Home Blog Page 1610

समाज घडविण्यात शिक्षकांचे अनन्य साधारण महत्व-सुरेश कोते

0

कुंभार समाज शिक्षक संघातर्फे गुणगौरव समारंभ
नारायणगाव/पुणे, ता. १८ : “देशासाठी, समाजासाठी शिक्षक अहोरात्र कष्ट घेऊन मुलांना घडवतात. समाज घडविण्यात शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे अभिमानास्पद काम जुन्नर तालुका कुंभार समाज शिक्षक संघ करीत आहे,” असे मत लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेश कोते यांनी व्यक्त केले.
जुन्नर तालुका कुंभार समाज शिक्षक संघातर्फे शिक्षक दिनानिमित्त नुकताच ‘गुणगौरव समारंभ २०२२’ आयोजिला होता. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सुरेश कोते बोलत होते. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील पर्यवेक्षीय अधिकारी रंगनाथ जाधव, ह.भ. प. निलेश महाराज कोरडे यांच्या हस्ते शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय अंबाडे, कुंभार समजोन्नती मंडळाचे अध्यक्ष संतोष कुंभार, पांडुरंग कार्लेकर गुरुजी, बाबाजी कुंभार आदी उपस्थित होते.
सुरेश कोते म्हणाले, “विद्यार्थ्यांना घडविण्याची जुन्नर तालुक्याची परंपरा आहे. या तालुक्याला शिवाजी महाराजांच्या काळापासून एक वेगळा इतिहास आहे. शिक्षकांचा सत्कार करण्याचे संघाचे काम कौतुकास्पद आहे. शिक्षकांनी समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य असेच अविरतपणे सुरू ठेवावे.” दरम्यान, सत्कारार्थी विद्यार्थी, शिक्षकांनी आपला सन्मान केल्याबद्दल संघाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

जॉन्सन बेबी पावडर मुलुंडचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द

0

मुंबई दि.18: अन्न व औषध प्रशासन विभागाद्वारे मे. जॉन्सन अँड जॉन्सन प्रा.लि. या बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादित केलेल्या ‘जॉन्सन बेबी पावडर’ या सौंदर्य प्रसाधनांचा परवाना 15 सप्टेंबर 2022 पासून कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक व पुणे येथील औषध निरीक्षकांनी तपासणी साठी नमुने घेतले होते. शासकीय विश्लेषक, औषध नियंत्रण प्रयोगशाळा, मुंबई यांनी बेबी पावडरचे उत्पादन अप्रमाणित घोषित केल्याने ही कारवाई करण्यात आली.

‘जॉन्सन बेबी पावडर’ चा प्रामुख्याने नवजात बाळासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. वरील उत्पादन पध्दतीमध्ये दोष असल्यामुळे सदर उत्पादनाचा सामू ( PH) हा प्रमाणित मानकानुसार नाही. त्याच्या वापरामुळे नवजात शिशु व लहान मुलांच्या त्वचेस हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे उत्पादन सुरु ठेवणे हे जनहिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही, त्यामुळे मुलुंड, मुंबई या उत्पादन कारखान्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

वरील अप्रमाणित घोषित नमुन्याच्या अनुषंगाने संस्थेची अनुज्ञप्ती रद्द का करण्यात येऊ नये ?अथवा नमूद केलेल्या परवान्या अंतर्गत मंजूर असलेल्या सौंदर्य प्रसाधनांची उत्पादन अनुमती निलंबित का करु नये? याबाबत कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. संस्थेस या उत्पादनाचा साठा बाजारातून परत बोलावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. वरील नमुन्याचे प्राप्त शासकीय विश्लेषकाचे अहवाल मान्य करण्यात आले नाहीत म्हणून संस्थेने औषध प्रयोगशाळेकडून फेरचाचणी होण्यासाठी नाशिक व पुणे न्यायालयात अर्ज केला होता.

केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडून सदरील फेरचाचणी नमुन्यांची चाचणी होऊन संचालक, केंद्रीय औषध प्रयोगशाळा, कलकत्ता यांनी अहवाल अप्रमाणित घोषित केल्याने परवाना रद्दची कारवाई करण्यात आली..अशी माहिती गौरीशंकर ब्याळे,सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई यांनी दिली.

यशस्वी नेतृत्वासाठी भगवद्गीता मार्गदर्शक-‘ गौरांग प्रभू

0

पुणे-दोन सैन्यांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आता युद्ध होत नाही. युद्धाची रुपरेषा बदलली आहे. व्यवसाय, उद्योग, समग्र बाजारमूल्य, महसूल, संचालक मंडळाचे नियंत्रण असे त्याचे स्वरूप झाले असून, अहंकार हे युद्धाचे मूळ कारण आहे. या युद्धात यशस्वी नेतृत्वासाठी भगवद्गीता मार्गदर्शक असल्याचे मत, इस्कॉनच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्याख्याते गौरांग प्रभू यांनी व्यक्त केले.

‘भगवद्गीता आणि आदर्श नेतृत्व’ या विषयावर शहरातील विविध संस्थांनी एकत्र येऊन प्रभू यांचे स. प. महाविद्यालयात व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी प्रभू मार्गदर्शन करीत होते.

समर्थ युवा फाउंडेशनचे राजेश पांडे, भक्तिवेदांतचे जनार्दन चितोडे, इस्कॉनचे संजय भोसले, विवेक व्यासपीठचे महेश पोहनेरकर, स्वामीनारायणचे राधेश्याम अग्रवाल, लक्ष्मीनारायण देवस्थानचे प्रल्हाद राठी आणि मुकुंद भवन ट्रस्टचे पुरुषोत्तम लोहिया यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रभू म्हणाले, ‘आदर्श नेतृत्व करण्यासाठी आंतरव्यक्ति कौशल्य, संवाद कौशल्य, प्रश्न व समस्या सोडविण्याची वृत्ती, संवेदनशीलता आणि चांगले मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याची क्षमता आवश्यक असल्याचे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेतून युद्धभूमीवर युद्ध सुरु होण्यापूर्वी सांगितले आहे. त्याचा अर्थ समजावून घेऊन कृती करणे आवश्यक आहे. यासाठी भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार महत्त्वाचा आहे.’

प्रभू पुढे म्हणाले, ‘ धेय्य, विचार व सवयींवर नियंत्रण, निकोप दृष्टिकोन, योग्य मूल्यांकन करण्याची क्षमता, आत्मविश्वास, सहनशीलता, अनपेक्षित परिस्थितीत काय करायचे याची जाण, सत्य, हितकारी व न दुखावणारी भाषा, प्रार्थनेची जीवनशैली आत्मसात करणे, कोणावरही वर्चस्व न गाजवता ज्ञान, प्रेरणा, प्रेम, दया आणि भावनांचे आदान प्रदान करण्याचे करण्याचे कौशल्य विकसित करणे आदी गुण यशस्वी नेतृत्वाने संपादन केले पाहिजे.’

समर्थ युवा फाउंडेशनचे राजेश पांडे यांनी प्रास्ताविक, भक्तिवेदांतचे जनार्दन चितोडे यांनी परिचय, इस्कॉनचे संजय भोसले यांनी सूत्रसंचालन आणि विवेक व्यासपीठचे महेश पोहनेरकर यांनी आभार प्रदर्शन केले.

कोथरूडच्या पहिल्या महिला फॅमिली डॉक्टर मंगलाताई पटवर्धन यांचे निधन

0

पुणे, १८ सप्टेंबर ; कोथरूडच्या पहिल्या महिला फॅमिली डॉक्टर मंगलाताई पटवर्धन (वय ९१ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या कोथरूड परिसरातील पहिल्या एमबीबीएस डॉक्टर होत्या.

त्यांनी कोथरूड, कर्वेनगर, वडगाव, खडकवासला, मुळशी परिसरात सर्वसामान्य नागरिकांची १९५४ पासून अविरतपणे वैद्यकीय सेवा केली. प्राप्त परिस्थितीत रस्त्यांचा अभाव असताना प्रसंगी रात्री अपरात्री सायकल, घोडागाडीत प्रवास करून त्यांनी रुग्णसेवा केली.

वैद्यकीय व्यवसायाला उत्पन्नाचे साधन न करता त्यांनी आयुष्यभर एक व्रत म्हणून वैद्यकीय सेवा केली. कोथरूड परिसरात हजारो कुटुंबांच्या त्या फॅमिली डॉक्टर होत्या.

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत व स्वातंत्र्य सैनिक किशाभाऊ पटवर्धन यांच्या त्या पत्नी होत्या. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, डॉ. महिपाल पटवर्धन, डॉ. वासंती पटवर्धन, डॉ. अवंती पटवर्धन आणि नातवंडे असा परिवार त्यांच्या पश्चात आहे.

मोदी हे अदाणींना नंबर 1 बनवत आहेत तर अरविंद केजरीवाल हे सामान्य जनतेला, देशाला नंबर 1 बनवत आहेत:खासदार संजय सिंह

0

पुणे-गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे काल झालेल्या आपच्या जाहीर सभेत खा. संजय सिंहांनी भाजप आणि मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवत ते म्हणाले की , मोदी सरकार हे जुमल्यांचे सरकार आहे. जनतेला मोठमोठी आश्वासने दिली आणि आता निलाजरेपणाने तो एक जुमला होता, अस सांगितलं जात आहे . लाख दीड लाखाचे कर्ज मिळवण्यासाठी सामान्य नागरिकाला बँकाचे खेटे मारावे लागतात. मात्र मोदींनी आपल्या दोस्तांना लाखो कोटींची कर्जे दिली व ती माफही केली. मोदी सरकार हे अडाणींना जगातील नंबर एकची श्रीमंत व्यक्ती बनवण्यामध्ये मश्गुल असताना अरविंद केजरीवाल हे भारतातील सर्वसामान्यांना नंबर वन बनवण्यात प्रयत्नशील आहेत असे मनोगत खासदार संजय सिंह यांनी व्यक्त केले. लाखो करोडोचे कर्ज घेवून कर्ज बुडवे देश सोडून पळाले, सुस्मिता सेनला ललित मोदी सापडतो मात्र सरकारला तो सापडत नाही असा टोला त्यांनी लगावला. भाजप सरकारने आपल्या दोस्तांच्या १२ लाख कोटींची कर्ज माफी करून बँका रिकाम्या केल्या आहेत. २०१४ मध्ये अदानीची संपत्ती ५० हजार करोड होती २०२२ मध्ये त्याची संपत्ती १० लाख करोड आहे . एका बाजूला अदानी जगातला दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत बनले आहेत आणि त्याच वेळी भारत उपासमारीच्या यादीत पुढे जात आहे. बेरोजगारी, महागाई प्रचंड वाढली आहे. सर्वसामान्य माणूसाचे जगणे कठीण झालय. देशाची तिजोरी भरणारा शेतकरी आत्महत्या करीत आहे पण शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसे नाहीत. सरकारी शाळा बंद पडत आहेत त्यासाठी सरकार कडे पैसा नाही. गरिबाच्या घासावर टॅक्स लावून , मोदी श्रीमंत उद्योगपती मित्रांना रेवड्याची खैरात वाटत आहेत. या सरकारला सत्तेवून खाली खेचण्याची वेळ आली आहे, जगणे महाग करणाऱ्या सरकारला जनता माफ करणार नाही. पुण्यात मनपा प्रशासन भ्रष्ट आहे. स्मार्ट सिटी योजनेचा बोजवारा उडाला आहे. येत्या निवडणुकीत भ्रष्टाचार मुक्त सुशासनासाठी आपला निवडून देण्याचा आवाहन त्यांनी केले.

या सभेला महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेले आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी देखील संबोधित केले आणि आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील कामाचे कौतुक केले. भास्कर राव पेरे पाटील यांनी आपल्या भाषणात सत्तेत मूर्ख बसल्यामुळे जनतेचे हाल सुरू आहे . शेतकऱ्याला मेल्यावर मदत करणे हास्यास्पद आहे . मात्र त्याला जिवंत पणी जगू देत नाहीत. दर्जेदार शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधा दिल्लीत मिळत आहेत हे आपण स्वतः पाहून आल्याचे त्यांनी सांगितलं . केजरीवाल ही फक्त व्यक्ती नसून तो विचार आहे आणि तो समाजात देशात रुजला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले. चांगल्या कामाला नागरिकांनी पाठिंबा दिला पाहिजे या भावनेतून आपण आम आदमी पक्ष, अरविंद केजरीवाल यांच्या कामाला आपला पाठिंबा आहे असे मनोगत भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र निवडणूक प्रभारी महादेव नाईक म्हणाले की महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्यात मात्र महाराष्ट्रातील सत्ताधीश सत्ता मिळवण्यात मश्गूल आहेत. काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. भाजपला भीती आहे ती फक्त केजरीवाल आणि आपची. केजरीवालांची मेक इंडिया नंबर 1 ही संकल्पना अमलात आणण्यासाठी आप सत्ता येणे महत्त्वाचे आहे.

आप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, जात-पात, धर्म याच्या आधारे बुद्धिभेद, मनभेद करणाऱ्या शक्तींचा जोरदार मुकाबला करा. तर राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांनी पुण्यात पक्षाच्या चाललेल्या कामाचे कौतुक करत जनतेच्या प्रश्नांसाठी सतत अग्रेसर राहण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.

राज्य संघटक आणि या सभेचे निमंत्रक विजय कुंभार हे आपल्या भाषणात म्हणाले की , पुणेकरांना हवंय स्वच्छ पाणी , वाहतूक कोंडी मुक्त व खड्डे मुक्त रस्ते, चांगली आरोग्य सेवा , स्वच्छ्ता आणि भ्रष्टाचार मुक्त सुशासन .. राज्य सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, तुम्ही वार्डची संख्या वाढवा, घटवा , त्याची नव्याने रचना करा पण निवडणुका तर घ्या … आम्ही सर्व जागा लढवू व जिंकून ही दाखवू . नागरिकांना आवाहन करताना ते म्हणाले की आपले मत पुण्याला आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी द्या , दिल्लीच्या धर्तीवर पुण्यातही दर्जेदार आणि मोफत शिक्षण मोफत आरोग्य सुविधा, कचरा मुक्त पुणे करण्यासाठी मत द्या.

आप प्रवक्ते डॉ अभिजित मोरे यांनी सभेचे प्रस्ताविकपर भाषण करताना पुणे शहरातील समस्यांची व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची जंत्री सांगत नागरिकांना आपचा झाडू हातात घेण्याचे आवाहन केले.

यावेळी आपचे राज्य सह संयोजक किशोर मंध्यान, राज्य सचिव धनंजय शिंदे, पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, आम आदमी शेतकरी संघटनेचे बिपीन पाटील, बाबासाहेब जाधव, संदीप पाटील, आप आरोग्य विभागाचे डॉ अमोल पवार, विनोद घरत, संदीप सोनावणे, आप शहर संघटक एकनाथ ढोले, शहर जनसंपर्क प्रमुख प्रभाकर कोंढाळकर, प्रवक्ते कनिष्क जाधव यांच्यासह पुणे शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. जोरदार पाऊस असताना देखील लोक मोठ्या संख्येने सामील झाले होते.यावेळी पक्ष कार्यकर्ते कुमार धोंगडे, जालिंदर ठोमके संचलित आम आदमी रुग्णवाहिकेचे उद्घाटन संजय सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे आप ची खा.संजय सिंह यांच्या उपस्थितीत पार पडलेली जाहीर सभा दोन दिवसाच्या संततधार पावसाच्या व्यत्यया नंतरही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे यशस्वी झाली. किरण कद्रे व प्राजक्ता देशमुख यांनी सूत्रसंचालन केले तर सुदर्शन जगदाळे यांनी आभार प्रदर्शन केले.

विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

पुणे दि.१७: युवकांनी आधुनिक विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवावे. छात्र संसदेतील विचारमंथनाच्या माध्यमातून विश्वबंधुत्वाच्या भारतीय विचाराचा प्रसार आणि‍ विकास करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप सत्राला दूरदृष्य प्रणालीद्वारे त्यांनी संबोधित केले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार, पद्मभूषण सुमित्रा महाजन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, एमआयटी विद्यापीठाचे संस्थापक डॉ.विश्वनाथ कराड, राहुल कराड आदी उपस्थित होते.

श्री.कोश्यारी म्हणाले, समाजाला सकारात्मक दृष्टीकोनाची गरज आहे. भारत हे लोकशाही राष्ट्र असल्याने आपल्याला स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी जीवनापासूनच चांगले लोकशाही राष्ट्र घडविण्याचा विचार करावा. जीवनात कोणत्याही परिस्थितीत निराश न होता उच्च ध्येय ठेवून वाटचाल सुरू ठेवावी.

छात्र संसदेच्या माध्यमातून युवकांना संसदीय लोकशाहीसाठी आवश्यक नव्या गोष्टी कळतील. सहभागी युवकांनी विविध विषयावर विचार करावा आणि राष्ट्र उभारणीत आपले योगदान कसे देता येईल याचा ध्यास धरावा. छात्र संसदेच्या माध्यमातून युवकांना चांगले मार्गदर्शन मिळेल आणि हा उपक्रम देशासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रप्रेमाच्या भावनेने प्रेरित होऊन युवकांनी देशकार्यात योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना लोकशाहीला पुढे नेणाऱ्या युवकांशी संवाद साधताना आनंद होत असल्याचे सांगून समारोप भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारताने जगाला विचारांनी जिंकले आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ संकल्पनेला पुढे नेण्याचे कार्य आपल्याला करावे लागेल. सहिष्णुतेच्या आधारे एकमेकांना पुढे नेत विचारांची कटुता, भेदभाव बाजूला सारत भ्रष्टाचार समुळ नष्ट करूनच देशाला पुढे नेता येईल. देशाला युवकांकडून मोठ्या अपेक्षा आहे. निडरता आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेने प्रेरित होऊन युवकांनी देशकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विचारांच्या मुक्ततेसाठी आहे, आपल्या ज्ञानकक्षा रुंदावण्यासाठी आहे. भारताची संस्कृती जगातील पुरातन संस्कृतीपैकी एक आहे. जगातील जुने विद्यापीठ भारतात होते. त्यामुळे विकसीत भारत आणि विश्वगुरू भारताची कल्पना करताना आपला वैभशाली गतकाळ जाणून घ्यावे लागेल. आपल्या चुकीच्या कामगिरीमुळे आपण पारतंत्र्यात गेलो हे लक्षात घेऊन प्रत्येकाला उत्तमतेसाठी प्रयत्न करावे लागतील. त्यातूनच आपण देशाला पुढे नेऊ शकतो.

क्षमता, विश्वास, युवाशक्ती, शक्यता, विचार आणि मूल्यांचा आधारे देश उभा रहातो. मूल्य जाणून घेतल्याशिवाय देशाला महान करता येणार नाही. सीमेवर लढणे सर्वांना शक्य होत नाही, नेतृत्व करणे प्रत्येकाला शक्य नाही. शक्य असलेल्या लहान कामातून आपण देशासाठी योगदान देऊ शकतो.

देशासाठी सर्वसमावेशक विकास महत्वाचा आहे. देशातील सर्व घटकांना सोबत घेऊनच पुढे जाता येईल. देशाची संपत्ती वाढविण्याचे प्रयत्न व्हायलाच हवे, पण त्यासोबत संसाधने अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचविणे हाच विकासाचा योग्य मार्ग आहे. भारत  स्टार्ट अपच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. आज सामान्य व्यक्ती युनिकॉर्न तयार करून देशात संपत्तीची निर्मिती करताना अनेकांना रोजगार देतो, हीच देशाची खरी शक्ती आहे.

आज जगात आपल्याला मोठी शक्ती मानले जाते. आपण जगातील पाचवी अर्थव्यवस्था आहोत. अशा परिस्थितीती नव्या तरुणाईला मनुष्यबळात परिवर्तीत करणे गरजेचे आहे. त्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेत सहभागी करून घेणे आणि त्याच्या माध्यमातून अर्थव्यवस्था पुढे नेली जाणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने देशाचे नवे शैक्षणिक धोरण उपयुक्त आहे. आपली शिक्षण पद्धती उपयोजित होत आहे. रोजगार देणारे मनुष्यबळ निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत, असे त्यांनी सांगितले. नवमाध्यमे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आहेत. त्यांचा सम्यक उपयोग केल्यास सकारात्मक विचार समाजात पोहोचविता येतील असेही श्री.फडणवीस म्हणाले.

छात्र संसदेच्या माध्यमातून देशातील विविधतेचे दर्शन-गिरीष महाजन

मंत्री श्री.महाजन म्हणाले, छात्र संसदेच्या माध्यमातून भारतातील विविधतेचे दर्शन घडते आहे. भारताला तरुणांचा देश म्हणून ओळखले जाते. सरासरी ३० वर्ष वयाची  सर्वाधिक  लोकसंख्या भारतात आहेत. या युवाशक्तीला योग्य दिशा देण्यासाठी हे आयोजन उपयुक्त आहे. इथे ऐकलेले विचार व्यवहारात आणून युवकांनी देशकार्यासाठी योगदान द्यावे. लोकशाही व्यवस्था विकसीत करण्यासाठी युवकांनी राजकारणात यावे. त्याग, निष्ठा आणि समर्पण भावनेने काम केल्यास तुम्हाला कोणी पराभूत करू शकत नाही. भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून युवकांनी देशविकासात अधिकाधीक योगदान द्यावे आणि  देशाला महाशक्ती बनविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

नवे स्वप्न घेऊन समाज घडवा-मीरा कुमार

श्रीमती मीरा कुमार म्हणाल्या, सामान्य, अतिसामान्य नागरिकांनी इंग्रजांविरुद्ध लढ्यात सहभाग घेतल्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. भौतिक प्रगती साधतांना मानसिक विकासाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. परिश्रम आणि विवेक एकमेकांशिवाय अर्थहीन आहेत आणि त्यासोबत स्वप्नही आवश्यक आहे. नव्या पिढीने नवे स्वप्न घेऊन समाज घडविण्यासाठी, वंचितांना त्यांचे हक्क देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.

चारित्र्य निर्माण महत्त्वाचे – सुमित्रा महाजन

श्रीमती महाजन म्हणाल्या, चांगले कार्य आवश्यक आहे, पण त्यापेक्षाही चारित्र्य निर्माण महत्वाचे आहे. मन शुद्ध ठेवून कर्तव्य भावनेने पुढे गेल्यास जीवनात निश्चितपणे यशस्वी व्हाल. राष्ट्रभावनेने कार्य केल्यास यश तुच्याकडे धावून येईल. आपल्या गुणांच्या आधारे समाजासमोर आपली प्रतिमा उभी रहाते आणि ती कायम रहाते हे लक्षात ठेवावे, असे त्यांनी सांगितले.

भारतीय संस्कृतीचा लौकिक जगात पोहोचवा – डॉ.विश्वनाथ कराड

डॉ.कराड म्हणाले, आपल्या पालकांना अभिमान वाटेल असे कार्य युवकांनी करावे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि ज्ञान प्रगतीचा खरा मार्ग आहे. सुख, समाधान आणि शांतीचे नवे स्वरुप जगासमोर ठेवण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे. मनाचे शास्त्र जाणण्याचा प्रयत्न करावा. आपल्या कुटुंब आणि भारतीय संस्कृतीचा लौकिक जगात होईल असा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

सर्वसमावेशक नेतृत्वाचा विकास करा-डॉ.रघुनाथ माशेलकर

श्री.माशेलकर म्हणाले, युवकांनी नेहमी उच्च ध्येय ठेवावे आणि ते गाठण्यासाठी प्रयत्न करावे. आपण केलेल्या विचाराचा, निश्चयाचा नेहमी ध्यास धरावा. स्वत: सर्वसमावेशक नेतृत्वाचा विकास करा. नव्या नेतृत्वाने नेहमी नवे ज्ञान, विचार, मूल्य शिकण्याचा प्रयत्न करावा. युवकांनी नव्या विश्वासाने आणि उमेदीने आपल्या क्षेत्रात कार्यरत रहावे. आपल्या यशाला कोणत्याही मर्यादा नाहीत हा विचार मनात ठेवत निश्चित केलेल्या मार्गावर वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

रजिस्ट्रार ऑफ कंपनीज पुणे मंगेश जाधव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. भारत लोकशाही राष्ट्र असून लोकशाहीची मूल्ये पुढे नेण्याचे कार्य युवकांचे आहे. भारताची मूल्ये जगात पोहोचवून आपण देशाच्या लौकिकात भर घालावी, असे आवाहन त्यांनी केले.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आयोजनाला पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी सहभागी युवकांनी देशासाठी योगदान देण्याची शपथ केली.

कौशल्य  प्रशिक्षणाकडे  सकारात्कमतेने पाहण्याची  आवश्यकता  – जुही बोस

0

यशस्वी  एकेडमी फॉर  स्किल्स तर्फे  आयोजित  ‘कौशल्य  दीक्षांत  समारंभ’ संपन्न

पुणे : दिनांक  १७ सप्टेंबर  २०२२ : कौशल्य  प्रशिक्षणाकडे  सकारात्मकतेने  पाहण्याची आवश्यकता  असून कौशल्य  प्रशिक्षणाचा सामाजिक स्तर  उंचावण्यासाठी  सर्वांनी प्रयत्नशील होण्याची गरज  आहे, असे  मत  भारतीय  युवा शक्ती ट्रस्टच्या मेन्टॉर  जुही  बोस  यांनी  व्यक्त केले.

यशस्वी  एकेडमी  फॉर स्किल्स तर्फे पुण्यातील  शिवाजीनगर  येथे आयोजित करण्यात  आलेल्या  कौशल्य  दीक्षांत  समारंभात त्या  प्रमुख  अतिथी  म्हणून  बोलत  होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या  की, एखाद्या डिप्लोमा  किंवा पदवी धारकाला  ज्याप्रमाणे  समारंभपूर्वक  प्रमाणपत्र  प्रदान केले जाते. त्याचप्रमाणे  अप्रेन्टिसशिप  प्रशिक्षण पूर्ण  करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना देखील  समारंभपुर्वक  प्रमाणपत्र  प्रदान करण्यासाठी  ‘कौशल्य  दीक्षांत  समारंभ’ आयोजित  करणे  ही  केंद्र सरकारची संकल्पना खूपच  प्रेरणादायी  आहे असे मत जुही  बोस  यांनी  व्यक्त केले.   

अप्रेन्टिसशिप  प्रशिक्षण  पूर्ण  केल्यानंतर  उद्योगक्षेत्रात रोजगारसंधी प्राप्त  झाल्यानंतरसुद्धा आपल्यातील  शिकण्याची  वृत्ती  कायम जागी  ठेवा. सातत्याने आपल्यातील दोषांचे  निरसन  करत सद्गुणांची  वाढ करण्याकडे लक्ष  देत राहायला हवे. आपल्याला  जे आणि ज्या प्रकारचे काम करण्याची संधी मिळालेली  असेल त्या काम करण्याच्या  पद्धतीमध्ये आपण आणखी  काय  सुधारणा  करू  शकतो, यादृष्टीने  विचार  करीत एकमेकांना  सहकार्य  करण्याची, एकमेकांकडून  शिकण्याची वृत्ती  जोपासायला  हवी  असे  मत  जुही  बोस  यांनी  व्यक्त  केले.

याप्रसंगी  बोलताना  भारतीय  युवा शक्ती ट्रस्टचे  फिल्ड  ऑफिसर सोहम धापटे यांनी उदयोजकता  म्हणजे काय हे विविध  उदाहरणांद्वारे  समजावून  सांगत  बीवायएसटी कशाप्रकारे नवउद्योजकांना  सहकार्य व मार्गदर्शन  करते  याविषयी  सविस्तर  माहिती  दिली.  

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना  यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सचे  संचालक  राजेश  नागरे यांनी कौशल्य दीक्षांत  समारंभानिमित्त  विद्यार्थ्यांचे  अभिनंदन  करीत त्यांना  पुढील  वाटचालीसाठी  मार्गदर्शन  करीत  शुभेच्छा  दिल्या.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते अप्रेन्टिस योजनेंतर्गत  विविध  स्केटर स्किल कौन्सिलच्या  अंतर्गत  पुणे येथील विविध  आस्थापनांमधील अप्रेन्टिस  प्रशिक्षण  पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना  प्रमाणपत्र प्रदान  करण्यात  आली. कार्यक्रमाला  यशस्वी  एकेडमी  फॉर स्किल्सच्या  संचालिका  स्मिता  धुमाळ, ‘यशस्वी’ संस्थेचे  संचालक  संजय  छत्रे, बीवायएसटी चे क्लस्टर  हेड  अभिषेक  धर्माधिकारी  उपस्थित  होते.

या कार्यक्रमासाठी  ईशा  फाटक, गणेश  साळवे, अबिद  शेख  आदींनी  विशेष  सहकार्य  केले.

पंतप्रधान मोदींनी जात लपविल्याचा नाना पटोले यांचा आरोप ,म्हणाले मुख्यमंत्री तर नाचगाण्यात व्यस्त ..

0

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत, भाजप त्यांना ओबीसी म्हणून प्रोजेक्ट करत आहे असा आरोप काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ओबीसींची मतं मिळवण्यासाठी त्याचा हा मोठा प्रयत्न आहे, मात्र मोदी हे ओबीसी नाहीत, त्याचे लवकरच पुरावे देऊन असंही त्यांनी म्हटलंय. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.नरेंद्र मोदी हे गुजरातमधील श्रीमंत जातींपैकी आहेत, आम्ही ते उघड करणार आहोत, असं मोठं वक्तव्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी नेमण्यात आलेल्या आयोगाने आडनावावरुन माहिती संग्रहित केली होती. मात्र आडनावावरुन जात समजत नाही. एकाच आडनावाचे लोक अनेक जातींमध्ये असू शकतात. त्यामुळेच मोदी हे ओबीसी नाहीत. त्यासंदर्भातील सगळे पुरावेदेखील आमच्याकडे आहेत. हे पुरावे लवकरच जनतेपुढे आणू, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातपेक्षा आम्ही महाराष्ट्रात उद्योग पुढे नेऊ अशी घोषणा केली. परंतु सन 2014 ते 2019 दरम्यान त्यांनी अनेक गोष्टी गुजरातला पाठवल्या आहे. त्यांचे स्वतःचे ही पद कमी झाले असून त्यांना मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले, याबाबत आम्हाला ही दुःख आहे. राज्याचे मुख्यमंत्री सध्या नाच गाण्यात असल्याने त्यांच्याबाबत मी काही बोलणार नाही, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली. नाना पटोले म्हणाले की, “फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेणारे सगळे मोदी आणि शाहांचे हस्तक आहेत. त्यांना महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रातील तरुण जनतेचं काहीही देणंघेणं नाही. मुख्यमंत्र्यांबाबत काही न बोललेलंच बरं. सध्याचे मुख्यमंत्री नाचगाण्यात व्यस्त आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना असे अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. त्यांनी काय काय गुजरातला नेलं याची यादी द्यावी. मात्र तेच फडणवीस महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेण्याच्या गोष्टी करतात. राधाकृष्ण विखे पाटील देखील स्वत: केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये गेले

पुढे ते म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात जातीनिहाय जनगणना झाली त्याचा अहवाल केंद्र सरकारने जाहीर करावे. भारत जोडो यात्रा राजकीय नसून तो देशाला एकत्रित बांधण्याची यात्रा आहे. तिरंगा देशात नेहमी फडकत राहिला पाहिजे अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे यात्रेत सहभागी होण्याबाबत आमच्या सहकारी मित्रांना निमंत्रण गरज नाही.

जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे

काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ओबीसी संघटन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बंठिया आयोगाने आडनाववरून राज्यात 38 टक्के ओबीसी असल्याचे सांगितले. पण हा डाटा चुकीचा आहे. राज्यात सुमारे 60 टक्के ओबीसी जनता असून जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ती आमची मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नसून भाजप त्यांचे चुकीचे मार्केटिंग करत आहे. केंद्राने ओबीसी जनगणना केली पाहिजे त्याचा फुटबॉल करू नये, असे मत देखील नाना पटोलंनी व्यक्त केला.

लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न

पुढे नाना पटोले म्हणाले की, नोटबंदी हा देशातला नव्हे तर जगातला सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. नोटबंदी काळात भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक जिल्ह्यात जमिनी घेण्यात आल्या त्यावर कार्यालये बंधण्यात आलीत. भाजपची ही चिवडा पार्टी होती, त्यांच्याकडे जमिनीसाठी पैसे कुठून आलेत. नोटबंदीच्या माध्यमातून त्यांनी काळा पैसा जमा केला असून, त्या पैशांच्या माध्यमातून देशात राजकारण सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवून लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न सध्या भाजपकडून सुरू आहे.

हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे निजाम राजवटीपासून मुक्तीसाठी झालेल्या या महान मुक्तिसंग्रामाचा इतिहास आणि अनाम शहिदांच्या कहाण्या युवा पिढीपर्यंत पोहचवून त्यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे-अमित शाह

0

नवी दिल्‍ली, 17 सप्‍टेंबर 2022

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शहा यांनी आज तेलंगणातील 75 व्या हैदराबाद मुक्ती दिनाच्या सोहळ्यात भाग घेतला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी आणि केंद्रीय गृहसचिव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001UVP0.jpg

यावेळी आपल्या भाषणात अमित शहा म्हणाले की, 15 ऑगस्ट 1947 रोजी संपूर्ण देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत होता, पण हैदराबादला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. 13 महिने या प्रदेशाने निजामाचे अन्याय आणि अत्याचार सहन केले आणि त्यानंतर सरदार पटेलांनी पोलीस कारवाई केल्यावर तेलंगणा स्वतंत्र झाला. कोमाराम भीम, रामजी गोंड, स्वामी रामानंद तीर्थ, एम चिन्नारेड्डी, नरसिंह राव, शेख बंदगी, केव्ही नरसिंह राव, विद्याधर गुरु आणि पंडित केशवराव कोरटकर यांसारख्या असंख्य लोकांनी या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले.   ते म्हणाले की निजामाविरुद्ध बंडाची हाक देणाऱ्या अनाभेरी प्रभाकरी राव, बद्दम येल्ला रेड्डी, रवी नारायण रेड्डी, बुरुगुला रामकृष्ण राव, काळोजी नारायण राव, दिगंबरराव बिंदू, वामनराव नाईक, आ. कृ. वाघमारे, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री बी. रामकृष्ण राव याना श्रद्धांजली अर्पण करतो. निजामाविरुद्ध लढणाऱ्या आणि रझाकार सेनेच्या विरोधात सशस्त्र संघर्ष करणाऱ्या कल्याण कर्नाटकातील अनेक नेत्यांना शहा यांनी वंदन केले. यामध्ये बीदरचे माजी खासदार रामचंद्र वीरप्पा, जेवर्गीचे सरदार शारंगौडा पाटील, रायचूरचे के  एम. नागप्पा, कोप्पलमधून नंतर लोकसभेचे सदस्य झालेले शिवकुमारस्वामी अलवंडी, कनकगिरीचे जयतीर्थ राजपुरोहित, यादगीरचे कोल्लूर मल्लप्पा, करातगीचे बेनकल भीमसेनराव आणि अन्य लोकांचा समावेश आहे. 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002C4FT.jpg

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, हैदराबाद मुक्ती दिन सरकारी कार्यक्रम म्हणून  साजरा करावा, अशी या भागातील लोकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. पण दुर्दैव आहे की 75 वर्षात इथे राज्य करणाऱ्यांनी व्होट बँकेच्या राजकारणामुळे हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्याचे धाडस केले नाही. ते म्हणाले की, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणातील लोकांच्या भावना लक्षात घेऊन हैदराबाद मुक्ति दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी मोदीजींचे खूप खूप आभार आणि अभिनंदन.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003WTG2.jpg

अमित शाह म्हणाले की हैदराबाद मुक्ती दिवस साजरा करण्या मागचा उद्देश, या मुक्ती संग्रामाचा इतिहास आणि ज्ञात-अज्ञात शहीदांच्या गाथा युवा पिढीच्या मनात पुनरुज्जीवित करून त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्ज्वलित करणे हा आहे. यामुळे आपल्या नवीन पिढी मध्ये देशभक्तीची भावना पुनरुज्जीवित होईल. शाह यांनी आज सरदार पपन्ना गौड़, तुर्रेबाज़ खान, अलाउद्दीन, भाग्य रेड्डी वर्मा, पंडित नरेंद्र आर्य, वंदेमातरम रामचंद्र राव, शोयबुल्ला खान, मोगिलिया गौड़, डोड्डी कोमारैया, चकली इलम्मा यांच्या प्रति देखील कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी विशेषतः नारायण राव पवार, जगदीश आर्य आणि गंदैया आर्य या वीर स्वातंत्र्य सेनानींना आदरांजली वाहिली, ज्यांनी निजामाच्या सुरक्षा रक्षकांचा सामना करताना शौर्याची पराकाष्ठा केली होती. केंद्रीय गृहमंत्र्यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी उस्मानिया विद्यापीठात राष्ट्र ध्वज फडकवणाऱ्या देशभक्तांना देखील नमन केलं, ज्यांना निजामाच्या सेनेनं अटक केली होतं. ते म्हणाले की अनेक संघटनांनी स्वातंत्र्याच्या या लढाईत आपलं योगदान दिलं होतं. आर्य समाज, हिंदू महासभेचा भागानगर सत्याग्रह असो, की उस्मानिया विद्यापीठात छेडलेलं वंदे मातरम आंदोलन असो. गांधीजींनी स्थापन केलेल्या हैदराबाद स्टेट काँग्रेस आणि बिदर क्षेत्रातील शेतकरी  त्या वेळच्या संघर्षाची लोकगीतं आजही गातात.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image00409LT.jpg

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की आजच्याच दिवशी 1948 मध्ये तेलंगणा, मराठवाडा आणि कल्याण कर्नाटक स्वतंत्र झाले आणि 13 ते 17 सप्टेंबर 1948 दरम्यान झालेल्या 109 तासांच्या संघर्षात अनेक वीर या ठिकाणी शहीद झाले. ते म्हणाले की निजाम आणि त्याच्या रझाकारांनी विविध प्रकारचे कठोर कायदे लागू करून असह्य अन्याय आणि महिलांवर अत्याचार करून तिन्ही राज्यांच्या जनतेला चिरडण्याचा प्रयत्न केला होता. ही  दुष्कृत्य आणि अत्याचारा विरोधात आपल्या जनतेने आंदोलन केलं होतं आणि शेवटी आपण विजयी झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद मुक्ती दिनाला संपूर्ण शासकीय आदेशा अंतर्गत साजरा करण्याचा निर्णय घेऊन हैदराबाद मुक्ती संग्रामाला स्वीकृती आणि आदरांजली वाहिली आहे.  

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005LD0E.jpg

शाह म्हणाले की ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला सुरक्षित आणि विकसित केलं आहे, भारतीय आणि भारतीयत्वाला सर्वोच्च स्थानी बसवण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे, आणि देशाच्या सर्व शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे, हा उपक्रम निश्चितपणे सुरूच राहील आणि हैदराबाद मुक्ती दिन साजरा करणेही निश्चितच सुरु राहील.   

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006F1FY.jpg

“वाघांची संख्या दुप्पट तर हत्तींची संख्याही 30 हजारांहून अधिक झाली आहे” -पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

आज देशातील 75 पाणथळ जागा रामसर स्थळे म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत, त्यापैकी गेल्या 4 वर्षात 26 स्थळांचा समावेश झाला आहे”

नवी दिल्‍ली, 17 सप्‍टेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातून नामशेष झालेले जंगली चित्ते आज कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले.  हे चित्ते नामिबियातून आणले असून हा जगातील पहिला मोठा आंतरखंडीय वन्य मांसभक्षक स्थानांतरण प्रकल्प आहे. हे स्थानांतरण  प्रोजेक्ट चीता अंतर्गत भारतात केले जात आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानात दोन ठिकाणी ह चित्ते पंतप्रधानांनी सोडले. कार्यक्रमस्थळी चित्ता मित्र, चित्ता पुनर्वसन व्यवस्थापन गट आणि विद्यार्थ्यांशीही पंतप्रधानांनी संवाद साधला.  या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित केले.

पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित करताना, मानवतेला भूतकाळातील चूका सुधारण्याची आणि नवीन भविष्य घडवण्याची संधी देणार्‍या निवडक संधींवर प्रकाश टाकून कृतज्ञता व्यक्त केली.  असाच एक क्षण आज आपल्यासमोर असल्याचे मोदींनी नमूद केले. अनेक दशकांपूर्वी जैवविविधतेचा जो जुना दुवा तुटला होता, नामशेष झाला होता, आज तो पुनर्संचयित करण्याची संधी आपल्याकडे आहे, “आज चित्ता भारताच्या मातीत परतला आहे असे ते म्हणाले.”  

या स्मरणीय प्रसंगामुळे भारताची निसर्गप्रेमी चेतना पूर्ण शक्तीने जागृत झाली आहे असे त्यांनी अधोरेखित केले .  नामिबिया आणि तिथल्या सरकारचा विशेष उल्लेख करत, या ऐतिहासिक प्रसंगी तमाम देशवासियांना मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. यांच्याच सहकार्याने अनेक दशकांनंतर चिते भारतीय भूमीत परतले आहेत असे ते म्हणाले.  “मला खात्री आहे की, हे चित्ते आपल्याला केवळ निसर्गाप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देतील असे नाही तर आपल्या मानवी मूल्यांची आणि परंपरांचीही जाणीव करून देतील,” असे पंतप्रधान म्हणाले.

स्वातंत्र्याच्या अमृतकाळाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी ‘पंच प्राण’ची आठवण करुन दिली. ‘आपल्या वारशाचा अभिमान बाळगणे’ आणि ‘गुलामीच्या मानसिकतेतून मुक्ती’ या महत्त्वाच्या वृत्तींचा त्यांनी उल्लेख केला.  “जेव्हा आपण आपल्या मुळांपासून दूर असतो, तेव्हा आपण बरेच काही गमावतो असे त्यांनी सांगितले.”  गेल्या काही शतकांमध्ये निसर्गाचे शोषण हे शक्तीचे आणि आधुनिकतेचे प्रतीक मानले जात होते.  “1947 मध्ये, जेव्हा देशात फक्त शेवटचे तीन चित्ते उरले होते, तेव्हा त्यांचीही सालच्या जंगलात निर्दयीपणे आणि बेजबाबदारपणे शिकार करण्यात आली होती”, याची त्यांनी आठवण करून दिली.

1952 मध्ये भारतातून चित्ते नामशेष झाले असले तरी गेल्या सात दशकांपासून त्यांच्या पुनर्वसनासाठी कोणतेही अर्थपूर्ण प्रयत्न झाले नाहीत, अशी टीका पंतप्रधानांनी केली.  

स्वातंत्र्याच्या महोत्सवात देशाने नव्या उर्जेने चित्त्यांचे पुनर्वसन करण्यास सुरुवात केली आहे, असा आनंद पंतप्रधानांनी व्यक्त केला. “अमृतामध्ये मृतांनाही जिवंत करण्याची ताकद आहे”, असे मोदी म्हणाले.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील कर्तव्य आणि विश्वासाचे हे अमृत केवळ आपल्या वारशाचे पुनरुज्जीवन करत नाही, तर आता चित्त्यांनीही भारताच्या मातीवर पाय ठेवला आहे असे त्यांनी सांगितले.

हे पुनर्वसन यशस्वी करण्यामागे मागील अनेक वर्षांच्या मेहनतीकडे सर्वांचे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले की, ज्या क्षेत्राला फारसे राजकीय महत्त्व दिले जात नाही अशा क्षेत्रासाठी सर्वोतोपरी ताकद पणाला लावण्यात आली. आपल्या प्रतिभावान शास्त्रज्ञांनी दक्षिण आफ्रिका आणि नामिबियाच्या तज्ञांसोबत काम करत विस्तृत संशोधन करत एक तपशीलवार चित्ता कृती योजना तयार केली असे त्यांनी नमूद केले.  चित्त्यांसाठी सर्वात योग्य क्षेत्र शोधण्यासाठी देशभरात वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यानंतर याच्या शुभारंभासाठी कुनो राष्ट्रीय उद्यानाची निवड करण्यात आली.  “आज आपल्या मेहनतीचे फळ सर्वांसमोर आहे”, असेही ते म्हणाले.

जेव्हा निसर्ग आणि पर्यावरणाचा रक्षण केलं जातं तेव्हा भविष्यही सुरक्षित होतं आणि वाढ आणि समृद्धीसाठी अनेक मार्ग खुले होतात याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला.  ते पुढे म्हणाले की कुनो राष्ट्रीय उद्यानात जेव्हा चिते वावरतील ,  तेव्हा पर्यावरणासह गवताळ जमिन परिसंस्था  देखील पूर्ववत  होईल . जैवविविधतेत वाढ होईल. मोदी यांनी अधोरेखित केलं की वाढत्या इको पर्यटनामुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि त्यामुळे विकासाच्या  नवीन शक्यता निर्माण होतील. 

कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडलेल्या चित्यांबाबत  पंतप्रधानांनी सर्व देशवासीयांना संयम राखण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की त्यांना काही महिन्यांचा कालावधी दिला  गेला  पाहिजे. आज हे चित्ते आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत आणि त्यांना  हे क्षेत्र परिचित नाही, यासाठीच  त्यांना कुनो  राष्ट्रीय उद्यान हा आपला अधिवास वाटावा यासाठी काही  महिन्यांचा कालावधी  दिला पाहिजे.  चित्त्यांना इथे स्थिरस्थावर होण्यासाठी आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केलं जात असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. आज जेव्हा जग निसर्ग आणि पर्यावरणाकडे पाहत आहे तेव्हा शाश्वत विकासाबद्दल चर्चा होते.  भारतासाठी निसर्ग आणि पर्यावरण, इथले प्राणी आणि पक्षी हे फक्त शाश्वतता आणि सुरक्षा नसून देशाची संवेदनशीलता आणि आध्यात्मिकताही आहे असं त्यांनी सांगितल, आपल्या सभोवती असलेल्या अगदी लहानात लहान कीटकांचीही काळजी घ्यायला  आपल्याला शिकवलं गेले आहे असं मोदी यावेळी म्हणाले.  एखादा प्राणी आपल्यातून निघून गेला तर आपलं मन अपराधीपणाच्या भावनेने भरून जाणं हे आपल्या परंपरेतच आहे तर मग  प्राण्यांची अख्खी प्रजाती  निघून जाणं आपल्याला कसे  चालेल असा सवाल त्यांनी यावेळी केला.  

आज काही आफ्रिकन देश तसच इराणमध्ये  चित्ते दिसून येतात मात्र भारताचं  नाव त्या यादीतून अनेक वर्षांपूर्वी  हटवले  गेले. मात्र आगामी काळात मुलांना हे सहन करावे लागणार नाही, मला खात्री आहे, कुनो  राष्ट्रीय उद्यानात  चित्ते धावताना  मुलांना पाहायला मिळतील असं पंतप्रधान म्हणाले. आज अरण्यात  निर्माण झालेली पोकळी लवकरच चित्यांच्या उपस्थितीने  भरून निघेल असं ते म्हणाले.

21व्या शतकातला भारत संपूर्ण जगाला एक संदेश देत आहे की अर्थशास्त्र आणि परिसंस्था ही संघर्षाची  क्षेत्र नव्हेत, पर्यावरणाच्या संरक्षणाने आर्थिक  विकास घडवून आणता येतो याचं भारत हे जिवंत उदाहरण असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.  आज आपण एका बाजूला , जगातली सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत आणि त्याचवेळी आपल्या देशातलं वनक्षेत्र सुद्धा वेगाने वाढत आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.  

सरकारने केलेल्या कामगिरीचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. ते म्हणाले की 2014 मध्ये आपलं  सरकार स्थापन झाल्यावर देशात सुमारे अडीचशे संरक्षित क्षेत्रांमध्ये वाढ झाली आहे.  देशात  आशियाई सिंहाच्या संख्येत वाढ झाली असून गुजरात हे  देशातल्या आशियाई  सिंहाच्या  वाढीचं  मोठं क्षेत्र  म्हणून उभारून वर येत असल्याचं त्यांनी सांगितलं.  गेल्या दशकभरातले कठोर परिश्रम, संशोधनाधारित धोरण आणि लोक सहभाग याचा यामध्ये फार मोठा वाटा असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. गुजरात मध्ये घेतलेली प्रतिज्ञा आपल्याला आठवत असल्याचे  मोदी यावेळी म्हणाले. आम्ही वन्य प्राण्यांबद्दलचा आदर वाढवून त्यांच्या विरोधातला संघर्ष कमी करू अशी ती प्रतिज्ञा होती अशी त्यांनी आठवण करून दिली आणि याचे परिणाम आता समोर दिसत आहेत  असं ते म्हणाले. वाघांच्या संख्येचं  उद्दिष्ट गाठण्यात आपण नियत  वेळेआधीच यश मिळवलं  आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. आसाम मध्ये एक शिंगी गेंड्याचा  अधिवास धोक्यात आला होता , मात्र आज त्यांची संख्या वाढल्याची  आठवण त्यांनी करून दिली.

गेल्या काही वर्षात हत्तींची संख्या सुद्धा तीस हजाराहून जास्त वाढली आहे. पाणथळ क्षेत्रात वाढलेल्या प्राणी आणि वनस्पती सृष्टीच्या संवर्धनासाठी झालेल्या कामाचीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली. जगभरातील कोट्यवधी लोकांच्या गरजा आणि जीवन हे पाणथळ म्हणजेच दलदलीच्या क्षेत्राच्या परिसंस्थेवर अवलंबून आहे असं ते म्हणाले. आज देशातल्या 75 पाणथळ जागा रामसरक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत, यापैकी 26 क्षेत्रं गेल्या चार वर्षात समाविष्ट करण्यात आली आहेत असं पंतप्रधानांनी सांगितलं. या शतकातल्या या सर्व प्रयत्नांचा परिणाम येत्या अनेक शतकांमध्ये पाहायला तसच अनुभवायला मिळेल, आणि त्यामुळे प्रगतीचे नवे मार्ग निर्माण होतील असं ते म्हणाले. भारत सध्या जागतिक पटलावर मांडत असलेल्या जागतिक मुद्द्यांकडे सुद्धा पंतप्रधानांनी यावेळी सर्वांचं लक्ष वेधलं. जागतिक समस्या, त्यावरचे उपाय आणि आपल्या सर्वांची जीवनपद्धती या सर्वांचं समग्र विश्लेषण करण्याच्या गरजेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. LIFE ( लाईफस्टाईल फॉर द एन्व्हायरन्मेंट फॉर द वर्ल्ड अँड एफर्ट्स ऑफ इंटरनॅशनल सोलर अलायन्स) म्हणजेच जागतिक पर्यावरणसुरक्षेला पूरक अशी जीवन पद्धती आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसाठी केले जाणारे प्रयत्न, या मंत्राचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की भारत यासाठी संपूर्ण जगाला एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे; या प्रयत्नांना मिळणारं यश जगाला मार्गदर्शन करुन जगाचं भवितव्य ठरवेल. 

जागतिक आव्हानांचं मूल्यमापन, ही आव्हानं आपल्या सर्वांची स्वतःची वैयक्तिक आव्हानं आहेत असं समजून करण्याची वेळ आली आहे आणि आपण आपल्या जीवनशैलीत केलेला एखादा छोटासा बदल सुद्धा वसुंधरेच्या भविष्यातल्या सुरक्षिततेसाठी पाया ठरू शकतो यावर त्यांनी जोर दिला. मला खात्री आहे की भारताचे यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि भारतीय परंपरा, संपूर्ण जगभरातल्या मानवजातीला या दिशेनं मार्गदर्शन करतील आणि उत्तम जगताचं स्वप्न साकार करण्यासाठी पुरेसं बळ देईल असं म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

पार्श्वभूमी

मध्य प्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात पंतप्रधानांच्या हस्ते चित्ते सोडण्याचा हा उपक्रम म्हणजे, भारतीय वन्य प्राणी जीवन आणि त्यांचा अधिवास  पुनरुज्जीवीत करण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. भारतात 1952 साली चित्ता हा प्राणी नामशेष म्हणून घोषित करण्यात आला होता. भारत आणि नामीबिया यांच्यामध्ये यावर्षी सुरुवातीला झालेल्या सामंजस्य करारा अन्वये हे चित्ते नामीबियातून मागवण्यात आले आहेत. प्रोजेक्ट चित्ता म्हणजेच चित्ता प्रकल्प, या जगातल्या पहिल्या मोठ्या आंतरखंडीय मांसभक्षक  प्राण्यांच्या इतर देशांमध्ये स्थानांतर करणाऱ्या प्रकल्पाअंतर्गत, भारतात पुन्हा एकदा चित्त्यांचा अधिवास निर्माण केला जात आहे. भारतात गवताळ प्रदेश परिसंस्था आणि अभयारण्य तसंच खुले जंगल क्षेत्र वाढवायला, या चित्त्यांमुळे मदत होईल. समाजाला मोठ्या प्रमाणावर लाभदायक ठरणाऱ्या,जलसुरक्षा,  कार्बनचं प्रमाण घटवणं आणि जमिनीच्या जलधारण क्षमतेचं संवर्धन यासारख्या, पर्यावरण परिसंस्थेकडून पुरवल्या जाणाऱ्या सुविधा आणि जैवविविधता यांचं संवर्धन करणं, यामुळे सुलभ होणार आहे. पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संवर्धना प्रति पंतप्रधानांनी व्यक्त केलेली वचनबद्धता जपण्याच्या दृष्टीनं हे प्रयत्न होत असून, त्यामुळे या क्षेत्रांमध्ये स्थानिकांना, परिसंस्था विकास आणि वन्य पर्यटनाच्या माध्यमातून उपजीविकेच्या जास्तीत जास्त संधी मिळू शकतील.

राजधानीत प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी

0

नवी दिल्ली, 17 : केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे  यांची जयंती आज महाराष्ट्र सदन येथे  साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहाय्यक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त (अ.का.) निलेश केदारे यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी  व  कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

उर्मिलासोबत काम करण्याचं श्रेयसचं स्वप्न होणार साकार

0

अवघ्या मनोरंजन विश्वाला आश्चर्याचा सुखद धक्का देत मराठी सिनेसृष्टीनं एकाच वेळी तब्बल सात चित्रपटांची घोषणा करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आजवर हिंदीमध्ये बऱ्याच सुपरहिट चित्रपटांचं लेखन आणि निर्मिती करणाऱ्या परितोष पेंटर यांच्या कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रॉडक्शन्स आणि राजेशकुमार मोहंती यांच्या एस. आर एन्टरप्रायजर्स या दोन मोठ्या निर्मितीसंस्थांनी एकत्रितपणे आगामी सात चित्रपटांची घोषणा केली आहे. बुधवारी मुंबईत संपन्न झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात मराठीतील दिग्गज कलाकार-तंत्रज्ञांच्या साक्षीनं सात चित्रपटांची अधिकृत घोषणा करण्यात आली. मनोज अवाना या चित्रपटांचे सहनिर्माते असून, सेजल पेंटर आणि मंगेश रामचंद्र जगताप ऑनलाइन निर्माते आहेत. या चित्रपटांच्या यादीतील ती मी नव्हेच या महत्त्वपूर्ण चित्रपटानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

परितोष पेंटर यांनी लिहिलेल्या ती मी नव्हेच या चित्रपटात श्रेयस तळपदे, उर्मिला मातोंडकर आणि निनाद कामत हे हिंदी कलाविश्वातील नामवंत कलाकार प्रथमच मराठीमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. जुन्या आठवणींमध्ये रमलेल्या श्रेयस तळपदेनं दिलखुलासपणे संवाद साधला. श्रेयस म्हणाला की, त्या काळी ‘रंगीला’मधील ‘या ही रे…’ या गाण्यातील उर्मिलाच्या रुपानं सर्वांना घायाळ केलं होतं. त्याच उर्मिलासोबत कधी काळी स्क्रीन शेअर करायला मिळेल असं वाटलं नव्हतं. परितोषनं ही किमया साधली आहे. योगायोग म्हणजे आम्ही दोघेही मिठीबाई कॅालेजचे विद्यार्थी आहोत. उर्मिलासोबत काम करण्याची संधी मिळाल्यान खूप आनंदी आहे. ती मी नव्हेच हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट असल्याचही श्रेयस म्हणाला.

ती मी नव्हेच असं म्हणत एका मोठ्या कालावधीनंतर उर्मिला मराठीमध्ये पुनरागमन करत आहे. अस्खलित मराठीत उत्स्फूर्तपणे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना उर्मिला म्हणाली की, चित्रपटाची कथा ऐकताक्षणी मला भावली. त्यामुळे पारितोषला नकार देऊच शकले नाही. ती मी नव्हेचच्या माध्यमातून पारितोषसोबत काम करण्याचा आनंद तर आहेच शिवाय मराठी चित्रपटाद्वारे आणि श्रेयस तळपदेसारख्या सहकलाकारासोबत काम करायला मिळत असल्याचा विशेष आनंद झाल्याचं उर्मिला म्हणाली.

ती मी नव्हेच या चित्रपटासोबत ‘निरवधी’, ‘सुटका’, ‘एप्रिल फुल’, ‘फक्त महिलांसाठी’, ‘थ्री चिअर्स’ आणि ‘एकदा येऊन तर बघा’ हे चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

पंतप्रधानांनी भारतातून नामशेष झालेले जंगली चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले

0

नवी दिल्‍ली, 17 सप्‍टेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातून नामशेष झालेले जंगली चित्ते आज कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले. हे चित्ते नामिबियातून आणले असून हा जगातील पहिला मोठा आंतरखंडीय वन्य मांसभक्षक स्थानांतरण प्रकल्प आहे. हे स्थानांतरण  प्रोजेक्ट चीता अंतर्गत भारतात केले जात आहे. या आठ चित्त्यांपैकी पाच मादी आणि तीन नर चित्ता आहेत.

कुनो राष्ट्रीय उद्यानात दोन ठिकाणी पंतप्रधानांनी चित्ते  सोडले. कार्यक्रमस्थळी चित्ता मित्र, चित्ता पुनर्वसन व्यवस्थापन गट आणि विद्यार्थ्यांशीही पंतप्रधानांनी संवाद साधला.  या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित केले.

पंतप्रधानांनी आज कुनो राष्ट्रीय उद्यानात जंगली चित्ते सोडणे हा भारतातील वन्यजीव आणि त्याच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन तसेच वैविध्य जपण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.  1952 मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले. सोडण्यात येणारे चित्ते नामिबियातील आहेत आणि त्यांना या वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या सामंजस्य करारांतर्गत आणण्यात आले आहे. प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत हे चित्ते भारतात आणले जात असून  हा जगातील पहिला मोठा आंतरखंडीय वन्य मांसभक्षक स्थानांतरण प्रकल्प आहे.

चित्त्यांमुळे भारतातील खुली जंगले आणि गवताळ प्रदेशातील परिसंस्था पुनर्संचयित करण्यात मदत होईल. यामुळे जैवविविधतेचे संरक्षण करण्यात मदत होईल आणि जलसुरक्षा, कार्बन कमी करणे आणि मातीतील ओलावा जपणे यासारख्या परिसंस्थेच्या सेवा वाढवण्यास मदत होईल. परिणामी समाजाला मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संवर्धनासाठी पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने हा प्रयत्न पर्यावरण-विकास आणि पर्यावरणीय पर्यटन उपक्रमांद्वारे स्थानिकासाठी उपजीविकेच्या संधी वाढवण्यास कारणीभूत ठरेल.

भारतात चित्यांच्या संख्येत  ऐतिहासिक  वेगान झालेली  वाढ हा गेल्या आठ वर्षात शाश्वतता आणि पर्यावरण रक्षणासाठी उचललेल्या दूरगामी आणि सातत्यपूर्ण पावलांचा परिणाम असून त्यामुळेच पर्यावरण रक्षण आणि शाश्वतता याबाबत महत्त्वपूर्ण उद्दिष्ट  गाठता आली आहेत.  2014 मधील देशातल्या  भौगोलिक दृष्ट्या संरक्षित क्षेत्रात 4 पूर्णांक 90 शतांश टक्क्यांवरून वाढ होत ते आता 5 पूर्णांक 3 शतांश टक्क्यांवर पोहोचलं आहे.  यात 2014 मध्ये असलेल्या  देशाच्या 740 क्षेत्रांच्या 161081.62 चौरस किलोमीटरहून वाढ होऊन आता 981 क्षेत्रांच्या 171921 चौरस किलोमीटर  वाढीचा अंतर्भाव आहे.  

वने आणि वृक्षांनी वेढलेला भूभाग गेल्या चार वर्षात 16 हजार चौरस किलोमीटरने वाढला आहे. वनक्षेत्रात सातत्याने वाढ होत असणाऱ्या जगातल्या काही निवडक देशांमध्ये भारताचा समावेश आहे. 

देशातल्या संरक्षित अधिवासात 2014 मधल्या 43 या संख्येवरून 2019 मध्ये 100 पर्यंत वाढ झाली आहे. 

देशातल्या 18 राज्यात सुमारे 75 हजार चौरस किलोमीटरवर पसरलेल्या वनक्षेत्रात व्याघ्र अभयारण्यांची संख्या 52 एवढी असून ही संख्या जागतिक पातळीवर व्याघ्र अभयारण्यांच्या सुमारे 75 टक्के इतकी आहे.  देशात 2022 पर्यंत ठेवलेल्या उद्दिष्टाच्या चार वर्ष आधी म्हणजेच 2018 पर्यंत वाघांची संख्या दुपटीने वाढण्यात यश मिळालं आहे. देशातली वाघांची संख्या 2014 च्या 2226 वरून 2018 पर्यंत 2967 इतकी झाली आहे.  

वाघांच्या जतन आणि  संरक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीत 2014 च्या 185 कोटी रुपयांवरून 2022 पर्यंत 300 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. 

आशियाई सिंहांच्या संख्येत 28.87 शतांश टक्के(आतापर्यंतचा सर्वात जास्त वेग) वेगाने सातत्याने वाढ दिसत असून ही संख्या 2015 च्या 523 वरून वाढून  आता आशियाई सिंहांची संख्या 674 झाली आहे. 

भारतात आता (2020) 12852 बिबटे असून 2014 मध्ये ही संख्या 7910 होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, . म्हणजेच, बिबट्यांच्या संख्येत सुमारे 60 टक्क्यांहून अधिक वाढ दिसत आहे.  

मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री  नरेंद्र सिंह तोमर,  भूपेंद्र यादव, ज्योतिरादित्य एम सिंदीया आणि अश्विनी चौबे यावेळी उपस्थित होते.

देशात विज्ञान आणि आरोग्याबाबत साक्षरता नाही-पद्मश्री डाॅ. रमण गंगाखेडकर

0

डॉ. अविनाश भोंडवे लिखित ‘पुनरावलोकन कोरोना काळाचे’ या पुस्तकाचे प्रकाशन 
पुणे : देशात करोना संसर्गाला सुरुवात झाली त्यावेळी परिस्थिती भयंकर होती परंतु करोनाचा उद्रेक झाल्यानंतर ज्या पातळीवरून आपण त्यातून बाहेर पडलो ती अतिशय सकारात्मक गोष्ट आहे.  कोरोनामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती वाढली आहे. परंतु  देशात विज्ञान आणि आरोग्याबाबत साक्षरता नाही, अशी खंत पद्मश्री डाॅ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केली
डॉ. अविनाश भोंडवे लिखित ‘पुनरावलोकन कोरोना काळाचे’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. गंगाखेडकर यांच्या हस्ते नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे झाले. यावेळी महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीधर लोणी, दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे, डाॅ.अविनाश भोंडवे उपस्थित होते. दिलीपराज प्रकाशनने पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.

डॉ.रमण गंगाखेडकर म्हणाले, कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात कम्युनिकेशन मॉडेल्स नव्हते त्यामुळे लोकांशी संवाद साधण्यास अडचणीचे जात होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काही चुका झाल्या त्यामुळे आपले नुकसान झाले, असेही त्यांनी या वेळेला सांगितले.
डॉ.अविनाश भोंडवे म्हणाले, कोरोनाचे प्रतिबंधात्मक उपाय लोक विसरले. कोरोना अखेरच्या घटका मोजत आहे, परंतु तो संपला नाही. कोरोना काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा चुकीची माहिती पसरविली गेली. भारत देश फारसा शास्त्रोक्त नाही. त्यामुळे शास्त्रावर आधारित गोष्टींवर पटकन विश्वास न ठेवता पारंपारिक समजुतीवर लोक जास्त विश्वास ठेवतात. आरोग्याविषयक जनजागृतीचा बहुसंख्य लोकांवर परिणाम होत नाही परंतु, काही टक्के लोकांवर नक्की परिणाम होतो यासाठी आरोग्य विषयी जनजागृती करत राहिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

कामाचे स्वरुप भक्तीमय होते तेव्हा ते कर्तृत्व म्हणून नावाजले जाते-निवृत्त एअर चिफ मार्शल भूषण गोखले

0

अखिल मंडई मंडळाच्यावतीने  गणेशोत्सवात सेवा देणारे स्वच्छता कर्मचारी आणि निवृत्त सैन्याधिकाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा

पुणे : आपल्याला नेमून दिलेले काम आपण सगळेच करतो. परंतु काही लोक हे आपले काम भक्ती समजून करतात. कामाचे स्वरूप भक्तिमय होते तेव्हा ते कार्य कर्तृत्व म्हणून नावाजले जाते. असे मत एअरमार्शल भूषण गोखले (नि.) यांनी व्यक्त केले.
अखिल मंडई मंडळाच्यावतीने गणेशोत्सवात आणि विसर्जन मिरवणूकीनंतर शहराची स्वच्छता करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तिन्ही दलातील  निवृत्त सैन्याधिकाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला. प्रशासकीय अधिकारी आश्विनी भागवत, लोकमान्य मल्टीपर्पज बॅंकेचे हर्षद झोडगे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कोषाध्यक्ष संजय मते, विश्वास भोर, देविदास बहिरट, सुरज थोरात, विकी खन्ना, दादा मोरे, संजय यादव, नारायण चांदणे यावेळी उपस्थित होते.
भूषण गोखले म्हणाले, पुण्याला सर्वात चांगले शहर समजले जाते. यामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे देखील मोठे योगदान आहे. देशासाठी लढणारे सैनिक आणि स्वच्छता कर्मचारी हे भक्तीच्या भावनेतून आपले काम करत असतात. गणपतीवर भक्ती करणारे जसे कार्यकर्ते असतात तसेच भारत मातेची सेवा करणारे सैनिक हे देशाचे कार्यकर्ते आहेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

अण्णा थोरात म्हणाले, विसर्जन मिरवणुकीनंतर सर्वत्र कचऱ्याचा खच पडलेले दिसतात. स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळे विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर काही वेळातच पुण्यातील रस्ते चकाचक होतात. त्यामुळे शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मान राखणं हे गरजेचे आहे.