Home Blog Page 1544

२९ कोटी रुपयांचे भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त

मुंबई, दि.5 : अन्न व औषध प्रशासनामार्फत खाद्यपदार्थांचा दर्जा खात्रीशीर रहावा तसेच ग्राहकांना सुरक्षित व आरोग्यदायी अन्नपदार्थ मिळावे यासाठी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. या तपासणी मोहिमेंतर्गत टीटीसी इंडस्ट्रियल एरिया येथे धाड टाकून परदेशातून आयात करण्यात आलेला 29 कोटी रुपयांचा भेसळयुक्त अन्न पदार्थ साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली आहे.

नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होण्याकरिता अन्न व औषध प्रशासनामार्फत अन्न आस्थापनांच्या तपासण्या व अन्न नमुने तपासणीचे काम सुरू आहे. अन्न आस्थापना व कोल्ड स्टोरेज व गोदामांमध्ये अचानक भेट देऊन धाड टाकण्यात आली. या दरम्यान 29 कोटी रूपयांची आयात करण्यात आलेल्या अन्न पदार्थांची जप्ती करण्यात आली आहे. यामध्ये मे. सावला फूड्स ॲण्ड कोल्ड स्टोरेज प्रायवेट लिमिटेड डी-39, व सावला फूड्स अॅड कोल्ड स्टोरेज प्रायवेट लिमिटेड डी-514, टीटीसी इंडस्ट्रीअल एरिया, MIDC तुर्भे, या पेढ्यांमधून अन्न पदार्थाचे एकूण ३५ नमुने विश्लेषणासाठी घेऊन त्यांचा उर्वरित साठा जप्त करण्यात आला आहे.

साठवणूक केलेल्या काही अन्न पदार्थांचा दर्जा निकृष्ट असल्याने व कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने तसेच अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण झाल्याने ही मोहिम राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन संबंधित अन्न पदार्थांचा उर्वरित साठा जप्त करून परवाना धारकांच्या ताब्यात पुढील आदेश होईपर्यंत ठेवण्यात आलेला आहे.  जप्त करण्यात आलेले सर्व अन्न नमुने हे अन्न विश्लेषक, अन्न चाचणी प्रयोगशाळा, मुंबई येथे विश्लेषणासाठी पाठविण्यात आलेले असून विश्लेषण अहवाल प्रथम प्राधान्याने देण्याबाबत कळविण्यात आले आहे. तपासणी अहवालामध्ये आढळून आलेल्या गंभीर त्रुटींबाबत तपासणी अहवाल संबंधित सहायक आयुक्त (अन्न), ठाणे यांना पुढील योग्य त्या कायदेशीर कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहेत.

राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आहे -शरद पवार

शिर्डी: तुम्ही राज्यभरातून मोठ्या संख्येनं आला आहात. शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही सर्वांचं म्हणणं ऐकून घेत आहात. राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आहे.

ही संधी लवकर मिळेल असी आशा आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व नेते शरद पवार म्हणाले.
मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू असतानादेखील शरद पवार यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात हजेरी लावली. तेव्हा ते बोलत होते.
यावेळी शरद पवार यांच्या हाताला बँडेज असल्याचे दिसून आले. तर चेहऱ्यांवर आजारपणामुळे थकवा दिसून येत होता. पवार यांनी पाच मिनिटे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पवार यांचे भाषण वाचून दाखवले.
शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा सुरू आहे. यावेळी पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. शरद पवार म्हणाले की, डॉक्टरांनी आपल्याला 10 ते 15 दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. या 15 दिवसानंतर नियमित कामकाजाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचा लहान कार्यकर्त्यांचा पक्षाच्या विकासात सहभाग आहे ही समाधानाची बाब असल्याचे पवार यांनी सांगितले.
शिर्डीच्या कार्यक्रमानंतर शरद पवार पुन्हा एकदा मुंबईत परतणार असून ते ब्रीच कँडी रुग्णालयात भरती होणार आहेत. त्यांच्यावर अजून दोन चार दिवस उपचार होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आयुष क्षेत्राची बाजारपेठ जगभरात 18 अब्ज 2 कोटी अमेरिकन डॉलर्सवर पोहोचण्यात यशस्वी – केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल

पुणे-

वेगवेगळ्या वैद्यकीय शाखांनी अनेक आजारांवर यशस्वीपणे मात केल्यामुळे आज आयुष मंत्रालयाची लोकप्रियता, विश्वासार्हता आणि स्वीकार्यता जागतिक पातळीवर वाढली आहे, असे आज केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले. त्यांनी आज पुण्यातील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

परंपरागत चिकित्सा पद्धतीला लोकांनी जोडलेले राहणे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहणे हा ‘हर दिन हर घर आयुर्वेद’ या उपक्रमाचा मूळ हेतू आहे. निसर्गात जी संपदा, आणि शक्ती आहे त्याची माहिती लोकांना व्हावी हेही त्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती सोनोवाल यांनी दिली. ही पाच हजार वर्षे जुनी उपचार पद्धत असून आज आयुष क्षेत्राने जी मानवसेवा केली आहे त्याला तोड नाही असे ते म्हणाले. 2014 पर्यंत आयुष क्षेत्राची बाजारपेठ फक्त 3 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या मर्यादित आकाराची होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने आणि निष्ठापूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे आणि त्यांनी त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्यामुळे आज हा उद्योग जगभरात 18 अब्ज 2 कोटी अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. आयुष मंत्रालयाची अन्य उत्पादने असतील किंवा औषधे असतील लोकांना त्यामार्फत दिलासा मिळाला आहे आणि त्यांचा विश्वास वाढला आहे, असे त्यांनी नमूद केले. या मंत्रालयाशी संबंधित सर्व घटकांनी एका कुटुंबासारखे काम करत 2027 पर्यंत  आत्मनिर्भर भारताच्या दिशेने जायचा त्यांचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आजारांवर मात करणे आणि आरोग्याला चालना देणे हे आयुष मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे समान लक्ष्य असल्यामुळे ही दोन मंत्रालये सध्या एकत्र काम करत असल्याचे सोनोवाल यांनी सांगितले.

संस्थेच्या संचालक डॉ. के. सत्यलक्षमी यांनी सोनोवाल यांना संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. संस्थेच्या विविध विभागांना भेट देऊन सोनोवाल यांनी कामकाजाची माहिती घेतली आणि इथे उपचारासाठी आलेल्या काही रुग्णांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी संस्थेच्या आवारात असलेल्या बापू भवन मधील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.

पुण्यातील आसामी नागरिकांनी यावेळी सोनोवाल यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. आसामचे विख्यात गायक भारतरत्न दिवंगत भूपेन हजारिका यांच्या छायाचित्राला यावेळी सोनोवाल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. आज हजारिका यांचा स्मृतिदिन असून त्यानिमित्त अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांनाही सोनोवाल यांनी हजेरी लावली.

मुंबई महापालिकेवर भाजपा झेंडा फडकवेल- भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष, खासदार तेजस्वी सूर्या

मुंबई:
सत्ता कुठल्या एका कुटुंबाचा हक्क असू शकत नाही. लोकांच्या पाठिंब्याने सत्ता येते, पैशांच्या पाठिंब्याने नाही.” “इथले सगळे तरुण सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. तुमचे वडील किंवा कुटुंबातील कोणी मंत्री नाही, असे म्हणत नाव न घेता भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष, खासदार तेजस्वी सूर्या यांनी वरळीत विरोधकांवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक गड-किल्ले उद्ध्वस्त केले आहेत, मुंबईवरही भाजप झेंडा फडकवेल असा विश्वास तेजस्वी सूर्या यांनी व्यक्त केला. त्यांच्या हस्ते वरळीत युवा वॉरियर या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या म्हणाले की, मुंबई हे भारतातील प्रमुख शहर आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबई आणि राज्याला ग्रहण लागले होते. मात्र, राज्यात भाजप आणि शिंदे यांचे सरकार आल्यानंतर हे ग्रहण सुटले आहे. आज मोदीजी आणि शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राचा विकास वेगाने होत आहे. पंतप्रधान मोदींचं सबका साथ, सबका विकास हे धोरण पुढे नेण्यासाठी आणि भाजपच्या युवा मोर्चाची ताकद वाढवण्यासाठी मी वरळीत आलो आहे,असे सूर्या म्हणाले. “सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या तरुणांना पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आगामी मुंबई महापालिका निवडणुका असतील किंवा लोकसभा निवडणुका असतील, या निवडणुकीत तरुण प्रभावीपणे काम करतील असा विश्वास तेजस्वी सूर्या यांनी व्यक्त केला. यावेळी मुंबई भाजप युवा मोर्चाचे तजींदर सिंग तिवाना, भाजप महाराष्ट्र युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल लोणीकर, भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश युवा मोर्चा प्रभारी गौरव गौतम, भाजपा मुंबई उपाध्यक्ष श्वेता परुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

गोरगरीब जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी बँकांनी पुढाकार घ्यावा-पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

पुणे : प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून देत त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

हॉटेल शेरेटन ग्रँड येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित प्रधानमंत्री स्वनिधी आणि पुणे विभागीय बँकर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार उदयनराजे भोसले, श्रीरंग बारणे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजीआमदार गोविंदराव केंद्रे उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, गरिबांचा विकास झाल्यास देशाचा विकास वेगाने होणार असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना राबविण्यात येत आहेत. गरजू व्यक्तींना मोफत सुविधा देण्याऐवजी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्यास त्यांची खऱ्या अर्थाने प्रगती साधता येईल आणि देशाच्या विकासालाही हातभार लागेल.

बँकांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी एक महिन्याचे उद्दिष्ट निश्चित करावे. गरजू फेरीवाल्यांना नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी. केवळ तीनच बाबी तपासायच्या असल्याने नोंदणी प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत केल्यास अधिकाधिक व्यक्तींना त्याचा लाभ होईल. लोकप्रतिनिधींनीही मोहिमस्तरावर नोंदणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

गोरगरिबांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ द्या-डॉ.भागवत कराड
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले, ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेचे अधिकाधिक प्रमाणात आर्थिक समावेशन झाल्यास देशाच्या अर्थकारणाला गती मिळेल. महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांना केंद्रीय योजनेचा लाभ देण्यासाठी आणि त्यासंबंधीची जागरूकता वाढविण्यासाठी विभागवार बैठका घेण्यात येत आहेत. फेरीवाल्यांचे बँकेत खाते, आधार आणि महानगरपालिकेत नोंदणी असल्यास त्यांना स्वनिधी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. प्रथम १० हजार रुपये कर्ज आणि वेळेवर परतफेड केल्यास नंतर २० हजार व त्यानंतर ५० हजार रुपये कर्ज देण्यात येईल. बैठकीत ठरविलेले उद्दिष्ट एका महिन्यात पूर्ण करून गोरगरिबांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मागील ८ वर्षात गरिबांच्या आर्थिक उन्नतीसाठी तीन स्तरावर प्रयत्न करण्यात येत असल्याचे नमूद करीत डॉ.कराड म्हणाले, बँक खाते नसलेल्यांचे खाते उघडणे, विमा योजनेचा सर्वसामान्यांना लाभ देणे आणि अर्थ सहाय्यापासून वंचित असलेल्यांना ते उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. पशुपालन आणि मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनाही किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. सुमारे ४७ कोटी जनधन खाते सुरू करण्यासोबत या खात्यांशी आधार व मोबाईल जोडणी केल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत पोहोचविणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात महाराष्ट्र बँकेचे कार्यकारी संचालक विक्रम कुमार यांनी बैठकीच्या आयोजनाविषयी माहिती दिली.

बैठकीस राज्याचे कृषि आयुक्त धीरज कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, नगर विकास संचालक किरण कुमार, पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी, नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेचे अधिकारी, विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुणे विभागात ३० लाख ३७ हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त

पुणे, दि. ५: अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने पुणे विभागात सुमारे ३० लाख ३७ हजार रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला आदी प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

पुणे कार्यालयाने वारजे माळवाडी येथील मे. मुकेश सुपर मार्केट येथे विमल पान मसाला, आर एम डी पान मसाला, व्ही. एन सुगंधित तंबाखू या प्रतिबंधित पदार्थाचा सुमारे १ लाख २० हजार १२९ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. मालक मुकेश कुमार अग्रवाल यांच्याविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. या ठिकाणी पुन्हा प्रतिबंधित पदार्थाची विक्री रोखण्यासाठी सदरची आस्थापना सिल करण्यात आली असून दुकानाचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. तसेच यापूर्वी बावधन येथील मे. नरेंद्र ट्रेडर्सचे मालक गोविदराम प्रजापती यांच्याकडून सुमारे २३ हजार ३५० रुपये किमतीचा साठा जप्त करून त्यांच्याविरुद्ध हिंजवडी पोलिस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल दिलेला आहे.

कोल्हापुर कार्यालयातर्फे कनार्टक येथून एमएच-१२-आरएन-१२७१ या वाहनातून महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी सुमारे १८ लाख ७२ हजार १०० रुपये किंमतीचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा तसेच ८ लाख ५० हजार रुपये किंमतीचे वाहन असा सुमारे २७ लाख २२ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलिस ठाणे, कोल्हापुर येथे गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

सांगली कार्यालयातर्फे मागील पाच दिवसात विविध सात ठिकाणावरून सुमारे १ लाख ७१ हजार ५१९ रुपये किंमतीचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करुन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आलेली आहे.

पुणे विभागातील सर्व किराणा, पान टपरी अशा अन्न पदार्थाच्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानातून प्रतिबंधित पदार्थाची विक्री करु नये. अन्न किंवा औषध संबंधात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

क्लाउडटेलने ग्राहकांना विकलेले 1,033 प्रेशर कुकर परत मागवून घेतलेले पैसे परत करावेत

मुंबई-घरगुती प्रेशर कुकर (गुणवत्ता नियंत्रण) आदेश, 2020 नुसार विहित केलेल्या अनिवार्य मानकांचे उल्लंघन करून घरगुती प्रेशर कुकरची विक्री करून ग्राहक हक्कांचे उल्लंघन आणि अनुचित व्यापार पद्धती अनुसरल्याबद्दल, क्लाउडटेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड विरोधात मुख्य आयुक्त निधी खरे यांच्या अध्यक्षतेखालच्या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) आदेश जारी केला आहे.

सीसीपीएने त्याच्या ई-कॉमर्स व्यासपीठांवर अनिवार्य मानकांचे उल्लंघन करून घरगुती प्रेशर कुकरची विक्री केल्याबद्दल संबंधित ई-कॉमर्स व्यासपीठा विरोधात स्वतःहून कारवाई सुरू केली आहे. सीसीपिएने ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल, शॉप क्लूज आणि स्नॅपडील यासह महत्वाच्या ई-कॉमर्स व्यासपीठांना, तसेच या व्यासपीठांवर नोंदणी केलेल्या विक्रेत्यांना नोटीस बजावली होती.

क्लाउडटेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे “ॲमेझॉन बेसिक्स स्टेनलेस स्टील आऊटर लिड प्रेशर कुकर, 4 L (शिटी वाजवून प्रेशरची सूचना देत नाही)”,  या नावाच्या प्रेशर कुकरची विक्री करते. संबंधित प्रेशर कुकर, ग्राहकांसाठी ॲमेझॉन ई-कॉमर्स व्यासपीठावरील पुढील युआरएल वर विक्रीसाठी उपलब्ध केला जात होता: https://www.amazon.in/AmazonBasics-Stainless-Steel-Pressure-Cooker/dp/B071G5KNXK.

क्लाउडटेलने सीसीपीएच्या आदेशाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की क्यूसीओ अंमलात आल्यानंतर त्यांनी प्रेशर कुकरची आयात थांबवली होती. सीसीपीए ला असे आढळून आले की आयात थांबवल्यानंतरही कंपनीने ग्राहकांना अशा प्रेशर कुकरची विक्री सुरूच ठेवली. खरे तर यामधून हे निदर्शनास येते की क्यूसीओ बद्दल माहिती असूनही, कंपनी अशा प्रेशर कुकरची ग्राहकांना मोठ्या प्रमाणात विक्री करत होती. क्यूसीओ द्वारे अधिसूचना जारी केल्या नंतर क्लाउडटेलने ॲमेझॉन ई-कॉमर्स व्यासपीठाच्या माध्यमातून सक्तीच्या मानकांची पूर्तता न करणाऱ्या एकूण 1,033 प्रेशर कुकरची विक्री केली होती.

आपल्या आदेशात सीसीपीए ने क्लाउडटेलला त्याने विक्री केलेले 1,033 प्रेशर कुकर परत मागवण्याचे, त्याचे पैसे  ग्राहकांना परत करण्याचे आणि याबाबतचा अनुपालन अहवाल 45 दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. क्यूसीओ अंतर्गत विहित केलेल्या मानकांचे उल्लंघन करत प्रेशर कुकरची विक्री करून ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीला 1,00,000 रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. 

क्यूसीओ द्वारे अनिवार्य करण्यात आलेल्या मानकांचे उल्लंघन केल्याने केवळ सार्वजनिक सुरक्षा धोक्यात येत नाही, तर ग्राहकांना गंभीर दुखापतींसह जीवित हानीचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः घरगुती प्रेशर कुकरच्या बाबतीत हे एक चिंतेचे कारण आहे, कारण ती बहुतेक घरांमध्ये वापरली जाणारी वस्तू आहे आणि कुटुंबातील सर्व सदस्य त्याच्या संपर्कात येतात.

वैध आयएसआय (ISI) मार्क नसलेल्या आणि बीआयएस मानकांचे उल्लंघन करणाऱ्या वस्तू खरेदी करण्यापासून ग्राहकांना सावध करण्यासाठी सीसीपीए ने कायद्याच्या कलम 18(2)(j) अंतर्गत सुरक्षेबाबतच्या सूचना देखील जारी केल्या आहेत. पहिली सुरक्षा सूचना हेल्मेट. प्रेशर कुकर आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर साठी जारी करण्यात आली आहे, तर दुसरी सुरक्षा सूचना, इलेक्ट्रिक इमर्शन वॉटर हीटर्स, शिवण मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, एलपीजीसह घरगुती गॅस स्टोव्ह यासारख्या घरगुती वापराच्या वस्तूंसाठी जारी करण्यात आली आहे.

सीसीपीए देशातील ग्राहक संरक्षणाबाबतच्या परिस्थितीचे सातत्त्याने निरीक्षण करत आहे.

सीसीपीए ने अलीकडेच, औषधे आणि सौंदर्य प्रसाधने नियमांच्या शेड्यूल E(1) मध्ये सूचीबद्ध केलेले घटक असलेल्या आयुर्वेदिक, सिद्ध आणि युनानी औषधांच्या विक्रीसंदर्भात ई-कॉमर्स व्यासपीठांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अशा औषधांची विक्री अथवा पुरवठा, वापरकर्त्याने नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाचे वैध प्रिस्क्रिप्शन संबंधित ई-कॉमर्स व्यासपीठावर अपलोड केल्यानंतरच करता येईल, हे या मार्गदर्शक सूचनांमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे.

ओदिशा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी 1 (एक) अशा 5 (पाच) विधानसभा आणि उत्तर प्रदेशातील 1 (एक) लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे वेळापत्रक

निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, ओडिशा, राजस्थान, बिहार आणि छत्तीसगडमधील खालील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Sl. No.Name of StateParliamentary Constituency No. & Name
1.Uttar Pradesh21-Mainpuri (PC)
Sl. No.Name of StateAssembly Constituency No. & Name
 Odisha01-Padampur
 Rajasthan21-Sardarshahar
 Bihar93-Kurhani
 Chhattisgarh80-Bhanupratappur (ST)
 Uttar Pradesh37-Rampur

पोटनिवडणुकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे वेळापत्रक
Poll EventsSchedule 
Date of Issue of Gazette Notification10th November, 2022(Thursday)
Last Date of Nominations17th November, 2022(Thursday)
Date for Scrutiny of Nominations18th November, 2022(Friday)
Last Date for Withdrawal of candidatures21st November, 2022(Monday)
Date of Poll5th December, 2022(Monday)
Date of Counting8th December, 2022(Thursday)
Date before which election shall be completed10th December, 2022(Saturday)

1.  मतदार याद्या

उपरोक्त लोकसभा/विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या 5 जानेवारी, 2022 रोजी प्रकाशित झाल्या. याची पात्रता तारीख 01.01.2022 होती.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतच्या सुधारणा या निवडणुकांसाठी वापरल्या जातील.

2.  इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट

आयोगाने सर्व मतदान केंद्रांवर पोटनिवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.  पुरेशा प्रमाणात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट उपलब्ध केले आहेत.  या यंत्रांच्या मदतीने मतदान सुरळीतपणे पार पडावे यासाठी सर्व पावले उचलली आहेत.

3.  मतदारांची ओळख

छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र (ईपीआयसी) हा मतदाराच्या ओळखीचा मुख्य दस्तऐवज असेल. तथापि, खालीलपैकी कोणतेही ओळखपत्र मतदान केंद्रावर दाखवले जाऊ शकते:

 i  आधार कार्ड,

 ii  मनरेगा ओळखपत्र (जॉब कार्ड),

 iii  बँक/टपाल कार्यालयाने जारी केलेले फोटोसह पासबुक,

 iv  कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,

 v. वाहनचालक परवाना,

 vi  पॅन कार्ड,

 vii  एनपीआर अंतर्गत आरजीआयद्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड,

 viii  भारतीय पारपत्र,

 ix  छायाचित्रासह निवृत्तीवेतन दस्तऐवज,

 x  केंद्र/राज्य सरकार/पीएसयू/पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्रे आणि

 xi  खासदार/आमदार/एमएलसी यांना जारी केलेली अधिकृत ओळखपत्रे.

 xii  विशेष दिव्यांग ओळखपत्र (युडीआयडी) ओळखपत्र, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार

4.  आदर्श आचारसंहिता

लोकसभा/विधानसभा निवडणूक होत असलेल्या जिल्ह्यात (जिल्ह्यांमध्ये)  त्या मतदारसंघाचा संपूर्ण किंवा कोणताही भाग समाविष्ट आहे, तिथे तत्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू होईल. आयोगाच्या दिनांक 29 जून 2017 रोजी जारी केलेल्या 437/6/1NST/2016-CCS निर्देश क्रमांकानुसार आंशिक बदलाच्या हे अधीन आहे.  (आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध).

5. गुन्हेगारी पार्श्वभूमी संबंधित माहिती

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी प्रचाराच्या कालावधीत तीन वेळा या संदर्भातील माहिती वर्तमानपत्रात आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांद्वारे प्रकाशित करणे आवश्यक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार उभे करणार्‍या राजकीय पक्षाने त्यांच्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती त्यांच्या संकेतस्थळावर तसेच वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर तीन वेळा प्रकाशित करणे आवश्यक आहे.

6. पोटनिवडणुकीदरम्यान कोविड संबंधित व्यवस्था-

देशभरातील कोविडच्या परिस्थितीतील एकूण सुधारणा लक्षात घेता आणि एनडीएमए/एसडीएमएद्वारे डीएम कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक उपाय मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर, केन्द्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करण्याचा निर्णय वेळोवेळी घेण्यात आला आहे.  पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान, चाचणी-मागोवा-उपचार-लसीकरण आणि कोविड प्रतिबंधक वर्तनाचे पालन या पंचतत्व धोरणावर सतत लक्ष केंद्रित केले पाहिजे.

लंडनमध्ये येत्या 7 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट:आपले पर्यटन मंत्रालय सहभागी

नवी दिल्ली- भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय येत्या 7 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत लंडनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट-2022 या  आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शनात  सहभागी होणार आहे.हे सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शनांपैकी एक आहे.यंदाच्या प्रदर्शनाची संकल्पना ‘द फ्यूचर ऑफ ट्रॅव्हल स्टार्ट्स नाऊ’ ही आहे.परदेशी पर्यटकांसाठी देश पुन्हा खुला झाल्याने,जवळपास 2 वर्षांच्या कालावधीनंतर, यावर्षीचा भारताचा यातील सहभाग विशेष लक्षणीय आहे.जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेनंतर, देश आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या स्वागतासाठी पुनश्च सज्ज झाला आहे. पर्यटनासाठी पसंतीचे ठिकाण म्हणून स्वत:ची पुन्हा ओळख करून देण्यासाठी  डब्ल्यूटीएममधे (WTM 2022)भारत सहभागी होत आहे.

2019 मध्ये, भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) प्रवास आणि पर्यटन या क्षेत्राचे योगदान एकूण अर्थव्यवस्थेच्या 5.19% होते.  2019 मध्ये, भारतीय पर्यटन क्षेत्रात 79.86 दशलक्ष रोजगार (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार) उपलब्ध होते. केंद्र आणि राज्य सरकारांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पर्यटन उद्योगाला कोविड-19 महामारीच्या धक्क्यातून हळूहळू पूर्वपदावर येण्यास मदत झाली आहे.

विविध राज्यातील सरकार, इतर केंद्रीय मंत्रालये, औद्योगिक भागीदार म्हणून भारतीय उद्योग महासंघ , पर्यटन स्थान व्यवस्थापन कंपन्या (DMCs), टूर ऑपरेटर, हॉटेलवाले, पर्यटन संस्था ,ऑनलाइन ट्रॅव्हल एजंट, वैद्यकीय उपचारांसाठी प्रवास व्यवस्थापक असे एकूण 16 भागधारक  यातील इंडिया पॅव्हेलियनमधे सहप्रदर्शक म्हणून  सहभागी होत आहेत. वैद्यकीय उपचारांसाठी प्रवास, लक्झरी गाड्या आणि विविध पर्यटन उत्पादनांसह सेवा यांचे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय व्यावसायिक समुदायासमोर मांडणे  हा यामागचा उद्देश आहे.

भारत 1 डिसेंबर 2022 पासून सुरू होणार्‍या G20 अध्यक्षपदासाठीही सज्ज होत आहे. जी -20 अध्यक्षपद हे‌ देखील भारतातील पर्यटन संधी अधोरेखित करण्याची आणि जागतिक स्तरावर भारताच्या पर्यटन यशोगाथा सामायिक करण्याची अतुलनीय संधी उपलब्ध करेल.

राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा – सरन्यायाधीश उदय लळीत यांची भावना

मुंबई, दि. 5 – आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला मिळाल्याची भावना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केली. निवृत्तीनंतरही न्याय प्रक्रियेत आवश्यकता असेल तेथे नक्की सहभाग घेऊ असे त्यांनी सांगितले.

उदय उमेश लळीत यांची भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. राजभवन येथे आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सरन्यायाधीश यांच्या पत्नी अमिता लळीत, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आपली कर्मभूमी सुप्रीम कोर्टात असली तरीही जी कामे हाती घेतली, त्यात राज्याशी संबंधित अधिक कामे होती असे सांगितले महाराष्ट्राचा सुपुत्र असल्याने घरात मराठमोळं वातावरण आणि बांधिलकी कायम ठेवल्याचे ते म्हणाले. राज्यात कोकण, सोलापूर, नागपूर, मुंबई येथे अधिक संबंध आला असला तरी प्रत्येक जिल्ह्याची माहिती असावी यासाठी मोटरसायकलवरून दौरा केल्याचे त्यांनी सांगितले. आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये अनेकदा सहभागी झाल्याची आठवणही त्यांनी सांगितली. महाराष्ट्राच्या मातीशी जवळचा संबंध असल्याने मायेची ऊब कायम आपल्यासोबत असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध कायम मनात राहील, असे सांगून राज्याच्या वतीने आग्रहाने झालेल्या सत्काराबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

सर्वसामान्यांना न्यायप्रक्रिया सहज समजावी यासाठी न्यायपालिकेच्या कामात मातृभाषेचा उपयोग वाढावा, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली. सरन्यायाधीश मराठी भाषेत बोलले याबाबत आनंद व्यक्त करून राज्यपाल म्हणाले, सर्वसामान्यांचा संबंध असेल त्या क्षेत्रात मातृभाषेतून कामकाज होणे गरजेचे आहे. कुलपती या नात्याने राज्यातील विद्यापीठांमध्ये आपण मराठी भाषेतून बोलण्याच्या सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. देशात अनेक कायद्यांमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा केली जात आहे याबाबत समाधान व्यक्त करून सरन्यायाधीश लळीत हे पुढील काही दिवसात निवृत्त होत असले तरीही कायदा क्षेत्राला त्यांचे मार्गदर्शन यापुढेही मिळत राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीश लळीत यांच्या कार्याचा गौरव करून न्यायालयीन कामकाज अधिक गतीने आणि पारदर्शकपणे व्हावे असा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले. राज्य शासनदेखील कायद्याच्या अंमलबजावणीतून सर्वसामान्यांना न्याय मिळावा या उद्देशाने काम करीत असून मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सुलभतेने व्हावे यासाठी वांद्रे येथे नवीन न्यायालयीन संकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र अनेक बाबतीत देशाचे ग्रोथ इंजिन मानले जाते. अनेक सुधारणांची सुरुवात राज्यातून झाली आहे.

राज्याने देशाला अनेक विद्वान, कायदे पंडित दिले. न्यायदानाच्या क्षेत्रातील हा लौकिक लळीत कुटुंबियांनी कायम ठेवला. सरन्यायाधीश उदय लळीत तो वारसा पुढे चालवत असून त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे मार्गदर्शक राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरन्यायाधीश लळीत यांचा राज्याला अभिमान असून त्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या हस्ते सत्कार असल्याचे सांगितले. राज्यात न्यायदानाची प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी विधी व न्याय मंत्री म्हणून आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सरन्यायाधीश लळीत यांच्या न्यायदानातील कार्याचा गौरव करून न्यायदानाचे काम सुलभ व्हावे यासाठी त्यांचे मार्गदर्शन निश्चित मिळत राहील, असा विश्वास व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या मानपत्राचे वाचन केले. मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी तर राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

शिंदे – पवार भेटीत बरंच काही दडलंय:अमोल मिटकरींच्या दाव्याने राजकीय धुरळा

मुंबई-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीत बरंच काही दडलं आहे, असा दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे.शरद पवार यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. काल त्यांची शिंदे यांनी भेट घेतली. त्यावरून तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. मात्र, या चर्चेला अर्थ नाही. शिंदे यांनी केवळ पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली. यातून काही वेगळे घडणार नाही, अशी सावरासावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ही भेट पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी होती. त्यांची प्रकृती चांगली आहे. ते शिर्डीतल्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या शिबिराला जाणार आहेत. त्यानंतर त्यांच्या रुग्णालयात पुन्हा काही टेस्ट होणार आहेत. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे, अशी माहिती पवारांना आपल्याला दिल्याचे शिंदे म्हणाले.

ही भेट भविष्यात काहीतरी वेगळं देऊन जाईल

एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीवर अमोल मिटकरी म्हणाले की, राष्ट्रवादीच्या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी शरद पवार येणार आहेत. त्यांची काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. शिंदे आणि पवार साहेबांच्या भेटीत बरंच काही दडलं आहे. ही भेट भविष्यात काहीतरी वेगळं देऊन जाईल, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी बारा आमदार फुटणार असल्याचा दावा केला होता. यावर मिटकरी म्हणाले की, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बारा आमदार फुटणार आहेत, पण ते कोणत्या बाजूचे हे त्यांनी चुकीचे सांगितले आहे.

लोकशाहीवरील संकटाला परतवून लावल्याशिवाय राहणार नाही असा योद्धा – शरद पवारांचे रोहित पवारांनी केलेले वर्णन ..

शिर्डी : अंगात थोडासा ताप, हाताला लावलेल्या पट्ट्या अन् कातर झालेला आवाज… अशा परिस्थितीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या शिर्डीच्या शिबिराला उपस्थिती लावली. खुर्चीवरुन त्यांनी आपलं छोटेखानी मनोगत व्यक्त केलं आणि आपल्या भाषणाचा कागद त्यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या हाती सोपवून आपलंच भाषण वळसे पाटलांच्या तोंडून ऐकत राहिले. पवारांनी आजारपणातही राष्ट्रवादीच्या शिबिराला लावलेली उपस्थिती आणि केलेलं छोटेखानी भाषण यामुळे शिबिराला उपस्थित राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता अचंबित झाला. पवारांनी बोलायला माईक हाती घेताच शिबिरस्थळी टाळ्यांच्या कडकडाटाने पवारांना मानवंदना देण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ शिबिरासाठी सभागृहात प्रवेश करताच ‘देश नेता कैसा हो.. शरद पवार साहेब जैसा हो..’ या घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. तर रोहित पवार यांनी लोकशाहीवरील संकटाला परतवून लावल्याशिवाय राहणार नाही असा योद्धा या शब्दात शरद पवारांचे वर्णन केले आहे.

गेल्या चार दिवसांपासून पवार यांना न्यूमोनियाचा संसर्ग जडल्याने ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेतायेत. पण राष्ट्रवादीचं नियोजित शिबिर असल्याने पवारांना जायला जमेल की नाही, याबाबत साशंकता होती. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला होता, पण पवार शिर्डीला जाण्यावर ठाम होते. आज सकाळीच ते हेलिकॉप्टरने शिर्डीला रवाना झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पण त्याचवेळी त्यांच्या मनात पवारांबद्दल प्रचंड आस्था होती. वयाच्या ८४ व्या वर्षी पवारांमधली उर्जा पाहून राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते भारावून गेले.तब्येत बरी नसतानाही पवारसाहेब आपण ‘राष्ट्रवादी मंथन शिबिरा’ला उपस्थित राहून आम्हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंत.. आज तुमच्या हाताला इंजेक्शनची पट्टी होती.. अशाही स्थितीत लढणारा तुमच्यातील योद्धा उद्या लोकशाहीवरील संकटाला परतवून लावल्याशिवाय राहणार नाही,असा विश्वास आहे, असं ट्विट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं.

 राष्ट्रवादी शिबिराकडे खा.अमोल कोल्हे यांनी फिरवली पाठ,अजित पवारही शेवटच्या दिवशी फारसे सक्रीय नव्हते:कुजबुज अन चर्चा

शिर्डी- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजारी असतानासुद्धा ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ शिबिरासाठी शिर्डीत हजेरी लावली. पण, या शिबिराकडे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पाठ फिरवली असल्याचे समोर आले आहे.शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय मंथन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते हजर आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते समजले जाणारे अमोल कोल्हे यांनी मंथन शिबिराकडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासदार डॉ. अमोल कोल्हे हे मंथन शिबिरात ‘हिंदुत्व आणि शिवाजी महाराजांची कार्यपद्धती’, या विषयावर बोलणार होते. मात्र, वेळेअभावी त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी होती. तसेच, पक्षाच्या कार्यपद्धतीवरही कोल्हे नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोल्हे यांनी या शिबिराकडे पाठ फिरवल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारही शिबिराच्या शेवटच्या दिवशी फारसे सक्रीय नव्हते. अचानक ते आपल्य आजोळी निघून गेले, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. जयंत पाटील यांच्या भाषणाच्यावेळीही अजित पवार गैरहजर होते, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही पक्षाच्या अधिवेशनात जयंत पाटील यांचे भाषण सुरू असतानाच अजित पवार सभागृहाबाहेर पडल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र, तेव्हा आपण वॉशरूमला गेल्याचे स्पष्टीकरम अजित पवारांनी दिले होते. शिर्डीतील अजित पवारांच्या गैरहजेरीच्या चर्चेबाबत त्यांची प्रतिक्रिया अद्याप मिळू शकली नाही.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजारी असतानासुद्धा ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ शिबिरासाठी शिर्डीत हजेरी लावली. शिबिरासाठी शरद पवार यांनी सभागृहात प्रवेश केला तेव्हा ‘देश नेता कैसा हो.. शरद पवार साहेब जैसा हो..’ या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी शरद पवार फक्त चार ते पाच मिनिटे बोलले. पवार यांनी आज आपलं भाषण उभे न राहता बसूनच केले. त्यांच्या हाताला बँडेज लावलेले दिसत होते. त्यांचे उर्वरित भाषण दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवले.

भारत जोडो यात्रेसाठी पुण्यातील शक्ती स्थळांवरून काँग्रेसच्या वतीने मातीचे संकलन.

पुणे-काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेसाठी पुणे शहरातील शक्तीस्थळांवरील मातीचे संकलन आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्ह्याचे भारत जोडो यात्रेचे समन्वयक ॲड. अभय छाजेड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.


पुणे शहरातील ऐतिहासिक व भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी सबंधित शक्ती स्थळांवरील माती सकंलन आज करण्यात आले. पुणे शहर हे ऐतिहासिक वारसा असलेले शहर असून छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या पुण्यातील लाल महालातून माती संकलन करण्यात आले. त्यानंतर काँग्रेस भवन हे देखील स्वातंत्र्य पूर्व काळातील एक अग्रगण्य स्थान असून १९४२ च्या चले जाव चळवळीमध्ये याच ठिकाणी देशातील पहिला हुतात्मा नारायण दाभाडे हे होते. आद्य क्रांतीकारक उमाजीराजे नाईक यांना इंग्रजांनी ज्या ठिकाणी फाशी दिली त्या मामलेदार कचेरी येथील त्यांच्या स्मारकातून माती संकलन केले. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज सुधारणेबरोबरच स्वातंत्र्याचे महत्व ज्यांनी पटवून दिले व स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी रचला अशा महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या ऐतिहासिक समाधी स्थळावरून (समताभूमी) येथून मातीचे संकलन केले. महात्मा गांधीजींचे गुरू ना. गोपाळकृष्ण गोखले यांच्या राहत्या घरातून म्हणजेच गोखले इन्स्टिट्यूट गोखले स्मारक येथून माती संकलनीत करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याचे जहाल नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांचे पुणे येथील राहते घर या ठिकाणाहून देखील माती संकलित करण्यात आली. आद्य क्रांतीगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमंवाडी स्मारकाची माती संकलित करण्यात आली. छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी असलेले, तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाने पावन झालेल्या सिंहगडावून, छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक वढू ब्रु. येथून व भीमा कोरोगाव येथील विजय स्तंभ येथून व तळेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानातून मातीचे संकलन केले गेले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष संगीता तिवारी,रजनी त्रिभुवन, सुजित यादव, सचिन आडेकर, विजय खळदकर, अजित जाधव, शिलार रतनगिरी, राहुल तायडे, राकेश त्रिभुवन, अमर गायकवाड, रवि आरडे, हरिदास अडसूळ, दत्ता जाधव, योगेश बोर्डे इत्यादींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

इमारतीचे फ्रंट,साईड मार्जिन असतात कशाला ? अतिक्रमणे करायला ? बाणेरमध्ये धडक कारवाई सुरु..

महापालिकेची, पोलिसांची जबाबदारी आहेच आणि नागरिकांची जबाबदारी नाही ?वाहतूक कोंडीचा विषय.

पुणे – सरका,सरका जेवढे पुढे सरकता येईल तेवढे,बळकवा,बळकावा जेवढी जागा बळकावता येईल तेवढी हि प्रवृत्ती रस्त्याच्या रुंदीला अपुरी करत असल्याचे संपूर्ण पुणे शहराच्या हद्दीत बहुसंख्य ठिकाणी राबविलेली दिसते आहे. हॉटेल असो,व्यापारी दुकाने असो वा घरे असो…रस्त्यावर ओसंडून वाहत असतात आणि मग उरल्या सुरल्या रस्त्यावर पदपथ मग त्यापुढे पार्किंग आणि मग गळा दाबून धरलेल्या रस्त्यावरून सुरु होणारी वाहतूक असे चित्र बहुताशी सगळीकडेच दिसते.मुळातच असे चित्र असताना नको असलेले सायकल मार्गिका,बीआरटी लेन या साऱ्यातून जे बहु अंशी संख्येने आहेत अशा वाहनांना मार्ग काढीत मुसंडी मारावी लागते.महापालिकेच्या वारंवार वाढणाऱ्या हद्दी, वाढती वाहने आणि रस्त्यांच्या रुंदी यांचा कधी मेळ कोणी घातलाच नाही.आणि आता रस्त्यावरची वाहतूक कोंडी हाच सर्वात मोठा यक्ष प्रश्न होऊन बसला आहे.ज्यास पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महापालिकेवर लेटर अस्त्र डागाळीत वाचा फोडली आहे.

हि बाब सर्वात आधी बाणेर मध्ये गंभीरपणे घेतली गेली आहे. युवराज देशमुख या बांधकाम विभागातील अधिकाऱ्याने येथे आपली धडक मोहीम सुरु केली आहे. कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता जे.बी. पवार, कनिष्ठ अभियंता संग्राम पाटील, कनिष्ठ अभियंता संदेश कुळवमोडे, कनिष्ठ अभियंता गंगाप्रसाद दंडीमे यांनी सुरु केलेल्या कारवाईची आज चौथा दिवस सुरु आहे.अर्थात कुठे ३ मजल्याची बांधकाम परवानगी असताना कोणी ४ /५ मजले बांधून इमारती उभ्या केल्या असतील तर तिथेही या विभागाला लक्ष पुरवावे लागणार आहे.

इमारतीच्या अगर कुठल्याही बांधकामांच्या फ्रंट,साईड मार्जिन असतात तरी कशाला ? याचा विचार न करता या जागांचा व्यावसायिक/ अव्यावसायिक वापर करणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर /अतिक्रमणांवर यांनी हाथोडा टाकण्याचे काम सुरु केले आहे. ज्या त्या इमारतीत येणारी वाहने या फ्रंट,साईड मार्जिन मध्ये उभी राहू शकतील ती रस्त्यावर येणार नाहीत या दृष्टीने आणि आपदकाळात योग्य ती सुविधा देण्याच्या दृष्टीने हि स्पेस सोडलेली असते.परंतु या बळकावून त्याही पुढे रस्त्यावर पुढे सरकून जागा बळकाविण्याची वृत्ती फोफावल्याने या जागेत उभी करता येणारी वाहने रस्त्यावर उभी राहू लागली, हि वाहने उभी करण्यासाठी भांडणे,हाणामाऱ्या झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत.

आता अशा प्रत्येक फ्रंट,साईड मार्जिन मधील आणि टेरेस वरील देखील अनधिकृत बांधकामानवर महापालिकेची वक्रदृष्टी पडली आहे. बाणेर मधून झालेली सुरुवात संपूर्ण महापालिका हद्दीत पूर्ण वेगाने आणि जोशाने राबविली गेली. आणि तिचे दर ३ महिन्यांनी सातत्य ठेवले तर वाहतूक कोंडीने गुदमरलेला श्वास बऱ्याच प्रमाणात मोकळा होण्यास मदत निश्चित होईल असे स्पष्ट दिसते आहे.