पुणे : उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा वरचे स्थान मतदारांनी देखील एकनाथ शिंदे यांना दिले आहे हे नुकत्याच २ टप्प्यात झालेल्या नगर पालिका आणि पंचायतीच्या निवडणुकीतून दिसून आले आहे त्यामुळे आमचा निर्णय योग्यच होता असा दावा आज राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शिवसेनेचे बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेतील प्रश्नांना उत्तरे देताना केला . शंभूराज देसाई यांनी आज पुण्यात उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देखील दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरे करण्यापेक्षा प्रशासकीय कामात लक्ष द्यावे असा सल्ला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता . त्यावर ते म्हणाले की, प्रशासकीय काम कुठेही थांबलेले नाही. मंत्रिमंडळाच्या नियमित बैठका होत आहे. मंत्री देखील नियमितपणे काम करीत आहे. माननीय मुख्यमंत्री हे कुठे ही मौजमजा करण्यास फिरत नाही. राज्यातील जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी ते फिरत आहेत. राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या करीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली येथे दोन दिवसापासून आहेत. राज्यातील प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच ते पुढे म्हणाले की, मागील मुख्यमंत्री अडीच वर्षात मंत्रालयात आले नाहीत. त्यावेळी पवार साहेबांनी, मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे होते. तुम्ही मंत्रालयात जावा,तुम्ही लोकांना भेटा, तुम्ही लोकांचे प्रश्न समजून घ्या. त्यावेळी शरद पवार यांनी हाच सल्ला किंवा आदेश दिला असता.तर ते अधिक बर झालं असत, अशा शब्दात शंभूराजे देसाई यांनी शरद पवार यांना टोला लगावला.दसरा मेळाव्या वरून वाद सुरू आहे. त्या प्रश्नावर शंभूराज देसाई म्हणाले की,शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू गर्जना यात्रा राज्यभरात सुरू आहे. सातारा,सोलापूर, अहमदनगर आणि पुणे या चार जिल्ह्यांची माझ्यावर जबाबदारी होती. त्या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या यात्रेतून मागील अडीच महिन्यामध्ये जनतेसाठी केलेल काम सांगितले. या यात्रेतून जनतेच्या भावना लक्षात घेता. शिवसेना आणि भाजपची नैसर्गिक युती राहिली पाहिजे होती. मात्र लोकांना अडीच वर्षात बोलण्याची संधी मिळत नव्हती.आमच्या भूमिकेमुळे लोकांना बोलण्याची संधी मिळाली आहे. हे लवकर होण्याची गरज होती. अशा तरुण वर्गाकडून प्रतिक्रिया आल्या असल्याच त्यांनी सांगितले.तसेच ते पुढे म्हणाले की,मुंबईत पाच तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा होणार आहे.न्यायालयामध्ये शिवसेना ठाकरे गट गेलेला आहे. त्यामुळे दसरा मेळावा ही बाब न्यायप्रविष्ट झालेली आहे.आम्ही कायद्याच, नियमांच पालन करणारे कार्यकर्ते आहोत.आम्ही दोन्ही जागेवर परवानगी मागितलेली आहे. प्रशासन आणि न्यायालय जिथे परवानगी देईल.त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने मेळावा होणार असल्याच त्यांनी सांगितले.
डॉ. रामचंद्र देखणे यांचे प्रतिपादन; नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या रौप्य महोत्सवी मेळाव्याचे उद्घाटन पुणे : “विनोदी लेखन ही अभिव्यक्ती, तर हास्य ही अनुभूती आहे. विनोदाचे मूळ दुःखात असून, हसण्यामुळे अप्रिय दुःखाचे विस्मरण होते. प्रत्येक विनोदात तत्त्वचिंतन असते. त्यातून फुलणारे हास्य माणसाला अनुकूल-प्रतिकूल परिस्थितीच्या द्वंद्वापलीकडे घेऊन जाते. अध्यात्म, विज्ञान आणि सामाजिक संवादाची जोड असलेला हास्ययोग आपण नियमित केला पाहिजे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले. हास्य चळवळीमुळे हास्य योगाचे माहेरघर अशीही ओळख आता पुण्याला मिळाली असल्याचे ते म्हणाले.
नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या रौप्य महोत्सवी मेळाव्याचे उद्घाटन डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते झाले. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडामंच येथे झालेल्या या सोहळ्यात क्रीडावैद्यक तज्ज्ञ डॉ. हिमांशु वझे, निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले, कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे, उपाध्यक्ष सचिन आपटे, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश धोका, ‘नवचैतन्य’चे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे, सुमन काटे, मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, सचिव पोपटलाल शिंगवी आदी उपस्थित होते.
८५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, तसेच २५ वर्षाच्या हास्य चळवळीच्या कार्याबद्दल सुमन व विठ्ठल काटे यांचा सत्कार करण्यात आला. उषा महाजन व निवृत्त न्यायाधीश जगदीश लिमये या देणगीदारांचा सन्मान करण्यात आला. चंदन भिडे व सहकाऱ्यांनी गणेशवंदना सादर केली. सुमन व विठ्ठल काटे यांनी विविध हास्यप्रकार घेत सभागृहात नवचैतन्य फुलवले.
डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, “हास्याची दिंडी घेऊन हास्य क्लबच्या माध्यमातून वैष्णवांचा मेळा भरवणा विठ्ठल म्हणजे विठ्ठल काटे आहेत. हास्य आणि विनोद ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे. अध्यात्म, संत साहित्यातही हसण्याला प्राधान्य दिले आहे. ज्ञानोबा-तुकोबा पासून ते आचार्य अत्रे, पुलं देशपांडे यांच्यापर्यंत खळखळून हसवणारे साहित्य निर्माण झाले आहे. त्यातून नकळत तत्त्वज्ञानही उद्धृत होते.”
डॉ. हिमांशु वझे म्हणाले, “चित्ताची साम्य अवस्था टिकवण्याचे काम हास्य करते. हसणे हा शंभर नंबरी सोन्यासारखा अलंकार ईश्वराने आपल्याला दिलेला आहे. आहार, विहार आणि आनंदी जगणे आपल्या आरोग्याला संतुलित ठेवेल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी हास्ययोग प्रभावशाली असून, त्याला वैज्ञानिक आधार आहे.”
“सशक्त भारताचे नागरिक सशक्त राहायला हवेत. कोरोना काळात मकरंद टिल्लू यांनी ही हास्ययोग चळवळ ऑनलाइन सुरू केली. त्यामुळे परिवारातील अनेकांना आरोग्य चांगले राहण्यात मदत झाली. देशभरात या चळवळीचा विस्तार झाला. लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी हे कार्य असेच पुढेही चालू राहावे”, असे विठ्ठल काटे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
मिलिंद काळे म्हणाले, “हसणे हे आपल्या जीवनाचा आणि दैनंदिन कामकाजाचा भाग असावा, हा विचार रुजविण्याचे काम नवचैतन्य हास्ययोग परिवाराने केले. प्रत्येकाने हास्ययोग केला, तर समाजात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.” भूषण गोखले म्हणाले, “निखळ हास्य, विनोद बुद्धी आपल्या जगण्याला आनंद देते. आपला हसरा चेहरा सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतो. हास्यक्लबने गेल्या २५ वर्षात ही ऊर्जा देण्याचे काम केले आहे.”
“आपण स्वतःसाठी एक दीड तास देतो, तेव्हा आपल्याला २४ तासांची ऊर्जा मिळते. त्यामुळे व्यायाम, हास्ययोग, प्राणायाम करायला हवा. निरोगी आयुष्याचा हा मंत्र आहे,” असे प्रकाश धोका म्हणाले. “रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त २५ जिल्ह्यात ६१ गावात ही हास्ययोग चळवळ घेऊन जाणार आहे. देशविदेशात आता हास्ययोगाच्या शाखा भरू लागल्यात याचे समाधान आहे”, असे मकरंद टिल्लू यांनी नमूद केले.प्रास्ताविक पोपटलाल शिंगवी यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष राजवळ यांनी केले. आभार रामचंद्र राऊत यांनी मानले. भावनिक नात्याने होऊ आनंदयात्री नोकरी-व्यवसायानिमित्त पुण्यातील अनेकांची मुले बाहेर असल्याने एकाकीपण येते आहे. त्यातून संवाद होत नाही. नैराश्य येते. अशावेळी हास्यक्लब उपयुक्त ठरतील. संवादाचे, भावनिक नाते निर्माण होऊन या लोकांनाही आनंदयात्री होता येऊ शकते. हास्य क्लबच्या सदस्यांनी यात पुढाकार घेऊन अशा आजीआजोबांना भावनिक आधार देण्याचे करावे, असे डॉ. रामचंद्र देखणे यांनी सूचित केले.
पुणे, दि.२२: जिल्ह्यातील अवैध हातभट्टीच्या माध्यमातून होणारी मद्यविक्री संपूर्णपणे बंद करण्यासाठी मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त अनिल चासकर, अधीक्षक चरणसिंह राजपूत, उपअधीक्षक संजय पाटील, युवराज शिंदे आदी उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यातील अवैध हातभट्टीच्या माध्यातून होणारी मद्यविक्री बंद करुन संबंधितावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करा. कार्यवाही करतांना पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी. परराज्यातून होणारी अवैध मद्यवाहतूक रोखण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. पोलीस विभागाप्रमाणे अवैध दारू व्यवसायाला प्रतिबंध घालण्यासाठी खबऱ्यांची मदत घेण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी अधीक्षक श्री.राजपूत यांनी बैठकीत विभागाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीत दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
पुणे:कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांच्यापुतळ्याला यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करूनअभिवादन करण्यात आले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या अमूल्ययोगदानामुळेच समाजाला स्वावलंबी होण्याचा व शिक्षणाचे महत्व जाणण्याचा अनमोल संदेश मिळाला. त्यांनी केलेल्या कार्याची प्रेरणा घेऊन युवकांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे करिअरमध्ये प्रगती केली पाहिजे, असे मत यावेळी स्मिता धुमाळ यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला कर्मवीर भाऊराव पाटील श्रमिक संघटनेचे अध्यक्ष मनोहर परदेशी, कार्याध्यक्ष विजेंद्र परदेशी, रेखा परदेशी यांच्यासह ‘यशस्वी’ संस्थेचे ज्ञानेश्वर गोफण, नीतीन कोद्रे आदी उपस्थित होते.
पुणे दि.२२-केंद्र शासनामार्फत असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने ‘ई-श्रम’ पोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यातील असंघटित कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन कामगार उपायुक्त अभय गीते यांनी केले आहे.
नोंदणी अंतर्गत असंघटित कामगारांना खाते क्रमांक (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) दिला जाणार आहे. ‘ई-श्रम’ कार्ड च्या रुपाने असंघटित कामगारांना ओळख मिळणार आहे. असंघटित कामगार, छोटे व्यापारी, फेरीवाले, टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती इ.ना त्याचा लाभ होणार आहे.
‘ई-श्रम’ पोर्टलवर नोंदणी केल्यावर संबंधितांना दोन लाख रुपयांचा अपघाती विमा मिळणार आहे. तसेच भविष्यातील सरकारी योजनांचाही लाभ मिळू शकणार आहे. या नोंदणी अभियानांतर्गत जास्तीत जास्त असंघटित कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन श्री.गिते यांनी केले आहे.
नवी दिल्ली-टीव्ही चॅनल्सवरील चालणाऱ्या विखारी चर्चा समाजाच्या दृष्टीने प्रक्षोभक, विखारी विषाप्रमाणे असल्याचे कडक ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत. हेट स्पीच (द्वेषपूर्ण भाषणे) संबंधी याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयाने हे मत व्यक्त केले. टीव्हीवर चर्चेवेळी निवेदकाची भूमिका ही महत्वपूर्ण असते. द्वेषपूर्ण, विखारी भाषेला रोखणे हे त्याचे कर्तव्यच आहे असे स्पष्ट करून आपला देश कुठे चाललाय? असा सवाल न्यायमूर्ती के.एम.जोसेफ आणि न्या. हृषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने केला. हे सर्व केंद्र सरकार मूकपणे का पाहतेय ? त्याला रोखण्याचा सरकारचा विचार आहे का ? प्रक्षोभक भाषणांविरुद्ध विधी आयोगाच्या सल्ल्यानुसार कायदा बनवणार आहे का? असे प्रश्न कोर्टाने केले आहेत .दरम्यान, याप्रकरणी पुढील सुनावणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
हेट स्पीच विविध स्वरूपात असू शकते असे सांगताना एखाद्याची वारंवार खिल्ली उडवणे म्हणजे त्याची हत्या करण्यासारखेच आहे, असे सवाल न्यायमूर्तीद्वयांनी केले. हेट स्पीचसंबधी न्यायालयाने नियुक्त केलेले न्यायमित्र संजय हेगडे यांनी सांगितले की, टीव्ही चॅनल्ससाठी कोणताही नियमावली नाही. त्यावर प्रक्षोभक भाषणांच्या मुद्द्यांची तड लावण्यासाठी स्पष्ट धोरण असले पाहिजे लोकशाही राष्ट्राच्या दृष्टीने ही देशाची जबाबदारी आहे. विखारी भाषणांवर सरकारच्या उपाययोजनांबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
ठाणे -शिवसेना नेते व राज्याचे माजी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टवर नवरात्रोत्सवात कारवाई सुरु होईल. दिवाळीपर्यंत हा रिसॉर्ट जमीनदोस्त झालेला असेल, असा दावा आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.परबांच्या दापोली रिसॉर्टप्रकरणी उद्या राष्ट्रीय हरिल लवादासमोर सुनावणी होणार आहे. यासाठी आज किरीट सोमय्या ठाण्याहून दापोलीला रवाना झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी रिसॉर्टवरील कारवाईसंदर्भात भाष्य केले.किरीट सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा उजवा हात समजले जाणारे शिवसेना नेते संजय राऊत सध्या जेलमध्ये आहेत. आता लवकरच उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय म्हटले जाणारे अनिल परब यांच्याविरोधातही फौजदारी कारवाईला सुरुवात होणार आहे.किरीट सोमय्या म्हणाले, अनिल परब यांचा दापोली येथील रिसॉर्ट नवरात्रीत पाडण्यास सुरुवात होणार आहे. दिवाळीपर्यंत हा रिसॉर्ट जमीनदोस्त झालेला असेल. उद्या या रिसॉर्टसंदर्भात राष्ट्रीय हरित लवादासमोर सुनावणी होत आहे. तसेच, या रिसॉर्टवर लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी मी दापोली येथे पोलिस, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत आहे, जेणेकरून हे रिसॉर्ट तोडण्याची प्रक्रिया जलद व्हावी.
मुंबई : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादीत करणाऱ्या खेळाडूंना राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसांच्या रकमेत पाचपट वाढ करण्यात आली आहे. नवी मुंबई येथे १७ वर्षाखालील मुलींच्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे १० सामने होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत आणि फिफा (१७ वर्षा आतील) महिला फुटबॉलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना यश संपादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा – २०२२ मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना ध्वज प्रदान आणि १७ वर्षाखालील मुलींची वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा – २०२२ यजमान शहर बोधचिन्ह अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा मंत्री गिरीष महाजन, क्रीडा विभागाचे सचिव रणजीत सिंह देओल, आयुक्त सुहास दिवसे, फिफाचे प्रतिनिधी रोमा खान, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते चिराग शेट्टी, महाराष्ट्र कबड्डी संघाच्या सोनाली शिंगटे यांना ध्वजप्रदान करण्यात आला.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, फिफा महिला फुटबॉल वर्ल्ड कप सारख्या जागतिक दर्जाच्या आयोजनात राज्याने घेतलेल्या पुढाकारामुळे महिला फुटबॉल क्रीडा प्रकाराचा राज्यामध्ये प्रसार होण्यास व महिलांनी या खेळात सहभागी होण्यास उत्तेजन मिळणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना विशेषत: मुलींना फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी. तसेच, युवकांना मैदानी खेळासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. भारतात पहिल्यांदाच फिफा महिला (१७ वर्षाखालील) फुटबॉल वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे यजमान पद राज्याला मिळाल्याचा आनंद असल्याचे सांगून या स्पर्धांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले.
३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा-२०२२ गुजरात येथे २७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत देशभरातील ७ हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये राज्यातील ८०० खेळाडूंचे पथक रवाना होणार असून, ध्यानचंद पुरस्कार विजेते प्रदीप गंधे हे पथक प्रमुख असणार आहेत. कबड्डी, खो-खो, हॉकी, स्केटिंग, कुस्ती, मल्लखांब, फुटबॉल, वॉटरपोलो, बॉक्सिंग अशा ३४ क्रीडा प्रकारांत सहभागासाठी महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यावश्यक सुविधांसह पूर्व प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
क्रीडा मंत्री गिरीष महाजन म्हणाले, राज्यामध्ये क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी शासनाने खेळाडूंना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमेत वाढ केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्यांना १० लाख रूपये देण्यात येत होते. आता ती रक्कम ५० लाख एवढी करण्यात आली आहे. रौप्य पदक विजेत्यांसाठी ७.५० लाखाऐवजी ३० लाख, तर कास्यपदक विजेत्यांसाठी ५ लाखाऐवजी २० लाख रक्कम करण्यात आली आहे. त्यांनीही यावेळी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
याचबरोबर दि. ११ ते ३० ऑक्टोबर पर्यंत नवी मुंबई येथे फिफा (१७ वर्षाखालील) महिला वर्ल्ड कप इंडिया २०२२ चे आयोजन शालेय शिक्षण, क्रीडा विभाग आणि फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे. भारतात हे सामने पहिल्यांदाच होणार असून १२ ते ३० तारखेपर्यंत डी. वाय. पाटील स्टेडियमवर १० सामने होणार आहेत. हे सामने पाहण्यासाठी जास्तीत जास्त खेळाडूंसह विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन क्रीडा मंत्री श्री. महाजन यांनी केले आहे.
हे सर्व भाग जहाल माओवाद्यांचे बालेकिल्ले होते आणि या ठिकाणी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा, विदेशी ग्रेनेड्स, एरो बॉम्ब आणि आयईडी केले जप्त
वर्ष 2022 मध्ये, सुरक्षा दलांना ऑपरेशन ऑक्टोपस, ऑपरेशन डबल बुल, ऑपरेशन चक्रबंधामध्ये अभूतपूर्व यश मिळाले आहे.छत्तीसगडमध्ये 7 माओवादी ठार झाले आणि 436 अटक/आत्मसमर्पण /4 माओवादी झारखंडमध्ये ठार झाले तर 120 अटक/आत्मसमर्पण केले. बिहारमध्ये 36 माओवाद्यांची अटक / आत्मसमर्पण मध्य प्रदेशात सुरक्षा दलांनी 3 माओवाद्यांना ठार केले आहे
नवी दिल्ली-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्षलवाद – मुक्त भारताच्या संकल्पनेला मूर्त रूप देणे आणि नक्षलवाद अजिबात खपवून न घेण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे शून्य सहिष्णुता धोरण याला अनुसरून नक्षलवादविरोधात गृह मंत्रालय निर्णायक लढाईच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. नक्षलवादविरोधात सुरू असलेल्या लढ्यात आज सुरक्षा दलांनी निर्णायक विजय मिळवला.
नक्षलवादविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शून्य सहिष्णुता धोरणाचा परिणाम म्हणून, प्रथमच छत्तीसगड आणि झारखंडच्या सीमेवर स्थित ‘ बूढा पहाड़ ‘ आणि बिहारच्या चक्रबांध आणि भीमबांधच्या अति दुर्गम भागात प्रवेश करून नक्षलवाद्यांना त्यांच्या सुरक्षित आश्रयस्थानातून हुसकावून लावण्यात आले आणि तिथे सुरक्षा दलांच्या कायमस्वरूपी छावण्या उभारल्या आहेत. हे संपूर्ण क्षेत्र देशातील प्रमुख नक्षलवाद्यांचे बालेकिल्ले होते आणि या ठिकाणी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा, विदेशी ग्रेनेड्स, एरो बॉम्ब आणि आयईडी जप्त केले .
नक्षलवाद्यांविरोधात 2019 पासून विशेष रणनीती अवलंबली जात आहे. केंद्रीय आणि राज्य सुरक्षा दले आणि संबंधित यंत्रणांचे समन्वित प्रयत्न आणि राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे नक्षलविरोधी लढ्यात अभूतपूर्व यश मिळाले आहे.
या निर्णायक यशाबद्दल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीआरपीएफ आणि राज्य सुरक्षा दलांचे अभिनंदन केले आणि सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृह मंत्रालय नक्षलवाद आणि दहशतवादाच्या विरोधात शून्य सहनशीलता धोरण सुरूच ठेवेल आणि हा लढा अधिक तीव्र केला जाईल.
2022 मध्ये नक्षलवाद्यांविरोधातल्या लढ्यात सुरक्षा दलांनी ऑपरेशन ऑक्टोपस, ऑपरेशन डबल बुल, ऑपरेशन चक्रबांधमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. छत्तीसगडमध्ये 7 नक्षलवादी मारले गेले आणि 436 जणांना अटक झाली किंवा त्यांनी शरणागती पत्करली. झारखंडमध्ये 4 नक्षलवादी ठार झाले आणि 120 जणांना अटक झाली किंवा त्यांनी शरणागती पत्करली. बिहारमध्ये 36 नक्षलवाद्यांना अटक झाली / आत्मसमर्पण केले. तसेच मध्य प्रदेशात सुरक्षा दलांनी 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. 1 कोटी रुपयांचे बक्षीसअसलेल्या मिथिलेश महतो प्रमाणेच यात ठार झालेल्या अनेक नक्षलवाद्यांवर लक्षावधी-कोट्यवधी रुपयांचे बक्षीस होते हे यश महत्त्वाचे ठरते कारण.
2014 पूर्वीच्या तुलनेत, नक्षलवादी हिंसाचाराच्या घटना 77 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. 2009 मध्ये 2,258 इतक्या सर्वोच्च हिंसाचाराच्या घटना झाल्या होत्या. 2021 मध्ये या घटना 509 या संख्येपर्यंत खाली आल्या आहेत. हिंसाचारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ही 85 टक्क्यांनी कमी झाले आहे. सन 2010 मध्ये, ही मृत्यूची संख्या 1005 अशी सर्वाधिक होती. ती 2021 मध्ये 147 मृत्यु इतकी कमी झाली. नक्षलवाद्यांच्या प्रभाव क्षेत्रातही लक्षणीय घट झाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या प्रभावाचे क्षेत्रही लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. 2010 मध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव देशभरातील 96 जिल्ह्यांमध्ये होता. 2022 मध्ये त्यांचे केवळ 39 जिल्ह्यांवर त्यांचे वर्चस्व उरले आहे.
डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जप्तीच्या कारवाईतील सातत्य कायम ठेवत सुमारे 65.46 किलो वजनाची आणि 33.40 कोटी (अंदाजे) रुपये किमतीची, मूळ परदेशी सोन्याची 394 बिस्किटे जप्त केली आहेत. ईशान्येकडून त्याची तस्करी होत होती.
मिझोराममधून विदेशी मूळ सोन्याची तस्करी करण्याचा आणि त्यासाठी देशांतर्गत कुरिअर पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक कंपनीचचा वापर करण्याची योजना एक टोळी आखत आहे, अशी खबर डीआरआयला मिळाली.
तस्करी रोखण्यासाठी डीआरआयद्वारे ऑपरेशन गोल्ड रश ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मुंबईला नेल्या जाणारा, ‘वैयक्तिक वस्तू’ घोषित केलेल्या विशिष्ट माल अडवण्यात आला. 19.09.2022 रोजी भिवंडी (महाराष्ट्र) येथे तपासणी केली असता सुमारे 19.93 किलो वजनाच्या आणि सुमारे 10.18 कोटी रुपये मूल्याच्या विदेशी मूळ सोन्याच्या बिस्किटांचे 120 नग जप्त करण्यात आले.
पुढील विश्लेषण आणि तपासणीत असे दिसून आले की इतर 2 वेळा त्याच एका व्यक्तीने त्याच लॉजिस्टिक कंपनीद्वारे त्याच ठिकाणाहून माल मुंबईला पाठवला आहे. यावेळी लोकेशन ट्रेस करण्यात आले.
मालाची दुसरी खेप बिहारमध्ये अडवली गेली . लॉजिस्टिक कंपनीच्या गोदमामध्ये तपासणी केल्यावर, सुमारे 28.57 किलो वजनाची आणि सुमारे 14.50 कोटी रुपयांची, 172 विदेशी मूळ सोन्याची बिस्किटे सापडली. त्याचप्रमाणे, तिसऱ्यांदा लॉजिस्टिक कंपनीच्या दिल्ली हबमध्ये माल अडवण्यात आला आणि त्याची तपासणी करण्यात आली. सुमारे 16.96 किलो वजनाचे आणि 8.69 कोटी
रुपये किमतीचे विदेशी मूळ सोन्याच्या बिस्किटाचे 102 नग जप्त करण्यात आले.
तपासांच्या या मालिकेमुळे ईशान्येकडील भागातून आणि लॉजिस्टिक कंपनीच्या देशांतर्गत कुरिअर मार्गाने परदेशी मूळ सोन्याची भारतात तस्करी करण्याची नवीन विशेष पद्धत शोधण्यात मदत झाली आहे. तस्करीच्या वेगळ्या आणि अत्याधुनिक पद्धती शोधण्याची आणि त्यांचा सामना करण्याची डीआरआयची क्षमता अशा मोहिमांमुळे वृद्धिंगत होते. सुमारे 65.46 किलो वजनाचे आणि अंदाजे 33.40 कोटी रुपये किमतीचे एकूण 394 विदेशी मूळ सोन्याची बिस्किटे या अनेक शहरांत राबवलेल्या मोहिमेत जप्त करण्यात आले.
शेकडो कोटीच्या सायकल ट्रॅक योजनेचे काय झाले ,ठाऊक आहेच :आता पुण्यात ई-बाईक धावणार ; प्रस्तावाला प्रशासकांची मान्यता पुणे-पुण्यात ३५० कोटी ची सायकल ट्रॅक योजना आणण्यासाठी किती आटापिटा केला गेला,आणि नंतर या योजनेचा कसा बोजवारा उडाला याबाबत पुणेकरांना सांगणे नको.पण समस्या सोडविण्यापेक्षा ती कायम ठेऊन तिच्या नावे सातत्याने नाव नवीन योजना कशा आणता येतील.आणि शेकडो,हजारो कोटीची उलाढाल कशी सुरु ठेवता येईल यासाठी बहुतेक वेळा यशवी चढाई केली जाते कधी दिवाळी पार्टी देऊन तर कधी गुजरात दौरे काढून तर कधी अन्य वेगवेगळ्या मार्गाने,आता नदी सुधार प्रकल्पाची मलई सुरु असताना,इ बाईक योजना पुण्यात राबविली जाणार आहे,हि योजना काय पुण्यातील वाहतूक समस्येवर किती मात करेल हे दिसेलच.पण तत्पूर्वी ३५० कोटीच्या सायकल योजनेसाठी कसा आटापिटा केला गेला होता ते दाखविणारा हा फ्लॅश बॅक आहे…
राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत 18 नवीन संवर्धन राखीव क्षेत्र घोषी
मुंबई,दि.२१:राज्यात १८ नवीन आणि ७ प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र घोषीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली.त्यामुळे महाराष्ट्रात संवर्धन राखीव क्षेत्रांची संख्या ५२ होणार आहे. त्यामाध्यमातून राज्यात सुमारे १३ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित होण्यास मदत होणार आहे. अशा संवर्धन राखीव क्षेत्रातील वन्यजीवांचे संवर्धन करताना त्या भागातील ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात अडचण येणार नाही,त्यांचे हक्क बाधीत होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिले.मंत्रालयात मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची १९ वी बैठक झाली.यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी,प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ.वाय.एल.पी.राव,वन्यजीव मंडळाचे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये आदी यावेळी उपस्थित होते.या बैठकीत राज्यात १८ नवीन संवर्धन राखीव क्षेत्र घोषीत करण्यात आली.त्यामध्ये पुणे आणि रायगड जिल्ह्यातील वेल्हे-मुळशी (८७.४१ चौरस कि.मी.)आणि लोणावळा(१२१.२० चौरस कि.मी.),पुणे-ठाणे जिल्ह्यातील नानेघाट( ९८.७८ चौरस कि.मी.),पुणे जिल्हा भोरगिरीगड (३७.६४ चौरस कि.मी.),नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (६२.१० चौरस कि.मी.),सुरगाणा (८६.२८चौरस कि.मी.), ताहाराबाद (१२२.४५ चौरस कि.मी.),नंदूरबार जिल्ह्यातील कारेघाट (९७.४५ चौरस कि.मी.), चिंचपाडा (९३.९१ चौरस कि.मी.),रायगड जिल्ह्यातील घेरा माणिकगड (५३.२५ चौरस कि.मी.) व अलिबाग (६०.०३ चौरस कि.मी.), पुणे जिल्ह्यातील राजमाची (८३.१५ चौरस कि.मी.),ठाणे जिल्ह्यातील गुमतारा (१२५.५० चौरस कि.मी.),पालघर जिल्ह्यातील जव्हार (११८.२८ चौरस कि.मी.)धामणी (४९.१५ चौरस कि.मी.), अशेरीगड (८०.९५ चौरस कि.मी.),सांगली जिल्ह्यातील आटपाडी (९.४८ चौरस कि.मी.), चंद्रपूर जिल्ह्यातील एकारा (१०२.९९ चौरस कि.मी.)यांचा समावेश आहे.राष्ट्रीय उद्यानालगत आणि अभयारण्यालगत किंवा दोन संरक्षित क्षेत्र जोडणाऱ्या भूप्रदेशातील प्राणी,
वनस्पती यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या हेतूने संवर्धन राखीव क्षेत्र घोषीत केली जातात.प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्रांमध्ये नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड,ठाणे जिल्ह्यातील मोरोशीचा भैरवगड,औरंगाबाद जिल्ह्यातीलधारेश्वर,त्रिकुटेश्वर,कन्नड,पेडकागड तर नांदेड जिल्ह्यातील किनवटचा समावेश आहे
वन्य जीवांच्या संवर्धनासाठी खासगी प्रकल्पांकडून २ ऐवजी ४ टक्के रक्कम घ्यावी
अभयारण्य, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र आणि व्याघ्रभ्रमण मार्गात ज्या प्रकल्पांना वन्यजीव मान्यता आवश्यक आहे त्यांच्या कडून बाधीत क्षेत्रातील प्रकल्प किंमतीच्या २ टक्के रक्कम वन्यजीवांच्या संवर्धनासाठी जमा केली जाते. आता खासगी प्रकल्प यंत्रणेकडून ४ टक्के रक्कम घेण्याबाबतची सूचना वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मांडली. त्याला यावेळी मान्यता देण्यात आली. ही रक्कम जमा करण्यासाठी राज्य वन्यजीव निधी स्थापन करण्याची सूचना देखील श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर या ४ टक्के रक्कमेतील १ टक्का निधी हा राज्यातील जैवविविधतेसाठी वापरण्याचे निर्देशही त्यांनी दिले. उपशमन (मिटीगेशन) योजनेत सुचविलेल्या प्रकल्पांच्या वाढीव रकमेचा भार संबंधित प्रकल्प यंत्रणेने उचलणे बंधनकारक करण्याबाबत मंत्री. श्री. मुनगंटीवार यांनी सूचना केली. वन्यजीवांमुळे शेती तसेच मनुष्य जीवितहानीच्या घटना घडतात, अशा प्रकरणांमध्ये संबंधितास तत्काळ नुकसान भरपाई देता यावी यासाठी उणे प्राधिकार (निगेटिव्ह ट्रेझरी) सुविधा पुनश्च उपलब्ध करण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना जागेवरच सेवांचे वितरण
पुणे दि.२१: ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा निमित्ताने जिल्ह्यातील १४ तालुका मुख्यालये, ४ नगर परिषदा आणि ७ मोठ्या मंडळाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून महासेवा दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विशेष मोहिमेअंतर्गत नागरिकांना जागीच विविध २६ हजार ५२९ सेवांचे वितरण करण्यात आले.
शिबीरामध्ये विविध विभागांचे कक्ष स्थापित करण्यात आले होते. या माध्यमातून पंधरवड्यात द्यावयाच्या १४ सेवा आणि इतरही सेवांचे वितरण करण्यात आले. १४ सेवांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण पंतप्रधान किसान सन्मान योजना तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थी यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा, पात्र लाभार्थी यांना शिधापत्रिकेचे वितरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळजोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणीपत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ता धारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत सिंचन विहीरी करीता अनसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे, अनसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वनहक्क पटटे मंजूर करणे, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देणे या सेवांचा समावेश होता.
या व्यतिरिक्त पोलीस, आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण विभागांनी देखील या शिबिरामध्ये महाराजस्व अभियानांतर्गत सेवा दिल्या. बार्टी संस्थेचे सहकार्य घेऊन जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी तालुक्यात अर्ज भरुन घेण्याची मोहिम जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात महसूल प्रशासनाकडे तालुकानिहाय एकूण विविध पोर्टलवर एकूण अर्ज ९८ हजार ४८८ प्रलंबित होते त्यापैकी १४ हजार ९८१ अर्ज आजपर्यंत निर्गत करण्यात आले आहेत.
नैसर्गिक आपत्तीमध्ये डिसेंबर २०२१ अखेर झालेल्या नुकसानीचे १६ कोटी अनुदान २७ हजार रुपये नुकसानग्रस्तांसाठी प्राप्त झाले आहे. त्यापैकी ७ हजार ४३ इतक्या लाभार्थ्याचे ३ कोटी ४५ लाख अनुदान आज त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले व १० सप्टेंबरपासून आज अखेर १० हजार ६३४ लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात आले आहे. २३ सप्टेंबरपर्यंत उर्वरीत नुकसानग्रस्तांचे अनुदान संबंधिताच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
आज महसूल विभागाच्या एका दिवसात १४ हजार ९८१ सेवा व इतर विभागाच्या ४ हजार ५०५ सेवा, नैसर्गिक आपत्ती लाभार्थी वितरण ७ हजार ४३ अशा एकूण २६ हजार ५२९ सेवा देण्यामध्ये प्रशासनाला यश आले आहे. आज लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखणेसाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम घेण्यात आली. एका दिवसात ७० हजार लसीकरण करण्यात आले. आजपर्यंत ८ लाख ४४ हजार पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे.
महसूल विभागाने विविध दाखले, शिधापत्रिका, ४२ ब सनद, महावितरणने विद्युत जोडणीस मंजुरी, आरोग्य विभगाने दिव्यांग प्रमाणपत्र, पंचायत विभागाने जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी आणि नगर परिषदेतर्फे मालमत्ता हस्तांतरण नोंद, नव्याने नळ जोडणी, मालमत्ता कर आकारणी, विवाह नोंदणी अशा विविध प्रकारच्या सेवांचा लाभ नागरिकांना आजच्या शिबिराच्या माध्यमातून मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
आदिलशहाच्या कुळातलेच अमित शहा, हिम्मत असेल तर महापालिकेच्या निवडणुका घ्या महिन्यात ,त्यानंतर विधानसभेच्या ..आम्हालाही कुस्ती खेळता येते , पाहू कोण कोणाला लोळवितंय
मुंबई-निजाम-आदिलशहाच्या कुळातलेच अमित शहा आहेत. आतापर्यंत मुले पळवणारी टोळी ऐकली, पण सध्या बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रात फिरत आहे, असा घणाघात बुधवारी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करत देवेंद्र फडणवीसांना पिलावळ म्हणत अमित शहांना थेट नाव घेऊन आव्हान दिले .
ठाकरे शिवसेनेच्या गोरेगाव येथील गटप्रमुखांचा मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. यावेळी ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे शिंदे गटासह अमित शहांचाही समाचार घेतला.ऐका त्यांच्याच शब्दात
शहा त्याच कुळातले
ठाकरे म्हणाले, सध्या गिधाडाची टोळी फिरते आहे. निजामशहा, आदिलशहा आले आणि गेले. त्याच कुळातले अमित शहा. मी गिधाड शब्द मुद्दाम वापरला. मुंबईत संकटात असते, त्यावेळेस ही गिधाडे कुठे असतात. ही जमीन नाही. आमची मातृभूमी आहे. जो आमच्या आईवर वार करायला येईल, त्याचा राजकारणात कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.
कमळाबाई पहिल्यांदा बोललो
उद्धव पुढे म्हणाले की, कमळाबाईचा आणि मुंबईचा संबंधच काय. कमळाबाई पहिल्यांदा बोललो. कमळाबाई शब्द माझा नाही. बाळासाहेबांनी दिलेलाय. ही तीच शिवसेनाय. ती पाहता मुंबईवरती दावा सांगण्याचे धाडस करू नका. वंशवाद, वंशवाद कसला वशंवाद. मला माझ्या घराण्याचा अभिमानय.
ही त्यांचीच औलाद
ठाकरे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. त्या लढाईत जनसंघ नव्हता. जेव्हा लढाई सुरू होती तेव्हा माझे आजोबा होते. पहिल्या पाच अग्रणी नेत्यात माझे आजोबा होते. तेव्हा रण पेटले होते. तेव्हा निवडणुका लागल्या. त्यावेळी जनसंघाने मराठी माणसांची संघटना फोडली. केवळ राजकीय स्वार्थासाठी. आता राज्यातील हिच त्यांची औलाद आहे.
चित्त्याचा आवाज म्यँव…
ठाकरे म्हणाले, नालायक माणसं आपण जोपासली. मेहनत शिवसैनिकांनी केली आणि पदे त्यांनी लाटली. त्यांचे कर्तृत्व काय? बाहेरचे उपरे एवढे घेतले की. बावनकुळे की, एकशे बावनकुळे हेच कळत नाही. सत्तर वर्षानंतर काय म्हणे चित्ता आणला पण चित्त्यांची काय डरकाळी, पण चित्ता डरकाळी फोडत नाही. पिंजरा उघडला तर आवाज म्यँव निघाला.
फॉक्सकॉन गेला, हे खोटे बोलतायत
उद्धव म्हणाले, धारावीचे आर्थिक केंद्र गुजरातेत नेले. माझी योजना असल्याने तिथे घर बांधा. धारावीकरांना घरे मिळावीच आणि ते आर्थिक केंद्र बनावेच. ही माझी आणि शिवसेनेची भूमिका आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गेला आणि हे धादांत खोटे बोलत आहेत.
कितीदा दिल्लीसमोर झुकता
ठाकरे म्हणाले, लाज वाटायला हवी तुम्ही कुणाची बाजू घेऊन मांडत आहात. चला मी तुमच्यासोबत येतो. उद्योग परत आणू. पण मिंध्या गट नुसता शेपटी घालून होय महाराजा असे म्हणतो. मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला जातात. कितीदा दिल्लीत जाऊन झुकता. वेदांताला केंद्र सरकार सवलती देत आहे. हा कट आहे, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातेत न्यायचा आणि सवलती द्यायच्या.
शिवसेनेने आधार दिला
उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेने अनेकांना आधार दिला. प्राण वाचवणाऱ्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या पत्नीला नोकरी दिली. मी आज एक पत्र दिले आहे. मुंबईवर जेव्हा हल्ला झाला त्यावेळी शिवसैनिकांनी एनएसजी कमांडोसाठी चहा पाणी आणि मदत केली. मदत करताना हरीश नावाचा शिवसैनिक अतिरेक्यांच्या गोळीत मृत्यूमुखी पडला. चार शिवसैनिक जखमी झाले होते. आम्ही लढवय्ये आहोत. भाई और बहनो असे सभेत म्हणणारे कुठे होते. भाजपवाले अशावेळी कुठे असतात, असा सवाल त्यांनी केला.
आम्ही झुकणारे नाही
ठाकरे म्हणाले, शिवसैनिक आणि मुंबईचे नाते का दृढ आहे, तर ते रक्तदान, संकटात मदतीची जेव्हा गरज असते तेव्हा ते शिवसैनिक पुढे सरसावतो त्यामुळे. आमचे नाते अथांग आहे. भाजपवाले म्हणतात आमचे ठरले काय ठरले? मुंबईला पिळणार आणि दिल्लीश्वरांसमोर झुकवणार आम्ही झुकणारे नाही.
आम्ही आश्वासने पाळली
आम्ही जी आश्वासने दिली ती पाळली. पाचशे फूटापर्यंत मालमत्ता कर रद्द केला. दिल्लीतील शाळांचा विकास झाला चांगली गोष्ट आहे. आज मुंबईत महापालिकेच्या शाळात प्रवेशासाठी रांगा लागतात. हे शिवसेना आणि शिवसैनिकांचे यश आहे. अमिताभ बच्चन, रघुनाथ माशलेकर, माधुरी दीक्षितही या शाळात येऊन गेल्या हेच आमचे यश असल्याचे उद्धव म्हणाले.
खुशाल आरोप करा
उद्धव पुढे म्हणाले की, चीनने कोविड केअर सेंटर उभे केले. त्यानंतर वांद्र्यात आपणही असेच काम केले. साथ येण्यापूर्वी आणि पहिल्या लाटेत आपण उपाययोजना केली. कोरोना अहवाल समोर आला. त्यात केंद्राचा हलगर्जीपणा दिसून आला. आता कमळाबाई कशाला टीका करतेय. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत असाल तर खुशाल करा. कोरोनामध्ये प्राण वाचवले हा भ्रष्टाचार असेल तर आम्ही तो पुन्हा करू.
मंदिराऐवजी आम्ही रुग्णालये उघडली
ठाकरे म्हणाले, आपले सरकार आले हिंदु सणावरील विघ्न टळले. हा प्रकार काय आहे. घटनेवर हात ठेवून शपथ घेतली ना..तुमचे सरकार येण्यापूर्वी पंढरीची वारी झाली. कुणी बंधने काढली आम्हीच ना..तोपर्यंत सर्व आम्ही उघडे करून टाकले होते. कोश्यारींनी मला पत्र लिहिले आणि ईश्वरी संकेत मिळतात का? असा सवाल केला, सर्व प्रार्थनास्थळ उघडून टाका म्हणाले पण तेव्हा आम्ही रुग्णालये उघडली आरोग्यसेवा वाढवत होतो. ती तेव्हाची गरज होती. सर्व प्रार्थनास्थळ बंद असताना देव गेला कुठे. देव आपल्यात डाॅक्टरांच्या रुपात होता. हे जेव्हा मंदिरे उघडा म्हणून बोंबलत होते तेव्हा मी आरोग्य केंद्रे, सुविधा, कोविड सेंटर उघडीत होतो. हे पाप असेल तर होय मी ते केले. ते मी केले नसते तर आज भाजप-शिंदे सरकार वळवळले नसते.
ज्यांच्यावर आरोप तेच पक्षात
ठाकरे म्हणाले, मी मुंबई, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले. युपीसारखे मी महाराष्ट्रात घडू दिले नाही. सुप्रीम कोर्टाने कौतूक केले. परदेशातील लोकांनी कौतुक केले पण कमळाबाईला कौतूक नव्हते. दुसऱ्यांना चांगले काम केले की, भ्रष्ट्राचार झाला म्हणून ते ओरडत सुटतात. लोकांना बदनाम करायचे. ज्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले त्यांनाच पक्षात घेतले.
लाॅंड्री काढली काय?
ठाकरे म्हणाले, मोदींचे आश्चर्य वाटते. ज्या महिला खासदारावर भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले. तिच बहिण राखी बांधायला मिळाले. भाजपने भ्रष्ट्रांना स्वच्छ करायची लाॅंड्री उघडली का? उद्या-परवा निकाल लागेल तो आमच्यासाठी नाही तर महाराष्ट्र आणि देशासाठी महत्वाचे आहेत. कायद्यासमोर सर्व सारखे आहेत , आजही रामशास्त्रीसारखे न्यायमूर्ती आहेत आम्हाला विश्वास आहे. आम्ही बरोबर आहे की नाही हे आम्हाला कळू द्या.
शिंदे म्हणजे फिरते सरकार
ठाकरे म्हणाले, खोक्यातून आधी बाहेर या मग भ्रष्ट्राचाराशी लढा. मुल विकल्या जात आहेत आणि आमचे मुख्यमंत्री म्हणजे फिरते सरकार आता फिरा गोवा, सुरत, गुवाहटीला फिरत आहेत. माझ्यावर आरोप होतो की, मी घरीच बसलो, होय मी लोकांनाही घरीच बसा असे सांगितले तेव्हा कोरोनाचा काळ आहे.
पुणे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचा नावीन्यपूर्ण उपक्रम
पुणे दि.२१: अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ‘ईक्यूजे कोर्ट लाईव्ह बोर्ड अॅप’द्वारे अर्धन्यायिक प्रकरणांबाबत वकील आणि पक्षकारांना माहिती देण्याची प्रणाली विकसीत केली आहे. या अभिनव उपक्रमाचा वकील आणि पक्षकारांना फायदा होत असून प्रकरणे निकाली काढण्याचा कामाला गती मिळाली आहे.
महसूल विभागातील अर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढताना जुन्या प्रणालीत वकील आणि पक्षकारांना तारखा लिहून घ्याव्या लागायच्या. प्रशासकीय कामामुळे बोर्ड रद्द झाला किंवा वेळ बदलली तर पक्षकार, वकिलांना पुर्वसूचना देणारी यंत्रणा नव्हती. सुनावणीच्या वेळेस वकील व पक्षकारांची गर्दी होऊन त्यांना सुनावणीसाठी ताटकळत बसावे लागत होते. प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाणही वाढत होते. या नव्या प्रणालीमुळे सर्वांना सुविधा होणार असून पक्षकार आणि वकिलांना मोबईलच्या माध्यमातून प्रकरणांबाबत अद्ययावत माहिती मिळू शकणार आहे.
अर्धन्यायिक प्रकरणांची प्रक्रिया सुटसुटीत सुनावणी बोर्ड आणि बजावणी बोर्ड अशी विभागणी करून त्याचे दिवस निश्चित केले. बजावणी बोर्डमध्ये नोटीस न बजावलेल्या तसेच कोर्टाची कागदपत्रे न आलेल्या अपरिपक्व प्रकरणांचा समावेश असतो. सुनावणी बोर्डवर फक्त परिपक्व प्रकरणे घेतली जातात. त्यावर तीन ते चार वेळा सुनावणी होऊन निर्णय दिला जातो. त्या केसचा निर्णय दिला जातो. त्यानंतर पक्षकारांना सर्टिफाईड नकला दिल्या जातात, त्यामुळे तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे.
तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे सुनावणी असलेल्या वकील व पक्षकारांच्या उपस्थितीत वाढ झाली आहे. आठवड्यात तीन दिवस सुनावणी बोर्ड आणि दोन दिवस बजावणी बोर्ड असे पाचही दिवस बोर्ड सुरू रहात असल्याने प्रकरणे निकाली काढण्याचे प्रमाणे वाढले आहे. कामकाजामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्वात वाढ झाली आहे.अधिकाऱ्यांना टच स्क्रीन टॅब लाईव्ह बोर्ड अपडेट करणे एका क्लिकवर शक्य झालू असून जुन्या केसेस निकाली काढण्यासाठी प्रभावी नियंत्रण करणे शक्य झाले आहे. संबंधितांनी प्रकरणांची माहिती जाणून घेण्यासाठी गुगल प्लेस्टोअरवर जावून ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन श्री.देशमुख यांनी केले आहे.
विजयसिंह देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी–पक्षकार आणि वकीलांना केसेसची सद्यस्थिती ऑनलाईन उपलब्ध असल्याने सुनावणी व्यतिरिक्त कार्यालयात चौकशीसाठी होणारी गर्दी कमी होते. महसुली न्यायालयाच्या कामात पारदर्शकता आणी गतिमानता आली आहे. केसेस निकाली काढण्याचे प्रमाण वाढले आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यस्तरावर प्रत्येक महसुली न्यायालयात करण्याचे नियोजन आहे.
ईक्यूजे कोर्ट लाईव्ह बोर्ड अॅपची वैशिष्ट्ये
सुनावणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता प्रकरणांची माहिती (बोर्ड) मोबाईल ॲपवर
सुनावणीची संभाव्य वेळ पक्षकार आणि वकिलांना आदल्या दिवशी उपलब्ध.
सुनावणीच्या दिवशी प्रत्यक्ष कामकाजानुसार संभाव्य सुनावणीची वेळ अद्ययावत होते.
मोबाईल संदेशाद्वारे प्रकरणांची सद्यस्थिती, वादी प्रतिवादी, त्यांचे वकील, सुनावणीची तारीख याची माहिती
अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, रिसेप्शन परिसर, कॅन्टीनमध्ये स्मार्ट स्क्रीनची सुविधा
स्मार्ट स्क्रीनवर चालू केसेस, पुढील केसची संभाव्य वेळ याची माहिती नागरिकांना समजेल अशा पद्धतीने कलर कोडींगनुसार -पुणे जिल्ह्यात सर्व महसुली कोर्टमध्ये अर्थात जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, आठ उपविभागीय अधिकारी, १५ तहसिलदार आणि १०० मंडळ अधिकारी अशा एकूण १२५ कोर्टमध्ये ही प्रणाली कार्यरत. -प्रकरणांची माहिती ईक्यूजे कोर्ट लाईव्ह बोर्ड मोबाईल ॲप आणि टच स्क्रीन इन्फॉर्मेशन किऑस्कवर उपलब्ध