नवी दिल्ली- भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय येत्या 7 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत लंडनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट-2022 या आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शनात सहभागी होणार आहे.हे सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शनांपैकी एक आहे.यंदाच्या प्रदर्शनाची संकल्पना ‘द फ्यूचर ऑफ ट्रॅव्हल स्टार्ट्स नाऊ’ ही आहे.परदेशी पर्यटकांसाठी देश पुन्हा खुला झाल्याने,जवळपास 2 वर्षांच्या कालावधीनंतर, यावर्षीचा भारताचा यातील सहभाग विशेष लक्षणीय आहे.जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेनंतर, देश आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या स्वागतासाठी पुनश्च सज्ज झाला आहे. पर्यटनासाठी पसंतीचे ठिकाण म्हणून स्वत:ची पुन्हा ओळख करून देण्यासाठी डब्ल्यूटीएममधे (WTM 2022)भारत सहभागी होत आहे.
2019 मध्ये, भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) प्रवास आणि पर्यटन या क्षेत्राचे योगदान एकूण अर्थव्यवस्थेच्या 5.19% होते. 2019 मध्ये, भारतीय पर्यटन क्षेत्रात 79.86 दशलक्ष रोजगार (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार) उपलब्ध होते. केंद्र आणि राज्य सरकारांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पर्यटन उद्योगाला कोविड-19 महामारीच्या धक्क्यातून हळूहळू पूर्वपदावर येण्यास मदत झाली आहे.
विविध राज्यातील सरकार, इतर केंद्रीय मंत्रालये, औद्योगिक भागीदार म्हणून भारतीय उद्योग महासंघ , पर्यटन स्थान व्यवस्थापन कंपन्या (DMCs), टूर ऑपरेटर, हॉटेलवाले, पर्यटन संस्था ,ऑनलाइन ट्रॅव्हल एजंट, वैद्यकीय उपचारांसाठी प्रवास व्यवस्थापक असे एकूण 16 भागधारक यातील इंडिया पॅव्हेलियनमधे सहप्रदर्शक म्हणून सहभागी होत आहेत. वैद्यकीय उपचारांसाठी प्रवास, लक्झरी गाड्या आणि विविध पर्यटन उत्पादनांसह सेवा यांचे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय व्यावसायिक समुदायासमोर मांडणे हा यामागचा उद्देश आहे.
भारत 1 डिसेंबर 2022 पासून सुरू होणार्या G20 अध्यक्षपदासाठीही सज्ज होत आहे. जी -20 अध्यक्षपद हे देखील भारतातील पर्यटन संधी अधोरेखित करण्याची आणि जागतिक स्तरावर भारताच्या पर्यटन यशोगाथा सामायिक करण्याची अतुलनीय संधी उपलब्ध करेल.