Home Blog Page 1540

‘ शाब्बास सुनबाई’ एका ध्येयवादी सुनेची गोष्ट

मुंबई:  सन टीव्ही नेटवर्कची सन मराठी ही वाहिनी  गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस आली. ‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी नात्यांनी सजलेल्या वेगवेगळया मालिका आणल्या.

अशीच एक वेगळ्या नातेसंबंधाची गोष्ट, म्हणजेच “शाब्बास सुनबाई” ही मालिका कौटुंबिक आणि पारंपरिक प्रथा, विचार व रूढींना वेगळा दृष्टिकोन देणाऱ्या सुनेची आहे. सोमवार ते शनिवार, संध्याकाळी ७ वाजता प्रसारीत होणाऱ्या या मालिकेतील नायिका “संजीवनी” ही अत्यंत प्रामाणिक, सारासार विचार करणारी ध्येयवादी मुलगी आहे.  लहानपणापासूनच अत्यंत हुशार असलेल्या संजीवनीला आयुष्यात खूप काही साध्य करायचंय. त्यासाठी तिच्या बाबांनी नेहमीच तिला प्रोत्साहन दिलंय. तिच्या बाबांनी सतत तिच्या मनावर हेच बिंबवलं आहे की तिने सतत पहिलं यावं आणि सर्वोत्कृष्ट असावं. तिने तिच्या वडलांच्या स्वप्नाला आपलसं करत नेहमीच अभ्यासात अव्वल नंबर पटकावत स्वतःचं शैक्षणिक वर्षांत नाव कमावलं आहे.

संजीवनीच्या स्वप्नांना खरा संघर्ष करावा लागणार आहे तो तिच्या लग्नानंतर. कसं आहे तिचं सासर ? संजीवनीला लग्नानंतर नेमका कशाशी आणि कोणाशी संघर्ष करावा लागणार आहे? प्रवाहाविरुद्ध पोहून आपली स्वप्नं साकारण्यात संजीवनी यशस्वी होणार का?  ह्या  प्रश्नाभोवती  मालिका गुंफलेली आहे.

नायिकेच्या भूमिकेत रश्मी अनपट तर मुख्य खलनायकाच्या भूमिकेत मयूर खांडगे असे एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. ह्या मालिकेचे लेखन केलं आहे शार्दुल सराफ व पूर्णानंद वांढेकर यांनी, तर दिनेश घोगळे यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. या मालिकेची निर्मिती केली आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री व निर्माती “सुचित्रा आदेश बांदेकर” यांनी.

तेव्हा पाहायला विसरू नका एक नवी कोरी मलिका, “शाब्बास सुनबाई!”  १४ नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ७ वा. फक्त आपल्या सन मराठीवर.

ह्यासोबतच सन मराठी ह्या वाहिनीवर प्रेक्षकांना नात्यांनी सजलेल्या वेगवेगळ्या मालिका  संध्याकाळी ७ ते रात्री १०. ३०  ह्या वेळेत पाहायला मिळतील. सन मराठीवर संध्याकाळी ७.३० वाजता ‘जाऊ नको दूर… बाबा!’, ८.३० वाजता ‘कन्यादान’,  रात्री ९ वाजता ‘संत गजानन शेगावीचे’,  ९. ३० वाजता ‘नंदिनी’ तसेच रात्री १० वाजता ‘सुंदरी’ ह्या मालिका दाखविल्या जातात.सन मराठी ही फ्री वाहिनी सर्व प्रमुख डिटीएच प्लॅटफॉर्म्स आणि केबल नेटवर्क्सवर मोफत उपलब्ध आहे. तसेच ही वाहिनी डीडी फ्री डिश वर देखील चॅनेल नंबर ६ वर उपलब्ध आहे

 ‘सवाल अंधाराचा’ सर्वोत्कृष्ट

पुणे, दि. ०९ नोव्हेंबर २०२२: महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलाने ‘सवाल अंधाराचा’ या नाटकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकाविला. तर कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला.

पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागातील दोन दिवसीय आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचा मंगळवारी (दि. ८) समारोप झाला. यावेळी थाटात झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांची मुख्य पाहुणे म्हणून उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके, मुख्य अभियंते श्री. सचिन तालेवार (पुणे), श्री. सुनील पावडे (बारामती), श्री. परेश भागवत (कोल्हापूर) यांची उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते नाट्यस्पर्धेतील विजेत्या संघांना करंडक तसेच वैयक्तिक गटातील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे म्हणाले, की नाट्यस्पर्धांच्या आयोजनातून महावितरण सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होत आहे. रंगकर्मी प्रगल्भ होत आहेत. व्यावसायिक नाटकांच्या तोडीच्या नाट्यकृती सादर केल्या जात आहेत. ही स्पर्धा असली तरी नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेचा आनंद रंगकर्मींसाठी वेगळाच असतो. रंगभूमी ही जिवंत कलेचे व्यासपीठ आहे. तिथे चित्रपटासारखे रिटेक नाही. त्यामुळे अतिशय धकाधकीच्या वीजक्षेत्रात काम करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना राज्यभरातील नाट्यमहोत्सव हा नवऊर्जा देणारा आहे.

नाट्यस्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी पुणे परिमंडलाने मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार निर्मित व अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार दिग्दर्शित ‘सवाल अंधाराचा’ ही नाट्यकृती सादर केली. प्र.ल. मयेकर लिखित या नाटकाच्या प्रभावी सादरीकरणाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या नाटकासह कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ व बारामती परिमंडलाचे ‘ब्लाईंड गेम’ या नाटकांच्या सादरीकरणाचे परीक्षण नाट्यपरीक्षक संजय गोसावी, अरुण पटवर्धन व सौ. मंजुषा जोशी यांनी केले. यामध्ये पुणे परिमंडलांचे ‘सवाल अंधाराचा’ नाटकाने प्रथम तर कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ नाटकाने द्वितीय क्रमांक पटकाविला.

यासोबतच वैयक्तिक गटात दिग्दर्शन– प्रथम – मंगेश कांबळे (कोल्हापूर) / द्वितीय – राजेंद्र पवार (पुणे), अभिनय (पुरुष)– प्रथम- प्रसाद दिवाण (कोल्हापूर)/ द्वितीय – संतोष गहेरवार (पुणे), अभिनय (स्त्री)– प्रथम- सोनाली बावस्कर (पुणे)/ द्वितीय- गंगाक्का गुडुर (बारामती), नेपथ्य– प्रथम- संजय कांबळे (कोल्हापूर) / द्वितीय- राजीव पुणेकर व भरत अभंग (पुणे), प्रकाशयोजना– प्रथम- गणेश लटपटे (बारामती)/ द्वितीय- श्रीकांत सनगर व शशांक आष्टेकर (कोल्हापूर), पार्श्वसंगीत– प्रथम- संजय नायकवडी व अभिजित टेंभुर्णे (पुणे) / द्वितीय- विनायक पाटील व सुरेश पाटील (कोल्हापूर), रंगभूषा व वेशभूषा– प्रथम- संतोष आडूळकर व सुमन पाटील (कोल्हापूर) / द्वितीय- माधुरी मेश्राम व निकिता खैरनार (पुणे). अभिनय उत्तेजनार्थ– अपर्णा मानकीकर (पुणे), रामचंद्र चव्हाण (बारामती) व संभाजी कांबळे (कोल्हापूर). बालकलाकार उत्तेजनार्थ – कनिष्का खोबरे (कोल्हापूर) व श्रद्धा चव्हाण (बारामती.)

बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी केले तर डॉ. संतोष पटनी व भक्ती जोशी यांनी सूत्रसंचालन केले. अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत यांनी आभार मानले. पुणे परिमंडलाकडून आयोजित या नाट्यस्पर्धेला पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला व तिनही नाटकांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांची मोठी उपस्थिती होती.

गडकरीसाहेब पुणे सोलापूर रस्त्याकडे लक्ष द्या -खा. सुप्रिया सुळे

पुणे- वाहतूक कोंडी ,वर्दळ, अरुंद रस्ते ,खराब रस्ते ,अपघात यांचे प्रश्न शहरात आणि शहरांबाहेर देखील ऐरणीवर येत असताना आता खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे -सोलापूर महामार्गाकडे लक्ष द्या असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केले आहे.

सुळे यांनी म्हटले आहे कि, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर नागरीकीकरण झाले आहे. महामार्गालगत लोणी काळभोर,उरुळी कांचन,यवत,वरवंड,पाटस,भिगवण अशी अनेक मोठी गावे आहेत.या गावांच्या मध्यातून हा महामार्ग जात असूनही अनेक ठिकाणी नागरीकांसाठी सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.अनेक ठिकाणी रस्ते दुभाजकांची दुरवस्था झालेली असून, विजेची देखील सोय नाही. यामुळे येथे वारंवार अपघात घडतात. या भागात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी तसेच नागरीकांची सोय लक्षात घेता येथे सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.तरी माझी रस्ते व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांना विनंती आहे की कृपया या बाबतीत संबंधित विभागास सूचना देण्याबाबत सकारात्मक विचार करावा.

जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकारनं वीस जिल्हा शासकीय रुग्णालयात 265 डीएनबी पदव्युत्तर वैद्यकीय जागांना दिली परवानगी


नवी दिल्‍ली-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमध्ये वैद्यकीय शिक्षणातल्या नवीन युगाची प्रशंसा केली आहे. वीस जिल्हा शासकीय रुग्णालयात 265 डीएनबी पदव्युत्तर वैद्यकीय जागांना परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाचं पंतप्रधानांनी स्वागत केलं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये युवाशक्तीचं सबलीकरण करण्याच्या तसेच वैद्यकीय क्षेत्रात पायाभूत सुविधा वृद्धींगत  करण्याच्या उद्देशाने केलेला हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविय यांचं ट्विट सामायिक करत पंतप्रधान यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, ‘जम्मू काश्मीर मधल्या युवाशक्तीचं सबलीकरण करण्यात तसच वैद्यकीय क्षेत्रात पायाभूत सुविधा वृद्धींगत  करण्याच्या उद्देशान केलेला हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे !’ 

मतदार जनजागृतीच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे – मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी सर्वांनी मतदार नोंदणी करावी – निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे

पुणे, दि. ९ : छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे येथे मतदार जनजागृती सायकल फेरीचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी निवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ.रणबीर सिंग, निवडणूक उपायुक्त हृदयेश कुमार, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, दिग्दर्शक नागराज मंजुळे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या अंजली भागवत,  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, निवडणूक आयोगाच्या माध्यम व संवाद महासंचालक शेफाली शरण, स्वीप संचालक संतोष अजमेरा आदी उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, देशाच्या प्रत्येक भागातील प्रत्येक पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी झाली पाहिजे. लोकशाही सशक्त करण्यासाठी मतदानही आवश्यक आहे. शहरी भागात मतदार नोंदणीचे प्रमाण कमी असल्याने त्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ पुण्यातून होत आहे.

देशातील दुर्गम भाग, वाळवंट, समुद्रकिनारा, दऱ्याखोऱ्यातील नागरिक मतदानात सहभाग घेतात हे आपले वैशिष्‌ट्य आहे.  देशात वयाची शंभरी ओलांडलेले २ लाख ४८९ हजार मतदार  आहेत. हिमाचल प्रदेशच्या शामशरण नेगी यांनी मृत्यूपूर्वी ३ दिवस आधी टपाली मतदान केले. मतदानाविषयी ही जागरूकता आणण्यासाठी सर्वांनी मतदार जागृतीच्या कार्यात सहभागी व्हावे, निवडणुकीत मतदानाचा हक्कही बजावावा आणि निवडणूक आयोगाचे दूत म्हणून कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. आजची जनजागृती फेरी सर्वसमावेशक असल्याचे नमूद करून या फेरीत खेळाडू, कलाकार, युवक, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी मतदारही सहभागी होत आहेत असेही ते म्हणाले.

लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी सर्वांनी मतदार नोंदणी करावी – निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे

निवडणुक आयुक्त श्री.पांडे म्हणाले,  या वेळेचा मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम युवा मतदार केंद्रीत ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत १७ वर्षाचा युवकही नोंदणी करू शकणार आहे. १८ वर्ष पूर्ण होताच त्याचा समावेश मतदार यादीत केला जाईल. लोकशाही सशक्त करण्यासाठी सर्वांनी मतदार नोंदणी करावी आणि सायकलच्या चाकाच्या गतीप्रमाणे मतदार जनजागृतीचा संदेश प्रत्येक भागात पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.

श्री.मंजुळे यांनी सायकल फेरीला शुभेच्छा देताना युवा मतदारांना मतदार नोंदणीचे आवाहन केले. प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे असे ते म्हणाले.

यावेळी दिलेल्या संदेशात मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, शहरी भागातील १७ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांनी मतदार म्हणून नोंदणी करुन मतदान प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घेणे तसेच मतदार यादीचे शुद्धीकरण करणे या दुहेरी उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक गावात १० नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करुन मतदार यादीचे वाचन, नवीन मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील महाविद्यालय व विद्यालयामध्ये जनजागृती मोहीम आयोजित करुन १७ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांची  नोंदणी करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

युवा मतदार सार्थक पडाळे, तृतीयपंथी समुदायातील मतदार सानवी जेठवानी, अमित मोहिते, ज्येष्ठ नागरिक आनंद पडाळे, दिव्यांग मतदार शिवाजी भेगडे यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल फेरीचा शुभारंभ केला.

सायकल फेरीच्या शुभारंभ प्रसंगी बॅडमिंटन खेळाडू निखिल कानिटकर, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू अभिजित कुंटे, बॉक्सिंग ऑलिंपियन मनोज पिंगळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुमेश झेपे, एव्हरेस्ट शिखर वीर आशिष माने, आनंद माळी,  हॉकी खेळाडू अजित लाखा, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, सायकलिंग ऑलिंपियन मिलिंद झोडगे उपस्थित होते.

सायकल फेरीत विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, आंतरराष्ट्रीय खेळाडू, युवा मतदार, ज्येष्ठ नागरीक, तृतीयपंथी समुदायाचे प्रतिनिधी, अधिकारी-कर्मचाऱ्यांसह सुमारे ४०० नागरिकांनी सहभाग घेतला.

राधा चौक- पुणे विद्यापीठ चौक- राजभवन-केंद्रीय विद्यालय समोरून- कस्तुरबा वसाहत- ब्रेमेन चौक- परिहार चौक- डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक- मेरी पॉईंट हॉस्पिटल- ताम्हाणे चौक- ज्युपिटर हॉस्पिटल- बाणेर बालेवाडी फाटामार्गे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे येथे सायकल फेरीचा समारोप झाला.

मतदार जागृतीसाठी नागरिकांशी संवाद

सायकल फेरीदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी कस्तुरबा गांधी वसाहत येथे नागरिकांशी संवाद साधला. युवक आणि वयोवृद्धांनीही मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी पुण्याची ओळख असलेल्या ढोल पथकाचे आणि पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

काँग्रेसचं ट्विटर हँडल ब्लॉक करण्याच्या निर्णयाला स्थगिती; हायकोर्टाचा दिलासा

बंगळुरु : काँग्रेसचं ट्विटर हँडल तात्पुरतं ब्लॉक करण्याच्या सत्र न्यायालयाच्या कालच्या निर्णयाला कर्नाटक हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. कोर्टाच्या या ताज्या निर्णयामुळं काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. भारत जोडो यात्रेच्या प्रमोशनदरम्यान कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन झाल्यामुळं काँग्रेसला या कारवाईला समोर जावं लागणार होतं. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेच्या एका व्हिडिओत KGF Chapter 2 सिनेमातील एका गाण्याचा वापर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ काँग्रेसच्या ट्विटर हँडल आणि भारत जोडो यात्रेच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला होता. यामुळं कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी बंगळूरुच्या कमर्शिअल कोर्टानं काल ही दोन्ही ट्विटर हँडल तात्पुरती ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. यानंतर काँग्रेसनं हा आक्षेप घेतलेला कंटेन्ट उद्यापर्यंत आपल्या ट्विटर, फेसबुक, युट्यूब आणि इन्स्टाग्राम हँडलवरुन हटवण्यात येईल, अशी हमी दिल्यानं कर्नाटक हायकोर्टानं अकाऊंट ब्लॉकच्या निर्णयाला स्थिगिती दिली आहे.

राहुल गांधींच्या यात्रेने अनेकांना केले प्रफुल्लीत …

राहुल गांधींनी शेतकऱ्याच्या घरी घेतला चहा आणि भज्यांचा आस्वाद

नांदेड- बिजूर बिलोली तालुक्यातील बिजुर या छोट्याशा गावातील शेतकरी शिंनगारे कुटुंबीयांकडे चहा आणि भज्यांचा आस्वाद घेत खासदार राहुल गांधी यांनी या कुटुंबांला एक सुखद धक्का दिला.दरम्यान कुटुंबातील ज्येष्ठ आणि बच्चे कंपनीशी जवळपास दहा ते बारा मिनिटे संवादही साधला. त्यामुळे शिनगारे कुटूंबियांच्या आनंदाला पारावर उरला नाही.

भारत जोडो यात्रेचा आज नांदेड जिल्ह्यातील दुसरा दिवस होता. दुपार सत्रानंतर यात्रा शंकरनगरकडे मार्गस्थ झाली. दरम्यान यात्रा मार्गावर असलेल्या बिलोली तालुक्यातील बिजूर येथील शेतकरी हनुमंत शिनगारे यांचे घर आहे. जवळपास १२ ते १४ लोकांचं हे एकत्रित कुटुंब आहे. मंगळवारी सायंकाळी अचानक खा. राहुल गांधी यांच्या ताफ्यातील चार कर्मचारी शिनगारे कुटुंबीयांकडे आले आणि त्यांनी राहुल गांधीजी तुमच्याकडे चहा घेणार आहेत असे सांगितले. शिनगारे कुटुंबीयांनी लागलीच तयारीला सुरुवात केली. तेवढ्यात राहुल गांधी आले.

अंगणातच राहुल गांधी यांनी स्वच्छ हात- पाय धुवून घरात प्रवेश केला. संध्याकाळची वेळ आणि घरापाठीमागील टेकडीवरील महादेव मंदिर असे वातावरण त्यांना अधिकच चांगले वाटत होते. त्यामुळे राहुल गांधी यांनी छतावर जाऊया अशी विनंती केली. ते व त्यांच्यासोबत असलेले काही पदाधिकारी लगेचच घराच्या छतावर गेले. याठिकाणी ५ मिनिटे विश्रांती करून त्यांनी छतावरच चहा घेत त्यासोबत भज्याचा देखील आस्वाद घेतला. अंगणात म्हैस, गाय पाहून त्यांनी शेतकरी कुटुंबाचे कौतुक केले.

शिनगारे कुटुंबियांच्या सुनेने बनविला चहा
शिनगारे कुटुंबीयांची सून मीना विठ्ठल शिनगारे यांच्या हाताने बनवलेल्या चहाचा आणि भाची उमाताई आकाश वरवटे (रा.ताकबीड) यांनी बनवलेल्या कांदा भज्याचे राहुल गांधी यांनी भरभरून कौतुक केले. तद्नंतर शिनगारे कुटुंबातील जेष्ठ हनुमंत शंकरराव शिनगारे यांच्यासह घरातील बच्चे कंपनीशी संवाद साधला. सर्वकाही व्यवस्थित आहे का? तुमच्या अडचणी काय अशी हिंदीतून विचारणा करून त्यांच्याशी संवाद साधला. तसेच येथील बच्चे कंपनीसाठी चॉकलेट आणि बिस्कीट त्यांच्यात काही वेळ रमले. राहुल गांधी यांची पदयात्रा ही गावातून जाणार असल्याने बिजुरवाशीय खुश होतेच. परंतु बिजूर येथील शिंनगारे कुटुंबियांकडे चहाचा आणि भज्यांचा आस्वाद घेतल्यामुळे कुटुंबाच्या आनंदाला पारावर राहिला नाही.

महाराष्ट्राला ‘टीआयओएल’चा ज्युरी पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, ८ :  महाराष्ट्राला ‘टॅक्स इंडिया ऑनलाईन (टीआयओएल)’चा ज्युरी (निवड समिती) पुरस्कार प्रदान  करण्यात आला.

येथील ताज पॅलेस मध्ये दिमाखदार सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार तामिळनाडू राज्याचे वित्तमंत्री पलानीवेल त्यागराजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जीएसटीचे विशेष आयुक्त अनिल भंडारी, संयुक्त आयुक्त जी. श्रीकांत, स्वाती काळे, संजय निकम, श्री. पोपळघाट यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुंबई आणि पुणे झोनला यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्य सभा सदस्य सुशील मोदी, पंजाब चे माजी अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल, सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्सच्या माजी अध्यक्ष प्रवीण महाजन या व्यासपीठावर उपस्थित होत्या. तसेच देशभरातील विविध नामवंत संस्थेचे प्रमुख सभागृहात उपस्थित होते.

महाराष्ट्र कर संकलनाच्या बाबतीत नेहमीच पहिले राज्य राहिलेले आहे. मागील वित्तीय वर्षात दोन लाख 18 हजार कर संकलन करून महाराष्ट्राने देशाच्या कर संकलनात जवळपास पंधरा टक्के योगदान दिले आहे. तसेच वर्ष 2022-23 मध्ये आत्तापर्यंत एक लाख 55 हजार विक्रमी कर संकलन केले आहे.

इज ऑफ डूइंग बिजनेस ( Ease of doing business ) मध्ये महाराष्ट्राचा जीएसटी विभाग नेहमीच अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्रात रिफंड प्रक्रिया नेहमी वेळेवर आणि जलद गतीने होते. व्यापाऱ्यांची नोंदणीही सुलभ आणि  वेळच्या वेळी होत असल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळतो. प्रामाणिक व्यापाऱ्याला महाराष्ट्र जीएसटी विभागातर्फे नेहमीच मदत केली जात असून योग्य सेवा जलद गतीने पुरविल्या जातात. बहुतांशी सर्व सेवा सुविधा जसे नोंदणी, दुरुस्त्या, परतावा (रिफंड) आता ऑनलाईन झालेले आहे.

महाराष्ट्र जीएसटी विभागात व्यापाऱ्याच्या तक्रारीची ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली व वास्तविक वेळेच्या आधारावर (Grievance redresses online and on real time basis) ताबडतोब दखल घेतली जाते. महाराष्ट्र शासनाने अमलात आणलेली अभय योजना एक यशस्वी योजना म्हणून गणली गेली असून प्राप्त झालेले एकूण दोन लाख अठरा हजार चारशे सहा अर्ज निकाली काढन्यात आले.

उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थ मार्गदर्शनामुळे आणि आयुक्त वस्तू व सेवा कर, राजीव मितल यांच्या नेतृत्वामुळे कर संकलनामधे सर्वात जास्त वाढ असलेले राज्य [highest growth in tax collection] म्हणून महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे.

गुरूनानकजींच्या मानव कल्याणाच्या विचारांमुळे शीख बांधवांचे राज्याच्या विकासात मोलाचे योगदान- मुख्यमंत्री

मुंबई, दि. ८: श्री गुरुनानकजी यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन शीख बांधव राज्याच्या विकासात नेहमीच आपले योगदान देत आहेत. कोरोना काळात लंगरच्या माध्यमातून शीख बांधवांनी केलेली मानवसेवा अभिनंदनीय असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

श्री गुरुनानक जयंती निमित्त येथील श्री गुरुसिंग सभेच्या माध्यमातून वडाळा येथे आयोजित केलेल्या गुरूबानी पाठ कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. खासदार राहुल शेवाळे, आमदार मंगेश कुडाळकर, रवींद्र फाटक यांच्यासह श्री गुरुसिंग सभेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, उद्योग आणि विविध सेवा क्षेत्रांच्या वाढीत शीख बांधवांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. श्री गुरुनानकजी यांनी अंधश्रद्धा, चुकीच्या प्रथा-परंपरांचा कडाडून विरोध केला. सत्य, धार्मिकता आणि करूणेचा मार्ग दाखवून त्यांनी समाजाच्या सेवेसाठी नेहमीच प्रेरणा दिली आहे. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेवुन शीख बांधव नेहमीच समाज सेवेसाठी अग्रेसर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

श्री गुरूनानकजी यांनी सदैव मानव कल्याणाचा विचार केला. त्यांच्या या विचारांचं प्रकाश पर्व निर्माण व्हावं आणि त्यातून आपल्या सर्वांचं जीवन उजळून निघावं, अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. राज्यातील सर्वधर्मीय बांधवांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा विकास करायचा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार श्री. शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना टॅब चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास श्री गुरूसिंग सभेचे अध्यक्ष सरदार मनमोहन सिंग रत्ती, उपाध्यक्ष कुलवंत सिंग, रघुवीर सिंग गील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्व जागा लढविणार

पुणे-

पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूक प्रक्रियेसाठी महाविकास आघाडीने सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले असून महाविकास आघाडी ही निवडणूक पूर्ण ताकतीनीशी लढविणार आहे.अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. या पत्रकार परिषदेसाठी रविकांत वर्पे ,सुनील गव्हाणे, गजानन थरकुडे, राजेश पळसकर, शरद लाड, प्रदीप देशमुख, किशोर कांबळे, मनोज पाचपुते यांसह पॅनलचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

जगताप म्हणाले,’ गेल्या अनेक वर्षांपासून सावित्रीबाई फुले विद्यापीठात एका विशिष्ट विचाराच्या लोकांची सत्ता आहे. विद्यापीठाचा कारभार लोकाभिमुख होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना मदत होणारी मदत केंद्र त्यांच्या सोयी सुविधा पुणे विद्यापीठासह नगर व नाशिक या केंद्रांवर विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय या सर्व बाबी लक्षात घेता महाविकास आघाडीने ही निवडणूक लढविण्याचे ठरवले असून , त्यानुसार या सर्व जागांवर त्यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत.

कोरोना महामारीच्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,युवासेना, एन. एस. यु.आय या विद्यार्थी संघटनांनी केलेली मदत. ऑफलाइन परीक्षा बाबत महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय, कोविड काळात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, कोवीड काळात ज्या मुलांनी आपल्या पालकांना गमावले त्यांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकारी नोकर भरतीस आलेला वेग असे अनेक चांगले निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेले असल्याने पुणे विद्यापीठातील मतदान महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे राहतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि हेच मुद्दे घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाविकास आघाडी यास निवडणुकीत उतरली असून या पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे” ,

फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात कोणी केली ? मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला सवाल

पुणे- ‘अब्दुल सत्तार यांच्या विधानाचे समर्थन करणार नाही. पण खोके हा विषय कसा सुरू झाला? ते देखील योग्य नाही. शिवसेना यापूर्वी फुटली नव्हती का? नारायण राणे, छगन भुजबळ यांना कोणी फोडले? त्यावेळी खोके नसतील, पेट्या होत्या. त्यामुळे एकांगी आरोप करायला नको. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची पक्षात घुसमट होत होती, त्यातून ते बाहेर पडले. त्यामुळे हे आरोप बंद व्हायला हवे.’या सोबतच खोके या विषयावरून एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना टार्गेट करणे हे चुकीचे असून,मात्र या सत्ता समीकरणमध्ये अस काही झालेले नाही. असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

राज्यातील राजकीय संस्कृती हा एक चिंताजनक विषय झाला असून, सर्व पक्षाच्या लोकांनी यावर बसून काय बोलले पाहिजे काय नाही हे ठरविणे आवश्यक आहे. दिलगिरी व्यक्त केली की हा विषय संपला पाहिजे असं वाटते . जुन्या काळातील यादी बाहेर काढल्यास अब्दुल सत्तार यांचे समर्थन होईल. जे मला करायचे नाही. या सोबतच खोके या विषयावरून एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना टार्गेट करणे हे चुकीचे असून,मात्र या सत्ता समीकरणमध्ये अस काही झालेले नाही. असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.ते म्हणाले,’ माझ्या गुरूने एक चूक करायला शिकवले आहे .मात्र एक चूक वारंवार घडत असेल तर ते चुकीच आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्याबाबत मुख्य नेते पाहतील काय करायचे ते. त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने राजीनाम्याची मागणी करू नये असे माझे अजिबात म्हणणे नाही .पण आता माफी मागितली असेल तर हा विषय संपवला पाहिजे असे चंद्रकांत पाटील म्हणाले.हर हर महादेव चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ज्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा टेंभा मिरवायचा असेल त्यांनी कायदा हातात घेणे योग्य नाही.

फडणवीसांना आता गृहमंत्री पद झेपत नाही-सुषमा अंधारे

अब्दुल सत्तारांवर कारवाई केली, मग गुलाबराव पाटील यांच्यावर का केली नाही?, सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांना सवाल

पुणे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी राज्याचा सर्व गाडा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाकत आहे. त्यांच्याकडे सहा जिल्ह्याचा भार आहे, अशात कामाचा ताण त्यांच्यावरील वाढला असल्याने त्यांना गृहमंत्री पद झेपत नाहीत. त्यांच्या मंत्रिमंडळातील नेते बेताल वक्तव्य करत आहे, मात्र, त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही. फडणवीस हे गृहमंत्री म्हणून कुचकामी ठरत आहेत अशी टीका शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.दरम्यान अंधारे यांनी महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनाही अब्दुल सत्तारांवर कारवाई केली, मग गुलाबराव पाटील यांच्यावर का केली नाही? असा सवाल केला आहे .

सुषमा अंधारे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत महिलांविरोधात अपशब्द काढणाऱ्या सर्व नेते मंडळींवर तोफ डागली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. अंधारे म्हणाल्या, भाजप सत्तेत आल्यापासून महिलांबद्दल बेताल वक्तव्य केले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील अनेक नेते हे बेताल वक्तव्य करत आहेत. राज्यातील भाजपचे आमदार आणि भाजपचे प्रवक्ते रामदास कदम यांनी देखील दहीहंडीत मुलींबद्दल बेताल वक्तव्य केले. तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. नुकतेच संभाजी भिडे हे एका महिला पत्रकारासोबत टिकली लवण्यावरून असभ्यपणे पणे बोलले. मात्र, उपमुख्यमंत्री एक चकार शब्द देखील बोलले नाहीत. अमृता फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस टिकलीवरुन बोलतील का? असा प्रश्न अंधारे यांनी विचारला.

ज्या पद्धतीने अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या बद्दल वाईट शब्दांत वक्तव्य केले. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. नारायण राणे आणि त्यांची दोन मुले हे देखील महिलांबद्दल अतिशय वाईट शब्दांत वक्तव्य करत असतात. गुलाबराव पाटील हे देखील सरंजामी वृत्तीचे असून त्यांची वाक्य देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्रालयाला आक्षेपार्ह वाटत नाही. पोलीस देखील गुलाबराव पाटलांचे हस्तक आहेत, असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला.

अब्दुल सत्तारांवर कारवाई केली, मग गुलाबराव पाटील यांच्यावर का केली नाही?, सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांना सवाल

अब्दुल सत्तार यांनी यांना सत्तेचा माज आला आहे. अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांनी सर्व महिलांची माफी मागावी. अब्दुल सत्तार यांना तुम्ही आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात नोटीस बजावता तर गुलाबराव पाटील यांना नोटीस का बजावत नाही, असा सवाल त्यांनी राज्य महिला आयोगाला विचारला आहे. महिला आयोगाने सिलेक्टिव्ह वागू नये. सत्तार आणि गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाई होत नसेल तर हे देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन होतं आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

त्यांनी महिला आयोगाला देखील प्रश्न विचारले. अंधारे म्हणाल्या, राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी माझ्या विरोधात अर्वाच्य भाषा वापरली तरी राज्य महिला आयोगाकडून त्यावर कारवाई करण्यात आली नाही. रुपाली चाकणकरांना आपण यांना या संदर्भात दोन वेळा फोन केला पण त्यांनी तो उचलला नाही. जी कारवाई सु्प्रिया सुळे यांच्या प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात आली ती कारवाई आपल्या प्रकरणात गुलाबराव पाटील यांच्यावर का करण्यात आली नाही असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

भजन सम्राट अनुप जलोटा आणि प्रसिद्ध युवा गायक श्रीवल्लीफेम जावेद अली यांना स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा उपक्रम
पुणे : रौप्य महोत्सव साजरा करीत असलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे सांगीतिक क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकारास स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार प्रदान केला जातो. यंदाच्या वर्षी भजन सम्राट पद्मश्री अनुप जलोटा आणि प्रसिद्ध पार्श्वगायक श्रीवल्लीफेम जावेद अली यांना या पुरस्काराने सन्मानित के

ले जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. प्रत्येकी एक लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्काराचे यंदाचे 14वे वर्ष आहे.यावेळी विश्वस्त राहुल देशपांडे, संदीप राक्षे, सौरभ वाटवे विवेक थिटे उपस्थित होते.
पुरस्कार वितरण शरद पवार यांच्या हस्ते दि. 2 डिसेंबर 2022 रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे होणार आहे. पुढला पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या दोन महिलांना दिला जाणार असल्याचे खाबिया यांनी सांगितले.
मराठी चित्रपट गीतांचे जादूगार आणि लावणी गीतांचे शहेनशहा मानल्या जाणाऱ्या श्रेष्ठ संगीतकार राम कदम यांच्या नावाने शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे 2006 पासून राम कदम कलागौरव पुरस्काराने संगीत क्षेत्रातील विविध मान्यवरांना गौरविण्यात आले आहे. यात जगदीश खेबुडकर, भास्कर चंदावरकर, इनॉक डॅनियल्स, सुलोचना चव्हाण, चंद्रशेखर गाडगीळ, अजय-अतुल गोगावले, उषा मंगेशकर, अशोक पत्की, सुरेश वाडकर, यशवंत देव, अरुण दाते, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन, राहुल देशपांडे यांचा समावेश आहे.


ज्येष्ठ गायक, संगीतकार आणि अभिनेता अशी अनुप जलोटा यांची ओळख आहे. संगीत क्षेत्रात भजन प्रकारातील योगदानामुळे ते भजन सम्राट म्हणून नावलौकिकप्राप्त आहेत. कला प्रकारातील योगदानाबद्दल त्यांना केंद्र सरकारने 2012 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. अनुप जलोटा यांचा जन्म नैनिताल (उत्तराखंड) येथील आहे. त्यांचे वडिल पुरुषोत्तमदास जलोटा हे प्रख्यात भजन गायक होते. अनुप जलोटा यांचे सांगीतिक शिक्षण लखनौच्या भातखंडे संगीत संस्थेत झाले असून त्यांची संगीत कारकिर्दीची सुरुवात आकाशवाणीमध्ये गायक म्हणून झाली. ‘ऐसी लागी लगन’, ‘मैं नही माखन खायो’, ‘रंग दे चुनरिया’, ‘जग मे सुंदर है दो नाम’, ‘चदरिया झिनी रे झिनी’, ‘तुम चंदन हम पानी’ या त्यांच्या आवजातील रचना प्रसिद्ध आहेत.
युवा पिढीतील सुप्रसिद्ध पार्श्वगायक जावेद अली यांचा जन्म दिल्ली येथे झाला. त्यांचे वडिल उस्ताद हमिद हुसेन हे लोकप्रिय कव्वाली गायक असल्याने जावेद यांची गायनाची तालिम बालवयातच सुरू झाली. जगप्रसिद्ध गझल गायक उस्ताद गुलाम अली यांचे जावेद यांना मार्गदर्शन लाभले आहे. उस्ताद गुलाम अली यांना श्रद्धांजली व त्यांचा सन्मान म्हणून जावेद यांनी आपले नाव जावेद हुसेन यावरून जावेद अली असे बदलले. हिंदीसह बंगाली, कन्नड, मल्याळम्‌‍, गुजराथी, मराठी, उडिया, तमिळ, उर्दू, तेलगु अशा विविध भाषांमधील चित्रपटांसाठी जावेद यांनी पार्श्वगायन केले आहे. तसेच कव्वाली गायक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. ‘श्रीवल्ली’, ‘एक दिन तेरी राहों में’, ‘जश्न-ए-बहारन’, ‘अर्जियां’ ‘गुजारिश’, ‘आ जाओ मेरी तमन्ना’ ही त्यांच्या आवाजातील चित्रपट गीते गाजली आहेत.

वरळीत पोटनिवडणूक करा मग कळेल मशाल आहे की चिलीम- आ. आशिष शेलार

मुंबई-अंधेरी पूर्वच्या निकालानंतर मशाल भडकली असे वक्तव्य उद्धवजीं ठाकरे यांनी केले. माझे त्यांना आवाहन आहे की, त्यांनी दिनांक सांगावी, वेळ सांगावी. वरळी विधानसभेत आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याची हिमंत दाखवावी. भाजपा कार्यकर्ते
आमनेसामने लढून उद्धवजींच्या सेनेची मशाल आहे की चिलीम हे दाखवून देतील, असे आव्हान भाजपा नेते आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी दिले.

जागर मुंबईची दुसरी सभा आज अंधेरी पूर्व येथे यावेळी माजी नगरसेवक मुरजी पटेल, अभिजित सामंत, संजय मोने, महामंत्री संजय उपाध्याय आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थितीत होते.

यावेळी आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की,
भारतीय जनता पार्टी अंधेरी पुर्व विधानसभेच्या सर्व नेत्यांचे अभिनंदन करतो की, त्यांनी जागर मुंबईची ही सभा गुंदवलीच्या भर रस्त्यात आयोजित केली.

मी २५ वर्ष जनतेच्या विश्वासावर निवडून आलेला राजकारणी आहे. या काळात तिकीट द्या म्हणणारे अनेक राजकारणी पाहिले. पण पक्षाने दिलेले तिकीट व्यापक हितासाठी मिळालेले तिकीट परत देणारे मुरजी पटेल हे आगळेवेगळे नेते आहेत. याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहीजे. पक्षाने सांगितल्यानंतर त्यागासाठी तयार राहण्याची वृत्ती भाजपाच्या नेत्यांमध्ये आहे.

जागर मुंबईचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काहीजणांच्या पोटात मुरडा सुरु झालाय. विरोधी पक्षाची टोळी मतिमंद झालीये. जागर मुंबईचे अभियान केवळ भाजपाला मत द्या, एवढ्यापुरते नाही. कुणा एकाला महापौर बनवायचे आहे, यासाठी देखील हे अभियान नाही. मुंबईकरांमध्ये जागृती आणण्यासाठी हा जागर आहे.

अंधेरी पूर्व विधानसभेचा निकाल कालच लागला. तरी अंधेरीत आम्ही सभा घेत आहोत, याचे कारण अंधेरीतील जनतेशी आमचे केवळ निवडणुकीसाठीचे नाते नाही, तर त्यापलीकडचे नाते आहे. अंधेरीचा निकाल शुभसंकेत आहेत. कारण उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष भाजपाच्या मदतीशिवाय जिंकू शकत नाही, हे स्पष्ट झालं. मुरजी पटेल निवडणुकीला उभे असते, तर आज उद्धवजींच्या शिवसेनेच्या शाखा बंद करण्याची वेळ आली असती.

२०१४ च्या आकडेवारीचा अंदाज घेतला तर असे दिसून येते की, अंधेरीमधील निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धवजींच्या सेनेला मतं दिलीच नाहीत. नोटाला अधिक मते मिळाली असल्याबाबत आमच्यावर आरोप केला जातो. हा आरोप खोटा आहे. जर भाजपाने आवाहन केले असते तर १२ ऐवजी ७२ हजार मते नोटाला मिळाले असते. अंधेरी पूर्व येथे ३१ टक्के मतदान झाले आहे, ७० टक्के लोकांनी यांच्या राजकारणाला कंटाळून मतदान केलेले नाही. ही १२ हजार मते नोटाला मिळाली आहेत, ती मते काँग्रेस-राष्ट्रवादीची मते आहेत.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होईल तेव्हा अंधेरी पूर्व विधानसभेतील १० पैकी ८ वॉर्डात भाजपाचा नगरसेवक निवडून आणू, असे सांगत आमदार अँड आशिष शेलार यांनी जोरदार हल्ला चढवला. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जे मतांसाठी विशिष्ट समाजाचे लांगूलचालन सुरु आहे त्याबाबत अनेक उदाहरणे देऊन जोरदार टिका केली

नवीन शिक्षण धोरणात लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाच्या भूमिकेवर भर- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

पुणे, दि. ८: केंद्र सरकारतर्फे आत्मनिर्भर भारताची संकल्पना राबविली जात आहे. मात्र या संकल्पनेचे प्रेरणास्थान लोकमान्य टिळक आहेत. नवीन शिक्षण धोरणातही लोकमान्यांच्या राष्ट्रीय शिक्षणाच्या भूमिकेवर भर देण्यात आला आहे. रोजगार, नोकरी आणि समाजाच्या गरजेनुसार शिक्षणाचा त्यात समावेश करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला ‘आएसओ 21001:2018′ मानांकन प्रदान सोहळा आणि विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांनी लिहिलेल्या‘जाणिवा कर्मयोगाच्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, प्र. कुलगुरू डॉ. गीताली टिळक, टिमवी ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. प्रणती टिळक, प्र-कुलसचिव अभिजीत जोशी, सचिव अजित खाडीलकर, ‘आयएसओ’चे पुणे विभागाचे प्रमुख अनिल कदम आदी उपस्थित होते.

लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाचा वारसा चालविण्याचे कार्य टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अविरत करत आहे अशा शब्दात विद्यापीठाचा गौरव करून मंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले, आयएसओ मानांकन मिळवणारे देशातील पहिले विद्यापीठ ठरल्यामुळे हे विद्यापीठ शैक्षणिक संस्थांसमोर आदर्श ठरले आहे. हा केवळ टिमविचा गौरव नसून राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा गौरव आहे. या गौरवामुळे शिक्षण क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या गरजेनुसार शिक्षण देण्यात हे विद्यापीठ आग्रेसर आहे. काळाची पावले ओळखून अभ्यासक्रम व शिक्षण पद्धतीत बदल केल्यामुळे या विद्यापीठाची स्वतंत्र अशी ओळख निर्माण झाली आहे.

श्री. विखे पाटील यांनी पुढे सांगितले, परदेशातील नामांकित विद्यापीठाचे कॅम्पस आपल्याकडे येत आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात जगाच्या तुलनेत आपले स्थान समजण्यास त्यामुळे मदत होणार आहे. लोकमान्य टिळक हे देशाचे स्फूर्तिस्थान आहेत. त्यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या विद्यापीठाला जयंतराव टिळक यांचा वारसा लाभला असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले. तोच वारसा डॉ. दीपक टिळक पुढे चालवत आहेत, असेही ते म्हणाले.

डॉ. दीपक टिळक म्हणाले, ‘जाणिवा कर्मयोगाच्या’ या पुस्तकात विविध विषयांवरील लेख आहेत. मात्र या लेखात लोकमान्यांच्या कर्मयोगाच्या विचाराचा धागा आहे. तसेच त्यास गीतारहस्याची बैठक आहे. मात्र आता समाज बदलला आहे. संकल्पनाही बदलल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा तरूणाईला सोप्या भाषेत लोकमान्यांचे विचार सांगण्याची गरज आहे. त्यामुळे सोप्या भाषेत लोकमान्यांचे विचार पुस्तकातून मांडले आहेत.

डॉ. गीताली टिळक म्हणाल्या, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे ‘आयएसओ’ मानांकन मिळविणारे देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षण व रोजगाराभिमुख शिक्षण पद्धती विद्यापीठाने राबविली. विद्यापीठातील गुणवत्तापूर्ण व दर्जात्मक शिक्षणामुळे विद्यापीठाचा सन्मान झाला आहे. विद्यापीठातील विविध विभागांनी कायमच शैक्षणिक दर्जाची उंची टिकवून ठेवली. हे आयएसओ नामांकन मिळण्यात विद्यापीठाच्या सर्व घटकांचा महत्वाचा सहभाग आहे.

आयएसओचे अधिकारी महेश मालपाठक यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला ‘आएसओ 21001:2018’ हे मानांकन प्रदान केले.