मुंबई-घरगुती प्रेशर कुकर (गुणवत्ता नियंत्रण) आदेश, 2020 नुसार विहित केलेल्या अनिवार्य मानकांचे उल्लंघन करून घरगुती प्रेशर कुकरची विक्री करून ग्राहक हक्कांचे उल्लंघन आणि अनुचित व्यापार पद्धती अनुसरल्याबद्दल, क्लाउडटेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड विरोधात मुख्य आयुक्त निधी खरे यांच्या अध्यक्षतेखालच्या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) आदेश जारी केला आहे.
सीसीपीएने त्याच्या ई-कॉमर्स व्यासपीठांवर अनिवार्य मानकांचे उल्लंघन करून घरगुती प्रेशर कुकरची विक्री केल्याबद्दल संबंधित ई-कॉमर्स व्यासपीठा विरोधात स्वतःहून कारवाई सुरू केली आहे. सीसीपिएने ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल, शॉप क्लूज आणि स्नॅपडील यासह महत्वाच्या ई-कॉमर्स व्यासपीठांना, तसेच या व्यासपीठांवर नोंदणी केलेल्या विक्रेत्यांना नोटीस बजावली होती.
क्लाउडटेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे “ॲमेझॉन बेसिक्स स्टेनलेस स्टील आऊटर लिड प्रेशर कुकर, 4 L (शिटी वाजवून प्रेशरची सूचना देत नाही)”, या नावाच्या प्रेशर कुकरची विक्री करते. संबंधित प्रेशर कुकर, ग्राहकांसाठी ॲमेझॉन ई-कॉमर्स व्यासपीठावरील पुढील युआरएल वर विक्रीसाठी उपलब्ध केला जात होता: https://www.amazon.in/AmazonBasics-Stainless-Steel-Pressure-Cooker/dp/B071G5KNXK.
क्लाउडटेलने सीसीपीएच्या आदेशाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की क्यूसीओ अंमलात आल्यानंतर त्यांनी प्रेशर कुकरची आयात थांबवली होती. सीसीपीए ला असे आढळून आले की आयात थांबवल्यानंतरही कंपनीने ग्राहकांना अशा प्रेशर कुकरची विक्री सुरूच ठेवली. खरे तर यामधून हे निदर्शनास येते की क्यूसीओ बद्दल माहिती असूनही, कंपनी अशा प्रेशर कुकरची ग्राहकांना मोठ्या प्रमाणात विक्री करत होती. क्यूसीओ द्वारे अधिसूचना जारी केल्या नंतर क्लाउडटेलने ॲमेझॉन ई-कॉमर्स व्यासपीठाच्या माध्यमातून सक्तीच्या मानकांची पूर्तता न करणाऱ्या एकूण 1,033 प्रेशर कुकरची विक्री केली होती.
आपल्या आदेशात सीसीपीए ने क्लाउडटेलला त्याने विक्री केलेले 1,033 प्रेशर कुकर परत मागवण्याचे, त्याचे पैसे ग्राहकांना परत करण्याचे आणि याबाबतचा अनुपालन अहवाल 45 दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. क्यूसीओ अंतर्गत विहित केलेल्या मानकांचे उल्लंघन करत प्रेशर कुकरची विक्री करून ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीला 1,00,000 रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.
क्यूसीओ द्वारे अनिवार्य करण्यात आलेल्या मानकांचे उल्लंघन केल्याने केवळ सार्वजनिक सुरक्षा धोक्यात येत नाही, तर ग्राहकांना गंभीर दुखापतींसह जीवित हानीचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः घरगुती प्रेशर कुकरच्या बाबतीत हे एक चिंतेचे कारण आहे, कारण ती बहुतेक घरांमध्ये वापरली जाणारी वस्तू आहे आणि कुटुंबातील सर्व सदस्य त्याच्या संपर्कात येतात.
वैध आयएसआय (ISI) मार्क नसलेल्या आणि बीआयएस मानकांचे उल्लंघन करणाऱ्या वस्तू खरेदी करण्यापासून ग्राहकांना सावध करण्यासाठी सीसीपीए ने कायद्याच्या कलम 18(2)(j) अंतर्गत सुरक्षेबाबतच्या सूचना देखील जारी केल्या आहेत. पहिली सुरक्षा सूचना हेल्मेट. प्रेशर कुकर आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर साठी जारी करण्यात आली आहे, तर दुसरी सुरक्षा सूचना, इलेक्ट्रिक इमर्शन वॉटर हीटर्स, शिवण मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, एलपीजीसह घरगुती गॅस स्टोव्ह यासारख्या घरगुती वापराच्या वस्तूंसाठी जारी करण्यात आली आहे.
सीसीपीए देशातील ग्राहक संरक्षणाबाबतच्या परिस्थितीचे सातत्त्याने निरीक्षण करत आहे.
सीसीपीए ने अलीकडेच, औषधे आणि सौंदर्य प्रसाधने नियमांच्या शेड्यूल E(1) मध्ये सूचीबद्ध केलेले घटक असलेल्या आयुर्वेदिक, सिद्ध आणि युनानी औषधांच्या विक्रीसंदर्भात ई-कॉमर्स व्यासपीठांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अशा औषधांची विक्री अथवा पुरवठा, वापरकर्त्याने नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाचे वैध प्रिस्क्रिप्शन संबंधित ई-कॉमर्स व्यासपीठावर अपलोड केल्यानंतरच करता येईल, हे या मार्गदर्शक सूचनांमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे.