पुणे : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन त्या व्यावसायिकाचे अपहरण करुन मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गज्या मार्नेच्या टोळीतील फरार झालेल्या सराईत गुंड रुपेश मारणे याला त्याच्या साथीदारासह मुळशीतून अटक करण्यात आली.रुपेश मारणे आणि संतोष शेलार अशी अटक केलेल्या दोघा फरार गुंडाची नावे आहेत. सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन त्यासाठी व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याला मारहाण केल्या प्रकरणी कुख्यात गुंड गज्या मारणे याच्यासह १५ जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाई केली. तसेच त्यांना आश्रय देणाऱ्यांवरही मोक्का कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला होता. त्यानंतर सातारा येथून गज्या मारणे याला पोलिसांनी अटक केली असली तरी रुपेश मारणे व त्याचे साथीदार फरार होते.
त्यानंतर रुपेश मारणे याने आणखी एका व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला होता.एका व्यावसायिकाने बांधकाम व्यवसायासाठी १ कोटी ८५ लाख रुपये घेतले होते.त्या बदल्यात २ कोटी ३० लाख रुपये परत दिले होते. तरीहीआणखी ६५ लाखांची मागणी करुन या व्यावसायिकाला धमकाविले जात होते.याप्रकरणी रुपेश मारणेसह चौघांवर नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.या दोन्ही गुन्ह्यात पोलीस रुपेश मारणे याचा शोध घेत होते.मुळशी परिसरात तो असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून रुपेश व संतोष शेलार दोघांना पकडले.