Home Blog Page 1545

बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करा- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. १२: आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे; बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशके बाजारात येऊ नये यासाठी अशा प्रकरणात तातडीने गुन्हे दाखल करत कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

विधानभवन येथे आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, संजय जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषि सहसंचालक रफिक नायकवडी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी अनिल देशमुख आदी उपस्थित होते.

अल निनोचा परिणाम पाहता खरीप हंगामात दुबार पेरणीची गरज भासल्यास बियाणे उपलब्धता राखीव ठेवावी असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, बियाणे, किटकनाशांच्या बाबतीत जिथे तक्रार येईल तिथे लगेच तपासणी, अहवाल करत गुन्हे दाखल करावेत. अशा प्रकरणात कठोर शिक्षा होईल यावर लक्ष द्यावे.

शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे. ऊस उत्पादकांना सूक्ष्म सिंचन संच बंधनकारक करण्यासाठी प्रयत्न करावेत. विविध कार्यकारी संस्थांना फवारणीसाठी अनुदानावर ड्रोन यंत्रे देता येतील. तेथून मागणीप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतावर फवारणी होऊ शकेल. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होण्याच्यादृष्टीने राज्याच्या महत्त्वाकांक्षी अशा सौरकृषि वाहिनी योजनेला गती द्यावी. या योजनेचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा, असेही श्री. पाटील म्हणाले.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पडीक जमिनीवर बांबू लागवडीचा उपक्रम चांगला असून त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धीद्वारे शेतकऱ्यांना महत्व पटवून द्या, असेही पालकमंत्री म्हणाले.

यावेळी कृषिपंप वीजजोडणी, जिल्ह्यातील धरणप्रकल्पातील पाणीपरिस्थितीचाही आढावा घेण्यात आला. मार्च २०२३ अखेर कृषिपंपांच्या वीजजोडण्या प्राधान्याने पूर्ण करण्यात आल्या असून यावर्षात जिल्ह्यात १० हजार वीजजोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार वीजजोडासाठी अनामत रक्कम भरलेल्या शेतकऱ्यांना तीन महिन्याच्या आता वीजजोडणी द्यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी प्रास्ताविकात सांगितले, मान्सूनवर परिणाम करु शकणाऱ्या अल निनो घटकाचा विचार करता जिल्ह्यात बियाणे आणि खतांची पुरेशी उपलब्धता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र सुमारे २ लाख हेक्टर आहे. गेल्या तीन हंगामात सुमारे २८ हजार क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून यावर्षी ३३ हजार क्विंटलच्या मागणीनुसार पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

गेल्या खरीप हंगामात २ लाख २१ हजार मे. टन रासायनिक खतांचा वापर झाला असून यावर्षीही आवंटनानुसार खताचा पुरवठा होत आहे. युरियाची होणारी मागणी पाहता शासनाने जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार ४ हजार २०० मे. टन खतांचा बफर साठा करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार युरियाचा ३ हजार २०० मे. टन आणि डी.ए.पी. चा १ हजार मे. टनचा बफर साठा करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पीक कर्ज वाटपाचेही जिल्ह्यात चांगले नियोजन करण्यात आले असून गेली दोन वर्षे उच्चांकी आणि त्यातही गतवर्षी उच्चांकी ४ हजार १६०कोटी रुपये पीक कर्ज वाटप झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांच्या कर्जमंजुरी रकमेत पुणे जिल्हा देशात दुसऱ्या स्थानावर आहे. ऊसाचे पाचट न जाळता कुजविण्यासाठी पाचट व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यात येत असून दीड लाख हेक्टर पैकी ४८ हजार हेक्टरवरील सुमारे ३ लाख ५० हजार मे. टन पाचट कुजविण्यात यश मिळविले आहे.

यावर्षी बाजरीची उत्पादकता वाढविण्यावर भर देण्याचे नियोजन केले आहे. तसेच पावसाला विलंब झाल्यास भात पिके करपून जाण्याचा अनुभव लक्षात घेता भाताच्या रोपवाटिकांना प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) देण्यात येणार आहेत. अंजीराला भौगोलिक ओळख (जीआय) मानांकन मिळाले. त्याप्रमाणे आता जुन्नर परिसरातील शिवनेरी हापूसची जीआय मानांकन प्रक्रिया करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला असून मानांकनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

अवेळी पाऊस आणि अन्य कारणामुळे मार्चअखेर झालेल्या नुकसानीचे पैसे वितरीत करण्यात आले असून यापुढे नुकसानभरपाईची रक्कम थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. काचोळे यांनी सादरीकरण केले. बी- बियाणे, रासायनिक खतांची मागणी, उपलब्धता, निविष्टा गुणवत्ता नियंत्रण, कृषि यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, राष्ट्रीय कृषि सिंचन योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना आदींची माहिती दिली.

श्री. हिरेमठ यांनी आत्मा यंत्रणेकडून राबविण्यात येणाऱ्या शेतीशाळा, सेंद्रीय शेती प्रकल्पाबाबत सादरीकरण केले.

प्रारंभी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते २०२३-२४ साठी कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत डीबीटीद्वारे अनुदान प्राप्त लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. तसेच राज्यस्तरीय खरीप हंगाम २०२२ च्या पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आत्मा यंत्रणेमार्फत तयार करण्यात आलेल्या विविध घडीपत्रिकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
0000

पुण्याच्या व्हायोलिन वादक बालकलाकारांनी  जर्मनीत प्रेक्षकांना जिंकले !

पुणे-

शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत, अभंग, देशभक्तीची गीते, भावगीत, भक्तीगीत, हिंदी चित्रपटातील शास्त्रीय रागांवर आधारित जुनी गाणी, महाराष्ट्राची लावणी आणि गुजरात, बंगाल, काश्मीर, राजस्थान, गोवा या राज्यांमधील लोकसंगीत हे सारे व्हायोलिनवर चक्क जर्मन देशात सादर करून पुण्याच्या ‘स्वरस्वप्न’च्या बालकलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. १३-१४ वर्षाची १० मुले-मुली व २० वर्षांची २ मुले यांच्या या  व्हायोलिन वाद्यवृंदाने जर्मनीतील स्टुटगार्ट आणि म्युनिक येथे बहारदार कार्यक्रम सादर केले. व्हायोलिन गुरु स्वप्ना दातार यांच्याकडे हे बालकलाकार व्हायोलिनचे शिक्षण घेत आहेत.  

जर्मनीतील स्टुटगार्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन व म्युनिक येथील महाराष्ट्र मंडळ यांच्या निमंत्रणावरून तेथे हे बालकलाकार गेले होते. स्टुटगार्ट येथील संगीत विद्यालयाच्या श्रीमती स्टेफी ब्रॉयनिंग यांच्या ‘दि टेलीमॅनर’ या ऑर्केस्ट्रा वाद्यवृंदाने ‘स्वरस्वप्न’ वाद्यवृंदासमवेत आपली कला सादर केली.  मोझार्ट या विश्वविख्यात व्हायोलिन वादकाच्या नावाने स्टुटगार्ट येथे उभारण्यात आलेल्या भव्य मोझार्ट अॅम्फीथिएटरमध्ये मोझार्ट यांची जगप्रसिद्ध ‘टर्किश मार्च’ ही धून स्वरस्वप्नच्या बालचमुंनी सादर करून सर्वांना अचंबित केले व टाळ्या वसूल केल्या. स्टुटगार्टमध्ये सौ. व श्री. सारोळकर व स्टुटगार्ट महाराष्ट्र  मंडळाचे  महेंद्रकर  यांनी  याचे आयोजन केले होते. म्युनिकमध्ये म्युनिक महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष  योगेश  वाडकर  आणि सहकाऱ्यांनी उत्तम आयोजन केले. म्युनिक येथे गार्शिगचे  महापौर जर्गन आशेरल आणि  म्युनिकचे महापौर एचिंग सेबास्टियन थालेर हे आवर्जून उपस्थित होते.   

‘स्वरस्वप्न’ वाद्यवृंदात १२ लहान व्हायोलिन वादक मुले-मुली, २ तबला वादक, १ पखवाज वादक, १ साईड रिदम, २ ड्रम वादक यांचा समावेश होता. स्वप्ना दातार यांनी कार्यक्रमाचे दिग्दर्शन व निवेदन हिंदी व इंग्रेजीतून केले. दि. २९ एप्रिल रोजी जर्मनीतील स्टुटगार्ट आणि दि. १ मे या महाराष्ट्र दिनी जर्मनीतील म्युनिक येथे या वाद्यवृंदाने आपली कला सादर केली. या दोन्ही ठिकाणी भव्य अॅम्फीथिएटरमध्ये झालेले कार्यक्रम हाउसफुल झाले होते. ‘स्वरस्वप्न’ वाद्यवृंदाचा 2 तासांचा हा कार्यक्रम दोन भागात सादर करण्यात आला. ‘संधीकाली या अशा’, ‘असा बेभान हा वारा’, ‘सावरे’ अशा अनेक गाण्यांना वन्समोअर मिळाले. देशात अनेक ठिकाणी ‘स्वरस्वप्न’ वाद्यवृंदाचा बाल कलाकारांनी आपल्या कलेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. नुकताच हा वाद्यवृंद पुण्यात परतला अशी माहिती ‘स्वरस्वप्न’च्या संचालिका स्वप्ना दातार यांनी दिली.

सोडले की अटक केले कळतच नाही:सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा-राज ठाकेरेंचे मत

ठाणे-महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा आहे, असे निरीक्षण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात माध्यमांशी बोलताना नोंदवले. तसेच कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जपून राहिले पाहिजे. आधीचे मुख्यमंत्री जपून राहिले नाहीत, म्हणून हे सारे उद्भवले, असा टोलाही त्यांनी हाणला.

राज ठाकरे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मात्र, अनेक प्रश्नांवर उत्तरे देणे टाळले. हा लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकांचा अंदाज घेण्यासाठीचा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले.

राज ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा आलेला निर्णय बराच संभ्रमात टाकणारा आहे. कोर्टाकडून, पोलिसांकडून जेव्हा मला नोटीसा येतात. ती भाषा वाचल्यानंतर कळत नाही की, आपल्याला सोडले आहे की, अटक केले आहे. ती इतकी कॉम्प्लिकिटेड भाषा असते.

राज ठाकरे म्हणाले की, न्यायालय म्हणते सगळी प्रोसेस चुकली. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. विधिमंडळातील गट पक्ष म्हणून समजला जाणार नाही. बाहेरचाच पक्ष म्हणून समजला जाईल. आता निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नाव त्या गटाकडे दिले आहे. त्याचे काय होणार, असा सवाल त्यांनी केला.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, निवडणूक आयोग एक यंत्रणा आहे. सर्वोच्च न्यायालय एक यंत्रणा आहे. आता सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या गोष्टीकडून निवडणूक आयोग काय करणार? असा प्रश्न उपस्थित करत यामुळे या गोष्टी सगळ्या भयंकर संभ्रमात टाकणाऱ्या आहेत. सगळी धूळ खाली बसल्यानंतर आपल्या सगळ्याला कळेल नक्की काय झाले ते, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी जपून राहिले पाहिजे होते, असा सल्ला दिला होता. त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जपूनच राहिले पाहिजे. आधीचे मुख्यमंत्री जपून नाही राहिले म्हणून आज हे सगळे उभे राहिले. त्यामुळे आपण कुठल्या पदावर बसलो आहोत ते पाहून जपून राहिले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे; शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमूख यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त यांचे निलंबन राज्य सरकारने मागे घेतले आहे.

परमबीर सिंह यांचे पोलिस दलातील बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता यासाठी ही कारवाई करण्यात आली होती. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. तत्पूर्वी तत्कालिन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल असे सांगितले होते.

मार्च २०२० मध्ये तत्कालिन मुख्यमंत्र्यांना परमबीर सिंह यांनी पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी अनिल देशमुख यांनी यांनी सचिन वाझे आणि इतर दोन पोलिस अधिकाऱ्यांना शहरातील बार मालकांकडून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचा आदेश दिला होता असा गंभीर आरोप करत खळबळ माजवून दिली होती. परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याविरोधात अनेक तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु झाली होती. त्यानंतर त्यांची कारागृहातून सुटकाही झाली आहे.

खंडणीच्या गुन्ह्यांत फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सुमारे सहा महिन्यांच्या अज्ञातवासानंतर अखेर मुंबईत पोलिसांपुढे शरण आले होते. गुन्हेसर्वोच्च न्यायालयाने सिंह यांना ६ डिसेंबपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळाल्यानंतर सिंह यांनी आपण चंदिगडमध्येच असल्याचे स्पष्ट केले होते.

घटनाक्रम

  • २९ फेब्रुवारी २०२०: महाविकास आघाडी सरकारने १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांची मुंबईचे ४३ वे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली.
  • १८ मार्च २०२१ : विरोधकांच्या आरोपांनंतर महाराष्ट्र सरकारने सिंह यांना पोलीस आयुक्तपदावरून दूर केले. सिंह यांची गृहरक्षक विभागात बदली करण्यात आली.
  • २० मार्च : आयुक्तपदावरून हटवल्यानंतर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्फोटक पत्र लिहून राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुन्हे शाखेचे वादग्रस्त एपीआय सचिन वाझेंना १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला. सिंह यांनी त्यांच्या तक्रारीसह न्यायालयांमध्येही धाव घेतली, त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले. याप्रकरणानंतर देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
  • ७ एप्रिल : अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणात सिंह हे राष्ट्रीय तपास संस्थेसमोर चौकशीला हजर झाले.
  • २८ एप्रिल : सिंह यांच्याविरोधात अकोल्यातील निरीक्षक बी. आर. घाडगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
  • ५ मे : सिंह हे प्रकृतीचे कारण देत ५ मेपासून रजेवर गेले.ते त्यांच्या मूळ गावी चंदीगडला गेले होते. आपल्यावर शस्त्रक्रिया झाल्याचा दावाही त्यांनी केला.
  • २१ जुलै: सिंह आणि काही पोलीस अधिकाऱ्यांनी २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करणाऱ्या भाईंदर येथील विकासक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मरिन ड्राइव्ह पोलिसांनी सिंह यांच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल झाला.
  • २३ जुलै: ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्याने सिंह आणि इतर चार आरोपींविरुद्ध अपहरण, खंडणी, फसवणूक केल्याप्रकरणी तिसरा गुन्हा खल केला़
  • ३० जुलै : व्यापारी केतन तन्ना यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाणे येथील नगर पोलीस ठाण्यात सिंह यांच्याविरोधात चौथा गुन्हा दाखल.
  • २० ऑगस्ट: हॉटेल व्यावसायिक आणि नागरी कंत्राटदार बिमल अग्रवाल यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे सिंह, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि इतर तिघांविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात पाचवा गुन्हा दाखल.
  • १५ नोव्हेंबर: मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी परमबीर सिंह यांना ‘फरारी आरोपी’ म्हणून घोषित करण्यासाठी अर्ज केला.
  • १७ नोव्हेंबर : सिंह यांना फरार घोषित करण्यात आले. त्यानंतर वाळकेश्वर व जुहू येथील घराबाहेर नोटीस लावण्यात आली.
  • २२ नोव्हेंबर : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार, पोलीस महासंचालक संजय पांडे आणि सीबीआय यांना नोटीस जारी करून ६ डिसेंबपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले.
  • २५ नोव्हेंबर: परमबीर सिंह मुंबईत दाखल, गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. गुन्हे शाखेकडून त्यांची चौकशी.
  • २९ नोव्हेंबर : परमबीर सिंह निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगापुढे हजर झाले. यावेळी आयोगाने सिंह यांच्याविरोधात जारी केलेला जामीनपात्र वॉरंट रद्द केला व त्यांच्यावर १५ हजार रुपये दंड ठोठावला. पण यावेळी सचिन वाझे यांची परमबीर सिंग भेट चर्चेचा विषय ठरली. सुमारे तासभर दोघे एकत्र गप्पा मारत होते.
  • २९-३० नोव्हेंबर : ठाण्यातील कोपरी प्रकरणात सीआयडीकडून सलग दोन दिवस चौकशी.
  • २ डिसेंबर : निलंबनाची कारवाई
  • १२ मे २०२३ : निलंबनाची कारवाई मागे.

पुणे वनविभागाकडून बुद्ध पोर्णिमेच्या चांदण्या रात्री प्राणीगणनेत आढळले 313 प्राणी

पुणे-बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पुणे वनविभागार्तंगत निसर्गानुभव – 2023 कार्यक्रम राबविण्यात आला. वनपरिक्षेत्रामध्ये तयार केलेल्या पाणवठयाच्या ठिकाणी लाकडी मचाण तयार करून वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशात प्राणीगणना करण्यात आली. यामध्ये रात्रभर जागे राहून वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने 22 प्रजातींच्या 313 वन्यप्राणी ( प्राणी ,पक्षी) यांच्या हालचालीची नोंद यावेळी घेण्यात आली.

पुणे वनविभाचे भौगोलिक क्षेत्र 7831 चौ.कि. मी असून ‘वनक्षेत्र 873.24 चौ. कि. मी. इतके लाभले आहे. पुणे वनवृत्तातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांनी पुणे वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या इंदापूर, वडगाव मावळ, पुणे, पौंड, शिरोता, बारामती, भांबुर्डा, दौंड या आठ ठिकाणी वनपरिक्रमा करुन ही नोंद घेतली आहे.

यामध्ये प्रामुख्याने चिंकारा, लांडगा, तरस, खोकड, ससा, वानर, रानडुक्कर, भेकर, सांबर, मोर, साळिंदर, कोल्हा, धामणसाप, रानकोंबडा, माकड, चितळ, हरिण, घार, पोपट, मुंगुस, टिटवी, रानमांजर यासारख्या प्राणी पक्ष्यांचे दर्शन झाले. यामध्ये कोणकोणते प्राणी , पक्षी या परिसरात आहेत. त्यांची संख्या किती आहे. याची माहिती मिळाली. तसेच सामान्यांना वने व वन्यजीव याबाबत माहिती मिळावी, या उद्देशाने पुणे वन विभागाच्या वतीने निसर्गानुभव- 2023 हा उपक्रम राबविण्यात आला.

हा उपक्रम हा एन. आर. प्रवीण मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक पुणे, व राहुल पाटील भा.व.से. उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली, सहा. वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, व सहा. वनसंरक्षक मयुर बोठे, सहा. वनसंरक्षक दिपक पवार व सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी व क्षेत्रिय कर्मचारी यांचे सहकार्याने पार पडली.

ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्याची पुण्यातील वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या:

निरूपम जयवंत जोशी याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

पुणे-बीड येथून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका तरुणाने वस्तीगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली असून त्यानुसार एका आरोपीवर चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

राज गर्जे ( वय- 22 )असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील रावसाहेब प्रल्हाद गर्जे (वय- 49 ,रा. पाटस , ता.आष्टी, जिल्हा बीड) यांनी निरूपम जयवंत जोशी या आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. राज गर्जे हा मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेज डेक्कन येथे तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता.

गोखलेनगर येथील एका वसतिगृहात तो राहण्यास होता. त्याच्या ओळखीचा मुलगा निरुपम जोशी यानी त्यास अज्ञात कारणावरून त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने, राज याने वसतिगृहाच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी पोलिसांना मिळून आली आहे.याबाबत चतुर्शिंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले की, राज गर्जे हा विद्यार्थी होता.

त्यांनी मित्रासोबत ५० हजार रुपयांचा आर्थिक व्यवहारात मध्यस्थी केली होती. मात्र ,संबंधित पैसे दिले जात नसल्याने त्याने आत्महत्या केली आहे. याबाबत पुढील तपास साह्यक पोलीस निरीक्षक एस कोळी पुढील तपास करत आहे.

बारा दिव्यांग जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी

सक्षम पुणे महानगर व दिव्यांग कल्याणकारी संस्थेचा पुढाकार; थाटामाटात झाले कन्यादान
पुणे : सनई चौघड्याचा नाद, बँडच्या तालावर वाजत-गाजत निघालेली वरात, रथामध्ये दिमाखात बसलेले नवरदेव,  लाजत मुरडत बोहल्यावर चढणारी नवरी, नटलेली वऱ्हाडी मंडळी, मांडलेला रुखवत, मंगलाष्टकांची सुरावट, डोईवर पडलेल्या मंगल अक्षता अन जोडीदाराशी नजरानजर करताना ओसंडून वाहणारा चेहऱ्यावरचा आनंद अशा थाटामाटाच्या वातावरणात दिव्यांग अकरा जोडप्यांनी रेशीमगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली.
सक्षम पुणे महानगर व दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संशोधन केंद्र, वानवडी यांच्या पुढाकारातून दिव्यांगांचा सामुदायिक विवाह सोहळा थाटामाटात वानवडी येथील संस्थेच्या आवारात पार पडला. दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत, वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत सेवा प्रमुख शैलेंद्र बोरकर, संघचालक रवींद्र वंजारवाडकर, सक्षम पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष ॲड. मुरलीधर कचरे, प्रांत सचिव महेश टांकसाळे, सहसचिव गहिनीनाथ नलावडे, सक्षम पुणे महानगर सचिव दत्तात्रय लखे आदी उपस्थित होते.
दारातील तुळशी वृंदावनापासून ते देवघर, स्वयंपाक घरातील सर्व भांडी, बाथरूममधील साहित्य, सोफा-बेड अशा बारीकसारीक प्रत्येक गरजेच्या वस्तू रुखवतात मांडण्यात आल्या होत्या. १२ जोडप्यांचे यावेळी संपूर्ण थाटामाटात लग्न करून देण्यात आले. पुनीत बालन यांनी सर्व नवविवाहित दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या व संयोजकांचे आभार मानले.
ॲड. मुरलीधर कचरे म्हणाले, “दिव्यांगांच्या आयुष्यात आनंद पेरण्यासाठी चार वर्षांपासून हा उपक्रम घेतला जात आहे. त्यांना परिपूर्ण करण्याचा हा प्रयत्न आहे. यंदा १२ जोडपी विवाहबंधनात अडकली. सक्षम पुणे महानगरच्या मदतीने हा सोहळा केला आहे. दिव्यांगांच्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा हा क्षण आहे.”
सामुदायिक विवाह सोहळ्याचे समन्वयक दत्तात्रय लखे म्हणाले, “दिव्यांगांचा परिचय मेळावा घेत त्यांचे समुपदेशन झाले. उपवरांच्या घरी भेटी देऊन विवाह निश्चित केले. आज प्रत्यक्ष सामान्य जोडप्याप्रमाणे थाटात यांचा संपूर्ण कन्यादानासह विवाह संपन्न झाला. सर्व संसारोपयोगी साहित्य दिले आहे. यासाठी मुख्याध्यापिका शिवानी सुतार, धनश्री बेके, अशोक जव्हेरी, नाना जगदाळे, शिवाजी भेगडे, विजय पगडे, भाऊसाहेब आवटे, किशोर रासकर, रवींद्र बारवकर, सुनिल पाटील या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

नारदीय कीर्तानांनी ;रंगले हरी भजनी संगीत !!

 पुणे-  श्रीहरिकीर्तनोत्तेजक सभेच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही देवर्षि श्रीनारद जयंती उत्सव दिमाखात पार पडला असून एकूण ५ दिवसीय ५ सत्रांत हा उत्सव उत्साहात पार पडला शुक्रवार दि. 5 मे 2023 ते मंगळवार दि. 9 मे 2023 पर्यंत हा उत्सव होता.संस्थेच्या श्री नारद मंदिरात ‘कीर्तन महोत्सव’ उत्साहात संपन्न झाला.

     सत्र १ मध्ये शुक्रवार दि.5 मे 2023 रोजी ह.भ.प.श्री. संदीपबुवा मांडके (पुणे) यांचे मंगलाचरणाचे कीर्तन झाले त्यांना संवादिनीची साथ वरद सोहनी यांनी केली तर तबल्यावर सिद्धार्थ कुंभोजकर याची साथ लाभली.

     सत्र २ मध्ये शनिवार दि.6 मे 2023 रोजी  नारद जयंतीच्या दिवशी ह.भ.प.श्री. मनोहरबुवा दीक्षित (संभाजीनगर) या ज्येष्ठ कीर्तनकारांच्या कीर्तनाने महोत्सवात अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण केले.’भाव तोची देव’ आणि ‘गोपी प्रेम’ त्यांनी हे पूर्वरंग – उत्तररंग मांडले. या निमित्ताने तबल्याची साथ सिद्धिविनायक पैठणकर, आणि संवादिनीची साथ वरद सोहनी यांनी केली. झांजेची साथसंगत ह.भ.प तन्मयी मेहेंदळे यांनी केली.

    सत्र ३ मध्ये रविवार दि.7 मे 2023 रोजी ह.भ.प. डॉ. अवंतिका टोळे (पुणे) यांनी ‘ज्याचा सखा हरी’ हा पूर्वरंग आणि ‘कृष्णसुदामा’ हे आख्यान सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.त्यांना तबल्याची साथ ह.भ.प निवेदिता मेहेंदळे आणि संवादिनीची साथ ह.भ.प रेशीम खेडकर यांनी केली.

    सत्र ४ मध्ये सोमवार दि.8 मे 2023 रोजी ह.भ.प. शिवानी वझे (गोवा) यांनी आपल्या कीर्तनातून नाम महात्म्य सांगून उपस्थितांना जागीच खिळवून ठेवले आणि गोकर्ण आख्यानाने आणि सफाईदार आवाजाने सर्वांची मने जिंकली.झांज साथ ह.भ.प पूर्वा काणे यांनी केली.

     अंतिम सत्र म्हणजे सत्र पाच मधील महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ,मंगळवार दि. 9 मे 2023 रोजी ह.भ.प कीर्तनकलानिधी व हरीकीर्तान्नोतेजक सभेचे अध्यक्ष रामचंद्रबुवा भिडे (पुणे) यांचे लळीताचे कीर्तन झाले त्यांनी यावेळी ‘ऐश्या दात्या विसरावे’ या अभंगावरील निरुपणाने भक्तिमय वातावरण निर्माण करून विष्णूमय जगताचा आभास उपस्थितांना करून दिला. त्यात भाजी वाले , चहावाले , लोककलेचे प्रतिक वासुदेव ,डॉक्टर अशी वैविध्यपूर्ण पात्रे त्यांनी व शिष्यवर्गाने सादर करून उपस्थितांना महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेतून लोककलेचे मार्मिक दर्शन घडवले.

   यावेळी भिडे यांना तबल्यावर शिवराज बोधने ,संवादिनीवर साहिल पुंडलिक आणि सह गायनाची साथ ह.भ.प श्रेयसबुवा कुलकर्णी आणि ह.भ.प गौरी घाटनेकर यांनी केली.

   संपूर्ण ५ दिवसीय महोत्सवात देवर्षी नारदांचे आरती गायन ह.भ.प मंदारबुवा गोखले आणि ह.भ.प सुषमा गोखले यांनी केले. या कार्यक्रमास हरीकीर्तानोत्तेजक सभेचे सर्व पदाधिकारी आणि देणगीदार , आश्रयदाते आणि कीर्तनप्रेमी रसिकांची तुडुंब गर्दी झाली.

मला पार्श्वगायिका म्हणून घडवणाऱ्या सर्वांची मी आयुष्यभर ऋणी-पुष्पा पागधरे

पुणे-पालघर जिल्ह्यातील सातपाटी हे माझे छोटे जन्मगाव. माझे वडील जनार्धन चामरे हे लोकप्रिय भजन गायक होते. त्यांची भजने ऐकून लहान वयापासून मी भजने गाऊ लागले. गावातील संगीत गुरु आर. डी. बेंद्रे यांनी शास्त्रीय संगीताचे धडे दिले. मुंबईत उस्ताद जनाब अब्दुल रहमान खान यांचे मार्गदर्शन मला लाभले, मुंबई आकाशवाणीची कलाकार बनले आणि ज्येष्ठ संगीतकार राम कदम यांनी मला ‘देवी तुझी सोन्याची – जेजुरी’ या चित्रपटात प्रथम पार्श्वगायनाची संधी दिली. माझ्यासारख्या छोट्या गावातील कोळी समाजातील मुलीला गायिका म्हणून घडवणाऱ्या आणि पार्श्वगायिका म्हणून संधी देणाऱ्या सर्वांची मी आयुष्यभर ऋणी आहे असे उद्गार ज्येष्ठ पार्श्व गायिका पुष्पा पागधरे (मुंबई) यांनी आज काढले. संगीताला समर्पित ‘स्वरप्रतिभा’ दिवाळी अंक आणि ‘कोहिनूर’ ग्रुप यांच्या तर्फे त्यांना पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद येथे झालेल्या कार्यक्रमात ‘स्वरप्रतिभा – कोहिनूर’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी नीलिमा बोरवणकर यांनी घेतलेल्या मुलाखतीवेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार होते. मंचावर पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष व कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयलआणि ‘स्वरप्रतिभा’चे संपादक व संयोजक प्रवीण प्र. वाळिंबे होते. ११,००० रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.   

प्रारंभी युवा गायिका तन्मयी मेहेंदळे यांनी प्रार्थना सादर केली. कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले, १९८६ मध्ये ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ हे गाणे पुष्पा ताईनी गायिले. युट्युबवर सुमारे पावणेदोन कोटी रसिकांनी हे गाणे ऐकले / पाहिले ही निश्चितच कौतुकाची बाब आहे.

पुष्पा पागधरेंनी मुलाखतीत अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ हे गीतकार अभिलाष व संगीतकार कुलदीप सिंग यांनी स्वरबद्ध केलेले गाणे सुषमा श्रेष्ठ समवेत ‘अंकुश’ चित्रपटासाठी मी गायिले. अभिनेते नाना पाटेकर यांचा हा पहिलाच चित्रपट! मात्र या चित्रपटाला मुंबईत चित्रपटगृह मिळेना. कारण अभिनेता, गीतकार, संगीतकार सर्वच नवे होते. अखेरीस निर्माते एम. चंद्रा यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी ताबडतोब कोहिनूर चित्रपटगृहाला फोन करून या चित्रपटासाठी एक आठवडा मिळवून दिला. मात्र एक आठवडा नव्हे तर अनेक महिने हा चित्रपट हाउसफुल होत राहिला आणि त्यातूनच ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ हे गाणे लोकप्रिय होत गेले. बाळासाहेब ठाकरे यांची मी सदैव ऋणी आहे असे त्या म्हणाल्या.  

एका प्रश्नाला उत्तर देतांना पुष्पा पागधरे म्हणाल्या, सध्या आकाशवाणीवरील कार्यक्रम बंद आहेत, त्यामुळे अनेक कलाकारांना गायन, वादनाची संधी मिळत नाही त्यामुळे तुटपुंज्या उत्पन्नावर  ते जगत आहेत. ज्येष्ठ कलावंतांसाठी असणारी पेन्शनही खूप कमी आहे. शासनाने अशा कलावंतांसाठी अजून काहीतरी केले पाहिजे अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.  

अध्यक्षीय भाषणात उल्हास पवार म्हणाले की, ‘पूर्वीच्या काळी १९६० – १९९० दशकांमध्ये अनेक कलापथके असायची. कॉंग्रेस सेवादल, राष्ट्र सेवादल, कम्युनिस्ट पक्ष अशा कलापथकांमधून पुढे अनेक कलाकार तयार झाले, शाहिर तयार झाले. भजन मंडळीही खूप असायची. ज्येष्ठ संगीतकार स्नेहल भाटकर यातूनच पुढे आले. आज महाराष्ट्रात अनेक कलाकार प्रकाशझोतापासून दूर आहेत, उपेक्षित आहेत. अशांची महाराष्ट्र सरकारने दाखल घ्यायला हवी असा ते म्हणाले.

पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले की, ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ हे प्रेरणागीत गात आम्ही मोठे झालो. त्यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली ही आनंदाची बाब आहे. पुष्पा पागधरे यांना ‘पद्मश्री’ मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा असे ते म्हणाले.

याप्रसंगी नीलिमा बोरवणकर यांनी सूत्रसंचालन केले तसेच पुष्पा पागधरे यांची मुलाखत घेतली. नीलिमा बोरवणकर व त्यांच्या मॉडर्न हायस्कूलच्या माजी विद्यार्थीनिंनी कृतज्ञता म्हणून आठ हजार रुपेयांचा चेक याप्रसंगी पुष्पा पागधरे यांना टाळयांच्या कडकडाटात दिला. श्रुती तिवारी यांनी आभार मानले.

निर्मल, हरित आणि आनंददायी पालखी सोहळ्यासाठी नियोजन करा- विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत आणि निर्मल व हरित वारीसोबत हा सोहळा वारकऱ्यांसाठी आनंददायी होईल यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुण्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त वर्षा लड्डा आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. निर्मल आणि हरित वारीवर भर देऊन त्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात येत आहे. जी-२० बैठकीसाठी १५० पेक्षा अधिक प्रतिनिधी यादरम्यान पुण्यात मुक्कामाला असणार आहेत. या प्रतिनिधींना राज्याच्या या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची माहिती देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखी मार्गावरील रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती करावी. जिल्हा परिषदांनी शौचालयाची सातत्याने स्वच्छता होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

पालखी सोहळा नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर बैठका घेण्यात आल्याचे सांगून श्री.राव म्हणाले, पालखी मार्ग आणि पालखी तळावरील विविध सुविधांसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. रस्ते दुरुस्ती, सपाटीकरण, अतिक्रमण काढणे, वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबतही आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने वारीच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी मोबाईल ॲप चा उपयोग करावा, अशी सूचना त्यांनी दिली. वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मनपा आयुक्त श्री.सिंह म्हणाले, सोहळ्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालखी तळावरील स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही, ६९२ तात्पुरती शौचालये आणि ५८ तात्पुरत्या स्नानगृहांची सुविधा करण्यात आली आहे. पालखीच्या स्वागताची तयारीदेखील करण्यात आली आहे.

श्री.फुलारी म्हणाले, पालखी सोहळ्यासोबत वायरलेस यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येईल. बंदोबस्तासाठी अनुभवी पोलीस अधिकारी नेमण्यात येतील. स्थानिक पोलीस प्रशासनाशी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, नीरा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. पालखी मार्गावर मदत केंद्र उभारण्यात येत आहे. पालखी तळावरील आवश्यक सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्ती आणि स्वच्छता तसेच आरोग्य सुविधांबाबत नियोजन करण्यात आले आहे.

सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे म्हणाले, पालख्याच्या मुक्काम आणि रिंगणाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा करण्यात आली आहे. घटना प्रतिसाद प्रणाली कार्यरत करण्यात आली असून ३१ आपत्ती प्रतिसाद केंद्र उभारण्यात येणार आहे. नियोजनासाठी ९ स्वयंसेवी व सामाजिक संस्थांचे १ हजार ९०० स्वयंसेवक मदतीला असतील. संपूर्ण सोहळ्यादरम्यान २५ हजार ५०० अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. या सर्वांना यशदा मार्फत प्रशिक्षण देण्यात येईल.

आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक साधनसामग्री तयार ठेवण्यात आली आहे. पाणी पुरवठ्यासाठी ४९ टँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालखी मार्गावर गॅस वितरणासाठी ३० ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असून २६ हजार शौचालयांची व्यवस्था करण्यात येईल. दर्शन रांगेचे नियोजन आणि लाईव्ह दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे, वारकऱ्यांच्या निवासासाठी ६५ एकर क्षेत्रात नियोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी पुणे जिल्ह्यातील पूर्वतयारीची माहिती दिली. त्या म्हणाल्या, पालखी तळावर आवश्यक सुविधा करण्यात येत आहे. पालखी मार्गावर अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्यात येत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालखी तळ, विसाव्याची ठिकाणे आदी ठिकाणी भेट देऊन आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण पालखी सोहळ्यादरम्यान आवश्यक आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येतील.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, यावर्षी २ हजार ७०० तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती असेल. वैद्यकीय उपचारासाठी रुग्णवाहिका, मोटार सायकलवर आरोग्यदूतांची नेमणूक आणि पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. पिण्याच्या पाण्याचे ७० टँकर उपलब्ध करून देण्यात येतील. निर्मल वारीसाठी आवश्यक उपाय केले जातील असे त्यांनी सांगितले.

बैठकीस पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, पालखी सोहळ्याचे प्रमुख पदाधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वाढत्या नवी मुंबईच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाने अधिक सक्षम व्हावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे : देशाच्या 65 टक्के डेटा सेंटर हे नवी मुंबईत असून डेटा सेंटरचे हे मोठे हब आहे. मोठ्या प्रमाणात येथे गुंतवणूक येणार आहे. विमानतळ, इतर पायाभूत सुविधांमुळे नवी मुंबईत तिसरी मुंबई तयार होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई आयुक्तालयाचे महत्त्व येत्या काळात आणखी वाढणार आहे. नवी मुंबई पोलिसांना वाढत्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भविष्याच्या दृष्टीकोनातून अधिक सक्षम आणि अत्याधुनिक व्हावे लागणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत महिला सुरक्षा प्रकल्पाअंतर्गत नेरुळमधील सेक्टर 7 येथे उभारलेल्या महिला सहाय्यता कक्ष, सायबर पोलीस ठाणे तसेच महिला सुरक्षा प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार मंदा म्हात्रे, आमदार सर्वश्री गणेश नाईक, रमेश पाटील, महेश बालदी, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त किशन जावळे, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, दिग्दर्शक रोहित शेट्टी, पोलीस सहआयुक्त संजय मोहिते, संजय पडवळ आदी उपस्थित  होते.

यावेळी वाशी येथील सिडको प्रदर्शनी भवनात झालेल्या कार्यक्रमात निर्भया पथकासाठी दिलेल्या 10 चारचाकी व 40 दुचाकी वाहनाचे उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले. नवी मुंबई पोलिसांसाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी निर्मिती केलेल्या निर्भया पथकावरील लघुपटाचे अनावरण उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमासाठी सहकार्य केलेल्या संस्था व व्यक्तींचा उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नवी मुंबई आयुक्तालयामार्फत नेरुळ येथे सावली सुरक्षितता उपक्रमांतर्गत महिला सहाय्यता कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या सहाय्यता कक्षामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसंबंधित सर्वच बाबी एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.  हा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई पोलिसांचे अभिनंदन केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, निर्भया हत्याकांड प्रकरणानंतर देशभरात महिलांच्या सुरक्षिततेबाबत मोठ्या प्रमाणात सजगता निर्माण झाली. राज्यात महिलांसंदर्भातील कायदे कडक करण्यात आले आहेत. आता महिलांसंदर्भातील तक्रारींची दखल तत्काळ घेण्यात येत असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. महिलासंदर्भातील गुन्हे वाढले असले तरी अशा गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी महिला पुढे येत आहेत, ही महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे अशा मानसिक रुग्ण असलेल्या गुन्हेगारांवर जरब बसविण्यात येत आहे. देशातील महानगरांमध्ये मुंबई सारखे सुरक्षित महानगर दुसरे नाही. मुंबई आणि नवी मुंबई सारख्या शहरांमध्ये पोलिसांच्या मदतीमुळे व निर्भया पथकामुळे सामान्य महिलांना येथे सुरक्षित वाटते. इथल्या सतर्क आणि सक्षम पोलीस यंत्रणेमुळे या शहरांमधील महिला रात्री उशीरापर्यंत एकट्या प्रवास करू शकतात. महिला अडचणीत असल्याचे पोलिसांना कळविल्यानंतर तातडीने प्रतिसाद मिळतो. निर्भया पथकांमुळे प्रतिसादाची वेळ अधिक चांगली होईल.

स्मार्ट पोलिसिंग व तंत्रज्ञानाचा वापर वाढवायला हवा – गृहमंत्री

गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यातील मोठ्या शहरांमध्ये सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले. कमांड अँड कंट्रोल सिस्टीम सुरु केली आहे. यामुळे पोलिसिंगमध्ये गुणात्मक बदल झाला आहे. तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा आहे. सर्वच गोष्टी पोलिसांच्या संख्येने नियंत्रित करता येत नाही. आपला देश मोठा आहे, आपली शहरे मोठी आहेत, तेथील आव्हाने वेगवेगळी आहेत. तंत्रज्ञानाचा व स्मार्ट पोलिसिंगचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. तंत्रज्ञानाधारित यंत्रणा वापरायला हवी. आजच्या काळात समाज माध्यम व डिजिटल माध्यमांमुळे आव्हाने वाढली आहेत. भविष्यात सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात होतील. त्यासाठी सायबर कक्षाकडे महत्त्वाचा घटक म्हणून पहायला हवे. गुन्ह्यांमध्ये तांत्रिक पुरावे हे अधिक महत्त्वाचे असतात. त्यामुळे अशा पुराव्यांचा उपयोग करून गुन्हे सिद्धीचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. महिलांच्या संदर्भातील गंभीर गुन्ह्यांमध्ये आता 90 दिवसांमध्ये चार्जशीट पाठविण्याचे प्रमाण 60 टक्क्यांवर आहे ते 90-95 टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. महिलांविषयक खटल्यांमधील न्यायालयीन निर्णय लवकरात लवकर व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असून राज्यात जलदगती न्यायालयाची संख्या वाढविण्याचाही प्रयत्न सुरु असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

एखाद्या महिलेला त्रासातून, चुकीच्या गोष्टीतून बाहेर काढले तरी तिला समाजात योग्य स्थान मिळावे, त्यांना चांगले जीवन जगण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शक्ती सदन ही योजना राबविण्यात येत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातही 50 शक्तीसदन उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शक्ती सदनात येणाऱ्या महिलांना तीन वर्ष राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्यात येणार असून, त्या ठिकाणी त्यांचे समुपदेशन करण्यात येईल, त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. यामुळे अशा पीडित महिलांना नवीन संधी उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पोलीस महासंचालक रजनीश शेठ म्हणाले की, महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस सातत्याने कटिबद्ध आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना पोलीस दलातर्फे करण्यात येत आहेत. महिला सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलिसांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. पीडित महिलांना मदत मिळावी, यासाठी  पोलीस ठाणेस्तरावर कौटुंबिक हिंसाचार, अत्याचारग्रस्त महिलांचे समुपदेशन व कायदेविषयक सल्ला उपलब्ध करून देणे असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. अत्याचार पीडितांना समुपदेशन देण्यासाठी विधी सल्लागार व महिला अधिकारी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पोलीस ठाण्यात पीडित महिलांना योग्य वागणूक व मदत मिळावी, यासाठी राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यात महिला सहाय्यता कक्ष निर्माण करण्यात येतील. गुन्हे रोखण्यासाठी व उकल करण्यासाठी प्रत्येक शहरातील खासगी सीसीटीव्ही हे पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला जोडणे आवश्यक आहेत, असेही श्री. शेठ यांनी सांगितले.

दिग्दर्शक रोहित शेट्टी म्हणाले की, आज महिला सुरक्षा हा विषय महत्त्वाचा आहे. महिलांसोबत काही अनुचित प्रकार घडत असल्यास नवी मुंबई पोलिसांच्या डायल 112, निर्भया पथकाला कळवावे. नवी मुंबई पोलीस सदैव तुमच्या मदतीसाठी तत्पर आहेत. महिला सहाय्यता कक्ष अहोरात्र तुमच्या संरक्षणासाठी तयार आहे. पोलिसांच्या मदतीसाठी आम्ही नेहमी तयार आहोत.

प्रास्ताविकात पोलीस आयुक्त श्री. भारंबे यांनी महिला सुरक्षा प्रकल्पाची माहिती दिली. श्री. भारंबे म्हणाले की, नवी मुंबई पोलीसांच्या निर्भया पथकासाठीच्या वाहनांचे लोकार्पण आज झाले. येत्या दोन महिन्यात आणखी 10 चारचाकी व दुचाकी वाहने देण्यात येणार आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याला प्रत्येकी एक निर्भया वाहन मिळणार आहे. गर्दीची ठिकाणे, मुलींची छेडछाड होणाऱ्या भागात ही वाहने गस्त घालत राहतील. डायल 112 उपक्रमास नवी मुंबईत चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवी मुबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे तिथे येणाऱ्या सर्व महिलांना सर्वतोपरी मदत केली जाईल. जिल्हा नियोजन समितीमधून पोलिसांसाठी वाहने दिली जातात.

यावेळी सहायक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी सूत्रसंचालन केले. सावली इमारतीमध्ये महिला सहाय्यता कक्ष असून तेथे महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच याच इमारतीमध्ये सायबर पोलीस ठाणेही स्थापन करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पांची पाहणी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

रस्त्यावर पडणाऱ्या पावसापासून भूजल पुनर्भरणाचा ‘लातूर पॅटर्न’ राज्यभर राबविणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

रस्त्यांच्या कामांविषयी तक्रारींचा तातडीने निपटारा करावा

लातूर, : रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरवून भूजल पुनर्भरणाचा ‘लातूर पॅटर्न’ अतिशय उपयुक्त आहे. राज्यात यापुढे रस्त्यांची कामे करताना हा पॅटर्न सर्वत्र राबविण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे सांगितले. तसेच पावसाळ्यापूर्वी विभागातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित औरंगाबाद आणि नांदेड सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे, नांदेड सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता बसवराज पांढरे, दक्षता व गुणनियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. एस. भगत, उस्मानाबाद मंडळाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, औरंगाबाद मंडळाचे अधीक्षक अभियंता विवेक बडे, नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. एच. राजपूत, लातूर मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, नांदेड सार्वजनिक बांधकाम विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता ए. बी. चौगुले, लातूरचे कार्यकारी अभियंता एम. एम. पाटील, देवेंद्र निळकंठ यावेळी उपस्थित होते.

रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरवून भूजल पुनर्भरण करण्यासाठी लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून तयार केलेले मॉडेल अतिशय उपयुक्त आहे. या उपक्रमामुळे रस्त्यावर पावसाचे पाणी जमा न होता, त्याद्वारे भूजल पुनर्भरण होईल. त्यामुळे भूजल पातळीत वाढ होवून शेतीला मदत होईल. तसेच रस्त्याचे जीवनमान वाढेल. त्यामुळे राज्यात नव्याने मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये या उपक्रमाचा समावेश केला जाईल. मराठवाडा, विदर्भासह पाणीटंचाईची समस्या जाणवणाऱ्या इतरही जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी प्राधान्याने करण्यात येईल, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम’ (पीएमआयएस) प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक कामाची विविध टप्प्यावरील माहिती, तसेच काम पूर्ण झाल्यानंतर व्हिडीओ, छायाचित्रे अपलोड करणे आवश्यक आहे. सर्व अधिकाऱ्यांनी या प्रणालीवर अद्ययावत माहिती अपलोड करावी. रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत, कामांच्या दर्जाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेवून त्याचा निपटारा करावा. तक्रारींची पडताळणी करून त्याबाबतची वस्तुस्थिती संबंधितांना अवगत करावी, असे श्री. चव्हाण यावेळी म्हणाले. अर्थसंकल्पीय कामे, तसेच योजनेतर कामे प्रलंबित राहू नयेत, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या औरंगाबाद आणि नांदेड प्रादेशिक विभागात सन 2022-23 मध्ये पूर्ण झालेले रस्ते, पूल आणि शासकीय इमारती, तसेच अर्थसंकल्पीय कामांची सद्यस्थिती, प्रगतीपथावर असलेल्या कामांची सद्यस्थिती, तसेच नवीन मंजूर कामांचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी घेतला. तसेच निवेदेच्या मंजूर किंमतीपेक्षा अधिक खर्च टाळण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

मुख्य अभियंता श्री. उकिर्डे यांनी औरंगाबाद प्रादेशिक विभागांतर्गत कामांचे, तसेच मुख्य अभियंता श्री. पांढरे यांनी नांदेड प्रादेशिक विभागांतर्गत कामांची माहिती सादर केली. लातूर मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांनी ‘रेन रोड वॉटर हार्वेस्टिंग’ उपक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन भास्कर कांबळे यांनी केले.

करिअर मार्गदर्शनासाठी लवकरच संकेतस्थळाची निर्मिती – कौशल्य, रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : ‘‘कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार, करिअर निवड, प्रवेश प्रक्रिया, विविध अभ्यासक्रम आदींविषयी अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना असतात. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर संबधी दिशा देण्याचे काम केले जात आहे. विद्यार्थ्यांचे करिअर विषयक विविध प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच संकेतस्थळाची निर्मिती केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांचे समाधान तातडीने उपलब्ध होईल’’,  असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज केले.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन एसएनडीटी विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात झाले.

शिबिर उद्घाटनावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना मंत्री श्री. लोढा बोलत होते. व्यासपीठावर एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, व्यवसाय व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी, उपसंचालक राजेंद्र संखे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, इयत्ता 10 वी 12 वी नंतर पुढे काय संधी उपलब्ध आहेत त्याच्या मार्गदर्शनाबाबत हे शिबीर आहे. विभाग निर्माण करीत असलेल्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन आपले प्रश्न नोंदवायचे आहेत. त्या प्रश्नांना ऑनलाईनच उत्तरे देण्याची व्यवस्था असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे करिअर विषयक प्रश्नांचे समाधान तातडीने होईल.

कुलगुरू डॉ. चक्रदेव म्हणाल्या की, आपणाला जे आवडते व जे नाही आवडत, ते ठरवून करिअरचा मार्ग निवडावा. पुढील पाच वर्षात आपण कुठे राहू, याचाही विचार करावा. तुमच्यामुळे भविष्यातील भारत घडणार आहे. त्यामुळे तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. विचार हे मनुष्याचे व्यक्तिमत्व घडवित असतात. त्यामुळे चांगले, प्रेरक विचार असावेत. आपल्या विचारांतून कार्य होत असते. विचार केवळ स्वत:साठी करावयाचा नसून समाजाच्या कल्याणासाठी विचार करावा. त्या पद्धतीचे करीअर निवडावे.

मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यामागील भूमिका प्रास्ताविकात संचालक श्री. दळवी यांनी सांगितली.

इम्रान खान अटक: न्यायपालिकेच्या इतिहासातील सर्वात निंदनीय घटना;इम्रान खान आज इस्लामाबाद हायकोर्टात हजर होणार

इस्लामाबाद-

पाकिस्तान सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश उमर अता बांदियाल यांनी गुरुवारी सायंकाळी ऐतिहासिक निर्णय देत माजी पंतप्रधान इम्रान यांना झालेली अटक बेकायदेशीर ठरवत एक तासाच्या सुनावणीनंतर सुटकेचे आदेश दिले. अटकेच्या ४८ तासांच्या आतच इम्रान खान यांची सुटका करत बांदियाल म्हणाले, हायकोर्ट परिसरातून केलेली अटक न्यायपालिकेच्या इतिहासातील सर्वात निंदनीय घटना आहे. ते म्हणाले, इम्रान यांच्या बेकायदेशीर अटकेनंतर ज्या प्रकारे अराजकता माजली ते योग्य नव्हते. आम्हाला देशात शांतता हवी आहे. कोर्टाच्या निकालानंतर भेदरलेले पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी लष्कर प्रमुख असिम मुनीर यांच्यासोबत आणीबाणीची बैठक बोलावली आहे. इम्रान यांना मंगळवारी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरोने ट्रस्टशी संबंधित घोटाळ्यात अटक केली होती. ते एनबीएच्या कोठडीत होते.

इम्रान खान आज इस्लामाबाद हायकोर्टात हजर होतील, पक्षाची बैठक बोलावण्याची शक्यता
इम्रान पोलिस विश्रामगृहातून शुक्रवारी थेट इस्लामाबाद हायकोर्टात हजर होतील. येथे त्यांनी तोशाखाना प्रकरणी जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांची अटक योग्य ठरवणारे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आमिर फारूक आता इम्रानच्या केसची सुनावणी करणार नाही. इम्रान खान भावी रणनीतीसाठी आपल्या पक्षाची लवकरच बैठक बोलावणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुप्रीम कोर्टात हजर झाले असता इम्रान गुरुवारी म्हणाले होते, मला देशामध्ये निष्पक्ष निवडणुका हव्या आहेत. पाकमध्ये ऑक्टोबरपर्यंत निवडणुका होणे निश्चित आहे, असे सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेवरून दिसते.

सरन्यायाधीश (सीजे) बांदियाल इम्रानला म्हणाले, तुमच्या समर्थकांचा हिंसाचार चुकीचा होता. आपल्या विरोधकांशी चर्चा करून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला बांदियाल यांनी इम्रान यांना दिला. ते म्हणाले, पाकमध्ये राजकीयदृष्ट्या समाज विभागला आहे. लोकांचा संताप एवढा वाढला होता की माझ्या घरावरही हल्ला होऊ शकतो, असे मला सांगण्यात आले.

सरन्यायाधीशांनी आता इम्रानच्या पक्षात प्रवेश करावा... पीएमएलएनच्या मरियम नवाज म्हणाल्या, ६० अब्जांच्या घोटाळेबाजाची सुटका केल्यानंतर आता बांदियाल यांनी आपल्या सासूप्रमाणे इम्रानच्या पक्षात प्रवेश केला पाहिजे.

न्या. बांदियाल यांनी एप्रिल २०२२ मध्ये असेम्ब्लीच्या उपसभापतींचा निर्णय फिरवत तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांना अविश्वास प्रस्तावाचा सामना करण्याचे आदेश दिले होते. बहुमत नसल्याने इम्रान यांना सत्ता गमवावी लागली होती.
२००७ मध्ये मुशर्रफ यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर बांदियाल यांनी विरोधासाठी हायकोर्ट जज म्हणून शपथ घेण्यास नकार दिला होता.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात १०१ तक्रारींचे निराकरण

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात कांदिवली येथील आर दक्षिण वॉर्ड येथे आज 1 हजार 355 तक्रारी प्राप्त झाल्या असून जागीच 101 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारींचे देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.

दिनांक 12 मे रोजी  एन वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही  करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते 5.30 या वेळेत  सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9  या लिंकवर जाऊन माहिती भरता येऊ शकते.