Home Blog Page 1561

मुळीक आणि मोहोळांना अरविंद शिंदेंचे खुले चॅलेंज ,म्हणाले असेल हिंमत तर ….

५ वर्षातल्या नाले सफाई ,ड्रेनेज च्या कामांची श्वेत पत्रिका काढा

पुणे- पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसाने अल्प वेळेत पुण्याच्या विकासाच्या कामकाजाचा केलेला पर्दाफाश आणि त्यामुळे सातत्याने गैरकारभार ,अनधिकृत बांधकामे , नाले बळकाविण्याचे, वळविण्याचे प्रकार खुलेआम पाहून डोळे मिटून वावरलेल्या पुणेकरांची उडालेली दैना आता सार्वत्रिक झाली आहे. पावसाने सर्वांचीच पोलखोल केली आहे . या पार्श्वभूमीवर भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आणि अन्य महापालिका पदाधिकारी राहिलेल्या भाजपा नेत्यांनी राष्ट्रवादी -आणि कॉंग्रेसचेच हे पाप असल्याचा आरोप केल्यावर ,त्यानंतर आता यावर आपण एकत्र बसून मार्ग काढू असा समंजस पवित्र घेत पुणेकरांकडे पालकमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यावर देखील सहज मिटेल असा हा विषय नसल्याने कॉंग्रेसच्या शिष्ट मंडळाने आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले. गेल्या ५ वर्षात कामांच्या नावाखाली केवळ बिले काढली गेली , कामे झालीच नाहीत असा आरोप करत कॉंग्रेसने पुन्हा एकदा आता या निमित्ताने किमान नाले सफाई , ड्रेनेज अशा कामांची तरी श्वेत पत्रिका काढा अशी मागणी केली आहे . पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे , माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे ,ज्येष्ठ नेते उल्हास पवार ,कमल व्यवहारे ,रजनी त्रिभुवन ,संगीता तिवारी आदी मान्यवर कार्यकर्ते यांचा या शिष्ट मंडळात समावेश होता. त्यानंतर संध्याकाळी कॉंग्रेस भवनात पत्रकार परिषद घेत कॉंग्रेसचे अध्यक्ष शिंदे यांनी भाजपा च्या तत्कालीन महापालिका पदाधिकाऱ्यांच्या कडून झालेल्या टीकेचा समाचार घेतला. या वेळी नेमके ते काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात ……

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांची कोतवालांना पदोन्नतीची विशेष भेट

पुणे दि.२०- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी कोतवाल संवर्गातील ५७ कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण जवळ आला असताना पदोन्नतीची विशेष भेट दिली आहे.

महाराष्ट्र राज्यातील कोतवाल महसूल विभागाच्या अधिपत्याखालील अवर्गीकृत कर्मचारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडील निर्णयानुसार महसूल विभागांतर्गत असणाऱ्या गट ‘ड’ च्या प्रथम नियुक्तीच्या पदांपैकी नियमित पदांमधून ४० टक्के पदे कोतवालांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत. पुणे जिल्ह्याच्या आस्थापनेवरील गट ‘ड’ शिपाई संवर्गाच्या एकूण पदांच्या ४० टक्क्यांनुसार येणाऱ्या पदापैकी ५९ पदे कोतवालातून गट ‘ड’ शिपाई पदावर प्रथम नियुक्ती देण्यासाठी उपलब्ध झाली आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, भूसंपादन अधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्या मार्गदर्शनानुसार कोतवालातून गट ‘ड’ शिपाई पदावर प्रथम नियुक्ती देण्याचे कामकाज प्राधान्य देत पूर्ण करण्यात आलले आहे. गुणवत्तेनुसार पात्र असलेल्या ५७ कोतवाल कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर अनोख्या भेट स्वरूपात डॉ. देशमुख यांच्या हस्ते गट ‘ड’ शिपाई संवर्गाच्या रिक्त पदावर प्रथम नियुक्ती आदेश वितरीत करण्यात आले.

पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये शिरूर तालुक्यातील ३, हवेली २, मावळ २, खेड ४, दौंड ११, पुरंदर ६, बारामती ६, इंदापूर ५, जुन्नर ७, आंबेगाव १, भोर ९ आणि वेल्हा तालुक्यातील एक कोतवालांचा समावेश आहे, अशी माहिती श्री. तेली यांनी दिली आहे. पदोन्नतीमुळे या सर्व कोतवालांसाठी ही दिवाळी आनंददायी ठरण्यासोबतच स्मरणीयही राहणार आहे

हर्षिल, रोहन, मालविका, पूर्वा, नेहाची विजयी सलामी

व्ही. व्ही. नातू स्मृती अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धा

पुणे : महाराष्ट्राच्या हर्षिल दाणी, रोहन गुरबानी, मालविका बनसोड, पूर्वा बर्वे, नेहा पंडित यांनी पुणे जिल्हा आणि मेट्रोपोलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) वतीने आयोजित व्ही. व्ही. नातू स्मृती अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.

शिवाजीनगर येथील पीडीएमबीएच्या मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचे अधिकृत उदघाटन महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अरुण लखानी यांच्या हस्ते झाले. यावेळी पीडीएमबीएचे सचिव रणजीत नातू, अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, टूर्नामेंट रेफ्री ओमर राशिद, आयोजन समिती सचिव राजीव बाग, पीडीएमबीएचे वरिष्ठ उपाध्यक्ष सदाशिव नातू तसेच श्रीकांत वाड, शिरीष बोराळकर, अविनाश जाधव, आनंद जोशी, सारंग लागू, शशांक हळबे यावेळी उपस्थित होते.यावेळी उपस्थित होते. याच वेळी पुणे येथे होणाऱ्या वरीष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

पात्रता फेरीतून आलेल्या हर्षिलने तमिळनाडूच्या खिरुथिक सी.चा २१-११, २१-१४ असा, तर रोहन गुरबानीने हरियाणाच्या बलराज कजलाचा २१-११, २१-१७ असा पराभव केला. पात्रता फेरीतून आलेल्या कर्नाटकाच्या डॅनिएल फरिद एस.ने वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्राच्या आर्य भिवपाठकीला २१-१७, २१-१३ असे नमविले. यानंतर पात्रता फेरीतून आलेल्या राजस्थानच्या प्रणय कट्टाने महाराष्ट्राच्या दर्शन पुजारीला २१-११, २१-१४ असे, तर कर्नाटकाच्या पृथ्वी रॉय के.ने महाराष्ट्राच्या वसीम शेखला २१-१७, २१-१४ असे पराभूत केले. कौशल धर्मामेरने तेलंगणच्या ऋषेंद्र तिरुपतीला २१-९, २२-२० असे नमविले.

महिला एकेरीच्या सलामीच्या लढतीत अग्रमानांकित मालविका बनसोडने पात्रता फेरीतून आलेल्या महाराष्ट्राच्याच ओजल राजकवर २१-९, २१-२ असा सहज विजय मिळवला. यानंतर रिया हब्बूने कर्नाटकाच्या ग्लोरिया आठवले व्ही.वर २१-१७, १८-२१, २१-१२ अशी, तर तिसऱ्या मानांकित पूर्वा बर्वे गोव्याच्या अंजनाकुमारीवर २१-११, २१-६ अशी मात केली. सातव्या मानांकित नेहा पंडितने पात्रता फेरीतून आलेल्या हरियाणाच्या चित्वान खत्रीवर १९-२१, २१-१५, २१-१५ असा, अकराव्या मानांकित श्रुती मुंदडाने महाराष्ट्राच्याच सानिका पाटणकरवर २१-१, २१-८ असा विजय मिळवला.

निकाल : पुरुष एकेरी – अभिषेक सैनी (हरियाणा) वि. वि. अधीप गुप्ता (गुजरात) २१-१८, २१-१४, कौशिक सी. एस. (तमिळनाडू) वि. वि. सिद्धार्थ मिश्रा (उत्तर प्रदेश) २१-१४, १२-२१, २१-१९, प्रणव राव गंधम (तमिळनाडू) वि. वि. हर्ष चापलोत (राजस्थान) २१-१८, २१-१६, तुकूम ला वि. वि. ऋषभ देशपांडे (महाराष्ट्र) १७-२१, २१-१८, २१-१५, मनराजसिंग (हरियाणा) वि. वि. किरणकुमार (तेलंगण) २१-१५, १९-२१, २१-१०, कार्तिक जिंदाल (हरियाणा) वि. वि. जस्करण सिंग (हरियाणा) २२-२०, २१-८, हेमंत एम. जी. (कर्नाटक) वि. वि. सिद्धान्त गुप्ता (तमिळनाडू) २२-२०, १३-२१, २१-१३.

महिला एकेरी – मिहिका भार्गव (मध्य प्रदेश) वि. वि. उत्सवा पलित (पश्चिम बंगाल) १४-२१, २१-७, २१-१६, मेघना रेड्डी (तेलंगण) वि. वि. हिमांशी रावत (उत्तराखंड) २१-१५, २१-९, मेघना एस. (केरळ) वि. वि. ऋथ मिशा विनोद २५-२३, २२-२०, ऐश्वर्या मेहता (मध्य प्रदेश) वि. वि. प्रीती के. (आंध्र प्रदेश) २१-१६, २५-२३, मधुमिता नारायण (महाराष्ट्र) वि. वि. प्रज्ञा के. पी. एस. (२२-२०, १४-२१, २१-११), श्रेया लेले (गुजरात) वि. वि. गायत्री राणी जैस्वाल (कर्नाटक) २१-१२, २१-११.

दिवाळी सण साजरा करताना वीजसुरक्षेची काळजी घ्या – महावितरणचे आवाहन  

पुणे, दि. २० ऑक्टोबर २०२२: सणांचा राजा असलेल्या दिवाळीची लगबग सुरु झाली आहे. दिवाळीनिमित्त होणारी विद्युत सजावट, रोषणाई तसेच फटाक्यांची आतषबाजी करताना वीजसुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातच सध्या पावसाची दररोज हजेरी सुरु असल्याने वीज सुरक्षेबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. सार्वजनिक वीजयंत्रणेसोबतच घरगुती रोषणाईच्या विद्युत उपकरणांपासून सतर्क राहावे. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता वीजसुरक्षेची काळजी घेत दिवाळी सण साजरा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

दरम्यान, दिवाळी सणाच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलातील अभियंता व कर्मचाऱ्यांनी सज्ज व सतर्क राहण्याच्या सूचना मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी दिल्या आहेत.

महावितरणची विजयंत्रणा ही सार्वजनिक ठिकाणी आहे. यात उच्च व लघुदाबाच्या उपरी वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणा उघड्यावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक वीजयंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. रोहित्र, फ्यूज पेट्या, फिडर पिलर, रिंग मेन युनिटजवळ फटाके फोडू नयेत किंवा त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये अथवा तो जाळू नये. वीजवाहिन्यांना स्पर्श होईल किंवा धोका निर्माण होईल असे रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत. मोकळ्या जागेतच फटाके उडवावेत. वीजयंत्रणेला आग लागल्यास, धोका निर्माण झाल्यास, वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या २४ तास सुरु असणाऱ्या कॉल सेंटरच्या १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

दिवाळी साजरी करताना घरगुती विद्युत उपकरणांपासून देखील सतर्क राहावे. घराच्या किंवा इमारतीच्या रोषणाईसाठी दिव्यांची विद्युत माळ चांगल्या दर्जाची असल्याची खात्री करून घ्यावी. विद्युत माळेचे वायर, दिवे, सॉकेट दर्जेदार नसल्यास धोका निर्माण होऊ शकतो. घर किंवा इमारतीचे अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करावी. घराबाहेर आकाशकंदील लावताना तुटलेल्या वायरचा वापर टाळावा किंवा तुटलेली वायर चांगल्या दर्जाच्या इन्सूलेशन टेपने सुरक्षित करून घ्यावी. घरगुती उपकरणांसह विद्युत माळेपासून सुरक्षित अंतरावर तेलाच्या वातीचे दिवे लावावेत. विद्युत सॉकेटवर अधिकचा भर टाकू नये. आकाश कंदिल किंवा दिव्यांच्या विद्युत माळेसाठी थ्रीपीनचा वापर न करता वायर्स थेट प्लगच्या छिद्रात आगपेटीच्या काड्यांच्या सहाय्याने खोचले जातात. त्यामुळे त्या प्लगमध्ये स्पार्कींग सुरु होऊन आग लागण्याची शक्यता असते. गॅलरीमधील लोखंडी जाळी किंवा घराचा लोखंडी जिना किंवा इतर कोणत्याही लोखंडी वस्तूपासून विद्युत दिव्यांची व आकाश कंदिलाची वायर दूर ठेवावी. ही वायर एकसंघ असावी. तुटलेली किंवा सेलोटेपने जोडलेली नाही याची खात्री करून घ्यावी.

भाजपचे माजी आमदार संजय देशमुखांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश

मुंबई-शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भाजपचे माजी आमदार संजय देशमुख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांच्यासाठी हे मोठे आव्हान असल्याचे बोलले जात आहे. संजय देशमुख हे राठोड यांचे राजकीय विरोधक असल्याने ठाकरे गटाकडून देशमुखांना बळ दिले जात असल्याची चर्चाही रंगू लागली आहेत. दरम्यान, संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर पक्षविस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा केली आहे. मी पोहरा देवीचे दर्शन घेण्यासाठी नक्की येणार आहे. मेळाव्यासाठी तुम्ही तारीख ठरवा. मी आलोच, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.महाराष्ट्रातील संस्कारी माणसांना जे झालं ते पटलेलं नाही. ज्यांचा आपल्याशी संबंध येणार नाही, तसे लोक आपल्यासोबत येत आहेत. वेगवेगळ्या धर्माचे लोक सोबत येत आहेत. तुम्ही फक्त लढा. जे होत आहे ते आम्हाला पसंद नाही, असे मला लोक म्हणत आहेत. या देशातील लोकशाही वाचवण्याचा हा प्रयत्न आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, संजय देशमुखांच्या या ठाकरे गटातील प्रवेशानंतर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“बाळासाहेबांच्या विचारांशी प्रेरित होऊन मी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत काम करतो आहे. यापुढेही माझं काम याच पद्धतीने चालणार आहे. कोण कुठं जातो, त्याने मला फरक पडत नाही. मी माझं काम प्रमाणिकपणे करत राहील”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांनी दिली आहे.

10 लाख कर्मचाऱ्यांच्या भरती मोहीमेचा येत्या 22 ऑक्टोबरला होणार शुभारंभ

नवी दिल्‍ली, 20 ऑक्‍टोबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  येत्या 22 ऑक्टोबरला, सकाळी 11 वाजता रोजगार मेला- ह्या 10 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकरभरती मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या समारंभात, 75 हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात येतील. यावेळी पंतप्रधान नवनियुक्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन देखील करतील. 

पंतप्रधान मोदी यांच्या, युवकांना रोजगाराच्या संधी प्रदान करण्याच्या तसेच नागरिकांच्या कल्याणाप्रति असलेल्या कटिबद्धतेची पूर्तता करण्याच्या दृष्टीने, हे एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशांनुसार, सर्व मंत्रालये आणि विभागांमध्ये असलेल्या मंजुरीप्राप्त रिक्त जागा भरण्याचे काम मिशन मोडवर सुरु झाले आहे.

देशभरातून निवडले गेलेले नवनियुक्त कर्मचारी, केंद्र सरकारच्या 38 मंत्रालये/विभागांमध्ये कामावर रुजु होतील. यात अ श्रेणी, ब श्रेणी (राजपत्रित अधिकारी) तसेच ब श्रेणी( अ-राजपत्रित) आणि क श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या भरतीयोग्य पदांमध्ये, केंद्रीय सशस्त्र दलाचे कर्मचारी, उपनिरीक्षक, हवालदार, स्टेनो, स्वीय सचिव, प्राप्तिकर निरीक्षक, एमटीएस (शिपाई) अशा पदांचा समावेश आहे.

मंत्रालये आणि विभागांद्वारे, स्वतः ही भरतीप्रक्रिया मिशन मोडवर पूर्ण केली जात आहे, अथवा, केंद्रीय लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे भरती मंडळ अशा संस्थांच्या माध्यमातून ही प्रक्रिया होत आहे. भरती प्रक्रिया जलद गतीने व्हावी, यासाठी ती सुलभ आणि तंत्रज्ञानयुक्त करण्यात आली आहे. 

अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत २९ नोव्हेंबरपर्यंत म्हणणे मांडण्याचे हायकोर्टाचे महापालिकेला आदेश

पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जिल्हा परिषद आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिपत्याखाली असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने त्या विरोधात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील अनेक संघटनांनी एकत्र येत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या याचिकेवर या यंत्रणांना मुंबई उच्च न्यायालायने नोटिस बजाविली असून २९ नोव्हेंबरपर्यंत त्यांचे म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

वाघोली हाउसिंग सोसायटी असोसिएशन, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट फेडरेशन, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्थांचा संघ मर्यादित, बाणेर-पाषाण लिंक रोड वेलफेअर ट्रस्ट, बालेवाडी रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग वेलफेअर फेडरेशन लिमिटेड, डिअर सोसायटी वेलफेअर असोसिएशन, बावधन सिटीझन्स फोरम, हिंजवडी एम्प्लाॅइज ॲण्ड रेसिडन्ट्स ट्रस्ट, औंध विकास मंडळ, असोसिएशन ऑफ नगर रोड सिटीझन फोरम या संस्थांनी ॲड. सत्या मुळे यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकार, केंद्रीय भूजल मंडळ, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि जिल्हा परिषद यांच्याविरोधात ही याचिका आहे, अशी माहिती ॲड. सत्या मुळे यांनी दिली.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून मुबलक प्रमाणात पाऊस होऊनही जिल्हा आणि शहरी भागातील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यासंदर्भात स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि रहिवासी संघटनांनी स्थानिक प्राधिकरणाबरोबर बैठका घेतल्या, निवेदनेही दिली आहेत. मात्र पाणीपुरवठ्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. विंधन विहिरींद्वारे पाणी उपसा करण्यासाठी संरक्षण आणि नियमन करण्याचे कोणतेही धोरण नाही. कृत्रित पाणीटंचाई करून पाणी विकत घेण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे जलवाहिनी द्वारे किंवा अन्य कोणत्याही पर्यायी पद्धतीने माणसी १३५ लिटर पाणीपुरठा तत्काळ करावा, असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

अवेळी पावसामुळे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे तात्काळ माहिती सादर करण्याचे आवाहन

पुणे दि.२०: प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांनी विमासंरक्षीत पिकाच्या गारपीट, अवेळी पाऊस, ढगफुटी आदी नैसर्गिक कारणाने झालेल्या नुकसानीची माहिती घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत नुकसानग्रस्त पिकाच्या फोटोसह आपल्या संबंधित विमा कंपनीकडे सादर करावी, असे आवाहन कृषी उपसंचालक अरुण कांबळे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांचे विमा संरक्षित क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, ढगफुटी किंवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग आदी घटनांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानीच्या स्वरुपानुसार विहित रक्कम शेतकऱ्यांना देय असते. नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत विमा संरक्षित क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा पुराचे पाणी शेतात शिरून, शेत दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत माहिती द्यावी.

नुकसानीबाबतची माहिती शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनीला देण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स ॲप, विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचा ई-मेल, विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय, कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी कार्यालय, ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा या पर्यायांचा वापर करता येईल, असेही आयुक्तालयाने कळवले आहे.
000

राहुल देशपांडे यांनी अपमान झाल्याचा दावा फेटाळला…

मुंबई-ठाकरे शिवसेनेचे सचिन अहिर यांनी टायगर श्रॉफ साठी राहुल देशपांडे यांचे गाणे थांबविल्याचा व्हिडीओ शेअर करून एका प्रख्यात गायकाचा अवमान झाल्याचे म्हटल्यावर आता खुद्द राहुल देशपांडे यांनीच आपला अवमान वगैरे काही नाही असे म्हटले आहे. राहुल देशपांडे यांनी अपमान झाल्याचा दावा फेटाळला आहे. “इतकी काही मोठी गोष्ट घडलेली नाही. मला काही अपमान वैगेरे वाटलेला नाही. मला हा विषय इतकं बोलण्यासारखा वाटत नाही,” असं सांगत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

सचिन आहिर यांनी शेअर केलेय व्हिडीओ त स्पष्टपणे देशपांडेंना गायना पासून थांबविण्याचा प्रयत्न केल्याचे आणि देशपांडे यांचेही त्यावेळी स्टेजवरील बोलणे ऐकून या व्हिडीओनेच सारे काही स्पष्ट केलेले असताना राहुल देशपांडे यांनीच अवमान दावा फेटाळला त्यामुळे ठाकरे शिवसेना ..ठीक आहे चालू द्या असेच तुमचे … म्हटले तर नवल वाटणार नाही .

पालघरचे प्रस्तावित क्रीडा संकूलाचे काम युध्दपातळीवर करा -पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण


मुंबई, दि.२०: पालघरच्या जिल्हा क्रीडा संकूल समितीची उभारणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत युध्दपातळीवर करण्यात यावी व त्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करावी अश्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिल्या
पालघरच्या जिल्हा क्रीडा संकूलसंदर्भात स्थापन केलेल्या समितीची बैठक आज पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडीओ कॉन्फरन्सीच्या माध्यमातून पार पडली. या बैठकीला पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडखे, महापालिका आयुक्त अनिल कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.जी.पालवे, पालघरचे जिल्हा पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील, क्रीडा विभागाचे प्रभारी उपसंचालक स्नेहल साळुंके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पाटील, पालघरचे जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, जिल्हा माहिती अधिकारी राहूल भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
पालघरमध्ये 16 एकरच्या प्रशस्त भूखंडावर जिल्हा क्रीडा संकूल प्रस्तावित करण्यात आले आहे. या संकूलाच्या निर्मितीसाठी कोटींचा निधी मंजूर झालेला असून 2.00 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. संकूल उभारणीसाठी आवश्यक टेंडर प्रक्रीया आठवडयाभरात सूरु करुन पुढील कार्यवाही तातडीने करण्यात यावी व या दृष्टीने गतीने प्रयत्न करण्याची सूचना मंत्री चव्हाण यांनी दिली.
आज झालेल्या व्हीडीओ कोन्फरंसिंगमध्ये चव्हाण यांनी प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकूलाच्या मध्ये उभारण्यात येणाऱ्या विविध क्रीडा सुविधांच आढावा घेतला. या क्रीडा सूविधांमध्ये 400 मीटरचा ट्रॅक, खुले प्रेक्षागृह, विविध खेळांची क्रीडांगणे, फीटनेस सेंटर, जलतरण तलाव, इनडोअ मॉल, मुलामुलींचे वसतीगृह, खेळाचे साहित्य आदी विविध बाबींचा समाावेश आहे.
प्रस्तावित क्रीडा संकूलाची उभारणी करण्याच्या दृष्टीने त्या कामांचा दर्जा व तांत्रिक गोष्टी कशा पध्दतीने परिपूर्ण होतील व हे काम उत्कृष्टरित्या पार पडेल याकडे सर्व अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. या संकूलाच्या उभारणीच्या कामात क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग व त्यांच्या सूचना आदींचा प्राधान्याने विचार करण्याच्या सूचनाही पालकमंत्री चव्हाण यांनी दिल्या.

‘अग्रवाल स्वीट मार्ट,कृष्णा डेअरी,चौधरी,पुरोहित’वर छापे गुजरात बर्फीचा ५ लाख ९० हजार रुपयांचा साठा जप्त

जाहिराती करून बोगस माल खपविणाऱ्यांवर छापे मारण्याची मागणी कपड्यांचे बोगस ब्रँड तपासण्याची मोहीम राबवा

पुणे, दि. २०: अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने पुणे शहरातील विविध मिठाईच्या दुकानांनी मागवलेला ५ लाख ९० हजार ४०० रुपये किंमतीचा गुजरात बर्फीचा साठा जप्त केला आहे.अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयाने मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सोमवारी (ता. १७) रोजी अशोक राजाराम चौधरी यांच्या वाहनातून गुजरात बर्फी – स्वीट हलवा (व्हानवटी), रिच स्वीट डिलाईट (ब्रिजवासी), स्वीट हलवा (ब्रिजवासी), स्वीट हलवा (पारस), स्पेशल बर्फी व स्वीट हलवा या अन्न पदार्थाचे ६ नमुने तपासणीसाठी घेवून हा साठा जप्त केला.

हा गुजरात बर्फी अन्न पदार्थ पुणे शहरातील मे. अग्रवाल स्वीट मार्ट, बुधवार पेठ, मंडई, मे. कृष्णा डेअरी फार्म, मानसरोवर अॅनेक्स, कोंढवा बु., मे. अशोक राजाराम चौधरी, गहुंजे, देहुरोड व हिरसिंग रामसिंग पुरोहित, बालेवाडी यांनी गुजरात व वसई (जि. पालघर) येथून मागविला असल्याचे आढळून आले. या विक्रेत्याकडे त्यांनी मागवलेल्या गुजरात बर्फीचा वापर कशासाठी करण्यात येत होता याबाबत अधिक तपास करून त्याअनुषंगाने संबंधितांविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.

अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयातर्फे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तपासणी नमुने घेण्याची मोहिम राबविण्यात येत असून या अंतर्गत १ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या कालावधीत मिठाईचे २८, खवा-२, रवा, मैदा, बेसन- १२, खाद्यतेल- ७, वनस्पती/घी- २, नमकीन- ३ व इतर अन्न पदार्थाचे १६ असे एकूण ७० अन्न नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत. तसेच खाद्यतेल पॅकिंगसाठी जुन्या डब्याचा पुनर्वापर केल्याचे आढळून आल्याने तीन ठिकाणी ४ लाख ५१ हजार ४०० रुपये किंमतीचा साठा, हिरवा वाटाणा- ३९ हजार ८०० रुपये, मिठाई- ६ हजार ७५० रुपये आणि घी /खवा १२ हजार ४०० रुपये असा एकूण ५ लाख १० हजार ४०० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

सर्व मिठाई विक्रेत्यांनी दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईच्या ट्रे वरती ‘बेस्ट बिफोर’ दिनांक नमूद करावा व मिठाई बनविण्यासाठी भेसळयुक्त स्वीट खवा (गुजरात बर्फी) चा वापर करु नये, दुधापासून बनविलेल्या चांगल्या दर्जाच्या खव्याचा वापर करावा. स्वीट खवा(गुजरात बर्फी) चा वापर करुन मिठाई बनवित असल्याचे आढळल्यास मिठाई विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी स्पष्ट केले आहे.

जाहिराती करून बोगस माल खपविणाऱ्यांवर छापे मारण्याची मागणी

दरम्यान दिवाळी निमित्त कपडे आणि तदनुषंगिक इलेक्ट्रोनिक बाजार तेजीत असतो याचा फायदा घेऊन १ वर २ फ्री , ३ वर ८ फ्री अशा स्वरूपाच्या जाहिराती करून बोगस ब्रँड कपडे मोठ्या प्रमाणात शहरात विकले जातात , कपडेच नाहीत तर इलेक्ट्रोनिक वस्तूंच्या बाबत हि असेच प्रकार होतात .याकडे लक्ष वेधून यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी होऊ लागली आहे.
0000

मला गाऊ तरी द्या किंवा तुमचे कार्यक्रम करा असे सांगूनही न कळल्याने देशपांडेंनी इंग्रजीत सांगितले …

मुंबई- वरळी च्या कार्यक्रमात प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांचा अवमान झाल्याच्या प्रकारात बोलताना शिवसेनेचे सचिन आहिर म्हणालेत कि , “ज्येष्ठ कलाकार गाणं गात असताना दोन वेळा अडवणूक झाल्याने त्यांनीच मला तरी गाऊ द्या किंवा तुमचे कार्यक्रम करा असं सांगितलं. टायगर श्रॉफही मुंबईतच मोठा झाला आहे. त्यामुळे त्याला विरोध असण्याचं कारण नाही. पण तुम्ही खऱ्या अस्मितेच्या गोष्टी करता आणि अशाप्रकारे कलाकारांचे अपमान करता,” असा संताप सचिन अहिर यांनी व्यक्त केला आहे.  “स्वत: राहुल देशपांडे यांनी एक तर मला गाऊ द्या, २० मिनिटं सादरीकरणं करतो नंतर तुम्ही हवं ते सोपस्कर करा असं सांगितलं होतं. मी उठून जाऊ का असंही ते म्हणाले होते. मराठीत बोलल्यानंतर मिहीर कोटेचा यांना कळलं नसेल म्हणून त्यांनी इंग्रजीत सांगितलं. पण तरीही नंतर ते मंचावर आले आणि टायगर श्रॉफचा सत्कार करुन गेले. त्यामुळे त्यांनी दिलगिरी तरी व्यक्त करावी. पण त्यांच्याकडून आता ती अपेक्षाही नाही,नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, दहीहंडी तसंच इतर सणांच्या माध्यमातून आपण मराठी माणसांची अस्मिता जपण्याचा प्रयत्न करत असल्याचं हे दाखवत आहेत. पण या व्हिडीओमुळे यांची खऱ्या अर्थाने मराठी माणूस आणि कलाकरांबद्दल अस्मिता काय आहे हे दिसत आहे. निवडणूका आल्यानंतर अशा गोष्टी करायच्या, पण नंतर कोणत्याच कार्यक्रमांचं आयोजन केलं जात नाही,” असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.

टायगर आला हि अभिमानाची बाब -आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर

मुंबई- वरळी च्या मराठी कलावंताच्या कार्यक्रमात हिंदीतील टायगर आला हि अभिमानाची बाब आहे असे वक्तव्य करत भाजपा नेते आशिष शेलार यांनी मराठी कलावंताचा अवमान या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले “ ठाकरे शिवसेनेने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जावं आणि नाव बदलून घ्यावं. आपलं नाव रडकी सेना ठेवावं. काही झालं तरी रडत असतात. स्वत: काही करायचं नाही, मराठी माणसाशी नाळ नाही, कार्यक्रम करायचे नाहीत आणि अपयश लपवण्यासाठी रडायचं हाच धंदा सुरु केला आहे. सचिन अहिर त्यांचे नेते असून तेच काम करत आहेत,” अशी टीका शेलार यांनी केली आहे.

खरोखरच अपमान झालाय का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “असा कोणताही अपमान झालेला नाही. उलट मराठी माणसाच्या मराठमोठ्या दिपोत्सवात हिंदी कलाकार येत आहेत हा मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे. भाजपाकडून मराठी माणसाचा सन्मान होतोय याची कोल्हेकुई सचिन अहिर यांची आहे”

मराठी कलावंताचा अवमान तरीही राज ठाकरे गप्प ?

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे नेते सचिन खरात यांचा सवाल

मुंबई-

राहुल देशपांडे या मराठी गायकाचा अपमान होऊन सुद्धा राज ठाकरे गप्प का ? राज ठाकरे आपल्याला खरंच मराठी माणसाबद्दल प्रेम असेल तर भाजपाला माफी मागायला लावावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे नेते सचिन खरात यांनी केली आहे. खरात म्हणाले की, भाजपच्या वरळी दीपोत्सव कार्यक्रमात प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांना बाजूला करत अभिनेते टायगर श्रॉफ यांचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे मराठी कलाकाराचा अपमान झाला आहे. माननीय राज ठाकरे सतत मराठी माणसाच्या न्याय हक्काच्या भूमिका मांडतात. आता प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे या मराठी गायकाचा अपमान होऊन सुद्धा राज ठाकरे गप्प का ? राज ठाकरे आपल्याला खरेच मराठी माणसाबद्दल प्रेम असेल, तर भाजपाला माफी मागायला लावावी, अशी मागणी खरात यांनी केली आहे.

एकाच वेळी ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २५०० कोटी रुपये जमा

बळीराजा खचू नको..धैर्याने संकटाला समोरे जा..शासन आहे पाठीशी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई, दि. २०: नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. आज एकाच वेळी राज्यातील ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २५०० कोटी रुपये जमा करण्यात आले. अशा प्रकारे एकाचवेळी थेट खात्यात रक्कम जमा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे बळीराजाने खचून जाऊ नये राज्य सरकार पाठीशी असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे उपग्रह आधारीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करतानाच त्याची भरपाई ऑटोपायलट मोडच्या माध्यमातून देण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतून अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ येाजनेचा शुभारंभ आज मंत्रालयात झाला. मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास सहकार मंत्री अतुल सावे, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व जिल्हाधिकारी, लाभार्थी शेतकरी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

राज्यातील शेतकरी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय असून त्याची तातडीने अमंलबजावणीही केली. शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे म्हणून दिवाळी पूर्वी लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश विभागाला दिले होते. त्यानुसार विभागाने तातडीने कार्यवाही केल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांचे अभिनंदन केले. शेतकरी केंद्रबिंदू मानून आम्ही निर्णय घेतले आहेत. एनडीआरएफच्या दुप्पट निधी देणे, नुकसान भरपाईसाठी दोन ऐवजी तीन हेक्टरची मर्यादा करणे, सततच्या पावसात निकषता न बसणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणे, रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना मान्यता देऊन जास्तीत जास्त जमीन ओलीताखाली आणून शेतकरी बांधवांना दिलासा देणारे निर्णय आम्ही घेतले आहेत.

सध्या राज्यात परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने संकटाला सामोरे जा शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले, आम्ही सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्याच बैठकीत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही केली. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होण्यासाठी ह्यावेळेस पहिल्यांदाच एका क्लिकवर निधी जमा करण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम जमा झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे कालपर्यंत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य शासनाने शेती आणि शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेतले असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी उपग्रह आधारित यंत्रणा करण्यात येत आहे. त्यानंतर ऑटोपायलट मोड मध्ये विमा रक्कम मिळावी यासाठी तंत्रज्ञान तयार केले जात असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

८ लाख शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण- सहकार मंत्री अतुल सावे

योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या आधारक्रमांकाचे प्रमाणीकरण करण्यात आले असून सध्या सुमारे ८ लाख शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण झाले आहे. त्यापैकी ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज थेट रक्कम जमा करण्यात आल्याचे सहकार मंत्री श्री. सावे यांनी सांगितले. यावेळी सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी प्रास्ताविक केले कर सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी आभार मानले.