शुक्रवार दिनांक ११ पासून अख्या महाराष्ट्राला खळखळून हसविण्यासाठी सर्वांचा लाडका अभिनेता मकरंद अनासपुरे २१ अवली विनोदवीर वाजंत्र्यांसोबत सज्ज झाला आहे. कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्यासह अतुल राजारामशेठ ओहोळ यांनी ही फुल्ल मनोरंजनाची ट्रीट ‘स्वराज फिल्म प्रॉडक्शन’द्वारे आणली आहे. त्यांची पहिलीच निर्मिती असलेला “वऱ्हाडी वाजंत्री” हा मल्टीस्टारर चित्रपट आजपासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ऍडव्हान्स बुकिंगसाठी तोबा गर्दी होत असल्याने आजच आपलं तिकीट आरक्षित करून मनोरंजनाचा हा खजिना लुटावा.
दस्तुरखुद्द लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेला हा भन्नाट मल्टीस्टारर ‘वऱ्हाडी वाजंत्री’ रसिकांसाठी विनोदाचा महाबंपर सरप्राईज घेऊन येत असून मकरंद अनासपुरे या विनोदाच्या हुकमी एक्क्यासह जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, विजय कदम, जयवंत वाडकर, रिमा लागू यांसह पॅडी कांबळी आणि हेमांगी कवी या छुईमुई जोडीला बोहल्यावर चढवण्यासाठी जगनकुमार अर्थात मकरंद अनासपुरेंनी ११ नोव्हेंबरचा मुहूर्त काढला आहे.
लग्न ही जगात प्रत्येकासाठी विलक्षण गोष्ट असते. वधूवर व त्याच्या नातेवाईकांसाठी हा अनुभव अविस्मरणीय असतो. पारंपरिक लग्नसोहळ्याची जागा हायटेक ‘मॅरेज इव्हेंट्स’नी घेतली आणि त्यासोबत ‘शादीराम घरजोडे’ जाऊन ‘सुटाबुटातला मॅरेजगुरु’ डॉटकॉमसोबत नवदांपत्यांचे प्री-वेंडिंग करत मेहेंदी – संगीत पार्ट्यांमध्ये धम्माल कम्माल करीत आहेत. अशीच जबरदस्त थीम घेऊन आपल्या एका मॅरेज इव्हेंट कंपनीद्वारे जगनकुमार अर्थात आपला लाडका मक्या…पंचक्रोशीतला मॅरेजगुरू झालाय…! आजमितीस या अवलियाने भन्नाट हुशारीतून ९९ ची खेळी पार केलीय … सचिनसारखी सेंचुरी करण्यासाठी तो कमालीचा उतावळा झालाय…. या रेकॉर्डब्रेक कामगिरीसाठी चक्क दादासाहेबांची बहीण ‘परी’ आणि ताईसाहेबांचा भाऊ ‘युवराज’ला बोहल्यावर चढविण्याचा चंग बांधून वरातीमागून घोडे दौडवण्यास तो सज्ज झालाय…. असं साधारण कथा बीज घेऊन ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटाचा रसाळ संगीतमय विनोदी प्रवास सुरु होतो. वैभव अर्जुन परब लिखित “वऱ्हाडी वाजंत्री” मध्ये मकरंद अनासपुरेंसोबत जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, रीमा लागू, पंढरीनाथ कांबळी, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, राजेश चिटणीस, प्रशांत तपस्वी, विनीत बोंडे, जयवंत भालेकर, शिवाजी रेडेकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे इत्यादी कलाकार आहेत.