Home Blog Page 1570

पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शासन आणि पर्यटन क्षेत्रातील भागधारकांचे सहकार्य घेणार- पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

पुणे, दि. १४: पुणे जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव असून शासन आणि या क्षेत्रातील भागधारक यांच्या संयुक्त प्रयत्नातून पर्यटनाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण कल्पना राबवण्यात याव्यात, असे निर्देश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पर्यटन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पर्यटन विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांच्यासह पर्यटन क्षेत्रात कार्यरत यात्रा व्यवस्थापक (टूर ऑपरेटर्स), हॉटेल असोशिएशन, टूरिस्ट गाईड्स यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. लोढा म्हणाले, पुणे जिल्ह्यात शिवनेरी, सिंहगड यासारखे गडकिल्ले, भिगवण पक्षी निरीक्षण केंद्र आणि जुन्नर द्राक्ष महोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव यासारखे विविध उपक्रम पर्यटकांना आकर्षित करतात. याच बाबीचा विचार करता पर्यटक क्षेत्राचा विकास करण्यासाठी जिल्ह्यातील खाजगी पर्यटन क्षेत्रात कार्यरत विविध कार्यरत असणाऱ्या संघटनेची मदत घेऊन समिती स्थापन करावी.

पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा शासनाचा मानस आहे. यादृष्टीने या क्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्थांना शासनाच्यावतीने आवश्यक ती मदत केली जाईल. समितीच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्र विकसित करण्याच्यादृष्टीने नवनवीन कल्पना सूचविण्यास मदत होणार आहे, असेही ते म्हणाले.

पुणे जिल्ह्यात पर्यटन विकासाच्यादृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती सहायक संचालक श्रीमती करमरकर यांनी दिली. यावेळी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपले विचार मांडले.
000

आयटीआयमध्ये नवीन कौशल्यांचे अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

पुणे, दि. १४: जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासह आजच्या काळातील मागणीच्या कौशल्याचे अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी शासन आणि खासगी क्षेत्राचा सहभाग घेण्यात येईल, असे प्रतिपादन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभागीय सहसंचालक चंद्रकांत निनाळे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त अनुपमा पवार यांच्यासह आयटीआयचे प्राचार्य, उद्योग, लघुउद्योगांचे तसेच लघुउद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कोणतेही काम कमीपणाचे नाही हे आताच्या विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवणे आवश्यक असून त्यादृष्टीने या कामांसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्यात यावा, असे सांगून श्री. लोढा म्हणाले, कौशल्य विकासासासाठी शहरातील प्रत्येक प्रभागातील महानगरपालिका तसेच खासगी शाळांचे सहकार्य घेऊन शालेय स्तरावर किमान एक ‘कौशल्य केंद्र’ सुरू करण्याचे नियोजन करावे. त्यासाठी विभागाने संबंधित शाळा, संस्थेबाबत सामंजस्य करण्यासाठी प्रयत्न करावेत.

औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिकवण्यात येणारे काही अभ्यासक्रम कालबाह्य झाले असून उद्योगांच्या मागणीनुसार नवीन अभ्यासक्रमांची रचना करणे आवश्यक आहे. आयटीआयमधून गुणवंत विद्यार्थ्यांना निवडून त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना आकार देण्यासाठी इनक्युबेशन सेंटर्समध्ये प्रशिक्षण व सहाय्य देण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत.

पुणे जिल्ह्यातील सर्व आयटीआय अद्ययावत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी तसेच खासगी क्षेत्राचेही योगदान घेण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. कौशल्य विकास, आयटीआयचे अद्ययावतीकरण आदींमध्ये शासनाबरोबर खासगी क्षेत्र कशा पद्धतीने सहभाग देऊ शकेल याबाबत विचार, कल्पनांचे आदान प्रदान करण्यासाठी जिल्हास्तरावर एक समिती स्थापन करावी अशीही सूचना श्री. लोढा यांनी केली. त्यानुसार लघुउद्योग संघटनांनीही पुढाकार घेण्याबाबत सहमती दर्शविली.
000

तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची – रामनाथ पोकळे

पुणे, दि. १४: तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या अतिवापरामुळे मौखिक कर्करोगाचे प्रमाण युवकांमध्ये वाढत असून त्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी केले.

पुणे जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या वतीने पुणे शहरातील पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्यासाठी तंबाखू नियंत्रण कायदा 2003 यावर कार्यशाळेचे आयोजन पुणे पोलीस आयुक्तालय येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी तंबाखू नियंत्रण कक्षाच्या जिल्हा नोडल अधिकारी डॉ. सुहासिनी घाणेकर, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या राज्य प्रकल्प अधिकारी जिया शेख, विभागीय व्यवस्थापक अभिजित संघई आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. सुहासिनी घाणेकर यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम व प्रकल्पाची माहिती दिली. जिया शेख व अभिजीत संगई यांनी कोटपा 2003 कायद्याची दृकश्राव्य माध्यमाद्वारे विस्तृत माहिती दिली.

सार्वजनिक आरोग्य दंतरोगतज्ञ डॉ. सहाना हेगडे यांनी तंबाखूमुक्त शाळा यावर मार्गदर्शन केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक स्वाती मोरे सुनंदा ढोले, गणेश उगले, दिपाली
भोसले, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी, समुपदेशक हनुमान हाडे यांनी परीश्रम घेतले. यावेळी तंबाखू विरोधी शपथेचे वाचन करण्यात आले.

कोंढवा बुद्रुक येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई

पुणे-कोंढवा बुद्रुक येथे पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागातर्फे आज (शुक्रवारी) 40 हजार चौरस फूट अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.(Unauthorized construction) यावेळी काही मालकांनी त्यांचे शेड स्वतःहून काढून घेतले.

महापालिकेच्या विकास आराखड्यातील 84 मीटर डीपी रोडच्या जागेवर ही बांधकामे अनधिकृतरित्या उभी होती. यात काही पक्की तर काही पत्रा शेड होते.(Unauthorized construction) कोंढवा कात्रज या भागातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी हा रस्ता प्रस्तावीत आहे. मात्र अनधिकृत बांधकामामुळे तेथे काम करणे कठीण होत असल्याने महापालिका बाधीत जागा संपादीत करणार असून महापालिका जागा मालकांना योग्य तो मोबदला देणार आहे.

ही कारवाई झोन दोनचे कार्यकारी अभियंता राहूल साळुंखे, उप अभियंता शंकर दुदुस्कर, कनिष्ठ अभियंता निशीकांत छापेकर, संदेश पाटील, धनंजय खोले,(Unauthorized construction) हेमंत कोळेकर,कुमावत तसेच अतिक्रमण विभागाचे पोलीस निरीक्षक अडागळे यांच्या पथकाने केली. यावेळी जेसीबी व जॉ कटरच्या सहाय्यांनी ही कारवाई करण्यात आली.

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी मंत्रिमंडळाची नवीन उपसमिती

मुंबई, दि. १४ : मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करण्याकरिता मराठवाड्यातील सर्व मंत्र्यांचा समावेश असलेली नवीन मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.

या समितीत रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपानराव भुमरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे असतील. औरंगाबादचे विभागीय आयुक्त हे या समितीचे सदस्य सचिव असतील. ही समिती १७ सप्टेंबर २०२३ पर्यंत मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम निश्चित करतील. तसेच यासाठी येणारा सुधारित खर्चाचा आराखडाही सादर करतील.

‘मुकुल माधव फाऊंडेशन’ची (फिनोलेक्स इंडस्ट्रीजची सीएसआर भागीदार) सीएसआर क्षेत्रातील ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इयर २०२२’ म्हणून निवड

पुणे१४ ऑक्टोबर २०२२ : एखाद्या मूक कार्याला लोकमान्यता मिळते, तेव्हा तो क्षण साजरा करण्यासारखा असतो. फिनोलेक्स इंडस्ट्रीजची सीएसआर शाखा असलेल्या मुकुल माधव फाउंडेशनला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी श्रेणीतील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२ या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा क्षणही साजरा करण्याचाच होता. एका सार्वजनिक मतदान प्रक्रियेमध्ये मुकुल माधव फाउंडेशनला २५ लाखांहून अधिक मते मिळाली, त्यानंतर नामवंत व्यक्तींच्या ज्युरी पॅनेलने विचारविनिमय केला आणि या संस्थेला  हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला गेला. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील विविध नागरिक आणि संस्था यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल या पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात येते. व्यवसायसामाजिक कार्यविज्ञानतंत्रज्ञानातील नवकल्पनाप्रशासनसाहित्यकलाक्रीडाचित्रपट, नाट्य आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी या क्षेत्रांत यश मिळविणाऱ्यांचा हा सत्कार सोहळा असतो.

असुरक्षित, उपेक्षित समुदाय आणि व्यक्तींसोबत ‘मुकुल माधव फाउंडेशन’ तळागाळात काम करीत आहे. या वंचित घटकांना उत्कर्षासाठी आवश्यक असलेली संसाधने मिळवून देणे व त्यातून त्यांचे सक्षमीकरण करणे असे या कामाचे स्वरूप आहे. या कार्याचा हा पुरस्कार म्हणजे गौरव आहे. या कामातून आरोग्यसेवा, शिक्षण, समाजकल्याण, पाणी आणि पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, आपत्ती निवारण, क्रीडा आणि कौशल्य विकास या सामाजिक मुद्द्यांवर परिणाम घडविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.

या पुरस्कारावर भाष्य करताना ‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’चे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश छाब्रिया म्हणाले, “मुकुल माधव फाऊंडेशन या आमच्या सीएसआर भागीदारासोबत आमचे संबंध किती उत्तम रितीने विकसीत झालेले आहेत, याची साक्ष म्हणजे हा पुरस्कार आहे. आमचा दृष्टीकोन आणि आमची उद्दिष्टे या संस्थेच्या समाजोपयोगी कार्याशी व्यवस्थित जुळतात. महाराष्ट्रातील, आणि त्यापलीकडे जाऊन समाजातील, प्रत्येक घटकामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न आम्ही एकत्रितपणे करीत असतो.”

मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया म्हणाल्या, “आम्ही ज्या व्यक्ती आणि समुदायांसोबत काम करतो, त्यांच्याकडे या पुरस्काराच्या निमित्ताने सर्व समाजाचे लक्ष जाईल, अशी आम्हाला आशा वाटते. त्यांची उन्नती होते आणि ते आनंदाने,

सन्मानाने जगू लागतात, तेव्हाच आम्हाला मोठे बक्षीस मिळालेले असते. आमच्या या समाजकार्याच्या प्रवासात सतत सहभाग आणि पाठिंबा दिल्याबद्दल सर्व भागधारकांचे व स्वयंसेवकांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत.”

बजाज आलियान्झ लाईफ इन्श्युरन्सने बहुभाषिक वेबसाईट सुरु केली; सहा भारतीय क्षेत्रीय भाषांचा समावेश

–        हिंदीमराठीतामिळकन्नडबंगाली आणि मल्याळम मध्ये वेबसाईटवरील कन्टेन्ट उपलब्ध आहे.
–        जीवन बीमा सेवासुविधा व उत्पादनांचा लाभ सर्वांना अतिशय सहजपणे घेता यावा यासाठी कंपनी करत असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.

पुणे: भारतातील एक आघाडीची जीवन विमा कंपनी बजाज आलियान्झ लाईफ इन्श्युरन्सने आपली बहुभाषिक अधिकृत वेबसाईट सुरु केली आहेज्यावर सहा भारतीय क्षेत्रीय भाषांमध्ये कन्टेन्ट उपलब्ध आहे. जीवन विमा सेवासुविधा आणि उत्पादनांचा लाभ सर्वांना अतिशय सहजपणे घेता यावा या बजाज आलियान्झच्या व्हिजनला अनुसरूनदेशभरात विमा सेवेबाबत जागरूकता वाढावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जीवन विम्याचे लाभ आणि कंपनीची उत्पादने व सेवांची माहिती आता ग्राहकांना हिंदीमराठीतामिळकन्नडबंगाली व मल्याळम या सहा भाषांमध्ये वाचता व समजून घेता येणार आहे.

बजाज आलियान्झ लाईफ इन्श्युरन्सचे चीफ मार्केटिंग ऑफिसर श्री. चंद्रमोहन मेहरा यांनी यावेळी सांगितलेपुढील काही वर्षांमध्ये नव्याने इंटरनेटचा वापर करत असलेल्या दर दहांपैकी नऊ व्यक्ती या इंग्रजी न जाणणाऱ्या असतील. विमा खरेदी करण्याच्या या प्रक्रियेच्या आधी व नंतर विम्याचे सुलभीकरण करण्यासाठी आणि आमच्या ग्राहकांच्या संरक्षण व दीर्घकालीन गुंतवणूक गरजा त्यांना सोयीच्या अशा भाषेत पूर्ण करण्यासाठी क्षेत्रीय भाषांचा उपयोग करणे खूप महत्त्वाचे आहे.”

विम्याशी संबंधित विविध संकल्पना आणि माहिती लोकांना अतिशय सहजपणे समजावी यासाठी बजाज आलियान्झ लाईफ इन्श्युरन्स विविध माहिती उपक्रम राबवत आहे. याआधी ऎय्यो श्रद्धा या लोकप्रिय इन्फ्ल्यूएंसरसोबत सहयोगातून कंपनीने “लाईफ गोल मंत्राज्” हा विषय घेऊन कंपनीने व्हिडीओची एक सीरिज देखील आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सादर केली आहे.

www.bajajallianzlife.com वर जाऊन युजर्स क्षेत्रीय वेबसाईटचा लाभ घेऊ शकतात.  वेबसाईटच्या उजव्या बाजूला असलेल्या आयकॉनचा वापर करून युजर्स त्यांना हवी असलेली भाषा निवडू शकतात.

एमक्युअर तर्फे आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पाठबळ,५७ पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण

पुणे-

वंचित विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी एमक्युअर फार्मास्युटिकल्स पुण्यातील ५७ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करत आहे. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून एमक्युअर फार्मास्युटिकल्स या शैक्षणिकदृष्ट्या हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागातील विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शुल्का पैकी ८०% चा भार उचलेल.

निवडलेले विद्यार्थी मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स येथे विविध अभ्यासक्रम शिकत आहेत. या संस्थेबरोबर एमक्युअरचा सहयोग सात वर्षांपूर्वी पासून सुरू झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे  आवश्यक शुल्काची पूर्तता करता येत नाही त्यांना गरजेनुसार आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. हा उपक्रम म्हणजे उद्याच्या तेजस्वी मनांना त्यांच्या शिक्षणाच्या अत्यंत नाजूक टप्प्यात पाठिंबा देण्यासाठी एमक्युअरचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे.

एक समग्र वार्षिक पडताळणी प्रक्रिया सर्वात योग्य उमेदवार निवडण्याचा आधार बनवते. गेल्या सात वर्षांत सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.

चिखलवाडीच्या संयुक्त विकास आराखड्या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश  

सुनील माने यांच्या मागणीला यश

पुणे ता.१४, प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वात पहिल्यांदा साजरी करणाऱ्या चिखलवाडी साठी संयुक्त विकास आराखडा तयार करावा अशी मागणी भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी समाजकल्याण आयुक्त यांच्याकडे केली होती. याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश राज्याचे समाजकल्याण उपायुक्त रविंद्र कदमपाटील यांनी समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त व सहायक आयुक्त यांना दिले आहेत.  

मागासवर्गीय समाजाच्या विविध समस्यासंदर्भात सुनील माने यांनी समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी या समस्या सोडवण्यासाठी समाजकल्याण आयोगाने पुढाकार घ्यावा अशी विनंती केली होती. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वात पहिल्यांदा साजरी करणाऱ्या चिखलवाडीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी समाजकल्याण विभागामार्फत संयुक्त विकास आराखडा तयार करावा तसेच येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतीस्थळ करावे अशी विनंती निवेदनाद्वारे केली होती.

यावेळी त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पहिल्यांदा १४ एप्रिल १९२८ साली जगात पहिल्यांदा पुणे शहरातील चिखलवाडी येथे साजरी केली होती. याचा दाखला देऊन हे ऐतिहासिक स्थळ असल्याने चिखलवाडी तसेच आसपासच्या परिसराचा पायाभूत सुविधा,शैक्षणिक विकास, रस्ते व आरोग्य विकास करण्यासाठी विशेष कृती आराखडा करावा अशी मागणी केली होती.

याबाबत समाजकल्याण आयुक्त यांनी सकारात्मकता दाखवत चिखलवातील आंबेडकर स्मृतिस्थळासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. याबाबत समाजकल्याण आयुक्तालयाने आदेश काढून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.  

श्री माने यांनी याबाबत उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्याचबरोबर खासदार गिरीश बापट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन आराखड्यातून यासाठी निधी देण्याबाबत पत्र दिले आहे.

चित्रकार प्रियंका गुरव यांनी राज्यपालांचे पेन्सिलने रेखाटले हुबेहुब स्केच

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रियंकाचे केले कौतूक
पुणे, १४ ऑक्टोबर: माईर्स एमआयटीच्या ज्यूनिअर कॉलेजमधील ११ विज्ञान शाखेची विद्यार्थीनी प्रियंका गुरव यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पेन्सिल ने रेखाटलेले स्केच नुकतेच त्यांना भेट दिले. पुण्यातील राजभवन येथे आयोजित छोट्या कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांनी प्रियंका हिचा विशेष सत्कार करून भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  
यावेळी माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड, स्वाती कराड चाटे, अण्णासाहेब टेकाळे, ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.के.एच.संचेती हे उपस्थित होते.
प्रियंका गुरव ही अत्यंत कष्टाळू असून चित्रकलेची आवड आहे. कोरोनाच्या काळात चित्रकलेची आवड निर्माण झाल्यानंतर या कलागुणासाठी कठीण परिश्रम घेतले. तीने आतापर्यंत अनेक नामवंत राजकीय, सामाजिक, सिनेसृष्टी, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींची भेट घेऊन त्यांचे स्केच काढून त्यांने भेट स्वरूप दिले. अत्यंत हुशार प्रियंकाने २०२२ मध्ये दहावीत ९१ टक्के गुण मिळवून शाळेत दुसार क्रमांक पटकविला.

देवनार पूर्व बेस्ट कामगार वसाहतीनजीकची ड्रेनेज लाईन बदलावी- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

मुंबई, दि. 14 : देवनार पूर्व बेस्ट कामगार वसाहत नजीकच्या ड्रेनेज लाईन बदलण्याचे काम तत्काळ सुरू करावे, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला  दिले.

एम.ईस्ट वॉर्ड, गोवंडी (पूर्व) येथे पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.यावेळी आमदार अबू आझमी, तसेच  सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवनार बेस्ट कामगार वसाहत मुंबई (पूर्व) येथे गेले ३० वर्षे ड्रेनेज लाईन तसेच इमारतींची देखभाल दुरूस्ती झालेली नाही. येथील नागरिकांची अडचण सोडविण्यासाठी प्रशासनाने प्राधान्याने कार्यवाही करावी. या कामामध्ये दिरंगाई करू नये. महाराष्ट्र नगर ते मानखुर्द घाटकोपर येथे पूलाचे बांधकाम गतीने पूर्ण करावे, असे निर्देश मंत्री श्री. लोढा यांनी दिले.

नागरिकांनी २७५ विविध विषयांवर आपले तक्रार अर्ज दिले. तर ७४ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. लोढा यांनी यावेळी दिल्या.

‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम दि. १५ ऑक्टोबर रोजी एच वेस्ट वॉर्ड- वांद्रे पश्च‍िम येथे सकाळी १० वाजता सुरू होईल. नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन ही  जिल्हाधिकारी : https://mumbaisuburban.gov.in  बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in वरील लिंक वरही ऑनलाइन तक्रार करता येतील.

ऐन दिवाळीत एसटी चा भाडेवाढीचा दणका

पुणे-ऐन दिवाळीत एसटी महामंडळाने भाडेवाढ करून जोरदार दणका दिला आहे. या काळात दहा टक्क्यांनी तिकीट महागणार आहे.महामंडळाने महसूल वाढीसाठी ही भाडेवाढ केलीय. दहा दिवस प्रवाशांना जादा भाडे आकारण्यात येणार आहे.

एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही 20.10.2022 व 21.10.2022 रोजीच्या मध्यरात्री 00.00 नंतर प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना सुधारित 10 टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येईल. ही भाडेवाड 31 ऑक्टोबर, 2022 पर्यत राहील.

यांना लागू नाही…

सदर भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागू राहील. शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे , त्या प्रवाशाकडून वाहकाद्वारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल.

पासधारकांना सूट

तथापि, ही भाडेवाढ एस.टी.च्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक व विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. 1 नोव्हेंबरपासून भाडेवाढ संपुष्टात येऊन, नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील, असे एसटी महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.

मेफेड्राॅन या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना पकडले

पुणे-मेफेड्राॅन या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने वानवडी भागात पकडले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगेंनी शुक्रवारी दिली. आराेपींकडून दीड लाख रुपयांचे 10 ग्रॅम मेफेड्रोन, मोबाइल संच, दुचाकी असा तीन लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मतीन हुसेन मेमन (वय 21, रा. सबेरा पार्क, कोंढवा,पुणे), शाहरुख कादीर खान (वय 29, रा. युनिटी पार्क, कोंढवा,पुणे), अनमोलसिंग मनचंदा सिंग (वय 33, रा. साईद्वारका सोसायटी, एनआयबीएम रस्ता, काेंढवा,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक- एक गस्त घालत होते. त्यावेळी वानवडी भागात लुल्लानगर परिसरात दोन तस्कर अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मतीन मेमन,शाहरुख खान यास पकडले. त्याच्याकडील सखाेल पोलिस चौकशीत साथीदार सिंग याचे नाव निष्पन्न झाल्यानंतर अनमाेलसिंग याचेकडून दाेघांनी मेफेड्राॅन विक्रीस आणल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मेफेड्रोन, दुचाकी, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्हा दाखल

आरोपी मेमन, खान, सिंग शहरात अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.याप्रकरणी आराेपींवर वानवडी पोलिस ठाण्यात एनडीपीसी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी नेमके सदर अमली पदार्थाची विक्री कोणास करणार होते ,त्यांचे अन्य साथीदार कोण आहेत, अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट नेमके कोण चालवतोय याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पाेकळे, गुन्हे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यक निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, मनोज साळुंके, योगेश मोहिते, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदीप शिर्के यांनी ही कारवाई केली आहे

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर  तातडीने स्वतंत्र  ट्रॅफिक प्लॅनरची नियुक्ती करा :आबा बागुल 

वाहतुकीचा प्रश्न गंभीर;पालिका प्रशासनाला सुचविल्या प्रभावी उपाययोजना 

पुणे 

सध्यस्थितीत  शहराचा  वाहतुकीचा गंभीर बनलेला  प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने    १५ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर  तातडीने स्वतंत्र  ट्रॅफिक प्लॅनरची नियुक्ती करून पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. 

यासंदर्भात आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे की,  

भविष्याचा विचार करता आतापासून आपल्याला वाहतूक नियोजनासाठी पाऊले उचलावी लागणार आहेत. 

त्यासाठी 

शहराच्या वाहतुकीबाबत नियोजनाचा मास्टर प्लॅन तयार असणे अनिवार्य आहे.  मात्र सद्यस्थितीत बिकट बनलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना  प्रभावीरीत्या  राबविल्यास वाहतूक कोंडीतून पुणेकरांना दिलासा मिळणे सहजशक्य आहे. 

सध्या वाहतूक कोंडीमुळे नोकरदार, विद्यार्थी अशा सर्वांचे हाल होत आहे. वेळेचा अपव्यय होत असल्याने मनस्तापाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यात  या प्रश्नावर पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आणि अनास्था यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न जटिल होत असल्याच्या वास्तवाकडेही  आबा बागुल यांनी लक्ष वेधले आहे.

सध्या  शहरात  होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अरुंद रस्त्यांसह शहरातील सर्वच रस्त्यांवर चार चाकी  वाहनांना पार्किंगला अटकाव घालणे, वाहतूक नियंत्रक दिव्यांचे सुसूत्रीकरण करणे, अतिक्रमण विरहित फुटपाथ, रस्ता रुंदीतील जागा ताब्यात घेऊन रस्ते विकसित करणे, प्रत्येक चौकात दोनशे मीटर अंतरावर गतिरोधक उभारणे, रस्त्यात बंद पडलेल्या वाहनांना घेऊन जाण्यासाठी क्रेनची व्यवस्था सक्षम करणे, चोवीस तास वाहतूक नियंत्रक दिवे  सुरु ठेवण्यासाठी वीज बॅटरी  बॅकअप यंत्रणा प्रभावी करणे, जिथे आवश्यक,त्या ठिकाणी एकेरी मार्गाची आखणी करणे, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर वाहनतळांची निर्मिती करणे आदी विविध उपाययोजना  माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रशासनाला सुचविल्या असून  त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.

 सद्यस्थितीत शहराला ट्रॅफिक प्लॅनरच नसल्याने,तातडीने मुख्य  ट्रॅफिक प्लॅनरची नियुक्ती   करून त्यांच्या नियंत्रणाखाली    पंधरा क्षेत्रीय कार्यालय स्तरावर स्वतंत्र ट्रॅफिक प्लॅनर नेमावेत आणि प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर  पोलिसांच्या मदतीने  सुरळीत वाहतुकीची जबाबदारी त्या त्या  ट्रॅफिक प्लॅनरवर सोपवावी असेही आबा बागुल यांनी म्हटले आहे.  

राजकारणी अभ्यासू नसतात हा मोठा गैरसमज-खासदार प्रकाश जावडेकर

800​​​​​​​ पैकी 700 खासदार पदवीधर, 400 द्विपदवीधर, 200 पीएच.डी.धारक

पुणे, दि. 14 – ”राजकारणी अभ्यासू असू शकत नाही, असा समाजाचा मोठा गैरसमज आहे. पण तो चुकीचा आहे. आठशे खासदारांपैकी 700 खासदार पदवीधर आहेत. चारशे खासदार द्विपदवीधर आहेत. दोनशे खासदारांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे. विविध विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. समित्यांमध्ये होणार्‍या सर्वपक्षीय चर्चांतून त्यांची अभ्यासूवृत्ती दिसून येते.” असे मत खासदार प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
‘दी पूना गुजराती केळवणी मंडळा’च्या ‘आरसीएम गुजराती हायस्कूल’मध्ये जावडेकर यांच्या खासदार निधीतून अद्ययावत व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. तिचे उद्घाटन करताना जावडेकर बोलत होते. जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कासगावडे, संस्थेचे अध्यक्ष मोहन गुजराथी, राजेश शहा, डॉ. ए. पी. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.  
जावडेकर म्हणाले, शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा प्रसन्न राहण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. वाढत्या व्यसनाधिनतेपासून मुलांना मुक्त करून चांगल्या मार्गाला लावायचे असेल, तर व्यायामशाळा उभारल्या पाहिजेत, असे मत खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले,“आश्वासक खेळाडूंना शिक्षक शोधतो, प्रशिक्षण देत असतो. खेळासाठी आवश्यक साहित्य, पोषण आहार पुरविण्याची व्यवस्था समाज आणि क्रीडा संस्थांनी करणे महत्त्वाचे काम आहे. मोदी सरकारने खेळाडूंना शिक्षक, प्रशिक्षण, स्पर्धेसाठी प्रवास अशा विविध सुविधा दिल्या. त्यामुळे खेळाविषयी आत्मीयता निर्माण झाली आहे. जाणीवपूर्वक केलेल्या या प्रयत्नांचे फळ म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले खेळाडू मोठ्या सं‘येने पदके मिळवित आहेत.”
जावडेकर पुढे म्हणाले, “व्यायाम केल्याने सौंदर्य प्रसाधने वापरावी लागत नाहीत. सौंदर्य आतून खुलते आणि ते चेहर्‍यावर दिसते, आरोग्य चांगले राहून हालचाली आणि चपळता वाढते. नवे खेळाडू खेड्यातून येतात त्यांचा अभिमान वाटतो. कॉन्व्हेंट शाळांमध्ये मुलांना घालणार्‍या पालकांनी हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच जिद्दीने खेळणार्‍या या खेळाडूंच्या कहाण्या मुलांना सांगितल्या पाहिजेत.
शमा गद्रे यांनी सूत्रसंचालन, रेणू तारे यांनी परिचय, किरीट शहा यांनी स्वागत आणि जनक शहा यांनी आभार मानले.