बंगळुरु : काँग्रेसचं ट्विटर हँडल तात्पुरतं ब्लॉक करण्याच्या सत्र न्यायालयाच्या कालच्या निर्णयाला कर्नाटक हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. कोर्टाच्या या ताज्या निर्णयामुळं काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. भारत जोडो यात्रेच्या प्रमोशनदरम्यान कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन झाल्यामुळं काँग्रेसला या कारवाईला समोर जावं लागणार होतं. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेच्या एका व्हिडिओत KGF Chapter 2 सिनेमातील एका गाण्याचा वापर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ काँग्रेसच्या ट्विटर हँडल आणि भारत जोडो यात्रेच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला होता. यामुळं कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी बंगळूरुच्या कमर्शिअल कोर्टानं काल ही दोन्ही ट्विटर हँडल तात्पुरती ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. यानंतर काँग्रेसनं हा आक्षेप घेतलेला कंटेन्ट उद्यापर्यंत आपल्या ट्विटर, फेसबुक, युट्यूब आणि इन्स्टाग्राम हँडलवरुन हटवण्यात येईल, अशी हमी दिल्यानं कर्नाटक हायकोर्टानं अकाऊंट ब्लॉकच्या निर्णयाला स्थिगिती दिली आहे.