रत्नागिरी-वेदांता-फॉक्सकॉन, त्यानंतर बल्क ड्रग्ज प्रकल्प राज्याबाहेर गेले, याची मला लाज वाटते. आता राज्यात येऊ पाहणारा टाटा-एअरबस प्रकल्प तरी गमावू नका, अशा शब्दांत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला आज खडे बोल सुनावले.रत्नागिरी येथे शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बंडखोरांवर जोरदार टीका केली.

आदित्य ठाकरे म्हणाले, आता उद्योगमंत्री असलेल्या उदय सामंत यांनी राज्यातील प्रस्तावित उद्योगांबद्दल काहीच माहिती नाही. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबद्दल पत्रकारांनी विचारल्यानंतर ते माहीती घेऊन सांगतो, असे पत्रकारांना सांगतात. शिंदे सरकारच्या अशा बेजबाबदारपणामुळे राज्यातून वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गेला. त्यानंतर बल्क ड्रग्ज प्रकल्पही राज्यातून गेला. मात्र, उद्योगमंत्र्यांना याबाबतही काहीच माहिती नाही. बल्क ड्रग्जचा एक प्रकल्प राज्यात होणार होता. मात्र, तो आता आंध्र प्रदेश आणि गुजरातला गेला. प्रकल्पातून किती गुंतवणूक होते, याला मी फार महत्त्व देत नाही. मात्र, यातून लाखो तरुणांना रोजगार मिळणार होता. ती संधी आता हिरावली गेली आहे.
तेलंगणा, आंध्रप्रदेशमध्ये असे उद्योग बाहेर जाण्याचे प्रकार घडले असते तर तिथे मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला असता. मात्र, आताचे सरकार हे निर्लज्ज आहे. टाटा-एअरबसचा काही हजार कोटींचा प्रकल्प मिहानमध्ये उभारण्यासाठी मविआ सरकार प्रयत्न करत होते. आता शिंदे सरकारने किमान हा प्रकल्प तरी राज्याबाहेर जाऊ देऊ नये. या नावाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आहे, हे तरी मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांना माहिती आहे की नाही? असा खोचक सवालही आदित्य ठाकरेंनी केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, जिथे-जिथे स्थानिक आमदारांनी गद्दारी केली, तिथे-तिथे मी शिवसंवाद यात्रा काढत आहे. बंडखोरांनी जे केल ते योग्य की अयोग्य हे मला लोकांकडून जाणून घ्यायच आहे. मला लोकांना विचारायच आहे की, असे घाणेरडे राजकारण करणाऱ्यांसोबत तुम्ही उभे राहाल का? महाराष्ट्रात अशा पद्धतीचे घाणेरडे राजकारण यापूर्वी कधीही झाले नाही. ’50 खोके, एकदम ओके’ हे वाक्य आता प्रत्येक गावात, घरात गेले आहे. गद्दारांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवून जिंकून दाखवावे, मीदेखील राजीनामा देतो व निवडणुकीला सामोरे जातो. हिंमत असेल तर समोरासमोर या, असे आव्हानच आदित्य ठाकरेंनी दिले.
खोके सरकार येताच प्रकल्प राज्याबाहेर जाऊ लागले
आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात अनेक प्रकल्प येण्याबाबत मविआ सरकार असताना सकारात्मक चर्चा झाल्या. मात्र खोके सरकार येताच हे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. यावरुन मला बाजीगर सिनेमातील हारकर जितने वाले को बाजीगर कहते है, हा डॉयलॉग आठवतो. त्यावरुन जितकर हारने वाले को खोके सरकार कहते है, असे आता म्हणाले लागेल, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.