पुणे-देशांतर्गत विक्रीच्या बाबतीत भारतातील चौथी सर्वात मोठी औषध कंपनी आणि आर्थिक वर्ष २०२२ साठी विक्रीच्या प्रमाणासंदर्भात दुसरी सर्वात मोठी कंपनी असलेल्या मॅनकाइंड फार्मा लिमिटेडने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (“SEBI”) कडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“DRHP”) सादर केला आहे.
कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये प्रवर्तक आणि विद्यमान गुंतवणूकदारांसह भागधारकांच्या प्रत्येकी १ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या ४०,०५८,८८४ इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर समाविष्ट आहे.
कंपनी विविध तीव्र आणि क्रॉनिक उपचारात्मक क्षेत्रांमध्ये तसेच अनेक ग्राहक आरोग्य सेवा उत्पादनांच्या विविध श्रेणीतील फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशनच्या विकसन, उत्पादन आणि विपणन करण्यात गुंतलेली आहे.
विक्रीच्या योजनेमध्ये रमेश जुनेजा यांचे ३,७०५,४४३ इक्विटी समभाग, राजीव जुनेजा यांचे ३,५०५,१४९ इक्विटी समभाग, शीतल अरोरा यांचे २,८०४,११९ इक्विटी समभाग (“एकत्रितपणे, “प्रवर्तक विक्री भागधारक”), १७,४०५,५५९ पर्यंतचे इक्विटी समभाग केर्नहिल CIPEF लिमिटेड, २,६२३,८६३ पर्यंतचे इक्विटी समभाग केर्नहिल CGPE लिमिटेड द्वारे, ९,९६४,७११ पर्यंतचे इक्विटी समभाग बेज लिमिटेड द्वारे आणि ५०,००० पर्यंतचे इक्विटी समभाग लिंक इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट द्वारे (“सामूहिकपणे “गुंतवणूकदार विक्री भागधारक”) समाविष्ट आहेत.
कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले आहे. याचा परिणाम म्हणून तिच्या भारतातील कामकाजामधील महसुलाने आर्थिक वर्ष २०२२ च्या कामकाजा मधील एकूण कमाईच्या ९७.६०% योगदान दिले जे IQVIA द्वारे ओळखल्या गेलेल्या अशाच प्रकारच्या कंपन्यांमध्ये सर्वात जास्त होते.
कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, अॅक्सीस कॅपिटल लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड, जेफ्रिज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि जे. पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
पुणे, दि. 16: राजा राममोहन रॉय यांच्या २५० वी जयंतीनिमित्त शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे मार्फत ‘महिला सक्षमीकरणावर शालेय मुलांची जनजागृती रॅली’चे २२ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
भारत सरकारने राजा राममोहन रॉय यांची जयंती देशभरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचे निश्चित केले आहे. या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून ही रॅली आयोजित करण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये पुणे शहरातील २५० शालेय विद्यार्थी- विद्यार्थीनी, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी यांच्या सहभागाने आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
रॅलीची सुरवात सकाळी १० वा. सारसबाग येथून होणार असून बाजीराव रोड मार्गे शासकीय विभागीय ग्रंथालय, न. वि. गाडगीळ शाळा, शनिवार पेठ, पुणे येथे समारोप होणार आहे. रॅलीचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे मालमत्ता व व्यवस्थापन उपआयुक्त राजेंद्र मुठे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रंथालयाचे प्र. ग्रंथपाल सु. द. रिद्दीवाडे यांनी दिली आहे.
मुंबई : नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आधुनिक आणि परिवर्तनशील आहे. त्यांच्या नेतृत्वात विविध योजना आणि उपक्रमातून देशाला आत्मनिर्भर करण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान मोदी सामान्य माणसाची भाषा जाणणारे व्यक्तिमत्व असून त्यांच्यावर आधारित Modi@20 या पुस्तकात त्यांच्यातील व्यवस्थापन कौशल्याची झलक अनुभवायला मिळते असे गौरवउद्गार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काढले. त्या मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वीस वर्षाच्या पारदर्शक प्रशासकीय जीवनावर आधारित Modi@20 या पुस्तकावर आयोजित विशेष कार्यक्रमात गुरुवारी बोलत होत्या. वांद्रे कुर्ला संकुल येथील डायमंड बोर्स येथे कार्यक्रम संपन्न झाला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, मोदी सरकारच्या काळात देशाने अमृतकाळाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्यांनी गुणवत्तेच्या आणि अंगभूत सामर्थ्याच्या जोरावर प्रशासनावर पकड मिळवली आहे. गुजरात भूकंप परिस्थिती हाताळताना त्यांच्यातील नेतृत्वाची चमक दिसली. पंतप्रधान मोदी कोणताही संकोच न बाळगता समोरच्याचे ऐकून घेण्यास प्राधान्य देतात. Modi@20 या पुस्तकात एका विशिष्ट उंचीवर गेलेल्या व्यक्तिमत्त्वांनी पंतप्रधान मोदीजींच्या कार्याचा आढावा घेतला आहे. अजित डोवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्या धोरणात्मक मुत्सद्दीपणा यावर भाष्य केले आहे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांच्या विदेश नितीवर प्रकाश टाकला आहे याचा आढावा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतला.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, पंतप्रधान मोदी सगळ्या देश बांधवांची काळजी घेणारा नेता आहे. मोदी यांनी दाखवलेल्या धैर्य आणि सचोटीमुळे कोरोना काळात ‘फार्मसी ऑफ वर्ल्ड’ हा भारताचा गौरव पुन्हा अधोरेखित झाला. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या निमित्ताने भारतातील आरोग्य व्यवस्था आमूलाग्र बदलत चालल्याचा दावा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. मोदींनी आरोग्य व्यवस्थेच्या फेररचनेला हात घातला आहे, असेही त्या म्हणाल्या. हे पुस्तक नव्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे असून प्रत्येकाने ते आवर्जून वाचावे असेही आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.
आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले, सलग २० वर्षे अखंडपणे जनतेसाठी कार्यरत राहणारे नेतृत्व म्हणून पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख करावा लागेल. Modi@20 हे पुस्तक म्हणजे सामाजिक जीवनात निष्कलंक राहून कशी सेवा करावी याचा धडा देणारे आहे. पंतप्रधान मोदी यांनी संवाद, बांधिलकी आणि कटिबद्धता याला महत्त्व दिले. त्यांनी व्यवस्था परिवर्तनाची लढाई लढली आहे. त्यांनी शिक्षणातील आमुलाग्र बदलाला प्राधान्य दिले. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना बरोबर घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले. आयुषमान भारत, उज्वला गॅस आदी योजनामुळे गोरगरिबांच्या कल्याणाचा मार्ग सुकर झाला. पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्ट व्यवस्थेचा किल्ला उध्वस्त करण्याचे काम केले त्यांचे कार्य सत्याच्या वाटेवर चालण्याची प्रेरणा देईल असेही आमदार अॅड. आशिष शेलार म्हणाले.
खासदार पूनम महाजन यांनी प्रास्ताविक केले. पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता आणि महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक, मुंबई भाजपा उपाध्यक्ष आमदार पराग अळवणी, भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्ष माधव भंडारी, आमदार योगेश सागर, आमदार मनिषा चौधरी, आमदार सुनील राणे, आमदार राजहंस सिंह, आमदार अमित साटम उपस्थित होते. अरुण मेहता यांनी आभार मानले.
ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूड येथील जनसंपर्क कार्यालयात विशेष उपक्रमाचे आयोजन
पुणे-देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस व महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा केला जात असून, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूड मधील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस आणि २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. या अंतर्गत संपूर्ण देशात विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री यांनी ही विशेष उपक्रम आयोजित केला आहे.
या अंतर्गत कोथरूड मतदारसंघातील नागरिकांना आवश्यक विविध दाखल्याचे मोफत वाटप केले जाणार आहे. यात प्रामुख्याने रहिवास व अधिवास दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नॉनक्रीमीलेयर दाखला, डोमीसाइल दाखला, ईडब्ल्यूएस (EWS) दाखला आणि आधार कार्ड दुरुस्ती व अद्यावत करणे आदींचा समावेश आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूड मधील जनसंपर्क कार्यालयात सकाळी १०.३० ते ५ या वेळेत विशेष शिबीर आयोजित केले आहे. तरी नागरिकांनी आवश्य याचा लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.
संस्कृती मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटवस्तू म्हणून मिळालेल्या 1200 हून अधिक प्रतिष्ठित आणि संस्मरणीय स्मृतीचिन्हांच्या आणि भेटवस्तूंच्या ई-लिलावाचे चौथे पर्व 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 दरम्यान, आयोजित केले आहे.
केंद्रीय संस्कृती , पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र विकास विभाग मंत्री जी. किशन रेड्डी यांनी या आगामी लिलावाबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती दिली.संस्कृती आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखीही यावेळी उपस्थित होत्या.
”2019 मध्ये या वस्तूंचा लोकांसाठी खुल्या बोलीद्वारे लिलाव करण्यात आला.त्यावेळी पहिल्या फेरीत 1805 भेटवस्तू आणि दुसऱ्या फेरीत 2772 भेटवस्तू लिलावात ठेवण्यात आल्या होत्या. 2021 मध्ये, सप्टेंबरमध्ये देखील ई-लिलाव आयोजित करण्यात आला होता आणि लिलावात 1348 वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. यावर्षी सुमारे 1200 स्मृतीचिन्ह आणि भेटवस्तू ई-लिलावात ठेवण्यात आल्या आहेत.नवी दिल्लीतील राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात , स्मृतिचिन्हांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. या वस्तू संबंधित संकेतस्थळावरही पाहता येतील”, अशी माहिती केंद्रीय संस्कृती, पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र विकास विभाग मंत्री जी. किशन रेड्डी यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
लिलावामधील स्मृतीचिन्हांमध्ये उत्कृष्ट चित्रे, शिल्पे, हस्तकला आणि लोक कलाकृतींचा समावेश आहे. यापैकी अनेक वस्तू म्हणजेच पारंपरिक पोशाख , शाल, पगडी , समारंभातील तलवारी या नेहमी भेटवस्तू म्हणून दिल्या जातात. अयोध्येतील श्री राममंदिर आणि वाराणसीतील काशी-विश्वनाथ मंदिराच्या प्रतिकृती आणि नमुन्यांचा समावेश असलेल्या इतर स्मृतीचिन्हांचाही यात समावेश आहे.
आमच्याकडे क्रीडाविषयक संस्मरणांचा देखील आकर्षक विभाग आहे.” राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 2022, डेफलिम्पिक्स 2022 तसेच थॉमस चषक क्रीडास्पर्धा 2022 या स्पर्धांमध्ये भारतीय संघाने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे आपण क्रीडा स्पर्धांच्या इतिहासात मानाचे स्थान आणि पदकांची भरघोस कमाई केली. क्रीडास्पर्धांतील यशस्वी संघ आणि विजेते यांच्या संस्मरणांचा देखील लिलाव होत आहे. लिलावाच्या या भागात 25 नवी क्रीडा संस्मरणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांनी उपस्थितांना दिली.
केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, “नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले असे पंतप्रधान आहेत ज्यांनी त्यांना मिळालेल्या सर्व भेटवस्तूंचा लिलाव करण्याचा आणि त्यातून मिळणारे उत्पन्न देशाची जीवनवाहिनी असणाऱ्या गंगा नदीच्या संवर्धनासाठी सुरु करण्यात आलेल्या नमामि गंगे या समाजकल्याणकारी कार्याला देण्याचा निर्णय घेतला आहे.”
याप्रसंगी बोलताना, केंद्रीय संस्कृती आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले, “गेल्या वेळी झालेल्या अशा प्रकारच्या लिलावात देशाच्या प्रत्येक राज्याच्या आणि विविध प्रकारच्या जातीधर्माच्या लोकांनी सक्रीय सहभाग घेतला.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या प्रतिष्ठित आणि संस्मरणीय भेटवस्तूंच्या लिलावात लोकांनी यावर्षी देखील भरभरून सहभाग नोंदवावा अशी विनंती त्यांनी जनतेला केली.
केंद्रीय संस्कृती आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी बोलताना पंतप्रधानांना मिळालेल्या विविध स्मृतीचिन्हांचे महत्त्व तसेच हा लिलाव कशा प्रकारे सामान्य नागरिकांना ‘नमामि गंगे’ उपक्रमात योगदान देण्याची अपूर्व संधी देतो आहे, यावर भर दिला.
या भेटवस्तू, स्मृतीचिन्हे आणि इतर वस्तू पाहण्यासाठी आलेल्या लोकांना ही भेट अधिक आनंददायी ठरावी म्हणून, या ठिकाणी मार्गदर्शकासोबतच्या फेऱ्या तसेच श्रवणदोष असलेल्या दिव्यांगांसाठी खुणांची भाषा येत असलेल्या मार्गदर्शकासोबतच्या फेऱ्या आयोजित करण्यात आल्या आहेत. दृष्टीदोषअसलेल्या दिव्यांग लोकांसाठी येथील वस्तूंची यादी आणि किंमत यांची माहिती देणारे ब्रेल भाषेतील कॅटलॉग देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जनतेसाठी या वस्तूंच्या प्रदर्शनाचा विभाग 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत खुला असून त्यात सर्वांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. या लिलावातून मिळणारे उत्पन्न समाजकल्याणकारी कार्यात योगदान देण्यासाठी म्हणजेच आपली राष्ट्रीय नदी असलेल्या गंगेच्या संवर्धन आणि पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या महत्त्वाच्या ‘नमामि गंगे’ या उपक्रमासाठी देण्यात येणार आहे.
ई-लिलावात सहभागी होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी कृपया पुढील लिंकवर क्लिक करून लॉगिन / नोंदणी करावी:
१२व्या भारतीय छात्र संसदेच्या दुसर्या सत्रात.राजस्थानचे विधानसभा अध्यक्ष डॉ.सी पी जोशी यांना आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार
पुणे दि.१६ : भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून कार्यरत असणारे युवक भविष्यात विधानसभा किवा लोकसभेत प्रतिनिधित्व करू शकतील .या युवकांनी आधुनिक भारत निर्मितीमध्ये महत्वपूर्ण योगदान द्यावे अशी अपेक्षा लोकसभेच्या माजी अध्यक्षा डॉ. मीरा कुमार यांनी व्यक्त केली आहे
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल आफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या छात्र संसदेच्या दुसर्या सत्रातील घराणेशाही- प्रत्येक राजकीय पक्षाचे कटू सत्य ? या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होत्या. यावेळी माजी राज्यपाल आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील , जेष्ठ पत्रकार रशीद किडवाई, राज्यसभा खासदार राघव चढ्ढा, बीजेपीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या भारती घोष, त्याचप्रमाणे विद्यार्थी प्रतिनिधी हेंमनंदन शर्मा,कोमल बडदे,टी रेगाम,पी पटनाईक,आणि गार्गी भंडारी व्यासपीठावर उपस्थित होते .
एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड अध्यक्षस्थानी होते.तसेच विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष व मिटसॉगचे संस्थापक राहुल कराड व्यासपीठावर उपस्थित होते.
या सत्रात राजस्थानचे विधानसभा अध्यक्ष डॉ. सी पी जोशी यांना आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . डॉ. मीराकुमार म्हणाल्या, भारतीय छात्र संसद हा एक चांगला आणि अनुकरणीय असा उपक्रम आहे . या माध्यमातून यापुढील काळात अनेक चांगले लोकप्रतिनिधी तयार होतील आणि देशाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहण्यास त्यांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. संसद अनेक प्रकारचे नियम कायदे करते पण त्याचबरोबर सामाजिक बदलाच्या दृष्टीने काम करण्यास एकप्रकारे प्रेरणा मिळणार आहे. जे देशाच्या प्रगतीसाठी महत्वाचे योगदान ठरणार आहे . देशाच्या लोकसभेत प्रथमच महिला अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
शिवराज पाटील म्हणाले, या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी व्यापक चर्चा होणे गरजेचे आहे. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणाबरोबर जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळणार आहे. आजच्या काळात ज्ञान व अनुभव असणारे निवडणूक रिंगणात कधी ऊतरत नाहीत. पण पैशाच्या जोरावर निवडणुका लढवल्या जातात हे चित्र लोकशाहीला पूरक नाही त्याचप्रमाणे सर्वांनी समानतेच्या सूत्राचा स्वीकार करायला हवा . लोकशाही पुढे नेण्यासाठी सर्वं घटकांचा सहभाग असणे आवश्यक आहे.
डॉ. सी.पी.जोशी म्हणाले, मला युवावस्थेत विधानसभा आणि लोकसभेत काम करण्याची संधी मिळाली पक्ष कोणता आहे, यापेक्षा काम करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे युवकांनी देखील काम करण्याची आणि सर्व जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे . राजकीय व्यवस्था बळकटीच्या दृष्टीने वंशवादा पेक्षा आपण संसदीय लोकशाहीला महत्त्व देण्याची गरज आहे. निवडणुका होतात, त्याप्रमाणे सभागृहात चर्चा .विचार होऊन धोरण नक्की करण्यात येते. त्या ठिकाणी युवकांचा सहभाग वाढला पाहिजे .
श्री.रशीद किडवाई म्हणाले, वंशवाद, परिवारवाद का?, त्यामागचे कारण आपण समजून घेतले पाहिजे. त्यावर मनन व चिंतन झाले पाहिजे. निवडणुकीसाठी खर्च होतो, त्याचा तपशील दिला जातो. पण हा कितपत योग्यप्रकारे खर्च होतो याचा विचार झाला पाहिजे . यासाठी खर्चाचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. राघव चढ्ढा म्हणाले, वंशवाद आणि परिवारवाद हा नवीन नाही. राजकीय क्षेत्रात तो पाहावयास मिळतो. यामधून काही प्रश्न निर्माण होत आहेत. या भूमिकेला राजकारणात स्थान असणे अयोग्य आहे, याचा राजकीय पक्षांनी विचार कारला हवा.
राहुल कराड म्हणाले, या उपक्रमातून चांगले लोकप्रतिनिधी तयार करण्याचा आमचा प्रयत्न असून तो अनेक वर्ष केला जातो आहे. यासाठी राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळींना निमंत्रित करण्यात येते. त्यांच्या अनुभवाचा युवकांना नक्कीच फायदा होणार आहे.
डॉ.पौणिमा बागची आणि उन्नती दिक्षित यांनी सूत्रसंचालन केले .
मुंबई: मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवर उपाययोजना करण्यासाठी 600 किलोमीटर लांबीचे रस्ते तातडीने दुरुस्त केले जात आहेत. त्यासाठी 5 हजार 500 कोटींचा निधी दिला आहे. रस्ते कामांच्या गुणवत्तेत तडजोड करू नका, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.
रवींद्र नाट्य मंदिर येथे राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांनी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.
यावेळी पद्मविभूषण डॉ. मनमोहन शर्मा, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महानगर पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारसू आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या, नानासाहेब मोडक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबई महानगरपालिका आपली आहे या समर्पित भावनेने काम करा. मुंबई शहराला जागतिक स्तरावर मोठे महत्त्व आहे. विविध क्षेत्रांमध्ये देशाला उभारण्याचे काम अभियंत्यांनी केले आहे. असे सांगून मुख्यमंत्र्यांनी अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘इंजिनिअर्स इज द बॅकबोन ऑफ नेशन’ असे म्हटले जाते. त्यांच्या कल्पकतेमुळे राष्ट्र उभे राहते. अभियंत्यांवर हल्ले होणार नाहीत यासाठी राज्य सरकार भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहील, असे त्यांनी सांगितले.
आपल्या सर्वांच्या प्रयत्नांतून कोविडकाळात मुंबईचे आणि मुंबईकरांचे रक्षण केले. आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय. स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने अभियंत्यांनी कृषी, जलसिंचन, औद्योगिक क्षेत्रातला विकास करून देश उभा केला, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
मुंबईत कोस्टल रोड, 337 किमी ची मेट्रो असे कितीतरी प्रकल्प उभे अभियंत्यामुळे उभे राहत आहेत. मिसिंग लिंक या जगातील सर्वात रुंद बोगद्याचे काम सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गतिमान, बलशाली भारताच्या निर्माणात अभियंत्यांनी आपले सातत्यपूर्ण योगदान देत रहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ठाणे, नवी मुंबईच्या धर्तीवर सुशोभीकरण आणि सांडपाणी प्रक्रियेचे काम करण्यात यावे असे सांगून रस्ते कामाच्या गुणवत्तेत तडजोड करू नका, पैसा वाया जाऊ देऊ नका. राज्याला खूप पुढे न्यायचं आहे, लोकहिताचे प्रकल्प मुंबईत आणूया, मुंबईला वैभवशाली बनवूया असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महानगरपालिका अभियंत्यांचे विविध प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्री तसेच उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. खासदार राहुल शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे लोकार्पण
पुणे, दि. १६: पाषाण-सूसला जोडणारा उड्डाणपूल हा हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्कच्या बाजूला होणाऱ्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार असून वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास बऱ्याच अंशी मदत होईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर पुणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे लोकार्पण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर,, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विलास कानडे, माजी सभागृहनेते गणेश बीडकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ,माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने स्वप्नाली सायकर , ज्योती कळमकर,ठेकेदार अजय नाईक आदी उपस्थित होते.
चांदणी चौकातील सहापदरी पूल झाल्यावर या भागातील बरेचसे प्रश्न मार्गी लागतील असे सांगून श्री. पाटील म्हणाले, या परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि त्यासाठी वाहतूक वळवण्यासाठी काही बाबतीत हा पूल उपयुक्त होईल. पुणे शहराची गतीने वाढ होत आहे. उद्योग, व्यापार, शैक्षणिक क्षेत्र आदींमध्ये शहर पुढे राहण्यासाठी रस्ते, उडाणपूल, मेट्रो, पूल आदी पायाभूत सुविधांची निर्मिती गरजेची आहे. चांगल्या प्रकारचे घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाण्याची व्यवस्था, शांतता आदीमुळे सर्वांनाच हे शहर राहण्यासाठी सुरक्षित वाटते.
मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, येत्या काळात शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहे. मेट्रो, सर्व भागात २४ तास समप्रमाण पाणी पुरवठा, जायका प्रकल्प आदी प्रकल्प गतीने पूर्ण करायचे आहेत. पाषाण- सूस भागातील घनकचरा प्रकल्प हलवण्याची नागरिकांची मागणी असून येथील लोकप्रतिनिधींनी नागरी वस्तीपासून दूर असलेली योग्य जागा शोधावी. या जागेचे संपादन करून तेथे हा प्रकल्प स्थलांतरीत करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
उद्घाटन करण्यात आलेल्या पूलाला राजमाता जिजाऊ भोसले यांचे नाव देण्यात येईल आणि राजमाता जिजाऊंचा पुतळाही या ठिकाणी उभा केला जाईल, असेही श्री. पाटील म्हणाले.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, १९९५ नंतर उड्डाणपूल, तसेच रस्त्यांच्या बाबतीत राज्यात चांगली पाऊले टाकली गेली आहेत. शहरात मोठ्या पावसामुळे सिग्नल व्यवस्था बंद पडू नये यावर उपाययोजना करणे आणि अशावेळी ऐनवेळचे वाहतूक नियोजन करणे गरजेचे आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था, घनकचरा, सांडपाण्याचे व्यवस्थापन गरजेचे आहे.
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी प्रास्ताविकात पुलाबाबत माहिती दिली. हा पूल ४७० मीटरचा असून पुलामुळे कात्रज व हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
फेब्रुवारी २०२० पासून काम सुरू झालेल्या या पुलाचे काम कोविडकाळातही गतीने सुरू ठेऊन पूर्ण केल्याबद्दल महानगरपालिकेचे अधिकारी, अभियंते तसेच कंत्राटदारांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्रावणी सतीश गोगुलवार हीचा १२ वी सीबीएसई बोर्डात ९९.४० टक्के गुण मिळवून राज्यात पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
असा आहे उड्डाणपूल ४१ कोटी रुपये खर्चातून उभारलेला ४७० मीटर लांबीचा हा उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर पाषाण-सूसला जोडणारा आहे. पाषाण-कात्रज, हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क, मुळशीला जोडणारा हा पूल वाहतूकीसाठी मोठा उपयुक्त ठरणार आहे. हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारी आणि मुळशीकडून येणारी वाहतूक सुकर होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा उड्डाणपुलाचे उद्घाटन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते. तांत्रिक कारणामुळ त्यांना सहभागी होता आले नाही. तथापि, मुख्यमंत्र्यांनी मंत्री श्री. पाटील यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत या लोकार्पण सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘आत्मनिर्भर भारत’ही संकल्पना भारताला जगातील सर्वात मजबूत आणि प्रतिष्ठित देश बनवत आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज 16 सप्टेंबर 2022 रोजी नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात केले.
आपल्या गरजा, विशेषत: सुरक्षिततेशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार कोणत्याही देशावर अवलंबून नसलेल्या नवीन भारताचे (न्यू इंडिया) स्वप्न साकार करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने उचललेल्या अनेक पावलांचे विवेचन करताना राजनाथ सिंह म्हणाले, 310 वस्तूंच्या स्वदेशीकरणाच्या तीन सकारात्मक याद्या जारी करणे तसेच खाजगी क्षेत्राला देशाच्या विकास गाथेचा एक भाग होण्यासाठी प्रोत्साहित करणे, सशस्त्र दलांना स्वदेशी विकसित अत्याधुनिक शस्त्रे/प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी आणि भविष्यातील सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना सुसज्ज करण्याच्या सरकारच्या अतूट बांधिलकीचा पुरावा आहे. ते पुढे म्हणाले की, देशांतर्गत उद्योगात पुढील काही वर्षांत जल, जमीन, आकाश आणि अंतराळात नवीनतम संरक्षण प्लॅटफॉर्म तयार करण्याची क्षमता आणि समर्थता आहे आणि सरकार त्यांना आवश्यक वातावरण प्रदान करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे.
सरकारच्या प्रयत्नांमुळे साध्य झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकताना संरक्षण मंत्री म्हणाले, संरक्षण क्षेत्रातली निर्यात जी पूर्वी 1,900 कोटी रुपयांची होती, ती आता 13,000 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.त्यांनी विश्वास व्यक्त केला की, 2025 पर्यंत संरक्षण उत्पादनातून 1.75 लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठण्याचा निर्धार आहे, ज्यामध्ये 35,000 कोटी रुपयांची निर्यात समाविष्ट आहे. त्यांनी देशातील पहिल्या स्वदेशी विमानवाहू INS विक्रांतचा विशेष उल्लेख केला, ज्यामध्ये 76% स्वदेशी सामग्री आहे, जीचे पंतप्रधानांनी 02 सप्टेंबर 2022 रोजी कोची येथे लोकार्पण केले होते. भारताच्या स्वावलंबनाच्या मार्गातील हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘आत्मनिर्भरता’म्हणजे अलगाव नसल्याचं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं, संपूर्ण जगाला आशा आणि दिलासा देण्याचा भारताचा संकल्प आहे, असा मानस त्यांनी व्यक्त केला. “आज जगाला हे समजले आहे की, मॅन्युफॅक्चरिंग हब (उत्पादन केंद्र)कोणत्याही एका देशात नसावेत. बदललेल्या परिस्थितीत, मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या ( MNCs) त्यांच्या उत्पादनाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी नवीन पर्याय शोधत आहेत. भारताने तो शोध तर पूर्ण केलाच, पण या उत्पादन निर्मिती बदलांमध्ये संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेला नवी उभारी देण्याची क्षमता आहे, अशी आशाही दिली आहे. भारत हा जागतिक आशावादाचा केंद्रबिंदू आहे. आमच्याकडे संधींचा महासागर, अनेक पर्याय आणि मोकळेपणाची भावना आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ मोकळ्या मनाने संधींचे नवीन दरवाजे उघडतो. आमचे ध्येय राष्ट्रीय हितांचे रक्षण करणे आणि त्याच वेळी आमच्या मित्र देशांना त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करणे हे आहे. आमचा दृष्टिकोन स्पष्ट आहे – ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’,” असही ते म्हणाले.
संरक्षणमंत्र्यांनी यावेळी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मरण केले, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारताने स्वातंत्र्यानंतर पुन्हा एकदा मजबूत अर्थव्यवस्था बनण्यास सुरुवात केली आणि सध्याचे सरकार ‘राष्ट्र प्रथम’ (नेशन फर्स्ट) ही त्यांची संकल्पना पुढे नेत आहे. “अटलजींच्या नेतृत्वाखालीच देश विकासाच्या मार्गावर परतला. त्यांनी पायाभूत सुविधांच्या विकासावर आणि गरिबांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित केले; महागाई नियंत्रणात आणली आणि अर्थव्यवस्थेचा विकास दर ८ टक्क्यांच्या पुढे नेला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. गेल्या आठ वर्षांत प्रक्रियात्मक तसेच संरचनात्मक सुधारणा हाती घेण्यात आल्या आहेत. कालबाह्य कायदे बदलून देशात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ सोबतच आमचा भर देशात ‘इज ऑफ लिव्हिंग’ वाढवण्यावर आहे, ज्या अंतर्गत प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा पुरवल्या जात आहेत,” ते म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी घेतलेल्या आणि धाडसी निर्णयांचे कौतुक केले, ज्याने जगामध्ये भारताची प्रतिमा एका मूक निरीक्षकापासून प्रतिज्ञाकर्ता आणि प्रदाता अशी बदलली आहे. कोविड-19 महामारीच्या काळात, आम्ही आतापर्यंतची सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली. आम्ही केवळ आमच्या नागरिकांचे संरक्षण केले नाही तर इतर देशांनाही मदत केली. सुमारे 100 देशांना कोविड लस, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. रशिया-युक्रेन संघर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, आमच्या पंतप्रधानांनी अमेरिका, रशिया आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला आणि ‘ऑपरेशन गंगा’ द्वारे आम्ही सुमारे 22,500 भारतीय नागरिकांना युद्धक्षेत्रातून सोडवण्यात यशस्वी झालो. हे भारताची मुत्सद्देगिरी, विश्वासार्हता आणि नेतृत्वाची गुणवत्ता प्रतिबिंबित करते,” ते म्हणाले.
देशवासीयांमधील एकता आणि देशभक्ती हे देशातील वेगाने होत असलेल्या विकासामागील एक प्रमुख कारण असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे. आपापल्या क्षेत्रात काम करताना राष्ट्राला हृदय आणि मनाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले.देशाला अधिक उंचीवर नेण्याचा हाच एकमेव मार्ग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (NCPCR) आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या (SCPCR) समन्वित कार्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे आणि बाल हक्क संरक्षण आयोग (CPCR) कायदा, 2005 चे कलम 13(2) लक्षात घेऊन, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (NCPCR) सर्व राज्य बाल हक्क संरक्षण आयोगांना (SCPCR) “ई-बाल निदान” पोर्टलमध्ये प्रवेश प्रदान करणार आहे. राज्य आयोगांना पोर्टलवर नोंदवलेल्या तक्रारी पाहून त्यावर आवश्यक कारवाई करता यावी यासाठी, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग राज्य आयोगांना वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड प्रदान करेल. यासोबतच, राज्य आयोगाने ज्या प्रकरणाची आधीच दखल घेतली आहे अशी नोंदणीकृत तक्रार पोर्टलवर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगा (NCPCR) कडून संबंधित राज्य आयोगाकडे हस्तांतरित करण्याचा पर्याय असेल. तक्रार निवारणात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचा (NCPCR) सहभाग आवश्यक असल्यास राज्य आयोगांना संयुक्त चौकशीचा पर्याय देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे.
देशातील बाल हक्क आणि बालकांसंबंधित इतर बाबींचे संरक्षण करण्यासाठी, बाल हक्क संरक्षण आयोग (CPCR) कायदा, 2005 च्या कलम 3 अंतर्गत, स्थापन करण्यात आलेली, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (NCPCR) ही एक वैधानिक संस्था आहे.
आयोगाने, बाल हक्क संरक्षण आयोग (CPCR) कायदा, 2005 च्या कलम 13 अंतर्गत, आपले आदेश आणि कार्ये पूर्ण करण्यासाठी 2015 मध्ये “ई-बालनिदान” ही ऑनलाइन तक्रार यंत्रणा विकसित केली होती. www.ebaalnidan.nic.in हे एक ऑनलाइन वेब पोर्टल आहे, ज्यामध्ये कोणतीही व्यक्ती एखाद्या मुलाविरुद्ध झालेल्या कोणत्याही प्रकारच्या हक्क उल्लंघनाबाबत तक्रार नोंदवू शकते. आणि, नोंदणीनंतर तक्रारकर्त्याला तक्रार नोंदणी क्रमांक दिला जातो. या क्रमांकाद्वारे, तक्रारदार आयोगातील तक्रार निवारणाच्या प्रगतीचा मागोवा घेऊ शकतो. हा तक्रार नोंदणी फॉर्म अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की, त्यामध्ये तक्रारीच्या सर्व पैलूंचा समावेश केला जाऊ शकतो आणि तक्रारदाराकडून तपशीलवार माहिती उपलब्ध होऊ शकते. फॉर्ममध्ये समाविष्ट करण्यात आलेला तपशील म्हणजे घटनेची तारीख, घटनेचे ठिकाण, पीडित व्यक्तीची माहिती, अधिकार, तक्रारीचे स्वरूप आणि श्रेणी, कोणती कारवाई सुरू करण्यात आली इत्यादी माहिती.
आयोगाने 2022 मध्ये या पोर्टलमध्ये सुधारणा करून नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत, जी तक्रारदारांना तसेच आयोगाला तक्रारी हाताळताना फायदेशीर ठरतील. काही नवीन वैशिष्ट्यांमध्ये तक्रारींच्या स्वरूपावर आधारित तक्रारींचे विभाजन जसे की बाल न्याय, पोक्सो, कामगार, शिक्षण इत्यादी; तक्रारींची अंतर्गत देखरेख आणि आयोगातील तक्रारींचे हस्तांतरण; तसेच, यांत्रिक आणि कालबद्ध पद्धतीने तक्रारींचा प्रत्येक टप्प्यावर मागोवा घेणे यांचा समावेश आहे.
असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या वतीने आज ‘महाराष्ट्र सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग संमेलन’ आयोजित करण्यात आले. मुंबईमध्ये झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
‘जागतिक मूल्य साखळीसाठी स्पर्धात्मकता निर्माण करणे’, या विषयावर आधारित हे संमेलन होते. यावेळी केलेल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी आपले विचार व्यक्त केले. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया सारख्या संस्थांच्या योगदानामुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्र प्रगती करत आहे. इतर देशांप्रमाणे उच्च तंत्रज्ञान वापरून आपले क्षेत्र काम करेल. निर्यात वाढवून आयात कमी व्हायला हवी; यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा देऊन उद्योजक वाढवू इच्छितो, असा मानस नारायण राणे यांनी यावेळी बोलून दाखविला.
निर्यात, सकल देशांतर्गत उत्पादन वाढून भारत ‘आत्मनिर्भर’ व्हावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील वाटते. यासाठी येत्या 5 वर्षात लघुउद्योजक वाढायला हवेत, याकरिता आम्ही नियोजन करत आहोत. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या तज्ज्ञांची यामध्ये मदत आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी केले. उद्योजकांच्या अडचणी दूर करणे, हेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे काम आहे. तरुणवर्ग औद्योगिक क्षेत्राकडे वळावा, त्यांनी रोजगार निर्माण करावेत; यासाठी त्यांना संपूर्ण सहकार्य करण्यास आम्ही पूर्ण ताकद लावू, असे आवाहन नारायण राणे यांनी यानिमित्ताने केले.
एमएसएमईच्या विकासासाठी एमएसएमई मंत्रालय ताकदिनिशी काम करत आहे. सातत्याने होणाऱ्या बैठकांमुळे ध्येय-धोरणे निश्चित होत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गेल्या काही काळात केलेल्या योजनांमुळे आम्ही कृतज्ञ आहोत, अशी भावना स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे सीएमडी शिवसुब्रमण्यम यांनी व्यक्त केली.
एमएसएमई क्षेत्र आर्थिक वृद्धीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बाजवते. जीडीपीमध्ये 40% पर्यंतचा त्यांचा वाटा आहे. महाराष्ट्रामध्ये 48 लाख सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आहेत. या क्षेत्राला पूर्ण पाठिंबा देणे, जागतिक पातळीवर मूल्यवर्धन करणे यासाठी भारत सरकारने अनेक पुढाकार घेतले आहेत, असे ASSOCHAM नॅशनल कौन्सिल ऑन ग्लोबल व्हॅल्यू चेनचे अध्यक्ष व महाराष्ट्र एमएसएमईचे संचालक विनोद पांडे यांनी सांगितले.
रत्नागिरी-शिवसेना नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत.आदित्य ठाकरेंच्या झेड सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तर हजर होते, मात्र त्यांना गाड्या पुरवण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे हे सुरक्षारक्षक देखील खासगी वाहनाने आदित्य ठाकरेंना सुरक्षा पुरवण्यासाठी दाखल झाल्याचं समोर आलं आहे. राज्याचे विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांचा हा मतदारसंघ असून सध्या वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावरून या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आज रत्नागिरी दौऱ्यावर आदित्य ठाकरे दाखल झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत मोठा हलगर्जीपणा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत हलगर्जीपणा दिसून आल्याचं म्हणत काही घडल्यास त्याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे.“हा प्रश्न पूर्णपणे सरकारचा आहे. ही त्यांची जबाबदारी असते.
रत्नागिरी दौऱ्यासाठी आदित्य ठाकरे आज चार्टर्ड विमानाने दाखल झाल्यानंतर त्यांना झेड सुरक्षा पुरवण्यात येणं अपेक्षित होतं. मात्र, त्यांच्या झेड सुरक्षेसाठीचे सुरक्षारक्षक खासगी वाहनाने दौऱ्यासाठी आल्याचं दिसून आलं. झेड सुरक्षेसाठी गृह विभागाकडून गाड्या पुरवल्या जातात. मात्र, आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यासाठी मुंबईहून गाड्याच आल्या नाहीत. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक खासगी गाड्यांमधून आल्याचं दिसून आलं. यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारणा करताच आदित्य ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.माझ्यासोबत आमचे शिवसैनिक आहेत. त्यांच्याच भरंवशावर आम्ही पुढे जात आहोत. महाराष्ट्र आम्हाला सांभाळून घेईल”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे.
रत्नागिरी-वेदांता-फॉक्सकॉन, त्यानंतर बल्क ड्रग्ज प्रकल्प राज्याबाहेर गेले, याची मला लाज वाटते. आता राज्यात येऊ पाहणारा टाटा-एअरबस प्रकल्प तरी गमावू नका, अशा शब्दांत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला आज खडे बोल सुनावले.रत्नागिरी येथे शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बंडखोरांवर जोरदार टीका केली.
आदित्य ठाकरे म्हणाले, आता उद्योगमंत्री असलेल्या उदय सामंत यांनी राज्यातील प्रस्तावित उद्योगांबद्दल काहीच माहिती नाही. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबद्दल पत्रकारांनी विचारल्यानंतर ते माहीती घेऊन सांगतो, असे पत्रकारांना सांगतात. शिंदे सरकारच्या अशा बेजबाबदारपणामुळे राज्यातून वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गेला. त्यानंतर बल्क ड्रग्ज प्रकल्पही राज्यातून गेला. मात्र, उद्योगमंत्र्यांना याबाबतही काहीच माहिती नाही. बल्क ड्रग्जचा एक प्रकल्प राज्यात होणार होता. मात्र, तो आता आंध्र प्रदेश आणि गुजरातला गेला. प्रकल्पातून किती गुंतवणूक होते, याला मी फार महत्त्व देत नाही. मात्र, यातून लाखो तरुणांना रोजगार मिळणार होता. ती संधी आता हिरावली गेली आहे.
तेलंगणा, आंध्रप्रदेशमध्ये असे उद्योग बाहेर जाण्याचे प्रकार घडले असते तर तिथे मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला असता. मात्र, आताचे सरकार हे निर्लज्ज आहे. टाटा-एअरबसचा काही हजार कोटींचा प्रकल्प मिहानमध्ये उभारण्यासाठी मविआ सरकार प्रयत्न करत होते. आता शिंदे सरकारने किमान हा प्रकल्प तरी राज्याबाहेर जाऊ देऊ नये. या नावाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आहे, हे तरी मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांना माहिती आहे की नाही? असा खोचक सवालही आदित्य ठाकरेंनी केला.
आदित्य ठाकरे म्हणाले, जिथे-जिथे स्थानिक आमदारांनी गद्दारी केली, तिथे-तिथे मी शिवसंवाद यात्रा काढत आहे. बंडखोरांनी जे केल ते योग्य की अयोग्य हे मला लोकांकडून जाणून घ्यायच आहे. मला लोकांना विचारायच आहे की, असे घाणेरडे राजकारण करणाऱ्यांसोबत तुम्ही उभे राहाल का? महाराष्ट्रात अशा पद्धतीचे घाणेरडे राजकारण यापूर्वी कधीही झाले नाही. ’50 खोके, एकदम ओके’ हे वाक्य आता प्रत्येक गावात, घरात गेले आहे. गद्दारांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवून जिंकून दाखवावे, मीदेखील राजीनामा देतो व निवडणुकीला सामोरे जातो. हिंमत असेल तर समोरासमोर या, असे आव्हानच आदित्य ठाकरेंनी दिले.
खोके सरकार येताच प्रकल्प राज्याबाहेर जाऊ लागले
आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात अनेक प्रकल्प येण्याबाबत मविआ सरकार असताना सकारात्मक चर्चा झाल्या. मात्र खोके सरकार येताच हे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. यावरुन मला बाजीगर सिनेमातील हारकर जितने वाले को बाजीगर कहते है, हा डॉयलॉग आठवतो. त्यावरुन जितकर हारने वाले को खोके सरकार कहते है, असे आता म्हणाले लागेल, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यानंतर आता आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील बालंट दूर झाले आहे.. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी टॉप्सग्रुप सर्व्हिसेस अँड सोल्युशन लिमिटेडच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे.विशेष म्हणजे याच प्रकरणाच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी केली होती. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारणे हा आमदार सरनाईक यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. कारण ईडीला 21 सप्टेंबरपर्यंत त्याची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश पण देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे एनएसईएल घोटाळ्याप्रकरणी ईडी आमदार प्रताप सरनाईक यांचीही चौकशी करत आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने मार्च २०२२ मध्ये सरनाईकच्या विविध ठिकाणांवर छापे टाकले होते. ज्यामध्ये 11 कोटींहून अधिकची संपत्ती जप्त करण्यात आली होती. ईडीने त्यानंतर सरनाईकसह अन्य आरोपींनी कट रचल्याचा आरोप केला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक झाली. यामध्ये बनावट गोदामाच्या पावत्या, बनावट खाती तयार करून सुमारे 13 हजार गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली. असा आरोप केला होता.टॉपसग्रुपचे एमडी एम शशिधरन यांचे वकील कुशल मोर यांनी बुधवारी विशेष न्यायालयात धाव घेऊन न्यायालयीन कोठडी वाढवू नये अशी मागणी केली. संबंधित गुन्ह्याचा तपास बंद करण्यात आला आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. ईडीला क्लोजर रिपोर्टच्या कार्यवाहीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्यामुळे एजन्सीने अपील दाखल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते म्हणाले की आरोपी देखील ईओडब्ल्यूच्या बंद करण्याच्या आदेशाला आव्हान देणार नाहीत आणि म्हणूनच, आदेशाला अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे.
काय आहे हे पूर्ण प्रकरण?
टॉप्सग्रुप सर्व्हिसेस अँड सोल्युशन्स लिमिटेड प्रकरणात आमदार सरनाईक यांच्यासह अमित चंडोले आणि एम. शशिधरन यांनाही आरोपी करण्यात आले होते. प्रत्यक्षात या कंपनीवर भ्रष्टाचार करून एमएमआरडीएला सुरक्षा रक्षक पुरवण्याचे कंत्राट मिळवल्याचा आरोप होता. या कंत्राटातून होणाऱ्या आर्थिक फायद्याचा मोठा हिस्सा आमदार प्रताप सरनाईक यांना देण्यात आला. याच प्रकरणाच्या आधारे ईडीने सरनाईक यांचे निकटवर्तीय एम. शशिधरन आणि अमित चंडोले यांना अटक केली होती.
मुंबई, दि. 16 : वस्तू व सेवा कर विभागाच्यावतीने विशेष मोहीम कारवाई अंतर्गत खोटी देयके सादर करणाऱ्या विविध सहा कंपन्यांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वस्तू व सेवा कर विभागाने दिली आहे.
बनावट पावत्यांमध्ये सहभागी असलेल्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून बालाजी स्टील कंपनीची चौकशी करण्यात आली. तसेच बालाजी स्टील, द्वारकेश ट्रेडर, एस.के.एन्टरप्रायजेस, परमार एन्टरप्रायजेस, अलंकार ट्रेडींग, शुभ ट्रेडर या सहा कंपन्यांच्या विविध शाखांवरही तपास करण्यात आला आहे. यामध्ये बालाजी स्टील कंपनीमध्ये 11.55 कोटीची बनावट देयके तसेच इतर पाच कंपन्यामध्ये 75.71 कोटीची बनावट देयके आढळली आहेत.
या प्रकरणात भंवरलाल गेहलोत, वय – 45 वर्षे, याला अटक होऊन 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. 2022 – 23 मधील या 41व्या अटकेसह, महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने पुन्हा एकदा करचोरी करणाऱ्यांना आणि बनावट पावत्या जारी करणाऱ्या आणि बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा आणि पासिंग करणाऱ्या व्यक्तींना कठोर इशारा दिला आहे.
राज्य कर, अन्वेषण-बी चे सहआयुक्त वनमथी सी. मुंबई आणि राज्य कर उपायुक्त मनाली पोहोरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य कर विभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र पवार, प्रसाद आडके, सायली धोंडगे आणि दिनेश भास्कर यांच्यासह राज्य कर निरीक्षक आणि कर सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.