नवी दिल्ली-टीव्ही चॅनल्सवरील चालणाऱ्या विखारी चर्चा समाजाच्या दृष्टीने प्रक्षोभक, विखारी विषाप्रमाणे असल्याचे कडक ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत. हेट स्पीच (द्वेषपूर्ण भाषणे) संबंधी याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयाने हे मत व्यक्त केले. टीव्हीवर चर्चेवेळी निवेदकाची भूमिका ही महत्वपूर्ण असते. द्वेषपूर्ण, विखारी भाषेला रोखणे हे त्याचे कर्तव्यच आहे असे स्पष्ट करून आपला देश कुठे चाललाय? असा सवाल न्यायमूर्ती के.एम.जोसेफ आणि न्या. हृषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने केला. हे सर्व केंद्र सरकार मूकपणे का पाहतेय ? त्याला रोखण्याचा सरकारचा विचार आहे का ? प्रक्षोभक भाषणांविरुद्ध विधी आयोगाच्या सल्ल्यानुसार कायदा बनवणार आहे का? असे प्रश्न कोर्टाने केले आहेत .दरम्यान, याप्रकरणी पुढील सुनावणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
हेट स्पीच विविध स्वरूपात असू शकते असे सांगताना एखाद्याची वारंवार खिल्ली उडवणे म्हणजे त्याची हत्या करण्यासारखेच आहे, असे सवाल न्यायमूर्तीद्वयांनी केले. हेट स्पीचसंबधी न्यायालयाने नियुक्त केलेले न्यायमित्र संजय हेगडे यांनी सांगितले की, टीव्ही चॅनल्ससाठी कोणताही नियमावली नाही. त्यावर प्रक्षोभक भाषणांच्या मुद्द्यांची तड लावण्यासाठी स्पष्ट धोरण असले पाहिजे लोकशाही राष्ट्राच्या दृष्टीने ही देशाची जबाबदारी आहे. विखारी भाषणांवर सरकारच्या उपाययोजनांबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.