Home Blog Page 1538

राहुल गांधींनी सांगितला सावरकर आणि गांधीजींच्या विचारांचा फरक

नांदेड -कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज येथे झालेल्या सभेत आरएसएस आणि काँग्रेसच्या लोकांमधील फरक सांगितला. राहुल यांनी केदारनाथ दर्शनातील किस्सा सांगितला. ते म्हणाले की, मला केदारनाथ येथे एक आरएसएसचे नेते भेटले होते. त्यांचं वजन साधारण १०० किलो असेल. दर्शन झाल्यावर त्यांना विचारलं काय मागितलं. तेव्हा ते म्हणाले की, मी चांगली प्रकृती मागितली. वास्तविक ते हेलिकॉप्टर ऐवजी चालत आले असते तर प्रकृती चांगली झाली असती. पण मी काही मागितलं नाही, मला रस्ता दाखवल्याबद्दल महादेवाचे आभार मानले. हा फरक आहे, सावरकर आणि गांधीजींच्या विचारांचा. हा फरक आहे काँग्रेस आणि आरएसएसमध्ये.. आम्ही बोलत नाही, करतो, असंही राहुल यांनी म्हटलं.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने राहुल गांधी यांचा सन्मान करण्यात आला. काठी , घोंगडी आणि विठ्ठल रुखमाई ची मूर्ती प्रदान करून

भारत जोडो यात्रेत अभूतपूर्व गर्दी आणि उत्साह आहे. राहुल गांधी यांच्या या यात्रेत वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील याही चालताना पाहायला मिळाल्या आहेत. बारा बलुतेदार, गोंधळी, बंजारा समाजाचे नेते असो की, शेतकरी सर्वजण या यात्रेत सहभागी झाले आहेत. महागाई आणि बेरोजगारीवर राहुल भर देत आहेत. या महिला आणि लहान मुलांशी राहुल गांधी यांनी संवाद साधताना दिसत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली. त्यानंतर काही महिन्यांनी म्हणाले की, देशातून काळा पैसा निघाला नाही तर मला फासावर लटकवा. काय त्यांचे इमोशन, काय ते शब्द नंतर अश्रूही निघाले. त्यांचीही तपस्या आहे पण अश्रूवाली तपस्या आहे, असा टोला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान मोदींना लगावला.

राहुल गांधी म्हणाले, नोटबंदी, चुकीची जीएसटी, पाच वेगवेगळे कर, स्वतंत्र भारतात शेतकरी, त्यांचे अवजार, खतांवर कर लागला. विरोधक म्हणतात, ऐवढे पायी चालत आहेत काहीही फरक पडणार नाही. पण मी म्हणतो ही गोष्ट सहज आहे, चालणे सोपे आहे, मी थकत नाही. कारण शेतकरी, मजूर, कष्टकऱ्यांची शक्ती माझ्यामागे आहे.

राहुल गांधी म्हणाले, भारत देश तपस्वींचा आहे, महापुरुषांसमोर आपण हात जोडतो ते त्यांच्या कार्यामुळे तपस्येमुळेच. या देशातील शेतकरीही तपस्या करतो, सर्व वर्ग तपस्या करतो पण त्यांना फळ मिळत नाही. ते मेले तरीही त्यांना फळ मिळत नाही ही खंत आहे.

राहुल गांधी म्हणाले, नोटबंदीमुळे सर्वसामान्यजन त्रस्त झाले. काळे धन उलट वाढले आहे, शेतकरी त्रस्त आहेत. रोजगार हातातून गेले. महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प गायब झाले. तसेच तुम्हाला आश्वासन दिलेले पंधरा लाखही गायब झाले. भाजपच्या पाॅलिसीमुळे भय उत्पन्न होते.

राहुल गांधी म्हणाले, मनरेगा बंद करू असे सांगताच शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या मनात भय उत्पन्न होते. या भयाला नरेंद्र मोदी आणि भाजप द्वेषात बदलतात. भय आणि द्वेषाविरोधात आम्ही भारत जोडो यात्रा सुरू केली. कन्याकुमारी ते श्रीनगरपर्यंत 3600 किमी पायी चालत आहोत. कुणालाही विचार कष्ट होत नाही. मला लोकांकडून आनंद, प्रेम मिळत असून खूप गोष्टी शिकायला मिळत आहे. माझी यात्रा कुणी रोखू शकत नाही.

राहुल गांधी म्हणाले, मी केदारनाथला गेलो. तेथील मुख्यमंत्री मला म्हणाले की, हेलिकाॅप्टरने केदारनाथ जाऊ शकता. मी म्हटलो नाही, मी पायीच जाणार. मी सांगीतले की मी भगवान शंकराच्या मंदिरात जात आहे जे सर्वात मोठे तपस्वी आहेत. त्यांच्यासाठी मी पंधरा किमी चालु शकत नाही का? मी पायी गेलो. खूप थंडी होती. केदारनाथला जात आहोत याची अनुभूती थंडीमुळे होते. मी मंदिरात घुसत असताना आरएसएसचे नेते मला भेटले. मी त्यांना नमस्कार घातला. (त्यांचे वजन सुमारे शंभर किलो असेल) आम्ही आत जाताना त्यांच्या बाजूने एक नोकर होता. नोकराच्या डोक्यावर मोठी फळाची टोपली होती. मी पाहिले आणि म्हणालो, सर हे काय? ते म्हणाले, मी शंकराच्या चरणावर ठेवण्यासाठी फळ नेत आहेत. मी विचार केला अन् मनातच पुटपुटलो. ”तुम्ही नाही तुमच्या नोकराने आणले.”

सुशांत सिंह (अभिनेता) भारत जोडो मध्ये सहभागी

मी म्हटलो, आपण सर्वात मोठ्या तपस्वीच्या मंदिरात आलात. तेही हेलिकाॅप्टरने..ते शांत बसले. मी म्हटलो शंकराला काय मागितले तेव्हा ते म्हणाले, मी सदृढ आरोग्य मागितले. मी मनात पुटपुटलो की,”तुम्ही जर केदारनाथला पायी आले असते तर सदृढ आरोग्य मिळाले असते.”

मी भगवान शंकराला काहीच मागितले नाही. पण शंकरापुढे मी नतमस्तक झालो आणि धन्यवाद दिले मी म्हटलो की, मला तुम्ही रस्ता दाखवला. हा फरक आरएसएस आणि काॅंग्रेसमध्ये आहे. गांधी आणि सावरकरमध्ये आहे. आम्ही सांगत नाही करतो.

सुप्रिया सुळे, जयंत पाटील, आव्हाड राहुल गांधींसोबत ‘भारत जोडो ‘ यात्रेत सहभागी

नांदेड-येथील देगलूरनाका येथे भारत जोडो यात्रा पोहचली असून सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी आहेत. यावेळी यात्रेत सुप्रिया सुळे यांनी एका युवतीसोबत स्वःत सेल्फीही घेतली.काॅंग्रेस नेते राहुल गांधींच्या बहुचर्चित भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात आहे. या यात्रेत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते सहभागी झाले.

पवार, ठाकरेंचा सहभाग नाही

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारी येथून निघालेली ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात आहे. काॅंग्रेसचा मित्रपक्ष असलेली राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नेते या यात्रेत सहभागी होत आहेत. त्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा समावेश नसेल हे आधीच स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज राहुल गांधींच्या पदयात्रेत सहभागी झाले. ते राहुल गांधी यांच्यासह चालताना दिसले.

असा आहे पुढील कार्यक्रम

  • भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये चार आणि हिंगोली जिल्ह्यात चार दिवस मुक्काम करून विदर्भात वाशिम येथून मार्गक्रमण करेल.
  • नांदेड जिल्ह्यातील पहिला मुक्काम देगलूर येथे झाला. गुरुवारी- पिंपळगाव महादेव आणि शुक्रवारी पहाटे हिंगोली जिल्ह्याकडे रवाना होणार आहे.
  • नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14 दिवस ही यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा (सेट) २६ मार्च रोजी; ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे -सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २६ मार्चला घेण्यात आहे. त्यासाठी उमेदवारांना ३० नोव्हेंबर पर्यंत यासाठी अर्ज करता येईल.विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यांच्या मान्यतेने राज्य शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) आयोजित करण्यात येते. यंदाची ३८ वी परीक्षा ही २६ मार्चला घेण्यात येणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना https://setexam.unipune.ac.in या संकेस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे. तर विलंब शुल्कासहित १ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत अर्ज करता येईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव आणि सेटचे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.
परीक्षेबाबतच्या अधिक माहितीसाठी संकेस्थळाला भेट द्यावी असे आवाहन सेट विभागातर्फे करण्यात आले.

 ‘वऱ्हाडी वाजंत्री’चे विनोदवीर महाराष्ट्राला खळखळून हसवणार!

शुक्रवार दिनांक ११ पासून अख्या महाराष्ट्राला खळखळून हसविण्यासाठी सर्वांचा लाडका अभिनेता मकरंद अनासपुरे २१ अवली विनोदवीर वाजंत्र्यांसोबत सज्ज झाला आहे. कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्यासह अतुल राजारामशेठ ओहोळ यांनी ही फुल्ल मनोरंजनाची ट्रीट ‘स्वराज फिल्म प्रॉडक्शन’द्वारे आणली आहे. त्यांची पहिलीच निर्मिती असलेला “वऱ्हाडी वाजंत्री” हा मल्टीस्टारर चित्रपट आजपासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ऍडव्हान्स बुकिंगसाठी तोबा गर्दी होत असल्याने आजच आपलं तिकीट आरक्षित करून मनोरंजनाचा हा खजिना लुटावा.

दस्तुरखुद्द लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेला हा भन्नाट मल्टीस्टारर ‘वऱ्हाडी वाजंत्री’ रसिकांसाठी विनोदाचा महाबंपर सरप्राईज घेऊन येत असून मकरंद अनासपुरे या विनोदाच्या हुकमी एक्क्यासह जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, विजय कदम, जयवंत वाडकर, रिमा लागू यांसह पॅडी कांबळी आणि हेमांगी कवी या छुईमुई जोडीला बोहल्यावर चढवण्यासाठी जगनकुमार अर्थात मकरंद अनासपुरेंनी ११ नोव्हेंबरचा मुहूर्त काढला आहे.

लग्न ही जगात प्रत्येकासाठी विलक्षण गोष्ट असते. वधूवर व त्याच्या नातेवाईकांसाठी हा अनुभव अविस्मरणीय असतो. पारंपरिक लग्नसोहळ्याची जागा हायटेक ‘मॅरेज इव्हेंट्स’नी घेतली आणि त्यासोबत ‘शादीराम घरजोडे’ जाऊन ‘सुटाबुटातला मॅरेजगुरु’ डॉटकॉमसोबत नवदांपत्यांचे प्री-वेंडिंग करत मेहेंदी – संगीत पार्ट्यांमध्ये धम्माल कम्माल करीत आहेत. अशीच जबरदस्त थीम घेऊन आपल्या एका मॅरेज इव्हेंट कंपनीद्वारे जगनकुमार अर्थात आपला लाडका मक्या…पंचक्रोशीतला मॅरेजगुरू झालाय…! आजमितीस या अवलियाने भन्नाट हुशारीतून ९९ ची खेळी पार केलीय … सचिनसारखी सेंचुरी करण्यासाठी तो कमालीचा उतावळा झालाय…. या रेकॉर्डब्रेक कामगिरीसाठी चक्क दादासाहेबांची बहीण ‘परी’ आणि ताईसाहेबांचा भाऊ ‘युवराज’ला बोहल्यावर चढविण्याचा चंग बांधून वरातीमागून घोडे दौडवण्यास तो सज्ज झालाय…. असं साधारण कथा बीज घेऊन ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटाचा रसाळ संगीतमय विनोदी प्रवास सुरु होतो. वैभव अर्जुन परब लिखित “वऱ्हाडी वाजंत्री” मध्ये मकरंद अनासपुरेंसोबत जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, रीमा लागू, पंढरीनाथ कांबळी, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, राजेश चिटणीस, प्रशांत तपस्वी, विनीत बोंडे, जयवंत भालेकर, शिवाजी रेडेकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे इत्यादी कलाकार आहेत.

जिल्ह्यात १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

पुणे, दि. १०: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये शनिवार १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.

या लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेली दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात नुकसान भरपाई, कलम १३८ निगोशिएबल इन्स्टुमेंट्स अॅक्ट, भूसंपादन, कौटुंबिक प्रकरणे, औद्योगिक कामगार व सहकार न्यायालयातील प्रकरणे मोठया प्रमाणात ठेवण्यात आलेली आहेत. तसेच विविध बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था तसेच विविध ग्रामपंचायती व पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड मनपा यांचेकडील घरपट्टी, पाणीपट्टीची प्रकरणे, बीएसएनएल, आयडिया व्होडाफोन, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, आदींकडील बाकी असलेली देयके इत्यादी दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्याकरीता मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली आहेत.

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून घेण्यात आलेल्या मागील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ८ हजारपेक्षा अधिक प्रकरणे निकाली काढत पुणे जिल्ह्याने राज्यात आपले प्रथम स्थान कायम ठेवले आहे. लोकन्यायालयात प्रकरण मिटल्याने दोन्ही पक्षकारांमध्ये जिंकल्याची भावना निर्माण होते तसेच दोन्ही पक्षकारांचा पैसा, वेळ व श्रमाची बचत होते.

या लोकअदालतमध्ये अद्यापही ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे घेऊन तडजोडीने निकाली काढण्याची इच्छा आहे त्या पक्षकारांनी आपापल्या न्यायालयात अर्ज करुन विनंती करावी. किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुक्याचे ठिकाणी तालुका विधी सेवा समिती कार्यालयाकडे संपर्क साधावा. जास्तीत जास्त पक्षकारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्रीमती मंगल दीपक कश्यप यांनी केले आहे.

सात लोक अदालतीतील ठळक नोंदी

-१२ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या लोक अदालतीत १३ हजार ५६१ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये ५ हजार २२६ प्रलंबित तर ८ हजार ३३५ दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.

-१ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या लोक अदालतीत ३३ हजार ६१ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये १५ हजार ५६२ प्रलंबित तर १७ हजार ४९९ दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.

-२५ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या लोक अदालतीत ३ लाख १७ हजार ८३६ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये ८ हजार ९६३ प्रलंबित तर ३ लाख ८ हजार ८७३ दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.

-११ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या लोक अदालतीत २ लाख ६० हजार ४१५ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये ८ हजार ७७१ प्रलंबित तर २ लाख ५१ हजार ६४४ दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.

-१२ मार्च २०२२ रोजी झालेल्या लोक अदालतीत ४६ हजार ६५९ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये १६ हजार ६९५ प्रलंबित तर २९ हजार ९६४ दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.

-७ मे २०२२ रोजी झालेल्या लोक अदालतीत ३२ हजार ९६ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये ११ हजार ७८ प्रलंबित तर २१ हजार १८ दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.

-१३ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या लोक अदालतीत ८ हजार १८ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये ३ हजार ४ प्रलंबित तर ५ हजार १४ दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.

कनेक्टिव्हिटी, डिजिटल मीडिया बनतेय मूलभूत गरज

पुणे १० नोव्हेंबर: “अन्न, वस्त्र, निवारा आणि कनेक्टिव्हीटी या आजच्या काळातील मूलभूत गरजा आहेत. डिजिटल मीडिया आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. याच गोष्टीचा लाभ घेण्यासाठी माध्यमे, राजकारण आणि उद्योग यांचे विलीनीकरण होताना दिसतेय. माध्यमांचा उपयोग करून आपले स्थान मजबूत करण्यावर राजकारण्यांकडून भर दिला जात आहे,” असे प्रतिपादन राज्यसभा खासदार आणि प्रसारभारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कुल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनच्या वतीने आर. के. लक्ष्मण म्युझियम, मुंबई प्रेस क्लब, द फॉरेन करस्पॉंडंट क्लब आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सहयोगाने विश्वराज बाग, लोणी काळभोर येथील विश्वशांती सभागृहात (घुमट) आयोजित तीन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी एशियन न्यूज इंटरनॅशनलच्या (एएनआय) संपादिका स्मिता प्रकाश, ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक राशीद किडवई, आर. के. लक्ष्मण म्युझियमच्या संचालिका उषा लक्ष्मण, एमआयटी वर्ल्ड पीसी युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, प्र-कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, स्कुल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनचे संचालक धीरज सिंह, दूरदर्शनचे माजी महासंचालक मुकेश शर्मा, विद्यार्थी प्रतिनिधी इर्तिका एजाज, तेजस कोल्हटकर आदी उपस्थित होते.

एनडी टीव्हीचे वरिष्ठ संपादक सुशीलकुमार महापात्रा (ब्रॉडकास्ट), मुक्त पत्रकार रवलीन कौर (प्रिंट) व मुक्त पत्रकार नीतू सिंग (डिजिटल) यांना पहिला ‘जर्नालिझम फॉर पीस’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
जवाहर सरकार म्हणाले, “कोविड काळात ओटीटी, मोबाईल जर्नालिझमने आपले स्थान प्रस्थापित केले आहे. त्यामुळे वृत्तपत्रे, वाहिन्या यांसह सोशल मीडिया, डिजिटल मीडिया या नवमाध्यमांचा प्रभाव मोठा आहे. निर्भया प्रकरण, अण्णा हजारे यांचे आंदोलन, नरेंद्र मोदी यांचे लॉन्चिंग यामध्ये या नवमाध्यमांचा फार प्रभावी उपयोग केला गेला. फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप द्वारे परिवर्तनाच्या मोहीमा राबवल्या गेल्या. आज ही माध्यमे आपल्या प्रत्येकाच्या हाती आल्याने प्रत्येकाला आवाज उठवण्याची संधी मिळाली आहे.”
स्मिता प्रकाश म्हणाल्या, “माध्यमांचे विविध पर्याय उपलब्ध झाल्याने सामान्य नागरिकही आवाज उठवू शकतो. सोशल मीडियाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकाच्या हाती नवी माध्यमे आल्याने स्वतःकडे लक्ष खेचून घेण्याची स्पर्धा लागली आहे. त्यातून गोंधळाचे वातावरण, चीड आणि नकारात्मता तयार होत आहे. मात्र, अशा गोंधळ घालणाऱ्यांपासून आपण सावध राहत नैतिकता आणि तत्वनिष्ठता जपायला हवी. भारतातील माध्यम उद्योग व्यापक आहे. येथे २३ पेक्षा अधिक भाषेत वृत्तपत्रे निघतात. ९०० पेक्षा अधिक सॅटेलाईट चॅनेल्स असून, हजारो डिजिटल चॅनेल्स व पोर्टल्स यामुळे वेगवेगळ्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत.”
रशीद किडवई म्हणाले, “कालानुरूप माध्यमे   बदलली, तशी आव्हानेही बदलली. या आव्हानांना समजून घेत समाजहिताची पत्रकारिता करण्यावर आपण भर द्यावा. सदोष निवडणूक प्रक्रियेमुळे माध्यमांचा गैरवापर, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो. पत्रकारांना थेट महत्वाच्या व्यक्तींपर्यंत पोहोचता येते, या भावनेतून अनेक राजकारणी, उद्योजक माध्यमे हाताशी धरतात किंवा माध्यम संस्था सुरु करतात. गेल्या काही काळात मोबाईल, इंटरनेट व सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे अनेक माध्यमे उदयास येत आहेत.”
उषा लक्ष्मण म्हणाल्या, “आपल्या कुंचल्यातून जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वच पंतप्रधानांच्या कालखंडावर आर. के. लक्ष्मण यांनी भाष्य केले. ‘कॉमन मॅन’ला वेगळी ओळख दिली. चांगल्या-वाईट गोष्टीवर व्यंग्यचित्रांतून आवाज उठवत सामान्य माणसांचे प्रश्न त्यांनी मांडले. सर्वच राजकारण्यांनी त्यांच्या या अभिव्यक्तीचा आदर केला. आपल्या हाती असलेल्या माध्यमांचा उपयोग विधायकपणे करून सामान्य माणसाला न्याय देण्याची आपली भूमिका असायला हवी.”
प्रा. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, “लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांवर समाजप्रबोधन, परिवर्तनाचे दायित्व आहे. समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असावे. सोशल मीडियाच्या प्रभावी काळात संवादाभिमुख व शांततापूर्ण वातावरणात समाजाहिताची पत्रकारिता होणे गरजेचे आहे. जातीयवाद, धर्मिकता, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीला आळा घालून विकासाच्या मुद्यांवर बोलणारी पत्रकारिता ही आजची गरज आहे.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी उपस्थितांना ऑनलाईन स्वरूपात मार्गदर्शन केले. सुशीलकुमार महापात्रा, नीतू सिंग, रवलीन कौर यांनी सत्काराला उत्तर दिले. स्वप्नील बापट, मुकेश शर्मा यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. रवीकुमार चिटणीस यांनी ‘एमआयटी’ मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची विस्तृत माहिती दिली. धीरज सिंग यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गुरुप्रसाद राव यांनी आभार मानले.

राज्य लोकसेवा आयोगाच्या इमारतीसाठी २८२ कोटी २५ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता

0

मुंबई, दि. 10 : राज्य लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील बेलापूर येथील नियोजित इमारतीसाठी राज्य शासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आता या इमारतीसाठी 282 कोटी 25 लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून आयोगाच्या कार्यालयासाठी प्रशासकीय इमारत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू होते आयोगाकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला शासनाकडून सुधारित मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता नियोजित इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल प्रशासकीय मान्यता मिळाल्याने इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

देशातील सर्वात मोठे, सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज आणि माहिती तंत्रज्ञानाचा अविष्कार असणारे हे मुख्यालय असणार आहे. भाडे तत्वावर चालणारे एमपीएससीचे आता स्वतंत्र मुख्यालय होणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून एमपीएससीचे प्रशासकीय कामकाज हे बँक ऑफ इंडियामधील इमारती मधून चालू होते, आयोगाचा विस्तार वाढत गेला, आयोगाची व्याप्ती देखील वाढत गेली. माझगाव डॉक येथे दुसरे कार्यालय आयोगाला घ्यावे लागले. त्यानंतर टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग येथे देखील आयोगाचे कार्यालय सुरु आहे. आता ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी येणार असल्याने कामकाजात सुसूत्रता आणणे शक्य होणार आहे.

कीस्टोन रियल्टर्स लिमिटेडचा आयपीओ १४ नोव्हेंबर २०२२ रोजी खुला होणार

·         कीस्टोन रियल्टर्स लिमिटेडच्या प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी शेयरसाठी प्राईस बँड ५१४ ते ५४१ रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे.

·         ऑफर खुली होण्याची तारीख – सोमवार १४ नोव्हेंबर २०२२ आणि ऑफर बंद होणार बुधवार १६ नोव्हेंबर २०२२.

पुणे : “रुस्तमजी” या ब्रँड नावाने चालवली जाणारी आणि ज्या बाजारपेठांमध्ये कार्यरत आहे त्याठिकाणी विकल्या गेलेल्या युनिट्सच्या संख्येच्या आधारे एक आघाडीची स्थावर मालमत्ता विकासक कंपनी कीस्टोन रियल्टर्स लिमिटेडचा आयपीओ १४ नोव्हेंबर २०२२ रोजी खुला होणार आहे.

प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी शेयरसाठी प्राईस बँड ५१४ ते ५४१ रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी २७ इक्विटी शेयर्स आणि त्यापुढे २७ च्या पटीत बोली लावावी लागेल.

आयपीओमध्ये ५६००.०० मिलियन रुपयांपर्यंतचे नव्याने जारी करण्यात आलेले व ७५०.०० मिलियन रुपयांपर्यंतचे विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आलेले शेयर्स आहेत. आपले समभाग विक्रीसाठी प्रस्तुत करत असलेल्या समभागधारकांमध्ये बोमन रुस्तम इराणी (३७५.०० मिलियन रुपयांपर्यंतचे), पर्सी सोराबजी चौधरी (१८७.५० मिलियन रुपयांपर्यंतचे) आणि चंद्रेश दिनेश मेहता यांच्याकडून १८७.५० मिलियन रुपयांपर्यंतचे समभाग आहेत.

नव्याने जारी करण्यात आलेल्या समभागांच्या विक्रीतून उभी राहणारी रक्कम कंपनीच्या आणि/किंवा त्यांच्या काही उपकंपन्यांच्या कर्जांची पूर्ण किंवा अंशतः परतफेड करण्यासाठी आणि भविष्यातील स्थावर मालमत्ता प्रकल्पांच्या फंडिंगसाठी तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी वापरली जाईल.

ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, १९५७ च्या नियम १९ (२) (बी) अनुसार,  संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम ३१ नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत आणि सेबी आयसीडीआर नियमांच्या कलम ६(१) ला अनुसरून देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी ५०% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील. यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी ६०% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील. क्यूआयबी पोर्शनपैकी ५% (अँकर इन्व्हेस्टर पोर्शन वगळता) हे विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. पण जर म्युच्युअल फंडांकडून आलेली एकूण मागणी ही नेट क्यूआयबी पोर्शनच्या ५% पेक्षा कमी असेल तर म्युच्युअल फंड पोर्शनमध्ये वाटपासाठी उपलब्ध असलेले उरलेले इक्विटी शेअर्स हे क्यूआयबीना वाटपासाठी उरलेल्या नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये समाविष्ट केले जातील. या नेट ऑफरमधील कमीत कमी १५% भाग क्वालिफाईड नॉन-इन्स्टिट्यूशनल बिडर्सना (“नॉन-इन्स्टिट्यूशनल पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील त्यापैकी एक तृतीयांश भाग २,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि १०,००,००० रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी आणि यापैकी दोन तृतीयांश भाग १०,००,००० रुपयांपेक्षा जास्त अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवण्यात आला आहे, जास्तीत जास्त ३५% भाग सेबी आयसीडीआर नियमांनुसार रिटेल व्यक्तिगत बोली लावणाऱ्यांसाठी उपलब्ध करवून दिला जाईल. यासाठी ऑफर किमतीपेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे. सर्व संभाव्य बिडर्स बोली लावणारे सर्व (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या  खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.

रेड हेररिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत केले जात असलेले इक्विटी समभाग हे बीएसई व एनएसईमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.

या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि क्रेडिट सूस सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत.

टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडला महाराष्ट्रात १५० मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यासाठी ‘लेटर ऑफ अवॉर्ड’ मिळाले

0

पुणे १० नोव्हेंबर २०२२: टाटा पॉवरची उपकंपनी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडला (टीपीआरईएल) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एमएसईडीसीएल) महाराष्ट्रात सोलापूरमध्ये १५० मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यासाठी लेटर ऑफ अवॉर्ड‘ मिळाले आहे. 

ई-रिव्हर्स ऑक्शननंतर झालेल्या टॅरिफवर आधारित स्पर्धात्मक बोली प्रक्रियेमार्फत टीपीआरईएलने हे लेटर ऑफ अवॉर्ड जिंकले आहे. वीज खरेदी करार लागू करण्यात आलेल्या तारखेपासून १८ महिन्यांमध्ये हा प्रकल्प सुरु करण्यात येईल.

हा प्रकल्प मिळाल्याबद्दल टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडचे सीईओ श्री. आशिष खन्ना म्हणाले, १५० मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी एमएसईडीसीएलकडून लेटर ऑफ अवॉर्ड जिंकल्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. अधिक हरित भविष्य साकार करून परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक पर्यावरणपूरकशाश्वत इकोसिस्टिम निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अनुसरून आहे. जागतिक दर्जाचे सौर प्रकल्प निर्माण करण्याची आमची क्षमता यामधून पुन्हा एकदा दिसून आली आहे.”

या प्रकल्पामुळे आता टीपीआरईएल ची एकूण नूतनीकरणीय ऊर्जा क्षमता ५७८६ मेगावॅटवर पोहोचली आहे, यामध्ये संस्थापित क्षमता ३८७७ मेगावॅट (सौर २९४९ मेगावॅट आणि पवन ९२८ मेगावॅट) आणि १९०९ मेगावॅट क्षमतेचे काम अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर सुरु आहे.

सर्व रस्त्यांचे नकाशे कागदावरील रुंदी,अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे याबाबतची माहिती पोलीस अधिकारी महापालिकेकडून मागविणार

पुणे-शहरातील वाहतूक नियोजनासाठी आता सर्व पोलिस उपायुक्तांवर विभागून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार पुर्व आणि पश्चिम विभाग वर्गवारीनुसार सर्व पोलीस उपायुक्तांना नियुक्त करण्यात आले आहे.हे सर्व पोलीस अधिकारी आता महापालिकेकडून रस्त्यांचे अधिकृत नकाशे , त्यांची अधिकृत कायदेशीर रुंदी या सह तिथे असलेली अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे याबाबतची माहिती लेखी स्वरूपात मागविणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वाहनांची संख्या वाढली त्या प्रमाणात रस्ते किंवा रस्त्यांच्या रुंदी आणि वाहनतळ वाढलीत काय ? सध्या काय अवस्था आहे आणि यावर काय करायला हवे यासठी पोलिसांचे खास पथक काम करेल असे सांगण्यात येते आहे .यावरून महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागासह अतिक्रमण विभागाच्या कामाची कसोटी येत्या काळात लागणार असल्याचे स्पष्ट आहे. साईड मार्जिनमधील अतिक्रमणे , पुढे सरकलेली दुकाने , इमारती ,प्रत्यक्षात ४ मजली इमारत शक्य आहे तिथे ८ मजली इमारती, पोटमाळे असा कारणांमुळे येथील वर्दळ संख्या वाढते आणि त्यामुळे वाहनाची संख्या हि त्या त्या ठिकाणी वाढते हे पोलिसाच पालिकेला दाखवून देणार काय ? असा सवाल यामुळे उपस्थित होतो आहे.

संबंधित अधिकारी यांना स्पॉटवर जाउन पाहणी करीत वारंवार होणारी वाहतूककोंडी, आवश्यक उपाययोजना, सिग्नल यंत्रणेसह गर्दीची ठिकाणांचा अहवाल तयार करावा लागणार आहे. अहवाल पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सहआयुक्त संदीप कर्णिक यांना सादर करण्यात येणार आहे. वाहतूक नियमनाच्या अभ्यासासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी उपक्रम हाती घेतला आहे.

वाहतूककोंडी दूर करण्यासाठी पुणे पोलिसांकडून दरदिवशी नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ठिकठिकाणांची वाहतूक सुरळित होण्यास मदत झाली आहे. दरम्यान, आता नव्याने हजर झालेल्या सर्व पोलीस उपायुक्तांकडेही वाहतूकीचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील 70 ते 80 ठिकाणी वारंवार होणाऱ्या कोंडीचा उपायुक्तांकडून अभ्यास केला जाणार आहे. त्यांच्याकडून घटनास्थळी जाउन वाहतूक पोलीस निरीक्षकांसोबत हद्दीतील वाहतूकीचा अभ्यास करावा लागणार आहे. तसेच, सिग्नल नियोजन करणे, परिसरातील अतिक्रमण, स्थानिक पथारीवाले, दररोज चौकातून मार्गस्थ होणारी वाहनसंख्येचीही माहिती घेतली जाणार आहे. पुर्व आणि पश्चिम विभागात प्रत्येकी तीन उपायुक्तांनी संपुर्ण वाहतूकीसंदर्भात माहिती काढून उपाययोजना सुचवावी लागणार आहे.

चौका-चौकात अधिकारी कर्मचाऱ्यांची फौज वाहतूक नियमनासाठी दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूकीचा वेगही वाढला असल्याचे दिसून आले आहे. माय सेफ पुणे सिस्टीमद्वारेही वाहतूक नियमनाचा आढावा घेतला जात आहे. त्याशिवाय आता थेट सर्वच पोलिस उपायुक्तांकडे आपआपल्या हद्दीतील वाहतूकीचा आढावा घेउन अहवाल तयार करावा लागणार आहे. येत्या आठवड्याभरात संबंधित अहवाल सादर केल्यानंतर त्यानुसार उपाययोजना राबविण्यात येणार आहे. आगामी काही दिवसांत वाहतूक नियमनासाठी पुन्हा एकदा नाविण्यपुर्ण प्रयोग राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांची कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे.

शहरभरातील वाहतूकीचा अभ्यास करण्यासाठी सर्वच पोलीस उपायुक्तांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार अधिकारी ऑनफिल्ड जाउन वेगवेगळ्या बाजूंनी माहिती तयार करणार आहेत. त्याचा अहवाल प्राप्त होताच, संबंधित हद्दीतील वाहतूक नियोजनासाठी आणखी प्राधान्य देण्यात येणार आहे. वाहतूक नियमन आणि विविध उपाययोजनांद्वारे कोंडी फोडण्यास प्राधान्य दिले आहे.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून दोन अनाथांचे शैक्षणिक पालकत्व

केळेवाडीतील ओंकार आणि तेजश्रीला मिळाला मोठा आधार!

पुणे-कर्तृत्व, दातृत्व आणि नम्रता या तिन्ही गुणांचे मिश्रण म्हणजे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य आणि पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील! समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. त्याचा पुन्हा एक नवीन प्रत्यय कोथरुडकरांना अनुभवायला मिळाला. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळे कोथरुड मतदारसंघातील दोन अनाथ मुलांना मोठा आधार मिळाला आहे.

कोथरुडमधील केळेवाडी भागातील ओंकार आणि तेजश्री पवार ही दोन अशी रत्ने, जी शिक्षणासाठी अतिशय खडतर परिश्रम घेत आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असूनही येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा समर्थपणे सामना करुन शिक्षणासाठी धडपडत आहेत. पण काही दिवसांपूर्वीच या दोघाही भाऊ-बहिणींचे आई-वडिलांचे छत्र हरपले अन् त्यांच्यावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला.

त्यानंतर दोघांनाही त्यांची आजी रेखा शिंदे यांनी आधार दिला. रेखा शिंदे यांनी घरकाम करुन आपला आणि ओंकार व तेजश्रीचा उदरनिर्वाह, तसेच शिक्षणाचा भार उचलला. सर्वकाही सुरळीत सुरु होते, पण तेवढ्यात दोन्ही भाऊ-बहिणीला पुन्हा धक्का सहन करावा लागला. आजी रेखा शिंदे यांना अर्धांगवायूचा तीव्र धक्का आल्याने, त्या अंथरुणाला खिळल्या. त्यामुळे आर्थिक उत्पन्नच थांबले. परिणामी संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. तसेच शिक्षणाची ही आबाळ झाली.

ओंकार आणि तेजश्रीचे आईने निधनापूर्वी दोन्हीही मुलांचे शैक्षणिक शुल्क शाळेत भरले होते. पण तरीही गणवेश आणि शैक्षणिक साहित्य नसल्याने, अभ्यासात अनंत अडचणी येऊ लागल्या. त्यानंतर दोघाही भाऊ-बहिणींनी एक दिवस कोथरुडचे आमदार आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपली व्यथा माननीय दादांसमोर मांडली.

त्यानंतर चंद्रकांत दादांनीही दोघांचे दु: ख दूर केले. लोकसहभागातून ओंकार आणि तेजश्रीला सर्वप्रकारे शैक्षणिक मदत उपलब्ध करुन देण्याची ग्वाही देऊन, तात्काळ आपल्या कार्यकर्त्यांकडून शैक्षणिक साहित्य आणि गणवेश उपलब्ध करुन दिला. तसेच, दोघांच्याही उत्तम शिक्षणासाठी शैक्षणिक पालकत्वाची घोषणा केली. माननीय दादांच्या कृतीचे सर्वांकडून कौतुक होत असून, ओंकार आणि तेजश्रीच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमलले आहे. दोघेही पुन्हा एकदा नव्या जोमाने अभ्यास सुरु केला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ‘मिसींग लिंक’ प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि.१०: जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. डिसेंबर २०२३ हा प्रकल्प पूर्णत्वास येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या लांबीतील नवीन मार्गिकेच्या (मीसिंग लिंक) प्रकल्पाला भेट देऊन लोणावळा (सिंहगड संस्था) येथे सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) महासंचालक राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर आदी उपस्थित होते

‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे काम अतिशय आव्हानात्मक होते. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास ५०० ते ६०० फूट अंतरावर हा बोगदा आहे. बोगद्याची लांबी ८ कि.मी. असून जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्याची रुंदी २३.७५ मीटर असून देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक रुंदीचा हा बोगदा आहे. मिसींग लिंक प्रकल्पामुळे मुंबई पुणे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. बोगद्यामुळे घाटाचा भाग पूर्णतः टाळला जाऊन अपघातसंख्येत मोठी घट होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, या प्रकल्पामुळे प्रवास सुखकर होणार आहे. वाहतूक कोंडी कमी होईल. त्याशिवाय प्रदुषण कमी होणार असून इंधनाची तसेच वेळेची बचत होईल. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. प्रवाशी, वाहने यांच्या सुरक्षेचा यामध्ये विचार करण्यात आला आहे. दरडी कोसळू नये यासाठी सर्वत्र ‘रॉक बोल्ट’ करण्यात आले आहे. काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बाहेर जाण्यासाठी प्रत्येक ३०० मीटरवर एक्झीट मार्ग तयार करण्यात आलेले आहेत. बोगद्याच्या भिंतीला ५ मीटरचे कोटिंग असणार असून त्यावर आगप्रतिबंधक कोटींग करण्यात येणार आहे. अत्याधुनिक हाय प्रेशर वॉटर मिक्स यंत्रणा असून त्यामुळे आग लागल्यास ही यंत्रणा त्वरित कार्यान्वित होऊन आग विझेल, अशीही माहिती त्यांनी दिली.

यावेळी अधीक्षक अभियंता श्री. वसईकर यांनी प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाबद्दल मुख्यमंत्री महोदयांना माहिती दिली. कामाची गती राखून नियोजित वेळेआधी प्रकल्प पूर्ण करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

असा आहे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प
‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत लोणावळा (सिंहगड संस्था) ते खालापूर पथकर नाकापर्यंत मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढ करण्याचे काम सुरू आहे.

◾खालापूर टोलनाका ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाचे ८ पदरीकरनाचे ५.८६ कि.मी. चे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. या लांबी मध्ये ३ मोठे पूल. लहान पूल, पाईपकल्व्हर्ट, बॉक्सकल्व्हर्ट अंतर्भूत असून सद्य:स्थितीत ९० टक्के पेक्षा पूर्ण झाले आहे.

◾व्हायाडक्ट क्र. १ मधे ९०० मीटर लांबीचे दोन समांतर पूल असून डाव्या बाजूचे डेस्क स्लॅबचे व उजव्या बाजूच्या खांबांचे (पियर) बांधकाम प्रगतीपथावर आहे. व्हायाडक्टची डावी अंदाजे डिसेंबर २०२२ तसेच उजवी बाजु पुर्ण होण्यासाठी मार्च २०२३ एवढा कालावधी लागणार आहे.

◾बोगदा क्र. १: बोगदा क्र. १ च्या दोन समांतर बोगद्यां पैकी उजव्या बोगद्याचे एकूण १ हजार ५६० मीटरपैकी १ हजार ४५१ मीटर (मुंबईकडे) खोदकाम पूर्ण झाले असून डाव्या बोगद्याचे एकूण १ हजार ५३० मीटरपैकी १ हजार ४५५ मीटर (पुणेकडे) खोदकाम पूर्ण झाले आहे.

◾व्हायाडक्ट क्र. २: व्हायाडक्टक्र. २ हा ६५० मीटर लांबीचे दोन समांतर केबल स्ट cable stay पूल असून पायलॉनचे काम प्रगती पथावर आहे. यामध्ये एकूण ४ पायलॉन समाविष्ट असून त्याची उंची १८१.७८ मीटर एवढी आहे. हा व्हायाडक्ट सर्वोच्च उंचीच्या व्हायाडक्ट पैकी एक आहे. व्हायाडक्ट पूर्ण होण्याचा अंदाजित कालावधी डिसेंबर २०२३ पर्यंत आहे.

◾बोगदा क्र. २: बोगदा क्र. २ च्या दोन समांतर बोगद्यांपैकी उजव्या बोगद्याचे एकूण ८ हजार ७७६ मीटर पैकी ७ हजार ६९६ मीटर (मुंबईकडे) खोदकाम पूर्ण झाले असून डाव्या बोगद्याचे एकूण ८ हजार ८२२ मीटरपैकी ७ हजार ५२९ मीटर (पुणेकडे) खोदकाम पूर्ण झाले आहे. बोगद्यांची रुंदी २३ मीटर असून आशिया खंडातील सर्वात जास्त रुंदीचा बोगदा होणार आहे. मुंबई व पुणेकडे जाणारे दोन्ही बोगदे दर ३०० मीटर अंतरावर एकमेकांस क्रॉस पँसेजद्वारे जोडण्यात येत आहेत.

◾कुसगाव येथील डायव्हर्जन रोड: कुसगाव येथील बोगदा क्र. २ च्या एक्झीटच्या ठिकाणी सध्याच्या द्रुतगती मार्ग वळण (डायव्हर्जन )मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु असून कामाची डावी बाजू नोव्हेंबर २०२२ व उजवी बाजू डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. हा रस्ता ‘मिसिंग लिंक’चा वापर न करणाऱ्या वाहनांसाठी तसेच लोणावळा येथे जाणाऱ्या वाहनांसाठी वापरण्यात येईल.

◾पथकर नाका विस्तारीकरण: पथकर नाक्यावरील प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले खालापूर व उर्से या दोन पथकरनाक्यांचे विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. या दोन्ही ठिकाणी सध्या असलेल्या दोन्ही बाजूच्या प्रत्येकी ८ ऐवजी १७ पथकर बूथ सुरू होणार आहेत.

धनकवडी,हडपसर, कोंढव्यातील पान टपऱ्यांवर छापे

प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त

पुणे, दि. १० : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने पुणे जिल्ह्यात सुमारे ५० हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.गार्णीश पान दुकान, त्रिमूर्ती चौक, धनकवडी आणि मे. न्यु जयनाथ पान दुकान, आंबेगाव, पुणे या दोन ठिकाणी धाड टाकून प्रतिबंधित पदार्थाचा सुमारे ९ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे. या दोन जणांविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे.

मे. नटराज पान दुकान, भाजीपाला बाजार, हडपसर, शरणअप्पा बेलुरे यांचे सुंदर कॉलनी, पवार नगर, थेरगाव येथील निवासस्थान, मे. भगवानबाबा पान दुकान, कोंढवा बु. , मे. प्रिया पान स्टॉल, चिंचवड स्टेशन, चिंचवड या चार ठिकाणी धाडी टाकून प्रतिबंधित पदार्थाचा सुमारे ४१ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे. या चार जणांविरुद्ध संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करुन चौघांना अटक करण्यात आली आहे.

पुणे विभागातील सर्व किराणा, पान टपरी अशा अन्न पदार्थाच्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानातून प्रतिबंधित पदार्थाची विक्री करु नये. अन्न किंवा औषध संबंधात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास शैक्षणिक, उद्योग कर्ज योजनांसाठी केंद्राकडून निधी

0

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई, दि. १० –मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज तर उद्योग- व्यवसायासाठी मुदत कर्ज आणि सूक्ष्म पतपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून निधी कर्जस्वरुपात उपलब्ध झाला असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी महामंडळाकडे अर्ज करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

अल्पसंख्याक विभागाच्या शैक्षणिक कर्ज, मुदत कर्ज आणि सूक्ष्म पतपुरवठा योजनेचा लाभ घेण्यासाठी उद्या, दि. ११ नोव्हेंबर रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीदिनापासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व जिल्हा कार्यालयांमध्ये हे अर्ज स्वीकारले जाणार असून या कार्यालयांचे पत्ते व संपर्क महामंडळाच्या www.mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या योजनांतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना १८ डिसेंबर रोजी अल्पसंख्याक अधिकार दिनी कर्ज वाटप करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. महामंडळामार्फत अल्पसंख्याकासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

कर्ज योजनांचे स्वरुप
केंद्र शासनाकडून मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला कर्ज स्वरुपात निधी उपलब्ध झाला आहे. या निधीमधून विविध कर्ज योजना राबविण्यात येणार असून या योजनांची राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळ, नवी दिल्ली यांनी दोन गटात विभागणी केली आहे.

● शैक्षणिक कर्ज योजना
शैक्षणिक कर्ज योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या गटात देशांतर्गत शिक्षणासाठी २० लाख रुपये तर विदेशातील शिक्षणासाठी ३० लाख रुपयांची कर्ज मर्यादा निश्चित केली आहे. पहिल्या गटात शहरी भागासाठी १.२० लाख तर ग्रामीण भागासाठी ९८ हजार आणि दुसऱ्या गटात ८ लाख रुपयांची उत्पन्नमर्यादा ठेवण्यात आली आहे.

● मुदत कर्ज योजना
मुदत कर्ज योजनेसाठी पहिल्या गटात २० लाख तर दुसऱ्या गटात ३० लाख रुपयांची कर्जमर्यादा असून उत्पन्नाची मर्यादा शैक्षणिक कर्ज योजनेप्रमाणेच निश्चित केली आहे.

● सूक्ष्म पतपुरवठा योजना
सूक्ष्म पतपुरवठा योजनेत पहिल्या गटात प्रत्येक सदस्य एक लाख रुपयांप्रमाणे २० सदस्यांच्या एका गटास २० लाखांपर्यंत तर दुसऱ्या गटात प्रत्येकी सदस्य दीड लाखाप्रमाणे २० सभासदांना ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज मर्यादा आहे. या योजनेची उत्पन्न मर्यादादेखील शैक्षणिक आणि मुदत कर्ज योजनेसारखीच राहील. 
००००

आता १४ नोव्हेंबरला अनिल परब यांच्या रिसोर्टवर कारवाई – किरीट सोमैय्या

नवी मुंबई-महाराष्ट्र सरकारने अनिल परब यांच्या विरोधात चिटिंग फ्रॅाड फोरजरीसाठी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे मी उद्या रत्नागिरीत जाणार आहे. रत्नागिरी पोलीस माझा जबाब नोंदवून घेणार आहेत. काल भारत सरकारच्या याचिकेवर दापोली न्यायालयाने सी.आर.झेडमध्ये रिसॉर्ट बांधले म्हणून आणखी एक समन्स अनिल परब यांना बजावले आहे. आता अनिल परब यांना न्यायालयात देखील हजर राहावे लागणार आहे आणि हिशोब हा द्यावाच लागणार आहे, असे भाजपा नेते किरीट सोमय्या म्हणाले आहेत. तसेच माझ्या तक्रारीवरून १४ नोव्हेंबरला परब यांच्या रिसोर्टवर कारवाई केली जाणार आहे, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. परब यांच्या विषयी माहिती दिल्यानंतर प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानच्या कबरी शेजारील अतिक्रमण कारवाईबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी काढता पाय घेतला.आता हिशोब अनिल परबचा उद्या रत्नागिरीला जाऊन पोलिसांची भेट घेणार आहे. लवकरच अनिल परब यांच्या बेकायदा रिसोर्टवर कारवाई केली जाणार, अशी माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली. शुक्रवारी सोमय्या खाजगी कार्यक्रमासाठी नवी मुंबईतील ऐरोलीत आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी परबांना इशारा दिला आहे.
अनिल परब यांचा दापोलीतील रिसॉर्ट पाडण्यात येईल. यासाठी नऊ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात ठेकेदाराची नियुक्ती होईल. ९० दिवसांत अनिल परब याचे साई रिसॉर्ट पाडण्यात येईल”, असा दावा किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.दापोलीतील रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असून त्याच्या जमीन खरेदी व बांधकामात अनियमितता झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच या रिसॉर्टच्या आर्थिक व्यवहाराचा उल्लेख अनिल परब यांनी चार वर्षांपूर्वी जुलै २०१८ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या शपथपत्रात केला होता. या रिसॉर्टच्या वीजजोडणीसाठी अर्ज करतानाच त्यांनी घरपट्टीही भरली होती, असा दावा किरीट सोमय्यांचा दावा आहे. दरम्यान, या आरोपानंतर ईडीकडून अनिल परब यांची चौकशी सूरू आहे. या रिसॉर्टशी माझा काहीही संबंध नसून याप्रकरणी किरीट सोमय्या यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच अनिल परब यांनी दिली होती.