Home Blog Page 1606

ज्ञानाची उत्कंठा व मानवतेमुळे यशाचे शिखर गाठता येते‘राइड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह’च्या उद्घाटन प्रसंगी नमिता थापर यांचे विचार

पुणे, दिः२०, सप्टेंबरः “ज्ञान संपादनाची भूक म्हणजे उत्कंठा आणि मानवता या दोन सूत्रांच्या जोरावर प्रत्येक व्यक्ती यशाचे शिखर गाठू शकतो.” असे विचार एमक्योर फार्मास्युटिकल्स लि.च्या कार्यकारी संचालिका नमिता थापर यांनी व्यक्त केले.एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या इनोव्हेशन कॉन्क्लेव्हतर्फे संशोधन, नवकल्पना, डिझाइन आणि उद्योजकता (आरआयडीई) या थीम वर आधारीत ‘राइड इनोवेेशन कॉन्क्लेव्ह २०२२’ या पाच दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.


यावेळी  आयआयएम, लखनौचे मार्केटिंग संचालक डॉ. सत्यभूषण डॅश हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्र कुलगुरू डॉ. तपन पंण्डा, सेंटर फॉर इंडस्ट्री अ‍ॅकेडमिया पार्टनरशिप्सचे वरिष्ठ संचालक प्रवीण पाटील, प्र कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर उपस्थित होते.नमिता थापर म्हणाल्या, “देशातील उद्योग जगात खूप मोठे परिवर्तन होतांना दिसत आहे. त्याची पाऊले ओळखून युवकांनी संशोधन आणि नवकल्पनेबरोबरच ज्ञानाची भूख कधीही मंद होऊ देऊ नका. सतत नव नवीन गोष्टी शिकत रहावे. सदैव आपल्या कार्यावर लक्ष्य ठेऊन कार्य करावे. युवकांनी स्वतःला सिद्ध केले की यश तुमच्या पाठीमागे येईल. स्वतःवर प्रेम करून जीवनात अहंकाराला कधीही थारा देऊ नका. त्यामुळे नुकसानच होते असा सल्ला ही त्यांनी दिला.”
डॉ. सत्यभूषण डॅश म्हणाले,“समाज कल्याणासाठी शाश्वत संशोधन गरजेचे आहे. नव्या उद्योजकांनी असे उत्पादन करावे की जेणे करून सर्वांचे कल्याण होईल. त्याच प्रमाणे पर्यावरणाचे रक्षण ही होईल. शाश्वत विकासातच देशाचे कल्याण आहे. आजच्या काळात नव उद्योजकांनी पारंपारिक व्यवसायापासून वेगळे काही नवे करण्यासाठी विचार करावा. आजच्या काळात हॉटेल आणि टुरिझम इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसत आहे.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“वर्तमान काळात सर्वांना शांती हवी आहे. त्यामुळे नव संशोधकांनी असे संशोधन करावे जेणे करून समाजाचे कल्याण होईल. रि-सर्च या शब्दाचा अर्थ उलगडला तर असे जाणवेल की रि  म्हणजे स्व व सर्च  म्हणजे संशोधन  म्हणजेच स्वतः संदर्भात संशोधन करणे होय. भगवान हे कोणी व्यक्ती नाही तर ती एक शक्ती आहे. त्या ऊर्जेचा योग्य वापर करून समाज कल्याण करावे. ”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या कल्पनांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. एका युनिक विचारांच्या देवाण घेवाण होईल. नवनिर्मिती, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर शाश्वत विकास होऊ शकतो. या देशात अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्या संशोधनाच्या जोरावर सोडविल्या जाव्यात. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी प्रत्येक विभागातील शिक्षकांना १-१ लाख रूपये देऊन नव संशोधन व नवनिर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. आमच्या संस्थेने जगातील सर्वोत्कृष्ट नव संशोधन करून डोमची निर्मिती केली त्यातून मानवता व शांतीचा संदेश दिला जात आहे.”
डॉ. प्रसाद खांडेकर म्हणाले, “भारत देशाला प्रति वर्ष कमी प्रमाणात पेटंट मिळतात. दुसरीकडे अमेरिका आणि चीन या देशात नवे संशोधन आणि पेटंटची संख्या खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे नव उद्योजकतेसाठी देशात खूप मोठी संधी उपलब्ध आहे. त्याचा लाभ युवकांनी उचलावा.
प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. डॉ. तपण पांडे यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. प्रसाद खांडेकर यांनी आभार मानले.

‘स्वच्छ व हरित ग्राम’ आणि ‘जलसमृद्ध गाव’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि.20: भारत सरकारचे ग्रामविकास व पंचायती राज मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ व हरित ग्राम’ व ‘जलसमृद्ध गाव’ या शाश्वत समान विकास ध्येयावर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेचे २२ ते २४ सप्टेंबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यशाळेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, लोकप्रतिनिधी, केंद्र व राज्य शासनातील विविध विभागाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

केंद्र शासनाने निश्चित केलेल्या ९ संकल्पनांपैकी ‘स्वच्छ व हरित ग्राम’ आणि ‘जल समृद्ध गाव’ या दोन संकल्पनांवर आधारित राष्ट्रीय कार्यशाळा घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्यावर सोपविण्यात आल्याने राज्यात शाश्वत विकास ध्येयाचे स्थानिकीकरण या विषयासंबंधीच्या दृष्टीकोनावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेकरीता राज्यातून अंदाजे एक हजार तसेच इतर राज्ये व केंद्र शासित प्रदेशामधून जवळपास पाचशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यशाळेत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे व मोबाईल अॅप, तीन माहितीपर पुस्तके यांचे विमोचन करण्यात येणार आहे. दोन संकल्पानांवर आधारीत तांत्रिक व्याख्याने, पाच पॅनेल चर्चा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. या पॅनेल चर्चामध्ये राज्यासह इतर राज्याचे सरपंच‍ त्यांच्या गावची यशोगाथा मांडणार आहेत. पॅनेलचे सदस्य त्यांच्याबरोबर गावाच्या प्रगतीबाबत चर्चा करणार आहेत. २२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम सादर केला जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त राहुल साकोरे यांनी दिली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन

0

मुंबई, दि.२०: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात नेमलेल्या कार्यबल गटाच्या अहवालातील शिफारशींनुसार राज्यात या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. कार्यगटाच्या सदस्यपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा मंत्र्यांचा समावेश आहे.

राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात स्वायत्तता आणि उत्कृष्टता सक्षम करणे, शाळांपासून कौशल्य विकास तसेच उच्च आणि तांत्रिक शिक्षणापर्यंतच्या सर्व शैक्षणिक बाबींवर लक्ष केंद्रित करणाऱ्यासाठी हा कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. राज्य स्तरावरील सर्व शिक्षण संस्था आणि विभागांना, पूर्व-प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षण संस्थांपर्यंत यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मधील दृष्टिकोनानुसार, गुंतवणुक आणि संसाधने यांचा मेळ घालण्यासाठी तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी या कार्यगटाची स्थापना करण्यात आली आहे.

या कार्यगटाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असून सदस्यपदी उपमुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री, शालेय शिक्षण मंत्री, पशुसंवर्धन व दुग्धविकास व्यवसाय मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कृषी मंत्री तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव समितीचे सदस्य सचिव आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सक्षम सनियंत्रणासाठी म्हणून हा कार्यगट काम करेल. डॉ. माशेलकर समितीच्या शिफारशींनुसार विविध विषयांवर स्थापन करण्यात येणाऱ्या समित्यांच्या कामकाजाचा वेळोवेळी आढावा घेणे व धोरणाच्या अनुषंगाने होणाऱ्या नवनवीन बदलांबाबत चर्चा, विषय समित्यांच्या अहवालातील शिफारशींनुसार विभागामार्फत करण्यात आलेल्या किंवा करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा घेणे तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षणात करावयाचे बदल याविषयी धोरणात्मक चर्चा करणे अशी या कार्यगटाची कार्यकक्षा असणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल

पुणे दि.- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) या परिक्षेच्या इयत्तानिहाय तसेच पेपरनिहाय जाहीर करण्यात आलेल्या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येणार आहे.

उत्तरसूची www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र सरकार चालवणारेच जर गुजरातची चाकरी करत असतील तर युवकांनी दाद मागायची कोणाकडे..?

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अभिनव आंदोलन

पुणे- महाराष्ट्र सरकार चालवणारेच जर गुजरातची चाकरी करत असतील तर युवकांनी दाद मागायची कोणाकडे..? असा सवाल आज राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उपस्थित केला आहे.महाराष्ट्र राज्यासाठी महत्त्वपूर्ण, दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातमध्ये नेण्यात आला. राज्यातील युवकांना रोजगार मिळवण्याचे हेतूने अत्यंत महत्त्वाचा असणारा हा प्रकल्प राज्यातून निघून गेल्यामुळे हतबल झालेले युवकांनी बुट पॉलिश करत, रद्दी विकत अभिनव स्वरूपाचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आयोजित केलेले आंदोलनास उपस्थित राहत युवकांच्या मागणीस पाठिंबा दर्शवला व राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारचा निषेध व्यक्त केला.या प्रसंगी माजी नगरसेवक सचिन दोडके ,प्रदीप गायकवाड ,युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे,मनोज पाचपुते,अजिंक्य पालकर,उदय महाले,नानासाहेब नलावडे,भूषण बधे, गोविंद जाधव,कुलदीप शर्मा,अमोल ननावरे,राकेश कामठे ,महेश हांडे,मयूर गायकवाड, अमोघ ढमाले , स्वप्निल जोशी,किरण खैरे ,गजानन लोंढे,पूजा काटकर आदी पदाधीकारी उपस्थित होते.

यावेळी जगताप म्हणाले,’ महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर याचा दीर्घकालीन परिणाम होणार असून महाराष्ट्राच्या हितासाठी राज्य सरकारनं यात तातडीनं हस्तक्षेप करत महाराष्ट्राबाहेर जाणारी गुंतवणूक थांबवत प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी युवकांनी यावेळी केली. वेदांत ग्रुपच्या वतीनं या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्यालाच प्रथम पसंती देण्यात आली होती. तळेगांव येथील कंपनीच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी, ‘जेएनपीटी’ बंदराशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्यानं वेदांत ग्रुपनं तळेगांव येथील एक हजार एकर जागेची निवड केली होती. मात्र राज्यात सत्तांतर होताच महाराष्ट्राच्या हिताचा असणारा हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला जात आहे. महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे राज्याचे ‘जीएसटी’चे सुध्दा मोठे नुकसान होईल. हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित केला असून महाराष्ट्रातील तळेगांवच्या तुलनेत ही जागा प्रकल्पाच्या उभारणीसाठी अगदीच सामान्य आहे. भाजपशासित गुजरातचे मुख्यमंत्री व वेदांतचे प्रमुख हे सांमजस्य करार (एमओयू) केले आहेत , महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे,असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

रामदासजी तोंड सांभाळा,तुमची गद्दारी राज्याला कळली आहे,तुमच्या बेताल वक्तव्याला उत्तरे मिळतील -सुषमा अंधारे

उद्यापासून शिवसेनेचे आंदोलन ;मिंधे सेनेला उत्तरे मिळतील

पुणे- रामदास कदम यांना पक्षाने मोठे केले परंतु त्यांनी पातळी सोडून पक्ष नेतृत्वावर टीका केल्याने त्यांच्या विरोधात पक्षाचा वतीने उद्यापासून आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.सध्या राजकारणात पातळी सोडून टीका सुरू आहे. सत्ता गेल्यावर उद्धव ठाकरे यांनी संयम सोडला नाही. वर्षा बंगल्यावरून राजीनामा देण्यास जाताना अथवा इतर सहकारी पक्ष सोडून जाताना त्यांनी कोणत्याही प्रकारे पातळी सोडून कोणावर टीका केली नाही.मात्र, भाजपकडून अफवांचे राजकारण सुरू असून त्याकरिता किरीट सोमय्या, मोहित कंबोज, नवनीत राणा यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे लोक ईडीचे प्रवक्ते सारखे बोलत असून त्यांना बोलण्याचे तारतम्य नाही अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

अंधारे म्हणाल्या, रामदास कदम हे सध्या निष्ठा बाबत बोलत आहे मात्र, इनामदारच्या निष्ठा किती आणि कितपत आहे हे आम्हाला माहिती आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जाहीरपणे कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार होते असे सांगितले होते. दोन वेळा कदम यांनी पक्ष सोडण्याची भीती पक्षास घातली होती. सर्वांच्या कुंडली या आमच्याकडे आहे. आदित्य ठाकरे यांचे विवाह बाबत खालच्या पातळीची टीका करण्यात येत आहे. मिंधी सेना ही भाजपची स्क्रिप्ट बोलत असून अटल बिहारी वाजपेयी हे अविवाहित होते हे भाजपने विसरू नये. काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर वयक्तिक टीका करताना याचे भान राखावे.विरोधक याच्याकडे ध्येय धोरणवर बोलण्यावर मुद्दे नाही. रामदास कदम यांच्यासाठी पक्षाने गुहागर जागा सोडण्यासाठी मुंबईतील दोन पक्ष जागा सोडल्या होत्या. सरड्या सारखे रंग ते बदलत असून दिल्लीच्या आशीर्वादाने ते पुन्हा पक्ष नेतृत्वावर बोलत आहे.रश्मी ठाकरे यांची कधी राजकारणात लुडबुड नसते परंतु सामनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारताना त्यांना दूषणे देणे योग्य नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार कदम स्वतःला म्हणत असून मीनाताई ठाकरे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले ही बाब पातळी सोडून राजकारण केले जात असल्याचे दाखवून देणारी आहे. रामदास कदम विरोधात पक्षाकडून उद्यापासून आंदोलन केले जाणार आहे. शिवसेना सुसभ्य आणि सुसंस्कृत असून भित्री नाही कारण आम्ही जशास तसे उत्तर देतो. 32 वर्षाच्या पोराने तुमची झोप उडवली आहे त्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहे. पडझडीच्या काळात ही पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत चांगल्या प्रकारे कामगिरी केली आहे. दसरा मेळावा होणार असून पक्ष प्रमुख जो आदेश देतील तो आमच्यासाठी शिरसवंध आहे.

पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणात शरद पवारांच्या चौकशीची भाजपची मागणी

मुंबई-एक हजार कोटींच्या पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही सहभाग आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात दाखल झालेल्या चार्जशीटमध्ये ईडीने पुराव्यानिशी हे दाखवून दिले आहे, असा गंभीर आरोप आज भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल गेऊन कालबद्ध मर्यादेत या संबंधांची चौकशी करावी, अशी मागणीही अतुल भातखळकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

अतुल भातखळकर म्हणाले, मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणामध्ये गुरुआशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, यासाठी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात संजय राऊत यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्रीही उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी.

अतुल भातखळकर म्हणाले, पत्राचाळ प्रकल्पाला परवानगी देण्यासाठी म्हाडा प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव होता. त्यामुळे या चौकशीच्या प्रकरणाचे धागेद्वारे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपर्यंत, महाराष्ट्राचे जाणते राजे म्हटल्या जाणाऱ्या नेत्यापर्यंत जात आहेत.

अतुल भातखळकर यांनी आपल्या आरोपांसंदर्भात तत्कालीन गृहनिर्माण सचिवांचे विश्लेषण करणारे पत्रही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे. या पत्रावरून म्हाडावर बाह्य शक्तीचा दबाव होता, हे स्पष्ट होत असल्याचे भातखळकर म्हणाले. तसेच, मराठी माणसाला न्याय देण्याकरता आणि त्यातील खरे सत्य बाहेर येण्याकरता या संदर्भात एक उच्चस्तरीय कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी, अशी मागणी भातखळकरांनी केली आहे.

संजय राऊत मास्टमाईंड

गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. यातून शेकडो मुंबईकरांना स्वस्तात घरे उपलब्ध होणार होती. मात्र, संजय राऊत यांचे बंधू व गुरुआशिष कंपनीचे प्रवीण राऊत यांनी या जागेतील एफएसआय परस्पर बिल्डरांना विकल्याचे समोर आले आहे. यातून जवळपास एक हजार कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. तसेच, शिवसेना नेते संजय राऊतच या घोटाळ्याचे मास्टरमाईंड होते, असा आरोपही ईडीने चार्जशीटमध्ये केला आहे.

ऊस तोडणी कामगार मुकादम व वाहन मालक यांचा उद्या साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा….

पुणे-

राज्यातील ऊस तोडणी कामगार मुकादम व वाहन मालक यांचा 20 सप्टेंबरला साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.अशी माहिती महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतक कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड जनरल सेक्रेटरी सुभाष जाधव उपाध्यक्ष आबासाहेब चौगुले दत्ता डाके यांनी येथे दिली .
ते म्हणाले,’ महाविकास आघाडी सरकारने ऊस तोडणी कामगार मुकादम वाहन मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केले त्याच्या कार्यालयाचे उद्घाटनही झाले प्रतिनिधी स्वरूपात दहा कामगारांना ओळखपत्रही दिले परंतु त्या मंडळाचे कामकाज अद्यापही सुरू झालेले नाही तसेच ऊस तोडणी कामगार मुकादम व वाहन मालकांना कुठल्याही योजना किंवा लाभ लागू केलेले नाहीत.
सदरचे महामंडळ बंद पाडण्याचा डाव सुरू आहे त्यामुळे या क्षेत्रातील कामगारांमध्ये तीव्र आसंतोष आहे या पार्श्वभूमीवर कल्याणकारी मंडळाचे कामकाज तातडीने सुरू करावे. ऊस तोडणी कामगार मुकादम व वाहन मालकांना ओळखपत्र द्यावीत मुकादम व वाहन मालकांची थकीत बिले त्वरित अदा करावीत तसेच विमा योजना घरासाठी अनुदान पाल्यांसाठी शिष्यवृत्ती अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने 20 सप्टेंबरला धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
मोर्चाच्या तयारीसाठी 24 ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यातील माजलगाव मध्ये भव्य परिषद घेण्यात आली तसेच राज्यात ऊस तोडणी कामगार मुकादम मालकांच्या बैठका सुरू आहेत. या मोर्चाला हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होतील.
महाविकास आघाडी सरकारने जरी महामंडळ स्थापन करून कार्यालय सुरू केले असले तरीसुद्धा झालेल्या निर्णयानुसार साखरेच्या उत्पादनाच्या प्रत्येक टना मागे दहा रुपये याप्रमाणे साखर कारखान्यांनी निधी द्यायचा आहे व तेवढाच निधी राज्य सरकारने द्यायचा आहे याबाबतीतही साखर कारखान्यांनी एक रुपयाही अद्याप दिलेला नाही व साखर कारखानदार व सरकार या दोघांचा मिळून हे कल्याणकारी मंडळ बंद पाडण्याचा डाव दिसून येत आहे.
ऊस तोडणी कामगार मुकादम व वाहन मालकांच्या मतावर अनेक नेते निवडून येतात सत्तेमध्ये जातात मंत्री होतात परंतु ऊस तोडणी कामगार मुकादम वाहन मालकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही यामुळे या क्षेत्रातील कामगारांमध्ये तीव्र संतोष आहे.मुख्यमंत्र्यांनी ऊस तोडणी कामगार मुकादम व वाहन मालकांना न्याय द्यावा अशी मागणी डॉक्टर डी एल कराड, सुभाष जाधव ,आबासाहेब चौगुले दत्ता डाके यांनी केली आहे.

महापालिका प्रशासकीय काळात नागरी समस्यांनी उग्र रूप धारण केलेय :खासदार सुप्रिया सुळे भेटल्या आयुक्तांना

पुणे- महापालिका प्रशासकीय काळात कचरा,पाणी ,यासह नागरी समस्या उग्र रूप धरण करू पाहत असल्याने आज यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी महापलिकेत जाऊन आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली .त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या ,’अजितदादा पालकमंत्री असताना दर आठवड्याला जिल्ह्यातील प्रश्ना बाबत आढावा बैठक होत होती. परंतु दुर्दैवाने मागील अडीच महिन्यापासून जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने आढावा बैठक होत नाही. खडकवासला भागात येणारा धायरी,वारजे परिसरात कचर्‍याचे ढीग वाढले आहेत.तर दुसर्‍या बाजूला पाणी कपात देखील सुरू केली आहे.अशा तक्रारी नागरिकांमार्फत येत आहे. आपल्या शहराला पाणी पुरवठा करणारी धरण पूर्ण भरली असताना पाणी कपात का होत आहे ? हे समजत नाही, पावसाने पुण्याची आणि रस्त्यांची अवस्थाही खडतर करून टाकली आणि अशा स्थितीत जबाबदारी कोण घेणार ,लोकांनी कुणाकडे जायचे ?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना कार्यकारिणीमधून डावलण्यात आलं आहे का त्यावर त्या म्हणाल्या की,नवाब मलिक यांना अजिबात डावलण्यात आलेल नाही.माझे त्यांच्या मुलींशी रोज बोलणे होते. तसेच नवाब भाईना डावललं नाही आणि डावललं जाणार नाही.त्याच बरोबर अनिल देशमुख,नवाब मलिक,संजय राऊत यांच्या कुटुंबियांसोबत सतत मी संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.अर्थमंत्री निर्मला सीतारामन मतदार संघात येणार असल्याने काय अपेक्षा आहेत. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की,माझी दिल्ली येथे निर्मला सीतारामन यांच्या सोबत अनेक वेळा भेट होत राहते. मागील वेळेस देखील म्हणाले होते की,आपण जर या भागात येत असला तर आम्ही मनापासून तुमचे स्वागत करतो. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन माझ्या मतदारसंघात येत असल्याने खूप आनंद होत आहे. तसेच अरुण जेटली देखील बारामतीमध्ये आले होते. ते गोविंद बागेत राहिले होते. त्यावेळी देखील अतिशय चांगला कार्यक्रम झाला होता. अरुण जेटली कृषी केंद्राला भेट दिली होती.त्यामुळे निर्मला सितारामन यांनी बारामती मतदार संघात अनेक संस्था चांगल्या काम करीत आहे त्या सर्वांना त्यांनी निश्चित भेट द्यावी आणि त्या पाहण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

इंडियन सिने फेस्टिव्हल मध्ये योगेश देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार

‘ लव्ह हॅज नो टॅग ‘ अॅड फिल्मला बेस्ट ऍड फिल्म अवॉर्ड ‘  योगेश देशपांडे यांच्या ‘रिडिफाइन कन्सेप्ट्स’चे यश  
पुणे :
इंडियन सिने फेस्टिव्हल २०२२ मध्ये पुण्याच्या ‘रिडिफाइन कन्सेप्ट्स’ निर्मित ‘ लव्ह हॅज नो टॅग’ या जाहिरातपटाला  ‘बेस्ट ऍड फिल्म अवॉर्ड’  मिळाले आहे.’रिडिफाइन कन्सेप्ट्स’ संस्थेचे संचालक,लेखक-दिग्दर्शक योगेश देशपांडे यांना ‘डॅडीज गर्ल ‘ जाहिरातपटासाठी ‘ बेस्ट डिरेक्टर ऑफ द यीअर ‘ हा पुरस्कार मिळाला आहे.  ‘मिनी बॉक्स ऑर्गनायझेशन’ आयोजित फेस्टिव्हलचे हे दहावे वर्ष होते.६० देशातून ४६० प्रवेशिका आल्या होत्या.त्यातून ही निवड करण्यात आली.  
 पीएनजी ज्वेलर्स यांच्यासाठी तयार केलेल्या  ‘ लव्ह हॅज नो टॅग ‘ या जाहिरातपटामध्ये लेखन,दिग्दर्शन योगेश देशपांडे यांनी केले असून कुंजिका काळविंट, बीना सिध्दार्थ, ज्योती सुभाष या कलाकारांनी त्यात अभिनय केला आहे. ‘ डॅडीज गर्ल ‘ मध्ये  तेजस्विनी पंडित, उदय टिकेकर यांनी प्रभावी काम केले आहे.

हळुवार नात्यांना स्पर्श करणारी ‘प्रथा ‘!‘लव्ह हॅज नो टॅग’ मध्ये सासरी नांदायला गेलेल्या नववधूला सासूबाईंचे प्रेम कसे मिळते हे पाहायला मिळते.योगेश देशपांडे यांच्या आवाजातील पार्श्वगायन या नात्याला अजून गहिरे करते.’डॅडीज गर्ल’मध्ये आईविना जगलेल्या मुलीला सासरी पाठविताना पित्याची होणारी घालमेल उदय टिकेकर यांच्या अभिनयातून दिसून येत आहे.खंबीर वाटणाऱ्या,पण मनाने हळव्या पित्याला जपणारी मुलगी तेजस्विनी पंडित यांच्या रूपाने ‘डॅडीज गर्ल’ मध्ये पाहायला मिळते.पीएनजी ज्वेलर्स यांच्या दागिन्यांना या दोन्ही जाहिरात पटातून भावूक कोंदण मिळते.   

मराठी चित्रपट महामंडळ: दोन्ही निवडणुका बेकायदेशीर असल्याने रद्द -धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी

कोल्हापूर/पुणे (अभिषेक लोणकर ) : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे मेघराज भोसले व धनाजी यमकर यांनी जाहीर केलेल्या एकाच महामंडळाच्या दोन्ही निवडणुका बेकायदेशीर ठरवत धर्मादाय उपायुक्तांनी त्या रद्द केल्या.धर्मादाय कार्यालयाकडूनच अधिकृत निवडणूक पार पाडली जाणार असून पुढील सात दिवसांत तारीख जाहीर केली जाईल. धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी दिलेल्या या निकालामुळे अधिकृत निवडणूक कोणाची, सभासदांनी नेमके कुणी जाहीर केलेल्या निवडणुकीत मतदान करायचे हा पेचप्रसंग सुटला आहे. संचालक मंडळाची मुदत ५ वर्षांची होती,ती संपून दिड वर्षे झाली तरीही या निवडणुकांकडे कोरोनाचा काळ संपल्यावरही दुर्लक्ष करण्यात आले होते ,दरम्यानच्या काळात मीच अध्यक्ष म्हणून दोन गट पडले होते .मुदत संपलेल्या संचालकांच्या दोन्ही गटांनी आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु करत आपापल्या सोयीनुसार निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला होता.

दोन्ही गटांच्या निवडणुका वादग्रस्त ठरणाऱ्या असून त्या रद्द करून महामंडळावर प्रशासक नियुक्ती करावी व स्वतंत्र समिती नेमून निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसारच हा निर्णय झाला आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील अंतर्गत राजकारणामुळे राजेभोसले व यमकर यांनी स्वतंत्र निवडणुका जाहीर केल्या होत्या. एकाच संस्थेच्या एका महिन्यात दाेन निवडणुका हे कायद्यानुसार नव्हते तसेच दोन्ही बाजूंनी आमचीच निवडणूक अधिकृत असल्याचा दावा करत धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडे एकमेकांविरोधात तक्रार केली. त्यावर सुनावणी होऊन धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी हा निकाल दिला. त्यानुसार दोन्ही बाजूंची निवडणूक बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे.

आसिफ शेख निवडणूक अधिकारी..

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धर्मादाय निरीक्षक आसिफ शेख यांची तर निवडणूक नियंत्रक अधिकारी म्हणून शिवराज नाईकवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जुन्या घटनेनुसारच कार्यवाही

चित्रपट महामंडळाची नवीन घटना अजून मंजूर नसल्याने जुन्या घटनेनुसारच निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे पुणे, मुंबई आणि कोल्हापूर या तीन केंद्रांवर मतदान होईल. त्यात १८ हजार सभासद मतदान करतील. ४० ते ५० हजार सभासद असल्याचा दावा एका गटाकडून होत होता

वकिलांना अधिकार नाही

चित्रपट महामंडळाच्या पॅनेलवर असलेल्या दोन वकिलांची दोन्ही बाजूंनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली. मात्र, धर्मादाय उपायुक्तांनी या दोन्ही वकिलांना तुम्ही महामंडळाच्या पॅनेलवर असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करू शकत नाही, असे सुनावले.

चंद्रकातदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती

0

मुंबई, दि. 20 : मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.

या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे.

ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करेल

राणेंचे अधीश बंगल्यातील बेकायदा बांधकाम पाडण्याचे हायकोर्टाचेआदेश,कोर्ट म्हणाले,’ पाडापाडीचा १० लाखाचा खर्च ही वसूल करा !

0

मुंबई-केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ‘अधीश’ बंगल्यातील बांधकाम बेकायदा असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. दोन आठवड्यात बंगल्यातील बांधकाम पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. याप्रकरणी राणेंना उच्च न्यायालयाने १० लाखांचा दंड ठोठावला आहे.नारायण राणे यांचा मुंबईतील जुहू भागात एक बंगला असून, तो समुद्र किनाऱ्यावर आहे. या बंगल्याचे काही एफएसआय आणि सीआरझेडचे याचे काही नियम यावर लागू होतात. समुद्र किनाऱ्यावर हा बंगला असून सीआरझेडचे उल्लंघन करण्यात आले आहे, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्याप्रकरणी आज सुनावणी पार पडली असून, कोर्टाने नारायण राणे यांना दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच एफएसआय आणि सीआरझेडचे उल्लंघन केल्याप्रकरणी अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश देखील कोर्टाने दिले आहे. हा नारायण राणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो.

संतोष दौंडकर यांनी या बंगल्याविरोधात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी मुंबई महापालिकेने नारायण राणेंना नोटीस देखील बजावली होती. या बंगल्याची पाहणी महापालिकेच्या पथकाकडून करण्यात आली होती. त्यावेळी भाजपा आणि शिवसेनामध्ये वाद निर्माण झाला होता.

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण; २०२३ अखेर प्रकल्प पूर्ण होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई, : मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) अर्थात मुंबई कोस्टल रोडचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण झाले असून पुढील वर्षाअखेरीस हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

मुंबई कोस्टल रोडच्या प्रगतिपथावर असलेल्या कामाची पाहणी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी केली.

प्रकल्पाच्या प्रियदर्शिनी उद्यान (नेपियन सी) येथील कार्यालयात मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. मुंबईकरांसाठी स्वप्नवत असलेला हा प्रकल्प वेळेत पूर्ण करुन त्यांचा प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रियदर्शिनी पार्क येथील भूमिगत बोगदा, हाजी अली आणि वरळी येथील आंतरमार्गीका बदल (इंटरचेंज) सह संपूर्ण प्रकल्प रस्त्याची पाहणी केली.

यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोर, प्रमुख अभियंता (किनारी रस्ता प्रकल्प) (प्रभारी) मांतय्या स्वामी यांच्यासह संबंधित अधिकारी  उपस्थित होते.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प विषयी :   बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. एकूण १०.५८ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरी सेतू (सी लिंक) च्या दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे. प्रकल्पामध्ये ४+४ मार्गिका असणारे भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे यांचा समावेश आहे.

किनारी रस्ता प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष ऑक्टोबर, २०१८ मध्ये सुरु झाले असून नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाचा वेळ कमी होऊन विद्यमान रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या निवारणासाठी मदत होणार आहे. एवढेच नव्हे तर वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी देखील कमी होईल. त्यासोबत समर्पित बस मार्गिकेद्वारे सार्वजनिक वाहतुकीमध्ये सुधारणा होऊन अतिरिक्त हरित पट्टयांची निर्मिती देखील होणार आहे.

एकूण तीन पॅकेजमध्ये हा संपूर्ण प्रकल्प विभागलेला आहे.

प्रकल्पामुळे होणारे फायदे

किनारी रस्त्यामुळे वेळेत ४० टक्के तर इंधनात ३४ टक्के बचत होणार आहे.

किनारी रस्त्यामुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण कमी होऊन मुंबईकरांचे जीवनमान उंचावेल.

हरित क्षेत्रामध्ये- सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह, फुलपाखरु उद्यान, जैव वैविध्यता उद्यान इत्यादी बाबी अंतर्भूत आहेत. प्रकल्पामध्ये ८.५ कि.मी.ची सागरी पदपथ निर्मिती.

किनारी रस्त्यावर समर्पित बस वाहतूक योजिले असल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यात मदत होईल व संरक्षित, जलद आणि परवडणारा प्रवास करता येईल.

रुग्णवाहिन्यांसाठी जलद प्रवास.

प्रस्तावित सागरी तटरक्षक भिंतींची योजना केल्यामुळे सध्याच्या सागरी किनाऱ्याची धूप होण्यापासून, वादळी लाटा व पुरापासून संरक्षण.

लम्‍पीतून ३ हजार २९१ जनावरे रोगमुक्त – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

0

मुंबईत लम्‍पी रोगाचे नियंत्रण, प्रतिबंध व निर्मूलन करण्यासाठी प्राणी प्रदर्शने, बाजार, यात्रा व जनावरांच्या ने-आण करण्यास पूर्णतः बंदी घोषित

मंत्रालयात समन्वय कक्ष सुरु, संपर्कासाठी ०२२-२२८४५१३२ क्र. जारी

मंगळवारी २५ लाख लसमात्रा प्राप्त होणार

मुंबई, दि. 19 : राज्यातील पशुसंवर्धन विभागाला दिलेल्या सूचना, मनुष्यबळ वाढ, पुरेशा लसमात्रा, पशुधनावर करण्यात आलेले उपचार आणि निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने राज्यातील लम्‍पी आजार आटोक्यात येत आहे. 3 हजार 291 जनावरे औषधोपचारामुळे ठीक झाल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

श्री. सिंह म्हणाले, राज्यात दि. १९ सप्टेंबर २०२२ अखेर जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक, जालना, पालघर, ठाणे, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, हिंगोली व रायगड अशा 27  जिल्ह्यांमधील 1108 गावांमध्ये 9 हजार 375 जनावरांमध्ये लम्‍पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधितांपैकी 3 हजार 291 जनावरे बरी झाली असून, उर्वरितांवर उपचार सुरु आहेत.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 49.83 लाख लसीच्या मात्रा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या लस मात्रांपैकी बाधित क्षेत्राच्या 5 कि.मी. परिघातील 1108 गावातील 16.45 लाख जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून लसीकरण मोहीम सुरु आहे. त्यानंतर प्राधान्याने गोशाळा व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.

मंगळवार दि. 20 सप्टेंबर रोजी 25 लाख लसमात्रा प्राप्त होणार आहेत. बाधित जिल्ह्यातील जळगांव 94, अहमदनगर 30, धुळे 9, अकोला 46, पुणे 22, लातूर 3, औरंगाबाद 5, सातारा 12, बुलडाणा 13, अमरावती 17, कोल्हापूर 9, सांगली 2, वाशिम १, जालना १, ठाणे 3,नागपूर 3 व रायगड 1 अशा 271 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबईत लम्‍पी रोगाचे नियंत्रण, प्रतिबंध व निर्मूलन करण्यासाठी प्राणी प्रदर्शने, बाजार, यात्रा व जनावरांची ने – आण करण्यास पूर्णतः बंदी घोषित

राज्यासह देशात अनेक ठिकाणी लम्‍पी आजार जनावरांमध्ये वेगाने फैलावत असल्याने मुंबईतही सावधगिरी बाळगली जात आहे. मुंबईत बैलगाड्या, घोडागाडी तसेच अनेक ठिकाणी गायीदेखील पाळल्या जातात. हे लक्षात घेता मुंबईत लम्‍पीचा फैलाव टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रदर्शन, जत्रा तसेच गर्दीच्या ठिकाणी प्राण्यांची ने – आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. निर्देशांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार, असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी जनावरांचे गोठे आहेत. मंदिरांबाहेर गायी बांधल्या जातात. मिरवणुकांमध्ये बैलगाड्यांचा वापर केला जातो. त्यामुळे गर्दीच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी जनावरांना नेण्यास या आदेशाद्वारे मनाई करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्यांमध्ये या सूचना प्रसिद्ध करण्याबाबत सांगण्यात आले असून परिसरात जनावरे पाळणाऱ्यांपर्यंत संदेशही दिले जात आहेत. 13 ऑक्टोबरपर्यंत पशुपालकांनी या नियमांचे पालन करावे, असे या आदेशात नमूद आहे. तसेच लम्‍पी करीता मुंबई हे ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित करण्यात आले असून मुंबईत प्राणी आणण्यास सक्त मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही मुंबई पोलीसांनी दिला आहे.

समन्वय कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२२-२२८४५१३२

श्री.सिंह म्हणाले, लम्‍पी नियंत्रणासाठी लसीकरण करणे, बाधित पशुधनास औषधोपचार करणे, पशुपालकांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे इत्यादी कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे. तथापि, काही ठिकाणी पशुपालकांना येणाऱ्या समस्या, अडचणींचे निराकरण करुन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, तसेच शेतकरी, पशुपालकांना संपर्क साधता यावा, आणि क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय साधता यावा यासाठी मंत्रालयामध्ये रुम नं. 520, 5 वा मजला (विस्तार) येथे समन्वय कक्ष सुरु करण्यात आला आहे. पशुपालक समन्वय कक्षातील ०२२-२२८४५१३२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतील.

लम्‍पी वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरु केल्यास निश्चित बरा होतो. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे घाबरुन न जाता मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन श्री. सिंह यांनी केले आहे.