Home Blog Page 1530

स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतनात दुप्पटीने वाढआता मिळणार दरमहा २० हजार रुपये

0

मुंबई-राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे आता स्वातंत्र्य सैनिकांना १० हजार रुपयांऐवजी दरमहा २० हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ मिळणार आहे.

या निवृत्तीवेतनात वाढ करण्याची मागणी वारंवार होत होती. यासाठी वार्षिक अंदाजे ७४.७५ कोटी रुपये इतका अधिक खर्च येईल. या निवृत्तीवेतन वाढीचा राज्यातील ६२२९ स्वातंत्र्य सैनिकांना लाभ होईल.
भारतीय स्वातंत्र्य लढा, हैद्राबाद मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम अशा देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी दरमहा निवृत्तीवेतन देण्याची योजना महाराष्ट्र शासनाने सन १९६५ पासून सुरु केली आहे. त्यानुसार २ ऑक्टोबर २०१४ पासून दरमहिन्याला १० हजार रुपये इतके निवृत्तिवेतन देण्यात येते.

मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर यावर्षी न बदलण्याचा निर्णय

कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर सध्या म्हणजे २०२२-२३ करिता न सुधारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याप्रमाणे मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम १५४(1ड) मध्ये सुधारणा करण्यात येईल.
कोविडमुळे लागू केलेल्या टाळेबंदी तसेच प्रादुर्भावाच्या भितीमुळे अनेक लहानमोठे उद्योगधंदे, शैक्षणिक संस्था, विकासाची कामे, कारखाने, बहुतांशी औद्योगिक क्षेत्रे, दैंनंदिन रोजगार बंद होता. यामुळे सर्वसाधारण अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला. त्यामुळे बहुतांशी मालमत्ताधारक, संस्था, लोकप्रतिनिधींकडून मालमत्ता कर माफ करणे किंवा सवलत देण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे निवेदने दिली होती.

यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने सदर भांडवली मुल्य सुधारित करण्यास 2022-23 करिता सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत दिल्याने महानगरपालिकेची अंदाजे 1116.90 कोटी रुपये इतकी महसूल हानी होणार आहे.

नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात सुविधा उपलब्ध करणार

नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात सुविधा उपलब्ध करण्यासाठी २५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या विद्यापीठाच्या वारंगा येथील स्थायी कॅम्‍पसमधील शैक्षणिक संकुल मुलामुलींचे वसतीगृह ॲमेनिटी ब्लॉक व प्रशासकीय संकुल या इमारतींमध्ये हिटींग,व्हेटीलेशन व एअर कंडीशन यंत्रणा लावण्यात येणार आहेत.

पुणे येथे जेएसपीएम विद्यापीठ स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठास मान्यता

पुणे येथे जेएसपीएम विद्यापीठ या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठास मान्यता देण्यास निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
हे विद्यापीठ २०२३-२४ पासून सुरु होईल. तसेच याबाबतीत विधिमंडळासमोर विधेयक सादर करण्यात येईल.
हे प्रस्तावित विद्यापीठ हवेली तालुक्यातील हवेल येथे असेल.

कुलगुरु, प्र-कुलगुरु यांच्या निवड पद्धतीत सुधारणा

राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरु, प्र-कुलगुरु यांची निवड पद्धती आता विद्यापीठ अनुदान आयोगाने विहीत केल्याप्रमाणे होणार आहे. यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या विविध कलमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
विद्यापीठ अनुदान आयोगाने कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांच्या निवडीची पध्दत, अर्हता इत्यादीसंदर्भात १८ जुलै २०१८ च्या अधिसूचनेन्वये सुधारणा केलेल्या आहेत. या सुधारणा आणि त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश विचारात घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अधिनियम, 1989, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, अधिनियम, 1997 व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक होते.
या अध्यादेशाव्दारे प्रामुख्याने पुढील सुधारणा करण्यात येणार आहेत. कुलगुरू पदावर नियुक्तीसाठी प्राध्यापक पदावरील किमान १० इतका अनुभव विहित करण्यात आला आहे, कुलगुरू पदाची निवड करण्यासाठी “शोध व निवड समिती” मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रतिनिधीचा समावेश करण्यात आला आहे, कुलगुरूंनी केलेली शिफारस विचारात घेऊन प्र-कुलगुरूची नियुक्ती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून करण्यात येणार आहे.

नवीन महाविद्यालयांच्या परवानगीसाठी मुदत वाढविली

नवीन महाविद्यालयांच्या परवानगीसाठी आता १५ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज स्वीकारण्यास व त्याप्रमाणे वेळापत्रकात बदल करून अध्यादेश प्रख्यापित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या सुधारणेनुसार राज्यामध्ये नवीन महाविद्यालये किंवा परिसंस्था, नवीन अभ्यासक्रम, विषय, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी अधिनियमात असलेल्या वेळापत्रकात बदल करण्यात येतील.

कला संस्थांमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांना विविध सेवाविषयक लाभ

अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध सेवाविषयक लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कला संचालनालयाच्या नियंत्रणाखाली ३१ अशासकीय अनुदानित कला संस्था आहेत. या कला संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध लाभ ५ ऑक्टोबर, २०१७ पासून लागू करण्यास देखील आज मान्यता देण्यात आली.
हे लाभ पुढील प्रमाणे राहतील- अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १) महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ मधील सर्वसाधारण तरतुदी ( भविष्यात करण्यात येणाऱ्या सुधारणांसह) लागू करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती योजना लागू करणे, अध्यापकीय पदांना द्विस्तरीय / त्रिस्तरीय वेतन संरचना लागू करणे, अध्यापकांनी विनाअनुदानीत कला संस्थेमध्ये केलेली सेवा उच्च वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरणाच्या तरतुदी लागू करणे, शिक्षक आणि शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांपर्यंत प्रसुती रजा मंजूर करणे, “कॅन्सर” “पक्षाघात” झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रजाविषयक तरतुदी लागू करणे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचार आणि वैद्यकीय खर्चाची प्रतीपूर्ती लागू करणे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत अनुज्ञेय करणे, अशासकीय अनुदानित कला संस्थामधील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या पात्र कुटुंबियांना अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा लाभ अनुज्ञेय करणे.

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; अधिसंख्य पदांवर सामावून घेणार

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्यांच्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, जळगांव, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर ,बुलढाणा, अकोला, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्हा परिषदांतील ५४७ सेवानिवृत्त व ३४७ कार्यरत कर्मचारी यांना याचा लाभ मिळणार असून यासाठी २४.०४ कोटी रुपये इतक्या आवर्ती खर्चास व थकबाकीपोटी येणाऱ्या ५०.०१ कोटी रुपये इतक्या अनावर्ती खर्चास आज मान्यता देण्यात आली.
पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. पाणी पुरवठा योजना तयार केल्यानंतर योजना चालविण्यासाठी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येते. अशा योजनेवरील कार्यरत रोजंदारी कर्मचारी यांना जिल्हा परिषदेकडून वेतन देण्यात येते. विविध कारणास्तव या रोजंदारी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी जिल्हा परिषदांना आर्थिक अडचणी येत आहेत. यामुळे या कर्मचाऱ्यांना पुरेसे व वेळेवर वेतन अदा न झाल्याने पाणी पुरवठा योजना सुरळीतपणे चालविण्यास मर्यादा येत आहेत.
रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांकडून विविध न्यायालयामध्ये उपस्थित प्रकरणामध्ये दिलेले आदेश, कालेलकर आयोगाच्या शिफारशी, पाणी पुरवठा योजना चालविण्यासाठी जिल्हा परिषदांना येणाऱ्या अडचणी विचारात घेवून शासनाने या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे दायित्व उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता या कर्मचाऱ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून सदरील कर्मचारी कार्यरत असेपर्यंतच पद निर्मिती करण्याचे ठरविले असून त्यांना रुपांतरीत नियमित अस्थायी (सीआरटी/CRT-Converted Regular Temporary Establishment) आस्थापनेवर सामावून घेण्यात येईल.

—–०——

नागपूर व औरंगाबाद खंडपीठात अतिरिक्त सचिव पदे

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथे मुख्य न्यायमुर्ती यांचे अतिरिक्त सचिव अशी २ पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
रु.43690-1080-49090-1230-56470 या वेतनश्रेणीवर ही पदे भरण्यात येतील. यासाठी ३७ लाख ८४ हजार ९४४ इतका वार्षिक खर्च येईल.

—–०—–

सर्वसामान्य शेतकरी देखील आता बाजार समितीची निवडणूक लढवू शकणार

आता सर्वसामान्य शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक लढवू शकतील. यासंदर्भात महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करणार करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या सुधारणेमुळे कृषि उत्पन्न बाजार समितीवर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व तसेच कामकाजात प्रत्यक्ष सहभाग वाढणार आहे.
या अधिनियमाच्या 13 (1)(अ) या कलमामध्ये सुधारणा करुन कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत शेतकऱ्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या सुधारणेमुळे कृषि पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या व्यवस्थापन समितीवरील निर्वाचित सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासोबतच सर्वसामान्य शेतकऱ्यांना कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविता येईल.

—–०—–

नाधवडे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामास गती देणार

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नाधवडे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी १०७.९९ कोटी खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या निर्णयामुळे वैभववाडी तालुक्यातील नाधवडे व सरदारवाडी गावातील सुमारे ५०० हेक्टर जमिनीला फायदा होणार आहे. हा प्रकल्प कोकण पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत उर्वरित महाराष्ट्र या प्रदेशात असून या प्रकल्पाचा एकूण पाणी साठा ८.२२ दलघमी असा आहे.

समृद्धी महामार्ग बांधकामासाठीचे गौण खनिजाबाबत दंडाचे आदेश रद्द

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठीचे गौण खनिजाबाबत दंडनीय कारवाईचे आदेश रद्द करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या गौण खनिजांच्या उत्खननावर आकारणी पात्र असलेले स्वामित्वधन बसविण्यास सूट दिली आहे. मात्र काही प्रकरणी दंडनीय कारवाईपोटी केलेल्या आदेशांच्या विरुद्ध संबंधित कंत्राटदारांनी वेगवेगळ्या प्राधिकरणांपुढे केलेल्या अपिलांच्या सुनावणी अद्यापही सुरु आहे. तर काही प्रकरणी महसूल यंत्रणेने वसुलीची कार्यवाही सुरु केली आहे. ही दंडनीय कारवाई ही विहित निर्देशानुसार केलेली नसल्यामुळे दंडनीय कारवाईचे आदेश रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याचप्रमाणे महसूल यंत्रणेसमोर दंडनीय कारवाईबाबत सध्या सुरु असलेली सर्व प्रकरणे देखील रद्द करण्यात आली आहेत.

प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी ३५ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास

राज्य रस्ते विकास महामंडळास मान्यता

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी ३५ हजार ६२९ कोटी रुपये कर्जरुपाने उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या मान्यतेमुळे भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार. कर्ज उभारणीस मान्यता दिलेल्या रकमेपैकी हुडकोकडून सुरुवातीला ५६४० कोटी रुपये इतका निधी उभा करण्यास मान्यता देण्यात आली.
विरार ते अलिबाग बहुउद्देशिय वाहतूक मार्गिका प्रकल्प (MMC), पुणे शहराभोवतालचा चक्राकार वळण मार्ग (Ring Road) बांधण्याचा प्रकल्प व जालना ते नांदेड द्रुतगती महामार्ग या प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी आवश्यक निधी हुडको व इतर वित्तीय संस्थांमार्फत मुदती कर्जाद्वारे उभारणाचा प्रस्ताव होता. या तीनही प्रकल्पांसाठी एकूण ३५,६२९ कोटी रुपये इतकी रक्कम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास कर्ज रुपाने उभारण्यास मंजूरी देण्यात आली. यासाठी लागणारी हमी शासनाकडून दिली जाणार आहे. यासाठी कर्ज व त्यावरील व्याज परतफेड करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदी करण्यात येईल. महामंडळाकडील भूखंडाच्या विक्रीतून येणारी रक्कमही कर्जाच्या परतफेडीसाठी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. या कर्जाचा कालावधी १५ वर्षाचा असेल.

—–०—–

पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस, आयबीपीएस कंपन्यांकडून घेण्यास मान्यता

राज्यातील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस-आयओएन व आयबीपीएस या कंपन्यांकडून घेण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे भरती प्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजेच लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब, गट क
आणि गट ड ही पदे सरळ सेवेने भरताना आता या कंपन्यांमार्फत स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील. यासाठी परीक्षा घेण्याचे दर, परीक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी शर्ती माहिती तंत्रज्ञान विभागाच्या उच्चाधिकार समितीच्या मान्यतेने करण्यास देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. या अनुषंगाने उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होऊन आज या दोन्ही कंपन्यांनी दिलेल्या कराराच्या प्रारुपास मान्यता देण्यात आली.
संबंधित विभागाने पदभरती करताना ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक पदभरती प्रक्रीया व स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी या कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करावयाचा आहे. या संदर्भातील विस्तृत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात येत आहे.

अनुसूचित जातीच्या नवउद्योजकांना आवाहन

पुणे, दि.१७: स्टँड अप योजनेअंतर्गत अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेला अनुसूचित व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक यांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदाराम स्टँड अप इंडिया योजनेतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित १५ टक्के मार्जिन मनी देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांचे कार्यालय बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, स.क्र. १०४/१०५. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर येरवडा येथून अर्ज प्राप्त करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात सहायक आयुक्त समाज कल्याण संगीता डावखर यांनी केले आहे.

गरवारे महाविद्यालय ते न्यायालय, मेट्रो मार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करा-पालकमंत्री

पुणे दि.१७: शहरातील मेट्रोच्या कामाला गती देऊन गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मेट्रोमार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दिक्षीत, संचालक अतुल गाडगीळ, कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे उपस्थित होते.

श्री.पाटील म्हणाले, मार्च अखेरपर्यंत शहरात सुरू असलेल्या ३३ किलोमीटरच्या मेट्रो लाईनचे काम पूर्ण होईल असे नियोजन करण्यात यावे. महामेट्रोला कामाची गती वाढविण्यासाठी शासनातर्फे आवश्यक सहकार्य करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प अहवालाला शासनाची मंजूरी मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा आढावा
पालकमंत्री श्री.पाटील यांनी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा आढावा घेतला. यावेळी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, अपर जिल्हाधिकारी वैशाली इंदानी उपस्थित होते. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. श्री.गटणे यांनी शहरातील प्रकल्पांच्या सद्यस्थितीविषयी यावेळी माहिती दिली.

स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचाही आढावा
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कार्पोरेशनच्या प्रकल्पांचाही आढावा घेतला. यावेळी कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य ज्ञान अधिकारी दिनेश वीरकर, मुख्य अभियंता अरुण गोडबोले, कंपनी सचिव स्वानंद शेडे उपस्थित होते.

स्मार्ट सिटीचे प्रकल्प नागरिकांच्या जीवनशैलीत अधिक चांगले बदल होण्याच्यादृष्टीने उपयुक्त असून या थीमबेस्ड प्रकल्पांना अधिक गती द्यावी, असे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

यावेळी श्री. कोलते यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. कॉर्पोरेशनच्या प्रकल्पांची सद्यस्थिती, निधीची आवश्यकता आदींविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.

६२ वर्षे वयाच्या रामनारायण अग्रवाल यांनी तयार केल्या २६ बोगस कंपन्या

११० कोटी रुपयांच्या बनावट कर क्रेडिट प्रकरणात महाराष्ट्र जीएसटी विभागाकडून अटकेची कारवाई

२०२२-२३ मधील आतापर्यंत ५० वी अटकेची कारवाई

पुणे, दि. १७: महाराष्ट्र वस्तू आणि सेवाकर विभागाने कर चुकविणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात विशेष तपास मोहिमेंतर्गत रामनारायण वरूमल अग्रवाल या व्यक्तीला ६३० कोटी रुपयांच्या बनावट पावत्यांद्वारे ११० कोटी रुपयाचे बनावट कर क्रेडिट वापरल्याबद्दल आणि पास केल्याबद्दल अटक केली आहे.

महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने बनावट पावत्यांमध्ये गुंतलेल्या करदात्यांच्या विरोधात केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून मेसर्स अग्रवाल एंटरप्रायझेस आणि इतर कंपन्यांच्या बाबतीत तपासणी करण्यात आली. रामनारायण बरुमल अग्रवाल (वय ६२ वर्षे) हे २६ बोगस कंपन्या तयार करण्यात सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कंपन्यांनी ५६. ३४ कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे आणि ५४. ६४ कोटी रुपयांचे बनावट कर क्रेडिट वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता पास केल्याचे आढळून आले असून या पद्धतीने वस्तू आणि सेवाकर विभागाची फसवणूक केली.

या प्रकरणात, बनावट करदात्यांकडून खरेदी इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला गेला आणि त्यामुळे महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर कायदा २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल श्री. अग्रवाल यांना अटक करण्यात आली असून मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

विभागाचे अप्पर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर सहआयुक्त दीपक भंडारे यांच्या नेतृत्वाखाली अटकेची कारवाई करण्यात करण्यात आली आहे.

२०२२-२३ मधील आतापर्यंत ५० वी अटकेची कारवाई केली आहे. यापुढेही महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने करचोरी करणाऱ्या, बनावट इनव्हॉइस जारी करणाऱ्या आणि बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा आणि पास करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागाचे जनसंपर्क अधिकारी भागवत चेचे यांनी दिली आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेकडून जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा

पाणीपुरवठा योजनांची कामे दर्जेदार आणि गतीने करा-पालकमंत्री

पुणे दि.१७: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेतला. योजनेची कामे दर्जेदार, पारदर्शीपणे आणि गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीला आमदार भीमराव तापकीर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ, उप कार्यकारी अभियंता अमित आडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, २०२४ पर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक घरी नळाचे पाणी असेल यासाठी नियोजनबद्ध काम करावे. आता जिल्हा दर सूचीच्या (डीएसआर) दरात वाढ झालेली असल्यामुळे त्यानुसार योजनांसाठी निविदा जाहीर केलेल्या असल्यास निविदेच्या रकमेपेक्षा अधिक दराने निविदा नसाव्यात. ज्या गावात सध्या योजना अस्तित्वात असलेल्या योजना निकषानुसार पाणी पुरविण्यासाठी पुरेशा नाहीत तेथे आवश्यक ती तपासणी करून नवीन योजना करण्याऐवजी सध्याच्या अस्तित्वातील योजनांची क्षमतावाढ करण्यावर भर द्यावा.

योजनांचे त्रयस्थ पक्ष अंकेक्षण करताना झालेले काम, सुरू असलेले काम आराखड्यानुसार आणि निकषानुसार सुरू आहे का याची बारकाईने तपासणी करावी. योजनांसाठी शासकीय जागा आवश्यक असल्यास जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरुन आढावा घेऊन मार्ग काढावा, आदी सूचनाही श्री. पाटील यांनी केल्या.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रसाद यांनी सादरीकरण करून योजनेच्या प्रगतीची माहिती दिली. बैठकीस पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता, शाखा अभियंता उपस्थित होते.

मराठीच्या विकासासाठी एकत्रितरित्या कार्य करणे गरजेचे – माजी खासदार, साहित्यिक डॉ. भालचंद्र मुणगेकर

0

मुंबई, दि. 17 : “ग्रंथालये ही मराठी वाचन संस्कृतीचे, विचार मंथनाचे, साहित्याचे, नाटक-शास्त्राचे, भावजीवनाची केंद्र व्हावीत. मराठीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितरित्या कार्य करावे”, असे प्रतिपादन मुंबई मराठी ग्रंथ चे उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मुंबई शहर ग्रंथोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथोत्सवादरम्यान देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ विद्यार्थ्यांना ग्रंथ प्रदान करण्यात आले. यावेळी साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. मुणगेकर बोलत होते.

मराठीतील दुर्मिळ ग्रंथांच्या प्रदर्शनाचे यावेळी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी उद्घाटन केले. या प्रदर्शनात विविध भाषांतील तसेच मराठीतील २०० पेक्षा अधीक काळ जुने ग्रंथ ठेवले आहेत.

कार्यक्रमाला राज्य शासनाच्या दर्शनिका विभागाचे सचिव डॉ. दिलीप बलसेकर, व्याख्याते प्राध्यापक डॉ. राजेंद्र कुंभार आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री.मुणगेकर म्हणाले की, मराठीच्या वाढीसाठी मुंबई ग्रंथालयाने अधिक कार्यक्रम करावेत. वाचनप्रेमी निर्माण करावेत. २०० वर्षे जुने ग्रंथ आणि सर्वांत जास्त ग्रंथसंपदा या ग्रंथालयात आहे. या ग्रंथांतील विचार सर्वदूर पोहोचविणे गरजेचे असून, त्यांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. बलसेकर म्हणाले की, माहिती व तंत्रज्ञान युगात आपण कार्यरत आहोत. मात्र, ग्रंथांशिवाय पर्याय नाही.  वाचन संस्कृती रूजविणे आणि वाढविणे गरजेचे आहे. “महाराष्ट्राचे ७५ समाजसुधारक आणि विचारवंत” हे पुस्तक आपण लवकरच प्रकाशित करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ग्रंथोत्सवात बालकथांपासून, शासकीय ग्रंथ, लोकनेत्यांचे चरित्र, महापुरूषांची आत्मचरित्र, विज्ञान आधारित कथा, स्त्री प्रधान साहित्य, संत साहित्य, राजकारण, पत्रकार लिखीत पुस्तके, छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा, प्रबोधनकार, गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य, कविता, अभंग, ललित, गुढ कथा, भारतीय साहित्याच्या निर्मात्यांची ओळख, नवतंत्रज्ञान, पत्रकारिता, राज्याचा इतिहास उलगडणारे साहित्य असे विविध ग्रंथ विद्यार्थ्यांना पहायला मिळाली.

सेवा पंधरवडा काळात ९५ टक्के अर्ज निकाली; अर्ज निकाली काढण्याची मोहिम सुरूच ठेवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई, दि. १७ : राज्यात दि. १७ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवडा कालावधीत विविध १४ सेवा आणि पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणांचा ९५ टक्के निपटारा करण्यात आला आहे. या मोहिमेत एकूण ८३ लाख ५७ हजार २१८ प्रलंबित अर्जांपैकी ७९ लाख ४५ हजार २२ अर्ज निकाली काढण्यात आले. याबद्दल आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन करीत यापुढेही प्रलंबित अर्जांवर मोहिम स्वरुपात कार्यवाही करून सामान्यांना दिलासा देण्याचे निर्देश दिले.

सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला होता. या पंधरवड्याच्या पहिल्या टप्प्यानंतर दि. ३ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत दुसरा टप्पा राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले होते.

दि. १० सप्टेंबरपर्यंत प्रलंबित असलेल्या एकूण ४९ लाख १८ हजार १०९ अर्जांपैकी ४६ लाख ५२ हजार २६० अर्ज निकाली काढण्यात आले तर विविध पोर्टल प्राप्त झालेल्या ३४ लाख ३९ हजार १०९ प्रलंबित अर्जांपैकी ३२ लाख ९२ हजार ७६२ अर्ज निकाली काढण्यात आले. एकूण निकाली काढण्यात आलेल्या अर्जाची टक्केवारी ९५.६ टक्के एवढी आहे.

राज्यात मोहिमेत समाविष्ट १४ सेवांशी संबधित अर्ज मोठ्या प्रमाणावर निकाली काढण्यात आले. यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण, तांत्रिक अडचणींमुळे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, फेरफार नोंदीचा निपटारा करणे, शिधापत्रिकांचे वितरण,विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अतंर्गत सिंचन विहिरी करिता अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्योची ऑनलाईन नोंदणी करणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मजूर करणे (अपिल वगळून),दिव्यांग प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे अशा सेवांचा समावेश करण्यात आला होता.

राहुल गांधींनी दाखवला थेट स्वातंत्र्यवीरांचा माफीनामा

0

 अकोला-सावरकरांनी इंग्रजांना माफीचे पत्र लिहिले होते, यावर मी ठाम आहे, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत सावरकरांचे माफीचे पत्रच माध्यमांसमोर दाखवले.तसेच, हे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरसंघलाचक मोहन भागवत यांनाही दाखवा, असेही राहुल गांधी म्हणाले.भारत जोडो यात्रा या कारणावरून थांबवावी असे सरकारला वाटत असेल तर त्यांनी ती थांबविण्याचा प्रयत्न करावा असेही ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी सांगितले की, पत्रात सावरकरांनी इंग्रजांना उद्देशून असे लिहिले आहे की, ‘सर मै आपका नौकर रहना चाहता हूँ’. या पत्राच्या खाली वीर सावरकर यांची स्वाक्षरीही आहे. ही स्वाक्षरी केल्यानंतर सावरकरांनी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांनाही अशी सही करण्यास सांगितले होते. असे म्हणून सावरकरांनी सर्व देशासोबत तसेच तेव्हा स्वातंत्र्यलढ्यात असलेल्या काँग्रेसशी विश्वासघात केला होता.

भारत जोडो यात्रा रोखून दाखवा

स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात वक्तव्य केल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींसह ठाकरे गटावर टीका केली आहे. तर, मनसे प्रमुख राज ठाकरेंनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. यावर राहुल गांधी म्हणाले, सरकारला भारत जोडो यात्रा रोखायची असेल तर रोखून दाखवावी. भारत जोडो यात्रेला सर्वसामान्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. विचारांशी लढाई विचारांनी लढली पाहिजे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही यात्रा आता श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावूनच थांबेल, असा निर्धारही राहुल गांधींनी बोलून दाखवला.

विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न

राहुल गांधी यांनी सांगितले की, भारत जोडो यात्रेत शिवसेनेचेही खासदार, आमदार सहभागी झाले आहेत. यातील एका खासदाराने मला सांगितले की, शिवसेना फोडण्यासाठी एका आमदाराला 50 कोटी देण्यात आले. भाजप पैशांच्या, तपास यंत्रणांच्या जोरावर विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, देशात अजूनही चांगले लोक आहेत. जे विकाऊ होते ते विकले गेले, इतर चांगली लोक आमच्यासोबत येतील.

भाजप नेते शेतकऱ्यांवर बोलत नाही

राहुल गांधी म्हणाले, सध्या देशात अनेक प्रश्न आहेत. देशात महागाई आहे. तरुणांना रोजगार नाहीत. हाती उत्पन्न येत नसल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकरी वेळेत पीक विमा भरतात. मात्र, त्यांना पैसे मिळत नाही. त्यांचे कर्ज माफ होत नाही. ऐन संकटाच्या काळात त्यांना मदत मिळत नाही. मात्र, भाजपचे नेते शेतकऱ्यांवर काहीच बोलत नाही. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप धार्मिक मुद्दे पुढे आणतो. जनतेच्या प्रश्नावर आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी यात्रेशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सर्वसामान्यही यात्रेत अपेक्षेने येत आहेत.

सर्वसामान्य प्रचंड अडचणीत

राहुल गांधी म्हणाले, सत्ताधारी पक्षाकडून केवळ तपास यंत्रणाच नव्हे तर न्याय व्यवस्थेवरही दबाब आणला जात आहे. या घटनात्मक समस्यांशिवाय देशात सर्वसामान्यही गंभीर समस्यांना सामोरे जात आहे. तरुणांना सध्या नोकरी मिळण्याची शाश्वती राहिली नाही. शिक्षणासाठी मोठा पैसा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे गोरगरीब चांगल्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आरोग्याच्या सुविधेसाठी खर्च करावा लागत असल्याने सामान्य हवालदील झाले आहेत. तरी देशात सरकारी शाळा, सरकारी दवाखान्यांऐवजी खासगीकरणाला चालना दिली जात आहे. सर्व पैसे उद्योगपतींकडे कसे जातील, याकडेच सरकारचे अधिक लक्ष आहे. या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठीच भारत जोडो यात्रा सुरू केल्याचे राहुल गांधी म्हणाले.

वैद्यकीय मदत कक्ष पोहचवण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत

मुंबई दि. १७ – जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मदत पोहचवण्याचा संकल्प करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या निर्देशानुसार कक्षाचे कार्य सुरु असून अवघ्या चार महिन्यातच १ हजार ०६२ रुग्णांना ६ कोटी ४० लाखांची मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सर्वांना चांगले वैद्यकीय उपचार मिळवून देणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्दीष्ट आहे. त्यानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे काम सुरू आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी मदत देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही उपलब्ध आहोत, असे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायता कक्ष वेगाने कामाला लागला आहे. मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली या कक्षाच्या कामाच्या पद्धतीत, मदतीचे निकष यात अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या माध्यमातून कक्षाचे काम अधिक लोकाभिमुख करण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करत गरजूंना मदतीसाठी अर्ज करणे सोपे व्हावे यासाठी mahacmmrf.com हे संकेत स्थळ सुरु करण्यात आले आहे. तसेच रुग्णांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नवीन आजारांचा समावेश

मुख्यमंत्री सहायता निधीच्या निकषात यापूर्वी समावेश नसलेल्या अनेक खर्चिक आजारांचा समावेश करण्यात आला आहे. यात फुफ्फुसाची शस्त्रक्रिया, गुडघे बदल, खुबा बदल शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. तसेच अपघातामधील रुग्णांनाही या योजनेतून आर्थिक मदत दिली जाणार आहे.

तसेच जन्मत: कर्णबधिर मुलांच्या कॉक्लिअर इंप्लांट शस्त्रक्रियेसाठी तीन लाख रुपये या योजनेतून मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक मदत देण्यासाठी पाच प्रकारचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. यात ह्रदय शस्त्रक्रिया, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोनमॅरो व ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. गुडघा वा खुबा बदल शस्त्रक्रिया, मेंदू रोग, कर्करोग, लहान बालकांचे आजार, अपघातातील शस्त्रक्रिया आदीसाठी एक लाख रुपयांपर्यंत मदत केली जाईल तर डायलिसिस, केमोथेरपी, जळीत रुग्ण, अस्थिबंधन आदींसाठी ५० हजार रुपये मदत मिळेल. या शिवायच्या अन्य आजारांसाठी आवश्यकतेप्रमाणे २५ हजार रुपये मदत दिली जाणार आहे.

स्त्री उद्योजिकांकडून सणासुदीच्या हंगामात कर्जाच्या मागणीत दुप्पट वाढ – निओग्रोथ सर्वेक्षण

फॅशन, जीवनशैली आणि एफ अँड बी अशा क्षेत्रांमुळे जुलै ते ऑक्टोबरदरम्यान स्त्रियांतर्फे चालवल्या जात असलेल्या एमएसएमईजमध्ये कर्जाच्या मागणीला चालना

मुंबई१७ नोव्हेंबर २०२२ – निओग्रोथ या भारतातीला आघाडीच्या आणि मायक्रो, स्मॉल व मीडियम एंटरप्राइजेसवर (एमएसएमईज) भर देणाऱ्या एनबीएफसीने आज एका सर्वेक्षणाचे अनावरण करत २०२२ मधील सणासुदीच्या हंगामात स्त्रियांतर्फे चालवल्या जाणाऱ्या एमएसएमईजकडून येणाऱ्या कर्जाच्या मागणीत कोविडपूर्व काळातील जुलै ते ऑक्टोबर २०१९ च्या तुलनेत दुप्पट वाढ झाल्याचे दाखवून दिले.

स्त्रियांतर्फे चालवल्या जाणाऱ्या लहान व्यवसायांकडून येणाऱ्या कर्जाच्या मागणीत झालेल्या दुप्पट मागणीमागे अर्थव्यवस्था सुरळीत होत असताना ग्राहकांकडून येत असलेली दमदार मागणी व गेल्या दोन वर्षांत सणांच्या निमित्ताने अभावाने करण्यात आलेला खर्च ही प्रमुख कारणे आहेत.  

निओग्रोथच्या माहितीनुसार २०२२ मध्ये बेंगळुरू, हैद्राबाद आणि मुंबईत स्त्रियांतर्फे चालवल्या जाणाऱ्या एमएसएमईजकडून कर्जाची सर्वाधिक मागणी आली.

ऑक्टोबरमध्ये संपलेल्या सणासुदीच्या हंगामात स्त्री कर्जदारांमध्ये इतर क्षेत्रांच्या तुलनेत फॅशन व जीवनशैली, एफ अँड बी, एफएमसीजी आणि रिटेल क्षेत्राकडून कर्जास जास्त चांगली मागणी मिळाली.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) जारी केलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर २०२२ मध्ये युपीआय व्यवहारांची संख्या वार्षिक पातळीवर ७३ टक्क्यांनी वाढली. हे ग्राहक त्यांच्या खर्चासाठी डिजिटल माध्यम वापरत असल्याचे निदर्शक आहे. या महिन्यात भारतीयांनी ७.३ अब्ज युपीआय व्यवहार केले.

निओग्रोथचे संपूर्ण वेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरूण नायर म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत भारताने वेगवेगळ्या डिजिटल पेमेंट्स पद्धतींमध्ये मोठे स्थित्यंतर अनुभवले आहे. डिजिटल पेमेंट्सचा सोयीस्करपणा आणि वाजवीपणा यांमुळे यंदाच्या सणासुदीतील मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली. कोविड- १९ मुळे दोन वर्ष अतिशय निराशाजनक गेल्यानंतर हा हंगाम संपूर्ण क्षेत्रासाठी सकारात्मक ठरला. पॅन भारतातील ग्राहकांची उत्साही मागणीमुळे विविध व्यवसाय क्षेत्रांत कार्यरत असलेल्या आणि कर्जाची मागणी करणाऱ्या स्त्री एमएसएमईजचे प्रमाण वाढल्याची नोंद आम्ही केली.’

सणांच्या निमित्ताने ३०,००० एमएसएमईजकडून आलेल्या कर्जाच्या मागणीचे विश्लेषण करण्यासाठी आम्ही २०१९ मधील कोविड पूर्व जुलै ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीची या वर्षातील याच कालावधीशी तुलना केली.

२०१९ प्रमाणेच २०२२ मधील सणांच्या कालावधीत मिळालेल्या कर्जाच्या एकंदर मागणीत प्रमुख शहरे आघाडीवर होती. निओग्रोथच्या डेटानुसार २०२२ मध्ये कर्जाची सर्वाधिक मागणी करणाऱ्या पहिल्या तीन शहरांत बेंगळुरू, हैद्राबाद व मुंबईचा समावेश होता. त्याशिवाय विजयवाडा, अहमदाबाद आणि कोलकाता या शहरांतूनही चांगली मागणी मिळाली.

एफएमसीजी आणि रिटेल क्षेत्रातील एमएसएमईजकडून २०२२ च्या सणांच्या काळात २०१९ च्या याच कालावधीच्या तुलनेत कर्जाची दुप्पट मागणी आली. ग्राहकोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर्सकडून येणाऱ्या कर्जाच्या गणीत ७० टक्के वाढ झाली. त्याशिवाय फॅशन, जीवनशैली क्षेत्रात या वर्षी एमएसएमई कर्जात २०१९ च्या तुलनेत ४० टक्क्यांची वाढ झाली.

निओग्रोथ भारतातील २५ शहरांतील ७०+ क्षेत्रांच्या कर्जाच्या गरजा पूर्ण करते. कंपनीने आतापर्यंत १ अब्ज डॉलर्स कर्जाचे वाटप करत १ लाखापेक्षा जास्त नागरिकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम केला आहे.

नितीन गडकरी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमध्ये सिलीगुडी येथे,1206 कोटी रुपयांच्या 3 राष्ट्रीय महामार्ग (एनएच) प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी

0

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2022

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पश्चिम बंगालमध्ये सिलीगुडी येथे, 1206 कोटी रुपयांच्या 3 राष्ट्रीय महामार्ग (एनएच) प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी झाली. यावेळी खासदार  राजू बिश्त, जयंत कुमार रॉय, केंद्रीय आणि राज्यातील अधिकारी उपस्थित होते.

आज उद्घाटन केलेल्या प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय महामार्ग एनएच-31 (उडलाबारी) वर  615.5 किमीवरील लेव्हल क्रॉसिंगच्या जागी दुपदरी  पुलाचा समावेश केला  आहे त्या पुलामुळे आणि  राष्ट्रीय महामार्ग  एनएच-31 (मायनागुरी) वरील 661.100 किमीच्या लेव्हल क्रॉसिंगच्या ऐवजी बांधल्या जाणाऱ्या  पुलामुळे आंतरराष्ट्रीय संपर्काला  लक्षणीय चालना मिळेल, असे गडकरी यांनी सांगितले.  सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे येथील  अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि त्याबरोबरच  प्रवासाचे अंतर आणि वेळ कमी होण्यास  मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पांच्या पूर्ततेमुळे पश्चिम बंगाल आणि देशाच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये  औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल आणि कृषी क्षेत्राकडे लक्षणीय वाटचाल होईल, असे गडकरी म्हणाले.

सिलीगुडीतील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून , आज राष्ट्रीय महामार्ग  एनएच-31 (नवीन एनएच-10) च्या चौपदरी / सहापदरीकरणासाठी  569.258 किमी  ते  581.030 किमी  (शिवमंदिर ते सेवोके आर्मी कॅन्टोन्मेंट जवळ एनएच- 31 वर एएच -02 प्रकल्पाच्या  शेवटी) दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांच्या विकासासाठी पायाभरणी करण्यात आली. त्यामुळे  ईशान्य भारताचा  नेपाळ, भूतान आणि बांगलादेश सारख्या शेजारील देशांशी संपर्क  वाढेल.

छोटा राजन दुहेरी हत्येच्या आरोपांतून पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त

0

 मुंबई- – छोटा राजन आणि त्याच्या चार साथीदारांची 2009 सालच्या दुहेरी हत्येच्या आरोपांतून पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.छोटा राजन विरोधात पुरावे गोळा करण्यास सरकारी यंत्रणांना अपयश आले आहे. त्यामुळे छोटा राजन या गुन्ह्यातून मुक्त झाला आहे.

न्यायालयाने यावेळी निकाल देताना यंत्रणांना खडे बोल सुनावले. राजन विरोधात गुन्हा सिद्ध करण्यास तपास यंत्रणांना अपयश आल्याचा ठपका यावेळी न्यायालयाने ठेवला. यातील महत्वाची बाब म्हणजे छोटा राजन या चौथ्या प्रकरणातून निर्दोष मुक्त होत आहे. या चारही आरोपांत न्यायालयात सबळ पुरावे सादर करण्यास यंत्रणांना अपयश आले. त्यामुळे या चार प्रकरणांतून राजन निर्दोष सुटला आहे. राजनवर आणि त्याच्या टोळीतील साथीदारांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच राजन हा भारतातील आघाडीच्या दहा गुन्हेगारांपैकी एक आहे. 25 ऑक्टोबर 2015 रोजी राजनला बाली (इंडोनेशिया) येथून अटक करण्यात आली होती.

राजनवर 30 ऑक्टोबर 1999 रोजी दहिसर परिसरात एका व्यापाऱ्याच्या हत्त्येसंबंधी दहिसर पोलीस
ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.यानंतर आरोपपत्र दाखल केल्यानंतर राजन फरारी आरोपी म्हणून या गुन्ह्यात नोंद होता.1999 साली दहिसरमधील व्यापारी नारायण पुजारी याच्याकडून खंडणी वसुलीचा प्रयत्न करताना राजनच्या टोळीतील चौघांनी त्या व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली होती. 2015 साली राजनला बालीतून अटक केल्यावर त्याच्यावर सर्व गुन्ह्याची सुनावनी न्यायालयात सुरु आहे.

आरआर काबलतर्फे १ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमातील केबल स्टार्स विजेत्यांची घोषणा

~ ब्रँडने महाराष्ट्रातून शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी केली २०० हून अधिक विजेत्यांची घोषणा

पुणे- आरआर ग्लोबल या १.२५ अब्ज अमेरिकन डॉलर मूल्य असलेल्या  समूहाचा एक भाग असलेल्या आणि भारतातील आघाडीची वायर आणि केबल उत्पादक कंपनी आरआर काबलने  महाराष्ट्रातील केबल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रम विजेत्यांची घोषणा केली. भारतभरातील १०१२ विजेत्यांपैकी पुण्यातील १४२ आणि मुंबईतील १११ विजेत्यांना मुंबईत आरआर काबल  कार्यालयात आणि त्यानंतर पुण्यात १९ नोव्हेंबर २०२२ रोजी कार्यक्रमात आयोजित पुरस्कार सोहळ्याद्वारे संबंधित शहरांमध्ये सन्मानित करण्यात आले. 

ज्या इलेक्ट्रिशियनच्या मुलांनी या वर्षी त्यांची १० वी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांच्यासाठी केबल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. सक्षम आणि शिक्षित भारतासाठी प्रयत्न करण्याच्या ब्रँडच्या दृष्टीकोनाचा हा एक भाग आहे. आरआर काबल घरातील वायरच्या प्रत्येक बॉक्सच्या विक्रीतून १ रुपयाचे योगदान देते. याच योगदानातून या शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत इलेक्ट्रिशियनच्या मुलांच्या उच्च माध्यमिक शिक्षणासाठी १ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. संपूर्ण भारतातून १,०१२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे आणि त्यांना प्रत्येकी १०,००० रुपये शिष्यवृत्ती मिळत आहे.

या शिष्यवृत्ती कार्यक्रमाबद्दल बोलताना आरआर ग्लोबलच्या संचालिका श्रीमती कीर्ती काबरा म्हणाल्या, “केबल स्टार्स शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या सर्व विजेत्यांचे मी त्यांनी त्यांच्या आयुष्यात हा महत्वाचा टप्पा गाठल्याबद्दल अभिनंदन करू इच्छिते. त्यांच्या उद्दिष्टांच्या दिशेने ते एक पाऊल पुढे टाकत आहेत. आरआर काबल मध्ये आम्ही इलेक्ट्रिशियनना आमच्या समुदायाचा एक अविभाज्य भाग मानतो आणि आमचे उपक्रम या समुदायाच्या कल्याणासाठी योगदान देण्याकरता समर्पित आहेत. केबल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा उद्देश इलेक्ट्रिशियन बंधुवर्गासाठी व्यवसायाच्या पलीकडे जात काहीतरी करणे हा होता. आपल्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे की या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याचे निकालही अभूतपूर्व लागले आहेत. दहावीच्या परीक्षा कोणत्याही मुलाच्या करिअरमध्ये निर्णायक घटक असतात. त्यांच्या आयुष्यातील हा एक टप्पा असतो जिथे ते त्यांच्या उर्वरित भविष्याचा पाया रचतात आणि आम्हाला या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग व्हायचे होते. हे जाणून घेणे प्रेरणादायी आहे की काही विजेत्यांनी त्यांच्या परीक्षेत ९०% आणि त्याहून अधिक गुण मिळवले आहेत. प्रत्येक केबल स्टारने पुढील शिक्षण घ्यावे आणि त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे अशी आमची इच्छा आहे.  अशा कार्यक्रमांद्वारे आम्ही आजच्या तरुणांना उद्याचे नेते बनण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न करतो.”

आरआर काबलकडून ही शिष्यवृत्ती मिळाल्याने सर्व विजेत्यांना खूप आनंद झाला. त्यांचा प्रवास आणि त्यांच्या योजनांबद्दल जाणून घेणे प्रेरणादायी होते. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे करिअर निवडण्यास मदत करणे हा होता जिथे ते त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू शकतील आणि त्यांच्या भविष्याची मजबूत सुरुवात करू शकतील.

होंडा रेसिंग इंडिया टीम थायलंडमधील 2022 एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या अंतिम संघर्षासाठी सज्ज

पुणे-चँग इंटरनॅशनल सर्किट (थायलंड), १७ नोव्हेंबर २०२२ – आशियातील सर्वात अवघड रोड रेसिंग चॅम्पियनशीप या वीकेंडला अंतिम टप्प्यावर पोहोचणार आहे. होंडा रेसिंग इंडियाची प्रमुख जोडी राजीव सेतु आणि सेंथिल कुमार थायलंडमधील चँग इंटरनॅशनल सर्किटवर आशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या (एआरआरसी) अखेरच्या संघर्षासाठी पोहोचले आहेत.

होंडा रेसिंग इंडिया टीम एशिया प्रॉडक्शन २५० सीसी (एपी२५०) क्लासच्या एकूण १४ टीम्सपैकी आघाडीच्या ९ टीम्समध्ये पोहचली आहे. २०१८ मध्ये पर्दापण केल्यापासून सातत्याने सुधारणा दाखवत टीमने मौल्यवान पॉइंट्स मिळवले असून उद्घाटनाच्या सीझनमध्ये ६ पॉइंट्सवरून टीम २०१९ च्या अंतिम सीझनमध्ये ३५ पॉइंट्सपर्यंत पोहोचली आहे. सातत्याने आपला मार्ग उंचावत टीम एकूण ४२ पॉइंट्ससह आता २०२२ च्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे.

आगामी फेरीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या ब्रँड आणि कम्युनिकेशन विभागाचे ऑपरेटिंग अधिकारी श्री. प्रभू नागराज म्हणाले, एआरआरसीचा २०२२ सीझन आमच्या रायडर्सना खूप काही शिकवणारा ठरला. चँग इंटरनॅशनल सर्किटवर आम्ही या चॅम्पियनशीपची सुरुवात केली आणि आमच्या रायडर्सनी चांगले पॉइंट्स मिळवले. रेसिंगच्या ४ अवघड फेऱ्यांनंतर सर्किटवर परत येताना मला खात्री वाटतेकी आमचे रायडर्स आधीच्या फेऱ्यांमधे मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करून टीम तसेच देशासाठी जास्त चांगली कामगिरी करतील. होंडा रेसिंग इंडिया थाई आव्हानाचा सामना करत या वीकेंडला सरस कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे.

होंडा रेसिंग इंडियाचे अनुभवी रायडर राजीव सेतु ३१ पॉइंट्ससह एपी २५० क्लासच्या शेवटच्या फेरीत सहभागी झाले आहेत. राजीव यांनी कायमच चँग इंटरनॅशलल सर्किटवर चांगली कामगिरी केली आहे. २०१८ मध्य त्यांनी आपला पहिला आंतरराष्ट्रीय पॉइंट्स इथेच मिळवला होता. २०१९ मध्ये एआरआरसीच्या तिसऱ्या फेरीत इथेच त्यांनी टॉप ७ क्वालिफाइंग फिनिश – पहिल्यांदाच भारतीय रायडरद्वारे मिळवले होते. २०२२ सीझनमच्या पहिल्या फेरीत त्यांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्यांना फिनिशसाठी ११ वे स्थान मिळाले. एपी२५० क्लासमध्ये ते २४ रायडर्सपैकी टॉप १५ रायडर्समद्ये असून या वीकेंडला आणखी वरचे स्थान मिळवण्यासाठी सज्ज आहेत.

दरम्यान राजीव यांच सहकारी सेंथिल कुमार यांच्यासाठी हा ट्रॅक परिचित आहे. इथेच त्यांनी थायलंड टॅलेंट कपमध्ये आपले आंतरराष्ट्रीय पर्दापण केले होते आणि २०१९ एआरआरसीच्या तिसऱ्या फेरीत त्यांनी टॉप २० मध्ये फिनिश केले होते. या सीझनच्या पहिल्या फेरीत त्यांनी इतर आंतरराष्ट्रीय रायडर्सना मागे टाकत १३ व्या स्थानावर रेस संपवत आतापर्यंतचे सर्वोत्तम फिनिश मिळवले होते. चौथ्या फेरीनंतर सेंथिल यांच्याकडे ११ पॉइंट्स असून ते टॉप १९ रायडर्समध्ये समाविष्ट आहेत. २०१९ मधील एकंदरीत ३० व्या स्थानापासून ही चांगली सुधारणा आहे.

चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीसाठी उत्सुक राजीव सेतु म्हणाले, ‘आम्ही चॅम्पियनशीपच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचलो आहोत आणि चँग इंटरनॅशनल सर्किटवर होत असलेल्या या शेवटच्या फेरीत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या सर्किटवर पूर्वीही रेसिंग केले असून मला चांगल्या कामगिरीची खात्री आहे. वैयक्तिक पातळीवरही मी जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवत लीडर  बोर्डवर आघाडीचे स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेन.’

आपले विचार व्यक्त सेथिंल कुमार म्हणाले, ‘या सीझनने माझ्या ज्ञानात मोलाची भर टाकली आहे. आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल मी आनंदी असून गेल्या वर्षाच्या तुलनेत मी जास्त पॉइंट्स मिळवून अधिक चांगले स्थान संपादन केले आहे. यावर्षी चँगवर मी टॉप १३ मध्ये फिनिश केले होते. शेवटच्या फेरीसाठी परत एकदा चँगवर रेसिंग करण्यासाठी मी उत्सुक आहे आणि देश व टीमसाठी मी अधिक चांगल्या स्थानावर सांगता करेन अशी आशा आहे.’

चँग इंटरनॅशनल सर्किटवर २०२२ थायलंड टॅलेंट कपची अंतिम फेरी (एशियन रायडर्ससाठी होंडाचा डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) पार पडणार आहे. चेन्नईचे कविन क्विंतल (तमिळ नाडू) आणि मलप्पुरमचे (केरळ) मोहसिन पी. होंडा भारतीय तरुण रेसर्सच्या पुढच्या पिढीचे जागतिक पातळीवर प्रतिनिधीत्व करतील.

२०२२ एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपविषयी (एआरआरसी)

एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपची २५ वी आवृत्ती ही १९९६ पासून भरवली जात असलेली आशियातील सर्वात स्पर्धात्मक रोड रेसिंग चॅम्पियनशीप आहे. २०२२ सीझनच्या एकूण फेऱ्यांची संख्या सहावरून पाचवर आली आहे. २२ मार्च २०२२ रोजी चँग इंटरनॅशनल सर्किट (थायलंड) येथे अधिकृत चाचणी आणि सीझन ओपनर नंतर तसेच सेपांग इंटरनॅशनल सर्किट (मलेशिया) येथे दुसऱ्या व तिसऱ्या फेरीनंतर स्पर्धा सेपांग इंटरनॅशनल सर्किटवर (मलेशिया) येथे परतेल. या वीकेंडला चँग इंटनरॅशनल सर्किटवर सीझनची सांगता होईल.

महिलांना न्यायालयीन लढाईत आयोग देणार साथ – राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर

0

मुंबई दि. १७ : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मुंबईतील मुख्यालयात महिलांना विनामूल्य कायदेविषयक सल्ला देणारे केंद्र (लीगल एड क्लिनिक) सुरु करण्यात येणार असून यामुळे पीडित महिलांना न्यायालयीन प्रकरणांमध्ये आयोगाकडून तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि तत्पर मदत मिळेल, असे आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

दि. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणार्या कार्यक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आयोगाच्या सदस्य ॲड. संगीता चव्हाण, ॲड. सुप्रदा फातर्पेकर, गौरी छाब्रिया, सदस्य सचिव श्रद्धा जोशी, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव डी. पी. सुराणा उपस्थित राहणार आहेत. यावेळी  दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोग कार्यालयातील कायदेविषयक सल्ला केंद्राचे (लीगल एड क्लिनिक) लोकार्पण होणार आहे. जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, मुंबई उपनगरच्या अध्यक्ष स्वाती चौहान या महिलांच्या कायदेविषयक साक्षरतेचे महत्व याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

या उपक्रमाबाबत माहिती देताना श्रीमती चाकणकर म्हणाल्या की, महिलांच्या कायदेशीर लढाईत आयोगाची सोबत असावी या जाणिवेने हे कायदेविषयक सल्ला केंद्र (लीगल एड क्लिनिक) सुरु करण्यात येत आहे. या सल्ला केंद्राच्या माध्यमातून महिलांविषयक कायद्यांची माहिती, त्यांचे हक्क, न्यायालयातील प्रक्रिया याची माहिती महिलांना दिली जाईल. कागदपत्र तयार करण्यासाठी तज्ज्ञ वकीलांचे मार्गदर्शन मिळेल. प्रत्यक्ष न्यायालयात जाण्यापूर्वी आयोग स्तरावरच महिलेला न्याय मिळावा यासाठी कायदेविषयक सल्ला केंद्र प्रयत्नशील राहणार असल्याचे श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.