लायन्स क्लब ऑफ शिवाजीनगर च्या वतीने ५० बालकांसोबत दिवाळी उत्सव पुणे : दिवाळीतील सुंदर सजावट…आवडीची गाणी लावल्यानंतर गाण्यांच्या तालावर नाचण्याचा आनंद लुटणारी मुले..जादूचे कार्यक्रम आणि विविध खेळ खेळत केक कापण्याचा आनंद केमोथेरपी घेत असलेल्या कॅन्सरग्रस्त मुलांनी लुटला. दिवाळी उत्सवाचा आनंद या चिमुकल्यांना देखील मिळावा यासाठी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. लायन्स क्लब पूना शिवाजीनगर यांच्या वतीने भारती हाॅस्पीटल व संशोधन केंद्र पुणे येथे ५० बाल कर्करूग्णांसाठी दिवाळी सेलिब्रेशन विथ डिफरन्स उपक्रमांतर्गत दिवाळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.प्रमुख पाहुणे नरेंद्र भंडारी, क्लबचे अध्यक्ष जीवन हेंद्रे, प्रकल्प समन्वयक विजया बांगड आणि विजय जाजू, त्यांचे मार्गदर्शक डॉ. ज्योती तोष्णीवाल उपस्थित होते. भारती हाॅस्पीटलच्या उपवैद्यकीय संचालक डॉ. अरुंधती पवार आणि कर्करोग-विशेषज्ञ डॉ. विभा बाफना यांचे सहकार्य उपक्रमाला मिळाले. कॅन्सरग्रस्त मुले आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न लायन्स क्लब पूना शिवाजीनगरच्या सदस्यांच्यावतीने करण्यात आला. डॉ. अनिल तोष्णीवाल यांच्या उपस्थितीत अध्यक्ष जीवन हेंद्रे आणि इतरांना आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. संजीव भोसले आणि नीलिमा भोसले यांनी हा उपक्रम प्रायोजित केला होता.
नरेंद्र भंडारी म्हणाले, केमोथेरपी उपचार घेत असलेली ही मुले खूप नाजूक आहेत. त्यांना एकत्र आणणे खूप कठीण आहे. भारती हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या प्रचंड सहकार्याने आमच्या लायन्स क्लब शिवाजीनगरने मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी केलेला हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे.
मुंबई, दि. 2 : अंधेरी पश्चिम येथील बागेसाठी आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवून परिसर सील करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
अंधेरी पश्चिम येथील के. ईस्ट वॉर्ड येथे आज झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार अमित साटम, भारती लव्हेकर सर्व विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.लोढा यावेळी म्हणाले की, बागेसाठी आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकामाबाबत माहिती घेऊन प्रशासनाने या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. लल्लूभाई पार्क, सूर्या हॉस्पिटल परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने स्थानिक पोलीसांनी तात्काळ कारवाई करावी. जोपर्यंत सुरक्षा रक्षक नियुक्त होत नाहीत, तोपर्यंत तिथे पोलीस स्टेशनने स्थानिक पोलीस सुरक्षेसाठी नेमावेत, असे निर्देश पालकमंत्री श्री.लोढा यांनी दिले.
नागरिकांनी विविध २३३ विषयांसंदर्भात आपले तक्रार अर्ज सादर केले. यामधील ८७ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्यासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहून समस्या मांडल्या. प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी https://mumbaisuburban.gov.in तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेसंदर्भात तक्रारीसाठी portal.mcgm.gov.in या लिंकवरही नागरिकांना तक्रार करता येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
पुणे : मोठ्या मुलीने फ्लॅट आपल्या नावावर करावा, यासाठी आपल्या ८३ वर्षाच्या आईचा हात पिरगळुन तो फॅक्चर केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसरमधील अमरगीत सोसायटीत राहणार्या एका ८३ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १३५७/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी परमजित नावाच्या मुलीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडला होता.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ही फिर्यादी यांची मोठी मुलगी आहे.”हा फ्लॅट माझ्या नावावर कर, हा फ्लॅट माझ्या वडिलांनी मला दिलेला आहे. तू या घरात परत यायचे नाही.परत तुम्ही दोघीही येथे आल्यास मी तुमचा जीव घेईन,”असे परमजित हिने आपल्या आईला धमकाविले.फिर्यादी व तिची लहान मुलगी यांना शिवीगाळ करुन परमजित कौर हिने आपल्या ८३ वर्षाच्या आईचा उजवा हातपिरगळला. हाताची करंगळी पिळगल्याने ती फॅक्चर झाली आहे. पोलीस हवालदार क्षीरसागर तपास करीत आहेत.
पेशंट नेव्हीगेटर कार्यक्रमाअंतर्गत गेल्या तीन वर्षात चार लाख कर्करोग रुग्णांना मिळाला विशेष सेवा-शुश्रुषेचा लाभ
मुंबई, 2 नोव्हेंबर 2022
टाटा मेमोरियल सेंटर (TMC) ने यावर्षी, 7 एप्रिल 2022 रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत, इंडोनेशियातील कर्क रुग्ण शुश्रुषा सुधारावी, या दृष्टीने ‘कॅन्सर पेशंट नेव्हीगेशन प्रोग्राम’ हा भागीदारी विषयक करार केला होता. धर्माईस नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल आणि पीटी रोच इंडोनेशिया, या दोन वैद्यकीय संस्थांसोबत हा करार करण्यात आला होता. या कार्यक्रमाअंतर्गत, प्रत्येकी 30 विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांच्या दोन तुकड्यांचा पदवी प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. यात, कॅन्सर पेशंट नेव्हीगेशन प्रोग्राम (CPN) अंतर्गत, त्यांना 100 टक्के नोकरीही मिळणार आहे. ‘टाटा मेमोरियल-केवट’ अभियानाचे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील विस्तारीकरण आहे. सध्या, इंडोनेशियातील 37 विद्यार्थ्यांची तिसरी तुकडी हे प्रशिक्षण घेत आहे.
टाटा मेमोरियल सेंटरने केवट या विशेष अभियानाअंतर्गत, निमवैद्यकीय सेवा क्षेत्रात एक नवा पायंडा निर्माण केला.केवट हा कर्करोग रुग्णांना दिशादर्शन करणारा, भारतातील पहिलाच, मान्यताप्राप्त असा हा पदव्युत्तर पदविका प्रशिक्षण अभ्यासक्रम असून या अभियानात प्रशिक्षणार्थींना रोजगाराची हमीही दिली जाते. त्याची जबाबदारी -टीस(TISS) टाटा समाजविज्ञान संस्था आणि टाटा ट्रस्ट ने घेतली आहे. हे प्रशिक्षित नेव्हीगेटर्स, आपले एक प्रभावी संपर्क जाळे तयार करतात, ज्याच्या माध्यमातून कर्करुग्ण आणि त्यांची काळजी घेणाऱ्या कुटुंबियांना कर्करोग व्याधीग्रस्त काळात सर्वतोपरी मदत मिळण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला जातो.
या केवट अभियानाअंतर्गत, गेल्या तीन वर्षांत, सुमारे चार लाख कर्करोगग्रस्तांना मदत आणि दिलासा देण्यात आला आहे. कोविड महामारीच्या काळात केवट प्रशिक्षितांची ही कार्यशक्ती अतिशय महत्वाची ठरली होती, त्यांनी एक लाख 40 हजार पेक्षा अधिक रुग्णांची रुग्णालयात आल्यावर स्क्रीनिंग म्हणजे प्राथमिक तपासणी करण्यात मोठे योगदान दिले होते. त्याशिवाय, औषधविषयक सेवा आणि सुमारे 70000 रुग्णांचे व्यवस्थापन, प्रशासकीय कर्मचारी आणि प्रशासकीय कर्मचार्यांचे प्रशिक्षण आणि रूग्णांची तपासणी करणे, टेलि- सल्लामसलत सेवा सुलभ करण्यात मदत केली, ज्यामुळे हॉस्पिटलची कार्यक्षमता 100% इतकी झाली. तर कर्करोगाच्या रूग्णांसाठी 60% आणि कर्करोगाच्या कोविड रूग्णांसाठी ही कार्यक्षमता 40% पर्यंत वापरणे शक्य झाले.
या प्रशिक्षणाअंतर्गत, 36 पदविका अभ्यासक्रम असून, ज्यात सहा महिन्यांचे मार्गदर्शन आणि कर्करोग शुश्रुषेतील वैद्यकीय आणि मानसिक स्वरूपाच्या काळजीसाठी निरीक्षण सांगितले जाते, त्यानंतर, टाटा मेमोरियलच्या कोणत्याही एका रुग्णालयात सहा महिन्यांचा प्रशिक्षणार्थी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो, ज्याचे मानधन दिले जाते. या अभ्यासक्रमाचे मूल्यमापन ठराविक काळानंतर केले जाते.- ज्यात मध्य सत्र आणि एक टर्म संपल्यानंतरच्या परीक्षा घेतल्या जातात. यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदविका प्रदान केल्या जातात. या पदविका धारक प्रशिक्षित विद्यार्थ्यांना देशभरात कुठेही, खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात रुग्णांची काळजी, शुश्रूषा करण्यासाठी नियुक्ती दिली जाते. टीएमसी अशा प्रशिक्षित विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या बळावर, एक वर्षाची अध्ययनवृत्तीही देऊ करते. ही अध्ययन वृत्ती यशस्वीपणे पूर्ण केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना टीमसी, कायमस्वरूपी नोकरी देखील देते. हा करार झाल्यानंतर एप्रिल 2022 पासून या अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. आणि आता, 25 आरोग्य व्यावसायिक, ज्यात परिचारिका आणि डॉक्टर्सचाही समावेश आहे, त्यांची एक वर्षाच्या कर्करोग रुग्ण नेव्हिगेशन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.
सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विविधतेच्या प्रमुख क्षेत्रांसह रुग्णांच्या उपचाराच्या अपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शक कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. भाषेतील अडथळे, जागरूकतेचा , आरोग्यविषयक माहितीच्या आकलनाचा संसाधनांच्या तरतुदीचा , वेळेवर निदान होण्याचा आणि हस्तक्षेप आणि उपचारांसंदर्भातील उद्दिष्टांचे पालन करण्याचा अभाव या आढळलेल्या काही चिंतेच्या गोष्टी आहेत.
रुग्णसेवेला पाठबळ देण्यासाठी, चिकित्सक आणि परिचारिकांवरील भार कमी करण्यासाठी, दर्जेदार सेवा प्रदान करण्यासाठी, उपचार आणि त्यासंदर्भात पाठपुरावा यांचे पालन करण्यासाठी, शारीरिक झीज होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी,उपचाराच्या मार्फत रुग्णांना जीवनदान देण्याच्या परिणामांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कर्करोग रुग्णालये किंवा विशेष कर्करोग उपचार सेवा देणार्या रुग्णालयांमध्ये रुग्ण मार्गदर्शक कार्यक्रम विकसित आणि कार्यान्वित करणे याचा या कार्यक्रमाच्या परिणामांमध्ये समावेश आहे.
चाचणी आणि प्राथमिक तपासणी उपक्रम , रुग्णांना कागदपत्रे आणि नोंदणीसाठी मदत करणे, असुरक्षित रुग्णांची ओळख पटवणे, रुग्णांची तपासणी करणे, रुग्णाच्या रोग निदानाच्या आकलनाचे मूल्यांकन करणे, निदान आणि प्रक्रिया समजावून सांगणे, उपचार करणाऱ्या चमूशी संवाद साधणे, पुढील प्रक्रियेसाठी रुग्णांना तयार करणे, रुग्णांना उपचारासाठी आर्थिक स्रोत शोधणे , रुग्णांना तपासणीसाठीच्या भेटींची आठवण करून देणे, मानसिक पाठबळ प्रदान करणे, रुग्ण आणि कुटुंबियांचे समुपदेशन करणे, उपचाराच्या विविध टप्प्यावर मदत करणे, पुनर्वसन सहाय्य, याचा मार्गदर्शकांच्या भूमिकेमध्ये समावेश आहे.केवट (मार्गदर्शक ) केंद्रीकृत अहवाल प्रणालीचे अनुसरण करतात आणि नियमित अंतराने सहकारी , कर्मचारी आणि पर्यवेक्षकांद्वारे केलेले निरीक्षण, लेखापरीक्षण आणि मूल्यांकन प्राप्त करतात.त्यांना वैद्यकीय मार्गदर्शक आणि त्यातील तज्ज्ञ दिले जातात जे त्यांच्या प्रगतीचा आराखडा तयार करतात आणि त्यांच्या उपक्रमांचा आढावा घेतात.विशिष्ट प्रकरणांवर आणि रुग्णाशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी ते ठराविक काळाने वैद्यकीय चमूची आणि प्रशासकीय चमूची भेट घेतात. ते रुग्णांच्या अभिप्रायाच्या एक बळकट प्रणालीची स्वतःजवळ नोंद ठेवतात , त्यांच्या आधारावर ते प्रणालींमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि बदलांसाठी सूचना देतात. वेळेवर निदान आणि उपचार आणि वैद्यकीय उपचारासाठी प्रतीक्षा अवधी कमी करणे यावर ते लक्ष केंद्रित करतात.
इंडोनेशियाच्या आरोग्य सेवा प्रदात्यांसह या सहकार्याच्या माध्यमातून ,सीपीएनची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि रूग्णालय सेवा प्रणालीमध्ये अंतर्भूत रुग्ण मार्गदर्शन , स्थानिक अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी तांत्रिक सहाय्याद्वारे ज्ञानाचे हस्तांतरण आणि सीपीएनसाठी राष्ट्रीय मान्यता असलेल्या स्थानिक प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. सीपीएमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि ते जिथे आहेत त्या रुग्णालय उपचार यंत्रणेमध्ये रुग्ण मार्गदर्शक भूमिका लागू करण्यासाठी सहभागी व्यावसायिक प्रशिक्षण प्राप्त करतील.मिश्र शिक्षण पद्धती वापरून,सहभागींना 2 महिने आभासी माध्यमातून प्रशिक्षण आणि 3 महिन्यांसाठी मुंबई इथल्या टीएमसी टाटा मेमोरियल केंद्रात थेट प्रशिक्षण, इंडोनेशियामध्ये 2 महिन्यांसाठी तज्ञांना भेटीचे प्रशिक्षण मिळेल आणि टीएमसीच्या दृढ सहाय्याने प्रत्येक रुग्णालयामध्ये 6 महिने नोकरीचे प्रशिक्षण मिळेल. स्थानिक अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी तांत्रिक सहाय्याद्वारे ज्ञानाचे हस्तांतरण आणि राष्ट्रीय मान्यता असलेल्या सीपीएनसाठी स्थानिक प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्याचे उद्दिष्ट देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे.
पुणे -कोंढवा येथील क्लोव्हर हिल प्लाझा इमारतीत असलेल्या लॅविटेट हॉटेल व द ब्रेक रूम हॉटेल या दोन हॉटेलमधील अवैध हुक्का बारवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला.या कारवाईत पोलिसांनी 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोन जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई काल येथे करण्यात आली.
सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना कोंढवा येथील लॅविटेट हॉटेल व द ब्रेक रुम हॉटेल मध्ये अवैध हुक्का बार सुरु असल्याची माहिती मिळाली. पथकाने पाळत ठेवून दोन्ही हॉटेलवर छापा टाकला असता त्याठिकाणी बेकायदेशीरपणे हुक्का बार सुरु असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन्ही ठिकाणावरुन वेगवेगळ्या कंपनीचे हुक्क्याचे फ्लेवर व हुक्क्याचे साहित्य असा एकूण 65 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोन जणांना ताब्यात घेतले.ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांना पुढील कारवाईसाठी कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.
श्री संत नामदेव महाराजांच्या ७५२ व्या जयंतीनिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन : अभिनेता स्वानंद बर्वे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन
पुणे : विठ्ठल आवडी प्रेमभावो, विठ्ठल नामाचा रे टाहो… देहुडा चरण वाजवितो वेणु, गोपिकारमणु स्वामि माझा…माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी… आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा… अशा एकाहून एक सरस रचना सादर करीत कलाकारांनी गायनसेवा सादर केली. या गायनसेवेला पुणेकरांनी मोठया संख्येने हजेरी लावली आणि भक्तीगीतांच्या सादरीकरणाने संपूर्ण परिसर भक्तीरंगात न्हाऊन निघाला.
श्री संत नामदेव महाराजांच्या ७५२ व्या जयंती निमित्त नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेच्या वतीने भक्ती संगीत व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन अभिनेता स्वानंद बर्वे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अजय फुटाणे, संजय नेवासकर, अॅड. ज्ञानेश्वर पाटसकर, वसंतराव खुर्द, राजेंद्र पोरे, संत नामदेव महाराज यांचे अभ्यासक डाॅ. ओम दत्तोपासक, अध्यक्ष संदिप लचके तसेच पुणे शहर कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गायक संजीव मेहेंदळे, कविता मेहेंदळे व सहकारी यांनी गायनसेवा दिली. कार्यक्रमाचे संयोजन सचिव सुभाष मुळे, उपाध्यक्ष प्रदीप खोले, रणजित माळवदे, कुंदन गोरटे, सोमनाथ मेटे, राहुल सुपेकर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल आवडी प्रेमभावो … या संतवाणीने झाली. माझे मनोरथ पूर्ण करी देवा,केशवा माधवा नारायणा… देव म्हणे नाम्या, ज्ञानदेव मीच आहे… अश्या गीतांच्या सादरीकरणातून वातावरणात निर्माण झालेल्या भक्ती वलयाची अनुभूती रसिकांनी घेतली.
संदीप लचके म्हणाले, महोत्सवात नामदेव महाराजांचे १७ वे वंशज, ह .भ .प मुरारी महाराज नामदास (पंढरपूर) यांची वारकरी कीर्तन सेवा होणार असून या कार्यक्रमास संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे, संत नामदेव महाराज यांची भूमिका करणारे अभिनेते अवधुत सुधीर गांधी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे संचालक डाॅ. महेश काकडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सातपुते यांनी केले तर आभार संदिप लचके यांनी मानले.
मैत्रयुवा फाऊंडेशनतर्फे आयोजन ; दिव्यांग, मूकबधिर, कर्णबधिर मुलांच्या चेह-यावर हास्य पुणे : समाजातील प्रत्येक घटक ज्या आनंदाने आणि उत्साहाने दिवाळीचा सण साजरा करतो, तसेच समाजातील मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या दिव्यांग, दृष्टीहिन, मूकबधिर, कर्णबधिर अशा विशेष मुलांना सण-उत्सवाचा आनंद देण्याकरीता तरुणाईने पुढाकार घेतला. नवीन कपडे, फराळ, भेटवस्तू देऊन या ५०० चिमुकल्यांसोबत पणत्या रंगवून पुण्यात विशेष दिवाळी साजरी झाली. मैत्र युवा फाऊंडेशनच्या पुढाकाराने सेवासदन दिलासा कार्यशाळा, सेवासदन दिलासा केंद्र, जीवनधारा, सहेली आणि बालसदन या पाच संस्थांमध्ये विशेष दिवाळी उत्सव साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.न.म.जोशी, अर्चना क्षीरसागर, चिंतामणी पटवर्धन, तेजस्वी सेवेकरी, अश्विनी नायर, मेघना जोशी, संगिता नागपूरकर, संतोष डिंबळे, पद्मजी कुलकर्णी, करुणा गायकवाड, फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे आदी उपस्थित होते. समाजातील विविध दिग्गजांनी पणती रंगवून विशेष दिवाळी उत्सवात सहभाग घेतला. शिक्षण, कला, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्रितपणे विशेष मुलांसोबत पणती रंगवून चिमुकल्यांना भेटवस्तू देत सण करु साजरे, माध्यम जरा वेगळे असा संदेशही दिला. संकेत देशपांडे म्हणाले, एक पणती तिच्यासाठी या उपक्रमांतर्गत त्यांच्यासोबत पणत्या रंगविण्यात आल्या. विविध संस्थांतील मुलांना दिवाळीचा आनंद मिळावा, याकरीता पणत्या आणि नवे कपडे देण्यात आले. वर्षभर या मुलांसाठी विविध उपक्रम, संस्कार वर्ग राबविले जातात. मात्र, दिवाळी हा त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाचा सण असतो आणि समाजातील प्रत्येक घटक यामध्ये आम्हाला साथ देतो, असेही ते म्हणाले.
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी ॲड. अर्चिता मंदार जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व ‘रिपाइं’चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले व महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सीमा आठवले यांच्या हस्ते ॲड अर्चिता मंदार जोशी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच त्यांचा रामदास आठवले व सीमा आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत महिला प्रदेश अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. ॲड अर्चिता मंदार जोशी या पुणे बार असोसिएशनच्या विद्यमान सदस्य असून, अनेक संस्थांमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच अखिल महाराष्ट्रीय ब्राह्मण महासंघाच्या कार्याध्यक्षा आहेत.महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या कायम अग्रेसर आहेत.
सर्व समाजाच्या महिलांना सोबत घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचा व कायदेशीर मार्गाने महिलांवरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तसेच ‘रिपाइं’ पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ॲड अर्चिता मंदार जोशी यांनी सांगितले.
पुणे :बीआरटी,सायकल मार्ग यांनी त्या त्या रस्त्यांवर खाजगी वाहनांची गळचेपी करत वाहतूक कोंडी केली हे खरेच आहे आणि हे सत्य पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांना पटल्यानेच त्यांनी महापालिकेचे कान खेचले पाहिजेत अशी भूमिका आता घेतली गेली तर नवल वाटू नये.ज्या बीआरटी ने कलमाडींची /कॉंग्रेसची सत्ता उलथवून टाकली आणि बीआरटी ला विरोध करून सत्तेवर आलेल्या अजित पवारांनी प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर मात्र बीआरटी ला समर्थन दिले त्या अजित पवारांचीही सत्ता येथून गेली आणि त्यानंतर भाजपाच्या काळात देखील बीआरटी आणि सायकल मार्गाचा खेळखंडोबा सुरूच राहिला तो कशासाठी ? या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच ठाऊक आहे. खाजगी वाहनांची गळचेपी होते आहे, रस्त्यावर हक्क सर्वांचाच सारखा आहे.हे विसरून केवळ काही वेगळाच कारभार करतच या दोन्ही प्रकल्पांची सुमारे १५ वर्षे री ओढली गेली.वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि जलदगतीने प्रवास करता यावा यासाठी बस रॅपीड ट्रान्झिट- बीआरटी सेवा सुरू करण्यात आली असा देखावा करण्यात आला पण हा देखावा फार काल लपून राहू शकलेला नाही. पुण्याच्या वाहतूक कोंडीला जशी राज्यकर्त्यांकडून महापालिकेची वारंवार वाढविण्यात येणारी हद्द जबाबदार आहे तसाच महापालिकेतील भ्रष्ट कारभार हि जबाबदार आहे.
आता कुठे शहरातील वाहतूक कोंडीला बीआरटी मार्ग कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी या वाहतूक कोंडीचे खरे खापर महापालिकेवर फोडले आहे. वाहतूक कोंडी कमी करायची असेल तर, सर्व बीआरटी मार्ग बंद करा आणि अनावश्यक सायकल मार्ग काढून टाका, असे पत्र पोलिसांनी महापालिकेला पाठविले आहे.याच महापालिकेने आणि पदाधिकारी अधिकारी यांनी आमच्या सारख्या माध्यमांनी बीआरटी येण्यापूर्वीपासून बीआरटी आणि सायकल मार्गानाही केलेल्या विरोधाकडे डोळेझाक केलेली आहे.बीआरटी,सायकल मार्ग,व्यावसायिक दुकानांमधील अनधिकृत बांधकामे,पोटमाळे यांना वेळोवेळी आमच्या सारख्यांनी विरोध केलेलाच आहे.ज्या दुकानात,हॉटेलात ५० ग्राहकांची क्षमता होती त्यांनी पोटमाळे करून ती ८० पर्यंत वाढविली त्यामुळे दुकानांसमोर / हॉटेलांसमोर ५० ऐवजी ८० ग्राहकांची वाहने उभी राहू लागली.लक्ष्मी रस्त्यावरील दुकानदारांनी बांधलेले पोटमाळे अनधिकृत ठरवून ते पाडण्याची कार्यवाही पूर्वी होत होती पण कलमाडींनी निवडणुकीपूर्वी त्यांच्यासाठी पोटमाळे अधिकृत करून देण्याची सुविधा उपलब्ध करवून दिली.हा इतिहास आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून बहुतांश भागात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यावरून केवळ वाहतूक पोलिसांवर टीका होत आहे.शहरामध्ये गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहतुकीस बंदी आहे. मात्र त्यानंतरही अवजड वाहने शहरात येत आहेत. शहराबाहेर धनकवडी येथे यासाठी कित्येक वर्षापूर्वीच ट्रक टर्मिनस उभारले गेले.पण हे ट्रक टर्मिनस आज कोणत्या स्थितीत आहे अशीच तत्कालीन शहराबाहेर अवजड वाहनांसाठी ठेवलेल्या जागांची काय अवस्था आहे याची माहिती देखील पोलिसांनी घेतली पाहिजे, शहरातील वाहनतळांची आणि पार्किंग साठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या जागांची /भूखंडांची अवस्था काय आहे याचीही माहिती घेतली पाहिजे म्हणजेच महापालिकेला ताळ्यावर आणण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.
बस, रिक्षा त्यांच्या थांब्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी थांबत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्यानुसार अवजड वाहने शहरात प्रवेश करताना त्यांना वाहतूक पोलिसांनी अटकाव करावा आणि बस, रिक्षा यांना योग्य त्या ठिकाणी थांबे देण्याबाबतचे नियोजन करावे, अशी मागणी पत्राद्वारे महापालिका प्रशासनाकडून वाहतूक पोलिसांकडे काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यासंदर्भात उत्तर म्हणूनच वाहतूक कोंडीचे योग्य खापर पोलिसांनी महापालिकेवर फोडले आहे.
शहरातील चोवीस रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच बीआरटी मार्ग आणि सायकल मार्गांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे, असा दावा पोलिसांनी महापालिकेला दिलेल्या पत्रात केला आहे.नगर रस्ता, सोलापूर रस्ता आणि सातारा रस्त्यावर महापालिकेने बीआरटी मार्ग सुरू केला आहे. यातील नगर रस्ता हा राज्य मार्ग असून सोलापूर आणि सातारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहेत. बाहेरील जिल्ह्यातून मुंबई, नगर, सोलापूर आणि सातारा येथे जाणारी वाहने शहरातून याच मार्गावरून जातात. या मार्गांवर जड वाहनांची वाहतूक मोठी आहे. या रस्त्यांवर बीआरटी मार्ग असल्याने बीआरटी मार्ग सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी वापरला जात आहे. त्याचा ताण उर्वरित रस्त्यांवर येत असून लहान मोठे अपघात होण्याबरोबरच वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत बीआरटी मार्ग आणि सायकल मार्ग काढल्यास वाहतूक कोंडी टाळता येणे शक्य आहे, असे पोलिसांनी महापालिकेला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.त्यास आक्षेप घेता येणारा नाही.
शहरातील सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच वेगवान वाहतुकीचे शाश्वत साधन उपलब्ध व्हावे, यासाठी पंधरा वर्षांपूर्वी बीआरटी योजना सुरू करण्यात आली. मात्र बीआरटी मार्ग पंधरा वर्षानंतरही त्याने वाहतूक कोंडी कमी करू शकलेला नाही हे उघड सत्य आहे. मेट्रो आणूनही पुण्याची वाहतूक कोंडी ची समस्या सुटणार नाही अगर कमी होणार नाही हे देखील वारंवार सांगितले गेलेले आहे. पण निव्वळ घाई प्रकल्प आणायची केली गेली,समस्या सोडविण्याची केली गेली नाही हे लक्षात घेतले गेले पाहिजे.अनधिकृत बांधकामे थांबलीच पाहिजेत,सायकल मार्गाची शहराला गरज नाही, बीआरटी उखडून फेकून दिलीच पाहिजे.पार्किंगच्या,ट्रक टर्मिनसच्या जागांचे रक्षण केले गेलेच पाहिजे आणि आता महापालिकेच्या हद्दी वाढविण्याला लगाम घातलाच पाहिजे.रस्ते रुंद केले गेलेच पाहिजेत.याच यावरील उपाय योजना आहेत.शहराच्या बाहेर ५० किलोमीटर पर्यंत शेती झोन ठेऊन पुढे खेडी विकसित करण्याचे धोरण ठेवले पाहिजे. एखाद्या एका दुसऱ्या शहरावरच अब्जावधींची उधळण करण्यापेक्षा शहरापासून ५० किमी अंतरापुढे असलेली खेडी विकसित करण्याचे धोरण राबविले पाहिजे.याकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केल्याने शहरांचे अजगर फोफावत चाललेले आहेत हे प्रमुख कारण लक्षात घेतले जात नाही हि खंत आहे.
पुणे- काही वर्षांपूर्वी अगदी तत्कालीन सत्ताधीश ढोले पाटलांच्या ,रामकृष्ण मोरेंच्या आणि कलमाडींच्या हॉटेलांचा समावेश असूनही अशा बेकायदा बांधकामे केलेल्या हॉटेल्स चे सर्वेक्षण करून तत्कालीन नगर अभियंता शिवाजीराव पवार यांनी महापालिकेच्या सभागृहात अशा हॉटेल्सची नावे आणि मालकांची नावे देखील समोरच जाहीरपणे सांगितली होती . पण आता गेल्या ५ वर्षात महापालिकेच्या हद्दीतील अशा हॉटेल्सचे सर्वेक्षणच झाले नसल्याचे उघड झाले आहे. पूर्वीच्या काळात साईड मार्जिन आणि माळे अशा स्वरूपात हॉटेल्सनी बेकायदा बांधकामे केली होती तर आता रुफ टॅाप हॅाटेल म्हणून देखील नवा प्रकार रुजला आहे. बांधकाम निरीक्षक हा अशा सर्वेक्षणात महत्वाची भूमिका बजावतात ज्याना जे इ म्हटले जाते . यांना आपल्या हद्दीतील बहुतेक सर्वच अनधिकृत बांधकामांची माहिती असते . आणि ते कुणाची आहेत हे देखील ठाऊक असते . पण ते अशा बांधकामांकडे दुर्लक्ष करत असल्याचे कायमच दिसून आले आहे. कधी राजकीय दबाव , कधी प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या नावाने दबाव तर कधी स्वहित साधण्याच्या हेतूने देखील अशा बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वेळो वेळी स्पष्ट झाले आहे . हॉटेल्स , लॉजेस , होस्टेल्स , व्यावसायिक इमारती , दुकाने अशा ठिकाणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जीवितहानी होऊ शकते पण याकडे देखील आजवर दुर्लक्षच झाल्याचे दिसून आले आहे .काही वर्षांपूर्वी अनधिकृत बांधकामांवरील कारवाई साठी महापालिकेला स्वतंत्र पोलीस अधिकारी आणि कुमक कायमस्वरूपी दिलेली आहे तरीही स्थानिक पोलीस बंदोबस्त मिळत नाही असे कारण देऊन अशा बांधकामांवर कारवाई टाळली जात असल्याचे दिसून आले आहे. गेल्या ६ वर्षात कोण त्याही महापालिका आयुक्तांनी अशा प्रकारचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबधितांना दिलेले नाहीत . निव्वळ फेरीवाले, स्टोल धारक यांच्यावर अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाते आणि लक्ष्मी रस्त्यासह बड्या बड्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर दुकानासमोर टाकलेल्या जाळ्या, रस्त्यावर पुढे सरकत आणलेले दुकाने याकडे देखील सर्रास दुर्लक्ष केले जाते आहे. जेई हा कर्मचारीच या सर्वांच्या केंद्रस्थानी असून त्यास बड्या अधिकाऱ्यांनी पाठबळ दिलेले असल्याने शहरातील अशा बांधकामांची संख्या झपाट्याने वाढली असून ती जीवितहानी हि करू शकेल अशा स्वरूपाची असल्याचे नाकारता येणार नाही. परवानगी पेक्षा दुपटी तिपटीने जास्त बांधकामे बांधल्याची प्रकरणे देखील मोठ्या संख्येने आहेत . त्यातच रुफ टोप हि पद्धत रूढ होत चालली आहे . निव्वळ कधी तरी आग लागून धोका होईल एवढीच शक्यता यश प्रकरणात गृहीत धरता येत नाही तर अशी बांधकामे वाहतुकीच्या कोंडीला देखील जबाबदार असल्याचे स्पष्ट आहे .पण केवळ करोडोच्या मागे धावणाऱ्या व्यवस्थेला याकडे पाहाण्याची इच्छ्याच नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. राजीव अगरवाल , अरुण भाटीया या दोन आयुक्तांच्या कारकिर्दीत बडी बडी अनधिकृत बांधकामे उखडून टाकण्यात आली . अशी कारवाई अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने केलेले नसल्याचे स्पष्ट झालेले आहे.
पुणे: बांधकाम व्यावसायिकाकडे ६५ लाखांची खंडणी मागणाऱ्या गुंड गजानन उर्फ गजा मारणे टोळीतील रूपेश मारणे याच्यासह चौघा जणांच्या विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रूपेश कृष्णराव मारणे (वय ३८, रा. एकता काॅलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) याच्यासह उमेश प्रसाद वाफगावकर (रा. यशराज अपार्टमेंट, तपोधाम सोसायटी, वारजे), नितीन तुकाराम ननावरे (वय ४१, रा. विंड बिल व्हिलेज बावधन), अनिल अंबादास लोळगे (वय ४०, रा. गोल्डफिंच पेठ, नवी पेठ, सोलापूर,) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कोथरूड भागातील एका बांधकाम व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. बांधकाम व्यावसायिकाने मारणे आणि साथीदारांकडून एक कोटी ८५ लाख रुपये व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. त्या बदल्यात व्याजासह बांधकाम व्यावसायिकाने आरोपींना दोन कोटी ३० लाख रुपये परत केले होते. त्यानंतर मारणे आणि साथीदारांनी त्यांच्याकडे आणखी ६५ लाख रुपयांची मागणी केली. रूपेश मारणे याच्या सांगण्यावरून आरोपींनी कर्वेनगर भागातील एका गृहप्रकल्पातील १२ सदनिकांचा ताबा घेतला. बांधकाम व्यावसायिकास सदनिका विक्रीस मनाई केली तसेच सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न केला, असे बांधकाम व्यावसायिकाने तक्रार अर्जात म्हटले आहे.
मुंबई, दि. 01 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. यामध्ये 10 लाखाच्या मर्यादेत असणाऱ्या कर्जावरील व्याज परतावा महामंडळामार्फत देण्यात येतो. या योजनेअंतर्गत कर्ज मर्यादेत वाढ करुन 15 लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्ज मर्यादा वाढविल्यामुळे लाभार्थींना कर्जाच्या हप्त्यांमध्ये सुलभता राहावी. म्हणून कर्ज परताव्याचा कालावधी सुद्धा 5 वर्षावरुन 7 वर्षापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
आज मंत्रालयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांच्या संदर्भात मंत्रीमंडळ उपसमितीने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, या कर्जाची पूर्ण प्रक्रिया बँकेकडून केली जाणार आहे या योजनेंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या कर्जांबाबत महामंडळाकडून (क्रेडिट गॅरंटी) पतहमी देण्यात येणार असल्याने या कर्जांसाठी कोणतेही तारण बँकांनी अर्जदाराकडून घेऊ नये, आणि या कर्जास सुरक्षित कर्ज समजण्यात यावे.
महामंडळामार्फत राज्यातील मराठा समाजातील लाभार्थींना लघु उद्योगाकरीता थेट महामंडळामार्फत बिनव्याजी 10 हजार रुपये प्रतिदिन 10 रुपये प्रमाणे परतफेड व्याज परतावा योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागात सर्वाधिक शाखा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेसोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या कर्जाची पूर्ण प्रक्रिया बँकेकडूनच केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे निकष म्हणून अर्जदाराचे व्यवसाय नोंदणीकृत प्रमाणपत्र व आधारकार्ड असणे आवश्यक राहील. तसेच या योजनेअंतर्गत एक वर्षात कर्ज रक्कम परतफेड केली तर तो लाभार्थी पुन्हा रुपये 50 हजार रुपये कर्ज प्रतिदिन 50 रुपये परतफेड प्रमाणे बिनव्याजी कर्जासाठी पात्र राहील. महामंडळाकडून कर्ज घेण्यासाठी यापूर्वी वयोमर्यादा 45 वर्ष होती ती वाढवून आता 60 वर्ष करण्यात आली आहे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
मुंबई, दि. 01 : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार एससी/एसटी/ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला 60 हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या अंतर्गत वसतीगृह, शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेने सर्व जिल्ह्यांमध्ये डिसेंबर पासून 100 मुलांचे वसतीगृह सुरु होईल यांचे कालबद्ध नियोजन करावे, तसेच याबाबत विभागीय स्तरावर आढावा घेऊन या कामाला गती द्यावी तसेच वसतीगृहासाठी आवश्यक नियमावली तयार करावी. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सारथी, महाज्योती, संबंधित जिल्हाधिकारी यांनी एकत्रित बैठक घेऊन अंतिम नियमावली सादर करावी.
केंद्र सरकारच्या एनसीईआरटीमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेले व शिष्यवृत्ती न मिळालेल्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना सारथीमार्फत दरमहा 800 प्रमाणे वार्षिक 9 हजार 600 रुपये लाभ देणारी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देशातील 200 नामांकित राज्याबाहेरील विद्यापीठ/संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख इतक्या मर्यादेत आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेंतर्गत अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्य याकरिता रुपये 50 हजार रुपये देण्यात येणार असून विद्यापीठाने निर्धारित केलेल्या शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी ची प्रतिपूर्ती आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह व भोजन शुल्क रक्कम अदा करण्यात येणार आहे.
मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थीं परदेशातील नामांकित विद्यापीठामधील उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शिष्यवृत्तीप्रमाणे पदव्युत्तर पदवीसाठी प्रती वर्षी रुपये 30 लाख मर्यादेत आणि पीएचडी साठी रुपये 40 लाखाच्या मर्यादेत परदेशी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे सादरीकरण केले.
हैद्राबाद – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज हैदराबाद येथे सुरू आहे. या यात्रेत राज्याचे माजी ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत सहभागी झाले; परंतु अफाट गर्दीत झालेल्या धावपळीत ते पडले, यात त्यांच्या कपाळाला जखम झाली असून पायालाही मुका मार लागला.नितीन राऊत यांना कार्यकर्त्यांनी लगोलग जवळील रूग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. 70 वर्षीय राऊत यांच्यावर 2020 मध्ये अॅन्जियोप्लास्टी झाली असून त्यांची प्रकृती आता ठिक आहे.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर ते कन्याकुमारी निघालेली भारत जोडो यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या 5 राज्यातून आतापर्यंत 53 दिवस ही पदयात्रा सुरु आहे. महाराष्ट्रात 7 नोव्हेंबरला या पदयात्रेचा प्रवेश होत असून महाराष्ट्र राज्यातूनही जनतेचा मोठा प्रतिसाद मिळून ही पदयात्रा इतिहास निर्माण करेल असा विश्वास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केला आहे.
के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नाही. आतापर्यंत कोणत्याही पक्षाने अशा पद्धतीची पदयात्रा काढलेली नाही. 150 दिवस, दररोज 25 किमी पदयात्रा करणे हे सोपे काम नाही पण राहुल गांधी यांनी ते करून दाखवले आहे. या पदयात्रेला प्रत्येक राज्यातून दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे.
आपले शेतकरी देशाचे रक्षणाचे काम करणाऱ्या सैनिकांप्रमाणेच वंदनीय – अभिनंदनीय आहेत, असे उद्गार केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काढले. देशवासियांचे पोट भरण्यासाठी शेतकरी कैक प्रकारचे त्याग करतात असेही ते म्हणाले. संरक्षण आणि कृषी दोन्ही क्षेत्रात काम करणे म्हणजे देशासाठी काम करणे होय. या क्षेत्रात काम करणारे उदरनिर्वाह तर करतातच पण सोबतच देशाचा आत्माही मजबूत करतात असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आज पुण्यात भारतात बागायती मूल्य श्रृंखला विस्तारासंबंधी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने केले होते. या कार्यक्रमाला शेतकरी, शेतकरी उत्पादक संघ, स्टार्ट अप्स, बैंकर्स यांच्यासह बागायतीशी संबंधित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. खेडी देशाचा आत्मा आहेत, खेडी समृद्ध आणि आत्मनिर्भर असतील तर देशही आपोआप समृद्ध आणि आत्मनिर्भर होईल असे तोमर याप्रसंगी म्हणाले. आपला देश कृषीप्रधान असून शेती आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे ते म्हणाले. कृषी आणि खेड्यांची पारंपरिक अर्थव्यवस्था देशाची सर्वात मोठी ताकद आहे म्हणूनच कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे असे ते म्हणाले. कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरीही कृषी क्षेत्र अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सहाय्यकारक ठरेल. कोविड महामारीच्या काळात ही बाब सिद्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मिळकतीवर चिंतन होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. कृषी उत्पादनाच्या व्यापारातला जास्तीत जास्त पैसा शेतकऱ्यांना मिळेल याकडे व्यापाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यामुळे आपला शेतकरी समृद्ध होईल आणि पुढच्या पिढ्या शेती करण्यासाठी प्रेरित होतील तसेच कृषी तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवून गावांमध्ये अधिक रोजगार निर्मिती होईल असे ते म्हणाले. या युगात आपल्याला स्वतःमध्ये परिवर्तन करण्यासोबतच कृषी क्षेत्रात बदल घडवून नवे आयाम जोडणे गरजेचे आहे आणि ही बाब सरकार ओळखून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार, उत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी सचिव मनोज अहुजा, अतिरिक्त सचिव डॉ. अभिलक्ष लिखी, संयुक्त सचिव प्रियरंजन बागायती आयुक्त प्रभातकुमार, महाराष्ट्र कृषी सचिव एकनाथ डवले यांनीही संबोधित केले. याप्रसंगी तोमर यांनी उत्कृष्ट शेतकऱ्यांना सन्मानित केले तसेच बागायती प्रदर्शनाचे उद्घाटन केले.