नांदेड -कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज येथे झालेल्या सभेत आरएसएस आणि काँग्रेसच्या लोकांमधील फरक सांगितला. राहुल यांनी केदारनाथ दर्शनातील किस्सा सांगितला. ते म्हणाले की, मला केदारनाथ येथे एक आरएसएसचे नेते भेटले होते. त्यांचं वजन साधारण १०० किलो असेल. दर्शन झाल्यावर त्यांना विचारलं काय मागितलं. तेव्हा ते म्हणाले की, मी चांगली प्रकृती मागितली. वास्तविक ते हेलिकॉप्टर ऐवजी चालत आले असते तर प्रकृती चांगली झाली असती. पण मी काही मागितलं नाही, मला रस्ता दाखवल्याबद्दल महादेवाचे आभार मानले. हा फरक आहे, सावरकर आणि गांधीजींच्या विचारांचा. हा फरक आहे काँग्रेस आणि आरएसएसमध्ये.. आम्ही बोलत नाही, करतो, असंही राहुल यांनी म्हटलं.
भारत जोडो यात्रेत अभूतपूर्व गर्दी आणि उत्साह आहे. राहुल गांधी यांच्या या यात्रेत वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील याही चालताना पाहायला मिळाल्या आहेत. बारा बलुतेदार, गोंधळी, बंजारा समाजाचे नेते असो की, शेतकरी सर्वजण या यात्रेत सहभागी झाले आहेत. महागाई आणि बेरोजगारीवर राहुल भर देत आहेत. या महिला आणि लहान मुलांशी राहुल गांधी यांनी संवाद साधताना दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली. त्यानंतर काही महिन्यांनी म्हणाले की, देशातून काळा पैसा निघाला नाही तर मला फासावर लटकवा. काय त्यांचे इमोशन, काय ते शब्द नंतर अश्रूही निघाले. त्यांचीही तपस्या आहे पण अश्रूवाली तपस्या आहे, असा टोला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान मोदींना लगावला.
राहुल गांधी म्हणाले, नोटबंदी, चुकीची जीएसटी, पाच वेगवेगळे कर, स्वतंत्र भारतात शेतकरी, त्यांचे अवजार, खतांवर कर लागला. विरोधक म्हणतात, ऐवढे पायी चालत आहेत काहीही फरक पडणार नाही. पण मी म्हणतो ही गोष्ट सहज आहे, चालणे सोपे आहे, मी थकत नाही. कारण शेतकरी, मजूर, कष्टकऱ्यांची शक्ती माझ्यामागे आहे.
राहुल गांधी म्हणाले, भारत देश तपस्वींचा आहे, महापुरुषांसमोर आपण हात जोडतो ते त्यांच्या कार्यामुळे तपस्येमुळेच. या देशातील शेतकरीही तपस्या करतो, सर्व वर्ग तपस्या करतो पण त्यांना फळ मिळत नाही. ते मेले तरीही त्यांना फळ मिळत नाही ही खंत आहे.
राहुल गांधी म्हणाले, नोटबंदीमुळे सर्वसामान्यजन त्रस्त झाले. काळे धन उलट वाढले आहे, शेतकरी त्रस्त आहेत. रोजगार हातातून गेले. महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प गायब झाले. तसेच तुम्हाला आश्वासन दिलेले पंधरा लाखही गायब झाले. भाजपच्या पाॅलिसीमुळे भय उत्पन्न होते.
राहुल गांधी म्हणाले, मनरेगा बंद करू असे सांगताच शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या मनात भय उत्पन्न होते. या भयाला नरेंद्र मोदी आणि भाजप द्वेषात बदलतात. भय आणि द्वेषाविरोधात आम्ही भारत जोडो यात्रा सुरू केली. कन्याकुमारी ते श्रीनगरपर्यंत 3600 किमी पायी चालत आहोत. कुणालाही विचार कष्ट होत नाही. मला लोकांकडून आनंद, प्रेम मिळत असून खूप गोष्टी शिकायला मिळत आहे. माझी यात्रा कुणी रोखू शकत नाही.
राहुल गांधी म्हणाले, मी केदारनाथला गेलो. तेथील मुख्यमंत्री मला म्हणाले की, हेलिकाॅप्टरने केदारनाथ जाऊ शकता. मी म्हटलो नाही, मी पायीच जाणार. मी सांगीतले की मी भगवान शंकराच्या मंदिरात जात आहे जे सर्वात मोठे तपस्वी आहेत. त्यांच्यासाठी मी पंधरा किमी चालु शकत नाही का? मी पायी गेलो. खूप थंडी होती. केदारनाथला जात आहोत याची अनुभूती थंडीमुळे होते. मी मंदिरात घुसत असताना आरएसएसचे नेते मला भेटले. मी त्यांना नमस्कार घातला. (त्यांचे वजन सुमारे शंभर किलो असेल) आम्ही आत जाताना त्यांच्या बाजूने एक नोकर होता. नोकराच्या डोक्यावर मोठी फळाची टोपली होती. मी पाहिले आणि म्हणालो, सर हे काय? ते म्हणाले, मी शंकराच्या चरणावर ठेवण्यासाठी फळ नेत आहेत. मी विचार केला अन् मनातच पुटपुटलो. ”तुम्ही नाही तुमच्या नोकराने आणले.”
मी म्हटलो, आपण सर्वात मोठ्या तपस्वीच्या मंदिरात आलात. तेही हेलिकाॅप्टरने..ते शांत बसले. मी म्हटलो शंकराला काय मागितले तेव्हा ते म्हणाले, मी सदृढ आरोग्य मागितले. मी मनात पुटपुटलो की,”तुम्ही जर केदारनाथला पायी आले असते तर सदृढ आरोग्य मिळाले असते.”
मी भगवान शंकराला काहीच मागितले नाही. पण शंकरापुढे मी नतमस्तक झालो आणि धन्यवाद दिले मी म्हटलो की, मला तुम्ही रस्ता दाखवला. हा फरक आरएसएस आणि काॅंग्रेसमध्ये आहे. गांधी आणि सावरकरमध्ये आहे. आम्ही सांगत नाही करतो.