योगासन, सायकलिंग, वेटलिफ्टिंग, कुस्तीत दाखवली चमक
पंचकुला, ५-
खेलो इंडिया स्पर्धेत तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या संघाने योगासनात ५ सुवर्ण पदके पटकावली. वेटलिफ्टिंगमध्येही २ मुली आणि एका मुलाने सुवर्ण मिळवले. सायकलिंगमध्येही सुवर्ण कामगिरी झाली. अशी एकूण ९ सुवर्ण पदके मिळाली. योगा (१), सायकलिंग (२) आणि कुस्तीत (१) अशी चार रौप्य पदके तर दोन कुस्तीत कांस्य पदके मुलींनी जिंकली दिली.
ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राने विविध क्रीडा प्रकारांत पदकांची लयलूट केली. सर्वाधिक पदके योगासनात मिळाली. त्यात ५ सुवर्ण आणि एक रौप्य पदकाचा समावेश आहे. पारंपरिक योगा प्रकारात सुमित भंडारे (सुवर्ण, संगमनेर), आर्टिस्टिक पीअरमध्ये – वैदेही मयेकर व युगांका राजम (सुवर्ण), आर्टिस्टिक पीअर मुले – आर्यन खरात व निबोध पाटील (सुवर्ण), रिदमिक योगा – नानक अभंग व अंश मयेकर (सुवर्ण), मुली – स्वरा गुजर व गीता शिंदे (सुवर्ण). पारंपरिक योगा – तन्वी रेडीज (रौप्य).
वेटलिफ्टिंगमध्ये सांगलीच्या काजल सलगरने सुवर्ण पदक पटकावले. याच क्रीडा प्रकारात नंतर सायंकाळी उशिरा दोन पदके मिळाली. ५५ किलोमध्ये -मुकुंद आहेर (सुवर्ण), ४५ किलो वजनगट- हर्षदा गरूड (सुवर्ण)
सायकलिंगमध्ये टाईम ट्रायलमध्ये संज्ञा कोकाटे (सुवर्ण), स्क्रॅच रेसमध्ये पूजा दानोळेस (रौप्य), टीम स्प्रिंटमध्ये आदिती डोंगरे, पूजा दानोळे व संज्ञा कोकाटे (रौप्य).
कुस्तीमध्ये एक रौप्य पदक मिळाले तर दोन कांस्य पदके आली. ४६ किलो वजन गटात – गौरी पाटील (कोल्हापूर) व ५७ किलो वजन गटात धनश्री फंड (अहमदनगर) यांनी कांस्य पदके पटकावली. तर ५७ किलो वजनगटात प्रगती गायकवाड हिने रौप्य पदकावर नाव कोरले. तिचा सुवर्ण पदकासाठीची लढत हरियानाच्या ज्योतीसोबत झाली. मुलांमध्ये गौरव हजारे, ओंकार शिंदे, समृध्दी घोरपडे, साक्षी पाटील यांनीही चमकदार खेळ केला. परंतु त्यांना पदकापर्यंत पोचता आले नाही.
khelo india महाराष्ट्राला तिसऱ्या दिवशी ९ सुवर्ण, ४ रौप्य व २ कांस्य पदके
२६९ कोटी ३४ लक्ष रुपयांच्या स्वराज्य रक्षक संभाजी महाराज स्मारक विकास आराखड्यास मान्यता
जिल्ह्यातील ३३ कोटी ५७ लक्ष रुपयांच्या अष्टविनायक विकास आराखड्यास मान्यता
पुणे दि.५- जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासाकामात शिक्षण, आरोग्य आणि रस्ते विकासावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन पुणे येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ३३ कोटी ५७ लक्ष रुपयांच्या अष्टविनाय विकास आराखड्यास आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे तुळापूर येथील स्मारक आणि वढू बुद्रुक येथील समाधीस्थळाच्या २६९ कोटी ३४ लक्ष रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली.
बैठकीस राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
श्री.पवार म्हणाले, सामाजिक उत्तरदायित्व निधी, जिल्हा परिषद आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून २६ कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व तालुक्यात आवश्यक तेथे अंगणवाडी बांधकाम करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये चांगल्या शैक्षणिक सुविधा देण्यात येत आहेत. रस्ते विकासालाही गती देण्यात येणार आहे.
अष्टविनायक विकासासाठी अंदाजपत्रकात २५ कोटी तरतूद करण्यात आले असून पुरवणी मागण्यातही अधिक निधी देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. परिसर विकास करताना मंदिराचे मूळ स्वरूप आणि सौंदर्य कायम राहावे याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. सर्व कामे मंदिर व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याने त्यांनी यासाठी सहकार्य करावे.
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काम सुंदर आणि भव्य होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. स्मारक आणि समधीस्थळाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेता वाहनतळाचे योग्य नियोजन करावे, लोकप्रतिनिधींनी याबाबत सूचना केल्यास त्यांचाही अंतर्भाव करण्यात येईल, असे श्री.पवार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी गतवर्षी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत झालेला खर्च, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ विकास आराखड्याबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची आणि अष्टविनायक परिसर विकास आराखड्याची माहिती दिली.२०२१-२१ या वर्षात जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत १०० टक्के , अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत ९९.६९ आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ९९.९२ टक्के खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीस आमदार महादेव जानकर, अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, अशोक पवार, भीमराव तापकीर, संजय जगताप, सुनील शेळके, माधुरी मिसाळ, राहुल कुल, संग्राम थोपटे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, राजेश पाटील, पीएमआरडीएचे सुहास दिवसे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक आयोगाने साजरा केला जागतिक पर्यावरण दिवस
नवी दिल्ली -निवडणूक आयुक्त श्री. अनुप चंद्रा पांडे यांनी आज जागतिक पर्यावरण दिना निमित्त भारतीय निवडणूक आयोगाचे महासचिव श्री. उमेश सिन्हा, महा संचालक श्री. धर्मेंद्र शर्मा यांच्यासह निवडणूक आयोगाच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर नवी दिल्ली येथील इंडिया आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन संस्थेच्या (IIIDEM) आवारात वृक्षारोपण केले. त्यांनी यावेळी एका पुस्तिकेचे प्रकाशन केले. तसेच भारतीय निवडणूक आयोग आणि राज्यांमधील निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक काळात केलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

या कार्यक्रमाला संबोधित करताना निवडणूक आयुक्त श्री अनुप चंद्रा पांडे म्हणाले, कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्निर्मिती करा हा पर्यावरण सापेक्ष निवडणूक व्यवस्थापनाचा आमचा दृष्टीकोन आहे. पर्यावरण दिवस दर वर्षी साजरा केल्याने त्याचे महत्त्व अधोरेखित होते. यंदाची पर्यावरण दिनाची संकल्पना ‘निसर्गाशी एकरूपतेने जगणे’ ही असून ‘केवळ एक पृथ्वी’ हे त्याचे समर्पक घोष वाक्य असल्याचं ते म्हणाले. भारतीय निवडणूक आयोगाने मतदात्यांची ऑनलाईन नोंदणी यासह विविध प्रक्रियांचे डीजीटायझेशन करून तसेच मतदाता हेल्पलाईन ॲप, सुविधा पोर्टल सुविधा पोर्टल, केवायसी ॲप, सी-विजील, ई-एपिक, पीओडब्ल्यूडी ॲप, मतदाता मोजणी ॲप, विविध भागाधाराकांशी संबंधित प्रक्रियेचे डिजिटलायझेशन, उमेदवारांचे ऑनलाईन नामांकन, एकदाच वापराच्या प्लास्टिकचा वापर टाळणे, कचरा व्यवस्थापन यासारख्या उपक्रमांमधून पर्यावरण पूरक पद्धतीने निवडणुका सुनिश्चित केल्याचं ते म्हणाले.

भारतीय निवडणूक आयोगाने राज्यांमधील निवडणूक अधिकाऱ्यांना प्लास्टिक आणि अन्य घन कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत सरकारने अधिसूचित केलेल्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यांनी सरकारी नियमानुसार फ्लेक्स, पत्रके, पिशव्या आणि अन्य प्रसिद्धी साहित्याची काळजी घ्यावी, आणि एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचे निर्देश दिले आहेत.

खुलताबाद तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य द्या- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
औरंगाबाद, दिनांक 05 : कृषि, आरोग्य, रोजगार हमी अशा विविध विभागांच्या योजनांचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे. याशिवाय कोविड काळात विधवा झालेल्या एकल महिलांना रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण देऊन, बालकांना सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळवून द्यावा. अशा प्रकारे शासनाच्या विविध योजनेच्या लाभातून सर्वांगीण विकास साध्य करावा अशा सूचना खुलताबाद तालुका प्रशासनास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
खुलताबाद तहसील कार्यालयात तालुक्यातील विकास कामांचा आढावा डॉ.गोऱ्हे यांनी घेतला. या बैठकीस उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार किरण देशमुख,तालुका आरोग्य अधिकारी डॉ किरण शिंदे, गट विकास अधिकारी श्री सुरडकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी सविता बिक्कड, यांच्यासह महिला पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.
उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी नैसर्गिक आपत्ती संदर्भात उपाय योजना, मॉन्सून पूर्व तयारी, अन्नधान्य पुरवठा, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत, रोजगार हमी योजना, तालुक्याला आवश्यक निधी, महिला दक्षता समिती आदींचा आढावा घेतला. सामान्यांच्या विकासासाठी शासनाचे विविध विभाग चांगले काम करत आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमातून महिला, बालक आणि शेतकरी यांना सर्व लाभ मिळवून द्यावेत, खुलताबाद तालुक्यातील उभारी 2.0 अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना त्यांच्या नावावर सातबारा करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असून, कोविड मध्ये ज्या महिला विधवा झाल्या आहेत त्यांच्या नावावर ही शेती अथवा मालमत्ता हस्तांतरण करण्याची प्रक्रिया जलद राबवावी, अशी सूचनाही डॉ.गोऱ्हे यांनी अधिकाऱ्यांना केली.
कोविडने पती गमावलेल्या विधवा महिलांना बी-बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा कृषी विभागाने आयोजित कराव्यात. सानुग्रह अनुदान, महिला आर्थिक विकास महामंडळ,याबरोबरच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मौलाना आझाद विकास, महामंडळाच्या कर्ज योजनांचा महिलांना लाभ मिळवून द्यावा. त्याचबरोबर कोविडमुळे जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा.बोगस बियाणे उत्पादन केलेल्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे निर्देश कृषि अधिकारी यांना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.
कोविड कालावधीत पालक गमावलेले पाल्य, कोविड काळातील लसीकरण नियोजन, सद्यस्थितीत करत असलेल्या उपाययोजना, मॉन्सून पूर्व तयारी, मुख्यमंत्री पाणंद रस्ते, पाणी पुरवठा योजना, कृषी आदींसह विभागाच्या विविध योजना आणि कामांचा त्यांनी सविस्तर आढावा डॉ .गोऱ्हे यांनी घेतला. बैठकीनंतर विविध प्रकारचे निवेदन स्वीकारून प्रलंबित विकास कामाबाबत सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना अंमलबजावणीबाबत सूचना नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
सावित्रीबाई फुले स्मारक आणि जलतरण तलावासाठी विद्यापीठाला १० कोटी रुपयांचा निधी-उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे दि.५- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी आणि जलतरण तलावासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील पै. खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील पॅव्हेलिअन इमारत, इनडोबर हॉल आणि अद्ययावत सिंथेटीक ट्रॅकच्या उद्घानप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.कारभारी काळे, प्र-कुलगुरु डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षणाचे संचालक डॉ. दीपक माने, क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, बालेवाडी परिसरात उत्तम क्रीडा सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठातदेखील अद्ययावत क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. राज्यातल्या कुठल्याही भागात समाजाच्या हितासाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी शासन भक्कमपणे पाठीशी उभे राहील. डेक्कन कॉलेज आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्माकरकासाठीदेखील सहकार्य करण्यात येईल.

खेळाडूंना पायाभूत सुविधा आणि प्रोत्साहन देण्याची गरज
पुढच्या पिढीला अभिमान वाटेल असे विद्यापीठ घडविण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून करावा. आपल्या युवा पिढीत मोठी क्षमता आहे. खेळाडुंच्या क्षमतेला वाव देताना पायाभूत सुविधा निर्माण करून देत प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विद्यापीठाला कुठलीही समस्या असल्यास ती सोडविण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. खेळाडुंवर भार न टाकता क्रीडा संकुलाची देखभाल करण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या बाबतीत आपलेपणाच्या भावनेने सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवून काम करावे, प्रत्येक विद्यार्थी आपला असल्याची भावना अधिकारी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी दाखवावी, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.
ते पुढे म्हणाले , पै.खाशाबा जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन करून यशाची प्रेरणा सर्वांना दिली. देशाला कुस्तीतले पहिले कांस्य पदक मिळवून दिले. स्वामी विवेकानंदांनी आपल्या विचार आणि कार्याने जगाला प्रभावीत केले. त्यांचे विद्यापीठात उभारण्यात आलेले पुतळे मानवतेसाठी कार्य करण्याची आणि यशाची प्रेरणा विद्यार्थ्यांना देतील असे त्यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग काही शहरात वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.
पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा देताना ते म्हणाले, जागतिक तापमान वाढीमुळे जगावर परिणाम होत असताना पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, ही काळाची गरज आहे. एक दिवस पर्यावरणाचा विचार न करता ३६५ दिवस आपल्यापरिने पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यायला हवे.
श्री.सामंत म्हणाले, पुण्याच्या शैक्षणिक पंढरीत अपूर्ण शिक्षण प्रकल्प पूर्ण करून पुण्याला देशपातळीवर लौकीक वाढविण्याचा प्रयत्न आहे. राज्याच्या विद्यार्थ्याला सक्षम करणारे शिक्षण विद्यापीठात मिळायला हवे यासाठी विद्यापीठ आणि शासनाला मिळून काम करावे लागेल. काश्मिरी पंडीतांच्या मुलांना शिक्षणासाठी राखीव जागा ठेवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानासाठी १३ कोटी ३३ लाख रुपये मंजूर करण्याात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा संकुलाच्या जलतरण तलाव आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक उभारण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ.काळे म्हणाले, सावित्रीबाई फुले विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करीत अनेक बहुमान प्राप्त केले. विद्यापीठाने अनेक आंतरराष्ट्रीय सामंज्यस्य करार करून आपला विस्तार केला आहे. देशपातळीवर विद्यापीठ १८ व्या स्थानी आहे. २७ एकर मध्ये उभारलेल्या क्रीडा संकुलामुळे क्रीडा क्षेत्रात विद्यापीठाचा नावलौकीक देशपातळीवर पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्री.पांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. क्रीडा संकुलाचा परिपूर्ण वापर करण्यासाठी विद्यापीठ लवकरच धोरण ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमापूर्वी श्री.पवार आणि श्री.सामंत यांनी स्वामी विवेकानंद आणि खाशाबा जाधव यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. त्यांनी यावेळी सिंथेटिक पथ, व्यायामशाळा आणि शुटींग रेंजची पाहणी करुन माहिती घेतली. शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या युवक-युवतींनी मर्दानी खेळ दांडपट्टा, लाठीकाठी आणि तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर केले. खेलो इंडिया स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मल्लखांबच्या खेळाडूंनी मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर केले. मंत्रीद्वयांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

अशा आहेत विद्यापीठातील नव्या क्रीडा सुविधा
क्रीडा संकुलामध्ये बहुउद्देशीय क्रीडा प्रकारांसाठी इनडोअर सभागृह तयार करण्यात आला आहे. यामध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, ज्युदो, कराटे, नेटबॉल, टेबल टेनिस, कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक्स असे विविध क्रीडा प्रकार खेळता येणार आहेत.
क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक व पॅव्हेलियन इमारत तयार करण्यात आली आहे. त्याच्या मध्यभागी फुटबॉल क्रीडांगण तयार करण्यात आले असून यासाठी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान (रुसा) अंतर्गत रुपये ४ कोटीचे अनुदान प्राप्त झाले व उर्वरित खर्च विद्यापीठाने केला आहे. या अद्ययावत सिंथेटिक पथचा खेळाडूंना लाभ होणार आहे.
भारताने 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य निर्धारित वेळेच्या 5 महिने आधीच पूर्ण केले
देशाची ऊर्जा सुरक्षा वाढवण्यासाठी, इंधनाच्या आयतीवरचे अवलंबित्त्व कमी करण्यासाठी, परदेशी चलन वाचवण्यासाठी, पर्यावरणाबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि देशाच्या कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी भारत सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रमाचा प्रचार करत आहे. सरकारने 2018 मध्ये अधिसूचित केलेल्या ‘जैव इंधनावरील राष्ट्रीय धोरणामध्ये 2030 सालापर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे सूचक लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. तरीही, 2014 पासून सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे झालेली उत्साहवर्धक कामगिरी लक्षात घेता 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य वर्ष 2030 ऐवजी 2025-26 मधेच पूर्ण होणार आहे.
माननीय पंतप्रधानांनी जून 2021 मध्ये प्रकाशित केलेल्या “भारतामधील इथेनॉल मिश्रणाचा मार्ग 2020-25” मध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे ध्येय गाठ्ण्यासाठीचा मार्ग तपशीलवार मांडण्यात आला होता.
मात्र, सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) केलेल्या समन्वयीत प्रयत्नांमुळे 10% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट नोव्हेंबर, 2022 या नियोजित वेळेच्या खूप आधी पूर्ण झाले आहे, यानुसार सार्वजनिक क्षेत्रातल्या ओएमसी नी देशभर पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
गेल्या 8 महिन्यांमधील या उद्दिष्ट पूर्तीने केवळ भारताची ऊर्जा सुरक्षा वाढवली नाही, तर 41,500 कोटी पेक्षा जास्त परदेशी चलनाच्या स्वरुपात त्याचा लाभ झाला, हरित वायु उत्सार्जानामध्ये (GHG) 27 मेट्रिक टन घट झाली तर शेतकर्यांना 40,600 कोटी रुपये खर्चाची रक्कम प्रदान करण्यात आली.
सरकारने केलेल्या या सर्व उपाययोजनांमुळे ईबीपी कार्यक्रम 2025-26 पर्यंत 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठण्याच्या मार्गावर आहे.
निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. 5- वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण सर्वजण मिळून ही जबाबदारी पार पाडूया, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपायोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान 2.0’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा सन्मान जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, सदस्य सचिव अशोक शिनगारे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, पर्यावरणात प्रत्येक घटक महत्वाचा आहे. आपण सर्वजण एक टीम आहोत आणि सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर कोणताही उपक्रम कसा यशस्वी होऊ शकतो याचे ‘माझी वसुंधरा अभियान’ हे उत्तम उदाहरण आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य यात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. विकास हा झालाच पाहिजे परंतु तो पर्यावरणाची जपणूक करून शाश्वततेकडे जाणारा असणे आवश्यक आहे. मागील काही वर्षांत कमी दिवसांत अधिक पाऊस पडतोय, दरडी कोसळत आहेत यामुळे होणाऱ्या हानीपासून पुढील पिढीचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राज्य शासनाने प्रत्यक्ष पावले उचलली आहेत. त्यानुसार वसुंधरेची जपणूक करण्याचा आपला जुना संस्कार नव्याने रूजविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
मुख्यमंत्री म्हणाले, विकास कशाला म्हणावे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपण निसर्ग आणि त्यातील वन्यजीव जपत पुढे आलो आहोत, यांची उपयुक्तता लक्षात घेता हा वारसा पुढे नेण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली. झाडांपासून मिळणाऱ्या प्राणवायूची निकड कोविड काळात सर्वाधिक जाणवल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईसारखी समृद्ध वन्य जीवसृष्टी असलेले शहर जगात अन्यत्र कुठेही नाही याचा उल्लेख करून पर्यावरण रक्षणासाठी आज होत असलेल्या कामांची फळे कदाचित आता दिसणार नाही, तथापि पुढच्या पिढीला याचा निश्चित लाभ होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. निसर्गाची हाक ऐकण्याची वेळ आली आहे, माझी वसुंधरा अभियान हे असेच आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारे अभियान असल्याचे त्यांनी सांगितले. या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकसहभाग महत्त्वाचा– अजित पवार

कोणत्याही उपक्रमात लोकसहभाग अंतर्भूत असला की त्यात यश नक्कीच मिळते, असे सांगून उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासाठी यापुढे 200 कोटी रूपयांचा निधी दिला जाईल, असे जाहीर केले. या माध्यमातून माझी वसुंधरा अभियानाद्वारे पर्यावरण रक्षणासाठी काटेकोर उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
राज्यात पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून एसटी महामंडळाअंतर्गत टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रीक वाहने घेण्यात येणार असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले. याची सुरूवात नुकतीच करण्यात आली आहे. वातावरणीय बदलांमुळे अनेक संकटे येत आहेत, याबाबत सर्वांनीच दक्षता घेण्याची वेळ आली आहे. प्रसारमाध्यमांनी देखील याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या मनावर पर्यावरणपूरक बाबी बिंबविण्यासाठी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावा असेही ते म्हणाले. माझी वसुंधरा 2.0 अंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या संस्था आणि अधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना पंचतत्वाच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा असावी या उद्देशाने यापुढे त्यांच्या प्रत्येक कामासाठी गुण देऊन उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सत्कार करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण आणि पर्यटन हे दोन्ही विभाग उत्कृष्ट काम करीत असल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.
स्वच्छता ही संस्कृती बनावी– बाळासाहेब थोरात

स्वच्छता, माझी वसुंधरा हे अभियान ही केवळ रोज राबविण्याची बाब नाही तर ती जनमानसात रूजून आपली संस्कृती बनली पाहिजे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. मागील दोन वर्षांच्या कठीण काळात सर्वच अधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागात केलेल्या उत्कृष्ट कामाचे मोजमाप करता येणार नाही. पर्यावरण दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा सन्मान होत आहे ही आनंदाची बाब असून अशाच इतरही चांगल्या कामाची जाणीव सर्वांना झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पर्यावरण, पर्यटन या विभागांमध्ये चांगली कामे होत असल्याचे सांगून त्यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले. पुढील वर्षी पारितोषिकांचा हा कार्यक्रम यापेक्षाही मोठ्या स्वरूपात घ्यावा, असे ते म्हणाले.
‘इज ऑफ लिव्हिंग’साठी काम करायचे आहे– आदित्य ठाकरे

पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करतानाच शाश्वत विकास साधून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी काम करायचे आहे, असे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनोगताद्वारे व्यक्त केले. ग्रीन ग्रोथ हे केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर रोजगार निर्मिती आणि आर्थिक चक्र गतिशील राहण्यासाठी देखील आवश्यक असल्याचे ते म्हणाले. माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पंचतत्वाच्या रक्षणासाठी काम होत आहे. याकामामध्ये मंत्रिमंडळापासून गाव पातळीपर्यंत सर्वांचे पाठबळ आणि सहकार्य लाभल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
नुकत्याच डावोस येथे झालेल्या परिषदेत गुंतवणुकीबरोबरच शाश्वततेवर भर दिला जात होता, हा जागतिक पातळीवर होत असलेला मोठा बदल असून राज्याच्या इलेक्ट्रीक वाहन धोरणाबाबत कौतुकाने बोलले जात असल्याचा अनुभव प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती देऊन यामुळे देशाला प्रगतीची मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात नवी दिशा दाखवणारे काम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकाद्वारे प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी माझी वसुंधरा अभियानाच्या दोन टप्प्यांची माहिती देऊन या अभियानाच्या वाटचालीचा आढावा घेतला. एबीपी माझा चे संपादक राजीव खांडेकर यांनी राज्यात पर्यावरणाबाबत होत असलेली जागृती कौतुकास्पद असून हे काम देशाला दिशादर्शक असल्याचे सांगितले. सकाळ चे संपादक सम्राट फडणीस यांनी या अभियानाला माध्यमांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर, टाइम्स ऑफ इंडियाचे पार्थ सिन्हा यांनी देखील यावेळी बोलताना मानवाला राहण्यासाठी एकच पृथ्वी अस्तित्वात असल्याने तिला जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले.
माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत विविध पातळ्यांवर उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि अधिकाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये अमृत शहरांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त अभिजित बांगर, उत्कृष्ट विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे, उत्कृष्ट जिल्हाधिकारी पातळीवरील पुरस्कार राहुल रेखावार, कोल्हापूर, उत्कृष्ट जिल्हा परिषद पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि आशिष येरेकर, अहमदनगर आदींसह विविध संस्था आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी शालेय शिक्षणामध्ये प्रगतीसाठी शासन आणि सीईडब्ल्यू तसेच युनिसेफ यांच्यादरम्यान सामंजस्य कराराची देवाणघेवाण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय भुस्कुटे यांनी केले.
संस्कारित नागरिकांच्या संख्येवर ठरतो बलशाली देश-अॅड.प्रशांत यादव
पुणे : सैनिक देशाचे आणि देशांच्या सिमांचे रक्षण करतात, त्यांचे कार्य अतुलनीय आहे. मात्र, कोणता देश बलशाली आहे, हे केवळ सैनिकांच्या शक्तीवर नाही. तर, त्या देशातील संस्कारित नागरिकांच्या संख्येवर ठरते. गुणवत्ता असलेल्या नागरिकांची संख्या ज्या देशात असते, तो देश ख-या अर्थाने शक्तीशाली असतो. भारतात संस्कार वर्गांच्या माध्यमातून संस्कारित नागरिक घडविण्याचे काम उत्तमपणे सुरु असल्याचे मत रा.स्व. संघाच्या कसबा भागाचे संघप्रमुख अॅड.प्रशांत यादव यांनी व्यक्त केले.
श्रुतीसागर आश्रम फुलगांव पुणे संचलित कसबा संस्कार केंद्राच्या ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त कसबा पेठेतील श्री नामदेव शिंपी दैव मंदिर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट, माजी नगरसेवक योगेश समेळ, कल्पना जाधव, अॅड.प्रताप परदेशी, शिरीष मोहिते, डॉ.मिलिंद भोई, कुमार रेणुसे, राजू परदेशी, अरविंद कोठारी, केंद्राचे प्रमुख संयोजक अनिल दिवाणजी, अनघा दिवाणजी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात कसबा कार्य गौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व साईनाथ मंडळ ट्रस्ट बुधवार पेठचे अध्यक्ष पीयुष शाह, कसबा गौरव पुरस्कार अष्टपैलू कलाकार वैष्णवी पाटोळे, राष्ट्रीय खेळाडू सार्थक चव्हाण यांना आणि बाल गौरव पुरस्कार सिने नाटय बालअभिनेता शर्व दाते यांना प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. केंद्राचे संस्थापक अध्यक्ष प.पू.स्वामी स्वरुपानंद सरस्वती (फुलगांव) यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
अॅड.प्रशांत यादव म्हणाले, संस्काराचे पंख घेऊन माणूस जन्माला येत नाही. त्याला आई-वडिलांकडून संस्कार मिळतात. तपश्चर्येने प्रत्येक माणूस देवत्वाकडे पोहचू शकतो. त्याची सुरुवात संस्कार वर्गांतून होत असते. ख-या अर्थाने माणसातील संस्कारदीप प्रज्वलित करण्याचे काम संस्कार वर्ग करीत आहेत. स्वरदा बापट म्हणाल्या, आजकाल मोबाईल, टिव्ही शिवाय लहान मुले जेवण देखील करीत नाहीत. तेव्हा अशा संस्कार केंद्राचे महत्व व जबाबदारी वाढत आहे. सर्वत्र सोशल मीडियाचा दुष्परिणाम वाढत असून लहान मुलांना चांगले नागरिक बनविणा-या संस्कार केंद्रामध्ये वाढ व्हायला हवी.
पुरस्काराला उत्तर देताना पीयुष शाह म्हणाले, मुलांच्या हातात मोबाईल आल्याने काळ बदलला आहे. त्यामुळे संस्कारांसोबतच गुड टच बॅड टच सारख्या संकल्पना मुलांना समजावून सांगायला हव्यात. पालकांनी मुलांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास वेळ देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी चैत्राली सरमहाले, मयुरेश कथवटे, समिधा चव्हाण, यश कुलकर्णी, तन्वी कुलकर्णी, ईश्वरी वनारसे, वज्रा जगताप, शिवाजंली हिरेमठ यांनी विविध स्पर्धांमध्ये सर्वाधिक बक्षिसे मिळविण्याचा मान मिळविला.
कार्यक्रमाचे आयोजन अनिल दिवाणजी, वसुधा वडके, अनघा दिवाणजी, सुप्रिया कुलकर्णी, सारिका पाटणकर, समृद्धी प्रभुणे, तेजश्री कडू, शिल्पा पिंगळे यांनी केले. संस्कार वर्गातील विविध उपक्रमांना जयश्री प्रभुणे, संगिता ठकार, बसवराज कलादगी, पूर्वा ढोले, आर्या परदेशी, दिव्या राऊत, समिक्षा सोनवणे, तनिष्का सोनवणे, रुपेश कुलकर्णी, जयेश वडके, अथर्व सरमहाले आदी उपस्थित होते.
समाज व शासनाकडून परिचारिका नेहमी उपेक्षित-ज्येष्ठ साहित्यिक डॉ.न.म.जोशी
महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनतर्फे परिचारिका जीवनगौरव सन्मान
पुणे : परिचारिका हा सेवेचा सर्वोच्च प्रकार असला, तरी देखील समाज व शासन यांच्याकडून परिचारिका नेहमीच उपेक्षित राहते. कोविड काळात परिचारिकांनी स्वत:च्या जीवावर उदार होऊन काम केले. त्यामुळे त्यांना सन्मान व प्रतिष्ठा मिळवून देणे हे आपले कर्तव्य असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.न.म.जोशी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनतर्फे ससून रुग्णालयात आयोजित परिचारिका जीवनगौरव सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. राज्य कर्मचारी संघटनेचे लढाऊ नेते नारायण जोशी, असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ.सुमन टिळेकर, पांडुरंग म्हस्के, सविता देवकर, प्रियांका जाधव, अनिल मोरे, संदीप लंगडे आदी यावेळी उपस्थित होते.
ससूनमधील निवृत्त अधिपरिचारिका आशा जोशी यांनी त्यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त संस्थेला दिलेल्या देणगीतून पुणे जिल्ह्यातील ६० परिचारिकांना कोविड काळात केलेल्या अद्वितीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सेवेचा आनंद आणि कमाईचे समाधान हे दोन्ही परिचारिका क्षेत्रात मिळते. त्यामुळे तरुण स्त्रियांनी परिचारिका क्षेत्र निवडावे, असे मत परिचारिका संघटनेच्या मार्गदर्शिका आशा जोशी यांनी व्यक्त केले.
भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली की त्याचा राजकीय एन्काऊंटर ;पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांचे हेच झाले
औरंगाबाद -भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली की त्याचा राजकीय एन्काऊंटर केला जातो. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांचे हेच झाले. मात्र भाजपाने इतर उमेदवारांना तिकीट देण्याऐवजी पंकजा मुंडे या चांगल्या उमेदवार असल्याचे सांगत विधान परिषदचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भाजपला चिमटा काढला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेची तयारी पूर्ण झाली असून त्याला मोठा प्रतिसाद मिळणार असल्याचा दावा त्यांनी रविवारी औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी गोऱ्हे यांनी औरंगाबादला ठाकरे सरकारच्या काळात कसा निधी दिला आहे, त्याचा पाढा वाचवून दाखवला. यावेळी विनोद घोसाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, अशोक पटवर्धन, रेणूकदास वैद्य यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मराठवाडा आणि औरंगाबादने कायम शिवसेनेवर प्रेम केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलतात हे लोकांना ऐकायचे आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण विषय असो अथवा अनेक विषयवार मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. तसेच औरंगाबाद नामकरण बाबतच्या प्रस्तावबाबत भाजपची ती जुनीच सवय असल्याचे सांगत मराठी भाषेच्या बाबतीतही सातत्याने प्रस्ताव पाठवून त्यामध्ये दोष दाखवत प्रस्ताव परत पाठवल्याचे त्यांनी सांगितले.
ती त्यांची जुनीच सवय असल्याचे सांगत त्यांनी भाजपला टोला लगावला. तसेच राज्यसभेत भाजपने कितीही ताकद लावली तरी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
पाणी प्रश्नावरून शिवसेनेची कोंडी करणाऱ्या भाजपने केलेल्या टीके विषयी विचारचताच गोऱ्हे म्हणाल्या, औरंगाबाद आणि येथील जनेतेचे शिवसेनेशी वेगळे नाते आहे. या शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शिवसेनेने सातत्याने प्रयत्न केले आहे. त्यासाठी कधीही निधीची कमतरता पडू दिली नाही.
मलनिस्सारण, रस्ते आणि पाण्यासाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही. एवढेच नाही तर मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे मुख्य ठिकाण आणि या लढ्याचे साक्षीदार असलेले शहर म्हणून इथे मराठवाडा मुक्ती संग्रहालय उभारण्यात आले. नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही म्हणून पाणीपट्टी ५० टक्क्याने कमी करत दिलासा दिला. मुबलक पाणी मिळावे यासाठी देखील सरकार, महापालिका युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.
समांतर योजेनेला विरोध केला नसता तर आज पाणीप्रश्न मिटला असता. तेव्हा योजनेला विरोध केला, ती बंद पाडली आणि आता मोर्चा काढतायेत, असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या सभेत या सदंर्भात सविस्तर सांगतिलच. संभाजीनगरचा विषय आमच्यासाठी आजचा नाही, तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यावर इतरांना राजकारण करायचे असेल ते करू द्या.
माहिती -तंत्रज्ञान क्षेत्रात दृष्टीहीनांना संधी:युवती परिषदेतील परिसंवादात करीयर संधींवर चर्चा
पुणे :’ दृष्टी नसली तरी माहिती -तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुतांशी मेन स्ट्रीम टेस्टींग, अॅक्सेसिबिलीटी,प्रोग्रामिंग, संगणक प्रशिक्षण कामांमध्ये दृष्टिहीनांना करीयर संधी आहेत, असे प्रतिपादन माहिती -तंत्रज्ञान तज्ज्ञ श्रीनिवास चक्रवर्थुला यांनी केले.
कोरोना साथीनंतरच्या काळात विविध करीयर संधींचा शोध घेऊन सक्षम होण्यासाठी राष्ट्रीय दृष्टिहीन संघ (नॅशनल फेडरेशन फॉर ब्लाइंड, महाराष्ट्र) च्या वतीने नॅशनल फेडरेशन फॉर ब्लाइंड, इंडिया ‘ च्या सहकार्याने’ आयोजित इन्स्पिरेशन 2022 ‘ या राष्ट्रीय युवती परिषदेचे उद्घाटन दि.४ जून रोजी सकाळी आळंदी येथे झाले. ‘ डेअर टू रिशेप द वर्ल्ड ‘ या संकल्पनेवर ही परिषद झाली.
४ आणि ५ जून रोजी आळंदीत धारिवाल सभागृह ( फ्रूटवाला धर्मशाळा , आळंदी देवाची)येथे ही परिषद पार पडली. विविध राज्यातून दृष्टिहीन युवती उपस्थित होत्या.परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच जून रोजी नवीन शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली .त्यात डॉ कुसुमलता मलिक यांनी मार्गदर्शन केले. ‘ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील करियर संधी ‘ विषयावरील कार्यशाळेत श्रीनिवासु चक्रवरथुला यांनी मार्गदर्शन केले.
श्रीनिवासु चक्रवरथुला म्हणाले, ‘माहिती -तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याची आवड असली पाहिजे, आणि सातत्यपूर्ण कामाची तयारी, चौकटीबाहेर काम करण्याची तयारी असली पाहिजे. दृष्टी असलेल्या व्यक्तींचाही विचार करता आला पाहिजे. कॉल सेंटरमधील कामातही दृष्टीहीन व्यक्तींना वाव आहे. प्रॉडक्ट मॅनेजर म्हणूनही काम करता येते.
कौशल्ये प्रशिक्षणात आपण इतके प्रवीण व्हावे, की दृष्टीहीन आहे, म्हणून कोणालाही रोजगार नाकारता येऊ नये, असे प्रतिपादन राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या प्रवक्त्या सकिना बेदी यांनी केले.
‘ कार्पोरेट क्षेत्रातील वैविध्य आणि सहभाग ‘ या विषयावरील चर्चासत्रात नीरज कुमार, रजनी विनोद , डॉ.सोनम कापसे, सोभना जय माधवन सहभागी झाले. दत्तात्रय जाधव, एचएल. चाफेकर उपस्थित होते.
‘कायदेशीर हक्क ‘ विषयावरील परिसंवादात डॉ.संजय जैन ,ऍड .जयना कोठारी, अंचल भतेजा, डॉ. जया सागडे सहभागी झाले. डॉ जया सागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण परिषदेचा समारोप झाला.
पुण्यातील १०१ गणेशोत्सव मंडळे उभारणार स्वराज्यगुढी
गणेशोत्सव मंडळ तेथे शिवस्वराज्य दिन सोहळा
पुणे : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमता : पुण्यातील तब्बल १०१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन सार्वजनिक शिवस्वराज्य दिन म्हणजेच ६ जून शिवराज्याभिषेक दिन साजरा करणार आहेत. प्रत्येक मंडळाशी निगडीत असलेले कार्यकर्ते आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती गणेशोत्सव मंडळ तिथे शिवस्वराज्य दिन सोहळ्याचे प्रवर्तक तसेच शिवजयंती महोत्सव समितीचे आद्यप्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, छत्रपती राजाराम मंडळ, बाबू गेनु मंडळ, जिलब्या मारुती मंडळ, साईनाथ मंडळ ट्रस्ट, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शनी मारुती बाल गणेश मित्र मंडळ, खजिना विहीर मंडळ, निंबाळकर तालीम मंडळ, सेवा मित्र मंडळ यांसह पुण्यातील १०१ मंडळे हा सोहळा साजरा करणार आहेत.
अमित गायकवाड म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच ६ जून १६७४ हा दिवस भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. शिवरायांनी स्वत:चा शक म्हणजेच शिवशक प्रारंभ करुन राजदंड हाती घेत सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम पवित्र सुवर्ण कलश रयतेच्या झोळी मध्ये रिता करुन रयतेची झोळी सुखसमृध्दी, स्वातंत्र्य, समता, समाधानाने भरली.
त्यामुळेच ६ जून शिवस्वराज्य दिन विश्वव्यापी होण्यासाठी आम्ही ६ जून २०१३ पासून भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, शहरात, राज्यात तसेच देशविदेशात उभारुन साजरा करत आहोत. शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंच स्वराज्य चिन्हांनी अलंकृत भगवा स्वराज्यध्वज आम्ही निर्माण केला. भविष्यात महाराष्ट्रातीलच नव्हे तर विश्वभरातील गणेशोत्सव मंडळे यात सहभागी करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
राजकारण विसरून संजय राऊतांनी म्हटले , फडणवीसांच्या तब्बेतीला लवकर आराम पडो…
मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील राजकीय मतभेद विसरून देवेंद्र फडणवीसांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ‘काळजी घ्या. आपल्या प्रकृतीस लवकरात लवकर आराम पडो! जय महाराष्ट्र!’ असं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.“माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी गृह विलगीकरणात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करोनासंबंधित औषधं आणि उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात जे कुणी आले असाल, त्यांनी आपली करोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांनी काळजी घ्यावी”, असं ट्वीट फडणवीसांनी केल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देत ते लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली आहे. फडणवीसांची ट्वीटर पोस्ट पाहून राऊत यांनी दिलेल्या रिप्लाय ला एकाने ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. अमोल नावाच्या कुणी तरी त्यांना असे म्हटले आहे कि, तुम्ही पण काळजी घ्या ED तुम्हाला पकडून घेऊन जाईल …जय मोदीजी ..
दरम्यान चित्रा वाघ आणि असंख्य जणांनी गेट वेल सून सर, लवकर बरे व्हा सारख्या पोस्ट रिप्लाय म्हणून केल्या आहेत . भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी देखील ट्वीट करत फडणवीसांसाठी सदिच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, “आपण काळजी घ्या आणि करोनातून लवकर बरे व्हा! महाराष्ट्रातील तमाम जनतेचं प्रेम आणि सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत. आपण लवकरच बरे होऊन पुन्हा जनसेवेच्या कार्यात रुजू व्हाल असा आम्हाला विश्वास आहे.” त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनीही फडणवीसांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली असून आमच्या प्रार्थना तुमच्यासोबत आहेत, असं म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा कोरोनाची लागण,होम आयसोलेशनमध्ये …
मुंबई-राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. आज संध्याकाळी राज्यसभेसंदर्भातली बैठक देखील पार पडणार होती. मात्र, त्या बैठकीला फडणवीस उपस्थित राहणार नाहीत.दोन दिवसांपुर्वी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राज्यसभेबाबत फडणवीस यांची भेट घेतली होती. छगन भुजबळ, सुनील केदार, अनिल देसाई यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती.राज्यसभेसाठी येत्या 10 जूनला मतदान होणार असून, त्याआधी फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते गृहविलगीकरणात असले तरी, राज्यसभेच्या निवडणुकीला ते उपस्थित राहणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
काल फडणवीस लातूरला होते त्यांनी सोलापूर दौरा रद्द करुन मुंबईला परतले होते. फडणवीसांनी स्वत: ट्विट करत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.शुक्रवारी फडणवीस लातूर दौऱ्यावर होते त्याठिकाणाहून ते सोलापुरला देखील जाणार होते. मात्र त्यांना ताप आल्यानंतर त्यांनी तो दौरा करुन मुंबईकडे परतले होते. त्यानंतर त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांच्यावर होम आयसोलेशमध्ये उपचार सुरू आहे. यापुर्वी दुसऱ्या लाटेत देखील फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते उपचार घेत आहेत.
वृक्षारोपणासह झाडांचे संगोपन करणे अधिक गरजेचे-खासदार प्रकाश जावडेकर
लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड्सतर्फे वारजे वनउद्यानात वृक्षारोपण
पुणे : “झाडे ही आपल्याला ऑक्सिजन देणारी बँक आहे. या बँकेत प्रत्येकाने किमान सहा-सात झाडे लावून त्याचे संगोपन करत ही बँक समृद्ध करावी. पर्यावरण दिनाच्या उत्सवात सर्वत्र वृक्षारोपण होते. मात्र, या लावलेल्या झाडांचे संगोपन करणे अधिक गरजेचे आहे,” असे मत माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांनी केले. यापुढे ‘झाडे लावा झाडे वाढवा’ असा नारा द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड्सच्या पुढाकारातून लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ व राज्याच्या वन विभाग आणि ट्रायडंट सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने वारजे येथील वनउद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जावडेकर यांच्या हस्ते आंब्याचे झाड लावून उपक्रमाचे उद्घाटन झाले. आंबा, सागरगोटे अशी एकूण १५०० झाडे येथे लावण्यात येणार असून, त्यातील १०० झाडे रविवारी लावण्यात आली. उर्वरित झाडे जुलैमध्ये लावली जाणार आहे.
प्रसंगी लायन्स क्लबचे प्रांतपाल हेमंत नाईक, प्रधान वनसंरक्षक जीत सिंग, भाजपचे संदीप बुटाला, लायन्स क्लबचे सदस्य सतीश राजहंस, संयोजक अनिल मंद्रुपकर, किशोर मोहोळकर, सौरभ सूर्यवंशी यांच्यासह धनकवडी येथील भारती विद्यापीठ इंग्लिश हायस्कुल व किरकटवाडी येथील ज्ञानज्योती विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
प्रकाश जावडेकर म्हणाले, “वृक्षारोपण खरे तर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून व्हायला हवे. कारण त्यावेळी मातीमध्ये ओलावा असतो. झाडे लावण्याचा केवळ कार्यक्रम न होता, ती जगली आणि वाढली पाहिजेत, यावर आपण काम करावे. भविष्यात स्वच्छ ऑक्सिजन मिळावा, हवेत गारवा राहावा आणि निसर्गाचे चक्र कायम राहावे, यासाठी झाडे लावण्याची गरज आहे. शाळांमधून ‘स्कुल नर्सरी’सारखे उपक्रम प्रभावीपणे राबवायला हवेत.”
हेमंत नाईक म्हणाले, “लायन्स क्लबच्या उद्दिष्टांमध्ये पर्यावरण रक्षण महत्वाचा उपक्रम आहे. शहरी भागात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ‘अर्बन फॉरेस्ट’, देवराई ही संकल्पना राबवत आहोत. नागरिकांचा, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आणि शासनाचे पाठबळ यातून हे उपक्रम यशस्वी होतील.”
अनिल मंद्रुपकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. किशोर मोहोळकर यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली.
