हैद्राबाद – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज हैदराबाद येथे सुरू आहे. या यात्रेत राज्याचे माजी ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत सहभागी झाले; परंतु अफाट गर्दीत झालेल्या धावपळीत ते पडले, यात त्यांच्या कपाळाला जखम झाली असून पायालाही मुका मार लागला.नितीन राऊत यांना कार्यकर्त्यांनी लगोलग जवळील रूग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. 70 वर्षीय राऊत यांच्यावर 2020 मध्ये अॅन्जियोप्लास्टी झाली असून त्यांची प्रकृती आता ठिक आहे.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर ते कन्याकुमारी निघालेली भारत जोडो यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या 5 राज्यातून आतापर्यंत 53 दिवस ही पदयात्रा सुरु आहे. महाराष्ट्रात 7 नोव्हेंबरला या पदयात्रेचा प्रवेश होत असून महाराष्ट्र राज्यातूनही जनतेचा मोठा प्रतिसाद मिळून ही पदयात्रा इतिहास निर्माण करेल असा विश्वास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केला आहे.
के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नाही. आतापर्यंत कोणत्याही पक्षाने अशा पद्धतीची पदयात्रा काढलेली नाही. 150 दिवस, दररोज 25 किमी पदयात्रा करणे हे सोपे काम नाही पण राहुल गांधी यांनी ते करून दाखवले आहे. या पदयात्रेला प्रत्येक राज्यातून दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे.