Home Blog Page 1546

आपल्या राष्ट्रवादीवर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे – जयंतराव पाटील

‘राष्ट्रवादी मंथन… वेध भविष्याचा’ शिबिरात राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचे आणि राजकीय विश्लेषकांचे विशेष मार्गदर्शन…

शिर्डी- आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्याने सत्ताधार्‍यांकडून राष्ट्रवादीवर टीका होत आहे असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराला आजपासून शिर्डी येथे सुरुवात झाली. या शिबिराच्या सुरुवातीला झेंडावंदन पार पडले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी ते म्हणाले,’ राष्ट्रवादी पक्षाला २३ वर्ष झाली आहेत. आ शरद पवारसाहेब या शिबिराला कालच येणार होते. मात्र ते उद्या येऊन मार्गदर्शन करतील असेही जयंतराव पाटील यांनी सांगितले. राज्यात सत्ता नसताना आपण केंद्रस्थानी होतो. हल्लाबोल आंदोलन केले. पदयात्रा काढली. त्यानंतर विदर्भात बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत सरकारला द्यावी लागली. आज शेतकरी अडचणीत व अस्वस्थ आहे याकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी सरकारला विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला निवेदन दिले मात्र सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केला नाही याबद्दल तीव्र नाराजी जयंतराव पाटील यांनी व्यक्त केली.आपल्या मंत्र्यांनी चांगले काम केले हे जनतेला सांगण्याची गरज आहे. आपल्या पक्षाच्या माध्यमातून झालेली कामे पोहोचवा, ती लोकांपर्यंत जायला हवीत असे आवाहनही जयंतराव पाटील यांनी केले.शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले. त्या बंडखोरीशी काही संबंध नाही म्हणणारे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू हे एका फोनवर गुवाहाटीला गेले हे जाहीर सांगतात यावरून या बंडामागे कोण होतं हे लक्षात येते असेही ते म्हणाले. या शिबिराला पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनिल तटकरे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार फौजिया खान, खासदार वंदना चव्हाण, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, माजी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री आदिती तटकरे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार आशुतोष काळे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, पक्षाचे सर्व आमदार, माजी आमदार, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रवक्ते, सरचिटणीस, फ्रंटल सेलचे राज्यप्रमुख, संघटक सचिव, महिला प्रदेशाध्यक्ष, युवक प्रदेशाध्यक्ष, युवती प्रदेशाध्यक्ष, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष आदींसह सर्व निमंत्रित उपस्थित होते.

निवडणुका १/२ महिन्यात जाहीर होऊ शकतात कार्यकर्त्यांनी तयार रहावे -अजित पवार

0

शिर्डी -राज्यातल्या २३ महानगरपालिका, २२१ नगरपरिषदा-नगरपंचायती, २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्या आणि ७ हजार ५०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका १/२ महिन्यात जाहीर होऊ शकतात कार्यकर्त्यांनी तयार राहावे असे आवाहन करताना आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भिडे गुरुजींवर हल्ला चढविला ते म्हणाले ,’महाराष्ट्राचं मंत्रालय जे आजपर्यंत पुरोगामी निर्णयांसाठी ओळखलं जायचं… त्याच मंत्रालयात एका महिला पत्रकाराला, एक व्यक्ती, भारतमाता विधवा नाही. तुम्ही कुंकु-टिकली लावून या मगच मी बोलेन… अशा पद्धतीची भाषा वापरतो. हे गंभीर, निषेधार्ह आहे, अशी भूमिका अजितदादांनी मांडली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ या शिबिराला पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संबोधित केले. ते म्हणाले,’ ‘सबका मालिक एक…’, ‘श्रद्धा आणि सबुरी..’ सारखा संदेश देणाऱ्या, अध्यात्माच्या माध्यमातून लोकसेवेचा डोंगर उभा करणाऱ्या, श्री साईबाबांच्या पवित्र शिर्डी नगरीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश शाखेतर्फे आयोजित, ‘राष्ट्रवादी मंथन–वेध भविष्याचा’ अभ्यास शिबिर होत आहे. दोन दिवसांच्या अभ्यास शिबिराला, राज्यभरातून उपस्थित, पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, पक्षाचा ‘बॅकबोन’, संघटनेचा मुख्य कणा असलेले कार्यकर्ते बंधू-भगिनी, पक्षाचं भविष्य ज्यांच्या हातात आहे, ते तरुण मित्र, पक्षाचे सर्व हितचिंतक, उपस्थित सर्व मान्यवरांचं, सर्वात पहिल्यांदा, मी मनापासून स्वागत करतो. आज कार्तिकी एकादशी आहे. कार्तिकी एकादशी निमित्तानं पंढरपूरच्या पांडुरंगाला, वारीच्या भक्ती परंपरेला वंदन करतो. समस्त वारकरी बांधवांना, आपल्या सर्वांना कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी पांडुरंगाला साकडं घालतो. हे बा-पांडुरंगा, महाराष्ट्रावर तुझी कृपा कायम ठेव, राज्याची भरभराट कर, शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला यश दे, प्रत्येक घरात सुख-शांती येऊदे. धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी होऊदे, महागाई, बेरोजगारीचं राज्यावरचं संकट दूर कर, अशी प्रार्थना मी बा विठ्ठलाच्या चरणी करतो. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वं, मार्गदर्शनाखाली हे शिबिर होत आहे. या शिबिराच्या नियोजन, आयोजन, समन्वयात योगदान दिलेले पक्षातील सर्व सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक बंधू-भगिनींचं अभिनंदन करतो. आभार मानतो. धन्यवाद देतो. शिबिराच्या आजच्या पहिल्या दिवशी व दुसऱ्या दिवशी जे मान्यवर अभ्यासक, विश्वेषक या शिबिराला मार्गदर्शक करत आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या जाणीवजागृतीसाठी आपण दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद देतो. ‘मंथन’ म्हटलं की पुराणातली ‘समुद्रमंथना’ची गोष्ट आणि त्या मंथनातून निघालेल्या अमृत आणि विषाची कथा आठवण्याची शक्यता आहे. पुराणातल्या त्या ‘समुद्रमंथना’शी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या वैचारिक ‘मंथना’चा काहीही संबंध नाही. आपलं ‘मंथन’ हे विचारांचं मंथन आहे. या मंथनातून, देशाच्या, राज्याच्या, पक्षाच्या भल्यासाठी, चांगलं शोधण्याचा, खुप काही चांगलं करण्याचा हा प्रयत्न आहे. येणाऱ्या भविष्यकाळात पक्षवाढीसाठी, राज्याच्या विकासासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काय केलं पाहिजे. पक्षकार्यकर्त्यांची भूमिका कशी असली पाहिजे. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी कसं वागलं पाहिजे, कोणत्या पद्धतीनं विचार केला पाहिजे, सत्यशोधक विचारांची कास कशी धरली पाहिजे, हे ठरवण्यासाठी हे मंथन शिबिर आहे. सध्याच्या राजकीय, सामाजिक पार्श्वभूमीवर, पक्षाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेऊन, पक्षाची, पुढच्या वाटचालीची दिशा ठरवण्यासाठी हे अभ्यास शिबिर महत्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाची ध्येय-धोरणं माहित असली पाहिजेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आर्थिक प्रश्नांकडे, कार्यकर्त्यांनी चिकित्सक पद्धतीनं बघितलं पाहिजे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संविधान आणि लोकशाहीच्या मुल्यांबाबत सजग असला पाहिजे. यासंबंधीची जाणीव निर्मिती आणि जाणीव जागृतीसाठी हे मंथन शिबिर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातल्या, देशातल्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याला त्यांची जबाबदारी समजावून सांगण्यात आणि ती पार पाडण्याचं बळ देण्यात, प्रदेश राष्ट्रवादीनं आयोजित केलेलं हे ‘राष्ट्रवादी मंथन–वेध भविष्याचा’ अभ्यास शिबिर यशस्वी होईल, असा विश्वास अजितदादा यांनी व्यक्त केला. अजितदादा म्हणाले, या शिबिरात आपल्यसमोर बोलण्यासाठी ‘राज्यातील आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुका’ हा विषय मला दिला आहे. अनेक कारणांसाठी हा विषय महत्वाचा आहे, असं मला वाटतं. येणाऱ्या काळात, लवकरच, राज्यातल्या २३ महानगरपालिका, २२१ नगरपरिषदा-नगरपंचायती, २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्या आणि ७ हजार ५०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांची पूर्वतयारी या शिबिरातून आपल्याला करायची आहे. सर्वोच्च न्यायालयानं सद्यस्थितीत, ग्रामपंचायती वगळता, इतर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांबाबत ‘जैसे थे’ आदेश दिला आहे. असं असलं तरी, ही स्थगिती कधीही उठू शकते. निवडणुका एक-दोन महिन्यात जाहीर होऊ शकतात, त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहिलं पाहिजे. मला आनंद आहे की, अनेक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. ही आघाडी आणि वेग आपल्याला टिकवायचा आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतून, पक्षाच्या गाव, शहर, तालुका, जिल्हा पातळीवरील अधिकाधिक कार्यकर्त्यांना, सत्तेत येण्याची, लोकसेवा करण्याची संधी मिळत असते. स्थानिक स्वराज संस्थांवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते हेच स्थानिक सत्तेच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी, पक्षाच्या बळकटीकरणासाठी ताकद देत असतात. याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भविष्यातले आमदार, खासदार पक्षाला मिळत असतात. त्यातून पक्षसंघटन वाढते. स्थानिक स्वराज संस्थांमधलं यशंच, येणाऱ्या काळात पक्षाची, लोकसभा, विधानसभा निवडणुकीची वाट सोपी करणार आहेत, हे लक्षात घेऊन अधिकाधिक जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता आणि ग्रामपंचायतीत आपल्या विचारांची माणसं निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अजितदादांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना केले. प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली, माझ्यासह, पक्षाच्या जिल्हा, तालुका अध्यक्षांपासून बुथ-मतदार यादी लेव्हलपर्यंतच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनं, आतापासून कामाला लागावे. मतदार यादी बुथप्रमुख, पन्ना प्रमुख यांच्याशी स्थानिक नेतृत्वाने संपर्कात राहावे. त्यांच्या अडचणी दूर करण्याचा, त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करावा, असे अजितदादांनी सांगितले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी, पंचायत राज्य व्यवस्था आणली. स्थानिक स्वराज संस्थांच्या माध्यमातून सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचं काम केले. नंतरच्या काळात आदरणीय साहेबांच्या नेतृत्व, मार्गदर्शनात महिलांसाठी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये, महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय आपण घेतला. हा निर्णय महिलांपर्यंत, घराघरात पोहचवला पाहिजे. आज स्थानिक स्वराज संस्थांमध्ये 50 टक्के महिला निवडून येतात. त्या जागांवर, राष्ट्रवादीच्या विचारांच्या उमेदवार अधिकाधिक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. महिलांच्या सक्षमीकरणसाठी राष्ट्रवादीने केलेले कार्य घराघरात पोहचवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. राज्याच्या ज्या मंत्रालयात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, (अगदी देवेंद्र फडणवीस साहेब) यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या अधिकार, मानसन्मानाचे अनेक निर्णय घेतले. महाराष्ट्राचं मंत्रालय जे आजपर्यंत पुरोगामी निर्णयांसाठी ओळखलं जायचं… त्याच मंत्रालयात एका महिला पत्रकाराला, एक व्यक्ती, भारतमाता विधवा नाही. तुम्ही कुंकु-टिकली लावून या मगच मी बोलेन… अशा पद्धतीची भाषा वापरतो. हे गंभीर, निषेधार्ह आहे, अशी भूमिका अजितदादांनी मांडली. स्थानिक स्वराज संस्थांमध्ये ओबीसी बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राहीली आहे. मंडल आयोगावेळी ओबीसी आरक्षणाची बाजू उचलून धरण्याचं काम पवार साहेब आणि भुजबळ साहेबांनी केलं होतं. मंडल आयोग ते बांठिया आयोग, असा हा राष्ट्रवादीचा प्रवास कायम ओबीसी बांधवांच्या बाजूचा राहिला आहे. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, महाविकास आघाडी सरकारने, राज्यात बांठिया आयोग स्थापन करून, त्यांच्या अहवालाच्या आधारे ओबीसी बांधवांनाना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आरक्षण मिळवून दिलं. आज भलतेच लोक त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांनी आरक्षणाला कायम विरोध केला, अशी टीका करत ओबीसींच्या मंडल आयोगाला विरोध करणाऱ्या त्या ढोंगी लोकांचा बुरखा फाडण्याचं काम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे, असे आवाहन उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका वेळेवर घेणे ही राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे; हे खरं असलं तरी राज्य शासन आणि न्यायालयांनीही त्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण राज्य निवडणूक आयोगाला त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी, या सगळ्यांकडून सहकार्याची अपेक्षित असते. मला वाटतं की, निवडणुका लांबविणे ही सध्याच्या शिंदे सरकारची गरज झाली आहे. त्यांना जनाधार नाही. लोकांची सहानुभूती महाविकास आघाडीकडे आहे, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. शिवाय त्यांची चूकही त्यांना उमगली आहे; पण ते जाहीरपणे कबूल करू शकत नाही. सरकारं येतात जातात; निवडणुकीत मतदारांनी विजयी कौल दिल्यावर सरकार येते, ते खरे कर्तृत्व असते. त्यात आनंद असतो किंवा पराभव झाला तरी तोही जनतेचा कौल असतो; पण गुवाहाटीला जाऊन सरकार पाडणे म्हणजे ही चोरवाट आहे, अशा शब्दांत अजितदादांनी टीका केली. मुख्यमंत्रीपदाच्या मोबदल्यात राज्यात येऊ घातलेले चार मोठे प्रकल्प गुजरातला दिले गेले. इथल्या तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवले गेले. हेच आपल्याला जनतेपर्यंत पोहचवायचे आहे. या प्रकल्पांसाठी दिल्लीला जावून पंतप्रधान, संरक्षणमंत्री यांना भेटण्याचं, त्यांच्याकडे मागणी करण्याचं धाडसही राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दाखवू शकत नाहीत. हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे. हे शिंदे सरकार जितकं सत्तेवर राहील, तितकं अधिक महाराष्ट्राचं, इथल्या जनतेचं नुकसान करत राहतील, ही राज्यातल्या जनतेची लोकभावना आहे, असे अजितदादा म्हणाले. राज्याच्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. महापुर आला. शेतकऱ्यांचं खरीपाचे पिक पूर्णपणे वाहून गेले आहे. पशुधन वाहून गेलं. शेतजमीनी पिकासह खरवडून गेल्या आहेत. येणाऱ्या काही वर्षात या जमीनींचं नुकसान भरुन येणार नाही. लोकांच्या घरांचं, दुकानांचं नुकसान झालं आहे. रबी हंगामात पेरणी झालेल्या पिकाचंही नुकसान झालं आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. कर्जाची परतफेड करणं शक्य नसल्यानं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी काळी गेली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना आधार, दिलासा देण्यासाठी, राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आपण केली. ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर, राज्यातला नुकसानग्रस्त शेतकरी पुन्हा उभा राहू शकणार नाही, हे वास्तव आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन, खरीपाचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये मदत करावी, अग्रीमसह शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यावी, अशी मागणी अजितदादांनी केली. यासंदर्भात, मी दिवाळीआधी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन पत्र दिलं होतं. त्या मागणीचा अजून विचार झाला नाही, ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना, दिवाळीत दिलासा देण्याची संधी, राज्य सरकारनं गमावली, हे राज्यातल्या शेतकऱ्यांचं आणि १३ कोटी जनतेचं दुर्दैवं आहे. ही वस्तुस्थिती आपापल्या मतदारसंघातल्या मतदारांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे.असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

मोदींनी देशावरील ५४ लाख कोटीचे कर्ज १४० लाख कोटींवर नेल्याचा घणाघात :वर्तमानातील सर्वाधिक कमकुवत पक्ष नरेंद्र मोदी आणि भाजप-पत्रकार अशोक वानखेडेंचा दावा

शिर्डी – देश स्वतंत्र झाल्यानंतर २०१४ पर्यंत देशावर ५४ लाख कोटी कर्ज होते. ते एकट्या मोदींनी १४० लाख कोटी केले. हे सरकार केवळ आकड्यांचा जुगाड करून सत्य लपवत आहे.सध्याच्या वर्तमानातील सर्वाधिक कमकुवत पक्ष कोण असेल तर नरेंद्र मोदी आणि भाजप पक्ष आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी जिंकलेल्या जागांचा पाढा वाचून दाखवला. त्यामुळे महाविकस आघाडी २०२४ मध्ये जर एकत्र लढली तर २०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप एकेरी आकड्यात निवडून येतील. असा दावा आज येथे वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी केला आहे.

केंद्रीय यंत्रणांचा राजकारणासाठी वापर या विषयावर राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी ‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राज्यात नरेंद्र मोदी व भाजपकडून सत्तेचा होणारा गैरवापर याबाबात त्यांनी अत्यंत मार्मिक शब्दांत विश्लेषण केले. ते म्हणाले,’ एखादी निवडणूक समोर आल्यावर भाजपकडून नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे केला जातो. परंतु आता त्याच चेहऱ्यावर आपल्याला प्रश्न उपस्थित करायला हवे, असे थेट आवाहन त्यांनी केले. प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगवेगळी असू शकते. मात्र २०१४ सालापासून राजकारणातील माणुसकी ही संकल्पना निघून गेली. सत्ता स्थापन करण्यासाठी कुठल्याही थराला लोक जात आहेत. भाजप पक्षात प्रवेश करण्यासाठी एखाद्या व्यक्तीमागे ईडी, सीबीआयची चौकशी असणे किंवा एखादा घोटाळा करणे गरजेचे आहे असा थेट आरोप वानखेडे यांनी केला. महाराष्ट्राची राजकीय ताकद काय हे सांगताना वानखेडे म्हणाले की, महाराष्ट्राची राजकीय ताकद शरद पवार साहेब आहेत. देशात भाजप विरहित कोणत्याही राजकीय पक्षाला काही प्रश्न केला तर ते पवार साहेबांकडे बोट करून ते काय विचार करतात असे विचारतात. ही आपली ताकद आहे, असे वानखेडे यांनी उदाहरणासह स्पष्ट केले. त्यामुळे पवार साहेबांना ताकद देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. २०२४ च्या निवडणुकीत विरोधकांना संधी आहे. सध्याच्या वर्तमानातील सर्वाधिक कमकुवत पक्ष कोण असेल तर नरेंद्र मोदी आणि भाजप पक्ष आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी जिंकलेल्या जागांचा पाढा वाचून दाखवला. याउलट २०१९ सालच्या झालेल्या कमी जागांचा पाढाही त्यांनी वाचला. त्यामुळे महाविकस आघाडी २०२४ मध्ये जर एकत्र लढली तर २०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप एकेरी आकड्यात निवडून येतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर आपण सर्वांनी महाराष्ट्रातील प्रश्नासोबत राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नही विचारात घ्यायला हवे. २०२४ च्या निवडणुकामध्ये भाजपाच्या जागा कमी झाल्या तर त्यांच्यामध्ये विद्रोह होईल. भाजपामध्ये लोक धुसमूसत आहेत, असे त्यांनी सांगितले. तुम्ही जरी महाराष्ट्रात निवडणूक लढवत असले तरी राष्ट्रीय पातळीच्या मुद्द्यांवर मोदी सरकारची पोलखोल केली पाहिजे. त्याच्या शिवाय लोकांनी जी अफीम खाल्ली आहे ‘तो आएगा तो मोदी ही..’ ती उतरणार नाही. त्या उलट नवीन टॅगलाईन देयची ‘जाएगा तो मोदी ही… ‘ही संकल्पना जनमानसात रुजवली पाहिजे, असे आवाहन वानखेडे यांनी सर्व विरोधी पक्षांना केले. देश स्वतंत्र झाल्यानंतर २०१४ पर्यंत देशावर ५४ लाख कोटी कर्ज होते. ते एकट्या मोदींनी १४० लाख कोटी केले. हे सरकार केवळ आकड्यांचा जुगाड करून सत्य लपवत आहे. ते सत्य बाहेर आणण्याची गरज आहे, असे वानखेडे यांनी नमूद केले. मोदी सरकारने कर्ज उपलब्ध करून देशाची अर्थव्यवस्था कशी व्यवस्थित आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करते. परंतु यामध्ये खूप मोठी तफावत असून देशाचे नुकसान होत आहेत याचे अर्थशास्त्रीय विश्लेषण यावेळी वानखेडे यांनी यावेळी सादर केले. एक लक्षात ठेवा महाराष्ट्रात एकही उद्योग या पुढे येणार नाही. जो पर्यंत वरती डाकू बसले आहेत व राज्यात गद्दार किल्लेदार बसलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून उद्योग प्रकल्प गेले. सेमी कंडक्टर प्रकल्प आला असता महाराष्ट्राला चांगले उत्पन्न मिळाले असते व रोजगारही मोठ्या प्रमाणात मिळाला असता. टाटा एअरबस कंपनीच्या प्रकल्प महत्त्वाचा होता. त्या ऐवजी दोन हजार कोटीचा इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प दिला. तो प्रकल्प आपल्याकडे असणाऱ्या एमआयडीसीच्या धर्तीवर आहे. अशा प्रकारे धुळफेक केली जाते. जीएसटी कलेक्शन मध्ये गुजरात महाराष्ट्राच्या अर्ध्यावरही नाही. जेव्हा विमान विकली जातील तेव्हा किती जीएसटी जमा होईल. हे भविष्याचे प्लॅनिंग भाजपावाले करत आहे. त्यामुळे येणाऱ्या २०२४ निवडणुकीत ‘जाएगा तो मोदी ही’ या संकल्पनेवर सर्व विरोधकांनी एकत्र येऊन लढावे, तरच हेच चित्र बदलेल, अशी अपेक्षा अशोक वानखेडे यांनी व्यक्त केले.

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी  पुण्यातील सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे मेटाबॉलिक अँड एंडोक्राइन डिसऑर्डर सेंटरचे उद्घाटन केले

पुणे-

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह  यांच्या हस्ते आज पुण्यातील सिम्बायोसिस रुग्णालय आणि संशोधन केंद्रात मेटाबॉलिक अँड एंडोक्राइन डिसऑर्डर्स सेंटरचे उद्घाटन झाले.

डॉ जितेंद्र सिंह  जे प्रख्यात डायबेटोलॉजिस्ट देखील आहेत आणि प्रतिष्ठित RSSDI (रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया) चे लाइफ पॅट्रन आहेत, त्यांनी जीवनशैलीतील आजार आणि चयापचय विकारांच्या वाढत्या घटना लक्षात घेता हे नवीन केंद्र प्रासंगिक असल्याचे सांगितले . हे केंद्र सर्व सामान्य रोग – मधुमेहाच्या प्रतिबंधात्मक तपासणीवर लक्ष केंद्रित करेल.

संपूर्ण सिम्बायोसिस आरोग्य धाम पुणे येथील लव्हाळे गावातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या निसर्गरम्य संकुलात  आहे. वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याच्याशी संलग्न सिम्बायोसिस विद्यापीठ आणि संशोधन केंद्रात अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि इतर सुविधा आहेत.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, गेल्या दोन दशकांमध्ये, भारतात टाइप 2 मधुमेहाच्या आजारात  वाढ झाली आहे, ज्याने आता संपूर्ण भारत  व्यापला आहे. ते म्हणाले की, टाईप 2 मधुमेह जो दोन दशकांपूर्वी दक्षिण भारतात प्रचलित होता, तो आज उत्तर भारतात तितकाच पसरला आहे आणि त्याच वेळी तो महानगरे, शहरे आणि शहरी भागातून ग्रामीण भागातही पसरला आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा हवाला देत डॉ जितेंद्र सिंग म्हणाले, गेल्या तीन दशकांमध्ये देशात मधुमेह असलेल्या लोकांच्या संख्येत 150 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टाईप 2 मधुमेहाचे निदान होत असलेले वय कमी असून  शहरी आणि ग्रामीण भागात 25-34 वर्षे वयोगटात या आजाराचे वाढते प्रमाण या चिंतेच्या मुख्य बाबी आहेत असे ते म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंग म्हणाले की, टाइप 1 मधुमेहाच्या व्यवस्थापनात जीवनशैली व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावते आणि रोगाच्या योग्य व्यवस्थापनासाठी आहार आणि शारीरिक हालचालींचा ग्लायसेमियावरील प्रभाव समजून घेणे आवश्यक आहे. त्यांनी  निदर्शनास आणून दिले की, कोविडपूर्व काळातही असंसर्गजन्य रोगांवर उपचार करताना, उदाहरणार्थ, मधुमेह :निसर्गोपचारात उपलब्ध काही योग आसने आणि जीवनशैलीतील बदलांच्या सहाय्यक सरावाने इन्सुलिन किंवा तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या मधुमेहविरोधी औषधांची मात्रा कमी करता येते हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या मोफत औषध सेवा उपक्रमांतर्गत, छोट्या मुलांसह गरीब आणि गरजू लोकांना इन्सुलिनसह इतर आवश्यक औषधे मोफत पुरवण्यासाठी राज्ये /केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जात असल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. याशिवाय, राज्य सरकारांच्या सहकार्याने ‘जन औषधी योजने’ अंतर्गत इन्सुलिनसह दर्जेदार जेनेरिक औषधे सर्वांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवाय सरकारी रुग्णालये मोफत उपचार देतात. सामाजिक आर्थिक जात जनगणना (SECC) डेटाबेस 2011 नुसार AB-PMJAY अंतर्गत पात्र 10.74 कोटी कुटुंबांसाठी आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या (PMJAY) अंतर्गत रुग्णालयात दाखल रूग्णांसाठी उपचार देखील उपलब्ध आहेत.

15 ऑगस्ट 2020 रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांच्या “राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशन” च्या क्रांतिकारी घोषणेचा संदर्भ देत डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, उपचारातील आव्हाने कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर केला जाईल. त्यांनी मोदींना उद्धृत केले की, “प्रत्येक भारतीयाला आरोग्य ओळखपत्र देण्यात येईल. हे आरोग्य ओळखपत्र प्रत्येक भारतीयाच्या आरोग्य खात्याप्रमाणे काम करेल. या खात्यामध्ये तुमची प्रत्येक चाचणी, प्रत्येक रोग, तुम्ही भेट घेतलेले डॉक्टर, तुम्ही घेतलेली औषधे आणि निदानाचा तपशील असेल. आम्ही एक अशी प्रणाली तयार करत आहोत जी प्रत्येक नागरिकाला चांगले आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करेल.”

सिम्बायोसिस सेंटर फॉर मेटाबॉलिक अँड एंडोक्राइन डिसऑर्डरमध्ये शरीर रचना यंत्र, त्वचेच्या घडीची जाडी मोजण्यासाठी कॅलिपर, न्यूरोपॅथी लवकर ओळखण्यासाठी बायोथेसिओमीटर, हातात धरता येणारे रक्तवहिन्यासंबंधी डॉप्लर, पोडियास्कॅन इत्यादी सुसज्ज यंत्रणा आहेत, सोबतच पोषणतज्ञ आणि नर्स डायबेटिक शिक्षक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना योग्य प्रकारचा आहार आणि त्याचे महत्त्व सुनिश्चित करण्यासाठी उपलब्ध असतील. केंद्राचा मुख्य भर आजाराची गुंतागुंत रोखणे आणि रुग्णांना चांगली जीवनशैली राखण्यासाठी मार्गदर्शन करणे यावर आहे.

कार्डिओलॉजी, पोडियाट्रिक सर्जन, न्यूरोलॉजिस्ट, नेत्ररोगतज्ज्ञ यांसारखे सर्व संबंधित तज्ञ केंद्रात सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत. शिवाय, आणखी एक प्रमुख चिंता करण्याजोगा जीवनशैली आजार आहे लठ्ठपणा. केंद्राचे उद्दिष्ट अशा रूग्णांसाठी गैर- उपचारात्मक आणि शस्त्रक्रिया दोन्ही उपाय प्रदान करणे हे आहे. या केंद्रात मधुमेह आणि लठ्ठपणा व्यतिरिक्त थायरॉईड विकार, पॉली सिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस) आणि इतर चयापचय आणि अंतःस्रावी विकार असलेल्या रुग्णांचे व्यवस्थापनही केले जाईल.

सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सिम्बायोसिस स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस आणि सिम्बायोसिस सेंटर फॉर स्टेम सेल रिसर्च (SCSCR), सिम्बायोसिस सेंटर फॉर मेडिकल इमेजिंग ॲनालिसिस (SCMIA), सिम्बायोसिस सेंटर फॉर इमोशनल वेलबीइंग (SCEW), सिम्बायोसिस सेंटर फॉर अप्लाइड आर्टिफिशियल इंटेलिजेंस (SCAAI), सिम्बायोसिस सेंटर फॉर बिहेवियरल स्टडीज (SCBS), सिम्बायोसिस सेंटर फॉर नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नॉलॉजी (SCNN) आणि सिम्बायोसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंट (SCWRM) यांसारख्या कॅम्पसमधील सहाय्यक  संस्थांचे अस्तित्व शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात लक्ष केंद्रित करण्यात मदत करेल.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने मनोहर भिडे यांच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन 

पुणे-‘‘झाशीची राणी चौक जंगली महाराज रस्ता येथे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने मनोहर भिडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या उपाध्यक्ष संगीता तिवारी, नगरसेविका लता राजगुरू, निता राजपूत, नंदा ढावरे, राजश्री अडसूळ, रमा भोसले मोनिका गावडे, अश्विनी गव्हाणे,कांता ढोणे , आयेशा शेख आदी मान्यवर उपस्थित होते 
यावेळी संगीता तिवारी म्हणाल्या ,’ काल विधानभवनामध्ये एक पत्रकार महिला मनोहर भिडे यांच्याशी बोलायला गेल्या असता ‘पोरी पहिल कुंकू लाव आणि नंतर माझ्याशी बोल’ असे बोलून तिला हुसकवून लावले.आज आपला महाराष्ट्र शाहू – फुले – आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा आहे. माँ जिजाऊ, ताराराणी, अहिल्यादेवी, इंदिरा गांधी यांनी कुंकू न लावता आपले सामर्थ्य या देशाला दाखवून दिले आणि  सिध्द ही  केले. अतंराळवीर कल्पना चावला हिने ही कुंकू न लावता आपल सामर्थ्य सिध्द केले होते. नेव्ही, डिफेन्स, मिलिटरी,पोलिस फोर्स येथे ही कित्येक महिलांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे हो. असे असताना हा बुरसटलेल्या विचारसरणी चा माणूस काहीही बोलतो,खरे तर आम्ही महिलांनी कुंकू लावावे का नाही हा आमचा निर्णय ,आमचा हक्क आहे. देशामध्ये लोकशाहीनुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यानुसार आपण स्वत: आपले निर्णय घेवू शकतो. मनोहर भिडेंनी आम्हाला संस्कारांचे शिक्षण देऊ नये. इंटर्नल पोलिस डायरी मध्ये ह्याचा उल्लेख धर्मवेडा माथेफिरू असा आहे.असेही तिवारी म्हणाल्या .

कार्तिक शुद्ध एकादशीच्या पूर्वसंध्येला एमआयटीतर्फे चंद्रभागेची आरती संपन्न

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात देशातील महत्वाच्या धार्मिक स्थळांना अत्याधुनिक स्वरूप देऊन तेथे भव्य कॉरिडॉर निर्मितीचे कार्य जोरात सुरू आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्राला कॉरिडॉर बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशी भावना समस्त वारकर्‍यांनी भक्त पुंडलिक घाटावर केली आहे. तसेच चंद्रभागा नदीच्या दोन्ही तीरांवर संतांच्या नावाने १८ घाटांची निर्मिती करण्याची मागणी केली आहे.विश्व शांती केंद्र (आळंदी) माईर्स एमआयटी पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समितीच्या वतीने पवित्र चंद्रभागेची आरती या नित्य उपक्रमाचा एक भाग म्हणून कार्तिक शुद्ध एकादशीच्या पूर्व संध्येला भक्त पुंडलिक घाटावर ह.भ.प. श्री. महादेव रामचंद्र महाराज यादव हस्ते आरती संपन्न झाली.
या प्रसंगी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, ह.भ.प. रामचंद्र महाराज यादव, बंगलोर येथील कृष्णा महाराज आमले, प्रा.डॉ. टी.एन.मोरे, दत्तात्रय बडवे, डॉ. महेश थोरवे हे उपस्थित होते.
या प्रसंगी रामचंद्र महाराज यादव लिखित श्री गुरू साखरे सांप्रदायिक विचार सागर या ग्रंथाचे प्रकाशन प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, स्वप्न व संकल्प असेल तर कोणतेही कार्य पूर्णत्वास नेता येते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर पुल ते गोपाळ पूरापर्यंत १८ अध्याय व १८ संतांच्या नावाने घाटांची उभारणी करावे असे निवेदन समस्त वारकर्‍यांच्या कडून करतो. ज्ञान तीर्थ क्षेत्र आळंदी  ते ज्ञान पंढरीच्या मार्गाने देव भूमीपर्यंत प्रवास करतांना बद्रिनाथ येथील माणा गावात माता सरस्वती मंदिराची निर्मिती करून जगासमोर भारताचे खरे स्वरूप मांडले आहे.
रामचंद्र महाराज यादव म्हणाले, डॉ. विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून सुचलेल्या चंद्रभागेच्या आरतीने संपूर्ण जगात विश्वशांतीचा ठसा उमटविला आहे. आळंदीच्या दोन्ही तीरावर उत्तम प्रकारे घाटांची निर्मिती करण्यात आली आहे. येथे १४५ फूट उंचीचा गरुड स्तंभ उभारला गेला आहे. त्या माध्यमातून संतश्री ज्ञानेश्वर महाराज व तुकोबांचे नाव उंच स्थानावर पोहचविले आहे. आळंदी-देहूच्या पुणे जवळील लोणी काळभोर येथे जगातील सर्वात मोठ्या घुमटाची निर्मिती करून जगात माऊली व जगदगुरूंचा संदेश पोहचविण्याचे कार्य करीत आहेत. त्यांच्या हातून शिक्षणाबरोबरच ज्ञान तीर्थ क्षेत्र ते देव भूमी पर्यंत अद्वितीय असे कार्य घडलेले आहे. आज त्यांच्याच मार्गदर्शनातून पंढरपूरचाही  कायापालट होण्यास वेळ लागणार नाही.
प्रा.डॉ. टी.एन.मोरे म्हणाले, शिक्षणाबरोबर भारतीय संस्कृती व परंपरा संपूर्ण देशात पोहचविण्याचे कार्य डॉ. कराड करीत आहेत. त्यांनी ज्ञानाबरोबरच आध्यात्मिक क्षेत्रात केलेले कार्य अतुलनिय आहे. महाराष्ट्रात प्रथमच चंद्रभागेची आरती सुरू करुन आध्यात्मिक भूमित वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
शालिग्राम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले. महेश नलावडे यांनी आभार मानले.

नद्यांचे पुनरुज्जीवन मिळणे आवश्यक
केंंद्र सरकारने सुरू केलेली स्वच्छ भारत योजना ही भारतातील एक सर्वात मोठी चळवळ आहे. त्याचप्रकारे आता देशातील नद्यांचे पुनरुज्जीवन होणे आवश्यक आहे. प्रत्येक तीर्थक्षेत्राजवळील नद्या इतक्या स्वच्छ हव्यात, की त्यातील पाणी हे तीर्थ म्हणून प्यावयाची इच्छा व्हावी. सध्या भारतातील सर्व नद्या या प्रदूषित झालेल्या आहेत. या नद्या खराब का होतात हे पाहून त्या कशा पद्धतीने शुद्ध करता येतील, यावर मोठ्याप्रमाणावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. जिद्द आणि उर्जा असेल तर या नद्यांना स्वच्छतेच्या माध्यमातून पवित्र करण्याचा संकल्प सर्वांनी घ्यावा.

महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात स्थानिक प्रशासनात उत्कृष्ट समन्वय

सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून कौतुक

कोल्हापूर, दि. 4 :- महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या.

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांच्या आंतरराज्यीय सामायिक मुद्यांबाबत कोल्हापूर येथील रेसिडेन्सी क्लब येथे दोन्ही राज्यांची समन्वय बैठक महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी महाराष्ट्रातील सीमा भागातील पाच जिल्हे व कर्नाटक राज्यातील चार जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची उपस्थिती होती.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पुढे म्हणाले की, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सीमेलगतच्या जिल्ह्यात परस्परात चांगला समन्वय आहे. दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांच्या चर्चेतून ज्या काही समस्या राज्यस्तरावरुन सोडविल्या जाणे आवश्यक आहे त्याबाबत राज्य शासनाला सुचित करण्यात येईल, असे सांगून ही समन्वय बैठक पुढील काळात नक्कीच लाभदायक ठरेल असेही त्यांनी सुचित केले.

कर्नाटकचे राज्यपाल श्री. गेहलोत यांनी या राज्यस्तरीय समन्वय बैठकीबाबत समाधान व्यक्त करुन या बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने सर्व संबंधित स्थानिक प्रशासनाने परस्परात अधिक चांगला समन्वय निर्माण करुन त्या भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.

आजच्या सामायिक मुद्यांबाबत आयोजित समन्वय बैठकीत सर्व जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी जे सादरीकरण सादर केले त्या सादरीकरणाचे प्रस्ताव दोन्ही राजभवनकडे पाठवावेत. त्यातील राज्यस्तरीय मुद्यांच्या अनुषंगाने दोन्ही राज्य शासनाला राजभवन कडून सुचित करण्यात येईल, असे दोन्ही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

या आंतरराज्य समन्वय बैठकीत जिल्हानिहाय पुढीलप्रमाणे चर्चा झाली.

यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री. रेखावार, दिनांक 26 जून 2020 च्या आंतरराज्य बैठकीत ठरल्याप्रमाणे कृष्णा नदीतील पुराचे पाणी प्रभावीपणे बाहेर काढण्यासाठी आणि पुराचा प्रभाव कमी करण्यासाठी दरवर्षी 15 ऑगस्टपर्यंत अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी 517 मिटर ते 517.50 मिटर च्या मर्यादेत राखली जावी. तर आजरा तालुक्यातील 3.10 टीएमसी क्षमता असलेला किटवडे मध्यम प्रकल्प कृष्णा नदी खोऱ्यातील घटप्रभा उप खोऱ्यात असून हा नवीन प्रकल्प आहे. दोन्ही राज्यासाठी फायदेशीर प्रकल्प असल्याने परस्पर सहमत असलेल्या अटी व शर्तीसह आंतरराज्य प्रकल्प म्हणून हा प्रकल्प घेतला जाऊ शकतो, अशी माहिती दिली.

गोवा राज्यातून अवैध दारू वाहतूक होऊ नये यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या उत्पादन शुल्क विभागाने शिनोली, संकेश्वर, कोगनोळी अंतर्गत मार्गांवर वाहनांची कसून तपासणी करुन अवैध दारू वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी एकमेकांशी समन्वय साधणे आवश्यक आहे. गुरांमध्ये लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव कमी करणे, पशुखाद्य आणि चाऱ्यासाठी सुलभ व्यापार आणि बाजारपेठ, कर्नाटकातून हत्तीचे स्थलांतर आणि मानव-प्राणी संघर्षात झालेली वाढ, विद्यार्थ्यांना नॅशनल मिन्स स्कॉलरशिप मिळण्याबाबत, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचा कोविड आजारामुळे कर्नाटक राज्यात मृत्यू झालेला आहे अशा नागरिकांना भरपाई मिळणे तसेच सीमावर्ती भागात पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी ची मागणी श्री रेखावर यांनी केली. पोलीस अधीक्षक श्री. बलकवडे यांनी कर्नाटक राज्यातील पोलीस विभागाशी समन्वय चांगला असल्याचे सांगितले.

सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 2016-17 मध्ये महाराष्ट्र राज्याने कर्नाटक राज्यातील अवर्षण प्रवण भागासाठी 6.865 टीएमसी पाणी सोडले होते, त्याप्रमाणे कर्नाटक शासनाने महाराष्ट्र राज्यातील जत व अक्कलकोट भागासाठी पाणी सोडणे, कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना सांगली जिल्ह्यात बस स्थानकावर प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिले जातात, त्याप्रमाणे कर्नाटक राज्यानेही जिल्ह्यातील बसेसना प्लॅटफॉर्म उपलब्ध करु द्यावेत. आरोग्य, उत्पादन शुल्क व पशुसंवर्धन तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दोन्ही राज्यातील पोलिसांनी परस्परात समन्वय ठेवण्याबाबतची मागणी केली.

सोलापूरचे उपजिल्हाधिकारी श्री. वाघमारे यांनी जिल्ह्यातील 40 साखर कारखान्यांव्दारे मोलॅसिस तसेच गुळ पावडरची निर्मिती होते. तीन वर्षात मोलॅसिस वाहतुकीच्या अनुषंगाने 24 गुन्हे नोंदले आहेत. गेल्या तीन वर्षात सुमारे 703 मेट्रीक टन मोलॅसिसची अवैध दारुसाठी विक्री झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दोन्ही राज्यातील उत्पादन शुल्क प्राधिकरणामध्ये योग्य तो समन्वय ठेवणे आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यात जेथून बेकायदेशीर मोलॅसिस उचल केली जाते त्या साखर कारखान्यात तपासणीच्या अनुषंगाने सहज प्रवेश करणे त्याचबरोबर अवैध दारु विक्री, मोलॅसिस गुन्ह्या संदर्भात दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये माहितीचे आदान प्रदान आवश्यक व संबंधित अधिकाऱ्यांव्दारे संयुक्तरित्या छापेमारी आवश्यकता असल्याची माहिती त्यांनी दिली.

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी श्री. ओंबासे यांनी कलबुर्गी येथे बेकायदेशीर लिंग निदान बाबत ऑनलाईन तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. याबाबत उस्मानाबाद आरोग्य प्रशासनाने स्टिंग ऑपरेशनही केलेले आहे. त्याप्रमाणेच कलबुर्गी प्रशासनाने बेकायदेशीर लिंगनिदान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात खुशखबर योजनेअंतर्गत लिंग निदान करणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयाचा निधी दिला जातो व नावही गोपनीय ठेवले जाते, त्याप्रमाणे कर्नाटक राज्यानेही ही योजना लागू करावी. तसेच अन्नसुरक्षा मानक अधिनियम २००६ च्या कलम 30 (2)नुसार गुटखा पान मसाला व अनुषंगिक अन्य बाबीवर महाराष्ट्र राज्याप्रमाणे कर्नाटक राज्यानेही निर्बंध घालण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.

लातूरचे जिल्हाधिकारी श्री. पृथ्वीराज यांनी कारंजा धरणातून पाणी सोडणे व हे पाणी बिदर जिल्ह्यातील चंद्रपूर बॅरेज पर्यंत नेण्यासाठी सिंधीकामठ  केटीवेअरचे गेट्स काढणे व बसवणे बाबतची थकबाकी,  कर्नाटक येथील शेतकरी पाण्याचा वापर करतात त्याची थकबाकी देण्याची मागणी केली.  सीमावर्ती भागातील वाळू उत्खनन व स्वातंत्र्यसैनिकांच्या नोंदी, कायदा व सुव्यवस्था सीमावर्ती भागात अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांमध्ये परस्पर समन्वय ठेवणे. तसेच गुन्हेगारांच्या माहितीची देवाणघेवाण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बेळगावीचे जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कृष्णा आणि प्रमुख नद्यांमध्ये महाराष्ट्रातील धरणांमधून पाणी सोडल्यामुळे पूरस्थितीचे व्यवस्थापन करणे. व्यापाराला चालना देण्यासाठी आंबोली घाटमार्गे बेळगावी आणि महाराष्ट्र दरम्यान दर्जेदार रस्ते जोडणीची गरज आहे.  महाराष्ट्रातील शहरांमध्ये माल पोहोचवण्यासाठी बेळगावी येथून मालवाहू वाहनांना विना अडथळा प्रवेश मिळणे. बेळगावीच्या एमएसएमईने पुरविलेल्या साहित्यासाठी उद्योगांकडून वेळेवर देयक देणे व दोन्ही राज्यांच्या सीमेपलीकडील गुन्हे, तस्करी, अवैध दारू वाहतूक आणि इतर पोलीस आणि सुरक्षा समस्यांशी संबंधित माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी दोन्ही बाजूंमधील परस्पर सहकार्य गरजेचे असल्याबाबत सांगितले.

विजयपुराचे जिल्हाधिकारी डॉ. दनम्मानवर यांनी द्राक्ष बाजारातील समस्या जसे की सीमेवरील चेकपोस्ट, वेळेवर पेमेंट इ. तसेच दोन्ही राज्यांच्या धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांना आणि यात्रेकरूंना पुरवल्या जाणाऱ्या दळणवळण आणि मूलभूत सुविधांबाबत, लिंग गुणोत्तरात घट, PCPNDT कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी समान मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे. रस्त्यांच्या पायाभूत सुविधा, समस्या. तस्करी आणि इतर गुन्ह्यांशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी दोन्ही बाजूंनी उत्तम समन्वय ठेवण्याची मागणी केली.

बिदरचे जिल्हाधिकारी श्री. रेडी यांनी चोंडीमुखेड गावाशी संबंधित पायाभूत सुविधांबाबत समस्या- प्रामुख्याने वीज, कर्नाटक राज्यातील स्थलांतरित मजुरांना महाराष्ट्रात जाण्यासाठी सहकार्य करणे, रस्त्यांच्या उत्तम सुविधा निर्माण करणे व रोजगार निर्मितीला चालना देणे तसेच सीमेपलीकडून गुन्हेगारांच्या हालचालींना प्रतिबंध करण्याची आवश्यकता सांगितली.

कलबुर्गीचे जिल्हाधिकारी श्री. गुरुकर यांनी  सीमा ओलांडून अबकारी उत्पादनांची बेकायदेशीर वाहतुक थांबवणे. दोन्ही राज्यांतील धार्मिक स्थळांना (देवळा गाणगापूर, गट्टारगा भाग्यलक्ष्मी ) भेट देणाऱ्या पर्यटक आणि यात्रेकरूंना दळणवळण आणि मूलभूत सुविधा, लिंग गुणोत्तरात घट, PCPNDT कायद्याची कठोर अंमलबजावणी, महाराष्ट्र राज्याच्या लगतच्या गावांमधील कन्नड माध्यमाच्या शाळांना मूलभूत सुविधा देण्याबाबत सूचित केले.

यावेळी दोन्ही राज्याच्या सीमा भागात मोठ्या प्रमाणावर मराठी व कन्नड भाषिक सामान्य नागरिक धार्मिक, पर्यटन, रोजगार, आरोग्य व अन्य कारणासाठी ये-जा करत असतात त्यांना दिशादर्शक फलक हे दोन्ही भाषेत( मराठी व कन्नड) करण्याबाबत समन्वय बैठकीत एकमत झाले. यावेळी अनेक सामाईक मुद्द्यावर दोन्ही बाजूने चर्चा होऊन त्यातील काही मुद्याबाबत बैठकीतच एकमताने निर्णय झाले. तर काही मुद्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे ठरले. तर राज्यस्तरावरील मुद्यांबाबत दोन्ही राज्यपाल संबंधित राज्य शासनाला सदरील प्रश्न सोडवण्याबाबत सूचित करणार आहेत.

रेसीडन्सी क्लब येथील महाराष्ट्र, कर्नाटक आंतरराज्य बैठकीस महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राजभवन येथील सचिव श्वेता सिंघल, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, बेळगावीचे प्रादेशिक आयुक्त के.पी. मोहनराज, कलबुर्गीचे प्रादेशिक आयुक्त कृष्णा वाजपेयी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कलबुर्गीचे जिल्हाधिकारी यशवंत गुरुकर, बीदरचे जिल्हाधिकारी गोविंद रेडी, विजयपुराचे जिल्हाधिकारी डॉ. विजयमहानंदेश दनम्मानवर, बेळगावीचे जिल्हाधिकारी नितेश पाटील, लातुरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, सोलापूरचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, सोलापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, बीदरचे पोलीस अधीक्षक डेक्का बाबु, विजयपुराचे पोलीस अधीक्षक डॉ. आनंद कुमार, उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.

आम आदमी पक्षाच्या प्रयत्नामुळे आज PMPML कंत्राटी सुरक्षाकांना बोनस मिळाला

पुणे -आम आदमी पक्षाच्या प्रयत्नामुळे आज PMPML कंत्राटी सुरक्षाकांना बोनस मिळाला आहे. अशी माहिती आपचे प्रवक्ते डॉ . अभिजित मोरे यांनी येथे दिली. पुणे मनपातील ८००० हून अधिक कंत्राटी कामगारांना ८.३३% बोनस, ५% घरभाडे भत्ता, ५% रजा वेतन कायद्यानुसार देणे आवश्यक असतानाही गेल्या काही वर्षात पुणे मनपाने नियमबाह्य पद्धतीने ते दिलेले नाही. याबाबत आम आदमी पार्टी सातत्याने पाठपुरावा करत आहे.असेही ते म्हणाले.

दिनांक २० ऑक्टोबर रोजी आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक बकोरिया यांची भेट घेतली होती व त्यांना शासन नियमाप्रमाणे कंत्राटी सुरक्षा रक्षकांना सुद्धा बोनस मिळण्याचा अधिकार असून कायम सेवकांप्रमाणे त्यांना सुद्धा मिळण्यासाठी संबंधित ठेकेदाराला तसे आदेश देण्याची विनंती केली होती. या शिष्टमंडळात आपचे डॉ अभिजीत मोरे, घनश्याम मारणे, कुमार धोंगडे, रविराज डोंगरे, अमोल मोरे यांचा समावेश होता.

या आम आदमी पक्षाच्या विनंतीचा सकारात्मक विचार करून संबंधित ठेकेदाराला बोनस देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार केला होता. आम आदमी पक्षाच्या प्रयत्नामुळे आज PMPML कंत्राटी सुरक्षाकांना बोनस मिळाला. सर्वसामान्य कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या घरी आनंदाचे वातावरण त्यामुळे तयार झाले आहे.

वेदांत वाचस्पती पूज्यश्री जगन्नाथ महाराज पवार यांचे कार्य समाजाला दिशा देणारे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर, दि. ४ : वारकरी संप्रदायाने समाजामध्ये संस्कार रुजविले असून काव्यतीर्थ आचार्य वेदांत वाचस्पती पूज्यश्री जगन्नाथ महाराज पवार (अण्णासाहेब) यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
काव्यतीर्थ आचार्य वेदांत वाचस्पती पूज्यश्री जगन्नाथ महाराज पवार (अण्णासाहेब) यांच्या मूर्ती अनावरणानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार बबनराव पाचपुते, आमदार बालाजी किणीकर, मारुती महाराज कु-हेकर, देवगिरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आप्पासाहेब गावंडे, सचिव कमलाकर पेरे, पदाधिकारी उपस्थित होते.
भक्ती हा ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा सरळ आणि सोपा मार्ग संतांनी दाखविला. त्या संत परंपरेचे जगन्नाथ महाराज प्रतीक होते आणि नव्या पिढीला त्यांनी आपला वारसा सोपवला, त्या अर्थानेही त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या अध्यात्मिक उन्नतीला बळ देणारेच आहे, असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जगन्नाथ महाराज यांची कीर्तने गहन तत्त्वज्ञान, सोप्या भाषेत सांगण्याची हातोटी, मार्मिक विनोद, शाब्दिक कोट्या आणि वर्तमानातील संदर्भ अशा अनोख्या शैलीने मनापर्यंत पोहोचत होती. त्यामुळे लोक मंत्रमुग्ध व्हायचे व्हायचे, असे सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, स्वरयंत्राचा कॅन्सर झाल्यामुळे जगन्नाथ महाराज यांची कीर्तनसेवाच खंडित झाली. पण अशा प्रसंगी त्यांनी जिद्द न सोडता वाणी खंडित झाली तर लेखणी हातात धरली आणि ग्रंथरचनेस सुरुवात केली. तब्बल ६१ ग्रंथ त्यांनी लिहिले. यातील ‘विष्णुसहस्रनाम विवरण’ हा दहा खंडांचा ग्रंथ तर अभूतपूर्व आणि अतिमहत्त्त्वाचा आहे, असेही सांगितले आणि संस्थेच्या नियोजित प्रकल्पाला मदत करण्याचे आश्वासन दिले.
प्रास्ताविक आचार्य तुषार भोसले यांनी केले. कार्यक्रमाला वारकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 4 : ‘शासन राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाला आणि महाराष्ट्राला विकासात सर्वोच्च स्थानी नेणार’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सांताक्रुझ परिसरातील हॅाटेल ग्रॅंड हयात येथे आयोजित ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’ मध्ये कार्यकारी संपादक साहिल जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज्य शासनाच्या विकासात्मक प्रकल्पांची माहिती देतांना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. कला, साहित्य, उद्योग, राजकीय आणि चित्रपटसृष्टीतील प्रख्यात व्यक्तींच्या संकल्पनांच्या आदान-प्रदानासाठी दि. 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी हा कॉनक्लेव्ह आयोजित करण्यात आला आहे.

मुलाखतीत उपस्थित केलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, “आमचे लोकाभिमुख, विकासाभिमुख’ सरकार असेल. गेल्या तीन महिन्यात जनतेच्या हिताचे चांगले निर्णय घेतले. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करून जनतेला दिलासा दिला. नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषांपेक्षा जास्त मदत केली आहे. देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधांचे काम महाराष्ट्रात सुरू आहे. राज्यात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केले जात आहेत. राज्य शासन विकास कामांच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत आहे. हे जनतेचे सरकार आहे. सण आणि उत्सव आता उत्साहात साजरे केले जात आहेत. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेली राज्याची  अर्थव्यवस्था सुधारते आहे. राज्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

औद्योगिक करारांची शंभर टक्के अंमलबजावणी

राज्यातील औद्योगिक प्रकल्पांविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली असून यापुढे महाराष्ट्रात मोठमोठे प्रकल्प दिले जातील, चिंता करू नका, असे आश्वासन दिले आहे.  औद्योगिक सामंजस्य करारांची अंमलबजावणी झाली पाहिजे. नुसते करार करून चालणार नाही. आगामी काळात जे करार होतील त्यांची शंभर टक्के अंमलबजावणी होईल. राज्याच्या औद्योगिक धोरणात बदल झाला आहे. यामुळे विदेशी गुंतवणूकही वाढेल, अशी माहितीदेखील मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिली.

समृद्धी महामार्ग लवकरच सुरू होणार

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग लवकरच सुरू होईल. हा गेमचेंजर प्रकल्प ठरणार आहे. महामार्गालगत नवनगर, नोडस, नॉलेज सिटीज उभारण्यात येत आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. प्रक्रिया उद्योगही सुरू होईल. शिर्डीपर्यंतचा मार्ग खुला केला जाणार आहे. पुढच्या वर्षात समृद्धी महामार्ग पूर्णपणे सुरू केला जाईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे ठाणे, रायगड,संभाजीनगर येथे उद्योग आहेत. आता महामार्गाजवळ सुद्धा उद्योग वाढत आहेत. या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आणि सर्वच क्षेत्रात समृद्धी येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

मुंबई-पुणे मिसिंग लिंक तयार करणार

यापूर्वी राज्यात मेट्रो, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ची निर्मिती झाली.  आता मुंबई-पुणे मिसिंग लिंक तयार करतोय. या मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे मधील प्रवासासाठीचा वेळ २० मिनिटांनी कमी होईल.

दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई

मुंबईत दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्याचं काम केले जात आहे. निविदा प्रकियेला सुरूवात झाली आहे. सुमारे ५ हजार ५०० कोटी रूपयांचे काँक्रीट रस्ते दोन वर्षात पूर्ण होतील, असे निर्देश देखील मुंबई महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. येत्या काळात मुंबईचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

मुंबईच्या विकासात भर घालणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) चे काम प्रगतीपथावर आहे. हा २२ किमीचा देशातील सर्वात लांब सी-लिंक आहे. त्याचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासह नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी केली जात असून शहरात मेट्रोचे जाळे निर्माण केले जात आहे. प्रमुख शहरांमध्ये सुमारे ३४० किलोमीटरची मेट्रो उभारण्यात येत असून २०२७ पर्यंत काम पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यंमंत्र्यांनी दिली.

प्रवाशांच्या फायद्यासाठी आरेमध्ये कार शेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

महावितरणच्या विद्युत साहित्याच्या दरसूचीमध्ये (कॉस्ट डाटा) वाढ

मुंबईदि नोव्हेंबर २०२२

वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण, आधुनिकीकरण तसेच पायाभूत सुविधा उभारणीची कामे नित्याने नियमितपणे करावी लागतात  या कामांसाठी लागणाऱ्या विविध तांत्रिक साहित्याच्या दरसूचीमध्ये (कॉस्ट डाटा) वाढ करण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला आहे. 

महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध विद्युतीकरणाच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येतात. या पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी महावितरणकडून वेळोवेळी दरसूची जाहीर करण्यात येत असते. मात्र, करोना महामारीच्या कालावधीनंतर आता विद्युतीकरणासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. सद्यस्थितीत २०१९-२० या वर्षांची म्हणजे करोना महामारीच्या पूर्वीची दरसूची या कामासाठी लागू आहे.

सध्या लागू असलेल्या दरसूचीमध्ये वाढ करण्याची मागणी विविध स्तरांवरून महावितरणकडे करण्यात आली होती. महावितरणने दरसूची अद्ययावत करण्यासाठी एका समितीची स्थापना करून या समितीने दरसूचीमध्ये बदल करण्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सदर समितीने दरसूचीमध्ये सुचविलेल्या बदलास महावितरणच्या प्रशासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. नवीन दरसूची लवकरच जाहीर करण्यात येणार असून यामुळे महावितरणच्या नवीन पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामास गती मिळणार आहे. याचा लाभ राज्यातील सर्व विद्युत ग्राहकांना होणार आहे.

गज्या मारणेचे साथीदार रुपेश मारणे आणि संतोष शेलार यांना मुळशीत पकडले, अटक .

पुणे : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन त्या व्यावसायिकाचे अपहरण करुन मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गज्या मार्नेच्या टोळीतील फरार झालेल्या सराईत गुंड रुपेश मारणे याला त्याच्या साथीदारासह मुळशीतून अटक करण्यात आली.रुपेश मारणे आणि संतोष शेलार अशी अटक केलेल्या दोघा फरार गुंडाची नावे आहेत. सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन त्यासाठी व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याला मारहाण केल्या प्रकरणी कुख्यात गुंड गज्या मारणे याच्यासह १५ जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाई केली. तसेच त्यांना आश्रय देणाऱ्यांवरही मोक्का कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला होता. त्यानंतर सातारा येथून गज्या मारणे याला पोलिसांनी अटक केली असली तरी रुपेश मारणे व त्याचे साथीदार फरार होते.

त्यानंतर रुपेश मारणे याने आणखी एका व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला होता.एका व्यावसायिकाने बांधकाम व्यवसायासाठी १ कोटी ८५ लाख रुपये घेतले होते.त्या बदल्यात २ कोटी ३० लाख रुपये परत दिले होते. तरीहीआणखी ६५ लाखांची मागणी करुन या व्यावसायिकाला धमकाविले जात होते.याप्रकरणी रुपेश मारणेसह चौघांवर नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.या दोन्ही गुन्ह्यात पोलीस रुपेश मारणे याचा शोध घेत होते.मुळशी परिसरात तो असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून रुपेश व संतोष शेलार दोघांना पकडले.

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करताना सर्वंकष, परिपूर्ण करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर – पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वोत्तम नियोजन करावे. वारकरी, भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने संबंधितांनी प्रारूप आराखडा अंतिम करताना सर्वंकष, परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूसंपादन करताना, निकषाच्या बाहेर जाऊन बाधितांचे पुनर्वसन करण्याची ग्वाही आज येथे दिली.

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे झालेल्या या बैठकीस महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सर्वश्री रणजितसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, बबनराव शिंदे, राम सातपुते, शहाजीबापू पाटील, सुभाष देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, प्रांताधिकारी गजानन गुरव आदि उपस्थित होते.

भूसंपादनासाठी आवश्यक जमिनीची मोजणी करून प्रस्ताव तयार करावा. भूसंपादन लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्थानिकांचे पुनर्वसन करताना ज्यांचा व्यवसाय आहे, त्यांना तिथेच प्राधान्याने जागा देऊ. रहिवाशांना बहुमजली इमारतीत घरे आणि मोकळा प्लॉट किंवा भरीव नुकसान भरपाई देण्याचा विचार करण्यात येईल. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी नागरिकांशी चर्चा करून पंढरपूरचा चांगला विकास करण्यासाठी सुवर्ण मध्य साधावा, असे ते म्हणाले.

रस्ते, रिंग रोड, पाणी पुरवठा आदि पायाभूत सुविधांसाठी पहिल्या टप्प्यात निधीची मागणी करून कामे सुरू करण्यास प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी अप्रतिम आराखडा करूया. आहे त्यापेक्षा अधिकच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात. चांगल्या दर्जाचे रस्ते तयार करावेत. मंदिर व मंदिर परिसराचा विकास करताना बाधित होणाऱ्या ऐतिहासिक, पुरातन मूळ वास्तुंचे अभियांत्रिकीतील आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जतन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, पंढरपुरात येणाऱ्या भाविक व स्थानिक नागरिकांना आवश्यक व दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नवीन समाविष्ट कामांना गती द्यावी. स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, रस्ते आदि बाबींचा विचार करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

प्रास्ताविकात पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा तपशील सादर केला. आराखडा सर्वसमावेशक करण्यासाठी वाराणसी कॉरिडॉर विकास योजनेच्या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा करण्यात आल्याचे सांगितले. प्रारूप तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यापूर्वी सर्व संबंधितांसोबत तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यात आल्याचे सांगितले. हरकती व सूचनांचाही विचार करण्यात आला. आराखडा तयार करताना त्रृटी राहू नयेत, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ, नागरिक, व्यापारी व वारकरी संप्रदाय पदाधिकाऱ्यांच्या आवश्यक सूचनांचा समावेश आराखड्यात करण्यात आल्याचे सांगितले. तसेच केंद्र शासकीय योजनेमध्ये चंद्रभागा नदीचा समावेश केल्यास आर्थिक व तांत्रिक मदत मिळेल, असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सादरीकरणात विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिसरात करावयाच्या पायाभूत सुविधांचा तपशील दिला. यामध्ये दर्शनरांग व पत्राशेड, प्रस्तावित स्कायवॉक, प्रस्तावित दर्शनमंडप, शहरातील पायाभूत विकास कामांसाठी आवश्यक निधी, रस्ते सुधारणा, पाणीपुरवठा व भुयारी गटार योजना, चंद्रभागा नदीवरील घाट, विष्णुपद मंदिर परिसर, प्रस्तावित पालखीतळ आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.

सदर मंजूर आराखड्यात पंढरपूर शहरातील व शहराकडे येणारे रस्ते, पूल, नदीकाठी घाट, 65 एकर क्षेत्र विकसित करणे, शौचालये, पाणीपुरवठा, पालखी तळ विकास, भूसंपादन आदि पायाभूत सुविधाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. आराखड्यांतर्गत मंजूर कामांपैकी 51 कामे पूर्ण झाली असून, 6 कामे प्रगतीपथावर आहेत. मंजूर असलेली 4 विकास कामे व 7 पालखी तळांचे भूसंपादनासाठी अतिरीक्त निधी आवश्यक असल्याने नवीन आराखड्यात प्रस्तावित केली आहेत. यावेळी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासंदर्भात लघुचित्रफित दाखविण्यात आली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मौलिक सूचना केल्या.

सरस फूड फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांना खवय्यांची पसंती

नवी दिल्ली, : सरस फूड फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांना खवय्यांनी पसंती दिली असून दिल्लीकर खवय्ये वडापाव, मिसळपाव, आगरी मटण तसेच चिकन आणि पुरणपोळीचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत.

बाबा खडक सिंग मार्गस्थित एम्पोरियम भवन परिसरात सरस फूड फेस्टिव्हल 2022 चे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये 17 राज्यांची 21 खाद्यपदार्थांची दालने आहेत. बचत गटांच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या पक्वान्नांना येथे मांडण्यात आलेले आहे. यामध्ये महाराष्ट्राची दोन दालने आहेत. एक नंदूरबार आणि दुसरे ठाण्यातील आहे

राजधानीत सध्या थंडीची चाहूल लागली आहे. अशा वातावरणामध्ये या परिसरात सर्वत्र राज्या-राज्यातील देशी खाद्य पदार्थांचा खमंग सुवास दरवळतो आहे. हिमाचल प्रदेश ते केरळपर्यंतच्या खवय्यांना आवडणारे  शाकाहारीसह मांसाहारी पदार्थ ताजे वाढले जात आहेत.

यात महाराष्ट्राचा वडापाव, दाबेली, मिसळपाव, तोंडाला पाणी सोडतात तर  पुरण पोळीने जिभेवर एक वेगळेच समाधान मिळत असल्याचे येथे दिसून आले. हे अधिक खाल्ले जाणारे पदार्थ ‘दशमा’ महिला बचत गट, नंदूरबार येथील आहेत. तर कोल्हापूर मटण नुसत ऐकूण असणारे खवय्ये डोळयात पाणी आणूनही खाण्यात दंग दिसले. यासह आगरी मटण, आगरी चिकण, कोळंबी रस्सा, भात, पोळी, तांदळाची भाकरी हे दिल्लीकरांसाठी नवीन असणारे पदार्थही खवय्ये चाखूण पाहत आहेत. हे दालन श्री कृपा बचत गट, ठाणे यांचे आहे.

प्रथमच देशाच्या राजधानीत स्टॉल्स लावण्याची संधी मिळाल्याने सुरूवातीला असणारी धाकधूक खवय्यांनी ‘और एक’ अशी फर्माईश करत दूर करून आत्मविश्वास वाढला. घरी जे पदार्थ सहज बनविले जातात तेच पदार्थ इतर राज्यातील लोकांपुढे मांडताना शेफ म्हणून टॅग लागतो तेव्हा मन सुखवून जाते अशी प्रतिक्रिया या बचत गटातील महिलांनी दिली.

या ठिकाणी खवय्यांनी खाद्यपदार्थांचा निवांत आस्वाद घ्यावा, यासाठी टोकन व्यवस्था केलेली आहे. स्टॉल्स आकर्षक आणि स्वच्छ आहेत. या ठिकाणी दररोज एक सांस्कृतिक कार्यक्रमही दाखविण्यात येतो.  हे फूड फेस्टिव्हल 27 ऑक्टोबरपासून सुरू झाले असून  ते 10 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत विनाशुल्क सर्वांसाठी खुले आहे.

मान्यवरांसाठी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा विशेष शो – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित असलेला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. पुढील आठवड्यात या चित्रपटाचा विशेष शो राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, आमदार तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सांगितले.

‘हर हर महादेव’ चित्रपटाची टीम आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटण्यासाठी आली होती. ‘हर हर महादेव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे सुबोध भावे, नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणारे शरद केळकर, चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिजित देशपांडे, निर्माते सुनील फडतरे, झी स्टुडिओचे प्रमुख मंगेश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यभरातील चित्रपटगृहात एकाच वेळी हा चित्रपट दाखविण्याचे नियोजन करण्यात येईल. तरुण पिढीला विशेषत: शालेय विद्यार्थ्यांसाठी या विशेष शोचे आयोजन कसे करता येईल याबाबतचे नियोजन करण्यात येईल.

झी स्टुडिओजची निर्मिती असलेला मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाला एकात्मिक वस्तू/माल आणि सेवा कर यामधून सुट देता येईल का याबाबतही तपासले जाईल.