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला.
भारतीय सिनेमा जागतिक पातळीवर लोकप्रिय करण्यासाठी भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. कान चित्रपट महोत्सवात यंदा भारतीय सिनेमाचा विशेष गौरव झाल्याचं त्यांनी सांगितलं. शौनक सेन यांच्या ‘ऑल दॅट ब्रीदस’ या चित्रपटाला कानमध्ये सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार मिळाल्याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे, असे ते म्हणाले, भारतात चित्रपट निर्मिती करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते, माहितीपट, अॅनिमेशन पट निर्माते, वेबसिरिज निर्माते यांच्यासाठी असलेल्या विशेष सवलती आणि योजनांची त्यांनी माहिती दिली. सिनेमा निर्मिती अधिक सुलभ करण्याचं आपला प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.
मिफ्फ, आशियातील सर्वात जुना नॉन फिचर चित्रपट महोत्सव असून या महोत्सवाने चित्रपटप्रेमींसाठी भारतातील गावे आणि शहरांसोबतच जगभरातल्या विविध भागातल्या चित्रपटकलेची उत्कृष्टता सादर केली आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पंचायत राज राज्यमंत्री, कपिल मोरेश्वर पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड हे या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. मुंबई ही चित्रपटसृष्टीची राजधानी आहे, असं राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. सिनेमा हे समाजातल्या सर्व स्तरातील लोकांचं प्रतिनिधित्व करणारं प्रभावी माध्यम आहे, असं ते म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि डॉ. भागवत कराड यांनीही महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. चित्रपटातून मिळणारा संदेश समाजासाठी महत्वाचा असतो अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
ज्यूरी सदस्यांचा सत्कार :
सतराव्या मिफ्फच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटांसाठी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या सर्व मान्यवर ज्यूरी सदस्यांचा यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्पर्धा स्तरावरील चित्रपट परीक्षकांमध्ये भारत आणि परदेशातील नामवंत व्यक्तींचा समावेश आहे.आंतरराष्ट्रीय परीक्षक सदस्यांमध्ये एस. नालामुथू, अनंत विजय, मीना रॅड (फ्रान्स),जॉन पिएर सेरा (फ्रान्स),डॅन वॉलमन (इस्राएल) यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय परीक्षक सदस्यांमध्ये संजीत नार्वेकर (भारत), सुभाष सेहगल (भारत), जयश्री भट्टाचार्य (भारत),अॅश्ली रतनविभूषण तारीक एहमद (बांग्लादेश) यांचा समावेश असून सर्व परीक्षकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
मिफ्फ महोत्सवात स्पर्धा श्रेणीतल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाला दहा लाख रुपयांचे रोख पारितोषिक
सतरावा मिफ्फ अनेक अर्थांनी विशेष ठरणार आहे. या महोत्सवात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात, 119 चित्रपट दाखवले जातील, तसेच स्पर्धा क्षेत्रांत, 264 चित्रपट दाखवले जातील. महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार म्हणजे सुवर्ण शंख आणि 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल, हा पुरस्कार आशियाई क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक आहे, तर इतर पुरस्कारांमध्ये रौप्य शंख, ट्रॉफी आणि प्रमाणपत्रांसह एक लाख ते पाच लाखांपर्यंतची रोख बक्षिसे यांचा समावेश आहे. याशिवाय मिफ्फ मध्ये सर्वोत्कृष्ट छायांकन, संपादन आणि ध्वनी डिझाइन श्रेणीतले पुरस्कारही दिले जाणार आहेत. यंदा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ‘India@75’.या संकल्पनेवर आधारित लघुपटाला विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
या मिफ्फ मध्येही, विशेष पॅकेजेस, रेट्रोस्पेक्टिव्ह, होमेज, बी-टू-बी, मास्टर क्लासेस यांच्यासह विविध कार्यशाळाही आयोजित केल्या जातील.
हा महोत्सव पहिल्यांदाच ऑनलाइन स्वरूपात सादर होत असून ऑनलाइन आणि प्रत्यक्ष अशा मिश्र स्वरूपात रसिकांना त्याचा आनंद घेता येईल. चित्रपट प्रेमींना स्पर्धा आणि प्रिझम श्रेणीतले चित्रपट त्यांच्या वैयक्तिक संगणकांवर पाहता येतील ऑनलाइन नोंदणी सर्वांसाठी विनाशुल्क आहे.
18 वर्षांखालील मुलांनाही विनाशुल्क नोंदणी करता येईल. महोत्सव सुरु असेपर्यंत नोंदणी सुरू असेल . https://miff.in/. या संकेतस्थळावर वॉक-इन नोंदणी उपलब्ध. आहे.
या वर्षी प्रथमच लहान मुले मुंबई अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग असणार आहेत.
नेटफ्लिक्सची मूळ मालिका “मायटी लिटल भीम: आय लव्ह ताजमहाल” च्या भागाचा मिफ्फ 2022 मध्ये वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI )द्वारे पुनरुज्जीवित सत्यजित रे यांच्या ‘सुकुमार रे’ माहितीपटाचे विशेष प्रदर्शनही ह्या महोत्सवात होईल.
भारत आणि जपान यांनी एकत्रितपणे तयार केलेल्या ‘रामायण: द लिजेंड ऑफ प्रिन्स रामा’ या पहिल्या अॅनिमेशन चित्रपटाचे मिफ्फ मधे विशेष सादरीकरण होणार आहे. हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित होऊन यंदा 30 वर्षे पूर्ण होत आहेत.
मिफ्फ महोत्सवात बांग्लादेशची ‘‘कंट्री ऑफ फोकस’ म्हणून निवड, समीक्षकांनी गौरवलेल्या ‘हसीना-अ डॉटर्स टेल’ या चित्रपटाचाही या पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे.
ऑस्करच्या धर्तीवर या महोत्सवातही विशेष चित्रपट पॅकेजेस तयार करण्यात आली असून त्यात इटली आणि जपानमधील विशेष चित्रपट पॅकेज, इफ्फीच्या अलीकडील महोत्सवांमधील इंडियन पॅनोरमा यांचा समावेश आहे आणि हे खास चित्रपटांचे विभाग रसिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतील.
याबरोबरच म्यानमारमधील विद्यार्थ्यांचे अॅनिमेशन माहितीपट आणि ब्राझीलमधील विद्यार्थ्यांचे अॅनिमेशन चित्रपट या महोत्सवातील खास मेजवानी असेल.
मणिपूर, जपान आणि फ्रान्समधील चित्रपटांनी 17 व्या मिफ्फ महोत्सवाचा प्रारंभ
मणिपुरी माहितीपट ‘मीरम- द फायरलाईन’ (33 मिनिटे ), फ्रान्सचा अँनिमेशनपट ‘कास्टअवे’ (6 मिनिटे) आणि जपानचा, ‘शाबु शाबु स्पिरिट’ (10 मिनिटे )हा लघुपट यांनी महोत्सवाची सुरुवात झाली. यंदाच्या महोत्सवात जगभरातील 400 चित्रपट आहेत. चित्रपट महोत्सवासाठी प्रवेशिकांची सुरुवात फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झाली. यंदाच्या महोत्सवासाठी पात्र चित्रपट प्रक्रिया 1 सप्टेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत करण्यात आली.
मिफ्फचा उद्घाटन समारंभ पीआयबी इंडिया यू ट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात आले.
महोत्सवाविषयी माहिती..
मुंबईतील पेडर रोड येथील चित्रपट विभागाच्या संकुलात 04 जून 2022 पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. महोत्सव यंदा हायब्रीड मोड म्हणजे मिश्र स्वरुपात होत असून ऑनलाइन पद्धतीने सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे. (येथे नोंदणी करा https://miff.in/). युवा पिढीच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, प्रतिनिधी नोंदणी शुल्क रु. 300/- सर्व विद्यार्थ्यांसाठी माफ आहे.
1990 मध्ये सुरू झालेल्या या द्वैवार्षिक महोत्सवाचे आयोजन चित्रपट विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, करते. मिफ्फ, दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि प्रसिद्ध चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. माहितीपट, लघुपट आणि ऍनिमेशनपट या फारसा वाव न मिळणाऱ्या नॉन फिचर पटांना प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवाची सुरुवात झाली.
मुंबई- पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पियुष गोयल यांना राज्यसभेवर पुन्हा संधी देण्यात आली आहे. तिसऱ्या जागेसाठी भाजप कोणाची निवड करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.राज्यसभेच्या उमेदवारीबाबत राज्यात वातावरण तापलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 मे आहे. आता फक्त दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे.
राज्यसभेवर उमेदवारी दिल्यानंतर भाजप नेते अनिल बोंडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि जे. पी. नड्डा यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर विश्वास टाकला. त्यांचे मनापासून आभार मी मानतो. ओबीसी समाजातील माझ्यासारख्या व्यक्तीवर विश्वास टाकला. सामान्य जनता, शेतकरी, मजूरांसाठी काम करणार आहे.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्हणाले की, महाविकास आघाडीची कानउघडणी करणार आहे, मी बहुजन समाज आणि ओबीसी वर्गाची बाजू राज्यसभेत मांडणार आहे. अमरावती जिल्ह्याला कैक वर्षांनी उमेदवारी मिळाली हे संतूलन आमचे नेते देवेंद्र फडणवीसांनी साधल्याचेही ते म्हणाले.
पुणे-दलीत समाजावर विशेष करून मातंग समाजावर अन्याय अत्याचार सातत्याने होत आहेत .त्यासाठी आता कार्यकर्त्यांनी सज्ज झाले पाहिजे , दलीत समाजावर अन्याय अत्याचार झाल्यास अतिशय आक्रमकपणे कार्यकर्त्यांनी न्याय मिळण्यासाठी लढा उभारला पाहिजे असे आवाहन मातंग समाजाच्या राज्यव्यापी निर्धार परिषदेत माजी मंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे यांनी केले.
पुढे ते म्हणाले की ,राज्यात दलितांवर कुठे अन्याय झाल्यास आपण आक्रमकपणे त्याला विरोध करून, पीडितांना न्याय मिळण्यासाठी लढा दिला पाहिजे .मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेची आज निर्धार परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यानी कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन केले . निर्धार परिषदेसाठी महाराष्ट्र राज्यातील संघटनेचे जिल्हाध्यक्ष, तालुकाअध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला व युवक आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील ३ वर्षाच्या कालावधी मध्ये कोरोनाच्या महामारी मुळे संघटनेची वार्षिक बैठक होउ शकली नव्हती यामुळे निर्धार बैठकीसाठी संघटनेचे पदाधिकारी आवर्जुन उपस्थित होते.यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करते समयी रमेश बागवे यांनी संघटनेच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी एकजूट करून या पुढील काळात संघटनेचा विस्तार गावोगावी, खेडोपाडी जाऊन केला गेला पाहिजे. समाजावर जे वाढते अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी एकसंघ राहणे अत्यंत गरजेचे आहे. मातंग समाज हा राज्यातील सर्वात मोठा दोन नंबरचा लोकसंख्या असलेला समाज असून केवळ आपसातील गटामुळे व विस्कळीतपणा मुळे आपल्यावर होणारे अन्याय-अत्याचार मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जर आपण एकजूट नाही झालो तर भविष्यात समाजाला आणखी वाईट दिवस येतील. या करिता आजपासूनच विस्तारासाठी सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापल्या भागांमध्ये काम करणे काळाची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये विभाग निहाय मेळाव्याचे आयोजन करावे आम्ही सर्वजण तुम्हास आवश्यक ती मदत करण्यास व सहकार्य करण्यास सतत तयार आहोत. महिला आघाडीच्या व युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या सर्व संघटनेच्या नियम व अटींचे पालन करून संघटना बळकट करण्यासाठी हातभार लावणे तितकेच महत्त्वाचे आहे. संघटना ही आपली आई आहे आणि आपण त्याप्रमाणेच संघटनेवर प्रेम केले पाहिजे याचे भान ठेवून राज्यात काम केले पाहिजे असे कळकळीचे आव्हान माननीय बागवे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून पदाधिकाऱ्यांना उद्देशून आव्हान केले. याप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. संघटनेचे राज्याचे पदाधिकारी अशोक कांबळे ,एडवोकेट एकनाथ सुगावकर,मुख्य समन्वयक विठ्ठल थोरात, महिला आघाडीच्या ऍड. राजश्री अडसूळ, जिल्हाध्यक्ष अलका सकट, सरचिटणीस सुरेखा खंडाळे, यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली. विस्तारासाठी यापुढील काळात प्रयत्न करत असल्याचेे आश्वासन देऊन सर्व राज्यातील कार्यकर्त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या या निर्धार बैठकीमध्ये उपस्थित सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्यातील संघटनेच्या कार्यात येणाऱ्या अडीअडचणी नेतेमंडळी च्या समोर मांडण्यात आल्या उपस्थित जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांना नवीन पदाचे वाटप उपस्थित प्रमुख मान्यवर व्यक्तींच्या शुभहस्ते देण्यात आले.माननीय चंद्रकांत काळोखे, रामभाऊ वाघमारे ,शिवाजी घुले, अनिल निर्भवणे, अलका सकट , सुरेखा खंडाळे अशा एकूण 25 नविन पदाधिकाऱ्यांना नवीन पदभार देण्यात आला. बैठकीसाठी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते प्र.बा.सोनवणे, यादवराव सोनवणे प्रामुख्याने उपस्थित होते.प्रास्ताविक अरुण गायकवाड यांनी केले तर आभार संजय साठे यांनी मानले या निर्धार बैठकीसाठी राज्यातील सोशल मीडिया ची स्वतंत्र टीम तयार करून त्यांनाही नवीन पदाचे वाटप संघटनेच्या प्रमुख नेतेमंडळींच्या हस्ते देण्यात आले
कलोल– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इफकोने गुजरातेतील कलोलमध्ये उभारलेल्या, जगातील पहिल्या नॅनो युरिया लिक्विड प्लांटचे उद्घाटन केले. शेतकऱ्यांना उत्पादनक्षमता आणि उत्पन्न वाढवण्यात मदत करणे हा या प्लांटचा उद्देश आहे. ‘आत्मनिर्भर भारत‘ आणि ‘आत्मनिर्भर कृषी‘ यांच्या दिशेने खूप मोठे पाऊल उचलत, माननीय पंतप्रधानांनी हा अल्ट्रामॉडर्न नॅनो युरिया लिक्विड फर्टिलायझर प्लांट गांधीनगर, गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात राष्ट्रसेवेत समर्पित केला आहे.केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण, रसायने व खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी पंतप्रधाननरेंद्रमोदी यांनी सांगितले की जगातील पहिल्या नॅनोफर्टिलायझर प्लांटचे उद्घाटन करताना त्यांना अतिशय आनंद होत आहे. ते पुढे म्हणाले की, युरियाच्या एका पिशवीइतकी शक्ती आता शेतकऱ्यांना युरियाच्या अर्ध्या लिटर बाटलीमध्ये उपलब्ध होणार आहे, यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होईल आणि लघु शेतकऱ्यांना याचे खूप जास्त लाभ मिळतील, परिणामी ते अधिकाधिक सक्षम बनतील. श्री. मोदी असेही म्हणाले की, कलोलमध्ये इफकोच्या या अत्याधुनिक नॅनो-युरिया प्लांटमध्ये दर दिवशी १.५ लाख युरियाच्या बाटल्यांचे उत्पादन होऊ शकते आणि असे अजून आठ प्लांट्स उभारण्याची सरकारची योजना आहे. यामुळे कृषी क्षेत्रात खऱ्या अर्थाने क्रांती घडून येईल आणि युरिया आयातीवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होऊन भारतातील शेती आत्मनिर्भर बनेल.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी भारताच्या कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणेल अशा नॅनो-खताच्या उत्पादनात पुढाकार घेतल्याबद्दल इफकोच्या संपूर्ण टीमचे आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
इफकोने नॅनो खतांच्या उत्पादनासाठी आंवला, फुलपुर, कलोल (विस्तार), बेंगलोर आणि पारादीप, कांडला, देवघर (बिहार) आणि गुवाहाटी युनिट्समध्ये नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि नॅनो मायक्रो पोषक तत्त्वांच्या उत्पादनासाठी विविध ठिकाणी अतिरिक्त उत्पादन सुविधा स्थापन केल्या आहेत. या सर्व युनिट्समध्ये डिझाईन उत्पादन क्षमता दर दिवशी २ लाख बाटल्या असेल तर एकूण गुंतवणूक ३००० कोटी रुपये असणार आहे. यापैकी ७२० कोटी रुपये आधीच गुंतवण्यात आले असून यामुळे हजारो लोकांसाठी रोजगार निर्माण होईल. इफकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यु एस अवस्थी यांनी एका वॉकथ्रू व्हिडिओच्या साहाय्याने प्लांटचे कार्य आणि येथील विविध तंत्रज्ञानांची माहिती दिली. यावेळी उपस्थित असलेल्या ७००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आणि सहकाऱ्यांना एका फिल्ममध्ये इफको नॅनो युरियाचे वापर दाखवण्यात आले, ज्याची प्रेरणा मातीमध्ये युरियाचा वापर कमी करण्याच्या माननीय पंतप्रधानांच्या दृष्टिकोनातून घेण्यात आली आहे. ते म्हणाले की, ते शेतीची आधुनिक तंत्रे व पद्धती सादर करणार असल्याने नॅनो युरिया क्रांतीचे वाहन ड्रोन असणार आहे.
इफकोचेव्यवस्थापकीयसंचालकडॉ. युएसअवस्थी म्हणाले की, पिकांची पोषण गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवण्यात नॅनो युरिया लिक्विड खूप जास्त प्रभावी असल्याचे आढळून आले आहे आणि भूगर्भातील पाणी व पर्यावरणाच्या गुणवत्तेवर याचा खूप मोठा सकारात्मक परिणाम होतो आणि अशाप्रकारे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये लक्षणीय घट होते. ते म्हणाले की, इफको नॅनो युरिया लिक्विडच्या ३.६० कोटी बाटल्यांचे उत्पादन करण्यात आले आहे, त्यापैकी २.५० कोटी बाटल्या आधीच विकल्या गेल्या आहेत.
इफकोचेअध्यक्ष, श्रीदिलीपसंघाणीयांनी सांगितले, नॅनो युरिया लिक्विड हे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत ‘ आणि ‘सहकार से समृद्धी‘ या दृष्टिकोनांना अनुसरून आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड अर्थात इफकोने गेल्या वर्षीच्या सुरुवातीला जगातील पहिले इफको नॅनो युरिया (लिक्विड) प्रस्तुत केले होते जे फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर (एफसीओ, १९८५) मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. इफको नॅनो युरिया (लिक्विड) हे देशामध्ये गुजरातेत कलोल येथील इफकोच्या नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये एका प्रोप्रायटरी तंत्रज्ञानामार्फत विकसित करण्यात आले होते. कलोलमधील पहिल्या इफको नॅनो युरिया (लिक्विड) उत्पादन युनिटसाठी १७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून त्याची सध्याची उत्पादन क्षमता दर दिवशी नॅनो युरियाच्या ५०० मिलीच्या १.५ लाख बाटल्या तयार करण्याची आहे. इफकोचे नॅनो युरिया लिक्विड हे क्रांतिकारी उत्पादन असून पर्यावरणानुकूल, शाश्वत शेतीच्या दिशेने उचललेले पुढचे पाऊल आहे.
पुणे-नागरिकांच्या सहभागातून सार्वजनिक स्वच्छता राखण्याच्या अनुषंगाने प्लॉगेथॉन हा उपक्रम राबविण्यात येत असून या वर्षी “पुणे प्लॉगेथॉन २०२२ : मेगा ड्राईव्ह” चे आयोजन दिनांक ५ जून २०२२ रोजी करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे शहरातील जास्तीत जास्त नागरिक, स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था, शाळा-महाविद्यालये, उद्याने यांचा सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्याचे नियोजन घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सुरु आहे. “पुणे प्लॉगेथॉन २०२२ : मेगा ड्राईव्ह” साठी पुणे शहरातील एकूण १३४ रस्ते निश्चित करण्यात आले आहेत. त्याच बरोबर विविध टेकड्या रामनदी, पुणे शहरातील विविध नदी घाट व क्रॉनिक्स स्पॉट या ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे. अशी माहिती उपायुक्त आशा राऊत यांनी येथे दिली
सदर अभियानात पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, महाविद्यालये, NSS, NCC, पुणे जिल्हा सहकारी गृह निर्माण संस्था मर्यादित, नेहरू युवा केंद्र, समग्र नदी परिवार व अशा अनेक संस्था सहभागी होणार आहेत.
या ड्राईव्हचा प्रचार व प्रसार करण्यासाठी व या प्लॉगेथॉन ड्राईव्हमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होणेसाठी मा महापालिका आयुक्त व प्रशासक श्री विक्रमकुमार यांचे मार्गदर्शनाने पुणे महानगरपालिके मार्फत दिनांक २९ मे २०२२ रोजी जनजागृतीपर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
पुणे महानगरपालिका सायकल क्लब व पुण्यातील सायकल क्षेत्रात काम करणा-या स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीच्या माध्यमातून स्वयंस्फूर्तीने पर्यावरण, ध्वनी व वायू प्रदूषण, आरोग्य, वाहतूक नियमांचे पालन करणे, स्वच्छ सर्वेक्षण, जागतिक लोकसंख्या दिन, सायकल चालवा पर्यावरण वाचवा इ. विषयांबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली . या सायकल रॅलीच्या माध्यमातून शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार करण्यात आला . या सायकल सायकल रॅलीचा शुभारंभ मा अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ कुणाल खेमनार, डॉ रवींद्र बिनवाडे, श्री. विलास कानडे व उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन तथा समन्वयक स्वच्छ भारत अभियान,श्रीमती आशा राऊत यांच्या शुभहस्ते दिनांक २९ मे २०२२ रोजी स.७.३० वाजता करण्यात आला.. सदर रॅली पुणे महानगरपालिका मुख्य इमारत येथून सुरु होऊन मॉर्डन कॅफे – जंगली महाराज रस्ता – अलका टॉकिज –टिळक रोड – पुराम चौक – बाजीराव रस्ता – शनिवार वाडा – पुणे महानगरपालिका या मार्गे समाप्त झाला . यामध्ये 300 हून जास्त सायकलस्वार सहभागी झाले होते .
या सायकल रॅलीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले होते…या आवाहनाला उत्तम प्रतिसाद लाभला.. सर्व पुणेकर नागरिकांनी दि.५ जून २०२२ च्या प्लॉगथॉन मेगाड्राईव्ह मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले .
क्रांतीवीर स्व.सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ट्रेझरपार्क येथील सावरकर पुतळ्यास आ.माधुरी मिसाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण..!
पुणे-क्रांतीवीर स्व.विनायक दामोदर सावरकर म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक धगधगते ज्वलंत योद्धे होते.सावरकरांनी जिथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्या कोठडीला भेट दिली असता या देशभक्तांनी किती अनंत यातना सहन केल्या हे लक्षात आले आणि माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले. परंतु हल्ली सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल यांचे नाव घेतले की देशद्रोही समजले जाते. ज्यांंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अपार कष्ट घेतले त्यांना सोडून राजकारण्यांचा उदोउदो होतो, याचे अतीव दुःख होते.असे मत आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मा.नगरसेवक महेश वाबळे यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्याच संकल्पनेतून ट्रेझरपार्क येथील नाला ब्रीज येथे साकारण्यात आलेल्या सावरकरांच्या शिल्पास आ.माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मा.नगरसेवक महेश वाबळे यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्याच संकल्पनेतून ट्रेझरपार्क येथील नाला ब्रीज येथे साकारण्यात आलेल्या सावरकरांच्या शिल्पास आ.माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यानिमित्ताने त्या बोलत होत्या.यावेळी मिसाळ यांनी स्वा.सावरकरांचा सहवास लाभलेल्या भिडे काकांचे अभिनंदन केले.
आमदार माधुरी मिसाळ पुढे म्हणाल्या, भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सावरकरांचे वर्णन करताना “सावरकर म्हणजे त्याग, तर्पण, तरुणाई, त्वेश होय” असे वर्णन केले होते.अशा सावरकरांचे शिल्प नगरसेवक महेश वाबळे यांनी उभे केले याचे खूप समाधान वाटले.सावरकरांच्या आठवणी अशाच आपण आजच्या तरूणाईकडे सुपुर्द केल्या पाहिजेत.
नगरसेवक महेश वाबळे यांनी प्रास्ताविक तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.यावेळी बाबाशेठ मिसाळ (विशेष निमंत्रित भाजपा) सरस्वती शेंडगे (उपमहापौर) रघुनाथ गौडा (माजी नगरसेवक) जितेंद्र पोळेकर (पर्वती भाजपा अध्यक्ष) प्रशांत दिवेकर (संघटन सरचिटणीस) प्रशांत थोपटे (पर्वती भाजपा उपाध्यक्ष) राजाभाऊ पानगावे ,दर्शन मिरासदार (भाग कार्यवाहक पर्वती) अविनाश धुमकर (पद्मावती नगर संघ चालक) श्रीपाद जोशी (भाग व्यवस्था प्रमुख पर्वती) चंद्रशेखर कुलकर्णी (पर्वती नगर संघचालक) हरीश परदेशी, कैलास मोरे, अनिल जाधव, मंगेश शहाणे, प्रियंका कांबळे,संगीता चौरे, मालती अवघडे तसेच भाजपा कार्यकर्ते व सावरकर प्रेमी उपस्थित होते.
पुणे-स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी राजकारणाबरोबर कार्यकर्त्यांनी अन्य क्षेत्रांत संपर्क वाढवला पाहिजे,असे मत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले.
ठाकूर विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर होते. त्या वेळी सर्किट हाऊस येथे भाजपच्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत होते.
भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, प्रभारी. धीरज घाटे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सरचिटणीस गणेश घोष, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, अर्चना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ठाकूर म्हणाले, राज्यात भाजपला काम करण्यासाठी चांगली परिस्थिती आहे. कोणत्याही पदावर भाजपचा पदाधिकारी असला तरी त्याने राजकारण करीत असताना त्याने खेलासारख्या अन्य क्षेत्रात ही काम करावे, ज्यामुळे पक्षाचा पाया व्यापक होऊन जनाधार वाढण्यास मदत होईल.
मुळीक यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले, पांडे यांनी परिचय आणि सूत्रसंचालन आणि पोटे यांनी आभार मानले.
ही नाती घरात एकोप्याने नांदण्यासाठी स्वतःचे हक्काचे घर असायला हवे. असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना’ आणि ‘राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना’ केंद्र आणि राज्य शासनामार्फत ग्रामीण विकास यंत्रणा या विभागामार्फत ग्रामीण भागात राबविल्या जातात. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साधारणपणे १० हजार घरं प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत घरकूल योजनेमधून बांधण्यात आल्याने ह्या दोन्ही योजनांची यशस्वी अंमलबजावणी होताना दिसत आहे. परिणामी वस्त्या, तांड्या-पाड्यांवरची मातीची, कुडाच्या झोपड्यांचे रूपांतर आता सिमेंटी पक्क्या घरात होऊ लागले आहे. त्यामुळे ऊन वाऱ्यापासून बचाव आणि पावसाळ्यात विंचू सापाच्या दंशाची शक्यता कमी झाली आहे. असं सुरक्षित हक्काचं छप्पर
शासनाच्या आवास योजनेतून मिळत असल्याने माणसाची निवारा ही मूलभूत गरज पूर्ण होत आहे. असा प्रकारे सर्वासाठी घरे २०२२ या शासनाच्या धोरणाचा हेतू साध्य होत आहे.
ग्रामीण भागासाठी अनेक वर्षांपासून आवास योजना सुरू आहे. टप्याटप्याने या योजनांमध्ये सकारात्मक बदल होत गेले. सामाजिक वंचित घटक आणि आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबाचा सर्व्हे करून पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. चार टप्प्यात १ लाख २० हजाराची रक्कम घराच्या बांधणीसाठी अनुदान स्वरुपात दिली जातो. शिवाय शौचालय उभारणीसाठी प्रोत्साहनपर १२ हजार रुपयांचे अनुदान व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत मजुरीच्या रूपाने साधारण रुपये वीस हजार रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केला जातो. ही योजना जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ या पाच तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागात राबवली जात आहे.
जिल्हाच्या ग्रामीण भागात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 2016-17 ते 2020-21 अंतर्गत 6720 उद्दिष्ट प्राप्त झाले असून, त्यामध्ये 6696 लाभार्थी मंजूर झाले आहेत. त्यापैकी 6362 घरे पूर्ण झाली आहेत. तसेच आवास प्लस अंतर्गत 2821 लक्षांक प्राप्त झाले, त्यापैकी 1596 लाभार्थी मंजूर झाले, उर्वरित 1225 मंजूरी प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. राज्य पुरस्कृत आदिम आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजना अंतर्गत 2016-17 ते 2021-22 4716 लक्षांक प्राप्त झाले, त्यातून 4242 मंजूर झाले असून 3289 घरे पूर्ण झाली आहेत. उर्वरित ९५३ घरे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहेत.
या केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनांना गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ कालावधीत महा आवास अभियान राबविण्यात आले. या अभियानाची जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेने ग्रामीण भागात यशस्वी अंमलबजावणी केल्याने प्रधानमंत्री आवास योजनेच्या ‘सर्वोत्कृष्ट जिल्हा’ या पुरस्कार गटात जिल्हा परिषदेला ‘तिसरा’ तर ‘सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत’ या पुरस्कार गटात ‘भिवंडी तालुक्यातील ‘चिचवली ग्रामपंचायतीस प्रथम’ पुरस्कार जाहीर झाला. विशेष म्हणजे या अभियान काळात पहिल्या टप्प्यात ३९ भूमिहीन कुटुंबाला हक्काची जागाही उपलब्ध करून देण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात १५ भूमीहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा चालू आहे. या अभियान काळात डेमो हाऊस, घरकुल मार्टची उभारणी तसेच लाभार्थ्यांचे मेळावे आयोजित करून अभियानाबाबत जागृतीही करण्यात आली. त्याचबरोबर प्रत्येक घराच्या भिंतीवर वारली चित्र रेखाटण्यात आली. तर काही गावांमधील घरांच्या भींती एकसारख्या रंगाने रंगविण्यात आल्या.
आवास योजना गतिमान करून गरिबांच्या घराची स्वप्नपूर्ती व्हावी म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे आणि त्यांची टीम अहोरात्र मेहनत घेत आहे. सातत्याने क्षेत्रभेटी करून कामांना गती देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत घरकूल योजनांमुळे आमच्या कुटूंबाना सुरक्षित आणि हक्काचे घर मिळाल्याची भावना नागरिक व्यक्त करतात.
कोल्हापूर, 29 मे 2022 : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित व डीवाय पाटील पुरस्कृत 16व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात कोल्हापूरच्या आश्विन नरसिंघानी, प्रद्युम्न तोमर, अवनीश चाफळे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश केला.
कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम पात्रता फेरीत कोल्हापूरच्या बिगरमानांकीत आश्विन नरसिंघानी याने अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवता तामिळनाडूच्या अव्वल मानांकित जी बालासुर्याचा 6-2, 3-6, 7-6(6) असा पराभव करून आजचा दिवस गाजवला. महाराष्ट्राच्या प्रद्युम्न तोमरने गुजरातच्या तिसऱ्या मानांकित अक्षज सुब्रमणियनचा 6-2, 6-1 असा सहज पराभव करून मुख्य फेरी गाठली. बाराव्या मानांकित पुद्दुचेरीच्या प्रणव सर्वनकुमार याने राजस्थानच्या सहाव्या मानांकित अमित मूदचा 6-2, 7-6(5) असा तर, महाराष्ट्राच्या अवनीश चाफळेने तेलंगणाच्या सातव्या मानांकित लोकेश राहुलचा 6-4, 3-6, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.
मुलींच्या गटात मध्यप्रदेशच्या सोळाव्या मानांकित पेहल खराडकर हिने कर्नाटकाच्या दुसऱ्या मानांकित साई जानवी टीचा 6-4, 7-5 असा पराभव करून आगेकुच केली. स्पर्धेची मुख्य ड्रॉची मानांकन यादी आज जाहीर करण्यात आली असून त्यात मुलींच्या गटात उत्तराखंडच्या नियती कुकरेतीला अव्वल मानांकन देण्यात आले. तर कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधव दुसरे, तर कर्नाटकच्या श्रीनिधी बालाजीला तिसरे मानांकन देण्यात आले. मुलांच्या गटात कर्नाटकच्या क्रिश त्यागीला अग्रमानांकन देण्यात आले. स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुली: अंतिम पात्रता फेरी: आदिती भट(कर्नाटक)[1] वि.वि.दिया मलिक(तेलंगणा)[9]6-1, 6-1; पेहल खराडकर(मध्यप्रदेश)[16]वि.वि.साई जानवी टी(कर्नाटक)[2]6-4, 7-5; प्रिशा शिंदे(महा)[10] वि.वि.जीडी मेघना(कर्नाटक) 7-5, 6-3;दिया रमेश(तामिळनाडू)[15] वि.वि.रिद्धी शिंदे(महा)6-1, 6-3;आरुषी रावळ(गुजरात)[5]वि.वि.सविता भुवनेश्वरन(तामिळनाडू)[12] 7-5, 6-4; सौम्या रोंडे(तेलंगणा)[6] वि.वि.मेहक कपूर(महा)[14]6-2, 6-1; अमोदीनी नाईक(कर्नाटक)[7]वि.वि.आनंदी भुतडा(महा)[11] 6-0, 6-1; रिशीथा बासिरेड्डी(तेलंगणा)[8]वि.वि.डेनिका फर्नांडो(महा)[15]6-2, 6-1;
पुणे, 29 मे 2022: एसेस टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एनरझरलचे निखिल राव प्रायोजित पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पीएमडीटीए एसेस करंडक पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत सचिन देसरडा, अमित किंडो, सुर्यप्रताप निंबाळकर, राहुल कोठारी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. एसेस टेनिस अकादमी, उंड्री या ठिकाणी आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत पुरुष एकेरीत सचिन देसरडा याने सातव्या मानांकित वरुण जाधवचा 6-3 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. अव्वल मानांकित सुर्यप्रताप निंबाळकरने पंकज बोरीकरचा 6-3 असा तर, तिसऱ्या मानांकित अभिषेक चव्हाणने नरेंद्र पवारचा 6-2 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी: पुरुष: सुर्यप्रताप निंबाळकर[1] वि.वि.पंकज बोरीकर 6-3;अमित किंडो[5] वि.वि.पार्थ मोहापात्रा 6-2;सचिन देसरडा वि.वि.वरुण जाधव[7] 6-3;राहुल कोठारी[4] वि.वि.निखिल भगत 6-0;अभिषेक चव्हाण[3] वि.वि.नरेंद्र पवार 6-2;रवी कोठारी[6]वि.वि.समीर मंसुरी 6-4;अमन रथाईथ[8]वि.वि.रोहन नाईक 7-6(7-4);रतीश रितूसरिया वि.वि.विकास चौधरी 6-3.
हवेली तालुक्यातील पेठ ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
पुणे दि.२९: गावाचा विकास अधिक गतीने होण्यासाठी तयार करण्यात आलेली पेठ ग्रामपंचायतीची नूतन इमारत गावाच्या वैभवात भर घालणारी आहे. पेठ ग्रामपंचायत नूतन इमारतीच्या माध्यमातून गावाच्या विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
हवेली तालुक्यातील पेठ ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार शेवाळे, सरपंच सुरज चौधरी, उपसरपंच जयश्री चौधरी, प्रदीप गारटकर उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, पेठ ग्रामपंचायत इमारतीत बसणारे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व गरजूंची व नागरिकांची सर्व कामे त्वरित करावी. ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न आवश्यक आहेत. शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामपंचायत हे महत्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणाहून लोकाभिमुख,पारदर्शक, प्रामाणिक व सचोटीने काम करावे. गावच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कोरोना, अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटाचा सामना करत राज्यातील विकासकामांना गती देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या विविध योजना तसेच जिल्हा वार्षिक योजना, जिल्हा परिषदेच्या योजना,आमदार निधीच्या माध्यमातून गतीने विकासकामे सुरू आहेत. शहरी भागासोबतच ग्रामीण भागाचा समतोल विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पुणे जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले.
पेठ गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मान्सूनचे आगमन वेळेत होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे, त्यादृष्टीने खरीपाची तयारी करून ठेवावी. शेतकऱ्यांना खते, बियाणे कमी पडणार नाहीत, त्याबाबतचे काटेकोर नियोजन केल्याचे सांगून पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या पीक कर्ज योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सरपंच सुरज चौधरी यांनी प्रास्ताविक केले.पेठ गावातील विकासकामाबाबत त्यांनी माहिती दिली
यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, विस्तार अधिकारी दत्तात्रय म्हेत्रे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
जनकल्याण बहुउद््देशीय फाऊंडेशन पुणे तर्फे सोलापूर भूषण, पुणे रत्न पुरस्कार वितरण सोहळा
पुणे : संगीत, कला, साहित्य, सामाजिक क्षेत्रात अनेक कर्तृत्ववान लोक कार्यरत आहेत. त्यांचा सन्मान समाजातील विविध स्तरांतून होतो, हे महत्वाचे आहे. सामाजिक विकास व उन्नतीचे कार्य करणारे हे गुणवंत आपल्या ध्येयवादी कृतीशीलतेने समाजाचे सांस्कृतिक व सामाजिक आरोग्य राखतात, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
जनकल्याण बहुउद्देशीय फाऊंडेशन पुणे तर्फे पद्मावती जवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाटयगृहात सोलापूर भूषण व पुणे रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, इंडस सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज इंडियाचे सीईओ अजित वाळे पाटील, चेतना जाठवडेकर, अॅड.शार्दुल जाधवर, फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व माजी अप्पर पोलीस अधिक्षक शहाजीराव पाटील, अभय ऐतवडेकर आदी उपस्थित होते. संस्थेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सोलापूर भूषण पुरस्काराने ग्लोबल टिचर पुरस्कारप्राप्त रणजितसिंह डिसले, शिल्पा फलफले, रोहित साठे, सोनाली कदम, सचिन कदम, सचिन चव्हाण, महेश भोरे, अभिनेत्री निता देव, काशिनाथ भतगुणकी, विजयसिंह चव्हाण, ज्ञानेश्वर भोसले यांना गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, शिंदेशाही पगडी, एस.पीज फूडतर्फे खाद्यपदार्थांची भेटवस्तू, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.
पुण्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या लिज्जत पापडचे सुरेश कोते, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या राहिबाई पोपरे, रुक्मीणी भोसले, मृदुला काळे, युवा अभिनेते आशुतोष पाटील, सिनेनाटय लेखिका माहेश्वरी पाटील चाकुरकर, सिनेनाटय निर्माते अविनाश कोलते, सौंदर्यवती स्वाती हणमघर, विनायक देव, ममता तायडे, सिनेनाटय क्षेत्रातील प्रितम पाटील, स्वप्ना कुलकर्णी-राठोड, वसंत जगताप, कीर्तनकार ह.भ.प. नेहा साळेकर, चेरी टूर्सच्या संस्थापिका अर्चना नवघरे यांना पुणे रत्न कार्यवैभव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी, एस.पीज फूडतर्फे खाद्यपदार्थांची भेटवस्तू, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे होते.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, पुरस्कार दिल्यानेच प्रत्येकजण काम करतो असे नाही. मात्र, सामाजिक ॠण व्यक्त करणा-यांना सन्मानीत करणे आपले कर्तव्य आहे. सुख-दु:खाच्या धाग्याने महावस्त्र तयार होत असते. तेच पांघरुन प्रत्येकजण स्वत:साठी आणि काहीजण समाजासाठी कार्य करतात, त्यांचे कौतुक होणे गरजेचे आहे.
शहाजीराव पाटील म्हणाले, शून्यातून कष्ट करुन आज जे स्वत:च्या पायावर उभे आहेत. त्यांना प्रकाशझोतात आणून त्यांच्या कार्याला चालना देण्याकरीता हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो. पुरस्कार वितरणासोबतच महाराष्ट्रभर गाजत असलेला मराठमोळा वाद्यवृंद – गर्जा सुवर्ण महाराष्ट्र हा सांस्कृतिक कार्यक्रम देखील उत्साहात पार पडल्याचे त्यांनी सांगितले. फाऊंडेशनच्या शोभा पाटील, सुशिला निंबाळकर, भाऊसाहेब निंबाळकर, प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, अॅड.शार्दुल जाधवर, सचिन पाटील, सुरेखा जाधवर, केशरनानी घाडगे, शैलेंद्र पाटील आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले. निनाद काळे यांनी सूत्रसंचालन केले.
चंदिगड-‘ज्यांना आपली मुले डॉक्टर, इंजिनिअर, वकील व्हावेत असे वाटते त्यांनी आमच्यासोबत यावे. पण, ज्यांना आपली मुले गुंड, दंगेखोर बनवायची आहेत त्यांनी भाजपसोबत जावे.’ असे जाहीर आवाहन आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी हरियाणामधील कुरुक्षेत्र येथे बोलताना केले .
आपची पहिली रॅली ‘आता बदलेल हरियाणा’ रविवारी कुरुक्षेत्रात झाली. त्यात केजरीवालांनी भाजपला 2024 ची विधानसभा निवडणूक विद्यमान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नावाने लढण्याचे आव्हान दिले. भाजप निवडणुकीपूर्वीच खट्टर यांची हकालपट्टी करणार असल्याची गोष्ट एका पत्रकाराने मला सांगितल्याचे ते म्हणाले.
माझ्या मुलाने गुंडगिरी केली तर त्यालाही सोडणार नाही
अरविंद केजरीवाल म्हणाले -‘हरियाणाला मोफत वीज पाहिजे असेल तर सरकार बदलावी लागेल. पंजाबमध्ये आमच्या आरोग्य मंत्र्याने पैसे मागितले होते. दुसरा एखादा पक्ष असता तर पैसे पार्टी फंडात जमा केले असते. पण, आम्ही त्या मंत्र्याला तुरुंगात पाठवले. त्याला निलंबित केले. दिल्लीतही माझा मंत्री स्वस्त धान्य दुकानदारांकडून पैसे मागत होता. कुणालाही माहिती नव्हते. पण, मी माझ्या मंत्र्याला सीबीआयच्या ताब्यात दिले. उद्या माझ्या मुलानेही बदमाशी केली तर मी त्यालाही सोडणार नाही.’
‘भ्रष्टाचाराच्या मार्गाने कमावलेला पैसा दिल्लीपर्यंत जातो. त्यामुळे आजवर एकाही पक्षाने आपल्या मंत्र्यावर कारवाई केली नाही. त्याला तुरुंगात पाठवले नाही. याऊलट आम्ही दिल्ली व पंजाबमधील भ्रष्टाचार बंद करवून दाखविला आहे. तसेच जनतेलाही नगर परिषद निवडणुकीत आपली ताकद दाखवण्याचे आवाहन केले आहे. नगर परिषदही आम्ही झाडूने स्वच्छ करू. त्यानंतर 2024 मध्ये संपूर्ण हरियाणात भ्रष्टाचार हद्दपार करू,’ असेही केरजीवाल यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांनी भाजपचा अहंकार मोडला केजरीवाल म्हणाले -‘हरियाणा व पंजाबच्या शेतकऱ्यांनी केंद्रातील अहंकारी सरकारला झुकवले. त्यांनी सलग वर्षभर आंदोलन केले. उन्हा-पावसातही मैदान सोडले नाही. त्रेता युगात प्रभू रामचंद्रांनी रावणाचे, द्वापर युगात कृष्णाने कंसाचे व कलयुगात शेतकऱ्यांनी भाजपच्या अहंकाराचे वस्त्रहरण केले आहे. आम्ही शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो.’
ते म्हणाले -‘मी सर्वसाधारण तरुण आहे. मला काम करता येते. माझ्याकडून कितीही काम करवून घ्या. दिल्लीच्या सरकारी शाळा शानदार झाल्यात. 4 लाख मुलांनी खासगी शाळेतून सरकारी शाळेत प्रवेश घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात आले होते. त्यांच्या पत्नीनेही आमच्या शाळांना भेट दिली होती.’
केजरीवाल म्हणाले -‘भाजपात दंगेखोर, लफंगे व बलात्काऱ्यांचा भरणा आहे. ते दंगलखोरांचा सन्मान करतात. काही गुंडांनी माझ्या घरावरही हल्ला केला होता. त्यांनी त्या गुंडांचा सन्मान केला. उत्तर प्रदेशात त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांवर गाडी चढविली व मोठ-मोठे वकील उभे केले. देशात कुठेही बलात्कार झाला तर त्यांचे कार्यकर्ते त्यांचा सत्कार करण्यासाठी पोहोचतात.’
‘भाजप नेते स्वतःच्या मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवतात. तर तुमच्या मुलांना दंगल घडवण्याचे प्रशिक्षण देतात. हरियाणातही सर्वच पेपर लीक होतात. पोलिस भरती, एचएसएससी, पटवारी, टीजीटी भरती, डेंटल सर्जन भरतीचे पेपर लीक झाले. मुख्यमंत्री खट्टर यांना साधा एक पेपर घेता येत नाही ते सरकार काय चालवणार. गुजरातमध्येही पेपर लीक झाले. तिथेही भाजपचे सरकार आहे. पेपल लीक होण्याप्रकरणी भाजपचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दिले पाहिजे,’ असेही केजरीवाल यावेळी भाजपवरील हल्ला अधिक तिखट करताना म्हणाले.