Home Blog Page 1534

‘कॉन्शियसनेस’ विषय शैक्षणिक धोरणात आणावा-डॉ. विजय भटकर

:एमआयटी डब्ल्यूपीयूत प्रथम जागतिक
कॉन्शियसनेस – ‘द अल्टिमेट रियॅलिटी’ परिषदेचे उद्घाटन

पुणे, १४ नोव्हेंबरः “ मन शुद्धता हा विषय विद्यापीठ पातळीवर चर्चीला जाऊ शकतो. या विषयाला नविन शैक्षणिक धोरणामध्ये कशा प्रकारे आणता येईल हे पाहणे गरजेचे आहे . त्यासाठी सर्वांनी एकत्रीत येऊन प्रयत्न करावे. या विषयामुळे संपूर्ण मानव जात ही सुख,शांती आणि समाधानाचा अनुभव घेऊ शकेल.” असे विचार जागतिक कीर्तिचे संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (डब्ल्यूपीयू)च्या एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस अँड अल्टिमेट रियॅलिटी, पुणे तर्फे देशात प्रथमच जागतिक दर्जाची ‘कॉन्शियसनेसः द अल्टिमेट रियॅलिटी’ विषयावर कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत श्री ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी मा. महंत योगी अमरनाथ हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच, एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस अँड अल्टिमेट रियॅलिटीचे संचालक डॉ. जयंत खंदारे, प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. दीपक रानडे व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस उपस्थित होते.
डॉ. विजय भटकर म्हणाले,“मानवी जीवनात येणारे अनेक संकटे हे शुद्धतेच्या परिभाषेेने टाळता येऊ शकतात. त्यामुळे मानवी मन सदैव चैतन्य राहिल. वर्तमान काळ पाहता या विषय संदर्भातील परिषद ही देशातील सर्व शाळा व महाविद्यालयात घ्यावे. तसेच विद्यार्थ्यांना याचे अनिवार्य शिक्षण द्यावे. ”
“ कॉन्शसनेस मध्ये उच्च दर्जाचे ज्ञान प्राप्त होते. वैदिक ज्ञान, ४ उपनिषेद आणि उपवेद यात संपूर्ण जगाच्या अस्तित्वाचे ज्ञान समाविष्ठ आहे. स्व अनुभव घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चैतन्य स्वरूपात जाणे. या भूतलावर अध्यात्माचा अनुभव घेणे हे एक अलौकिक सत्य आहे. मोबाइल सारख्या साधनामुळे संपूर्ण जगाचे ज्ञान मिळत आहे. ब्रम्हांडाचे सत्य जाण्यासाठी त्याचा उपयोग करावा. त्या करीता अनेक भाषेचे ज्ञान असावे. या विश्वाकडे वैदिक दृष्टिकोनातून पाहण्याची आज गरज आहे. ”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “अविनाशी आत्मा आणि मनाचे खरे स्वरूप कळाल्यानंतर जीवन सुखमय होते. ओम आणि योग हे दोन शब्द सर्वात महत्वाचे असून तेच शांतीचे सर्वात मोठे सूत्र आहे. अद्वैत ज्ञान हे विज्ञानाचे तत्वज्ञान आहे.  संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितलेले ज्ञान, कर्म, आत्मा आणि मनाचे स्वरूप हे जगातिल कोणत्याही प्रयोगशाळेत सापडणार नाही. या परिषदेच्या नंतर जगातिल कोणत्याही विज्ञान परिषदेत आध्यात्मिक व्यक्तींना उंच दर्जाचे असे स्थान मिळेल. सद्गुणांची पूजा हीच ईश्वर सेवा असून त्या संदर्भात आत्मपरीक्षाची गरज आहे.”
डॉ. दीपक रानडे म्हणाले, भारतीय तत्वज्ञानाने जीवन जगण्याचा मार्ग दाखविला आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातून जीवनात सुख आणि आनंद प्राप्त होतो. संत ज्ञानेश्वर यांनी सांगितलेले सत्य हे अंतिम आहे.
त्या नंतर आयोजित प्रथम चर्चासत्रात डॉ. अ‍ॅलेक्सी हॅकी, डॉ. यूलिसी डी क्रोपो व स्वामी राधिकानंद सरस्वती , दुसर्‍या सत्रात डॉ. के रघू, आनंदी रविनाथ व डॉ. रामकृष्ण भट, आणि तिसर्‍या सत्रात महंत योगी अमरनाथ, विवेक सावंत आणि डॉ. मिलिंद पात्रे यांनी आपले विचार मांडले.
डॉ. जयंत खंदारे यांनी प्रस्ताविकेत परिषदेचे महत्व विषद केले.

 आव्हाड प्रकरण हे षडयंत्र नव्हे, कारवाई सुद्धा सूड भावनेने नाही, योग्य तपास होईल! मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई-जितेंद्र आव्हाड यांच्यावरील कारवाई सूड भावनेने झाली नाही. या प्रकरणात महिलेने तक्रार दिली. त्यात तथ्य आहे अथवा नाही याचा तपास केला जाईल. या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव पोलिसांवर नाही, अशी स्पष्टोक्ती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. ते माध्यमांशी मुंबईत बोलत होते.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राजीनामा दिला की, नाही याची माहिती मला नाही. पण त्या महिलेने गुन्हा दाखल केलेला आहे. पण यात पोलिस नियमानुसार गुन्ह्याची चौकशी, पडताळणी करतील. गुन्ह्यात तथ्य असेल नसेल पोलिस कारवाई करतील.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचे सरकार कुठल्याही स्थितीत राजकीय सूड भावनेतून कारवाई केली नाही. करणारही नाही. हे सरकार आमचे सरकार नियमानुसार चालते. नियमाने आणि लोकशाहीने चालणारे आमचे सरकार आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोकशाही मार्गाने आंदोलन करणे ठिक पण कुठल्याही स्थितीत कायदा हातात घेतला तर खपवून घेतले जाणार नाही. या राज्यात कायद्याने, शांततेने सलोख्याने राहतात, कुठलीही कारवाई सूड भावनेपोटी आम्ही करणार नाही. पोलिसांववर राजकीय दबाव नाही, आणि तो येणारही नाही.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या प्रकरणात कोणतेही षडयंत्र रचलेले नाही. जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत. कालच आम्ही एकत्र कार्यक्रमाला होता. त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचा पोलिसांवर दबाव नाही. ​​​पोलिस योग्य ती चौकशी करतील. प्रकरणात तथ्य असेल अथवा तथ्य नसेल त्यानुसार पोलिस योग्य तो तपास करून पुढील निर्णय घेईल. ​​​​

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर गुजरात निवडणुकीची जबाबदारी

पुणे – गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये त्यांना बडोदा व अहमदाबाद या विभागाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी पक्ष नेतृत्वाने सोपविली असल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले.

निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या असून राज्यात दोन टप्प्यात मतदान होणार आहे. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 98 जागांसाठी 1 डिसेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे.गुजरातमधील सर्व 182 जागांसाठी 8 डिसेंबरला एकाच वेळी मतमोजणी होणार आहे. गुजरातमध्ये 4.91 कोटी मतदार असून त्यापैकी 4.61 लाख नवीन मतदार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.

चव्हाण गुजरातमधील अहमदाबाद दौऱ्यावर पुढील 4 दिवस असतील. येथे ते राज्य व जिल्हानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मिटिंग घेऊन संवाद साधणार आहेत. गुजरात राज्याच्या पाच विभागाची जबाबदारी काँग्रेसने महत्वाच्या पाच नेत्यांवर सोपविली आहे त्यानुसार महाराष्ट्रातून काँग्रेसने माजी मुख्यमंत्री चव्हाण आणि खासदार मुकुल वासनिक यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.गुजरात काँग्रेस पक्षाचे प्रभारी म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तमरित्या जबाबदारी याआधी निभावली आहे. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसने २००४ मध्ये गुजरात मध्ये १२ खासदार निवडून आणले. त्याच वर्षी गुजरातच्या खासदारांच्या संख्येमुळे काँग्रेस हा लोकसभेत एक नंबरचा पक्ष ठरला होता आणि काँग्रेस पक्ष मित्र पक्षांच्या साहाय्याने सत्तेवर आला होता.

गुजरात विधानसभा निवडणूक 2022 साठी काँग्रेसने मुकुल वासनिक, मोहन प्रकाश, पृथ्वीराज चव्हाण, बीके हरिप्रसाद आणि केएच मुनियप्पा यांची विभागीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर 32 नेत्यांना लोकसभा निरीक्षक बनवण्यात आले असून त्यात प्रेमसाई सिंग टेकम आणि अशोक बैरवा यांच्या नावांचा समावेश आहे.

याशिवाय शकील अहमद खान, शिवाजी राव मोगे, कांतीलाल भुरिया, राजेश लिलोथिया आणि जय किशन यांना इतर निरीक्षक करण्यात आले आहेत. गुजरात विधानसभा निवडणूक 2022 संदर्भात आज ‘टास्क फोर्स-2024’ ची बैठक होणार आहे, ज्यामध्ये निवडणूक रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे.

.

मार्केटयार्ड मध्ये फायरिंग करत २८ लाखाचा दरोडा घालणारे दोन दिवसात पुणे पोलिसांनी पकडले.

मावळातील मोर्वेगाव येथील साई फार्म हाऊस मध्ये बसले होते लपून

पुणे : मार्केट यार्ड परिसरात अंगडीयाच्या कार्यालयात भरदिवसा घुसून गोळीबार करीत 28 लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या 7 दरोडेखोरांना पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अवघ्या दोन दिवसातच पकडले आहे.. हि घटना शनिवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड येथे घडली होती.”या गुन्ह्यातील दोन आरोपीना मोका लावलेला आहे, त्यामध्ये ते फरारी होते. आरोपी कारागृहात असतानाच त्यांनी दरोडा टाकण्याचा कट रचला. त्यानंतर त्यांनी हा गुन्हा केला. पोलिसांनी सात जणांना दोन दिवसातच त्यांना अटक केली.यात आणखी 4 ते 5 जण सहभागी असावेत जे अजूनही फरारी आहेत.” अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि तपास अधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली. पोलिसांनी आरोपींकडून आतापर्यंत 11 लाखाची रोकड, तीन दुचाकी, मोबाईल असा 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अविनाश उर्फ सनी रामप्रताप गुप्ता ( वय 20, मंगळवार पेठ), आदित्य अशोक मारणे (वय २८, रा. रामनगर,वारजे), दिपक ओम प्रकाश शर्मा ( वय १९, राहुलनगर, शिवणे), विशाल सतीश ( वय २०, मंगळवार पेठ), अजय बापू दिवटे ( वय २३, श्रीराम चौक, वारजे), गुरुजनसिंह सेवासिंह विरक (वय २२, वर्षे,शिवाजीनगर), निलेश बाळू (वय २०, एस. आर. ए. स्कीम, मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड येथील गेट नंबर दोन येथे गणराज मार्केट नावाची इमारत आहे. संबंधित इमारतीमध्येच द प्रोफेशनल कुरिअर नावाने अंगडीयाचा व्यावसाय चालतो. तर इमारतीच्या पाठीमागील बाजुस असलेल्या पोटमाळावजा जागेत त्याचे कार्यालय आहे. येथे शनिवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास अंगडीयाच्या कार्यालयात दोन कर्मचारी उपस्थित होते. ते काचेच्या केबिनमध्ये बसून त्यांचे नियमीत काम करीत होते.त्यावेळी एक व्यक्ती तेथे आला, त्यानंतर तो थेट कर्मचारी काम करीत असलेल्या काचेच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करु लागला.यातील एका कर्मचाऱ्याने त्यास धक्का देऊन बाहेर काढत दार लावून घेतले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने कोयता काढून केबिनची काच फोडली. तर त्याच्या मागून आलेल्या दुसऱ्या व्यक्तीने थेट पिस्तूल काढून जमिनीवर गोळी झाडली. त्यापैकी एकाने केबिनमध्ये घुसून तेथील रोकड बाहेरील व्यक्तीकडे दिली. त्यांनी रोकड पिशवीमध्ये भरुन तेथून पळ काढला. दरम्यान, इमारतीच्या बाहेर त्यांनी त्यांचे तीन साथीदार थांबविले होते. दरोडा टाकल्यानंतर पाचही जणांनी धावत जाऊन पुढे थांबलेल्या दोन दुचाकींवरुन पळ काढला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अतिरीक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त पौर्णिमा तावरे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित कार्यालय व रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण थाब्यात घेतले. त्यामध्ये दरोडेखोर दुचाकीवरुन शिवनेरी रस्त्याने पुणे सातारा रस्त्याच्या दिशेने गेल्याचे चित्रीकरणात दिसून आले होते. त्यादृष्टीने पोलिसांनी तांत्रिक तपास केला. त्यामध्ये आरोपी मावळ तालुक्यातील मोर्वेगाव येथील साई फार्म हाऊस येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अधिक तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता व सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. श्रीनिवास घाडगे,
सहायक पोलीस आयुक्त – १, गुन्हे शाखा, गजानन टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-१ चे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पो.उप निरी विकास जाधव, श्रेपोउनि यशवंत ओबासे, पोलीस
अंमलदार मधूकर तुपसौंदर, सयाजी चव्हाण, प्रमोद सोनवणे, संजय भापकर, हेमा ढेबे, नितीन कांबळे, किरण
ठवरे, दुर्योधन गुरव, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, संभाजी गंगावणे यांनी केलेली
आहे.

श्री गजानन विजय ग्रंथाचे १६०० भक्तांनी केले सामुदायिक पठण

पुणे : श्री सद्गुरू गजानन महाराज की जय चा जयघोष… गं्रथ पठणातून निर्माण झालेले अध्यात्मिक वलय…  आणि तब्बल -१६०० हून अधिक भक्तांनी एकत्रित येत श्री गजानन विजय गं्रथाचे केलेले सामुदायिक पठण… अशा श्री गजानन महाराजांच्या जयघोषाने भक्तीमय झालेल्या वातावरणात आळंदी कार्तिक वारीनिमित्त आयोजित श्री गजानन विजय गं्रथाचा भव्य सामुदायिक पारायण सोहळा संपन्न झाला. या पारायण सोहळ््यात तब्बल १८५० हून अधिक भाविकांनी सहभाग घेतला.


श्री गजानन महाराज (शेगांव) सेवाधारी परिवार, पुणे  या संस्थेतर्फे न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या ह.भ.प.ज्योत्स्ना मोदले यांना श्री गजानन महाराज सेवाधारी भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. चिंचवड येथील डॉ.गजानन खासनीस यांच्या उपस्थितीत आणि न्यासातील सेवाधा-यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मदन कस्तुरे व पदाधिकारी, सेवाधारी उपस्थित होते. 
शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व रोख रक्कम अकरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. सोहळ््याचे यंदाचे १६ वर्ष आहे. प.पू. स्वामी गणेशानंद सरस्वती महाराज उर्फ दादा महाराज यांच्या उपासनेचा आणि अध्यात्माचा वारसा पुढे नेणा-या व्यक्तिस हा पुरस्कार दिला जातो. 
ह.भ.प.ज्योत्स्ना मोदले म्हणाल्या, मंदिरात उपासना सुरु करणे सोपे असते, मात्र ती सतत प्रवाहित ठेवणे अवघड असते. परमेश्वराची मंदिरात स्थापना सहजपणे करणे शक्य असते, मात्र भक्तांच्या ह्रदयात परमेश्वराची स्थापना होणे कठिण असते. परंतु महाराजांच्या कृपेने हे शक्य होत आहे. भक्तांनी मंदिरात एकत्रित यावे आणि संघटित होणे, हे महत्वाचे आहे. त्यातूनच विधायक कार्य चांगल्या पद्धतीने घडू शकते. 
पारायण सोहळ््यादरम्यान लायन्स क्लब आॅफ पुणे,सहकारनगर यांच्यावतीने महिलांसाठी कर्करोग तपासणी, डोळे तपासणी, चष्मे वाटप, रक्त व हिमोग्लोबिन, शर्करा तपासणी व जनजागृतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ४५० जणांची तपासणी करण्यात आली.  

मर्द असाल तर कामातून उत्तर द्या, नामर्दासारखं बाईला पुढे करु नका : ऋता आव्हाड

मुंबई- खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांना मला सांगायचंय, मर्द असाल तर कामातून उत्तर द्या, नामर्दासारखं बाईला पुढे करुन लढाई लढू नका”, असं थेट आव्हानाच राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना दिलं.

“ज्या महिलेने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार केली, त्या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत का? याचा शोध घेतला पाहिजे. कारण काल मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला भाजपचं कुणीच आलं नव्हतं. त्या एकट्याच तिथे आल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर प्रचंड गर्दी असताना आव्हाडसाहेबांनी त्यांना गाडीसमोरुन बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी व्हिडीओमध्ये प्रचंड गर्दी असताना एवढ्या समोर का थांबलात असं आव्हाड संबंधित महिलेला म्हणत आहेत. बरं हे सगळं मुख्यमंत्र्यांपासून १५ फुटांवर घडतंय… एखादा गुन्हा दाखल करताना त्या गुन्ह्याला काही गाईडलाइन्स असतात. आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करताना कोणत्या दृष्टीने तो विनयभंग वाटतो? असा सवाल करतानाच मर्द असाल तर सत्ताधाऱ्यांनी कामातून उत्तर द्यावं. बाईला पुढे करुन लढाई लढू नये”, अशा शब्दात ऋता आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं.

जिल्हा ग्रंथोत्सवाचे १५ नोव्हेंबर रोजी उद्घाटन

पुणे, दि. १४: महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘ग्रंथोत्सव- २०२२’चे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते मंगळवार १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वा. उद्घाटन होणार आहे. पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, घोलेरोड, शिवाजीनगर येथे हा ग्रंथोत्सव होणार आहे.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-२०१० अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन, विक्री आणि त्यासोबतच विविध साहित्यिक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे हे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.

ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाची सुरुवात
१५ नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात सकाळी १० वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले असून ११.३० वा. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. दुपारी ३ ते ४ वा. ‘सार्वजनिक ग्रंथालयांची उर्जित अवस्था’ या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे मार्गदर्शन होणार आहे. दुपारी ४ ते ५ वा. जी.एं.च्या कथांचे अभिवाचन, दुपारी ५ ते सायं. ६ वा. एकपात्री काव्य नाट्यानुभव ‘कुटुंब रंगले काव्यात’चे सादरीकरण होणार आहे.

दोन दिवसीय ग्रंथोत्सवात विविध नामांकित प्रकाशकांच्या दर्जेदार पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यत असून प्रवेश विनामूल्य आहे. तरी सर्व नागरिक व ग्रंथप्रेमी रसिकांनी या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा आणि ग्रंथखरेदी करुन वाचनचळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती श्रे. श्री. गोखले यांनी केले आहे.

अनुसूचित जातीच्या नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर पुरवठा योजना

पुणे दि.१४: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचा पुरवठा करणे ही योजना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे.

२०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी किंवा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे नोंदवलेल्या आणि राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या पात्र बचत गटांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत ३ लाख १५ हजार रुपये मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्यानंतर जमा करण्यात येतात.

स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रुपये ३ लाख ५० लाख हजार राहील. नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादा रकमेच्या १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर ९० टक्के शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल. ठरवून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल. योजनेअंतर्गत ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटव्हेटर ट्रेलर खरेदी करता येईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसहित विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, डॉ. बाबासाहेव आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रोड, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, येरवडा पुणे- ४११०१५ (दूरध्वनी क्र. ०२०-२९७०६६११) येथे पंधरा दिवसाच्या आत प्रत्यक्ष सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त संगीता डावखर यांनी केले आहे.

औंध आयटीआयमध्ये १५ नोव्हेंबरपासून अल्पमुदतीचे व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम

पुणे दि.१४: औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील महिला व युवक तसेच ‘सारथी’ अंतर्गत लाभार्थ्यांसाठी अल्पमुदतीच्या रोजगारक्षम विनाशुल्क व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमांचे येत्या १५ नोव्हेंबरपासून आयोजन करण्यात आले आहे.

कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. अल्पसंख्यांक समाजातील तसेच ‘सारथी’ अंतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी घटकातील काही कारणास्तव पूर्णवेळ किंवा दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण पूर्ण करू शकत नाहीत असे बेरोजगार युवक, युवती किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना अधिकचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी या अल्पमुदतीच्या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल.

सुरुवातीला अल्पसंख्यांक समाजातील युवकांसाठी एकूण सहा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये सीएनसी सेटर कम ऑपरेटर टर्निंग, ड्राफ्ट्समन- मेकॅनिकल, क्यूसी इन्स्पेक्टर लेव्हल ४, फील्ड टेक्निशियन- एसी, ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन लेव्हल ३, मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग/शील्डेड मेटल आर्क वेल्डिंग वेल्डर या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सारथी अंतर्गत लाभार्थ्यांसाठी सध्या फक्त सीएनसी सेटर कम ऑपरेटर टर्निंग हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.

अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे, शिक्षण किमान इयत्ता आठवी ते दहावी उत्तीर्ण असावे. या अभ्यासक्रमांसाठी मुलींना प्राधान्य असून प्रत्येक व्यवसायातील प्रवेश क्षमता ३० आहे. किमान तीन महिन्याचा हा अभ्यासक्रम असणार आहे. प्रवेश घेण्यासाठी गुणपत्रिका, टीसी, आधार कार्डची छायांकित प्रत, अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी अल्पसंख्यांक असल्याचा पुरावा आदी कागदपत्रे तसेच दोन छायाचित्रे आवश्यक आहेत. इच्छुकांनी प्रवेशासाठी https://forms.gle/m7jZocco3RFcmBav5 या लिंकचा उपयोग करावा.

अधिक माहितीसाठी सुनिल तुपलोंढे (भ्रमणध्वनी क्र. – ९८५०१५१८२५) तसेच रविंद्र रापतवार (भ्रमणध्वनी क्र. -९४२१७६६४५६) यांच्याशी संपर्क साधावा. या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचा लाभ घेऊन उमेदवारांनी कौशल्यवृद्धी करावी, असे आवाहन संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची हीच परंपरा आहे का? रीदा राशीद यांचा सवाल

मुंबई –

खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगावे की जे माझ्यासोबत झाले हीच त्यांच्या पक्षाची परंपरा आहे का?, असेच महिलांना ढकलून त्यांच्या पक्षात बाजूला सारले जाते का? हीच शिकवण राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिली जात आहे का, असा सवालही राशीद यांनी उपस्थित केला. यावर महाराष्ट्र महिला आयोग काय प्रतिक्रिया देते याकडे माझे लक्ष आहे. माझ्याकडून महिला आयोग कधी उभे राहणार का हे देखील मी पाहणार आहे. त्यांच्याकडे मी जाईलच, पण ते माझ्याकडे आले तर बरे वाटेलआहे.राष्ट्रवादी काँग्रेसची हीच परंपरा आहे का, असा सवाल रीदा राशीद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंना केला आहे. माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मला पकडून धक्का देत गर्दीत ढकल्याचा आरोपही रीदा राशीद यांनी पत्रकार परिषदेत केला.

धक्का लागतो आणि पकडून धक्का देणे यात फरक आहे. जितेंद्र आव्हाडांनी अनेक पुरुष उभे असलेल्या ठिकाणी मला ढकलले. महिला चांगले काम करते. तिच्या मागे हेच का लागतात, असा सवालही राशीद यांनी उपस्थित केला आहे.

काल मुंब्र्याला उड्डानपुलाचे उद्घाटन होते. यावेळी निमंत्रितामध्ये मी देखील होते. यावेळी मी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जात असताना स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांना स्माइल केले. यानंतर आव्हाडांनी माझ्या हाताला जोरात पकडत, तू इथे काय करते म्हणत त्यांनी मला पुरुषांच्या अंगावर ढकलले, असा आरोप रीदा राशीद यांनी केला. आपण हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला असता त्यांनी पोलिस ठाण्यात जात माहिती देण्याचे सांगितल्याने आपण ही सर्व माहिती दिली आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असे म्हणत रीदा राशीद यांनी आपली बाजू मांडली.

जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांना एका हाताने बाजूला केले आणि मी महिला असताना दोन्ही हातांनी पकडून मला बाजूला केले. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण जी कारवाई सर्वांवर व्हायला हवी ती त्यांच्यावर करण्यात यावी, अशी माझी अपेक्षा असल्याचे मतही रीदा रशीद यांनी व्यक्त केले. मी साधारण महिला म्हणून माझी मतदारसंघात ओळख आहे. लोकांना मी भाजपची म्हणून जास्त चर्चेत नसते, असेही राशीद यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून किंवा असा काही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

मुख्यमंत्री आणि पोलीस अधिकारी यांच्या समक्ष विनयभंग होईल कसा ? हा समस्त महिलांचा अवमान – खासदार सुप्रिया सुळे यांचा हल्ला बोल

बावनकुळे जादूटोणा वर विश्वास ठेवणारे, अंधश्रद्धा पाळणारे त्यांच्यावर मी बोलणार नाही

पुणे-खोट्या केसेस ,आरोप करून कुटुंबे उध्वस्त करण्याचे प्रकार होऊ नयेत अशी विनंती आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे,खडकवासला मतदार संघातील वाहतूक कोंडी आणि नागरीसुविधा बाबतच्या समस्यांनी उग्र रूप धारण केले असून याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी महापालिकेतील बैठकीसाठी त्या आल्या असत्या पत्रकारांनी विचारलेल्या प्र्शान्नाची उत्तरे देताना त्या म्हणाल्या ,’माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देऊ नये. त्यांचे काम चांगले असून त्यांनी अशाप्रकारे राजीनामा देऊ नये. त्यांनी लढाई लढली पाहिजे असे नाराज झाले नाही पाहिजे.’सत्यमेव जयते’ महत्वाचे असून सत्याचा विजय होईल.संबंधित व्हिडिओ मी पाहिला असून याबाबत कोणता अनुचित प्रकार घडलेला नाही.राज्यातील राजकारण खालच्या स्तरावर जाणे वेदनादायी आहे.अशा घटनांमुळे राजकारणातील महिलांचे नुकसान होते अशी भावना त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्री यांना विनंती आहे की, खोट्या केसेस कोणावरही दाखल केल्या जाऊ नये. भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत मी बोलणे योग्य होणार नाही कारण ते जादुटोणावर विश्वास ठेवणारे असून आम्ही अंधश्रद्धा विरोधी आहे. ते काही बोलत असतात त्याकडे मी गांभीर्याने पाहत नाही. विनयभंग हा खोटा गुन्हा आव्हाड यांच्यावर दाखल असून त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः फोटो फ्रेम मध्ये आहे. खोटे आरोपामुळे कुटुंब उध्वस्त होतात. आव्हाड यांनी चित्रपट गृहात कोणास मारहाण केली नाही. त्यांना चौकशीस बोलावून पोलिसांनी अटक केली आणि जाणीवपूर्वक दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकास आहे परंतु इतिहासावर आधारित चित्रपट करताना काल्पनिक गोष्टी टाकू नये. जी लढाई झाली नाही ती दाखवून चुकीचा इतिहास दाखवणे चुकीचे आहे.

दमानियांच्या भूमिकेबद्दल आभार

आव्हाड यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी महिलांची योग्य भूमिका मांडल्याने मी त्यांची आभारी आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतीस राजकारणात घेऊन कौटुंबिक पातळीवरील राजकारण करणे हे गलिच्छ राजकारण सुरू असल्याचे दिसून येते. हे थांबण्याची जबाबदारी सत्ताधारी यांची आहे. महिलांना शिवीगाळ करणे, पोलीस ठाण्यात पिस्तूल घेऊन जाणे, मंत्रालयात अधिकारांना शिवीगाळ करणे असे प्रकार ‘ ईडी’ सरकार करत असून प्रलोभन आणि दडपशाहीवर त्यांचे सरकार चालू आहे.

शरद पवारांनी आव्हाडांचा राजीनामा घ्यावा-भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जाणीवपूर्वक गुन्हे दाखल होत नाही, सर्व घटना सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद असून ते पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आव्हाड यांचा राजीनामा घ्यावा. आव्हाड यांची स्टटबाजी यापुढे चालणार नाही कारण आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नाही, तर देवेंद्र फडणवीस आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

पुण्यात भाजप पक्षाची संघटना चांगली असून सन 2024 पर्यंत पक्षाने सामाजिक दृष्ट्या भक्कम व्हावे यासाठी काम करण्यात येईल. सरकारच्या योजना लाभ जोपर्यंत नागरिकांना मिळत नाही तोपर्यंत पक्ष विस्तार होऊ शकत नाही. 2024 मध्ये महाराष्ट्रमध्ये भाजप-शिवसेना आणि मित्रपक्ष मिळून 45 खासदार आणि 220 आमदार निवडून आणण्याची तयारी करत आहे. त्यादृष्टीने पक्षाचा माध्यमातून काम करण्यात येत आहे असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

यावेळी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर आणि भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विक्रांत पाटील, राजेश पांडे, गणेश बिडकर, दीपक पोटे, सुशील मेंगडे उपस्थित होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, केंद्र सरकारच्या योजनांना माहविकास आघाडी सरकारने मागील काळात ब्रेक लावण्याचे काम केले. पेट्रोल, डिझेल, गॅस या दरवाढीचा आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार अवलंबून असल्याने महागाई समस्या जाणवते. 12 ऑगेस्ट रोजी मला केंद्रीय नेतृत्वाने पदभार दिला. त्यानंतर संपूर्ण राज्यात संघटनात्मक प्रवास योजना आखली त्यानुसार हा 26 वा जिल्हा आहे.

10 डिसेंबर पर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यातील दौरा पूर्ण करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या विविध योजना ज्या अमलबजावणी करण्यात आल्या त्याची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. फ्रेंडस ऑफ बीजेपी ही योजना सुरू करण्यात येणार आहे.त्यासाठी हेल्पलाईन 7030776161 हा सुरू करण्यात आली असून भाजप कडून त्यांना जे अपेक्षित आहे त्याची नोंदणी घेण्यात येणार आहे.20 परिवार एक पालकत्व योजना द्वारे प्रत्येक घरापर्यंत पोहचणे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनीच विनयभंगाचा प्रकार झाला नसल्याचे सांगायला हवे, आव्हाडांनी राजीनामा देऊ नये:अजित पवारांचे आवाहन

पुणे-आव्हाडांच्या प्रकरणातील घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तेथे हजर होते. मुख्यमंत्र्यांपासून काही फूट अंतरावरच ही घटना घडली. तुम्ही कशाही प्रकारे मुख्यमंत्री झाला असलात तरी तुम्ही महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेचे प्रतिनिधी आहात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन विनयभंगाचा प्रकार झाला नसल्याचे सांगायला हवे.असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे , यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही उपस्थित होते.अजित पवार यांनी पुणे येथे आव्हाड यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत भाष्य केले. अजित पवार म्हणाले, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारकडून पोलीसांचा दुरुपयोग केला जात आहे. राज्यात सध्या घाणेरडे राजकारण सुरू आहे.मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारकडून हे पोलीसांचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप करत सध्या राज्यात गलिच्छ प्रकार सुरू असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. आव्हाड यांनी राजीनामा न देण्याचे आवाहनही पवार यांनी केले.तेंद्र आव्हाड यांनी 72 तासात दोन गुन्हे दाखल झाल्याने कंटाळून राजीनामा देतो असे म्हटले. जितेंद्र आव्हाड यांना पहिल्यांदा विनंती आहे की त्यांनी राजीनामा देऊ नये असे आवाहन अजित पवार यांनी केले. ज्या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो त्या शरद पवारांनी अनेक चढ उतार पाहिलेत, अनेक स्थित्यंतर पाहिलीत. हे लक्षात घेता आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये असे अजित पवार यांनी म्हटले.समोर आलेल्या व्हिडिओनुसार, जितेंद्र आव्हाड हे अनेकांना हाताने बाजूला करत होते. त्याचप्रमाणे त्यांनी या महिलेला बाजुला केले. बाकी काही घडलेले नाही. मुख्यमंत्र्यांची कार काही फूट अंतरावरच होती. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढं येऊन विनयभंगाचा प्रकार घडला नसल्याचे सांगायला पाहिजे. तुम्ही कशाही प्रकारे मुख्यमंत्री झाला असलात तरी तुम्ही महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेचे प्रतिनिधी आहात, असेही पवार यांनी म्हटले.
महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकार सुरू असल्याची टीका पवार यांनी केली. आव्हाडांवर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करणे हा भ्याडपणा असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष देण्याची गरज आहे. कोणतेही कारण नसताना जर लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचे, अपमानित करण्याचे काम होत असेल तर जनतेने याची दखल घ्यायला हवी असे आवाहनही पवार यांनी केले. जितेंद्र आव्हाडांवरील हा गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणीदेखील त्यांनी केली.राज्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारीचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्याला बगल देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अशा घटना समोर आणल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले. विवियाना मॉल प्रकरणातील प्रेक्षकाने आव्हाड यांनी मारहाण केली नसल्याचे सांगितले. तरीदेखील त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आला नाही. दिवस बदलतात. चार दिवस सासूचे असतात, तसे चार दिवस सुनेचे असतात असे सांगताना अजित पवार यांनी नियमांचे, कायद्याचे पालन होत नसेल तर कोणत्याही पक्षाचा आमदार का असेना कारवाई झाली पाहिजे असेही त्यांनी म्हटले.

असे तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील: जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ त्यांच्या पत्नीही आता मैदानात..

अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील. असे स्पष्ट करत जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ त्यांच्या पत्नीही आता मैदानात उतरल्या आहेत.

ज्या महिलेने आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. म्हणजेच एका वेगळ्या उद्देशाने, हेतूने आव्हाडांविरोधात महिलेने तक्रार केली आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता यांनी केला आहे. तसे ट्विट ऋता यांनी केले आहे.रीदा रशिद ह्या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात.आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती spontaneous reaction होती. त्याला विनयभंग म्हणतां येत नाही.असेही ट्वीट करत ऋता सामंत आता आव्हाडांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत .

केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी  हयातीचा डिजिटल दाखला   उपक्रमाचा प्रचार करण्यासाठीच्या राष्ट्रव्यापी मोहीमेअंतर्गत  पुण्यात कार्यक्रम

0

केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी हयातीचा डिजिटल दाखला   उपक्रमाचा प्रचार करण्यासाठी भारत सरकारच्या कार्मिक-सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने देशव्यापी मोहीम सुरू केली आहे.  फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान प्रणाली, कार्मिक-सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सुरु केली.  निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे निवृत्ती नंतरचे आयुष्य सुखा समाधानात जाण्याच्या दृष्टीने, हयातीचा दाखला  देण्यासाठी  विशेष शिबिरे आयोजित करून, डिजिटल हयातीचा दाखला /फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा प्रचार करण्याचे निर्देश, सर्व नोंदणीकृत निवृत्तीवेतनधारक  संघटना, पेन्शन वितरण बँका, भारत सरकारची मंत्रालये आणि सीजीएचएस केंद्रांना देण्यात आले होते.  या संदर्भात, केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक  कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक पुण्यात आले  आणि त्यांनी आज 13 नोव्हेंबर 2022 रोजी, भारतीय स्टेट बँक, पुणे मुख्य शाखा, डॉ. आंबेडकर रोड, जिल्हाधिकारी कार्यालय कंपाउंड, पुणे-411001 इथे, केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी मोहीम राबवली.

निवृत्तीवेतनधारकांनी या मोहिमेत उत्साहाने भाग घेतला आणि हे  नवीन तंत्रज्ञान आणल्याबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केले.  आपल्या मोबाईल फोनमध्ये फेस ऑथेंटिकेशन हयातीचा दाखला  अॅप कसे डाउनलोड करायचे आणि आपल्या फोनवरूनच हयातीचा दाखला  कसा मिळवायचा याबद्दल, विभागाच्या अधिकाऱ्यांनी, या निवृत्तीवेतनधारकांना मार्गदर्शन केले.  हयातीचा दाखला  60 सेकंदात तयार होतो  आणि त्या पाठोपाठ मोबाईल फोनवर आलेल्या लिंक वरुन ते डाउनलोड केले  जाऊ शकते. डिजिटल जगात,  भारत सरकारच्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने  घेतलेली ही मोठी  झेप आहे.  पूर्वी हयातीचा दाखला  प्रत्यक्ष जाऊन घेण्यासाठी वृद्ध निवृत्तीवेतन धारकांना बँकांबाहेर तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते.  आता, आपापल्या घरात एका बटणाच्या क्लिकवर ते अगदी  आरामात शक्य झाले आहे, असे विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अधिकाऱ्यांच्या पथकाने भारतीय स्टेट बँकेच्या शाखेला भेट दिली आणि निवृत्तीवेतनधारकांशी संवाद साधला. डिजिटल स्वरुपातील जीवन प्रमाणपत्र, त्यांच्या सुखकर निवृत्त्योत्तर आयुष्यासाठी कसे लाभदायक ठरते याची माहिती त्यांनी यावेळी या निवृत्तीवेतनधारकांना दिली. या प्रक्रियेचे डिजिटलीकरण करून त्यांना विनासायास या प्रक्रियेचा लाभ मिळवून देऊ शकणाऱ्या, विभागाच्या नवीन उपक्रमाची ओळखही निवृत्तीवेतनधारकांना यावेळी करून देण्यात आली.  पथकाने सर्व निवृत्तीवेतनधारकांना, DOPPW_INDIA OFFICIAL या विभागाच्या अधिकृत यू ट्यूब चॅनेलला भेट देण्याची विनंती केली. या यूट्यूब चॅनेलवर, फेस ऑथेंटिकेशन तंत्राद्वारे हयातीचा दाखला  सादर करण्याची प्रक्रिया साध्या सोप्या भाषेत स्पष्ट करुन दाखवणाऱ्या दोन ध्वनीचित्रफिती (व्हिडिओ) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

डिजिटल जीवन प्रमाणपत्रांची एक ऑक्टोबर 2022 ते 12 नोव्हेंबर 2022 पर्यंतची आकडेवारी याप्रमाणे

हयातीच्या डिजिटल दाखल्यांची  एकूण संख्या=46,92,442

फेस ऑथेंटिकेशन द्वारे हयातीच्या डिजिटल दाखल्यांची  एकूण संख्या=2,51,415

केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांना देण्यात आलेल्या हयातीच्या डिजिटल दाखल्यांची  एकूण संख्या=17,91,635

केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांना फेस ऑथेंटिकेशन द्वारे देण्यात आलेल्या हयातीच्या डिजिटल दाखल्यांची  एकूण संख्या=1,54,095

ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशन, पुणे आणि डिफेन्स अकाउंट्स पेन्शनर्स असोसिएशन, पुणे, या निवृत्तीवेतनधारकांच्या  पुणे येथील दोन संघटना,  निवृत्तीवेतनधारकांना फेस ऑथेंटिकेशन द्वारे हयातीच्या डिजिटल दाखल्यांसंदर्भातल्या प्रचारात सक्रियपणे सहभागी होत आहेत.  या संघटनांतर्फे पुण्यातील विविध ठिकाणी दररोज विशेष शिबिरे घेण्यात येत आहेत.  वृद्ध, दुर्बल आणि आजारी निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल हयातीचा दाखला  मिळवून देण्यासाठी ते घरोघरी आणि अगदी रुग्णालयांनाही भेट देत आहेत.

मोबाईल फोन वापरून फेस ऑथेंटिकेशन द्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेत, प्रथमच आधार क्रमांक, ओटीपीसाठी मोबाइल क्रमांक, पीपीओ क्रमांक, बँक/टपाल कार्यालयातील खाते क्रमांक असे संबंधित तपशील आवश्यक ठरत आहेत.  राज्याचे कोषागार कार्यालय म्हणून वितरण प्राधिकरणाचे अधिकार असलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही ही सुविधा उपलब्ध आहे.

या कार्यक्रमाला भारतीय स्टेट बँक, निवृत्तीवेतनधारकांच्या संघटना , भारतीय विशेष ओळख प्राधिकरण यांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. ही मोहिम यशस्वी होण्यासाठी या मंडळींचा सहभाग अमूल्य होता.

फेस ऑथेंटिकेशन द्वारे हयातीचा सादर करण्यासाठीची ही मोहीम, विभाग संपूर्ण नोव्हेंबर महिनाभर  राबवत आहे.