नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘आत्मनिर्भर भारत’ही संकल्पना भारताला जगातील सर्वात मजबूत आणि प्रतिष्ठित देश बनवत आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज 16 सप्टेंबर 2022 रोजी नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात केले.
आपल्या गरजा, विशेषत: सुरक्षिततेशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार कोणत्याही देशावर अवलंबून नसलेल्या नवीन भारताचे (न्यू इंडिया) स्वप्न साकार करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने उचललेल्या अनेक पावलांचे विवेचन करताना राजनाथ सिंह म्हणाले, 310 वस्तूंच्या स्वदेशीकरणाच्या तीन सकारात्मक याद्या जारी करणे तसेच खाजगी क्षेत्राला देशाच्या विकास गाथेचा एक भाग होण्यासाठी प्रोत्साहित करणे, सशस्त्र दलांना स्वदेशी विकसित अत्याधुनिक शस्त्रे/प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी आणि भविष्यातील सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना सुसज्ज करण्याच्या सरकारच्या अतूट बांधिलकीचा पुरावा आहे. ते पुढे म्हणाले की, देशांतर्गत उद्योगात पुढील काही वर्षांत जल, जमीन, आकाश आणि अंतराळात नवीनतम संरक्षण प्लॅटफॉर्म तयार करण्याची क्षमता आणि समर्थता आहे आणि सरकार त्यांना आवश्यक वातावरण प्रदान करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे.
सरकारच्या प्रयत्नांमुळे साध्य झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकताना संरक्षण मंत्री म्हणाले, संरक्षण क्षेत्रातली निर्यात जी पूर्वी 1,900 कोटी रुपयांची होती, ती आता 13,000 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.त्यांनी विश्वास व्यक्त केला की, 2025 पर्यंत संरक्षण उत्पादनातून 1.75 लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठण्याचा निर्धार आहे, ज्यामध्ये 35,000 कोटी रुपयांची निर्यात समाविष्ट आहे. त्यांनी देशातील पहिल्या स्वदेशी विमानवाहू INS विक्रांतचा विशेष उल्लेख केला, ज्यामध्ये 76% स्वदेशी सामग्री आहे, जीचे पंतप्रधानांनी 02 सप्टेंबर 2022 रोजी कोची येथे लोकार्पण केले होते. भारताच्या स्वावलंबनाच्या मार्गातील हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘आत्मनिर्भरता’म्हणजे अलगाव नसल्याचं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं, संपूर्ण जगाला आशा आणि दिलासा देण्याचा भारताचा संकल्प आहे, असा मानस त्यांनी व्यक्त केला. “आज जगाला हे समजले आहे की, मॅन्युफॅक्चरिंग हब (उत्पादन केंद्र)कोणत्याही एका देशात नसावेत. बदललेल्या परिस्थितीत, मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या ( MNCs) त्यांच्या उत्पादनाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी नवीन पर्याय शोधत आहेत. भारताने तो शोध तर पूर्ण केलाच, पण या उत्पादन निर्मिती बदलांमध्ये संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेला नवी उभारी देण्याची क्षमता आहे, अशी आशाही दिली आहे. भारत हा जागतिक आशावादाचा केंद्रबिंदू आहे. आमच्याकडे संधींचा महासागर, अनेक पर्याय आणि मोकळेपणाची भावना आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ मोकळ्या मनाने संधींचे नवीन दरवाजे उघडतो. आमचे ध्येय राष्ट्रीय हितांचे रक्षण करणे आणि त्याच वेळी आमच्या मित्र देशांना त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करणे हे आहे. आमचा दृष्टिकोन स्पष्ट आहे – ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’,” असही ते म्हणाले.
संरक्षणमंत्र्यांनी यावेळी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मरण केले, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारताने स्वातंत्र्यानंतर पुन्हा एकदा मजबूत अर्थव्यवस्था बनण्यास सुरुवात केली आणि सध्याचे सरकार ‘राष्ट्र प्रथम’ (नेशन फर्स्ट) ही त्यांची संकल्पना पुढे नेत आहे. “अटलजींच्या नेतृत्वाखालीच देश विकासाच्या मार्गावर परतला. त्यांनी पायाभूत सुविधांच्या विकासावर आणि गरिबांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित केले; महागाई नियंत्रणात आणली आणि अर्थव्यवस्थेचा विकास दर ८ टक्क्यांच्या पुढे नेला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. गेल्या आठ वर्षांत प्रक्रियात्मक तसेच संरचनात्मक सुधारणा हाती घेण्यात आल्या आहेत. कालबाह्य कायदे बदलून देशात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ सोबतच आमचा भर देशात ‘इज ऑफ लिव्हिंग’ वाढवण्यावर आहे, ज्या अंतर्गत प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा पुरवल्या जात आहेत,” ते म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी घेतलेल्या आणि धाडसी निर्णयांचे कौतुक केले, ज्याने जगामध्ये भारताची प्रतिमा एका मूक निरीक्षकापासून प्रतिज्ञाकर्ता आणि प्रदाता अशी बदलली आहे. कोविड-19 महामारीच्या काळात, आम्ही आतापर्यंतची सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली. आम्ही केवळ आमच्या नागरिकांचे संरक्षण केले नाही तर इतर देशांनाही मदत केली. सुमारे 100 देशांना कोविड लस, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. रशिया-युक्रेन संघर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, आमच्या पंतप्रधानांनी अमेरिका, रशिया आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला आणि ‘ऑपरेशन गंगा’ द्वारे आम्ही सुमारे 22,500 भारतीय नागरिकांना युद्धक्षेत्रातून सोडवण्यात यशस्वी झालो. हे भारताची मुत्सद्देगिरी, विश्वासार्हता आणि नेतृत्वाची गुणवत्ता प्रतिबिंबित करते,” ते म्हणाले.
देशवासीयांमधील एकता आणि देशभक्ती हे देशातील वेगाने होत असलेल्या विकासामागील एक प्रमुख कारण असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे. आपापल्या क्षेत्रात काम करताना राष्ट्राला हृदय आणि मनाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले.देशाला अधिक उंचीवर नेण्याचा हाच एकमेव मार्ग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.